रवांडामधील वंशसंहार

#रवांडा #संकल्पनाविषयक #आफ्रिका #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२३

रवांडामधील वंशसंहार

- उज्ज्वला

११ एप्रिल ते १४ मे १९९४ या काळात रवांडा देशातील ५९ हजार तुत्सी लोकांपैकी ५० हजारांपेक्षा जास्त लोकांची भोसकून हत्या करण्यात आली. न्यामाता हे ब्युजेसेरा या छोट्या, टेकड्यांनी आणि दलदलीने युक्त प्रांतातील एक छोटेसे गाव. तिथे तुत्सी लोक मोठ्या संख्येने होते. जीव वाचवायला काहींनी चर्चचा आश्रय घेतला, तर काही टेकड्या, जंगले यांत लपू लागले. १४, १५ व १६ एप्रिल रोजी न्यामाताच्या चर्चमध्ये आसरा घेतलेल्या ५ हजार लोकांची कत्तल झाली. त्यात सैनिकांच्या बरोबरीने हुतु जमातीच्या सर्वसामान्य लोकांचा सहभाग होता. मे महिन्याच्या मध्यापर्यंत चाललेले हे निर्घृण हत्याकांड अत्यंत पद्धतशीर नियोजन करून घडवले होते. भेदरलेल्या, लपलेल्या तुत्सी लोकांना पाठलाग करून वेचून वेचून मारत होते. हे सर्व दिवसाउजेडी जमेल तितके. मग 'युद्धविराम'. पुन्हा दुसऱ्या दिवशी नव्या उत्साहात, गाणी म्हणत हल्लाबोल.

या सर्वाचा लेखाजोखा जाँ आत्झफेल्ड या फ्रेंच भाषक पत्रकाराने आपल्या तीन पुस्तकांतून मांडला. त्यातले पहिले 'दाँ ल न्यू द ला व्ही' – उघडेवाघडे आयुष्य – हे या शिरकाणातून वाचलेल्या १४ जणांचे कथन आहे.

दुसरे पुस्तक 'ला सेझों दे माशेत' – सुऱ्यांचा मोसम – तुत्सी लोकांच्या हत्याकांडात सामील झालेल्या व नंतर तुरुंगात टाकलेल्या हुतु समाजातील कैद्यांच्या मुलाखतीवर आधारित हे पुस्तक आहे.

तिसरे, 'ला स्त्रातेजी देझांतिलोप' – काळवीटांचे धोरण, हे तुत्सी लोक या वांशिक कत्तलीनंतर कसे जगत आहेत आणि हुतु व तुत्सी जमातींत सलोखा कसा दुरापास्त आहे यावर प्रकाश टाकते.

पुस्तकाचं मुखपृष्ठ

२००० साली प्रसिद्ध झालेले हे पुस्तक १९९७ ते १९९९ मध्ये अनेक खेपा घालून, लोकांना बोलते करत लिहिले आहे. पुस्तकात इतरही काही जणांचा ओझरता उल्लेख आहे.

यातील दाँ ल न्यू द ला व्ही – उघडेवाघडे आयुष्य – या पुस्तकाचा परिचय करून घेण्यापूर्वी थोडा इतिहास पाहू.

  • रवांडा हा देश १८८४ साली जर्मनीच्या संरक्षण छत्राखाली आला.

  • १८९९मध्ये जर्मन ईस्ट आफ्रिका कंपनीचा अंमल सुरू झाला.

  • १९१६मध्ये (पहिल्या महायुद्धादरम्यान) रवांडावर बेल्जियमने कब्जा केला.

  • १९२२ साली लीग ऑफ नेशन्स या आंतरराष्ट्रीय (वसाहतवादी) संस्थेने रवांडा – उरुंडी हे बेल्जियमच्या आधिपत्याखाली असतील यास मान्यता दिली. (उरुंडीलाच बुरुंडी असे म्हणतात. तेथे वेगळा राजा होता.) मात्र तेथे स्थानिक राजेशाही होतीच.

  • राजाला म्वामी म्हणत व १९३१मध्ये रवांडामध्ये तुत्सी जमातीचा राजा आला - त्याचे नाव म्युतारा (तिसरा). त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला व त्याच्या कार्यकाळात, म्हणजे १९५९पर्यंत रोमन कॅथलिक संप्रदाय तेथे प्रस्थापित झाला.

  • १९३३ साली रवांडा – उरुंडी येथील जनतेला त्यांच्या जमातीनुसार ओळखपत्र मिळाले. हुतुंच्या मानाने तुत्सी किंचित उजळ होते तर हुतु मात्र काळेशार होते. उच्चवर्गीय लोक तुत्सी – राजेशाहीमध्ये सत्ता त्यांच्या हाती होती. बेल्जिअन अधिपत्याच्या काळात हुतुंना कामाला जुंपले जाई व तुत्सींना मुकादमी देत. शाळा, प्रशासन, एकूण समाजात तुत्सींना झुकते माप मिळे.

  • १९४५मध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर लीग ऑफ नेशन्सचे रूपांतर United Nations Organisation [UNO]मध्ये झाल्यावर रवांडा – उरुंडी यांचे विश्वस्तपद हे UNOकडे गेले.

  • १९५७मध्ये हुतु जमातीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.

  • २४ जुलै १९५९ रोजी राजाचा मृत्यू झाल्यावर तेथे दोमिनिक अम्बोन्युम्युत्वा [Dominique Mbonyumutwa] या राजेशाहीविरोधी हुतु नेत्याचा उदय झाला.

  • ३ सप्टेंबर १९५९ रोजी Union NAtionale Rwandaise [UNAR] हा पक्ष स्थापन झाला. तो राजेशाहीच्या बाजूने होता.

  • १ नोव्हेंबर १९५९ रोजी दोमिनिक अम्बोन्युम्युत्वा यांच्यावर हल्ला झाला व त्याचा वचपा म्हमहणून हजारो तुत्सी लोकांना ठार मारण्यात आले.

  • १९६०मध्ये निवडणुका जाहीर झाल्या व जानेवारी १९६१मध्ये राजेशाहीविरोधी कौल पडला.

  • २८ जानेवारी १९६१ रोजी दोमिनिक अम्बोन्युम्युत्वा हे प्रभारी राष्ट्राध्यक्ष झाले.

  • बेल्जियमने १ जुलै १९६२ रोजी रोजी रवांडा व बुरुंडी यांना दोन देश म्हणून संपूर्ण स्वातंत्र्य बहाल केले. (बुरुंडीमध्ये अजून राजेशाही होती.)

  • २६ ऑक्टोबर १९६२ रोजी ग्रेग्वार कायीबांदा [Grégoire Kayibanda] यांची रवांडाचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली. ते हुतु जमातीचे होते.

  • १९६३ साली तुत्सी जमातीने बुरुंडी देशातून सूत्रे हलवून गनिमी हल्ला केला, त्याचा सूड रवांडातील तुत्सी लोकांच्या हत्येने घेतला गेला.

  • १९६५पर्यंत कित्येक तुत्सींनी देशांतर केले. जवळजवळ निम्मे तुत्सी देशाबाहेर पडले. बर्ट्रांड रसेल यांनी या स्थलांतराची तुलना ज्यूंच्या स्थलांतराशी केली होती.

  • १९७३मध्ये ग्रेग्वार कायीबांदा यांची सत्ता उलथवून ज्युव्हेनाल आब्यारिमाना [Juvénal Habyarimana] या हुतु नेत्याने सत्ता हस्तगत केली.

  • १९९० साली रवांडन पॅट्रिऑटिक फ्रंट [RPF] या पक्षाने युगांडामधून सूत्रे हलवून हल्ले करण्यास सुरुवात केली व रवांडन नागरी युद्धाला सुरुवात झाली.

  • ४ ऑगस्ट १९९३ रोजी टांझानिया येथे रवांडाचे अध्यक्ष आब्यारिमाना व RPFचे नेते यांच्यात करार होऊन हे नागरी युद्ध संपुष्टात आले.

  • ६ एप्रिल १९९४ रोजी रवांडाचे अध्यक्ष ज्युव्हेनाल आब्यारिमाना यांचे विमान उतरत असताना कोसळून ते ठार झाले. त्यानंतर सुरुवातीला उल्लेख केला ती वांशिक कत्तल घडून आली.

  • पुढे RPFने आधी राजधानी किगालीवर व २१ ऑगस्ट १९९४ रोजी संपूर्ण रवांडावर ताबा मिळवला.

  • ८ नोव्हेंबर १९९४ रोजी UN Security Councilने International Criminal Tribunal for Rwanda स्थापन केले व पुढे या वांशिक कत्तलीत सहभागी झालेल्यांना शिक्षा झाल्या.

दाँ ल न्यू द ला व्ही – उघडेवाघडे आयुष्य – प्रथम प्रकाशन सन २०००.

जगले वाचलेले लोक अर्थातच त्या अनुभवांबद्दल तिऱ्हाईताशी – एका गोऱ्याशी – बोलायला फारसे उत्सुक नव्हते. पण जाँ आत्झफेल्ड यांनी तेथील स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांमार्फत त्यांना बोलते केले.

कोण आहेत हे वाचलेले आणि बोलायला तयार झालेले १४ जण? या चौदा जणांत १२ ते ६० या वयोगटातील १० स्त्रिया आहेत.

यातील प्रत्येक आत्मकथनापूर्वी सुरुवातीला काही पाने जाँ आत्झफेल्ड सदर व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची कहाणी सांगतात. त्या व्यक्तीचे घर, दुकान, शेत जिथे कुठे भेटले त्याचेही वर्णन करतात.

हे सगळे तुत्सी जमातीचे, त्यामानाने सधनही आणि अधिक कष्टाळूही. एकीच्या बोलण्यात उल्लेख आहे की जे हुतु तिच्या नवऱ्यासारखे पशुपालन करू लागले होते ते स्वतःला तुत्सी म्हणवत असत. एकंदरीत बहुसंख्य असले तरी हुतु लोकांना काहीसा न्यूनगंड होता. तिने म्हटले आहे की या दोन्ही जमातींतील तेढ मुळात गोऱ्यांनी पद्धतशीरपणे निर्माण केली.

यातील एकेक कहाणी म्हणजे माणसे किती क्रूर असू शकतात याचे उद्विग्न करणारे दर्शन आहे. हे जे हुतु मारेकरी होते त्यांना अँतेरामवे म्हणत. [खेदाची बाब अशी की, 'अँतेरामवे' या शब्दाचा अर्थ 'एकी'! ते त्यांच्या संघटनेचे नाव होते.]

कास्य नियोन्साबा हा बारा वर्षांचा शाळकरी मुलगा चर्चमध्ये लपला होता. तिथे बाँबगोळे टाकून कत्तल झाली. लहान लहान मुलांना चर्चच्या दारात जाळून मारले. शिवाय सुरे घेऊन आत शिरलेले अँतेरामवे भोसकतही होते. दोन दिवसांनंतर त्यांनी चर्चऐवजी जंगलात लपलेल्यांना शोधायला सुरुवात केली. तेव्हा काही मोठ्या माणसांनी आतल्या वाचलेल्या मुलांना बाहेर काढून पाठुंगळी घेऊन जंगलातच आसरा घेतला. एक दिवस हा मुलगा एका अँतेरामवेला सापडलाच. त्याने केलेला वार या मुलाच्या डोक्याला आरपार जखम देऊन गेला. त्याच्यावर एका तुत्सी बाईने उपचार केले. जखमेवर झाडपाला बांधला. तिचा नवरा हुतु होता. त्याने तिला थोडे दूर नेऊन मारून टाकले व काँगोला पळ काढला असे कास्य नियोन्साबाला नंतर कळले. जखम, शिवाय मलेरियाने आजारी पडल्याने त्याला कसे दिवस काढले ते नीट आठवत नाही. आता तो अधूनमधून शाळेच्या वाटेवरच्या त्या चर्चमध्ये जातो, तिथे पडलेल्या कवट्या, हाडे पाहून आधी त्याला रडू येई, आता मात्र तो रडत नाही.

जानेत आयिंकामिये ही सतरा वर्षांची जी मुलगी वाचली, तिच्या दोन लहान बहिणींसमोर त्यांच्या आईचे हात, पाय तोडून अँतेरामवेंनी तिला मरायला सोडून दिले. कहर म्हणजे त्या बाईने याचना केली होती की, मला एका घावात ठार करा. त्यासाठी तिने जवळचे पैसे देऊ केले होते. ही मुलगी थोडी दूर अंतरावर लपली होती, म्हणून वाचली. बहिणीही जखमी झाल्या होत्या. त्यांना ती जगवू शकली, मात्र आईला जगवण्याचा प्रयत्न ३-४ दिवसांनी निष्फळ ठरला. हत्याकांडाचा काळ संपल्यानंतरही त्यांना स्थैर्य असे मिळाले नाही. निरनिराळ्या नातेवाइकांकडे जशी जितकी सोय होईल तशा त्या राहत होत्या. दोन वर्षांनंतर एका बहिणीने काँगोहून निवांतपणे परतलेल्या आईच्या मारेकऱ्याला ओळखले. त्याला मग तुरुंगात टाकण्यात आले.

किबुंगो टेकड्यांच्या आश्रयाला आलेले फ्रान्सिन नियिंतेगेकाचे कुटुंब सुखासुखी तेथे आले नव्हते. १९६२साली बेल्जियन सैन्याने तिच्या आईवडिलांना विस्थापित केले होते. हुतु आणि तुत्सी आपापल्या लोकांना धरून, तरीही शांततामय सहजीवन जगत होते. पण वातावरण सातत्याने गढूळ होत गेले. चर्चच्या आश्रयाला ते कुटुंबही गेले होते, फ्रान्सिन वाचली, सरपटत, लपतछपत बाहेर पडली आणि पुढे महिनाभर दलदलीच्या आश्रयाने तगून राहिली. दिवसा चिखलात लपायचे, रात्री जरा वरच्या बाजूला कोरड्यात जायचे. रोज त्यांना बायकांची उघडी प्रेते दिसायची कारण मारलेल्या बायकांच्या अंगावरचा चांगल्या स्थितीतला 'पान्य' नावाचा घोळदार झगाही अँतेरामवे काढून न्यायचे. एका म्हाताऱ्या बाईबरोबर लपलेली असताना एक दिवस त्या दोघी अँतेरामवेंच्या नजरेस पडल्या. त्या म्हातारीला त्यांनी मारले आणि ती एकटी कशी असेल म्हणून चिखलात ढोसायला सुरुवात केली. मग फ्रान्सिनही सापडलीच. तिने त्यांना बाहेर काढण्याची विनंती केली. तिथे दलदलीत म्हातारीच्या रक्तमांसात नको. त्यांनी तिला बाहेर फरपटत काढले आणि कपाळावर घाव घातला. मग ते निघून गेले. अनेकदा अँतेरामवे अशा तऱ्हेने लोकांना मरण्यासाठी सोडून देत व एक दोन दिवसांनी खातमा करत. ते बहुधा परत यायला विसरले म्हणून मी जगले, इति फ्रान्सिन. दुसऱ्या दिवशी ती तुत्सी लोकांना दिसली आणि त्यांनी तिला जगवले.
हत्याकांड संपल्यानंतर चार महिन्यांनी फ्रान्सिन आणि तेओफिल यांनी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत आणि शिवाय चार अनाथ मुलांचाही ते सांभाळ करतात.

जाँव्हिए म्युन्यानेझा हा १४ वर्षांचा मेंढपाळ सांगतो की शाळेत कधी त्याने जमातीवरून कोणी बोलताना ऐकले नव्हते. पण १० एप्रिल (१९९४) रोजी अचानक काही हुतु लोक आले, म्हणाले, "आम्ही तुम्हाला मारणार नाही, पण आम्हाला तुमचं घर हवंय, इथून निघून जा." मग त्याचे कुटुंब किबुंगो टेकड्यांवर राहणाऱ्या त्याच्या आज्याकडे राहायला गेले. दुसऱ्या दिवशी सैन्य चालून आले. त्याच्या काकाने पळण्याचा प्रयत्न केला. पण त्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. मग बाकी सगळे एन्तारामाच्या चर्चकडे पळाले – तो, त्याची आठ भावंडं, आई-वडील, आजी-आजोबा सगळेच. तीन दिवस अँतेरामवे चर्चभोवती वेढा घालून होते. मग त्यांनी आतल्या आणि बाहेरच्या लोकांना मारायला सुरुवात केली. त्याच्या मोठ्या बहिणीने ओळखीच्या हुतुला तिला एका फटक्यात मारण्याची विनंती केली. त्याने तिला गवतावर फरफटत नेऊन मारले. मग कोणीतरी ओरडले, ती तर गर्भार होती. मग तिचे पोट चिरले. जाँव्हिए चर्चमध्ये प्रेतांच्या ढिगात मेल्यासारखा पडून राहिला. त्याला एकाने ढोसून पाहिले. मेला आहे म्हणून सोडून दिले. संध्याकाळी अँतेरामवे निघून गेल्यावर त्याच्या वडिलांनी आणि मोठ्या भावाने त्याला, त्याच्या धाकट्या बहिणीला शोधून काढले आणि बाहेर नेले. बहीण खूपच जखमी झाली होती. ती वाचली नाही. लवकरच सगळ्यांनी दलदलीत लपण्याचा निर्णय घेतला. मेलेल्यांना पुरण्याएवढी ना हुतुंकडे माणुसकी होती ना तुत्सींकडे उसंत. त्या रक्ताने माखलेल्या प्रेतांच्या वासात, तिथेच आसपास लपण्याची वेळ आल्याने जिवंत राहिलेलेही मरणकळा अनुभवत होते. म्हातारेकोतारे लपायला नकार देऊन मरणाला सामोरे जात होते.

