IFFI २०२० इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग १)

सिनेमा थिएटरात जाऊन अनेक प्रेक्षकांच्या गर्दीत बसून चित्रपट बघणे, ही आता चित्रपट बघण्याची एकच रीत राहिलेली नाही. तशी ती एकच रीत कधीच नव्हती. शम्मी कपूरपासून गोविंदापर्यंत ‘धमाल’ चित्रपट बघताना थिएटरात वाजणाऱ्या शिट्या आणि टाळ्या ऐकतानाचा सामूहिक आस्वादाचा अनुभव एकटं आणि अंतर्मुख करणाऱ्या चित्रपटाच्या अनुभवापेक्षा निश्चित वेगळा. ‘ग्रॅविटी’सारखा ३-डी चित्रपट बघणं वेगळं आणि घरी सोफ्यावर बसून अमेझॉन-नेटफ्लिक्सवर थ्रिलर, रोमान्स, सायफाय बघणं वेगळं. हे वेगळेपण चित्रपटामधल्या कण्टेण्टमधून येण्याअगोदर आस्वादाच्या प्रक्रियेमुळे ठरतं. IFFI सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपट बघणे हासुद्धा त्याच प्रकारे वेगळ्या प्रकारचा अनुभव आहे. चित्रपट कसा आहे, हे माहीत होण्याअगोदरच हा वेगळेपणासुद्धा निश्चित होत असतो. असल्या महोत्सवातले चित्रपट जगभरच्या अक्षरश: शेकडो चित्रपटांमधून कुणीतरी निवडलेले असतात. त्या निवडीमागे काहीतरी चित्रपटकलेसापेक्ष चिकित्सक भूमिका असावी, अशी अपेक्षा असते. एरवी पहायला न मिळणारे चित्रपट एकापाठोपाठ एक बघण्याची ती संधी असते. सहाजिकच तिथे चित्रपट सुरू होण्याअगोदर, चित्रपटाविषयी कसलीही माहिती होण्याअगोदर एरवीपेक्षा वेगळ्या अपेक्षा मनाला वेगळ्या स्थितीत नेऊन ठेवतात.

या वर्षीचा महोत्सव नेहमीप्रमाणे गोव्यात, आयनॉक्स आणि कला अकादमी इथल्या थिएटरांमध्येच झाला. पण थिएटरातली एकाआड एक खुर्ची पट्टी घालून बाद करण्यात आली होती. परिणामी कोणाच्याही शेजारी कुठेही, कोणीही नव्हतं. आपोआप सिनेमा सुरू होण्याअगोदर, सिनेमा सुरू असताना कुजबुज ऐकू आलीच नाही. कानगोष्टी नाहीत आणि स्वीट नथिंग्जसुद्धा नाही. थिएटरं अर्धीच भरलेली असल्याने पूर्ण अंधार झाल्यावर अटळपणे ऐकू येणारे खोकले, कितीही सूचना दिल्या तरी रसभंग करत वाजणारे मोबाइल फोन यांचा व्यत्ययदेखील अगदी कमी झाला. हे सगळं आस्वादासाठी अनुकूल ठरलं, असं म्हणावं लागेल.

पण एक गोष्ट मला कबूल केली पाहिजे. गेली नऊ वर्षं मी गोव्यात जाऊन इफ्फीला हजेरी लावत आहे. जगभरच्या सिनेसंस्कृतीचं दर्शन होण्याच्या कल्पनेने हुरळून जातो आहे. पण दर वर्षी कितीही ठरवलं की चित्रपटाच्या सर्व अंगांकडे लक्ष द्यायचं, तरी ते विसरून समोर उलगडणाऱ्या चित्रपटाच्या कथनात रमून जातो आहे. संगीत, कॅमेऱ्याच्या हालचाली आणि कोन, रंगांचा वापर, वगैरे तपशिलांमुळे आशयावर कसा परिणाम होतो, याकडे लक्ष देण्याचा ठाम निश्चय करूनही ते विसरून चित्रपटाच्या प्रवाहाबरोबर वहात जातो आहे. त्या रमण्यात ज्या काही गोष्टी जाणवतात, तेवढ्या टिपतो आहे. आणि बाहेर आल्यावर काही जाणकारांच्या तोंडून ‘अमुक ठिकाणी कॅमेरा काय करतो’ याची वर्णनं ऐकून ‘अरे हो की! बरोबरच आहे; पण आपल्या लक्षात नाही आलं हे.’ असं मनात म्हणत हिरमुसतो आहे.

तेव्हा मी इफ्फीविषयी लिहिणार ते एका सर्वसाधारण आस्वादकाच्या डोळ्यांना दिसलेलं आणि कानांना ऐकू आलेलं असणार. आणि चित्रपट हे प्रामुख्याने गोष्टी सांगणारंच माध्यम आहे, या सत्यजित राय यांच्या मताशी सहमत असल्याने कथानकाला धरूनच इतर गोष्टींबाबत मतं देणार.

असो. २०२० साल जवळ जवळ संपूर्णपणे कोरोनाने खाऊन टाकलं. त्यात चित्रपटसृष्टीलासुद्धा फटका बसला. चित्रपट निर्माण होण्यालाच खीळ बसली. इफ्फीतही या वर्षी चित्रपटांची संख्या कमी होती आणि काही ‘जुने’, म्हणजे मागच्या महोत्सवांमध्ये दाखवून झालेले चित्रपटही पुन्हा दाखवण्यात आले. गोवा हे देशाचं मोठं पर्यटन केंद्र असूनही इफ्फीला परदेशी प्रेक्षक कमी असतात. पण जे काही असतात, त्यातले तुरळक अपवाद सोडता कोणी दिसलं नाही. दर वर्षी दिसणारी स्वीडनची दिग्दर्शक-फोटोग्राफरची जोडी या वर्षी नव्हती.

इतर चित्रपटांप्रमाणे ‘फेस्टिवलच्या चित्रपटां’नासुद्धा कोणत्याही विषयाचं वावडं नसलं आणि काल्पनिक भविष्यापासून प्राचीन-अर्वाचीन इतिहासापर्यंत कोणताही काळ निवडण्याचं त्यांना स्वातंत्र्य असलं तरी चित्रपट हे एक अत्याधुनिक, तंत्रज्ञानावर मोठ्या प्रमाणात विसंबणारं आणि वेगाने उत्क्रांत होत जाणारं माध्यम आहे. म्हणजेच वर्तमानकाळाचा काही का काही संदर्भ चित्रपटांमध्ये, विशेषत: महोत्सवी चित्रपटांमध्ये असतोच असतो. आजच्या वर्तमानाचा सर्वात ठळक विशेष अर्थात कोविड१९ ही जागतिक साथ. जगण्याच्या सगळ्या क्षेत्रांवर कोविडने आक्रमण केलेलं आपण अनुभवलं. इफ्फीतदेखील मास्क बंधनकारक होता. परिसरात शिरण्यापासून थिएटरात प्रवेश करेपर्यंत दोन तीन वेळा हात सॅनिटाइज करावे लागत होते. दर वर्षी मिळते तशी घट्ट विणीची मजबूत आणि लाबरुंद कापडी पिशवी नाही की त्या पिशवीत असणारी महोत्सवातल्या एकूण एक चित्रपटांची माहिती देणारी जाडजूड आणि वजनदार माहितीपुस्तकं नाहीत. कागद इफ्फीच्या आसमंतात बाद होते: तिकिटं ऑनलाइन होती, मोबाइलवर दाखवावी लागत होती, ‘पीकॉक’ हे इफ्फीचं दैनिक ऑनलाइनच होतं. या पार्श्वभूमीवर एकाही चित्रपटात कोविडचा उल्लेख नसणे खटकलं! काही महिन्यांच्या प्रभावामधून कोरोनाने आपल्या संज्ञेवर चौफेर आक्रमण केलं आहे आणि दैनंदिन जगण्यातले फारच थोडे तपशील कोरोनाच्या संदर्भाविना राहिले आहेत. त्यामुळे, कोरोना-कोविडची नावनिशाणी नसलेले हे सर्व चित्रपट वर्तमानातले नसून भूतकाळातले, इतिहासकालीन आहेत, आउटडेटेड आहेत, असं ॲब्सर्ड सुचत राहिलं. याला इलाज नव्हता; पण वर्तमानाशी अत्यंत निकटचा संबंध बाळगणाऱ्या माध्यमात वर्तमानाच्या सर्वात ठळक वैशिष्ट्याचा अभाव असणे विचित्र वाटलं.

