"बेटर कॉल सॉल"ची सांगता

...तर अशा प्रकारे सॉल गुडमनने निरोप दिला.

वॉल्ट,  स्कायलर, जेसी, हँक, माईक, गस यांच्या मांदियाळीतला हा महाआगाऊ, महाभावखाऊ गडी. त्याची कॅरॅक्टर आर्क इथे संपली.
जेसी  पिंकमनचं "काय झालं?" ते एका छोट्या सिनेमातून आलेलं होतं.  सॉलची पुनरपि जननम् पुनरपि मरणम् कथा सांगायला चांगले सहा दीर्घपल्ल्याचे मोसम पुरवलेनीत. गंमत म्हणजे पुन:पुन्हा नवा जन्म घेणारा सॉल लाक्षणिक अर्थानेच मरतो. लौकिकार्थाने मरत नाही. वॉल्ट, हँक, माईक, गस यांच्यासारखं "गोईंग आउट विथ अ बँग" त्याच्या नशीबी नाही. हेही एकंदर त्याच्या चिवटजिवटपणाशी सुसंगतच. हां, जगाकरता दरवाजा बंद करताना परत उघडणार नाही असा कडेकोट बंदोबस्त मात्र  त्याने केलानी.

वॉल्ट्प्रमाणे सॉलने जाताना हुरहूर - किमान मला - लावली नाही. म्हणजे असं की, वॉल्टचे शेवटचे एपिसोड्स - जवळजवळ सगळा शेवटाचा सीझन आणि एकंदर सर्व "वैटाकडे नागमोडणं" हेच मुळी  सोफोक्लीस, व्यास, शेक्सपियरशी नातं सांगणारं. त्यामानाने, सॉलची गोष्ट अशी एपिक प्रपोर्शनची नाही. त्याची स्वतःची अशी शोकांतिका आहे; पण तो हिरो नाही. अँटिहिरो नाही. व्हिलन नाही. शेंगेतला चोरदाणा असतो तसा. पूर्ण शेंग उलटून काढल्यावर "अरेच्चा! हाही आहे की. त्याचं काय?" अशा प्रकारचा.

तस्मात, "ब्रेकिंग बॅड"ची जशी पारायणं झाली तसं "बेटर कॉल सॉल" सारखं आपलं काही होणार नाहीये. पण तरीही त्याच्याबद्दल काय वाटतं ते तपासून पहावं इतपत मनातून नातं जोडलेलंच आहे.

ब्रेकिंग बॅडमधे सॉल जितका आगाऊ, भावखाऊ डायलॉग मारणारा, पर्यायाने विनोदी आणि त्याच्याबद्दल मॉर्बिड कुतुहल निर्माण व्हावं असा वाटावा, तसा बेटर कॉल सॉल मधे नाहीच वाटला. तसं का झालं असावं याचा मी किंचित विचार केला तेव्हा लक्षात आलं की सॉलची  बटबटीत अतिरंजित व्यक्तिरेखा ही उठून दिसत होती त्याला पार्श्वभूमी होती वॉल्टबद्दलच्या प्राचीन आर्केटाईपची, हँकच्या  उद्धट मॅस्क्युलिनिटीची, गसच्या गहनगंभीर खलत्वाची, माईकच्या "टफ अ‍ॅज नेल्स" आणि चेहर्‍यावरची रेषा न हलवता करायच्या कामगिरीची. "बेटर कॉल सॉल"मधे या सार्‍यांपैकी होता फक्त माईक. त्याची त्याची बॅकस्टोरीसुद्धा रंगवली. पण माईकच्या एकट्याच्या कहाणीमधे आणि त्याच्या अस्तित्त्वामधे ब्रेकिंग बॅडला टक्कर देईल इतपत फायर-पॉवर नव्हती.

एक गोष्ट नोंदवली पाहिजे. ब्रेकिंग बॅडच्या पाचपाच सहासहा जोरदार पुरुष व्यक्तिरेखांमधे स्कायलर येते आणि तिने केलेली तोलामोलाची कामगिरी मनात शिल्लक राहातेच. (आठवा : "यू आर अ ड्रग डिलर!" हे तिने पहिल्यांदा वॉल्टला म्हणताना अंगावर आलेला काटा. किंवा सगळे आजूबाजूला बसलेले असताना, आयुष्याची घुसमट सहन न होऊन तिने शांतपणे स्विमिंगपूलच्या खोलखोल पाण्यामधे केलेला प्रवेश..) तर इथे तशी किम येते. आणि राव काय अविस्मरणीय व्यक्तिरेखा उभी केलेली आहे. ब्रेकिंग बॅडच्या सुप्परस्टार्सच्या गर्दीत स्कायलरला स्वतःला एस्टॅब्लिश करण्याकरता जीव एकवटावा लागला असेल. "किम"ला ते करायची गरज नव्हती. सॉलच्या समोर ती सरळसरळ तुल्यबळ ठरते - अगदी तिच्या पहिल्या सिगरेट पिण्याच्या सीनपासून. किम बॉस आहे. कुठलेही प्रयास न करता.

खुद्द सॉलची उलगडलेली कहाणी, त्याचे पदर  या सार्‍या गोष्टीच मुळात मला पुरेशा इंटरेस्टिंग - किंवा योग्य शब्द वापरायचा तर कंपेलिंग - वाटल्या नाहीत.  त्याचा तो वकील भाऊ, त्याचा मानसिक विकार , "स्लिपिंग जिमी" ही सॉलची मूळ ओळख, त्यामधे गोवलेली मेक्सिकन ड्रग कार्टॅलची कथानकं - या सार्‍यामधे मला किमान ब्रेकिंग बॅडच्या तुलनेत उबवलेपणा वाटला. आता हा आमचा दोष. दुसरं काय म्हणणार.

better-call1

पण तरीही, सॉलचा निरोप घेताना "हुई मुद्दत कि 'ग़ालिब' मर गया पर याद आता है - वो हर इक बात पर कहना कि यूँ होता तो क्या होता" या न्यायाने त्याची याद येत राहील. "यूं होता तो क्या होता" याचं उत्तर मिळालेलं असलं तरी.

वॉल्ट, जेसी, सॉल, स्कायलर, किम , माईक, हँक, गस आणि बाकी सगळे परत नव्याने भेटतील असं वाटत नाही. त्यांना परत आणू नये आता. त्यांना परत आणण्याइतपत आता रसायन शिल्लक नाही.

महाकाव्याच्या सुट्यासुट्या सर्गांपैकी शेवटचा सर्ग आज संपला. ग्रंथ आटोपला.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

शेवटचा प्रसंग (काहीसा) epic करण्यासाठीही किमचीच गरज भासली! They revived their early chemistry! She's a rare gem- very well written and acted.
कोव्हिडमुळे लांबलेली शूटिंग्स, बदलावी लागणारी कथानके- ह्यामुळे आधीच्या सीझन्सनी/ ब्रेकिंग बॅड या मूळ मालिकेने ज्या अति उंचावलेल्या अपेक्षा होत्या, त्या पुर्‍या करणे ही फार tall order होती. तरीही, it had its moments!
बाकी यावर्षीच्या सगळ्याच वेब-मालिकांचा शेवटचा सीझन anticlimactic वाटतो आहे- पीकी ब्लाईंडर्सही शेवटचा भाग अधांतरी वाटेल, अशीच संपली( शेवटचे गाणे आणि white horse हे symbolism हुरहूर लावणारे होतेच, तरीही...)- मोस्लेच्या कथानकाचे सार्थ closure साठी सिनेमाची वाट बघावी लागणार, असे दिसते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The Journey Is the Reward...

आता तुम्ही म्हणताय तर बघेन; पहिले दोन सीझन झाल्यावर काही बघितलं नव्हतं.

जिमी मगिल सुरुवातीला अतिसामान्य दाखवण्याबद्दल मलाही कुतूहल वाटलं होतं. मग त्याबद्दलच कुतूहल वाटायला लागलं; हा सर्वसामान्य मनुष्य असा जोकर का, कशामुळे बनतो असं दाखवलं असेल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.