संस्कृती

संत अन स्त्रीरुप

सर्वात आधी हे स्पष्ट करते की मी कोणत्याही धर्माचा , सखोल अभ्यास केलेला नाही. पण एक हौस्/छंद म्हणून शीख, ख्रिश्चन, हिंदू आदि धर्मांतील गोष्टी/श्लोक वाचल्या आहेत. बर्‍याच वेळा असे आढळले आहे की - संत हे स्वतःला स्त्री (वधू) मानून परमेश्वराची (पतीची) आराधना करतात. या संदर्भात एक असे विश्लेषण ऐकले होते की परमेश्वर हा धनभारीत (देणारा दाता) असून आपण नेहमीच ऋणभारीत (घेणारे/याचक) असतो अन तो दाता - याचक
संबंध या कथा दर्शवितात.

चैतन्यमहाप्रभू देखील स्वतःला राधा समजत. त्यांनी स्वतःचे प्रतिबिंब पाण्यात पाहीले अन त्यांना राधारुप दिसले वगैरे आख्यायिका प्रचलित आहेत.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

भोजनकुतूहल - १

शीर्षकात दाखविलेले स्वयंपाक ह्या विषयावरचे ’भोजनकुतूहल’ हे पुस्तक मला DLIच्या संस्थळावर दिसले. असले विषय संस्कृत लिखाणात क्वचितच दृष्टीस येतात म्हणून कुतूहलाने ’भोजनकुतूहल’ उतरवून घेतले आणि चाळले.  त्यातून वेचलेले काही वेधक उल्लेख येथे दाखवीत आहे.

पुस्तक ’रघुनाथ’ नावाच्या लेखकाने १७व्या शतकाच्या शेवटाकडे लिहिले असावे.  त्याची मजसमोरील आवृत्ति १९५६ साली (तत्कालीन) त्रावणकोर विद्यापीठाच्या विद्यमाने मुद्रित झाली आहे.  पुस्तकाचा लेखनकाल, त्याचा लेखक रघुनाथ आणि त्याच्या अन्य कृति ह्याविषयी भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे डॉ.प.कृ.गोडे ह्यांनी केलेल्या संशोधनाचा सारांश ह्या लेखाच्या अखेरीस लिहिला आहे.

वेगवेगळे खाण्याचे पदार्थ कसे कसे करावे, त्यांच्यामध्ये कायकाय घालावे असे जे मार्गदर्शन सध्याच्या पाककृति ह्या विषयांवरच्या पुस्तकांमध्ये असते तसे ह्या पुस्तकात फार थोडे आहे.  काही ठळकठळक प्रकार कसे बनवायचे असे मार्गदर्शन देऊन त्या प्रत्येक गोष्टीचे शरीरावर काय परिणाम होतात त्याचे आयुर्वेदाच्या अंगाने विवेचन असे पुस्तकाचे स्वरूप आहे.  दिलेले प्रकारहि आजच्या पेक्षा काही फार वेगळे आहेत असे नाही.  तरीपण पुस्तक मनोरंजक वाटते ते अशासाठी की १७व्या शतकात लोक काय खात होते आणि काय खात नव्हते, कोणते अन्नघटक उपलब्ध होते आणि कोणते नव्हते ह्याचे सामाजिक इतिहासाच्या संदर्भात उपयुक्त असे दर्शन ह्यातून होते.  काही काही कृति वापरातून अजिबात गेल्या आहेत, काही काही वेगळ्या नावांनी पुढे येतात तर काही काहींचे दर्शक शब्द आता विस्मरणात गेले आहेत असे लक्षात येते.

पुस्तकाची काही प्रमुख प्रकरणे अशी आहेत:

१) शूकधान्यप्रकरण. ह्यामध्ये शूकधान्ये - शालि (तांदूळ), गोधूम (गहू), यव (जव) आणि यावनाल (ज्वारी) - ह्यांचे प्रकार.  ’शूक’ म्हणजे कणीस.  ही धान्ये कणसांमधून मिळतात.  ( पुस्तकातील वर्गीकरण हे पारंपारिक आयुर्वेदिक असून लिनेअसच्या वनस्पतिवर्गीकरणाशी काही संबंध ठेवत नाही हे ध्यानात ठेवायला हवे.). ह्या प्रत्येक धान्याचे आयुर्वेदाच्या दृष्टीने काय गुणदोष आहेत त्यांचे वर्णन सुश्रुत, भावप्रकाश, राजनिघण्टु, वाग्भट अशा ग्रंथांमधील अवतरणांच्या आधारे दिलेले आहे.  ह्यापुढे वर्णिलेल्या अन्य गोष्टींबाबतहि असेच केले आहे.