एक खात्री आहे, की पुढच्या (नाही, याच. पुढचा, म्हणजे बावन्नावा महोत्सव २०२१ सालच्या नोव्हेंबर महिन्यात होणार आहे!) वेळी याचं उट्टं निघणार! बघू.

गेल्या काही वर्षांपासून इफ्फीतल्या चित्रपटांमधील सेक्सचं, नग्नतेचं दर्शन कमी कमी होत चाललं आहे, असं मला जाणवलं आहे. या गोष्टी पूर्ण बाद झालेल्या नाहीत; पण अगोदर जसं नग्नतेचं दर्शन नसणे हा अपवाद होता, तसं आता नसतं. आता त्च्या उलट असतं, असंही म्हणायला हरकत नाही. या मागे निवडधोरण आहे की आणखी काही की योगायोग की मलाच काहीतरी चुकीचं वाटतंय, सांगता येत नाही. महोत्सवातले सगळे चित्रपट बघणे शक्य नसतं. नेमके ‘तसले’ चित्रपट माझ्या पहाण्यातून सुटले असतील!

दोन वर्षांपूर्वी चित्रपट सुरू होण्याआधी दिसणारा मोरांचा नाच बदलला होता. नवीन होतं, ते वाईट होतं. गेल्या वेळेपासून पुन्हा मोर-लांडोरीची तीच जोडी आकाशात तरंगत्या सतरंजीवर बागडते आहे. ‘हा नाच किती चांगला आहे,’ असं सर्व प्रेक्षकांना पटवण्यात संयोजक यशस्वी झाले आहेत! मात्र, बाहेरच्या सजावटीत बऱ्याच ठिकाणचा मोर पांढरा होता. भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मिरवणारा सफेद मोर चिनी परंपरेनुसार अशुभ, दुष्ट मानला जातो, हे आठवलं. ‘कुंग फू पांडा – भाग २’ या ॲनिमेशनपटामुळे झालेलं ज्ञान! सर्वत्र पोस्टरांवरचे मोर पाहून काहींना मोदीजींची आठवण आली.

काही वर्षांपासून या महोत्सवाचं ‘यूजर फ्रेंडली’ रूप पुसट होत चाललं आहे. म्हणजे, काही बचत गटवाल्या महिला स्थानिक खाद्यपदार्थ माफक किंमतीत विकत असत. त्यांना मिळणारी जागा अगोदर कमी झाली, मग त्यांची हकालपट्टी पार दूर कुठेतरी झाली. या वर्षी त्या नव्हत्याच. खाद्यपदार्थ असोत की बिअर-चहा-कॉफी; सगळ्यांची कुपनं एकाच ठिकाणी मिळत होती आणि काहीही स्वस्त नव्हतं. गिऱ्हाइक फिरकत नाही असं पाहून बिअरचे भाव तात्काळ निम्मे करण्यात आले. तेही पूर्वीच्या तुलनेत जास्तच होते; पण पुन्हा ‘कालच्यापेक्षा बरे’ या तत्त्वाद्वारे ते लोकप्रिय झाले!

‘लोक’ कमी आले, यामुळे कुठेही गर्दी झाली नाही; थिएटरात नाही, कुठल्या स्टॉलवर नाही की परिसरातल्या बसण्याच्या जागांवर नाही. एका परीने ते सुखद वाटलं, जरी काहींना चित्रपट महोत्सवाला गर्दी नसण्यामुळे वातावरण उत्साहावर पाणी पाडणारं वाटलं. पण बघितलेल्या चित्रपटांवर चर्चा करणे, न बघितलेल्यांविषयी सल्ला मागणे, एकूण चित्रपट महोत्सव संस्कृतीवर बोलणे यातलं काहीच यावेळी करता आलं नाही. ही नक्कीच त्रुटी म्हणावी लागेल. चित्रपट महोत्सव म्हणजे नुसतं दिवसाला हावरटासारखे तीन किंवा चार (क्वचित जास्त) चित्रपट बघणे आणि आकडा वाढवून ‘पैसा वसूल’ केल्याचं समाधान मिळवणे नसतं. कधी तर फार चांगला चित्रपट बघितल्यावर पुढचा मुद्दाम सोडून द्यावासा वाटतो. पाहिलेल्या चित्रपटामधल्या एकेक गोष्टी आठवत रवंथ करावासा वाटतो. अशा वेळी आपल्यासारखं दुसरं कुणी भेटलं की एकमेकांची इम्प्रेशन्स शेअर करण्यात अवर्णनीय आनंद मिळतो. अशा चित्रपट महोत्सवाला जाण्याचं सार्थक तिथे होत असतं. उच्च दर्जाचा आनंद कधीच स्वत:शी ठेवता येत नाही. तो दुसऱ्याकडे उघड केला की वाढतो. चित्रपट, नाटक, शास्त्रीय संगीताची मैफल अशा प्रयोगकलांमधून हे उच्च कोटीचं सुख मिळतं. चित्रपटांची गोष्ट काहीशी स्पेशल. कारण चित्रपट एकूणच व्यामिश्र प्रकरण. त्यात इतर सर्वच प्रयोगकलांची अंगं थोड्याफार प्रमाणात असतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ही फार मोठी पर्वणी ठरते. दहा साधारण चित्रपट बघितल्यावर एक जरी मनाला दुथडी भरून आनंद देणारा चित्रपट मिळाला, तरी महोत्सवाला पुन्हा पुन्हा येत रहाण्याला कारण मिळतं.

गोव्यात यामध्ये ‘गोवा’ ही भारी व्हॅल्यू ॲडिशन होते. गोवा म्हणजे केवळ दारू आणि समुद्रकिनारा आणि गोरे पर्यटक नव्हे. गोवा हा मनाला शांत करणारा, मुक्त वाटवणारा प्रकार आहे. तिथलं खाणं, तिथे नुसतं निरुद्देश फिरणं यातूनही एक निवांतपणा मिळतो, जो शहरी-महानगरी जगण्यात दुर्मिळ असतो.

असो. आता एकेक चित्रपट.

१.
महोत्सवाच्या सुरुवातीलाच ‘ॲपल्स’ नावाचा एक चित्तवेधक चित्रपट पहायला मिळाला. त्यात एक विचित्र, इलाज नसलेली ‘पँडेमिक’ म्हणावी, अशी साथ होती. पण चित्रपटाचा कोविडशी संबंध अजिबात नव्हता. ही साथ अशी, की माणसं अचानक स्वत:ची ओळख विसरतात. त्यांना स्वत:च्या जगण्याविषयी काहीही आठवत नाही. त्यातल्या काहींचे नातेवाईक येऊन त्यांना घेऊन जातात; पण नातीगोती नसलेले, घरी जोरदार भांडण होऊन दुरावलेले; थोडक्यात घरच्यांना नको झालेले मागे रहातात. कसलीही आठवण नसलेल्या, स्वत:ची ओळख विसरलेल्या या लोकांचा सांभाळ करण्यापुढे त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रश्न सरकारपुढे असतो. मग एका व्यवस्थित आखलेल्या कार्यक्रमाद्वारे त्यांना काहीतरी व्यक्तिमत्व देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातून त्या व्यक्तीला आठवणी मिळतात, स्वत:मधली कौशल्यं सापडू शकतात आणि व्यक्ती पुनर्जन्म झाल्याप्रमाणे नवीन जीवन जगायला सुरुवात करते.

Apples (2020)

संपूर्ण स्मृती जाणे, ही पहिली पायरी; आख्ख्या जगात, काळाच्या पटावर पूर्ण एकटं होणे, ही दुसरी. अशा दोन पायऱ्या ओलांडून चित्रपट तिसऱ्या पायरीवर जातो, तो एकेका व्यक्तीसाठी आठवणी निर्माण करून तिला व्यक्तिमत्व मिळवून देण्याच्या, ‘वैद्यकीय देखरेखीखाली चालणाऱ्या’ अभिनव कार्यक्रमातून. अशा व्यक्तीला शासनाकडून जागा मिळते, थोडे पैसे मिळतात, कपडे मिळतात आणि रोज एक छोटी कॅसेट मिळते जिच्यात आज काय करायचं, याच्या सूचना असतात. सोबत एक कॅमेरा असतो: ते केल्याचा पुरावा म्हणून फोटो काढायला. या सूचना ‘नाच कर,’, ‘पोल डान्सिंग बघायला जा’, ‘अमुक ठिकाणी एक बाई भेटेल, तिच्याशी कॅजुअल सेक्स कर (पण तिच्यात गुंतू नकोस!)’, वगैरे प्रकारच्या, कृतीला चढत्या भाजणीवर नेणाऱ्या असतात. मग एका बाईला शीर्षासन करता येत असतं, त्याला-तिला ड्रायव्हिंग तर येत असतंच. ती त्याला एक चित्रपट पाहिल्याचं वर्णन करून सांगते. ‘टायटॅनिक’सारख्या जगभर प्रचंड गाजलेल्या आणि बहुसंख्य नागर लोकांनी मन गुंतवून पाहिलेल्या चित्रपटाचं ते वर्णन रोचक वाटतं. कोऱ्या मनाने घेतलेला दृष्यानुभव मनात कसा उतरतो, याचा वस्तुपाठ देणारं.

या चित्रपटाचं मला जाणवलेलं वैशिष्ट्य म्हणजे त्याला नॅरेशन आहे, असं वाटतच नाही. कोणी ही कथा आपल्याला सांगत आहे, असं जराही होत नाही. सतत एक गप्पपणा जाणवत रहातो. सुरुवातीपासून पडद्यावर काळोख आहे. मूड बऱ्यापैकी उदास आहे. पार्श्वसंगीताचा सूर दबता आहे. यातले डॉक्टर लोक काहीसे चैतन्ययुक्त दिसतात; अन्यथा चित्रपटभर कोणीही आवाज चढवत नाही. नायक तर अथपासून इतिपर्यंत निर्विकार, जवळपास अबोल आहे. स्मृती गमावलेल्या माणसाचं असं होईल, अशी स्वत:शी समजूत काढता काढता मध्येच गचके बसतात. पोल डान्सर एकांतात त्याच्या अंगचटीला येते, तर तो काहीच रस दाखवत नाही; फक्त तिच्याबरोबर फोटो काढून घेतो. भेटलेली बाईसुद्धा तिला मिळालेल्या सूचनांचं पालन करते आहे, तिच्या वागण्यामागे स्वयंप्रेरणा नाही, हे लक्षात आल्यावर तो तिच्याशी सेक्स टाळतो. आणि त्यात गूढता वाढवणारे तुरळक प्रसंग. सफरचंदं खाल्ल्यामुळे स्मृती जागी व्हायला मदत होते, असं कानावर पडल्याबरोबर तोवर सफरचंदच खात असलेला हा मनुष्य तात्काळ सगळी सफरचंदं परत करून संत्री घेतो!

सर्वसाधारणपणे चित्रपटाला जेव्हा नायक – प्रोटागॉनिस्ट – असतो, तेव्हा कथानक त्याच्या दृष्टीतून उलगडतं, असा अनुभव आहे. इथे गोष्ट त्याच्याबरोबर फिरली तरी त्याच्या मनाचा थांग प्रेक्षकाला ‘बाहेरून’, म्हणजे त्याच्या वागण्यावरून लावावा लागतो. त्याचे मनोव्यापार अज्ञात रहातात. भावनिकता पूर्णपणे वजा असलेला हा चित्रपट एका भावनिक शेवटाकडे येतो आणि संपतो.

चित्रपट ‘सायन्स फिक्शन’ नाही. माणसाच्या मनाचा शोध घेणाराच आहे. त्यासाठी एक वेगळी, अद्‌भुत चौकट निवडली आहे. स्मृती आणि स्वत:ची ओळख यांमधल्या नात्याचे धागे धुंडाळणारा आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी असा ‘खास महोत्सवी’ म्हणावा असा चित्रपट बघायला मिळाला!

२.
त्याच, म्हणजे पहिल्या दिवशी पाहिलेला ‘विंडो बॉय वुड ऑल्सो लाइक टू हॅव अ सबमरीन’ हासुद्धा ‘फेस्टिवलचा सिनेमा’ होता. यातदेखील फँटसी होती. मात्र याला सायन्स फिक्शन म्हणता येणार नाही. तुलना करायचीच तर या सिनेमाचा प्रवास मुराकामीच्या कादंबरीसारखा होता. सामान्य जगण्यातलं लॉजिक गुंडाळून काहीतरी भलतंच घडवणारा. चित्रपटाचा वेगही मुराकामीला साजेसा संथ होता.

Window Boy Would Also Like To Have A Submarine

समुद्रातून चाललेल्या एका लक्झरी बोटीमधल्या एका खिडक्या साफ करणाऱ्या तरुण नोकराला एक दार सापडतं, ज्यातून पलीकडे गेल्यावर लॅटिन अमेरिकेतल्या कुठल्याशा शहरातल्या एका चकाचक अपार्टमेंटमध्ये प्रवेश होतो. तिथे एक बाई एकटी रहात असते. पण बोटीला आणखी एक ठिकाण जोडलेलं असतं. फिलिपीन्समधल्या दुर्गम भागातल्या एका खेड्यापासून काही अंतरावर एकाला एक सीमेंटची शेड सापडते, जिच्यातून (बोटीच्या इंजिनमध्ये निर्माण होणाऱ्या) कंप, थरथर यांचं प्रक्षेपण होत असतं. खेडूत लोक घाबरून कोंबड्या, डुकरं यांचे बळी देत सुटतात आणि शेडवर पहारा ठेवतात. बोटीवरच्या हालचालीमुळे अपार्टमेंटमध्ये मात्र काही आवाज, कंप निर्माण होत नाही. तिथली बाई त्या तरुणाला पहाते पण घाबरत नाही की फारशी चकित होत नाही. ती उलट त्याला तिथे काम देते! एक खेडूत धीर करून शेडमध्ये शिरतो आणि तिथल्या एका दारातून बोटीमध्ये प्रवेश करतो. या सगळ्या प्रकारात ना विनोदाची निर्मिती होते ना भयाची. एकमेकांपासून पार वेगळी अशी तीन जगं एकमेकांच्या जवळ येतात आणि आपल्याला त्यांच्यातला विरोध ठळकपणे जाणवतो. या पलीकडे चित्रपट जास्त काही सांगत नाही.

चित्रपटभर प्रतिबिंबांचा मुबलक वापर केला आहे. म्हणजे, बऱ्याचदा आपल्याला पडद्यावर प्रतिबिंबच दिसत रहातं आणि काही काळाने प्रत्यक्ष माणसं, वस्तू, दिशा दिसतात. चित्रपटातून काहीतरी अर्थ काढण्याचा हट्ट सोडला, तर तीन भिन्न जगांचं तपशिलात जाऊन दर्शन देताना प्रतिबिंबांमधून त्यांच्यातली भ्रामकता समोर आणण्याचं काम हा चित्रपट करतो. असं म्हटल्यावर आणखी एक फायदा असा होतो की शेवटी बोटीत धो-धो पाणी कोसळू लागतं; पण घरात नुसतं झिरपतं, असं का, वगैरे प्रश्न बाद होतात. खेड्याभोवतीचं हिरवंगार, दाट जंगलसुद्धा जिवंत आहे.

या चित्रपटात माणसांपेक्षा कॅमेरा जास्त बोलतो. आणि नवचित्रकलेत जसा शाब्दिक अर्थ शोधू नये, ते इथेही लागू होतं.

हे दोन्ही चित्रपट त्या त्या दिग्दर्शकांचे पहिले चित्रपट आहेत. हा दुसरा बनवायला सातेक वर्षं लागली, अशी माहिती मिळते. मनात साकारलेली कला प्रत्यक्षात आणायला इतका वेळ लागणं बरोबर नाही.

या दोन चित्रपटांच्या तुलनेत त्या दिवशीचा तिसरा चित्रपट ‘पॅराडाइज’ अगदी फिका होता. त्यातल्या पात्रांच्या वागण्यात सुसंगती नव्हती (आणि विसंगतीला काही कलात्मक आधार नव्हता). मेलोड्रॅमॅटिक प्रसंगांची मालिका, असं याचं वर्णन करता येईल. महोत्सवी चित्रपट मानवी मूल्यांच्या बाबतीत सहसा चुकत नाहीत. इथे या बाबतीतही गोंधळ होता. पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्था दाखवताना त्या व्यवस्थेला अनुमोदन देणं बरोबर नाही.

तसं म्हटलं तर कल्पना इंटरेस्टिंग आहे. खून बघितलेल्या साक्षीदाराला दूर कुठेतरी सुरक्षित जागी नेऊन ठेवलेलं असतं आणि त्याला परतण्याची ओढ लागलेली असते. तशात त्याला शोध लागतो की खुनीसुद्धा तिथेच रहातो आहे आणि दोघांनी एकच नाव घेतलं आहे. दोघे भेटतात. भेटीत गोंधळतात. एकमेकांबद्दल त्यांना आकर्षण वाटतं आणि दुःस्वासही वाटतो. वगैरे. अशा कल्पनेवरचा हा चित्रपट लक्ष धरूनही नीट ठेवत नाही. शेवट तर तद्दन कमर्शियल आहे.

असो. महोत्सवातला प्रत्येकच चित्रपट थोर असायला हवा, अशी अपेक्षा ठेवायची नसते. सिसिलीमधलं कुटुंब, खून करणारा होमोसेक्शुअल असतो आणि स्वत:ला ‘फॅगॉट’ म्हणतो! यातून चित्रपट थोरपणाला मुकत असला तरी तिथली माणसं, तिथली मूल्यं यांची चुणूक मिळतेच.

(क्रमशः)

field_vote: 
0
No votes yet

वाचतोय.
छान सुरुवात. यावर्षी जास्तीजास्त चित्रपट पाहणार असे ठरवतो आहे. बघू.
आमचे जे परिचित नेहेमी जातात ते सविस्तर सांगत नाहीत. यांना काय कळतं असं म्हणत नाहीत पण त्यांना वाटू शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आढावा आवडला .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

पण एक गोष्ट मला कबूल केली पाहिजे. गेली नऊ वर्षं मी गोव्यात जाऊन इफ्फीला हजेरी लावत आहे. जगभरच्या सिनेसंस्कृतीचं दर्शन होण्याच्या कल्पनेने हुरळून जातो आहे. पण दर वर्षी कितीही ठरवलं की चित्रपटाच्या सर्व अंगांकडे लक्ष द्यायचं, तरी ते विसरून समोर उलगडणाऱ्या चित्रपटाच्या कथनात रमून जातो आहे. संगीत, कॅमेऱ्याच्या हालचाली आणि कोन, रंगांचा वापर, वगैरे तपशिलांमुळे आशयावर कसा परिणाम होतो, याकडे लक्ष देण्याचा ठाम निश्चय करूनही ते विसरून चित्रपटाच्या प्रवाहाबरोबर वहात जातो आहे. त्या रमण्यात ज्या काही गोष्टी जाणवतात, तेवढ्या टिपतो आहे. आणि बाहेर आल्यावर काही जाणकारांच्या तोंडून ‘अमुक ठिकाणी कॅमेरा काय करतो’ याची वर्णनं ऐकून ‘अरे हो की! बरोबरच आहे; पण आपल्या लक्षात नाही आलं हे.’ असं मनात म्हणत हिरमुसतो आहे.

You are doing great! इतकी वर्षे इतके चित्रपट पाहून, सगळी फेस्टीवलं पालथी घालून सुद्धा बऱ्याच लोकांना हे जमत नाही. गुंतून जाणे. त्यांच्या डोक्यात असलीच काही analytical जळमटं साचून राहतात. चित्रपटांवर समीक्षकी अंगाने सगळी कडून इतकं इतकं बोललं जातंय की बस्स. वात आणला आहे या jargon ने. उदंड झालेत हे समीक्षक, youtubers, परीक्षक, recomenders.चित्रपट पाहत असताना ह्या असल्या गोष्टी जर आपसूक notice होत असतील तर चित्रपट गंडलाय असं मी मानू लागलो आहे. ज्या तांत्रिक गोष्टी आधी अप्राप्य होत्या त्या आजकाल सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे स्थिरचित्रण, संकलन या गोष्टींची बेसिक माहिती ही lowest common denominator होऊ पाहत आहे आणि एकंदरीत दृश्यात्मक IQ वाढलेला आहे. त्यामुळे चित्रपट ही शास्त्रीय संगीतासारखी मेटाआस्वाद्य कला होऊ पाहत आहे. साहजिक हे नाकारणारी आणि storytelling मध्ये गुंतुवून ठेवणारी बलवान "मार्गी" कलाकृती खूप दुर्मिळ झालेली आहे. म्हणून तुम्हाला शास्त्रीय संगीतातूनही मार्गी emotional आस्वाद घेता येत असेल तर तुम्ही खरेतर पुढच्या पायरीवर पोचला आहात. आता फक्त पैलतीर

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला