आयुराजा आणि पुरूरवा

आयुराजा - नहुष हा सोमवंशातील अतिशय प्रसिद्ध असा राजा होता. त्याने अपार पराक्रम गाजविला आणि शेवटी इंद्रपदी आरुढ झाला अशी कथा आहे. आयुराजा हे नहुषाचे वडील होते. त्यांची पत्नी इंदुमती ही देखील अत्यंत सदाचरणी आणि सत्त्वशील होती. विवाहानंतर कितीतरी वर्षे लोटली तरी त्यांना संतती नव्हती. यासाठी काय करावे अशा चिंतेत ते असताना त्यांना त्रषिमुनींनी श्री दत्तात्रेयांना शरण जा अशी सूचना तेव्हा सह्याद्री पर्वतावर जाउन श्रीदत्तात्रेयांचा ते शोध घेऊ लागले. एके ठिकाणी त्यांना एका झऱ्याकाठी श्री दत्तात्रेय शीर्षासन अवस्थेत बसलेले दिसले. अशा स्थितीत पाहून आयुराजाने दत्तप्रभूना विनम्रपणे प्रार्थना केली. तेव्हा श्री दत्तप्रभू म्हणाले अरे, मी सदाचारी नसल्याने तुझी कामना मी पूर्ण करू शकणार नाही. तरीही आयुराजा तेथून हलला नाही. तेव्हा श्री दत्तात्रेय यांनी त्याचा अपमान केला, त्याची अपशब्दांमध्ये संभावना केली आणि त्याला घालवून दिले. तरीही विचलित न होता, त्याने अंतःकरणपूर्वक श्री दत्तत्रेयांची उपासना सुरू ठेवली. अशी अनेक वर्षे गेली. शेवटी श्री दत्तप्रभू त्याचेवर प्रसन्न होऊन त्याला वर माग अशी आज्ञा केली. तेव्हा आयुराजाने श्रद्धापूर्वक वर मागितला की, कर्तव्यदक्ष, पराक्रमी, आध्यात्मिक, उदार, मानी, अजिंक्य आणि दीर्घायुषी असा पुत्र मला द्या. श्री दत्तात्रेयांनी त्याला 'तथास्तु' असा आशिर्वाद दिला आणि मग चक्रवर्ती नहुषाचा जन्म झाला.

पुरुरवा - या राजाचे गोत्र अत्री होते. एका शापामुळे तो कुरूप झाला. सर्व जण त्याच्या कुरुपतेची चेष्टा करीत असत. तो युवराज झाला. त्याचे लग्नाचे वय झाले पण त्याला कोणीही मुलगी देईना, एखादा वधुपिता त्याला मुलगी देण्याची तयारी दाखवी, पण प्रत्यक्षात मुलगी त्याचा स्वीकार करीत नसे. आपल्या रूपामुळे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पुरुरवा अतिशय निराश झाला. शेवटी त्याने ठरविले की आपण तपश्चर्या करायची. ज्या ठिकाणी अत्रि ऋषिनी तपश्चर्या केली तेथेच आपण जायचे या निश्चयाने तो बाहेर पडला. त्याने तेथे जाऊन तपश्चर्या सुरू केली. त्याला भगवान श्रीदत्तात्रेय यांनी दर्शन दिले. ते म्हणाले की, जीवनम्हणजे मायेचा खेळ आहे. ही योगमायाच आपल्याला जन्माला घालते आणि संसार क्षेत्रामध्ये खेळवते. संसार म्हणजे तिच्याच लीला आहेत. श्रीदत्तात्रेय यांनी पुरुरवाला ज्ञान आणि मंत्र दीक्षा देऊन अनुग्रह दिला आणि श्रीदेवीची उपासना करायला सांगितली. पुरुरव्याने श्री दत्तात्रेयांची आज्ञा मान्य करून देवी उपासना सुरू केली. त्याच्या प्रखर उपासनेमुळे त्याला सुंदर रूप प्राप्त झाले आणि त्याने दीर्घकाळ राज्याचा आणि ऐश्वर्याचा उपभोग घेऊन शेवटी तो दत्तचरणी लीन झाला मोक्षधामी गेला.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet