सिंधुआज्जी आणि टारझनचे पशू

#सिंधुआज्जी #संकल्पनाविषयक #आफ्रिका #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२३

सिंधुआज्जी आणि टारझनचे पशू

- देवदत्त

आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरचा एक निर्जन प्रदेश. सायंकाळचा समय. अटलांटिक महासागर आफ्रिकेचे चरण (ॲक्चुअली, नकाशाप्रमाणे बघितलं तर, कोपर किंवा काख) क्षाळीत होता. महासागरातून जमिनीकडे पाहिलं तर बॅकग्राऊंडला निबिड अरण्य, आणि फोरग्राऊंडला सोनेरी वाळूचा किनारा. पशुपक्ष्यांच्या हालचाली आणि आवाज वगळले तर निःस्तब्ध शांतता.

अचानक दोन गलबते दृगोचर झाली. एक गलबत झपाट्याने किनाऱ्याजवळ आले, आणि त्याच्या डेकवरून सागवानी लाकडाची सुबक फळी किनाऱ्यावर फेकली गेली. पेस्टल कलरचं नऊवारी पातळ नेसलेली आणि त्यावर बॉम्बार्डियर जॅकेट घातलेली एक वयस्कर स्त्री सा.ला.सु. फळीवरून चालत किनाऱ्यावर उतरली. एका खुशालचेंडू खादाडखाऊ खुनशी खलाशाने तिची ट्रंक आणि वळकटी किनाऱ्यावर फेकून दिली, आणि सा.ला.सु. फळी ओढून घेतली. गलबत लगबग पुढे निघून गेले. त्याच्या डोलकाठीवरील झेंडा मतलई वाऱ्यांच्या झुळुकीवर मोठ्या दिमाखात फडकत होता. चाणाक्ष वाचकांनो - तुम्ही जाणलेच असेल की तो साधासुधा झेंडा नव्हता; तर काळ्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या रंगाची कवटी आणि हाडे दर्शवणारा समुद्री चाच्यांचा झेंडा होता - जॉली रॉजर!

चाच्यांनी किनाऱ्यावर उतरवलेल्या वयस्कर स्त्रीने बॉम्बार्डियर जॅकेटच्या खिशातून पॉकेट डायरी बाहेर काढली, एक पान फाडलं आणि जांभळ्या स्केचपेनने ती त्यावर काहीतरी लिहू लागली. मजकूर लिहून झाल्यावर तिने ट्रंकमधून महाभृंगराज तेलाची रिकामी बाटली काढली, आणि त्यात चिठ्ठी ठेवून समुद्राच्या लाटांवर अर्पण केली. चिठ्ठीवर एकच शब्द होता - "Marooned." आणि त्यानंतर तारीख आणि अक्षांश रेखांश.

हे पहिलं काम आटपल्यावर ती स्त्रीने आपल्या बटव्यातून सॅटेलाईट फोन काढला आणि स्पीड डायलवरचं तिसरं बटण दाबलं. पलीकडे, सोमाली चाच्याने तात्काळ फोन उचलला.

"अगदी सुयोग्य ठिकाणी Maroon केलंत. शाब्बास, आणि धन्यवाद!"

"तुमच्यासाठी कायपण, कधीपण, सिंधुआज्जी!"

सिंधुआज्जी स्वतःशीच हसल्या.

काही दिवसांपूर्वी त्यांनी ब्रिस्टल ते बहामा क्रूझ शिपचा प्रवास सुरू केला होता. क्रूझ शिपने युरोपचा किनारा मागे टाकल्यानंतर सिंधुआज्जींनी आपल्या जीवश्च कंठश्च सोमाली चाच्यांना टेलेक्स धाडला होता. मग, चाचांचं आगमन होईपर्यंत सिंधुआज्जींनी क्रू. शि.च्या कप्तानाला केपांचं पिस्तूल दाखवून क्रू. शि. मोरोक्कोच्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनच्या बाहेर थांबवून ठेवलं होतं.

सोमाली चाच्यांचं एक गलबत - सांता मारिया - चाच्यांनीच पेरलेल्या समुद्री सुरुंगावरून जाताना स्फोट होऊन उध्वस्त झालं होतं. बाकी दोन जहाजांच्या कप्तानांमध्ये मार्गाबद्दल तात्त्विक मतभेद झाले होते. तात्त्विक मतभेदांचं रूपांतर रुसवेफुगवे, धुसफूस, आणि अबोला यांत झाल्यावर (सोमाली चाचे झाले म्हणून काय झालं, शस्त्रांशिवाय आणि शब्दांशिवायदेखील ते संवाद साधू शकत होते) अखेरीस सामोपचाराने निन्या गलबताने सुएझ कालव्यातून तर पिंटा गलबताने केप ऑफ गुड होपला वळसा घालून प्रवास केला होता. दोन्ही गलबतं एकसमयावच्छेदेकरून क्रूझ शिपपाशी पोहोचली होती; आणि त्यांनी सिंधुआज्जींचे अपहरण केले होते. (क्रू. शि.च्या कप्तानाने आपले जहाज रोखून धरणाऱ्या चाचीचा बंदोबस्त केल्याबद्दल सोमाली चाच्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला होता.)

सिंधुआज्जींनी स्वतःच्याच अपहरणाचा आणि किनाऱ्यावर सोडल्याचा बनाव का घडवून आणला होता?

गेल्या दहा हजार वर्षांत झाला नसेल अशा प्रथितयश ऑनलाईन दिवाळी अंकात लेख लिहिण्यासाठी सिंधुआज्जींना टारझनच्या कथांमधील पशूंचा मागोवा घ्यायचा होता. टारझन कथेतल्या उल्लेखानुसार, बंडाळी करणाऱ्या नाविकांनी टारझनच्या आईवडलांना आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर एका निर्जन प्रदेशात सोडून दिलं होतं, म्हणजेच मरून केलं होतं. त्यामुळे, “Life imitates art” या उक्तीनुसार आपल्या प्रवासाची सुरुवातही आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर निर्जन प्रदेशात maroon केलं जाऊन व्हावी असे सिंधुआज्जींचे मनोगत आणि मनोरथ होते. आता, टारझनच्या कथेत कुठे अपहरणाचा उल्लेख नव्हता; पण ती सिंधुआज्जींनी घेतलेली creative liberty होती.

सिंधुआज्जींच्या मनोगताची आणि मनोरथाची पूर्तता झाली होती, आणि टारझनच्या कथांमधील पशूंचा अभ्यास करण्यासाठी त्या सज्ज झाल्या होत्या. निसर्गतज्ज्ञ जॉर्ज शेल्लरच्या सूचनेनुसार दुर्बीण, नोंदवही, आणि प्राणी पाहायची इच्छा या तिन्ही बाबी (आणि त्याव्यतिरिक्त ट्रंक, वळकटी, आणि बटव्यात भरलेल्या अनेकविध चीजवस्तू) सोबत बाळगत सिंधुआज्जींनी आपला प्रवास सुरू केला.

शंभरएक मीटरच्या (रुंदी, लांबी नव्हे - तो काय प्रभादेवीच्या किंवा बॅण्डस्टॅण्डचा किनारा आहे काय?) वालुकामय किनाऱ्यानंतर वृक्षराजी सुरू होत होती; त्या दिशेला सिंधुआज्जींनी कूच केले. हळूहळू वळसे घेत जाणाऱ्या एका निर्झरास पाहून त्या हसल्या. निर्झराच्या लाटांवर पाय टाकुनी बसलेला औदुंबरासारखा वृक्षराज पाहून त्यांचे हसू अधिकच रुंदावले. सिंधुआज्जींनी वर पाहिले. वृक्षाच्या विस्तीर्ण शाखांमध्ये त्यांच्या सूचनेबरहुकूम बांधलेल्या ट्री हाऊसखाली "सुस्वागतम" लिहिलेली डोअरमॅट दिमाखात फडकत होती. सिंधुआज्जींनी विवक्षित शीळ वाजवली आणि ट्री हाऊसमधून दोराची शिडी खाली फेकली गेली. "सिंधुआज्जींनी मारली उडी, आणि सरसर चढल्या शिडी"चे प्रात्यक्षिक दाखवत शिडी चढून सिंधुआज्जी घरात गेल्या.

"नमस्कार सिंधुआज्जी! आपले स्वागत आहे!" आपल्या शुभ्र दंतपंक्ती दाखवत एका तरुणाने त्यांचे स्वागत केले. "मी वॅल वालावलकर. तुमचा वाटमाऱ्या - आपलं, वाटाड्या!"

"नमस्कार वॅल," सिंधुआज्जी म्हणाल्या. "तुम्ही आफ्रिकेतील पशू या विषयाचे जाणकार आहात आणि त्याबद्दल दीर्घ व्यक्त होता असं मला सांगण्यात आलं. मला वाटतं की आपण प्रवासाची सुरुवात मार्जारवर्गीय प्राण्यांपासून करावी.”

"जरूर," वॅल म्हणाला. "आफ्रिका म्हटली की सिंह आलेच!"

"सिंह काय म्हणताय? न्युमा (Numa) म्हणा किंवा सॅबोर (Sabor) म्हणा. न्युमाला आयाळ असते, सॅबोरला नसते," सिंधुआज्जी विजयी मुद्रेने म्हणाल्या.

"ओके ओके. न्युमा म्हणजे सिंह, सॅबोर म्हणजे सिंहीण," वॅल थोडासा कन्फ्यूज झाला होता.

"आणि एल अड्रेआ म्हणजे काळा सिंह. उत्तर आफ्रिकेतील सिंह," सिंधुआज्जींची मुद्रा अधिकच विजयी झाली.

"गेली पन्नास-साठ वर्षं उत्तर आफ्रिकेत सिंह नाहीत. त्यांची शिकार झाली," वॅल दुःखी चर्येने म्हणाला.

"माहितीये मला. काही वर्षांपूर्वी मला एकजण भेटला होता. तो म्हणाला, मी उत्तर आफ्रिकेतला मोठा शिकारी आहे. तिथे बिबळे, उंट, काळवीट, सिंह यांची शिकार केलीय! मी म्हटलं - काहीही बोलू नका, उत्तर आफ्रिकेत सिंह नाहीत. तर म्हणतो कसा, बरोबर! मी सगळ्याच सिंहांची शिकार केली."

रेड बुलचा एक घोट घेऊन सिंधुआज्जी पुढे बोलू लागल्या, "असो. एल अड्रेआ नाही तरी न्युमा आणि सॅबोर दाखवाल ना? आणि शीता?"

"शीता? चित्ता म्हणायचंय का तुम्हाला?"

"नाही नाही. शीता (Sheeta) म्हणजे बिबळ्या," सिंधुआज्जींनी खुलासा केला.

"बरं. तुम्हाला न्युमा, सॅबोर, शीता सगळं दाखवू."

"आणि जा? जातो?"

"कुठे जाऊ? आणि तुम्ही जातो म्हणता? जाते म्हणत नाही? म्हणजे, तुमचं प्रोनाऊन काय ते मला सांगा, मी लक्षात ठेवीन."

"जाते कशाला म्हणू? मला कुठे जात्यावरच्या ओव्या रचायच्या आहेत?”

"काय??"

"अहो विनोद केला हो. जा (Ja) म्हणजे ठिपकेदार सिंह, आणि जातो (Jato) म्हणजे सिंह आणि सेबर-टूथ वाघ यांची संकरित प्रजाती! 'टारझन द टेरिबल'मध्ये उल्लेख आहे त्यांचा."

वॅलने सुस्कारा सोडला. "सिंहांना बालपणी ठिपके असतात. सिंह मोठे होतात तसे ते ठिपके अंतर्धान पावतात. केनियात ठिपकेदार सिंहांच्या आख्यायिका आहेत, पण सबळ पुरावे नाहीत."

"आणि जातो?"

"सेबर-टूथ वाघ नामशेष झाले त्याला हजारो वर्षं झाली, तर त्यांची सिंहांबरोबर संकरित प्रजाती कुठून येणार? आणि हो, सिंह आणि वाघीण यांचा संकर झाल्यास लायगर जन्माला येतात, पण नर लायगरांना पिल्लं होत नाहीत. तशी नर खेचरांनाही होत नाहीत म्हणा. तर, जातो अशी प्रजाती जरी असती तरी तग कसा धरून राहणार?"

"ठीक आहे. उद्या न्युमा, सॅबोर, शीता आणि इतर दिसतील ती मांजरं बघायला जाऊ. ठीक पाच वाजता ट्री हाऊसवर येऊन घुबडाच्या आवाजात शीळ वाजवा. गुड नाईट."

पडत्या फळाची आज्ञा घेऊन वॅल सटकला. नजीकच्या बांबूच्या बनात स्वतःसाठी बांधलेल्या क्र. ५४ च्या घरी जाताना तो (माणसाच्या आवाजात) शीळ घालत होता - "बांबूचे घर पहायला हवे, बांबूच्या घरात रहायला हवे"

सिंधुआज्जींनी पपनस, पर्सीमन, पीच, पेअर असा माफक फलाहार केला आणि त्या निद्रिस्त झाल्या.

दुसऱ्या दिवशी पहाटे ठीक पाच वाजता सिंधुआज्जींना घुबडाच्या आवाजातील शीळ ऐकू आली. त्या तयारच होत्या, आणि पुन्हा एकदा "सिंधुआज्जींनी मारली उडी, आणि सरसर चढल्या शिडी"चे प्रात्यक्षिक दाखवत, वॅल वालावलकरने विमानातून सोडलेली शिडी चढून त्या विमानात स्थानापन्न झाल्या.

पुढचे बरेच तास विमानातून प्रवास करताना सिंधुआज्जींनी सिंहांचे कळप पाहिले, खडकावर बसून ऊन खाणारे बिबळे पाहिले, देशोदेशी निर्यात केले जाऊन फुका मारले जाऊ या भयाने सैरावैरा पळणारे चित्ते पाहिले, आणि कॅराकल, सर्व्हल इत्यादी रानमांजराच्या आकाराचे मार्जारवर्गीय प्राणीही पाहिले.

यादरम्यान, आपल्या नोंदवहीत नोंदी करत सिंधुआज्जींनी वॅलला विचारले होते,

"या मांजराचं भक्ष्य असलेले प्राणी आपल्याला दिसतील ना? पॅक्को (Pacco) म्हणजे झेब्रा, होर्टा (Horta) म्हणजे डुक्कर, बारा (Bara) म्हणजे हरण, वाप्पी (Wappi) म्हणजे कुरंग?"

"कुरंग? एखाद्या प्राण्याचा रंग तुम्हाला आवडत नसेल तरी असं बॉडी-शेमिंग करणं शोभतं का तुम्हाला सिंधुआज्जी?" वॅलने सात्त्विक संतापाने विचारले होते.

"अहो, कुरंग म्हणजे वाईट रंगाचा प्राणी असं नाहीये. कुरंग म्हणजे अँटेलोप. भारतातल्या काळवीटासारखे. त्यांना भरीव शिंगं असतात आणि ती शिंगं दरवर्षी गळत नाहीत. हरणांची शिंगं पोकळ असतात आणि दरवर्षी गळून नवीन उगवतात."

"अच्छा, कुरंग हा शब्द मला माहित नव्हता. थँक्स हं, सिंधुआज्जी!"

"मुद्द्याचं बोला! हे सगळे प्राणी दाखवणार ना मला?"

"नाही सिंधुआज्जी, झेब्रे पश्चिम आफ्रिकेत नसतात; फक्त पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेत असतात. उत्तर आफ्रिकेतले काही देश सोडले तर आफ्रिकेत हरणं नाहीत. बाकी, कुरंगांचे आणि डुकरांचे निरनिराळे प्रकार आपल्याला दिसू शकतात. पण लक्षात ठेवा, जंगलात प्राणी दिसतील याची खात्री नसते."

"आपण प्रयत्न तर करू! आणि इतर प्राण्यांचं काय? टॅन्टोर (Tantor) म्हणजे हत्ती, बुटो (Buto) म्हणजे गेंडा, बोल्गानी (Bolgani) म्हणजे गोरिल्ला. किती सुंदर प्राणी आहेत ते!"

"प्रयत्न करू," वॅल म्हणाला. सिंधुआज्जींच्या दुर्दम्य आशावादाने तो थकून गेला होता.

तरीही यथाशक्ती प्रयत्न करून वॅलने जमतील तेवढ्या प्रजातींचे प्राणी सिंधुआज्जींना दाखवले. गोरिल्ला जंगलात दिसणं कठीण असल्याने त्याने एका शहरातल्या प्राणिसंग्रहालयावर विमान नेऊन तिथले गोरिल्ले दाखविले. सिंधुआज्जी माफक प्रमाणात खूष झाल्या.

संध्याकाळी ट्री हाऊसला परतल्यावर, नवलकोल बार्बेक्यू करत सिंधुआज्जी वॅलला म्हणाल्या, "सर्वात महत्त्वाचं राहून गेलं! मंगानी (Mangani) कपि-वानर या प्रजातीबद्दल मला माहिती सांगा."

"टारझनच्या गोष्टींमधले मंगानी कपि-वानर? टारझनच्या वडिलांना मारणारे, बाल-टारझनला सांभाळणारे?"

"हो हो, तेच ते. त्यांची स्वत:ची भाषा आहे, ते चंद्राकडे बघून ओओओओओ अशी आरोळी ठोकतात, आणि कधीकधी मातीचे ड्रमदेखील वाजवतात."

"अहो सिंधुआज्जी, असे प्राणी अस्तित्वात नाहीत."

"असं कसं? एडगर राईस बरोजने सविस्तर वर्णन केलंय त्यांचं. आणि ते गोरिल्ला नाहीत हेसुद्धा लिहिलंय. गोरिल्लाला बोल्गानी म्हणतात; ते आणि मंगानी यांत वैर असतं; हे सगळं लिहिलंय. बरोजजीने लिखा है तो कुछ सोच समझ के ही लिखा होगा ना?"

वॅल हसला. "अहो सिंधुआज्जी, अशी प्रजाती असती तर त्या काळच्या किंवा नंतरच्या वैज्ञानिक साहित्यात काहीतरी उल्लेख आला असता ना? आणि तुमचा एडगर राईस बरोज आफ्रिकेत आला तरी होता का कधी? अमेरिकेतल्या घरी बसून कपोलकल्पित गोष्टी लिहिल्या त्याने."

"मग काय झालं? ज्यूल्स व्हर्ननेदेखील घरी बसूनच लिहिल्या ना गोष्टी!" सिंधुआज्जी सात्विक संतापाने म्हणाल्या.

"खरंय. पण ज्यूल्स व्हर्नच्या गोष्टींना सबळ वैज्ञानिक आधार होता. बरोजच्या गोष्टी वाचकांना रंजक वाटाव्यात या एकाच हेतूने लिहिलेल्या, सवंग होत्या. म्हणून तर त्याच्या पुस्तकांमध्ये अतर्क्य आणि अशक्य प्राणी आणि मानव असतात. मघाशी तुम्ही 'टारझन द टेरिबल'चं म्हणालात. अहो, त्या पुस्तकात ग्रफ नावाच्या, ट्रायसेराटॉप्ससारख्या प्राण्यांचासुद्धा उल्लेख आहे. वाझ-डॉन आणि हो-डॉन नावाच्या, शेपटीवाल्या मानवी प्रजाती आहेत असाही उल्लेख आहे.”

"किती गंमत ना? अशा प्रजाती खरंच असत्या तर आपण गाणं म्हटलं असतं - शेपटीवाल्या प्रजातींची एकदा भरली सभा, वाझ-डॉन होता सभापती मधोमध उभा!"

"गंमत म्हणून ठीक आहे. पण सांगायचा मुद्दा हा की एडगर राईस बरोज हा काही विज्ञानकथा लिहीत नव्हता. त्या काळातल्या वाचकांना काय आवडेल हे समजून तशा गोष्टी लिहिणं हा त्याचा हातखंडा होता. मग यात वीर, रौद्र, शृंगार, बीभत्स असे बरेच रस आले. म्हणून तर 'टारझन द टेरिबल'मध्ये हो-डॉन प्रजातीच्या एका धर्मगुरूला टारझनची बायको जेन आवडते आणि तो तिचं अपहरण करतो; पुढे टारझन तिला वाचवतो वगैरे गोष्टी. नरमांसभक्षक टोळ्यांच्या गोष्टी. वगैरे, वगैरे."

थोडंसं पाणी पिऊन वॅल पुन्हा बोलू लागला, "बरोजच्या सुरुवातीच्या कादंबऱ्यांमध्ये पश्चिम आफ्रिकेतील कृष्णवंशीय लोक क्रूर, नरमांसभक्षक असे दाखवलेत. पुढच्या कादंबऱ्यांमध्ये पूर्व आफ्रिकेचे वझिरी टोळीचे कृष्णवंशीय लोक शूर आणि इमानदार दाखवलेत, पण तरीही श्वेतवंशीय टारझन त्यांच्यापेक्षा अधिक हुशार, ताकदवान, शूर वगैरे दाखवलाय. श्वेतवंशीय लोकांमध्येही इंग्लंड, अमेरिका, आणि फ्रान्सचे लोक चांगले, आणि जर्मनी आणि रशियाचे लोक वाईट अशी ढोबळ मांडणी केलीय. सांगायचा मुद्दा हा की एडगर राईस बरोजच्या कादंबऱ्या टाईमपास म्हणूनच ठीक आहेत. त्यांत फार अर्थ शोधू नये."

बोलून बोलून वॅलचा घास कोरडा पडला होता. त्याने सिंधुआज्जींकडे टॅमप्लीस मागितली, आणि रेड बुलचा एक कॅन फस्त करून तो पुन्हा बोलू लागला:

“एखाद्या देशातल्या माणसांविषयी आणि अगदी पशुपक्ष्यांविषयी प्रांजळपणे लिहायला लेखक सहृदय असणं आवश्यक असतं. उदाहरण सांगायचं झालं तर, जिम कॉर्बेट भारतात जन्मला, भारतात वाढला, अनेक दशकं भारतीय लोकांमध्ये मिळूनमिसळून राहिला. त्याच्या पुस्तकांमध्ये माणसांबद्दल आणि प्राण्यांबद्दलही खरोखरचा जिव्हाळा आणि आपुलकी जाणवते. दक्षिण भारतातलं उदाहरण घ्यायचं झालं तर केनेथ अँडरसन. अगदी आफ्रिकेबद्दल बोलायचं झालं तर ॲड्रीयन बोशीयर दक्षिण आफ्रिकेच्या जमातींमध्ये राहिला आणि त्यांच्या संस्कृतीचा पाईक झाला. हे सगळे जण आणि तुमचा बरोज यांची तुलनाच होऊ शकत नाही.”

सिंधुआज्जींनी सुस्कारा सोडला. "म्हणजे आफ्रिकेतील पशूंचा मागोवा घ्यायची कल्पना योग्य नव्हती तर?"

"तसं नाही सिंधुआज्जी, आपण उद्या पुन्हा प्राणी पाहायला जाऊच. पण पूर्वग्रह बाजूला ठेवून जाऊ आणि जे प्राणी दिसतील त्यांत आनंद मानू. तुम्ही झकास लेख लिहाल असं मटेरियल शोधू आपण. आणि तुम्हाला अजून अभ्यास करायचा असेल तर चांगल्या शास्त्रज्ञांची पुस्तकं वाचा. एडगर राईस बरोज गेला खड्ड्यात. डील?"

"डील!" सिंधुआज्जी उत्साहाने म्हणाल्या, आणि बटव्यातील धोत्र्याची पाने काढून चहाची तयारी करू लागल्या.

---

Partial glossary (*E&OE)

Word in Tarzan World Meaning Initial Reference In
Bara Deer Tarzan of the Apes
Bolgani Gorilla Tarzan of the Apes
Buto Rhinoceros Tarzan and the Golden Lion
Gryf Dinosaur combining features of triceratops, stegosaurus, and other dinosaur species Tarzan the Terrible
Horta Boar Tarzan of the Apes
Ja Spotted Lion Tarzan the Terrible
Jato Hybrid of lion and saber-tooth tiger Tarzan the Terrible
Mangani Anthropoid Ape Tarzan of the Apes
Numa Lion Tarzan of the Apes
Pacco Zebra Tarzan and the Golden Lion
Sabor Lioness Tarzan of the Apes
Sheeta Leopard Tarzan of the Apes
Tantor Elephant Tarzan of the Apes
Wappi Antelope Tarzan and the Golden Lion

---

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

खतरनाक , नेहमीप्रमाणे देवदत्त

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बोले तो, (हे लिखाण) खतरनाक तथा टिपिकल देवदत्त असायला हरकत नसावी; नव्हे, (तसे ते) असावेच. दुर्दैवाने, लहानपणी (किंवा फॉर्दॅट्मॅटर कधीही) टारझन न वाचल्याकारणाने, बहुतांश संदर्भ (माझ्या) डोक्यावरून गेले, नि त्यामुळे (मला) तितकीशी मजा आली नाही. (याला जबाबदार अर्थात मीच, तथा दोष (आणि मर्यादा) सर्वस्वी माझीच! मात्र, केवळ देवदत्तच्या लिखाणातले संदर्भ लागावेत, म्हणून (देवदत्तचे लिखाण कितीही उच्च कोटीचे असले, तरीही), आता, या वयात, ऑफऑलदथिंग्ज़ टारझन वाचायला घेईन, असे वाटत नाही. त्यामुळे, असो.) त्यामुळेच, या कथेवरील माझ्या प्रतिक्रियासुद्धा (देवदत्तच्या इतर लेखांवरील माझ्या प्रतिक्रियांच्या तुलनेत) बऱ्याचश्या subdued तथा काहीश्या अवांतर आहेत, त्याला अर्थात (माझा) नाइलाज आहे.

मात्र, बरोज़छाप पांढऱ्या लेखकांच्या (केवळ पांढऱ्यांच्या कलोनियल/बिगरकलोनियल ग्लोबल रीचमुळे जगभर खपलेल्या) 'दाकाराई सुमन ओकोये'छाप कथांची ही उत्कृष्ट खिल्ली असू शकेल, असा केवळ अंदाज बांधू शकतो.

इत्यलम्|

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिंधुआजी राॅक्स, अॅज युज्वल.
"गेल्या दहा हजार वर्षांत झाला नसेल अशा प्रथितयश ऑनलाईन दिवाळी अंकात" अगदी अगदी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This too shall pass!

एक नंबर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

या खेपेस स्लॉथ्या दिसला नाही तो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऍटलस पर्वतातील अस्वलांचं शिरकाण झाल्याचा निषेधार्थ या ट्रीपवर बहिष्कार टाकलाय. (इति स्लॉथ्या)

टारझनच्या कथेत स्लॉथ्याचा उल्लेख नाही, मग त्याला कसं नेणार? (इति सिंधुआज्जी)

त्या आजी एकवेळ चालतील, पण ते अस्वल नको यंदा. (इति संपादकमंडळ)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

You just made this up, didn’t you? Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Totally

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या अस्वलाचं स्लॉथ्याबद्दल काय म्हणणं पडलं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Biggrin Biggrin झकास!
पण राहून राहून वाटलं की सिंधुयाज्जींनी पॅस्टेलऐवजी मरून रंगाचं पातळ नेसायला हवं होतं....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाटलीतली चिठ्ठी जांभळ्या स्केचपेनने लिहिली की! आता, प्रसंगासाठी पातळसुद्धा सिंधुआज्जी जर मरून रंगाचे घालू लागल्या, तर (मरूनचा अतिरेक होऊन) सिंधुआज्जी मरून पडतील ना!

मग कसे व्हायचे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"सेबर-टूथ वाघ नामशेष झाले त्याला हजारो वर्षं झाली, तर त्यांची सिंहांबरोबर संकरित प्रजाती कुठून येणार? आणि हो, सिंह आणि वाघीण यांचा संकर झाल्यास लायगर जन्माला येतात, पण नर लायगरांना पिल्लं होत नाहीत. तशी नर खेचरांनाही होत नाहीत म्हणा. तर, जातो अशी प्रजाती जरी असती तरी तग कसा धरून राहणार?"

हे एक. दुसरे म्हणजे, (आत्ताच चटकन चाळलेल्या विकीसंशोधनाप्रमाणे) सेबरटूथ वाघांचा रहिवास अमेरिका खंडातला. ही (टारझनकथांमधली) सिंहमंडळी आफ्रिकेतली. (तसेही, आफ्रिकेत माझ्या कल्पनेप्रमाणे सेबरटूथ राहूद्यात, परंतु कोठलीच वाघमंडळी (कधीच) राहात नसावीत. (चूभूद्याघ्या.)) कसे जमायचे?

पूर्वी एकदा, (ऐकीव कथेप्रमाणे) 'शेर का बच्चा हूँ!' म्हणून गमजा मारणाऱ्या एका सद्गृहस्थास कोणीतरी 'बोले तो, शेर तेरे घर में आया था, या तेरी माँ जंगल में गयी थी?' असे विचारून गार केले होते, त्याची आठवण झाली. चालायचेच.

मग, चाचांचं आगमन होईपर्यंत सिंधुआज्जींनी क्रू. शि.च्या कप्तानाला केपांचं पिस्तूल दाखवून क्रू. शि. मोरोक्कोच्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनच्या बाहेर थांबवून ठेवलं होतं.

हे विनोद म्हणून लिहिले आहे, हे उघड आहे. मात्र, १९७८ साली इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे, खेळण्यातली बंदूक तथा क्रिकेटचा बॉल (बाँब म्हणून) दाखवून खरोखरच अपहरण, (तेही भारतातल्या भारतात!) झाले होते. आता बोला!

"खरंय. पण ज्यूल्स व्हर्नच्या गोष्टींना सबळ वैज्ञानिक आधार होता..."

अं... 'अराउंड द वर्ल्ड इन एटी डेज़' व्हर्नचेच ना? त्यातला 'इंटरनॅशनल डेट लाइन क्रॉस करणे' वगैरे (तेवढाच काय तो) 'सबळ वैज्ञानिक आधार' असलेला भाग जमेस धरला, तरीही?

(सांगण्याचा मतलब, व्हर्नसुद्धा त्यातलाच!)

-----------------------------------------------------

दुवा

दुवा

ज्यात फिलियस फॉग आणि पासेपार्तू औदा नावाच्या मुलीला सती जाण्यापासून वाचवतात. आता, 'औदा' असे नाव कोठल्या (कोणत्याही धर्माच्या) हिंदुस्थानी मुलीचे असू शकते? तेही सोडा. ही औदा मुंबईच्या एका पारशी व्यापाऱ्याची मुलगी असते, आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिचे लग्न बुंदेलखंडाच्या थेरड्या राजाशी लावून दिलेले असते, तो गचकतो, म्हणून सतीचा प्रसंग. आता, पारशी लोक सतीची प्रथा कधीपासून पाळू लागले? दुसरे म्हणजे, बुंदेलखंडाचा राजा, बोले तो हिंदुस्थानातला संस्थानिक, हा हिंदू, मुसलमान, शीख, किंवा फार फार तर नवपरिवर्तित ख्रिस्ती असू शकतो. (अगदीच झाले तर बौद्ध किंवा जैनही असायला हरकत नाही.) मात्र, हिंदुस्थानात कधी पारशी संस्थानिक झाल्याचे ऐकलेले नाही ब्वॉ. (आणि, तेही, बुंदेलखंडात?) आता, या पारशी मुलीचा बाप, कितीही लोभी म्हटला, तरीसुद्धा, आपल्या मुलीचे लग्न (पैशांकरिता का होईना, परंतु) बिगरपारश्याशी कसे काय लावून देईल? पारशी लोक या बाबतीत कट्टर असतात ना? मग, कितीही पैसे मिळाले, तरी हा पारशी बाप धर्मबहिष्कृत (आणि, पर्यायाने, समाजबहिष्कृत, तेही विशेषत: एकोणिसाव्या शतकात!) होण्याची जोखीम कशाला घेईल? (अपवाद आहेत, कल्पना आहे.) पण येथे कोणाला पत्ता लागणार आहे? सबब, ठोकुनि देतो ऐसा जे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0