शूकधान्यांपैकी शालि आणि यावनाल ह्यांच्या अनेक पोटजाती दर्शवून त्यांना मराठीमध्ये काय म्हणतात ह्याचेहि एकेका शब्दात दिग्दर्शन आहे.  ( लेखक रघुनाथ हा मराठीभाषिक होता.  ह्याच्याविषयी पुढे अधिक माहिती येईलच.) शालिविषयात वेगवेगळ्या ग्रंथांमधून घेतलेली असे प्रकार पुढीलप्रमाणे -  राजशालि (महाराष्ट्रात रायभोग, आन्ध्रात राजान्न), कृष्णशालि (गोदातीर), रक्तशालि (तामसाळ?), स्थूलशालि अथवा महाशालि (कोळम, कृष्णा-तुंगभद्रा अंतर्वेदीमध्ये विख्यात), सूक्ष्मशालि, गन्धशालि किंवा प्रमोदक (कमोद), षाष्टिका (साठ दिवसात होणारी, मालव प्रान्तातील) आणि असेच आणखी काही.

यावनाल म्हणजे ज्वारी हिच्या उपप्रकारांमध्ये पांढरी (लटोरा, मोल्सवर्थने ह्याचा अर्थ अरगडी असा दिला आहे), तांबडी, शारद म्हणजे हिवाळ्यात होणारी (शाळू) आणि मका (मक्का, हा बालप्रिय असल्याचा उल्लेख आहे म्हणजे मक्याची कणसे भाजून खायचा उद्योग असणार) इतके प्रकार दर्शविले आहेत.  मका ज्वारीखाली टाकला आहे ह्याबाबत काही लिखाण नंतर येईल.  अखेरीस बाजरीचाहि अस्फुट उल्लेख ज्वारीखालीच केला आहे.  रघुनाथाने त्याला त्रोटकपणे ’सजगुरे’ असे म्हटले आहे आणि मोल्सवर्थप्रमाणे ह्याचा अर्थ ’बाजरी’ असा आहे.

२) शिम्बीधान्यप्रकरण - शेंगांमधून मिळणारी धान्ये.  ह्यामध्ये मुद्ग (मूग), मसूर, माष (उडीद), चणक (हरभरे), लंका (लाख) - एक गुलाबी डाळ, ही खाल्ल्याने लकवा होतो अशी समजूत आहे.  उत्तर भारतात हिचा वापर आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांमधे अधिक होतो - तुवरी (तूर), कुलित्थ (कुळीथ), मकुष्ठ (मोठ म्हणजे मटकी), तिल (तीळ), सर्षप (मोहरी), निष्पाव (वाल?), अतसी (जवस), कलाय (मटार) इत्यादींचा समावेश आहे.  ’शेंग’ हा शब्द ’शिम्बी’चाच अपभ्रंश दिसतो. शेंबी असाहि शब्द मी ऐकला आहे आणि मोल्सवर्थ इ. कोशांमधून त्याचा अर्थ ’टोपण’ अशा अंगाने दिला आहे.  तोहि येथून निघाला असावा.

३) तृणधान्यप्रकरण - ह्यामध्ये प्रियंगु (राळे), कोद्रव (हरीक), वरक (वरई), श्यामाक (सावे) अशी काही गवताच्या बियांसारखी असणारी धान्ये दिली आहेत.

४) चौथ्या प्रकरणात धान्यांपासून काही प्रक्रियेने होणार्‍या वस्तु, म्हणजे भाजून केलेल्या लाजा (लाह्या), कुटून केलेले पृथुक (पोहे), अर्धपक्व धान्ये गवतावर भाजून होलक (हुरडा), धान्य भिजवून केलेले कुल्माष (घुगर्‍या), यन्त्रपिष्ट (जात्यामध्ये धान्य भरडून केलेले) सक्तु (सत्त्व), भाजलेले चणे (फुटाणे), मिठाचे पाणी शिंपडून भाजलेले (मिठाणे), तेच तेलात तळलेले (उसळे) अशा गोष्टी आहेत.

अशा ह्या सर्व प्रकारच्या धान्यांचे उल्लेख भारतीय प्राचीन वाङ्मयात अनेकदा मिळतात.  यजुर्वेदान्तर्गत अशा प्रसिद्ध रुद्रसूक्तात सूक्तकार रुद्रांकडून ज्या ज्या अनेक गोष्टींची प्रार्थना करतो त्यांमध्ये ’व्रीहयश्च मे यवाश्च मे माषाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियंगवश्च मेऽणवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे’ अशाहि मागण्या आहेत.

५) ग्रन्थकर्ता ह्यापुढे शिजवलेल्या अन्नाकडे वळतो.  येथे नाना प्रकारचे भात, खिरी, पोळ्या, सूप म्हणजे आमटी, क्वथिका म्हणजे कढी, वटक (वडे), शिखरिणी, जिलबी, शंखपाल (शंकरपाळे), मांसाचे प्रकार, मद्य इत्यादींची वर्णने आहेत.  ह्या मनोरंजक विषयांकडे आणि उर्वरित ग्रंथाकडे पुढील भागामध्ये पाहू.

मिरची, बटाटा, भुईमुगाच्या शेंगा, टोमॅटो ह्या आजच्या मराठी - किंबहुना भारतीय -आहारातील महत्त्वाच्या घटकांचा ग्रंथामध्ये मुळीच उल्लेख नाही.  ग्रंथातील सर्वात अधिक तिखट गोष्ट म्हणजे मरीच किंवा मिरी.  तिचे उल्लेख मुबलक आहेत.  आर्द्रक म्हणजे आलेहि ह्या संदर्भात अनेकदा दिसते पण मिरची कोठेच नाही.  ह्याचे कारण असे की स्पॅनिश विजेत्यांना ह्या दक्षिण अमेरिकेतील मूळच्या गोष्टी तेथे माहीत होऊन त्या युरोपात पोहोचायला १५व्या शतकाची अखेर आली आणि तेथून त्या पोर्तुगीज-स्पॅनिश वसाहतकारांबरोबर आफ्रिका-आशियात पसरल्या.  रघुनाथाने प्रस्तुत ग्रंथ लिहीपर्यंत त्या दक्षिण भारतात पुरेशा प्रसार पावलेल्या नसाव्यात.  अपवाद दोन गोष्टींचा - मक्याचा उल्लेख यावनाल (ज्वारी) प्रकारात आला आहे हे वर उल्लेखिलेले आहे.

प्रस्तुत ग्रंथाचा लेखक रघुनाथ कोण असावा? ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये पूर्वी भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटचे बरीच वर्षे क्यूरेटर असलेले डॉ.प.कृ.गोडे ह्यांच्या संशोधनाच्या आधारे असे लिहिले आहे की हा रघुनाथ नवहस्त (नवाथे) आडनावाचा एक महाराष्ट्रीय कर्‍हाडा ब्राह्मण समर्थ रामदासांच्या परिवारात होता आणि रामदासांनी त्याला लिहिलेली पत्रे उपलब्ध आहेत.  काही काळ चाफळच्या राममंदिराच्य़ा देखभालीचे काम त्याच्याकडे होते.  नंतर १६७८च्या सुमारास तो दक्षिणेकडे भोसले घराण्याच्या तंजावर शाखेच्या आश्रयास गेला. त्याचे अन्य सात संस्कृत आणि तीन मराठी ग्रंथ माहीत आहेत.

त्याचे हा तंजावर संबंध पाहता अशी शंका घेता येईल काय की नलदमयन्तीस्वयंवराचा कवि रघुनाथपण्डित तो हाच काय?  असे मी फार सावधपणे लिहीत आहे कारण डॉ गोडेंनी असे कोठेहि सुचविलेले नाही.  परन्तु विश्वकोशामधील रघुनाथपंडितावरील लेखन आणि महाराष्ट्रसारस्वताच्या पुरवणीमध्ये डॉ.शं.गो.तुळपुळे ह्यांचे त्याच्यावरील लिखाण ह्या दोहोंमध्ये तो तंजावरला १६७५च्या पुढे गेल्याचा उल्लेख आहे, तसेच तो रामदासांच्या परिवारातील एक होता असेहि म्हटले आहे. भोजनकुतूहलकार रघुनाथ आणि नलदमयंतीकार रघुनाथपंडित ह्यांच्या चरित्रांतील हे समान दुवे पाहता ते दोघे एकच व्यक्ति असण्याची शक्यता दृष्टिआड करता येईल काय?

(नलदमयंतीस्वयंवरातील हा श्लोक, कमीतकमी त्यातील शेवटची ओळ, बहुतेकांस माहीत असते:
तदितर खग भेणें वेगळाले पळाले।
उपवन जलकेली जे कराया मिळाले।
स्वजन गवसला जो त्याजपाशी नसे तो।
कठिण समय येता कोण कामास येतो?)

धाग्याचा प्रकार निवडा: : 

तेलंगण

तेलंगणचा प्रश्नाने सध्याच्या सरकारसाठी एका चिघळलेल्या गळूचं स्वरूप धारण केलं आहे. मुळात भारतीय संघराज्य संरचनेत, स्वतंत्र राज्यांसाठी इतका टोकाचा संघर्ष करण्याची गरज पडू नये अशी लवचीकता आहे. पण तरीही हा प्रश्न चिघळतच गेला आहे. याला काँग्रेसचे सद्य सरकारच जबाबदार आहे हा निष्कर्ष आततायी ठरावा. मुळात हा प्रश्न नवा नाही किंवा "तेलंगण हे स्वतंत्र राज्य असावे का?" यावरील उहापोहही स्वतंत्र भारताला नवीन नाही. हैदराबाद संस्थान भारतात समाविष्ट केल्यापासून हा प्रश्न अस्तित्वात आहे. अर्थातच, हैदराबादच्या विलिनीकरणाच्याही आधी किंबहुना भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळापासून या प्रांताचा इतिहास आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

ऐसी अक्षरे कुल सम्मेलन, पुणे (वृत्तांतासहित)

(नवीन धागा काढण्याऐवजी याच धाग्यात वृत्तांत लिहितो आहे - राजेश घासकडवी)

धाग्याचा प्रकार निवडा: : 

मनोरमाबाई रानडे

आजच्या दिनविशेषात रविकिरण मंडळातील कवयित्री मनोरमा रानडे ह्यांचा १३ जानेवारी १८९६ हा जन्मदिन आणि १३ जानेवारी १९२६ हा मृत्युदिन अशी नोंद आहे. ती वाचून सुचलेले काही विचार.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

ऐसी अक्षरे सांस्कृतिक कट्टा १ - पुणे फिल्म फेस्टिवल

सध्या ऐसी सदस्यांसाठी कट्टा करण्याचं घाटतं आहे. त्यावरून आठवलं. ऐसी अक्षरेतर्फे काही सांस्कृतिक कट्टे व्हावेत अशी इच्छा स्थापनेपासूनच व्यक्त केलेली होती. त्यात नुसतंच कट्ट्याला भेटण्यापेक्षा काहीतरी कार्यक्रम एकत्र करावा, पहावा आणि त्याबरोबर गप्पाटप्पा व्हाव्यात अशी कल्पना होती. पुण्यात लवकरच सुरू होत असणारं फिल्म फेस्टिवल ही या दृष्टीने उत्तम संधी आहे.

सांस्कृतिक कट्ट्यांमध्ये येऊ शकणाऱ्या गोष्टी.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

समलैंगिकता

ऐसीवर मराठी विकीपीडियावर चढवण्यासाठी लेख तयार करणं या उद्देशाने 'विकीपानांसाठी' हा नवा विभाग सुरू केलेला आहे. विकीसाठी लेख तयार करणं हे दोन प्रकारे करता येईल एक म्हणजे इतर भाषांत अस्तित्वात असलेल्या पानांचं भाषांतर/रूपांतर करणं. दुसरं म्हणजे नवीन पानच सुरू करणं. या दोन्ही प्रकारांसाठी हा विभाग वापरता येईल.

भाषांतर/रूपांतर करणं हे मोठं ओझं वाटू शकतं. एखाद्या व्यक्तीला आख्ख्या लेखाच्या भाषांतरासाठी वेळ मिळेलच असं नाही. काही तांत्रिक शब्दांच्या भाषांतरावर अडून रहायला देखील होईल. त्यामुळे हे ओझं सगळ्यांनी वाटून घेतलं तर हलकं होईल. हे करण्यासाठी आम्हाला एक मार्ग सुचलेला आहे. तो असा.

Taxonomy upgrade extras: 

मुंबईतील काही रस्ते आणि जागा - भाग 3

मुंबईतील काही रस्ते आणि जागा - भाग 3 (भाग १. भाग २)

३२) फोरास रोड (आर एस निमकर मार्ग) - हे नाव कोठल्याहि साहेबाचे नसून मुंबई बेटे पोर्तुगीज अमलाखाली असण्याच्या दिवसांत ह्या शब्दाचा उगम आहे.  तेव्हा ही बेटे वसईकर पोर्तुगीज अमलाचा भाग होती. बेटावरील जमीन ज्या धारकांकडे होती त्यांचे जमिनीवरचे हक्क कशा प्रकारचे होते ह्या विषयाशी ह्या नावाचा संदर्भ आहे आणि त्याचे दोन परस्परविरोधी अर्थ लागू शकतात असे दिसते.  अशा जमिनीस पोर्तुगीज शासक ’फोरा’ जमीन असे म्हणत असत.  हा पोर्तुगीज ’फोरा’ शब्द कसा निर्माण झाला ह्याविषयी दा कुन्हा ह्यांनी विस्तृत वर्णन केले आहे परंतु त्यांच्या पुस्तकाचे जालावरील उपलब्ध पान संपूर्णपणे अवाचनीय आहे. मायकेल वेस्ट्रॉप ह्या न्यायाधीशांच्या निर्णयात ह्याच शब्दाचा वेगळा अर्थ लावला आहे.  त्या सर्व वादात अधिक न शिरता असे म्हणता येईल की १८४० नंतर वाढत्या मुंबईत किल्ल्याच्या उत्तरेस सार्वजनिक सोयी - रस्ते, नाले इ. - निर्माण करण्यासाठी सरकारला ह्या जमिनीचा काही भाग हवा होता आणि तो सरकारने कसा घ्यावा ह्याविषयी सरकार आणि जगन्नाथ शंकरशेट, दादाभाई पेस्तनजी अशा जमीनधारकांमध्ये विवाद होता.

किल्ल्याच्या उत्तरेकडील सर्वच जमीन ’फोरा जमीन’ ह्या वर्णनाखाली येते आणि त्या भागात जाणार्‍या रस्त्यांना ’फोरास रस्ते’ असे सार्वत्रिक नाव होते.  कालक्रमाने हे रस्ते जेव्हा पक्के बांधून वापरात आले तेव्हा त्यांना स्वत:ची अलगअलग नावे मिळाली आणि केवळ एकाच रस्त्याचे म्हणून हे नाव शिल्लक उरले. बेलासिस रोड (जहांगिर बोमन बेहराम मार्ग) आणि ग्रॅंट रोड ह्यांना जोडणार्‍या रस्त्यालाच काय ते हे नाव उरले आहे.  १९०९ सालच्या इंपीरिअल गॅझेटमधील नकाशात ह्याचा उल्लेख ’कामाठीपुरा रोड’ असा केला आहे. त्या नकाशाचाहि तुकडा खाली जोडला आहे.

३३) फ्लोरा फाउंटन (हुतात्मा चौक) - फ्लोरा फाउंटन हे मूळचे फ्रियर फाउंटन आणि सर बार्टल फ्रियर ह्यांच्या नावे ते विक्टोरिया गार्डनमध्ये उभे राहायचे होते.  अग्रि-हॉर्टिकल्चरल सोसायटी नावाची संस्था ह्या प्रस्तावामागे होती पण तिच्याजवळचे पैसे संपल्यामुळे त्यावेळचे क्रॉफर्ड ह्यांनी पुढाकार घेऊन त्याला सध्याच्या जागी आणले.  कर्सेटजी फर्दूनजी ह्यांची मोठी देणगीहि ह्या कामी लागली.  मूळच्या चर्चगेटच्या जागीच ते आता उभे आहे.  फाउंटनवरील फ्लोरा देवतेवरून हे नाव पडले आहे.  खालील चार स्त्रिया हिंदुस्तानात उत्पन्न होणार्‍या चार शेतमालांची प्रतीके असून डॉल्फिन्स, सिंह अशा प्राण्याच्या शिल्पांनी त्याला शोभा आणली आहे.  त्याची सध्याची दोन चित्रे आणि १८७१ मध्ये ’सायंटिफिक अमेरिकन’ नियतकालिकाच्या अंकात दिसणारे एक चित्र पुढे दाखवीत आहे. (श्रेय )

३४) जेकब सर्कल - सातरस्ता (गाडगेमहाराज चौक) -  मे.ज. सर जॉर्ज जेकब (१८०५-६१) ह्यांचे नाव मुंबई प्रांतात प्रामुख्याने सावंतवाडी, कोल्हापूर आणि काठेवाड संस्थानांमध्ये मुंबईकरांचे प्रतिनिधि म्हणून माहीत आहे.  कोल्हापुरात १८५७ च्या काळात संस्थान शांत ठेवण्याच्या कार्यात त्यांनी विशेष कर्तबगारी दर्शविली.  त्यांचे नाव मुंबईतील ह्या प्रमुख चौकास देण्यात आले होते.  चौकात सात मोठे रस्ते एकत्र मिळत असल्याने स्थानिक रहिवासी चौकास सातरस्ता ह्या प्रसिद्ध नावानेहि ओळखतात.  चौकातील कारंजे जेकब ह्यांच्या मानलेल्या मुलीने दिलेल्या देणगीतून बांधण्यात आले आहे.  जेकब हे मराठी आणि संस्कृत भाषांचे अभ्यासकहि होते.  गिरनार येथील अशोकाच्या शिलालेखाचे त्यांनी वाचन केले होते.

सर जॉर्ज जेकब (श्रेय) 


३५) कामाठीपुरा - बेलासिस रोड (जहांगीर बोमन बेहराम मार्ग), सुखलाजी स्ट्रीट, ग्रॅंट रोड (मौलाना शौकत अली मार्ग) आणि डंकन रोड (मौलाना आझाद मार्ग) ह्या मर्यादा असलेल्या भागास कामाठीपुरा असे नाव तेथे वसतीला आलेल्या कामाठी-कोमटी लोकांवरून पडले आहे.  निजामाच्या प्रदेशातील हे मूळचे लोक १८व्या शतकाच्या अखेरीच्या दिवसात कामधंद्यासाठी मुंबईत आले आणि ह्या भागात स्थायिक झाले. प्रथमपासून हा भाग निम्नस्तरातील जनतेच्या वस्तीचा आणि तेथे चालणारा वेश्याव्यवसायहि असाच त्या दिवसांपासूनचा आहे.  (१८व्या शतकाच्या पहिल्या दशकांमध्ये मुंबईत रामा कोमटी नावाचा सधन हिंदु राहात असे.  कान्होजी आंग्रे ह्यांच्याशी गुप्त संधान बांधल्याच्या आरोपावरून इंग्रजांनी १७२०मध्ये त्याच्यावर खोटा ’कांगारू’ खटला चालवून त्याला आयुष्यातून उठविले.  त्याच्याशी कामाठीपुर्‍याचा संबंध लावल्याचे मी वाचले आहे पण त्यात मलातरी काही अर्थ दिसत नाही.  ह्या खटल्याचा वृत्तान्त मुंबई उच्च न्यायालयाच्या  ह्या संस्थळावर  वाचायला मिळतो.  ह्या अनुसार हा खटला १७२० साली झाला आणि रामा कोमटी हा कोमटी नसून राम कामत नावाचा शेणवी जातीचा गृहस्थ होता.  तसेच १७८४ मध्ये महालक्ष्मीजवळ समुद्राला हॉर्नबी वेलार्ड हा बांध घालण्यापूर्वी सध्याचा कामाठीफुरा हा पाण्याखालीच होता.  ह्या दोन कारणांसाठी रामा कोमटीचे नाव कामाठीपुर्‍याशी जोडता येत नाही.)

३६-३९) केनेडी ब्रिज, मॅथ्यू रोड, फ्रेंच ब्रिज आणि गवालिया टॅंक - ही चारहि स्थाने खाली जोडलेल्या इंपीरिअल गॅझेट १९०९ मधील नकाशाच्या तुकडयात दिसत आहेत.  तसेच केनेडी, मॅथ्यू, फ्रेंच ह्या तिघांचे पुतळे पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट येथील मुख्यालयात एकत्र ठेवलेले आहेत त्याचे चित्रहि दिसत आहे.

कर्नल जे.पी.केनेडी कन्सल्टिंग एंजिनीअर म्हणून, कर्नल पी.टी.फ्रेंच हे रेल्वे कंपनीच्या संस्थापकांपैकी एक म्हणून आणि फ्रान्सिस मॅथ्यू हे चीफ एंजिनीअर आणि नंतर एजंट (मुख्य अधिकारी) म्हणून असे तिघेहि १८६० ते १८८० च्या दशकांमध्ये BB&CI रेल्वेच्या कामाशी संबंधित असे उच्च अधिकारी होते.  फ्रेंच ह्यांच्याविषयी आणखी मनोरंजक माहिती म्हणजे त्यांना हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची समज आणि गोडी असावी असे जालावरील उल्लेखांवरून वाटते.  बहुतेक इंग्रजांना पाश्चात्य संगीताची सवय असल्याने हिंदुस्तानी संगीत समजत नसे आणि कंटाळवाणे वाटे.  त्याचे कारण म्हणजे बहुतेकांची ह्या संगीताशी ओळख संस्थानिकांच्या दरबारात होणार्‍या नाचगाण्यांमधून होते आणि खर्‍या गवयांचे गाणे त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही असेहि एका इंग्रजाने लिहून ठेवले आहे.  पी.टी.फ्रेंच हे ह्या बाबतीत थोडे निराळे असावेत कारण त्यांनी मेहनतीने गोळा केलेल्या भारतीय वाद्यांच्या संग्रहाचे - जो संग्रह त्यांनी नंतर रॉयल आयरिश ऍकॅडेमीकडे सुपूर्द केला - कर्नल मेडोज टेलर  ह्यांनी केलेले परीक्षण जालावर येथे  पाहता येते.

१८५०-६० पर्यंत गवालिया टॅंक हा भाग जवळजवळ मोकळाच आणि ग्रामीण भागासारखा होता.  गवळी आणि गुराखी आपली गुरे चरण्यासाठी आणि धुण्यासाठी येथे आणत असत. हे गायीम्हशी धुण्याचे काम ज्या तलावावर चालत असे गवळी तलाव असे नाव पडले.  चालू ’गवालिया’ हे नाव मूळ नावाचे बदललेले रूप दिसते कारण १९०९ च्या नकाशात त्याचे नाव Gowli Tank गवळी तलाव असेच दर्शविले आहे.  १९०९ नंतर लवकरच हा तलाव बुजविण्यात आला कारण शेपर्ड ह्यांनी तसा उल्लेख केला आहे.  सध्याच्या नाना चौकातून केम्प्स कॉर्नरमार्गे भुलाभाई देसाई मार्ग (Warden Road) आणि एल. जगमोहनदास मार्ग (Nepean Sea Road) ह्यांच्याकडे जाणार्‍या रस्त्याला प्रथम गवालिया टॅंक रोड असे नाव होते आणि ते तसेच चालू राहिले. बुजवलेल्या तलावाच्या जागी मोकळे मैदान निर्माण झाले.  ऑगस्ट ८, १९४२ ह्या दिवशी महात्मा गांधींनी ह्या मैदानामध्ये छोडो भारत - Quit India - ही घोषणा करून स्वातन्त्र्यलढयाचे शेवटचे पान उलटले.  त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ अलीकडच्या काळात रस्त्याचे नाव ऑगस्ट क्रान्ति मार्ग आणि मैदानाचे नाव ऑगस्ट क्रान्ति मैदान असे बदलण्यात आले.  गूगल मॅप्समधील मैदानाचे चालू चित्र आणि त्यामध्ये उभारलेल्या स्मृतिस्तंभाचे चित्र खाली दर्शवीत आहे.  (श्रेय.)

४०-४३) ग्रीन स्ट्रीट, एल्फिन्स्टन सर्कल (हॉर्निमन सर्कल), हमाम स्ट्रीट (अंबालाल दोशी मार्ग). -  मुंबईतील प्रसिद्ध टाउन हॉलसमोरील जागेस ब्रिटिश दिवसांमध्ये एल्फिन्स्टन सर्कल असे नाव होते.  त्या मोकळ्या जागेचा उपयोग निर्यातीसाठी मुंबईत आणलेल्या कापसाच्या साठवणीसाठीहि केला जात असे आणि त्या कारणाने त्या मोकळ्या जागेस कॉटन ग्रीन असे म्हणत असत.  ही साठवणीची जागा कुलाब्यात नेईपर्यंत ’कॉटन ग्रीन’ एल्फिन्स्टन सर्कल मध्येच होते.  कॉटन ग्रीन तेथून हलले तरी त्याची आठवण अद्यापि  ’ग्रीन स्ट्रीट’ ह्या रस्त्याच्या नावात टिकून आहे.  स्वातन्त्र्यानंतर एल्फिन्स्टन सर्कलचे नाव बदलून ’हॉर्निमन सर्कल’ असे करण्यात आले आहे.  खालील चित्रामध्ये हमाम स्ट्रीट आणि एल्फिन्स्टन सर्कल दिसत आहे.  ग्रीन स्ट्रीट ह्या नकाशाच्या तुकडयात दिसत नाही पण हमाम स्ट्रीटपासून पश्चिमेकडे जाणारा रस्ता म्हणजे ग्रीन स्ट्रीट.  गूगल मॅप्समध्ये हा नावासकट दिसतो.

बी.जी.हॉर्निमन हे जन्माने ब्रिटिश वृत्तपत्रकार पत्रकारितेच्या व्यवसायासाठी हिंदुस्तानात आले आणि ब्रिटिश राजवटीचे विरोधक आणि स्वातन्त्र्य चळवळीचे पाठिराखे बनले.  मुंबईतील बॉंबे क्रॉनिकलचे संपादक असतांना जालियनवाला बागेसंबंधीच्या त्यांच्या लिखाणामुळे त्यांना हिंदुस्तान सोडावा लागला पण परत येऊन त्यांनी पुन: ते पत्र हाती घेतले.  १९२९ नंतर त्यांनी स्वत:चे वृत्तपत्र सुरू केले.

खाली ’बॉंबे क्रॉनिकल’चा मार्च १,१९१९ चा अंक दाखवीत आहे. (श्रेय.) अंकामध्ये मध्यभागी 'The Satyagraha Vow' अशा शीर्षकाखाली रौलट बिलाविरुद्ध महात्मा गांधींची सत्याग्रहाची घोषणा दाखविली आहे.  त्याखाली 'Mr. Gandhi's Manifesto' दिसतो.  त्याच्या शेजारी दोन कॉलम्समध्ये 'Signatories to the Pledge' अशी नावे आहेत.  डाव्या बाजूचे पहिले नाव 'Mohanadas Karamchand Gandhi, Satyagraha Ashram, SabaramatI'  आणि त्याखालचे नाव ’Vallabhbhai J. Patel, Bar-at-Law, Ahmedabad'  अशी आहेत.  उजव्या बाजूचे पहिले नाव B.G.Horniman, Editor, "The Bombay Chronicle," Bombay असे आहे.  पुढे डी.डी.साठे (गिरगावातील डी.डी.साठे मार्ग), अवंतिकाबाई गोखले (अवंतिकाबाई गोखले मार्ग), सरोजिनी नायडू अशीहि नावे दिसतात.

ग्रीन स्ट्रीटजवळच ’हमाम स्ट्रीट’ आहे.  येथे कधीकाळी असलेल्या सार्वजनिक स्नानगृहावरून ते नाव पडले.

४४) किंग्ज सर्कल स्टेशन - २०व्या शतकाच्या प्रारंभापासून मुंबईच्या वाढत्या वस्तीला राहण्यासाठी जागा आणि पाणीपुरवठा-मलनि:सारणासारख्या बाबी पुरविण्यासाठी विचार करावयास हवा अशी जाणीव मुंबई सरकार आणि महानगरपालिकेस होऊ लागली होती आणि त्यातूनच १९०९च्या सुमारास Bombay Development Committee, Bombay Improvement Trust अशांची निर्मिती झाली होती.  त्यांच्या शिफारशीतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे दादर-माटुंगा ह्यांच्या पूर्वेकडील भाग वस्तीयोग्य करणे असा होता आणि त्यामध्ये क्रॉफर्ड मार्केटपासून शीवपर्यंत १५० फूट रुंदीचा रस्ता बांधणे हा विचार समाविष्ट होता.  प्रत्यक्षात इतका मोठा रस्ता झाला नाही पण नायगाव-दादर-माटुंगा भागात विन्सेंट रोड (सध्याचा बाबासाहेब आंबेडकर मार्ग) नावाचा रुंद रस्ता बांधला गेला. विन्सेंट हे मुंबईचे पोलिस कमिशनर होते.  ह्या रस्त्याच्या शीवकडील बाजूचा शेवट एका वर्तुळाकृति बागेमध्ये झाला आणि त्या बागेस ’किंग्ज सर्कल’ असे नाव दिले गेले.  हल्ली ह्याच बागेस माहेश्वरी उद्यान असे नाव आहे पण जुने किंग्ज सर्कल एका उपनगरी स्थानकाच्या रूपाने अजून जिवंत आहे.  अंधेरी ह्या पश्चिम रेल्वेवरील स्थानकाकडे जाणार्‍या मध्य रेल्वेच्या उपनगरी गाडया हार्बर लाईनने येऊन शीव आणि माटुंगा ह्या मध्य रेल्वेच्या स्टेशनांदरम्यान पूर्व बाजूकडून पश्चिम बाजूकडे येऊन अंधेरीकडे जातात.  येथे असलेल्या स्टेशनास किंग्ज सर्कल असे नाव आहे.(किंग्ज सर्कलसंबंधित पुढील चित्रे विकिपीडियावरून घेतली आहेत.)

४५-५०) खोताची वाडी, कांदेवाडी, करेलवाडी, गायवाडी, मुगभाट, झावबाची वाडी अशा गिरगावातील छोटया गल्ल्या - खोती हे वतन कोकण प्रान्तातील पारंपारिक वतन आहे.  गावातील सरकारी उत्पन्न सरकारकडे भरण्याचा पत्कर खोत घेतो आणि त्या बदल्यात जमीन कुळाकडे कमीअधिक काळासाठी कसायला देऊन त्यांच्याकडून उत्पन्न गोळा करतो.  दादोबा वामन खोत ह्या पाठारे प्रभु व्यक्तीने ह्या भागातील खोती इनाम सरकारातून मिळविले.  त्याच्यावरून ह्या भागास खोताची वाडी हे नाव मिळाले.

कांदेवाडीमध्ये कांदे साठवण्याची वखार - godown - होती आणि शेपर्ड ह्यांच्या काळापर्यंत ती तेथे असावी असे दिसते.

करेलवाडी - हे नाव मूळचे करळवाडी असे असावे कारण तेथे मिळणार्‍या ’Karel’ जातीच्या दगडावरून हे नाव पडले आहे असे शेपर्ड लिहितात.  मोल्सवर्थच्या १८३१ च्या कोशात ’करळ’ असा शब्द असून त्याचा अर्थ ’a soft sandy stone’ असा दिला आहे.

गायवाडी - गायी ठेवण्याची जागा असा ह्याचा स्पष्ट अर्थ शेपर्ड देतात.  मुंबईत अजूनहि दोनतीन गायवाडया आहेत असे ते नोंदवतात. उदा. लेडी जमशेटजी रोडपासून माहीम बझारकडे जाणारा रस्ता.  आज हा रस्ता कोणता असावा असा तर्कच करावा लागेल.

मुगभाट - दा कुन्हा ह्यांच्या मताने ’मुंगा’ नावाचा कोळी जमातीमधील कोणी एक पुढारी व्यक्ति होऊन गेला. त्याचे ’भाट’ (शेत) ते मुगभाट.  रा.ब.जोशींच्या मते ’मुगाचे शेत’ अशा अर्थाने हे नाव पडले आहे. (मुंबादेवीच्या नावाशीहि मुंगा कोळ्याचा संबंध कोठेकोठे लावला आहे.  ’मुंगादेवी’चे ’मुंबादेवी’ असे रूपान्तर झाले असे म्हणतात.)

झावबाची वाडी हे नाव विश्वनाथ विठोजी झावबा ह्यांच्या नावावरून पडले आहे कारण १८व्या शतकात त्यांनी ही वाडी - जिचे तत्पूर्वीचे नाव रणबिल वाडी असे शेपर्ड नोंदवतात - विकत घेतली आणि ती त्यांच्या वंशजांकडे वारसाहक्काने जात राहिली.  विश्वनाथ ह्यांचे नातू विठोबा झावबा ह्यांनी तेथील ’झावबा राम मंदिर’ ह्या नावाने ओळखले जाणारे देऊळ १८८२ मध्ये बांधले.  विश्वनाथ ह्यांचे एक पणतू नारायण मोरोजी हे तेथे शेपर्ड ह्यांच्या काळापर्यंत राहात होते.

५१) लालबाग - जहाजबांधणी व्यवसायातील प्रख्यात वाडिया कुटुंबातील लवजी वाडिया ह्या मूळ व्यक्तीचे पणतू दादाभाई पेस्तनजी हे सध्याच्या लालबाग-परळ भागातील जमिनीचे मालक होते आणि तेथील त्यांच्या बंगल्याला ’लालबाग’ असे नाव होते. ओरिएंटल बॅंक १८७५ मध्ये बुडाली त्यात पेस्तनजींची बहुतेक मालमत्ता नष्ट झाली.  ही माहिती जेम्स डग्लस ह्यांच्या 'Glimpses of Old Bombay' ह्या १८७५ मध्ये छापलेल्या पुस्तकात मिळते (पान १११).  ह्यावरून मी असा तर्क करतो की त्या भागात नंतर निर्माण झालेल्या वस्तीला लालबाग बंगल्यावरून ’लालबाग’ हे नाव मिळाले असावे.

५२) लेडी जमशेटजी रोड - दादर-माहीम भागातील ह्या महत्त्वाच्या रस्त्याच्या बांधणीची कथा आर.पी.करकारिया ह्यांनी २२ सप्टेंबर १९१०च्या 'The Advocate of India' मध्ये सांगितली आणि ती शेपर्ड ह्यांनी नोंदवली आहे.  वान्द्रे आणि त्यापलीकडील भाग हा मुंबईपासून माहीम खाडीने अलग ठेवलेला होता आणि इकडून तिकडे येण्याजाण्यासाठी नावांचा वापर केला जात असे.  १८२०-३० पासून हे दोन भाग जोडून सलग करण्याचे प्रयत्न मुंबईतील सधन व्यापार्‍यांकडून चालू होते पण त्यासाठी पुरेसे पैसे उभे करता आलेले नव्हते.  खाडीमध्ये नंतर एकदा वीस नावा बुडून सर्व प्रवासी मृत्यु पावले तेव्हा सर जमशेटजी जीजीभॉय ह्यांनी सर्व खर्च स्वत: करून हे काम अंगावर घेण्याचे ठरविले.  एकूण २ लाखाहून अधिक खर्च करून हा भराव आणि रस्ता १८५४ च्या सुमारास बांधला गेला आणि जमशेटजींची पत्नी लेडी जमशेटजी ह्यांचे नाव त्या रस्त्याला देण्यात आले.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

पाने

Subscribe to RSS - संस्कृती