सांस्कृती आणि योगिराज

सांस्कृती - हा श्रीदत्तात्रेयांचा शिष्य होता. तो ब्राह्मण असून विद्यादानाचे कार्य करीत असे. त्याने दत्तप्रभूची उपासना केली आणि त्यासाठी मोठी तपश्चर्या आरंभिली. श्रीदत्तात्रेयांनी
त्याची अनेक प्रकाराने परीक्षा घेतली. शेवटी सर्व कसोट्यांना उतरल्यावर त्याला दर्शन दिले. त्याने दत्तप्रभूना ब्रह्मज्ञान देण्याची प्रार्थना केली. त्यांना विचारले की अवधूतांची स्थिती, लक्षणे
आणि संचारण कसे असते? तसेच योगमार्गाबद्दल आणि अष्टांग योगाबाबत अनेक प्रश्न विचारले. श्रीदत्तात्रेयांनी त्याला जी उत्तरे दिली त्याला ‘अवधूतोपनिषद' आणि 'जाबालदर्शनोपनिषद' असे म्हणतात. अवधूतोपनिषदामध्ये अवधूतांची लक्षणे आणि जीवनपद्धती यावर भाष्य केले आहे. जाबालदर्शनोपनिषद म्हणजे अष्टांग शास्त्राचे सार आहे. जीवनमुक्तीसाठी अष्टांग योग आहे.
यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी ही योगाची आठ अंगे आहेत. परमहंस पदाचेही वर्णन यामध्ये आले आहे. सांस्कृतीने श्रीदत्तात्रेयांचे वर्णन चतुर्भुज,
भगवान, योगसम्राट, सकल ऐश्वर्य पंडित, महाधिराज, महायोगी असे केले आहे.
योगिराज - ब्रम्हदेवाचे मानसपुत्र ‘अत्रि' हे पुत्र प्राप्तीसाठी पत्नीसह हिमालयात कठोर तपश्चर्या करीत होते. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन साक्षात भगवान कार्तिक पौर्णिमेस प्रकट झाले.
त्यांचे रुप स्फटिकासारखे ज्योतिर्मय होते. दत्तात्रेयांचा हा अवतार 'योगिराज' म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनी योगमार्गाचा पुरस्कार करुन लोकांना सुखी केले. म्हणून वरील नाव पडले. हा अवतार
एकमुखी चतुर्भुज व प्रत्यक्ष विष्णूप्रमाणेच होता. श्री ब्रम्हदेवांनी या सृष्टीची निर्मिती केली खरी, पण विश्वाच्या निर्मितीनंतर सर्व जीवांना त्यांच्या पूर्वीच्या कर्माप्रमाणे जे दुःख सहन करावे
लागले ते पाहून ब्रह्मदेव चिंतित झाले आणि म्हणून ते विश्वाच्या प्रभूला श्रीविष्णूना शरण आले. दत्तोहम् दत्तोहम् (मी स्वतः देतो. समर्पित करतो. शरण आलो आहे.) अशी प्रार्थना केली. सृष्टीच्या कल्याणासाठी श्रीहरी विष्णू ब्रह्मदेव यांच्यासमोर प्रकट झाले. त्यांनी ब्रम्हदेवांना योग आणि आत्मतत्त्वाचे ज्ञान देऊन चिंतामुक्त केले आणि मनःशांती देऊन त्याचा प्रचार करण्यात उद्युक्त केले. दत्तोहम् दत्तोहम् चा जो जप करेल त्यास फळ मिळेल असा आशीर्वादही दिला. हा अवतार कार्तिक पौर्णिमेला, कृत्तिका नक्षत्रावर बुधवारी, पहिल्या प्रहरी, सूर्योदयाच्या वेळी झाला. या अवताराने योगाचा प्रचार केला, म्हणून त्याला 'योगेश्वर' किंवा 'योगीराज' म्हणून ओळखले जाते. ह्या अवतारात श्रींचे स्वरूप सर्वात आकर्षक, आणि बर्फासारखे शुभ्र होते. श्रीकृष्णाप्रमाणे, त्याचे रूप एकमुखी आणि चतुर्भुज होते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet