Skip to main content

उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - ४

आधीचे भाग | २ |

आपण ऐसी अक्षरेचे सदस्य नवनवीन पुस्तके वाचत असतो, नवनवीन संगीत/व्याख्याने वगैरे ऐकत असतो, नाटके/चित्रपट/व्हिडीयो/दृकश्राव्य कार्यक्रम बघत असतो. इतकेच नव्हे, तर त्याबद्दल ऐसीवर लिहून इतरांनाही जे जे उत्तम वाटले त्याबद्दल सांगून त्याचा आस्वाद घ्यायला उद्युक्त करतो, त्याच बरोबर जे जे अनुत्तम त्याबद्दल सावधही करतो. याच बरोबर आपल्यातील अनेक पाककृती आणि छायाचित्रणातही एकत्रितपणे काहीतरी उपक्रम राबवताना दिसतात. या सगळ्यात पदार्थ बनवणार्‍याप्रमाणे जातीच्या खवैय्याकडे दुर्लक्ष होऊ नये असे वाटले आणि त्यातूनच ह्या धाग्याची कल्पना सुचली.

आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहीतरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या/नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती? हॉटेलचा अ‍ॅम्बियन्स कसा होता वगैरे हवं ते लिहू शकता. पदार्थाचा फोटो असेल तर उत्तमच.

अर्थातच हे फक्त खाण्याबद्दल नाही, तर पिण्याबद्दलही आहे

भाग ३ बराच लांबल्याने, वाचनाच्या सोयीसाठी, तेथील रुची यांच्या प्रतिसादाचे रुपांतर, नव्या भागात करत आहोत:
======================

ऐसी अक्षरेच्या श्रद्धाळू / अश्रद्ध, आस्तिक/नास्तिक, विवेकवादी/परंपरावादी, सर्वधर्मीय....सांस्कृतिकदृष्ट्या मराठी सदस्यांना 'उकडीच्या मोदकांच्या हार्दिक शुभेच्छा'!
modak
फोटो जुना आहे पण गरमागरम वाफाळते मोदक, तूप आणि नारळाचे दूध घालून आत्ताच संपविले!

मी Tue, 10/09/2013 - 18:18

मोदक आवडले, वळताना मोदकाचं पातळ कव्हर फाटू नये ह्यासाठी कौशल्याशिवाय(नो पन) इतर काही वापरले जाते काय? जसे थोडा मैदा वगैरे?

रुची Tue, 10/09/2013 - 23:40

In reply to by मी

मैदा वगैरे वापरण्याविषयी मलातरी कल्पना नाही. उकड चांगली चिकट असेल तर इतर कशाची गरज लागत नाही, मधूनमधून हाताला थोडे तूप आणि पाणी लावले तर वळायला सोपे जातात.

ऋषिकेश Wed, 11/09/2013 - 10:53

In reply to by रुची

वरच फटू आवडले.
परवा एखाद-दोन मोदक वळण्याचा सपशेल अयशस्वी प्रयत्न केला. शेवटी तयार झालेल्या आकारात "स्वीट डेसिकेटेड कोकोनट मोमोज्" असे नामकरण करण्याचा प्रस्ताव भगिनीवर्गाकडून येताच त्याचे अधिक नामकरण होण्याआधी काढता पाय घेतला ;) आणि नंतर सराईत हातांनी बनवलेले वरच्या फटुतल्यासारखे दिसणारे मोदक, झालंच तर ओव्याची पाने, दोडके, केळी, भरल्या मिरच्या वगैरेंच्या 'भजी'चा पुरेपूर आस्वाद मात्र घेतला

मी केलेल्या मोदकांच्या पाकळ्या या वरच्या टोकात भारतातील संस्थानांपेक्षाही अधिक तत्परतेने विलीन झाल्याने वाटोळा मोदक म्हणावा की मोदकांचे वाटोळे असा प्रश्न माझा मलाच पडल्याचेही नमुद करतो ;)

अमुक Wed, 11/09/2013 - 20:34

In reply to by ऋषिकेश

मोदकाच्या पाकळ्यांना 'पारी' असा शब्द आहे.
(प्राचीन काळी मोदक भारतातून खुष्कीच्या मार्गाने फ्रांसला पोहोचताना गोलाचे उभट झाले. पोहोचविणार्‍याला ते बिघडलेले आकार पाहून वाईट वाटून इंग्रजीत 'आय् फेल्ड्' असे तो पुटपुटत असताना एका वास्तुअभियंत्याने ऐकले. त्याला वाटले की त्या पदार्थाचे नांवच 'आयफेल' आणि मोदकाच्या उभट झालेल्या आकारावरूनच त्याला मनोर्‍याची कल्पना सुचली. मग बांधून झाल्यावर रीतसर त्याचे नामकरण 'आयफेल टॉवर' झाले. मोदकाच्या त्या बिघडलेल्या पारीच्या सन्मानार्थ आजही त्या शहरास 'पारी' असे संबोधले जाते.)

बॅटमॅन Thu, 12/09/2013 - 03:02

In reply to by अमुक

अजून एक व्युत्पत्ती सांगितली जाते. ते मोदक खुष्कीने फ्रान्सला पोचले. ते आयफेल्डवाल्याच्या एका बंगाली सहकार्‍याने पाहिले आणि म्हणाला, "आमि पारी!!!" अर्थात "येस वी कॅन".
त्यावरून ते नाव पडले. आणि मुख्य अभियंत्याला उभारी येऊन आयफेल टॉवर उभा राहिला.

ऋता Sun, 15/09/2013 - 14:58

In reply to by अमुक

पारी मोदकाच्या आवरणाला म्हणतात(पाककृतींमध्ये 'पारीसाठी साहित्य' असे वाचनातही आले आहे). मोदक वळताना सारण पारीत ठेवल्यावर जो आकार पहिल्यांदा दिला जातो त्याला ऋषिकेशनी मोदकाच्या पाकळ्या म्हटले-तिथे पारी शब्द घालून अभिप्रेत अर्थ पोहोचेल असे वाटत नाही.

अमुक Wed, 11/09/2013 - 20:26

In reply to by मी

रुची म्हणतात, तसे योग्य चिकटपणा आला की बहुतेक काम होते. तो तसा येण्यात (आवरण न फाटण्यात) अनेक घटक कार्यरत असतात. त्यामुळे पुढील गोष्टी ध्यानात ठेवाव्यात -
१. जी तांदूळाची पिठी घ्याल, ती अतिशय बारीक असणे महत्त्वाचे. अगदी बारीक दळले असले तरी मैदा चाळण्याच्या चाळणीने ते चाळून घ्यावे. पिठी हाताला गुळगुळीत लागले पाहिजे. चिकटपणासाठी हा मुख्य घटक.
२. १ माप पिठी = १.५ माप पाणी असे प्रमाण घ्यावे. पातेल्यात चमचाभर तेल + किंचित मीठ घालून त्यात पाणी वरील ओतून १ उकळी आणावी. पातेले विस्तवावरून उतरवून त्यात पिठी थोडी-थोडी घालत (वैरत) ढवळावे, ज्यायोगे गुठळ्या होत नाहीत आणि योग्य चिकटपणा येण्यास मदत होते.
३. सगळी पिठी वैरून झाली की पातेले पुन्हा विस्तवावर चढवून ५ मि. नी १ वाफ आणावी.
४. अशी तयार झालेली उकड गरम असतानाच तेल-पाण्याचा हात लावून मळावी. तसेच मळल्यावरही ती गरम ठेवणे महत्त्वाचे. एखाद्या कॅसेरॉलमध्ये उकडीचा गोळा ठेवावा व ताबडतोब सारण भरून मोदक करण्यास सुरूवात करावी.
५. मोदक उकडताना ते ओल्या रुमालात गुंडाळून उकडवावे. अन्यथा उकड कोरडी होत जाऊन भेगा पडतात.

रुची Wed, 11/09/2013 - 20:56

In reply to by अमुक

माझे उकडीचे प्रमाण १ भाग पाण्यासाठी १ भाग पीठ असे आहे. पाण्याला (२ चमचे तूप, थोडेसे मीठ घालून) उकळी आली की त्यात पीठ घालून थोडेसे ढवळायचे आणि तो लगदा झाकून, मंद आचेवर त्याला एक वाफच द्यायची (साधारण २-३ मिनिटे), उकडीत या वेळेस थोड्या गुठळ्या असल्या तरी चालते कारण ती गरम असतानाच मळल्याने व्यवस्थित करून घेता येते. बाकी सर्व पद्धत वरीलप्रमाणेच.

ऋषिकेश Thu, 12/09/2013 - 09:20

In reply to by अमुक

या वर्षी प्रयोग म्हणून उकडीचा काही भाग हाताने मळण्याऐवजी फूड प्रोसेसरवर मळून बघितला. अगदी एखाद मिनिटात उत्तम मळला गेला. त्याचे मोदकही हाताने मळलेल्या मोदकांइतकेच तलम/सलग झाले होते.

फ्रीजनंतर फूड प्रोसेसर हे आमच्या घरात सर्वाधिक वापरले जाणारे यंत्र असावे. मोदकांसाठी नारळ खवणे, गुळ किसणे आणि आता उकड मळणेही त्यातच झाले :)

गवि Wed, 11/09/2013 - 10:21

पौष की पॉश अशा नावाच्या काश्मिरी क्विझिन देणार्‍या हॉटेलात नुकतेच जेवण केले. सध्या फोटो अपलोडवून इथे डकवण्याचा वेळ हाताशी नाही, म्हणून इतकेच सांगतो की "भिकार".

आंबटढाण, अमर्याद लडबडत्या तारा सुटलेली कमळखोडाची दह्यातली भाजी (चिकामुळे तार निघणं हे काही प्रमाणात मान्य असूनही त्याचा इथे अतिरेक दिसला), कडक लाकडासारखी जून खोडं, न शिजलेली.. मटण रोगनजोशला कोणतीही स्पेसिफिक चव नाही आणि त्यातलं मटण अर्धंकच्चं. अत्यंत बकवास.

काश्मिरी फूड असं वाचून मोहात पडू नये इतकीच सूचना.

मी ठाणे येथील शाखेत जेवलो. बसण्याबिसण्याची व्यवस्था एकदम हाऊसबोट थीमसारखी आणि अ‍ॅम्बियन्स झकास. पण अ‍ॅम्बियन्सच झकास फक्त. हॉटेलचा आत्मा, जी चव, ती कैलासवासी झालेली दिसली.

बॅटमॅन Sun, 15/09/2013 - 01:30

पुण्यात फर्गसन कालिज रोड, ज्ञानेश्वर पादुका चौक. हाटेल "बाय दि वे".

चिकन सूप, चिकन पॅप्रिका, चिकन सीख कबाब, आणि तिरामिसू. सर्व पदार्थ उत्तम. चिकन पॅप्रिकाचा सॉस विशेषतः अप्रतिम होता. कॉण्टिनेण्टल पदार्थांसाठी हे हाटेल उत्तम आहे एकूण. तिरामिसू खाल्ले, मलई कॉफीत केक घातल्यागत लागले. ही आमची पहिलीच वेळ खायची. आमचा नाही म्हटले तरी तसा जीव जडला त्यावर. तिरामिसू पाहून अंमळ जरा तोंपासू होईल इथून पुढे-अर्थात पोटात तेवढी जागा असेल तं मगच.

मेघना भुस्कुटे Sun, 15/09/2013 - 13:56

हेमंत स्नॅक्स, लुईसवाडी, ठाणे - या चारच बाकडी असलेल्या, लहानश्या, स्वच्छ खानावळीत स्वर्गीय सुरमई खायला मिळाली. अडीचशे रुपये मच्छी ताट. केवळ अफलातून. फोटू काढायला मी थांबू शकले नाही.

नंदन Sun, 15/09/2013 - 14:17

In reply to by मेघना भुस्कुटे

हेमंत स्नॅक्स, लुईसवाडी, ठाणे - या चारच बाकडी असलेल्या, लहानश्या, स्वच्छ खानावळीत स्वर्गीय सुरमई खायला मिळाली.

ठाण्याच्या ह्या लुईसवाडीत अनेक दिव्य गोष्टी वसतात ;)

१. 'दिव्य'चा अर्थ 'दिव्य मराठी' प्रमाणे घ्यायचा की प्रचलित अर्थाने, ते आपापल्या आवडीवर अवलंबून.
२. हे वाक्य 'रत्नागिरीच्या त्या मधल्या आळीत लोकोत्तर पुरूष राहतात' या चालीवर वाचावे.
३. अद्याप उलगडा झाला नसल्यास जिज्ञासूंनी राजहंस, लुईसवाडी असे गूगलून तेथील स्थानकस्थानिक लेखकाचे नाव पहावे.
४. पहिल्या तळटीपेचा भावार्थ पहा.
५. ठाण्याचे मूळ नाव स्थानक.

प्रकाश घाटपांडे Sun, 15/09/2013 - 14:18

ऐसी अक्षरेच्या श्रद्धाळू / अश्रद्ध, आस्तिक/नास्तिक, विवेकवादी/परंपरावादी, सर्वधर्मीय....सांस्कृतिकदृष्ट्या मराठी सदस्यांना 'उकडीच्या मोदकांच्या हार्दिक शुभेच्छा'!

थ्यांकू! आम्ही जगण्यासाठी जगण्यापुरत खाणारे पण उकडीचे मोदक आवडतात.

बॅटमॅन Fri, 27/09/2013 - 13:08

अलीकडेच हाटेल आर्थर्स थीम, कोरेगाव पार्क पुणे इथे जाणे झाले. शुद्ध युरोपियन पदार्थ मिळतात. लहानशीच जागा. अँबियन्स उत्तम, खाणेही चांगले अन बहुधा ऑथेंटिकही असावे. यद्यपि याबद्दल प्रथमहस्ते व्हाऊचण्यास असमर्थ असलो तरी एकुणात इंप्रेशन चांगले होते. रेट अंमळ महाग, पण इतकेही नाही. ठीकच.

हां तर खाल्लेले पदार्थः

फिश क्रॉकेट आणि कसलासा सॉस चोपडला होता त्यांवर. तोंडात विरघळणारी मस्ताड चव होती. सॉसही मसालेदार, अंमळ गोड पण जबरी होता.

चिकन पीसेस, मश्रूम पीसेस विथ कसलीशी तिखटसर गिरवी अन बटाट्याचे गोळे. ते तोंडात इतके मस्त विरघळत होते की मजा आली. चिकन बरे होते पण अजून लुसलुशीत पाहिजे होते. बाकी गिरवी उत्तम.

रेड व्हेल्वेट केक- एकाआड एक क्रीम आणि कसलासा गुलाबी-लालसर पदार्थ यांचे स्तर होते. चव उत्तमच.

सोबत बनपावसदृश आकारांचे गरम ब्रेड आणि बटरच्या वड्या होत्या. चिकनच्या गिरवीसोबत ते खायला मजा आली.

या हाटेलचे अजून एक वैशिष्ट्य म्हंजे सर्व पदार्थांची नावे भलती अगम्य- हेलन, नेपोलियन, वैग्रे. यद्यपि त्यांच्या खाली त्यात काय असेल हे लिहिले असले तरी नावांमुळे काही घंटा कळत नाही. मनोरञ्जन मात्र होते.

युरोपियन पदार्थ खायचे असतील तर एकदा तरी अवश्य भेट द्या असे सुचवितो.

बाकी एक प्रश्नः युरोपियन पद्धतीचे ताजे ब्रेड खायचे असतीलतर ते पुण्यात कुठल्या बेकरीत मिळतात? शिवाय ब्ल्याकबेरी वैग्रे विदेशी फळे चांगल्या दर्जाची पुण्यात कुठे मिळू शकतील?

मी Fri, 27/09/2013 - 17:26

In reply to by बॅटमॅन

>>बाकी एक प्रश्नः युरोपियन पद्धतीचे ताजे ब्रेड खायचे असतीलतर ते पुण्यात कुठल्या बेकरीत मिळतात? शिवाय ब्ल्याकबेरी वैग्रे विदेशी फळे चांगल्या दर्जाची पुण्यात कुठे मिळू शकतील?

बेकर्स बास्केट मधे एक (जर्मन!) पद्धतीचा मल्टीग्रेन ब्रेड मिळतो, रोज ठरावीक वेळासाठीच उपलब्ध असतो. तो चांगला आहे असे अनेकांचे मत आहे. ब्लॅकबेरी पुण्यात पाहिली नाही, महाबळेश्वरला मात्र पाहिली आहे.

बॅटमॅन Mon, 30/09/2013 - 14:27

In reply to by अनिल सोनवणे

लै आहेत. टिळक रोडला बादशाही म्हणून आहे. बादशाहीच्या समोरून भरत नाट्य मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावर सात्त्विक थाळी म्हणून आहे. अजूनही त्या भागात किंवा इतरत्रही चिक्कार रग्गड हाटेले आहेत.

मन Tue, 15/10/2013 - 10:23

In reply to by बॅटमॅन

सात्विक थाळी मध्ये हल्ली वारंवार गेलोय. काय गडबड झालिये ठाउक नाही, अगदिच बकवास झाले आहे. एकेकाळचे माझेही आवडते होतेच.

अनिल सोनवणे Mon, 30/09/2013 - 17:21

बादशाहीला एकदा गेलो होतो. त्या दिवशी योगायोगाने (कि नेहमीच) खूपच गर्दी होती. नंतर काम होतं. तास लागेल असं सांगितल्यावर चुळबुळ सुरू झाली. मित्राने एकदा इथे जेवूयातच असा आग्रह धरल्याने थांबलो. तासभर वाट पाहणं जिवावर आलं होतं. रांगेतल्या लोकांची प्रशंस करूनही वेळ संपेना. शेवटी खडा टाकून पहावा म्हणून मॅनेजरांकडे जाऊन त्यांना आम्ही बारामतीहून आलोय असं आगाउपणा करून सांगितलं. त्यावर त्यांनी मख्ख चेह-याने पाहीलं. मग हसत आम्ही साहेबांची खास माणसं आहोत असं ठोकून दिलं. त्यावर बरं मग असा प्रश्न आला. मग जरा लवकर सोडायचं बघा ना असं मुद्द्यावर येताच मॅनेजर साहेब म्हणाले.. "रांगेत या. सोडणारच आहोत."
"अहो पण साहेबांची माणसं...!!"
" साहेब आले तरी त्याना रांगेतच सोडतो " या थंड उत्तराने आम्हीही थंड झालो. जेवण मात्र खरंच उत्कृष्ट इतका वेळ थांबल्याचा वैताग निघून गेला. पुण्याचे लोक उगाचच कुठेही रांग लावत नाहीत...

बॅटमॅन Mon, 14/10/2013 - 17:54

मध्ये थाई चिकन करी खाण्याचा योग आला. लै तिखट नव्हती, अंमळ माइल्डच. रंग हिरवा अन चवीला अप्रतिम. नारळाची चव जी लागली त्यामुळे खुद्दांची तब्येत खूष झाली.

गवि Tue, 15/10/2013 - 10:08

In reply to by बॅटमॅन

थाई चिकन करी खाण्याचा योग आला म्हणजे काय मेल्या.. कुठेशीक खाल्लीस ते सांग.

पॉप टेट्स (ठाणे, मुलुंड या भागातल्या ३ शाखा.. अन्य ठिकाणी चवीत फरक असल्यास ठाऊक नाही.) येथील थाई करी (रेड) ही चिकन आणि (खास करुन मागितल्यास) फिश अशा दोन्ही प्रकारांत मिळते.

डिशचं नाव थाई चिकन करी विथ राईस. ही आत्तापर्यंतची जग्गातली सर्वात जबरी टेस्ट असलेली थाई करी असे सर्टिफिकेट देऊ इच्छितो. मी तर या थाई करीचा अ‍ॅडिक्टच आहे. अगदी तुळशी सारखे काय ते पान असते त्याच्या स्वादासहित सर्व स्वाद या करीमधे उतरलेले असतात. खेरीज त्याच मसाल्याचा आणि स्वादाचा पण करी नसलेला ड्राय पदार्थ = थाई टॉस्ड फिश.. हाही एकदम जन्नतमधून थेट आणलेला.

बॅटमॅन Tue, 15/10/2013 - 12:39

In reply to by गवि

तेच ते फर्गसन रस्त्यावरचे तुकाराम पादुका चौकाजवळचे "बाय दि वे". त्याच्या चवीमुळे अन तुमच्या वर्णनाने आता खास थाइ पदार्थांसाठीचे असलेले कोरेगाव पार्कातले "मलाका स्पाईस" देखील ट्राय करेन लौकरच!

@ऋषिकेशः पॅड थाइ पाहीन, पण दाण्याचे कूट अन चिकन??? ईईई :D

ऋषिकेश Tue, 15/10/2013 - 17:45

In reply to by बॅटमॅन

माझीही आधी तीच रीअ‍ॅक्शन होती ;)
पॅड थाई बघुन एकदा खायचे नाकारलेही होते.. पण खाल्यावर अजा आली होती

हे बघा चित्र

स्रोतः विकी (प्रताधिकारमुक्त)

'न'वी बाजू Sat, 19/10/2013 - 02:14

In reply to by गवि

डिशचं नाव थाई चिकन करी विथ राईस. ... मी तर या थाई करीचा अ‍ॅडिक्टच आहे. अगदी तुळशी सारखे काय ते पान असते त्याच्या स्वादासहित सर्व स्वाद या करीमधे उतरलेले असतात.

हो हो, अगदी! शिवाय त्यात अगदी कोंबडीसारखा काय तो पक्षी असतो, आणि जोडीला अगदी भातासारखे काय ते पांढरेपांढरे नि शिते असलेले पण देतात!

ही आत्तापर्यंतची जग्गातली सर्वात जबरी टेस्ट असलेली थाई करी असे सर्टिफिकेट देऊ इच्छितो.

थाई रेड करी जबरी लागते, हे आगाऊ मान्य. पण तिला 'थाई करींपैकी सर्वात जबरी' म्हणणे म्हणजे बहुधा पहिल्या यत्तेत पहिला नंबर काढणार्‍याला 'आईनस्टाईन' म्हणून संबोधण्यासारखे व्हावे. (अं, मला वाटते, रत्नांगिरीचेच ना हो तुम्ही मूळचे? मग बरोबरच आहे. ;) [नसल्यास चूभूद्याघ्या.])

माझ्या लेखी 'रेड करी' ही फार तर 'एंट्री लेवल' ठरावी. म्हणजे, हीदेखील नीट बनवणे जर जमत नसेल, तर माणसाने थाई रेष्टॉरण्ट खोलण्याच्या भानगडीत पडू नये, अशातली. थाई नारळदूधयुक्त कर्‍यांपैकी आवर्जून खाण्यासारख्या प्रकारांत (वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे) 'मास्सामान करी' नामक प्रकाराला माझ्या मते तोड नाही. (बादवे, यात काजूबिजू घालतात.) कोंबडी घालून खावी, किंवा त्याहीपेक्षा श्रिंप/प्रॉन्स (जरा मोठ्यापैकी) घालून मिळाली, तर अत्युत्तम. (माशांबरोबरही बहुधा चांगली लागावी.)

बाकी पानांग करी, ग्रीन करी वगैरे करी-प्रकारही बरे असतात.

(आणखी एक थोडा अनवट आणि तुलनेने क्वचित मिळणारा प्रकार म्हणजे अननसाचे तुकडे घातलेली बदकाची नारळदूधयुक्त करी कधी मिळाल्यास जरूर खाऊन पहावी.)

शक्य तोवर या सर्व थाई नारळदूधयुक्त कर्‍या, थाई सुपे, झालेच तर पाड् थाई, तुळसयुक्त थाई फ्राईड राईस वगैरे, हे सर्व प्रकार मागवताना शक्य तितके जालीम तिखट बनवून आणण्याची विनंती करावी. त्याशिवाय थाई जेवणास मजा नाही. असो.

मी Sat, 19/10/2013 - 10:28

In reply to by 'न'वी बाजू

करी जरा देशस्थ चिंच-गुळ घालून आमटी करतात तशी लागते(चिंचेची चव नसते). कदाचीत चुकीच्या ठिकाणी खाल्ली असावी, फ्लॅट नुडल असलेली करी-डिश पण बरी लागल्याचे आठवते आहे, पण तो फ्राईड बनाना आइस्क्रीम प्रकार पहिल्यांदा आवडला होता.

ऋषिकेश Tue, 15/10/2013 - 10:23

In reply to by बॅटमॅन

थाई आवडत असेल तर 'पॅड थाई' नावाचा पदार्थही खाऊन बघा असे सुचवेन.
दाण्याचे कुट आणि चिकन हे काँम्बी वाटते तितके विचित्र लागत नाही ;)

बाकी नारळाच्या दुधात बनणार्‍या ग्रेव्ह्यांमूळे एकूणच विविध थाई करीज मी सुद्धा चाहता आहे.

उपाशी बोका Fri, 18/10/2013 - 09:49

In reply to by ऋषिकेश

>> थाई आवडत असेल तर 'पॅड थाई' नावाचा पदार्थही खाऊन बघा असे सुचवेन.
थाई करीमध्ये 'मसम्मन करी' हा प्रकार खाऊन बघा असे सुचवेन.

मन Fri, 18/10/2013 - 09:54

In reply to by ऋषिकेश

"तोम्-खा" नावाचं कुठलंसं थाई सूप लै भारी आहे; तेही नारळाच्या दुधातलच.
वाकड्-विशाल नगर ला कोपा कबान्ना आहे; तिथेही हे बरं मिळतं.
बर्‍यापैकी तिखटही असतं; पण त्या तिखटालाही एक वेगळी चव असते; तिख्ट ते मिरचीचं नाही तर गवती चहा किंवा काळे मिरे किंवा तत्सदृश कशामुळं तरी लागत असावं.

घनु Fri, 18/10/2013 - 13:35

In reply to by ऋषिकेश

अहा!!! थाई करीज जीव की प्राण.... बॅटमन म्हंटल्याप्रमाणे 'बाय द वे' मधे छानच मिळते थाईकरी... त्याव्यतिरिक्त कल्याणी नगर, पुणे मधे 'पोलका डॉट्स' मधेही छान मिळते थाई करी (खरं तर ते एक इटालियन रेस्टॉरंट आहे) - पण प्रचंड महाग, शिवाय त्या बरोबर 'राईस' येत नाही - त्याचे वेगळे पैसे आणि तेही महाग... पण चव बाकी उत्तम.

'न'वी बाजू Sat, 19/10/2013 - 00:20

In reply to by ऋषिकेश

तोम् खा बद्दल +१ (उच्चार असाय होय!)

अगदी!

मात्र त्याचा उच्चार मी 'टॉम-खा' असा करत असे ;)

'पॅड थाई' नव्हे, बरे का, माष्टर ऋषिकेश! पाड् थाई!! पाड् थाई!!!' ;-)

'न'वी बाजू Sat, 19/10/2013 - 01:27

In reply to by मन

"तोम्-खा" नावाचं कुठलंसं थाई सूप लै भारी आहे; तेही नारळाच्या दुधातलच.

याचा सर्वात कॉमन प्रकार म्हणजे तोम-खा गाई. (म्हणजे कोंबडी घातलेले तोम-खा सूप.)

याशिवाय, नारळाचे दूध न घातलेले 'तोम-यम' नावाचे सूपही उत्कृष्ट लागते. याच्या चवीतील ओव्हरपॉवरिंग इन्ग्रीडियंट म्हणजे गवती चहा. शिवाय जबरी तिखट असते. याची सर्वात कॉमन (आणि सर्वाधिक चांगली लागणारी) आवृत्ती म्हणजे 'तोम-यम गूंग', अर्थात श्रिंप घातलेले तोम-यम सूप.

मन Mon, 21/10/2013 - 08:10

In reply to by 'न'वी बाजू

गवती चहा. तो सुद्धा आपण चहात घालतो तसा पातळ नाही, किंचित जाड, आणि रसरशीत.
तिखट असतेच; पण ह्या तिखटाची चव मिरचीच्या तिखटापेक्षा वेगळी.(गुळाचा गोडवा साखरेच्या गोडव्यापेक्षा वेगळा असतो; तसेच.)

ऋता Sun, 20/10/2013 - 12:21

'ईरो' (उच्चार?..Gyros) हा ग्रीक प्रकार खाल्ला. पिटा ब्रेड मध्ये चिकन (मंद आचे वर भाजलेलं, शवर्मा रोलमध्ये असतं तसं) आणि त्यात त्झाझिकी (उच्चार?) सॉस लावलेला होता. मस्त चव. खूप आवडली. बोलोन्यात 'Gyrosteria' या जागी हे खाल्लं.

'न'वी बाजू Sun, 20/10/2013 - 18:53

In reply to by ऋता

'ईरो' (उच्चार?..Gyros)

'आमच्या' बाजूस याचा उच्चार 'हीरो' असा ऐकलेला आहे. (चूभूद्याघ्या.)

(अतिअवांतर: ग्रीकमंडळी ज्याला 'ईरो'/'हीरो' म्हणतात, त्याला तुर्कमंडळी 'दोनरकबाब' ('Doner Kebob') म्हणतात, नि यूकेत हाच प्रकार 'दोनरकबाब' नावाने तुर्की खानावळींतून अधिक प्रचलित आहे, असे ऐकून आहे. (चूभूद्याघ्या.))

'न'वी बाजू Sun, 20/10/2013 - 22:06

In reply to by ऋता

(आय मीन, हो का?)

स्प्यानियर्डांचाही 'एच' सायलेंट असतो, आणि त्याऐवजी 'जे'चा उच्चार इंग्रजीतील 'एच'सारखा करतात. द्या टाळी!

(शिवाय आमच्याकडची मेहिकनमंडळी 'एक्स'चा उच्चारही इंग्रजीतील 'एच'सारखा करतात, नि 'जे' आणि 'एक्स' त्यांच्यात अनेकदा (पण नेहमी नव्हे) इंटरचेंजेबल असावेत, असे वाटते. [म्हणजे, Mexico/Mejico दोन्ही चालते; Texas/Tejas दोन्ही बहुधा चालावे, खात्री नाही (चूभूद्याघ्या.); Juan, Jorge किंवा (Ciudad) Juarez यांकरिता मात्र Xuan, Xorge किंवा Xuarez असे पर्याय वापरलेले पाहिलेले नाहीत. ही काय भानगड आहे, ते कळत नाही.])

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 21/10/2013 - 01:00

In reply to by ऋता

दोनरकबाब आणि ईरो हे एकच प्रकरण असतं हे माहित नव्हतं.

युरोप आणि अमेरिकेत Fage नावाचं ग्रीक दही मिळतं. (आम्रखंड, श्रीखंडासाठी उत्तम असतं.) त्याचा उच्चार 'फाये' असा होतो असं डब्यावर लिहीलेलं असतं. आता ग्रीकांना ईरीक (किंवा ह्रीक) म्हणावे काय?

बॅटमॅन Mon, 21/10/2013 - 14:55

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ग्रीक अक्षर गॅमा नुस्ते असेल तर त्याचा उच्चार य-सदृश असतो. इंग्रजी g लिहायचे असेल तर बहुतेकदा γκ असे एकत्र लिहिले जाते. संदर्भ

आणि ग्रीक लोक स्वतःला ग्रीक कधीच म्हणवून घेत असत. ते नाव त्यांना रोमन लोकांनी बहाल केलेलं आहे. झ्यूस देवाचा मुलगा ग्रेकस याचे वंशज इ.इ. कथा. ग्रीक लोक स्वतःला "हेलेनी"-उच्चारी "एलेनी" असे म्हणवून घेत. होमर ग्रीकांचा उल्लेख कधीही ग्रीक म्हणून करत नाही, कधीही "एखिअन्स, आर्गाईव्ह्ज, दनान्स,"इ. नावांनीच उल्लेख करतो. म्हंजे "हेलेन" चे वंशज. आणि हा हेलेन पुरुष होता. स्पेलिंग त्या राणी हेलनपेक्षा वेगळे आहे.

बाकी φαγε हे सकृद्दर्शनी पाहता φαγήτο म्ह. जेवणाशी निगडित दिसतंय. पाहिले पाहिजे.

राधिका Sat, 23/11/2013 - 17:02

कालच इम्बिस येथे गेलो होतो. वांद्र्यातल्या एका बारक्याशा बोळात सुंदर लाकडी क्रूसाशेजारी असलेली ही एक छोटीशी, सुबक, दीडमजली जागा. मंद पिवळा प्रकाश, बसायला लाकडी बाक, टेबलं आणि स्टूलं वापरून केलेल्या वेगवेगळ्या रचना, वेगळ्याच प्रकारची झाकणं असलेल्या काचेच्या बाटल्या असा सरंजाम. तिथे आम्ही बदकाच्या अंड्याचं आम्लेट (मस्त!), म्हशीच्या मांसाचा स्टेक (आंबट आणि चविष्ट), हंगेरियन गुलॅश (गोमांस घातलेले सूप- चांगले) आणि वीनर श्निट्झल (वासराच्या मांसाला ब्रेडक्रंब्ज लावून तेलात तळून कडक केलेले- मुळीच आवडले नाही) असे पदार्थ खाल्ले. तीनजणांत मिळून ६००च्या आसपास बिल झाले, फार महाग वाटले नाही. इथे तर्‍हेतर्‍हेच्या मांसाचे युरोपियन पदार्थ मिळतात. अशा प्रकारचे पदार्थ अशा कमी दरांत मिळवून देणारे मुंबईतले हे एकमेव ठिकाण असावे. त्यांच्या मेन्यूवरील सर्वच्या सर्व पदार्थ एकेकदा चाखून पाहण्यासारखे आहेत, आणि अधूनमधून तिथे वार्‍या करून हे सत्कर्म पार पाडण्याचे आम्ही ठरवले आहे.

त्यांची सर्व्हिसही चांगली होती. मजा म्हणजे इथे खायला काही गोड मिळते का, नसल्यास जवळ कुठे चॉकलेटांचे चांगले दुकान आहे का असे विचारल्यावर त्यांनी एका छोट्या भांड्यातून आल्पेनलिबंची चॉकलेटं आणून दिली.

इथे जाण्यात रस असेल तर लक्षात घेण्यासारख्या गोष्टी-
१. इम्बिस सोमवारी बंद असते.
२. बटेराच्या अंड्यांचे लोणचे, बीफ जर्की असे काही पदार्थ नेहमीच उपलब्ध असतात असे नाही. बटेराची अंडी हैद्राबादवरून मागवली जातात. तेव्हा खास हे पदार्थ खाण्यासाठी जायचे असल्यास आधी फोन करून ते उपलब्ध आहेत का हे विचारलेले उत्तम.
३. केवळ झोमॅटोवर दिलेल्या पत्त्यावरून ही जागा शोधणे कठीण आहे, तेव्हा आधी फोनवरून कसे यायचे ते विचारून घेतलेले आणि झोमॅटोवर दिलेल्या फोटोंसोबत दिलेला नकाशा पाहून ठेवलेला बरा.

राधिका Sat, 23/11/2013 - 18:03

चीजकेक हे प्रकरण मला दिवसेंदिवस अधिकाधिक आवडत चाललं आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथले चीजकेक चाखून पाहत असते. आत्तापर्यंत चाखलेल्या चीजकेक्सबद्दल या प्रतिसादात, नंतरच्यांबद्दल पुढील भागांत लिहीन, त्यामुळे या प्रतिसादाच्या शीर्षकापुढे '१' हा क्रमांक घातला आहे.

बेकरीचे नाव चीककेकचे नाव कोल्ड की बेक्ड किंमत शेरा
डेलिसिए पाटिसेरी बेक्ड बेक्ड १७० रु. (वर्षभरापूर्वी) चीजच्या स्वादात ब्लूबेरी वगैरे अशा कोणत्याही फळाची चव मधेमधे पाय घालत नाही, शिवाय छान बेक करतात. दोन वेळा घेतला, दोन्ही वेळी सुरेख, चवीत आणि पोतात सातत्य. मी आतापर्यंत खाल्लेला सर्वोत्कृष्ट ची.के.
डेलिसिए पाटिसेरी ब्लूबेरी कोल्ड १७० रु. (वर्षभरापूर्वी) क्रीम चीज. तद्दन बकवास.
न्यू सरण्या ब्लूबेरी कोल्ड १५० रु. खाली बिस्किटाच्या चुर्‍याचा थर, त्यावर चीज आणि त्यावर मस्तसा ब्लूबेरी सॉस. या तिन्हींचे वेगवेगळे पोत एकत्र तोंडात घोळवताना छान वाटते. शिवाय, चीजची गोड चव, त्यात दाणाभर जास्त मीठ घातल्याने आलेली हलकीशी खारट चव आणि ब्लूबेरी सॉसची आंबट चव यांचे काँबिनेशन झकास. मला आवडणार्‍या ची.के. मध्ये याचा क्रमांक तिसरा
न्यू सरण्या आंबा कोल्ड १५० रु. वरच्याच प्रमाणे दाणाभर जास्त मीठ. पण मजा म्हणजे आंब्याची चव वेगळी अशी जाणवत नाही. याचा क्रमांक दुसरा.
थिओब्रोमा न्यू यॉर्क बेक्ड १२० रु. साखर वेगळी लागत होती. नुसताच गोड. आवडला नाही.
लव्ह अँड चीजकेक ब्लूबेरी बेक्ड १८० रु. ठीक होता, वाईट नव्हता, पण १८० रु. खर्चून खाण्याजोगा वाटला नाही.
लव्ह अँड चीजकेक लेमन कोल्ड बहुधा १८० रु. क्रीम चीज आणि त्यात लिंबाची वाजवीपेक्षा जास्त आंबट चव. आवडला नाही.
बोरिवली बिर्याणी सेंटर ब्लूबेरी कोल्ड बहुधा ८० रु. कदाचित थोडा शिळा झालेला होता. ब्लूबेरी सॉस गरजेपेक्षा जास्त आळलेला आणि आंबट होता. केकच्या पोटात सॉसचा आणखी एक थर दिल्याने केक अतिआंबट झाला होता. तद्दन बकवास.
मोकँबो कॅफे आयरीश कॉफी कोल्ड १५० रु. एकदम कडू. चीजची चव लागत नव्हती. पण कडू चॉकलेटं आणि कॉफी आवडणार्‍या लोकांना आवडेल असा.

अमुक Sat, 23/11/2013 - 19:21

In reply to by राधिका

हे कोष्टक 'माहितीपूर्ण'च्या पलीकडे असल्याने 'अभ्यासपूर्ण' अशी नवी श्रेणी दिली गेली आहे.

मन Sat, 23/11/2013 - 20:13

In reply to by राधिका

----/\-----

हादडण्यासाठीही इतका अभ्यास असतो!!??

ऋषिकेश Mon, 09/12/2013 - 15:51

शुक्रवारी औंधला "ग्रीन्स अ‍ॅन्ड ऑलिव्ह्स" मध्ये जोडीनं गेलो होतो.
देशी+परदेशी विशेषतः इटालियन पदार्थ मिळणारे हे "फक्त शाकाहारी" हाटील आहे. उत्तम अँबियन्स, बहुतांश फ्यामिली आलेल्या असल्याने त्याच-त्या गळ्यात आय कार्ड अडकवलेल्या दया येणार्‍या जीवांना सारखं सारखं बघावं लागत नाही, सर्विस उत्तम व अदबशीर आहे (जरा जास्तच वेटर्स आहेत, बहुदा दर दोन लहान टेबल्सला एक असावा इतकी संख्या वाटली - पण तरी उगाच टेबलाभोवती घुटमळात नाही).

आता टेस्टः मला स्टार्टर्स(पिटा ब्रेड विथ हामुस), मॉकटेल व (मेन कोर्स म्हणून घेतलेला) पिझ्झा हे तीनही पदार्थ अतिशय आवडले. इथे ऑलिव्ह ऑईलमध्ये लडबडून दिलेले हामूसने तर माझ्या आम्रिकेच्या काळातील एका पॅलेस्ताईन सहकार्‍याच्या "घरच्या" हामुसची आठवण करून दिली. पिटा ब्रेडही अगदी ताजा, छान पापुद्रा सुटलेला होता.
पिझ्झा सुद्धा पावाच्या लादीवर थापलेला टोमॅटोसॉस सारखा नसून (चक्क) उत्तम बेक झालेल्या थीन क्रस्टवरील अती-रुचकर पदार्थ होता. (चक्क मला व बायकोला दोघांनाही जराही खुस्पट न काढता - एकमेकांत नव्हे पदार्थात - आवडला म्हंजे बघा ;) )

इथे पिझ्झाज् ची प्रचंड व्हरायटी आहे. स्टार्टर्सचीही! पुन्हा भेट नक्की देणार आहे.. सहकुटूंब जाण्यासारखी जागा!

त्यामानाने डेझर्ट म्हणून घेतलेले तिरामिसू मात्र डेझर्ट म्हणून ठिक पण "तिरामिसू" म्हणून बेतास बात. आतापर्यंत पुण्यात "ऑफ बीट"चे (तेव्हा करिश्माचौकाजवळ होते, आता माहित नाही) तिरामिसू सर्वात आवडले आहे (तरी मूळाची सर नाही वगैरे आहेच). अजून कोणाकडे चांगले मिळते का?

सविता Mon, 09/12/2013 - 16:00

परवा "सिसिलिया" ला भेट दिली

त्यांचा सेट लंच अगदी लिमिटेड व्हरायटी असून पण आवडला. ३२५ ला व्हेज आणि ४२५ ला नॉनव्हेज. चव आणि अँबियन्स आणि सर्विसचा विचार करता अगदी टोटल व्हल्यू फॉर मनी वाटले. लिटल इटली काहीच्या काही महाग आहे.(अर्थात इथला ला-कार्टे मेन्यू सुद्धा काही खुप स्वस्त नाहीये)

पण इटालियन रेस्तराँ ने इंडियन बफे सुद्धा ठेवावा हे जरा चिवित्र वाटले. नुस्ते इटालियन चालत नाही असा फिल आला, आणि चव, व्हरायटी,सर्विस चा विचार करता असे व्हावे याचे आश्चर्य सुद्धा वाटले.

ऋषिकेश Mon, 09/12/2013 - 16:04

In reply to by सविता

मग वरच्या प्रतिसादातल्या G&Oमध्ये भेट द्याच! फक्त इटालियन व्हरायटी अतिप्रचंड नसली तरी वेचक आणि वेधक आहे.
माझी बायको भारतीय मसालेदार अधिक आवडणार्‍यांपैकी आहे तरीही तिला या हॉटेलला परत भेट द्यावीशी वाटतेय. तिने भारतीय मेन्युकडे बघितले सुद्धा नाही

मन Tue, 10/12/2013 - 09:40

कांद्याच्या पातीचा, कांद्याच्या हिरव्या पाल्याचा घोलाणा* व कांद्याच्या पातीची भरडा भाजी फार दिवसांनी खाल्ली.
हरियाल बूट किंवा हिरवे टहाळ मनसोक्त खाल्ले.
धावपळ नि दगदगीचा असला, तरी आवडीच्या खाद्यामुळे वीकांत मस्त गेला.

*घोलाणा = हिरव्या पातीवर थोडीफार फोडणी शिंपडायची, नावापुरते, कणभर तिखट(खरं तर तेही नकोअच शक्यतो) आणि भाकरीसोबत खायचे.

फुलबाजी Tue, 10/12/2013 - 23:46

मुलासाठी वॉफल केल्यावर उरलेल्या पिठात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि तिखट सॉस घालून(मिरच्या चिरायचा कंटाळा केला.) तिखट वॉफल करून खाल्ले. बरे लागले.

सन्जोप राव Wed, 11/12/2013 - 05:31

ब्ल्यू नाईलला विविध प्रकारच्या बिर्याण्या खाल्ल्या. नंतर अर्धी पिस्ता कुल्फी. खिसा रिकामा झाला.पण व्हाट दी हेल. मन सुखी झाले.

बॅटमॅन Wed, 11/12/2013 - 05:38

In reply to by सन्जोप राव

ब्ल्यू नैल मधले अण्भव संमिश्र आहेत. एकदा वैट्ट अण्भव आला. पायजे त्या डिषेसच नव्हत्या नेमक्या. दुस्र्यांदा गेलो तर जेवणबिवण ठीक होते. सर्व्हिस लैच फास्ट होती, "गिळा आणि टळा" छाप वाटावयास लावणारी.

अनुप ढेरे Wed, 11/12/2013 - 15:04

In reply to by बॅटमॅन

"गिळा आणि टळा" छाप वाटावयास लावणारी.

सहमत आहे. क्वाल्टी घसरली आहे आजकाल ब्लु नाईलची. पण कडाडून भूक लागलेली असताना विना विलंब तुमचं जेवण घमघमाटात समोर येतं तेव्हा चवीमधलं १९-२० चालून जातं.

अमुक Wed, 11/12/2013 - 07:55

In reply to by सन्जोप राव

साधारण २००० साली मी 'ब्लू नाईल्'मध्ये तंदूरी चिकन् खाल्ले होते. तसे आणि त्यानंतर आजतागायत कुठेही खायला मिळालेले नाही. अत्यंत खरपूस भाजलेली आणि तंदूरचा खास वास असलेली अप्रतिम एक पूर्ण चिकन् तंदूरी...
आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद !
--
अवांतर : 'ऐसी..' वर 'ब्लू नाईल' हे द्वित्त होईल ! :ड

बॅटमॅन Wed, 11/12/2013 - 14:43

In reply to by अमुक

म.गांधी रस्त्यास समांतर असलेल्या "पूर्व रस्त्या"वर क्वालिटी नामक हाटेल आहे. रेट अंमळ बांबू असला तरी क्वालिटी उत्तम आहे. तिथले मांसल अन लुसलुशीत, चवदार तंदुरी चिकन खाणे हा लै खत्रा अण्भव.

'न'वी बाजू Wed, 11/12/2013 - 09:44

...बहुधा मागच्याच आठवड्यात (नक्की कधी, ते आता आठवत नाही, पण एवढ्यातच कधीतरी) डिकेटरच्या झायकामध्ये टपकलो होतो. तसे आम्ही अधूनमधून बर्‍याचदा तिथे टपकतो म्हणा. १९९०च्या दशकाच्या मध्याकडे अटलांटाच्या डिकेटरात सुरू झालेले - आणि, मुख्य म्हणजे, अजूनपर्यंत तोच दर्जा कायम टिकवून असलेले, उत्कृष्ट प्रतीचे हैदराबादी पद्धतीचे रेष्टारंट. (हो, नाहीतर बाकीची बहुतांश इण्डियन रेष्टारण्टे ही सुरू होतात, तेव्हा अनेकदा बरी असतात, क्वचित उत्कृष्टही असतात, नि सुरू झाल्यावर दोनतीन महिन्यांतच क्वालिटी ढुप्प होते, असा कन्शिष्ट्ण्ट अनुभव आहे. अनेकदा, लवकरच मग ती बंदही पडतात. प्रस्तुत रेष्टारण्टवाल्याने मात्र इतकी वर्षे धंदा टिकवून, आणि त्यात पुन्हा दर्जाही बर्‍यापैकी कायम राखून, सुखद धक्का दिलेला आहे.)

रेष्टारण्ट सेल्फ-सर्व्ह पद्धतीचेच आहे (पक्षी: म्याकडॉनल्डातल्यासारखे ऑर्डर द्यायला लायनीत उभे राहायचे, ऑर्डर देतानाच पैसे द्यायचे, नि ऑर्डर तयार झाल्यावर आपले नाव पुकारल्यावर आपणच ट्रेमधून आपले जेवण आपल्या टेबलापर्यंत उचलून न्यायचे, नि जेऊन झाल्यावर टेबलावरचा कचरा आपणच कचर्‍याच्या डब्यात टाकायचा; टिपिंगची भानगड नाही, शिवाय, सेल्फ-सर्व्ह असल्याकारणाने किमतीही त्या मानाने कमी आहेत.), नि थर्माकोलच्या प्लेटा अन् थर्माकोलचेच पाण्याचे कप नि प्लाष्टिकच्या डिस्पोज़ेबल काट्याचमच्यांचाच माहौल असतो, पण जेवण लाजवाब. मात्र, मेनूवरून हैदराबादी खासियतीच मागवाव्यात, म्हणजे आत्मा तृप्त होण्याची ग्यारण्टी. उगाच मेनूवर आहे म्हणून इतर काहीतरी मागवले, तर बरे मिळते, नाही असे नाही, पण त्यात ती मजा नाही. (याबद्दल पुढे. शेवटी ज्याची जी स्पेशाल्टी, तीच खावी, नाही का?)

रेष्टारण्टात तशी नेहमीच गर्दी असते, पण शुक्रवारी रात्री अनेकदा डायरेक्ट मशिदीतून निघून इथे हादडायला येणारी झुंबड काही औरच. अशा वेळी पार्किंगचा पोपट होऊ शकतो; नव्हे, बहुधा होतोच. (रेष्टारण्टाच्या मागच्याच हॉलमध्ये मशीद भरते वाटते; चूभूद्याघ्या.) इतर दिवशी पार्किंगला अडचण येत नाही. पण एकंदरीत मजा असते. गर्दी असली, लायनीत एखादवेळेस जास्त वेळ उभे राहावे लागले, तरीही इट ईज़ वर्थ द वेट.

हां, तर अशा रीतीने तेथे टपकलो होतो. निहारी खाल्ली. (बरेचदा खातो म्हणा.) अप्रतिम. केवळ उच्च. अवर्णनीय. अहाहा! खाओ, तो जानो! (अटलांटात निहारी इतरत्रही - अशाच एका पण पाकिस्तानी सेल्फ-सर्व्ह रेष्टारण्टात - खाल्लेली आहे, पण त्यास ती सर नाही. कोठे इंद्राचा ऐरावत, नि कोठे शामभटाची तट्टाणी. नाही म्हणायला, फार पूर्वी आणखीही एका काहीशा उच्चभ्रू - बोले तो, महागड्या नि झटॅक - फुल्ल-सर्व्ह पाकिस्तानी रेष्टारण्टात उत्कृष्ट निहारी खाल्ली होती, पण ते पाकिस्तानी रेष्टारण्ट पुढे काळाच्या ओघात नि ढुपत्या इकॉनॉमीच्या रेट्यात लवकरच बंद पडले. धाकल्या बुशसाहेबाच्या कारकीर्दीतली गोष्ट. तर ते एक असो.) पोराने चिकन ६५ मागवले. इतके जिभेवर विरघळल्यासारखे कोवळे (मराठीत: टेंडर) नि चवीत नेमके असे चिकन ६५ त्रिभुवनांत इतरत्र मिळत असेलही कदाचित - त्रिभुवन हिंडलेलो नसल्याकारणाने खात्रीलायकरीत्या सांगू शकत नाही - परंतु बृहदटलांटात तरी सापडणे अशक्य. बायकोने साग पनीर नि दाल हैदराबादी मागवली. तरी मी वॉर्न केले होते, की हे हैदराबादी रेष्टारण्ट आहे, हैदराबादी पदार्थ ही याची खासियत आहे, पंजाबी नव्हे; तेव्हा उगाच नसते काहीतरी साग पनीर वगैरे मागवण्याच्या फंदात पडू नकोस, आपले नेहमीचे ट्रैड-अँड-टेष्टेड बघारे बैंगन घे, म्हणून. पण 'ते तर आपण इथे नेहमीच खातो, म्हणून या वेळेस काहीतरी वेगळे' म्हणून हे मागवण्याची उपरती झाली. आणि व्हायचे तेच झाले. दाल हैदराबादी अपेक्षेप्रमाणेच उत्तम; साग पनीर, वेल, नॉट ब्याड, पण सो-सो. म्हटले आय टोल्ड यू सो. तर ते एक असो.

(इथले बघारे बैंगन मात्र आवर्जून खाण्यासारखे असते. हरकत नाही, पुढल्या वेळी पुनश्च हरि ॐ.)

या ठिकाणी मटका कुल्फी हा प्रकारही फार सुंदर मिळतो. तीन फ्लेवर उपलब्ध आहेत - केशर-पिस्ता, आंबा आणि चिक्कू. पैकी चिक्कू सर्वोत्तम. (मात्र, या वेळी कुल्फी खाल्ली नाही.)

एकंदरीत, झक मारलीत नि मेट्रो-अटलांटात चुकून कधी कडमडलातच, तर आवर्जून जाण्यालायक जागा.

टीप: वरील माहिती ही (कितीही अचूक नि मनापासून - सिन्सियरली - लिहिलेली असली, तरी) येथील बहुतांश वाचकांसाठी अत्यंत निरुपयोगी (मराठीत: यूसलेस) आहे, याची पूर्ण जाणीव आहे. किंबहुना म्हणूनच ती जनरीतीस नि या धाग्याच्या परंपरेस अनुसरून (नि वचपा म्हणून) येथे आवर्जून मांडलेली आहे.

(कोणीतरी 'माहितीपूर्ण' द्या रे या प्रतिसादाला!)

मन Wed, 11/12/2013 - 11:04

In reply to by 'न'वी बाजू

चुकून निरर्थक दिली.
(वरतून दुसॠ देण्याऐवजी खालतून दुसरी श्रेणी दिली गेली. अ‍ॅरो की चा झोल.)

'न'वी बाजू Sat, 14/12/2013 - 04:42

In reply to by मन

मी वरतून चौथी श्रेणी (बोले तो, 'माहितीपूर्ण') मागितली होती; वरतून दुसरी (पक्षी: 'मार्मिक') नव्हे.

सबब, आपण खालून चौथी ('भडकाऊ') दिली असतीत, तर आत्मा तृप्त झाला असता. ती तहान खालून दुसरीवर (= 'निरर्थक') भागवावी लागली.

श्रेणी देताना अशी हातची राखून देणे बरे नव्हे!

(मी आपणांस कधी 'भडकाऊ'पेक्षा कमी अशी कोणती श्रेणी कधी दिल्याचे आठवते काय? 'सढळ हस्त' म्हणजे काय, याबद्दल आपली कधी शिकवणी घ्यावी म्हणतो.)
=================================================================================================================================
आमची सर्वात लाडकी श्रेणी! म्हणून तर ती इतक्या मुक्तहस्ताने प्रदान करीत हिंडतो. शिवाय, प्रदानांती श्रेणिग्राहक हमखास भडकतो, असे निरीक्षण आहे; सबब, श्रेणी सार्थकी लागते.

जी श्रेणी दिली असता घेणारा भडकणार नाही, ती श्रेणी 'भडकाऊ' कसली?

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 17/12/2013 - 01:50

In reply to by 'न'वी बाजू

झकास.

आता फक्त अटलांटा भागात फिरण्यासारख्या, बघण्यासारख्या गोष्टींची यादी देऊन टाका. आमच्याकडून १४ तासावर तर आहे अटलांटा! ;-)

गोगोल Fri, 03/01/2014 - 22:18

In reply to by 'न'वी बाजू

त्या दोन पाकिस्तानी हडळी सारख्या दिसणार्या मुलींनी घेतली होती का?

अतिशहाणा Fri, 13/12/2013 - 21:56

बनाना लीफ नामक एका स्थानिक भारतीय रेस्टॉरंटमध्ये जबरदस्त वाईट अनुभव आला. मुंबई स्टाईल ६ प्रकारचे स्ट्रीट फूड अपेटायझर्स आणि ३ कोर्स अनलिमिटेड जेवण या दाव्याला भुलून तिथे खाण्याचे पातक सपत्नीक केले. तेलकट डाग पडलेल्या ताटल्या, पाण्याचे ओशट ग्लास आणि वास मारणारी आंबट लस्सी याकडे दुर्लक्ष करत स्ट्रीट फूड - चाट प्रकारांची लाळ पुसत वाट पाहत बसलो. सर्वप्रथम एका ताटलीत एक सिंगल पीस पाणीपुरी आली. ती लगेच संपली. त्यानंतर पाच दहा मिनिटांनी एक मिनी सामोसा आला. (बहुदा फ्रोजन समोसा गरम करण्यास तितका वेळ लागत असावा) मग आणखी वाट पाहिल्यावर नैवेद्य दाखवल्याप्रमाणे वाटीभर भेळ आली, नंतर गोल्फचेंडूच्या आकाराची एक कचोरी आली, (त्यात चटणी वगैरे नसल्याने ती मागवली असता बहुदा स्वाद किंवा तत्सम ब्र्यांडच्या प्रिझर्वेटिव युक्त चटण्या असतात त्यातली थोडी चटणी एका स्टीलच्या वाटीत आणून समोर ठेवली ) मग एक शेवपुरी आली आणि शेवटी तेलाने थबथबलेला मसाला डोसा. नंतर ३ कोर्स जेवणात फ्लॉवर रस्सा भाजी, तेलकट पुऱ्या किंवा नान आणि डाळीचा चिखल होता. कसेबसे पोटात ढकलून बाहेर आलो. दोघांचे प्रत्येकी १३.९९ डॉलर + ट्याक्स असे द्यावे लागले. टीप देण्याची इच्छा झाली नाही.

रेस्टॉरंटचा पटेल नामक मालक अत्यंत मुजोर होता. आत ३ पैकी दोन टेबलांवर गोरे ग्राहक होते व एकावर आम्ही भारतीय बसलो होतो. पटेलमहाशयांनी गोऱ्या ग्राहकांची जेवण आवडले का वगैरे आवर्जून चौकशी केली मात्र आमच्याकडे ढुंकून पाहण्याचे कष्ट घेतले नाहीत. वेट्रेस जवळपास नसताना मालकांकडे पाणी मागवल्यावर दुर्लक्ष केले व वेट्रेस येईपर्यंत वाट पाहावी लागली. एका गोऱ्या ग्राहकिणीने फक्त लस्सी व एकदोन ऍपेटायझर खाल्ले व मुख्य जेवणाची वाट न बघता आवरते घेतले. निघताना तिने फक्त दोनतीनच पदार्थ खाल्ल्याने कमी पैसे घेण्याची विनंती केली असता पटेलमहाशयांनी You opted for unlimited food असे म्हणून १४ दिडक्या वस्सूल करुन घेतल्या.

घरी येताना मी व बायको दोघांच्या पोटात प्रचंड ढवळून येत होते व मळमळत होते. डॉक्टरकडे वगैरे जावे लागले नाही याचे आभार मानत संध्याकाळी पोटभर वरणभात खाल्ल्यावर बरे वाटले.

रुची Sat, 14/12/2013 - 01:17

In reply to by अतिशहाणा

भारतीय रेस्तराँत भारतीय ग्राहकांना वेगळी आणि गोर्या ग्राहकांना वेगळी सर्विस देण्याचा अनुभव सार्वत्रिक दिसतोय :-)
आम्ही अलिकडे 'निर्वाण/णा' नावाच्या भारतीय रेस्तरॉंत गेलो असताना आमची ऑर्डर घ्यायला माणूस तब्ब्ल २५ मिनिटांनी आला आणि जेवण त्यानंतर ३० मिनिटांनी! आम्हाला लगेचच त्या रेस्तरॉंचे नाव 'निर्वाणा' का आहे ते समजले! आमच्या नंतर आलेल्या गोर्या दांपत्याची ऑर्डर ते आल्यावर पाचेक मिनिटात घेतली गेली आणि त्यांचे जेवण आमच्या बरोबरच आले. शिवाय अधूनमधून त्यांच्या टेबलापाशी जाऊन मधाळ हसू देऊन त्यांची विचारपूस चालली होती ते वेगळेच.

बॅटमॅन Sat, 14/12/2013 - 01:40

In reply to by रुची

तुम्ही जेवढी भार्तीय हाटेले पाहिली त्यांचा बह्वंशी अनुभव असाच होता की कसे?

बाकी भारतीयांच्या तुच्छतेबद्दल सहमत आहे.

'न'वी बाजू Sat, 14/12/2013 - 04:19

In reply to by बॅटमॅन

सरसकट वाईट अनुभव येतो असे म्हणणार नाही (पुरेसे चांगले अनुभवही गाठीशी आहेत), परंतु दुर्दैवाने अशा प्रकारचा अनुभव तितकाही दुर्मिळ/असामान्य नाही.

ऋषिकेश Sat, 14/12/2013 - 08:12

In reply to by रुची

मलाही बर्‍याच "मोठ्या" हाटिलात हा भेदाभेद जाणवला होता. मात्र आमच्या जवळ एका हाटिलात मूळच्या मालवणी काकू माझ्यासाठी दर रविवारी एक 'हलवा' राखून ठेवत असत / किंवा एखाद्द्या रविवारी दोन पीसेस देत असत तेव्हा पर्सनलाइज्ड सर्विसवर - भारतीयांनी ठरवलं तर- गिर्‍हाईक किती बांधून ठेऊ शकतो हे ही जाणवलं

मन Sat, 14/12/2013 - 12:18

In reply to by अतिशहाणा

बेडेकर मिसळ इथे येण्याचे अगत्याने करावे.
भारतीय्-अभारतीय सर्वांचा हटकून अपमान झाल्याचे पाहण्यात येइल अशी खात्री आहे.

अनुप ढेरे Sat, 14/12/2013 - 12:38

In reply to by मन

छ्या !
उगाच बदनाम नका करू बेडेकरवाल्यांना. मी तरी अजून अपमान केलेला पाहीला नाहिये त्यांनी कुणाचा. उगाच आगाऊपणा करणार्‍या गिर्‍हाइकांचा देखील !

मन Sat, 14/12/2013 - 13:01

In reply to by अनुप ढेरे

क्ष नावाची एखादी व्यक्ती य नावाच्या व्यक्तीशी चाम्गली वागली असेल तर झ नावाच्या व्यक्तीशीही चाम्गली वागेलच असे नाही.
य ने झ ला क्ष बद्दल चाम्गले बोलण्याचा आग्रह करुन उपयोग नाही, झ ने य ना क्ष बद्दल वाईट बोलण्याचा आग्रह करुन उपयोग नाही.

ज्याचा त्याचा अनुभव.
माझ्याशी वागणूक खराब होती. त्यचवेली हॉटेलात आलेल्या गोर्‍या व्यक्तीशीही वागणूक सौहार्दपूर्ण वाटली नाही.
तुम्हाला चाम्गली वागणूक मिळालेली असणे शक्य आहे.
तरीही मिसळ हादडायला एरव्ही तिकडे जाणे होतेच.

'न'वी बाजू Sat, 14/12/2013 - 20:05

In reply to by मन

त्यचवेली हॉटेलात आलेल्या गोर्‍या व्यक्तीशीही वागणूक सौहार्दपूर्ण वाटली नाही.

मुंजाबाच्या बोळातल्या 'बेडेकर टी ष्टॉल'मध्ये आजकाल गोर्‍या व्यक्तीसुद्धा येतात?

('गोर्‍या' अ‍ॅज़ इन 'गोर्‍याघार्‍या' तर नव्हेत ना?)
=================================================================================
मुंजाबाच्या बोळातच आहे ना अजून? की हलले इतरत्र? नाही म्हणजे, फारा वर्षांपूर्वी, नारायण पेठेत लहानाचा मोठा होत असताना, त्याची किमान दोन स्थित्यंतरे पाहिलेली आहेत, म्हणून विचारले.

मन Sat, 14/12/2013 - 20:17

In reply to by 'न'वी बाजू

तिथेच.
गोरा = युरोपीय वंशीय.
मलाही आश्चर्य वाटलं इतक्या गावात, आतामध्ये तो ते शोधत एकटाच आल्याच पाहून.

मन Sun, 15/12/2013 - 11:43

In reply to by अनुप ढेरे

बोळातील ठिकाणी मोठ्या अक्षरात नोटीस लावली आहे "वारजे-कर्वेनगरमधील शाखा आमची नाही. तिथे आमच्या नावाचा (गैर)वापर होत आहे"
कंसातील शब्द त्यांनी लिहिला नाही, ते त्यांना सूचित करायचे आहे; असे मी म्हणत आहे.

अनुप ढेरे Sat, 14/12/2013 - 23:15

In reply to by मन

चांगली वागणूक म्हणजे काय? जो पर्यन्त छान खायला घालतायत, शिवीगाळ नाही करत आहेत तो पर्यंत मी तरी समाधानी असेन. आता लोक तौबा गर्दी असली आणि त्या व्यवस्थापकानी भली मोठी वेटिंग लिस्ट दाखवली तरी लोक अहो अजून किती वेळ असं सारखं विचारतात... कोणीही वैतागेल !

मन Sun, 15/12/2013 - 11:45

In reply to by अनुप ढेरे

अधिक चर्चा नकोच. मी माझ्याकडून थांबत आहे.
मी कुणाला बेडेकरमिसळवाल्यांना वाईट म्हणण्याचा आग्रह करु इच्छित नाही.
कुणी मला बेडेकरमिसळवाल्यांना चांगले म्हणण्याचा आग्रह करु नये.

लॉरी टांगटूंगकर Sat, 14/12/2013 - 15:17

In reply to by अनुप ढेरे

त्यांच्यातला एक ढापण्या बोकड दाढीवाला येड्यासारखा वागतो. त्या दिवशी उगाचच तिखट तर्री मागितली तर कचकुन तिखट करणे (मला माझ्या पद्धतीने प्रमाण म्यानेज करायचे होते). त्यावर लिंबू मागितले तर फुकटचे सल्ले देणे वगैरे करत होता. त्या दिवशी नंतर तिथल्या एका ओळखीच्याला पकडून तूच सर्विस दे असं सांगितलं होतं

तो सोडल्यास सर्व जण लै भारी मंडळी आहेत.

मी Sat, 14/12/2013 - 21:06

In reply to by अतिशहाणा

तुम्ही फार सोशिक दिसता आहात, वुस्टर(एमए) मधे एक इन्डिया पॅलेस नामक अस्सल भारतीय माणसाने(म्हणजे अस्सल भारतीय म्हणून पाकिस्तानी माणसाने चालविलेले नव्हे) चालविलेल्या रेस्तरांमधे जाण्याचा कुयोग आयतेच चालून आला होता, ऑर्डर देताना जरा तिखट बनवा असे सांगितलेले तो एवढे मनावर घेईल असे वाटले नव्हते, पहिल्या घासानंतर बहुदा उपलब्ध सगळेच तिखट त्याने वापरले असावे अशी शंका आली, माझ्या मित्रांनी आचार्‍याला बोलावून त्याला आधी आग्रहाने ते खायला घातले व नंतर तो नको-नको म्हणत असताना बराच वेळ शिव्या खायला घातल्या, त्याचे पोट आणि त्यांचे मन भरल्यावर उठून(ऑफकोर्स पैसे न देता)घरी जाऊन ब्रेडावर भागविले.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 17/12/2013 - 02:03

In reply to by अतिशहाणा

तुम्ही म्हणता तसं सेल्फ-रेसिझम मी ही अनुभवलेलं आहे, पण अॉस्टीनमधली, निदान आम्ही जातो ती, रेस्टॉरंट्स अपवाद आहेत. अमेरिकन/ब्रिटीश पद्धतीचं उत्तर भारतीय आणि अगदी भारतीय पद्धतीचं म्हणावं असं दाक्षिणात्य, असे दोन प्रकारचे बुफे असणाऱ्या दोन रेस्टॉरंटांमधे आम्ही बरेचदा जातो. इतर स्नॅक टाईप खाण्याच्या दोन जागा आहेत. तिथे कुठेही अशा काही अडचणी नाहीत.

पण सगळ्या ठिकाणची बेसिन्स, टॉयलेट्स मात्र दळिद्री किंवा त्यापेक्षा थोडी बरी म्हणावीत अशी. एका ठिकाणी मालकांनी जागा चांगली ठेवली आहे तर गिऱ्हाईकं तिथे हात पुसून कागद कचऱ्याच्या पेटीत टाकत नाहीत. ते ही पायाने झाकण उचलायच्या कचरापेटीत. त्यामानाने, अगदी अमेरिकन डायनर दिसावं एवढं चकचकीत, गुळगुळीत दिसणारं एक रेस्टॉरंट आहे, तिथे अन्न चविष्ट नसलं तरी जायची सोय मात्र व्यवस्थित आहे ... बाकीच्या अमेरिकेसारखीच.

बॅटमॅन Sat, 14/12/2013 - 01:00

फिष टेंगा अन फिष बांबू शूट्स नामक आसामी पद्धतीच्या फिष डिषेस खाल्ल्या. फिश बांबू शूट्स चवीला खास नै, पण किंमत मात्र अंमळ नावासारखी, सबब त्यावर काट.
टेंगा मात्र उत्तम. गिरवीत मोहरी जाणवते, पण अंमळ आंबटपणही आहे. आवडले.

............सा… Mon, 16/12/2013 - 22:36

परवा माझ्या स्पीच क्लबच्या ग्रुप बरोबर "डुलुथ ग्रिल" मध्ये "लँब शँक " खाल्ला. पहील्या घासालाच निवर्तले व परत जन्मून खाऊ लागले. डिश अतिशय स्वादिष्ट होती. सगळे बडबडे, बहीर्मुख लोक हादडताना अक्षरक्षः स्पीचलेस झाले होते. माझ्या लँब शँक" बरोबर मीट स्ट्यू होता तो चवीला बराचसा भारतीय होता पण मसालट नव्हता. योग्य प्रमाणात कोथिंबीर, काबुली चणे, बटाटा,टोमॅटो हे घटक त्या स्ट्यूत घातले होते व मसाला भुरभुरल्यासारखी चव होती. फ्लेम ब्रेझ्ड शँकचे मीट पटकन निघात होते. ते मीट सहज निघते का हे आधीच विचारुन घेतले होते कारण सर्वांसमोर मेसी खायचे नव्हते.

रुची Tue, 17/12/2013 - 00:53

In reply to by ............सा…

लँब शँक हा अतिशय चविष्ट प्रकार आहे आणि बनवायलाही फार सोपा आहे. कांदा, लसूण, सेलरी, गाजर, चिकन स्टॉक आणि आपल्याला आवडणारी अर्ब्स वगैरे घालून ओव्हनमध्ये दोन-अडीच तास शिजवायला ठेऊन दिले की मांस अगदी मऊसूत शिजते. इथे एक चांगली पाकृ. आहे. सर्वसाधारणपणे त्याबरोबर बटाटे (मॅश्ड) खातात. तुम्ही लँब शँक बरोबर पुन्हा मीट स्ट्यू घेतलात म्हणून आश्चर्य वाटले कारण लँब शँक हा एका प्रकारे स्ट्यूच आहे. शँक्सच्या ऐवजी बकरीचे तुकडे वापरून हीच पाकृ वापरली आणि बरोबर थोडे छोटे बटाटे (आणि आवडत असल्यास थोडी स्टाऊट) घातली की आयरीश लँब स्ट्यू तयार! हे दोन्ही पदार्थ थंडीत खायला फार मजा येते.

............सा… Tue, 17/12/2013 - 01:01

In reply to by रुची

रुची, स्ट्यू होता त्या बोल मध्ये. त्या शँकबरोबर अत्यंत कमी मसाल्याचा काबुली चणे, टोमॅटो, गाजर, बटाटा, कोथिंबीर घातलेला रस्सा आला. तो अफाटच होता. मी काही वेगळं मागवलं नाही.

सविता Fri, 03/01/2014 - 17:48

मिनी वोक ओरीएन्टल किचन ह्या मॉडेल कॉलनी मधील एका अतिशय छोट्या पण अतिशय स्वच्छ ठिकाणी बर्मीज खो सुई ( उच्चारातील चू.भू.दे.घे.) हा एक अफलातून प्रकार खाण्यात आला.


(चित्र जालावरून साभार)

नारळाच्या दाट दुधातील ग्रेव्ही, नुसत्या लसूणावर परतलेले नूडल्स आणि बरोबर तळलेले नूडल्स , तळलेला कांदा,तळलेला लसूण, कांद्याची पात, लिंबू , बारिक चिरलेली मिरची इ. वेगळे मिळते.

नूडल्स वर ग्रव्ही ओतायची आणि मग तुमच्या आवडीप्रमाणे इतर पदार्थ वरून भुरभुरायचे...

अहाहा.... निर्मल आनंद(खूबसूरत मधल्या रेखा चा डायलॉग आठवा!)

किंमत फक्त २२० व्हेज ग्रेव्ही - दोन जणांना आरामात शेअर करता येईल(शिवाय आम्हाला कॉर्पोरेट डिस्काउंट म्हणून २०% टक्के सूट मिळाली.. दिल गार्डन गार्डन हो गया)

ॲमी Fri, 03/01/2014 - 18:57

In reply to by बॅटमॅन

माझ्या मते कॉर्पोरेट डिस्काउंट सर्व आयटी कंपन्यांना मिळतोच. बाकीच्यांच ठाउक नै. एक्सेस कार्ड दाखवावे लागते. पण मी जिथे काम केलय त्या कंपणीँना शक्यतो १० आणि कधीतरी १५% च मिळायचा. २०% म्हणजे भारीच!

सविता, मस्त फोटो. आधी सांगितल असत तर ऐसी कट्टा इथेच केला असता की :-)

सविता Mon, 06/01/2014 - 10:57

In reply to by ॲमी

कट्ट्याला वेळ आहे त्यामुळे अजूनही बदलू शकता जागा! (१८ जानेवारी ना?)

पण तिथे अँबियन्स झीरो आहे आणि एका वेळेला जास्तीत जास्त १६ लोक बसतात हे ध्यानात ठेवा.

पण मस्त पदार्थ पोटभर खाऊन बिल साऊथ इंडिज पेक्षा १/३ येईल हे नक्की!

सविता Mon, 06/01/2014 - 10:58

In reply to by बॅटमॅन

सेनापती बापट रस्ता परिसरातील सर्व कंपन्यांना मिळत असावे.

जाऊन मस्त चापा. बिल देताना जे आहे ते कार्ड लांबून हलवून दाखवा आणि परिसरतील कंपनीचे नाव घ्या (अ‍ॅक्सेंचुअर, सिग्मा, पर्सिस्टंट, यार्दी (ही आमची कुंपणी) , बिटवाईज, बीएमसी ). तो माणून आय-कार्ड निरखून बघत नाही, नुसते कार्ड आहे असे सांगितले तरी पुरते त्याला.

लास्ट टैम फारच आवडल्याने काल परत गेलो होतो तिकडे, आय-कार्ड पण विसरले होते. पण नुसते सांगितले तरी त्याने दिला डिस्काउंट. (अर्थात मी तिकडे किमान ७-८ वेळेला गेलेले असल्याने, त्याला इमेल वर एक दोन सल्ले आनि झोंमॅटो वर रिव्हू सुद्धा लिहिला असल्याने तो मला आता चेहर्‍याने ओळखत असावा ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही)

मन Mon, 06/01/2014 - 11:16

In reply to by सविता

हे असच लांबून आम्ही कार्ड हलवून दाखवतो कंपनीत महिन्यातून एकदा.
त्यांना वाटतं पोरगं रोज कामाला येतय.
महिन्याच्या महिन्याल खात्यात पगार जमा!!
;)