जाँ-बाप्तिस्त म्युनिआँकोरे हा साठीचा म्हातारा वयाच्या सत्ताविसाव्या वर्षापासून सियुगारो इथल्या शाळेत शिक्षक होता. त्याने १९५९ साली राजाचा मृत्यू झाल्यानंतर हुतु लोकांनी तुत्सी लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हापासूनचा काळ अनुभवला होता. बिरुंगा प्रांतात तो राहत होता. हुतु लोक तुत्सी लोकांची घरे शोधून त्यांच्यावर खूण करून ठेवायचे आणि मग रात्री ती घरे जाळत. चर्चमध्ये आश्रय घेणाऱ्यांची संख्या वाढत गेली तेव्हा बेल्जिअनांनी त्यांना एक फॉर्म भरून मागितला. त्यात कोठे स्थलांतरित व्हायचे आहे ते लिहायचे होते. त्या लोकांच्या जगण्याचा परीघच इतका छोटा होता की त्यांना रवांडाखेरीज काहीच माहिती नव्हते. शेजारच्या काँगो किंवा टांझानियात जायची त्यांची इच्छा नव्हती. ज्यांनी ज्यांनी रवांडा लिहिले, त्यांना नेसत्या वस्त्रानिशी गाडीत घालून ब्युजेसेरा या प्रांतात सोडले कारण तेव्हा तेथे फारशी वस्ती नव्हती. जंगल, आकाश झाकोळून टाकतील एवढ्या त्सेत्से माशा, या सर्वांना तोंड देत, ते सारे हळूहळू तेथे स्थिर झाले. तेथील टेकड्यांवर थोडेफार दोन्ही जमातींचे लोक आधीपासून होते, आणि ते गुण्यागोविंदाने राहत होते. पहिल्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने तेथे प्रत्येकाला थोडी जमीन देण्यात आली. ती शेतीयोग्य करून घेणे हे अजिबात सोपे नव्हते. ब्युजेसेरा प्रांत हळूहळू अधिक राहण्यायोग्य होऊ लागल्यावर तेथे अधिकाधिक हुतु लोक येऊ लागले. १९७३मध्ये त्यांची तेथील संख्या तुत्सींएवढी झाली. तुत्सी लोक गायी पाळत, ती जणू तुत्सी असण्याची खूण होती. हुतुंना मात्र गायी आवडत नसत. शिरकाण झाले तेव्हा फक्त तुत्सींनाच नाही, त्यांच्या गायींनाही मारले. ब्युजेसेरा प्रांतात सरकारी अधिकारी सगळे हुतुच होते. तुत्सींना मिळणारी नोकरी ही फक्त शिक्षकाची होती. दुसरीकडे कोठे तुत्सी-हुतु यांच्यात चकमक झाली तर लगेच त्याचे पडसाद ब्युजेसेरात पडत. तुत्सींमधील इन्कोतान्यी म्हणजे बंडखोर लोकांना शिक्षकांची फूस असणार असे गृहीत धरून त्यांचा छळ होई. स्वतः जाँ-बाप्तिस्तना एकदा झाडाला बांधून मारणारच होते पण त्यांच्या एका हुतु विद्यार्थ्याने त्यांची बाजू घेतली व बांधलेला दोर तोडला. हुतु-तुत्सी जमातींच्या आपसातल्या संबंधात तणाव–तणावमुक्ती असे चढउतार होत राहिले. पण तुत्सींची चिकाटी, कष्टाळूपणा यांतून ते आपली प्रगतीही करत राहिले. त्यांनी रानटी जनावरांना हुसकून लावले. त्सेत्से माशा माजल्या होत्या त्यांचा नायनाट केला. काहीजण आपला शेतमाल स्थानिक बाजारात आणि पार राजधानी किगालीपर्यंत विकू लागले. वाढते स्थलांतर, मर्यादित जमीन आणि विखारी प्रचार यातून १९९१पासून बिघडत गेलेली परिस्थिती १९९४ साली चिघळली. जाँ-बाप्तिस्त म्युनिआँकोरेंच्या निवेदनात भेदक तटस्थता आहे. "संध्याकाळी जगले वाचलेले आपण सारे एक आणि दिवसा ज्याचा तो"! त्यांचेही बहुतेक सर्व नातेवाईक एकेक करून ठार झाले. नऊ शिक्षकी शाळेतील सहाजण मारले गेले आणि दोघे तुरुंगात – मुख्याध्यापक व एक शिक्षक हुतु होते आणि त्यांचेही हात रक्ताने माखले होते. खात्यापित्या घरातले, शिकलेसवरलेले लोकही इतक्या रानटीपणे वागले याने त्याला आणि वाचकांनाही विषण्णता येते.

आंजेलिक म्युकामान्झी या शिरकाणामुळे विधवाही झाली आणि रोज नव्याने अनाथ होणाऱ्या मुलामुलींची ताई, आईही. ती आणि तिची बहीण लेतिशिया मिळून आठ अनाथांचा सांभाळ करतात. खरे तर तिला राष्ट्रीय पातळीवरची परीक्षा देऊन राजधानी किगालीत जाऊन वकील व्हायचे होते. त्यामुळे की काय, पण ती स्थानिक पोशाख न घालता कायम शर्ट-पँटमध्ये वावरते. चर्चच्या दारात बाँबस्फोट झाला तेव्हा ती मागच्या दाराजवळ होती. तिथून सरपटत, लपतछपत ती दलदलीजवळच्या झुडुपांच्या आश्रयाला गेली. तेव्हा तिला कल्पनाही नव्हती की पुढचा महिनाभर तिला दिवसा चिखलात लपून राहावे लागणार आहे. लहानग्यांना काठावर झुडुपांत लपवायचे आणि मोठ्यांनी दलदलीत शिरून लपायचे. असे दिवस काढताना कपड्यांची चैन कोणाकडेच नव्हती. कधी रात्री पाऊस आला तर झाडांच्या मोठ्या पानांच्या सहाय्याने चिखल निपटून काढायचा आणि जमिनीवर अंग टाकायचे. रोज आज कोण मेले या माहितीची देवाणघेवाण करायची. ३० एप्रिल रोजी तिच्या डोळ्यांदेखत तिच्या आईचा मृत्यू ओढवला. वडील, मावशी सगळे थोड्याच दिवसांत मारले गेले. भीतीवर मात करून तगून राहणे तिला जमले, पण शांतता प्रस्थापित झाल्यावरही भीती तिच्यात भिनून राहिली आहे असेच तिला जाणवते. या संहारानंतर हुतु बायकांनीदेखील कधी त्यांच्या पुरुषांचे वर्तन अयोग्य होते असे म्हटले नाही की माफी मागितली नाही. वाचलेल्या तुत्सींमध्ये तिला काही प्रवृत्ती दिसल्या. दारु आणि दुःखद घटनांच्या आठवणीत बुडून जायचे, आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या मृत्यूच्या दर्दभऱ्या कहाण्या उगाळत बसायचे आणि त्यात तपशिलांची सरमिसळ करायची. एक मुलगी आधी आई चर्चमध्ये मेली सांगे, मग दोन वर्षांनी ती दलदलीत मेली असे सांगू लागली. पण या परिस्थितीकडे आंजेलिक सहानुभूतीने पाहते. आई पहिल्याच दिवशी मेली असे स्वतःला सांगण्यामागे आईला फार काळ खडतर आयुष्य जगावे लागले नाही अशी मनाची समजूत असू शकते किंवा आपण आईला दलदलीत मरताना तसेच सोडून दूर गेलो या वास्तवापासून पळ काढणे असू शकते. सत्याला सामोरे जायला त्या मुलीला दोन वर्षे लागली. दुसरी एकजण धडधडीत खूण दिसत असूनही हाताला जखम झालीच नव्हती म्हणते. मग एक दिवस दुसरी कोणी आपल्यावर बलात्कार झाल्याचे सांगते तेव्हा ती धीर गोळा करून तीही अत्याचाराला बळी पडली होती आणि त्या झटापटीत तिच्या हाताला जखम झाली हे सांगते. असे मानसिक ओरखडे, ताण कितीही सर्वसाधारण आयुष्य जगत असल्याचा आव आणला तरी प्रत्येकाच्या मनात खोल रुतून बसले आहेत.

इनोसाँ ऱ्विलिलिझाचे वडील आधी पशुवैद्याकडे मदतनीस म्हणून काम करायचे. मग त्यांचेही स्थलांतर झाले ते कानोंबे नावाच्या टेकडीवर. तिथे ते मिळालेल्या जमिनीच्या तुकड्यावर मेहनत घेऊ लागले. इनोसाँने रोज २० किलोमीटरची पायपीट करत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतले. मग तो शिक्षक झाला. त्याने लग्न केले आणि बायकोसह टेकडीपेक्षा न्यामातामध्येच राहू लागला. त्या गावाचा चेहरामोहरा हळूहळू शहरासारखा झालेला होता. तेथे हुतुंपेक्षा तुत्सी संख्येने जास्त होते. १९७२पासून हुतुंची संख्या आणि वागणूक बदलत गेली. १९९४साली हल्ले सुरू व्हायच्या काही दिवस आधी इनोसाँ आपल्या हुतु सहकाऱ्याशी राजधानीत काय वाटाघाटी होत असतील, कधी तोडगा निघेल असे बोलत असताना तो एकदम म्हणाला, आम्ही तुम्हा सगळ्यांना मारून टाकणार आहोत. ते इनोसाँने मनावर घेतले नाही. नंतर हल्ले सुरू झाल्यावर तो सहकारी खरेच एका ट्रकवर चढून हल्लेखोरांना तुत्सी लोकांची घरे दाखवत असताना इनोसाँला दिसला. राष्ट्राध्यक्षांचे विमान पडले त्या दिवसानंतर इनोसाँ व त्याचे कुटुंब इतर अनेक जणांप्रमाणे रात्री घरी न राहता रानात आश्रय घेत. एक दिवस सरकारी मुख्यालयात गोळा झालेल्या लोकांना तिथल्या प्रमुखाने सांगितले, तुम्ही कुठेही जा, तुम्ही मरणारच आहात, फक्त माझ्या दारात मरू नका, इथून जा. इनोसाँने चर्चमध्ये न जाता कायुंबा टेकडीची वाट धरली. त्याची बायको, मुलगा जोरात पळू शकत नव्हते म्हणून ते चर्चकडे गेले आणि त्याला ते पुन्हा कधीच दिसले नाहीत. पण इनोसाँ एकटाच दुसरीकडे निघून जायला तेवढे एकच कारण नव्हते. त्याच्या कुटुंबाने ठरवले होते की, सगळेच जर मरणार असू तर निदान आपल्या डोळ्यांसमोर आपल्या कोणाचे मरण, तडफड पाहायला नको, आणि बाकीचे तरी सुखरूप असतील अशा आशेवर जगतो माणूस. चार दिवसांनंतर तिथून जीव वाचवून आलेल्या एका बाईने त्याला सांगितले की ते दोघे अतोनात जखमी होऊन पडले होते, वाचण्याची शक्यता नव्हतीच. तरीही एक आशेचा किरण तो मनाशी बाळगून होता की ते मेलेच असे काही त्या बाईने सांगितले नाही. वाचले असू शकतील. कियुंबाच्या टेकडीवर निलगिरी वाढलेली होती. ती झाडे उंच असतात, पण दाट नसतात, त्यांच्या आडोशाने फार काळ लपून राहता येत नाही. त्यामुळे सतत पळत राहणे गरजेचे होते. अँतेरामवे नुसता पाठलागच करीत नसत, तर काळवीटांना जसे एका दिशेला जायला भाग पाडून तेथे दबा धरून बसलेले शिकारी एका फटक्यात अनेकांची शिकार साधत तसेही बहुसंख्यांना हूल देऊन एकाच ठिकाणी गोळा व्हायला भाग पाडत आणि आपला कार्यभाग साधत. त्यांच्या गनिमी काव्याला तसेच उत्तर द्यायला तुत्सींकडे शस्त्रे नव्हती, पण हुतु गात, आरडाओरडा करत टेकडीवर येत. त्यांना हुलकावणी देऊन ते पुढे जातील आणि आपण मागे राहू यासाठी दिशा, गती यांचा जलद अंदाज घेण्यात जे तरुण यशस्वी होत ते दुसरा दिवस पाहू शकत. पण या सगळ्या श्रमांमुळे तहान लागली तर प्यायला पाणीही नव्हते. दिवस पावसाळ्याचे होते तरी जवळ कोणतेच भांडे नव्हते त्यामुळे ओली पाने चोखणे हाच काय तो उपाय होता. कित्येकजण तहान न भागल्याने मेले.

इनोसाँ ऱ्विलिलिझा तुत्सींच्या आणि हुतुंच्या मानसिकतेबाबतही खूप बोलतात. दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढत असताना मरणाची अधिकाधिक मानसिक तयारी आणि तरीही जगण्याची, तगून राहण्याची धडपड याची कशी संगती लावायची ते त्यांना कळत नाही. हुतुंच्या दुष्टाव्याने ते उद्विग्न होतात. मारायचे तर फटकन मारून टाकावे, हातपाय तोडणे, जखमी करून सोडून देणे या मानसिकतेचे कसलेच समर्थन असू शकत नाही. वंशसंहाराची कल्पना हुतुंमधल्या शिकलेल्यांनीच जोपासली, त्यांनी आपल्या बुद्धीचा, शिक्षणाचा दुरुपयोग केला असे इनोसाँचे मत आहे. त्याचबरोबर हुतुंनी आपला हेतु साध्य करण्यात फार वेळ घालवला. तुत्सींची संपत्ती मिळवणे, त्याचा आनंद साजरा करणे, आज इतक्या जणांना मारले त्याचा आनंद साजरा करणे – अर्थात दारू पिऊन – यामुळे त्यांच्यात दुसऱ्या दिवशी तितका जोर, जोश नसे म्हणून तुत्सींना जगण्याची संधी मिळाली असेही विश्लेषण ते करतात. पण इतरही अनेकांनी म्हटल्याप्रमाणे जर आणखी एक आठवडा कोणी त्यांच्या साहाय्याला आले नसते तर एकही तुत्सी शिल्लक राहिला नसता हेही ते सांगतात.

मारी-लुइज कागोइते ही चालवते तो पब कमी आणि दुकान जास्त आहे. तिचे आई-वडील शेती करायचे. ती आठवीपर्यंत शिकली. मग एके दिवशी ती न्यामाता येथे तिच्या मावशीकडे गेली असता एकाने तिला पाहून मागणी घातली आणि स्थळात नाकारण्यासारखे काहीच नसल्याने तिचे लग्न लावून दिले. तिचा नवरा लेओनार कष्टाळू होता. त्याने शेतात पक्के घर बांधले. बाजारच्या रस्त्यावर एक गाळा बांधला. मग काही दुकाने बांधली. एक जुना ट्रक विकत घेतला. ते न्यामातामधील पहिले खाजगी वाहन होते. मग फ्रातेर्निते नावाचा पब उघडला. काही रेस्टॉरंटस् उघडली. जमीन, गायी विकत घेतल्या. १९८० साली त्याने दोन नवीन ट्रक विकत घेतले. तो तिथला महत्त्वाचा वाहतुकदारही बनला. तुत्सी लोक भराभर प्रगती करत असल्याचे पाहून हुतु लोकांना त्यांचा मत्सर वाटे. तुत्सी लोक एकमेकांना मदत करत, काही वर्षांनी आपल्या नोकरांनाही स्वतंत्र व्यवसाय सुरु करण्यास प्रोत्साहन देत आणि कधीही कर्ज काढत नसत. विमान पडले त्यादिवशी बरेच तुत्सी लेओनारच्या आश्रयाला आले. लेओनारला चकमकींचा बराच अनुभव होता. त्याने तरुणांना कायुंबा येथे पळून जायला सांगितले. पण स्वतः मात्र कोठे जाण्यास नकार दिला. आता पायांना एवढे कष्ट जमणार नाहीत म्हणाला. ११ एप्रिलला, म्हणजे पहिल्याच दिवशी अँतेरामवे त्यांच्या घरावर चालून आले. लेओनारने लगेच दार उघडले कारण त्याला वाटले तो बायका-मुलांना वाचवण्याबद्दल त्यांच्याशी बोलू शकेल. पण त्यांनी दारातच त्याला गोळी मारली. मग सर्व मुलांना एका रांगेत उभे करून पालथे पडायला सांगितले आणि सर्वांची कत्तल केली. त्यात एक हुतु मुलगाही होता. तो आपल्या मित्राशी खेळायला आला होता. मारी-लुइज आपल्या सासूला घेऊन घराच्या मागे असलेल्या टायर्सच्या ढिगात लपली. तिथून तिने त्यांचे सगळ्या प्रकारचे सामान, दारुच्या बाटल्यांचा, धान्याचा साठा ट्रकमध्ये भरत असल्याचे आवाज, आपसात फर्निचरच्या वाटणीवरून भांडण, सारे ऐकले. संध्याकाळी मारी-लुइजची सासू टायरच्या ढिगातून बाहेर येऊन बसली. तिला त्यांनी हटकले. ती म्हणाली, "मी एकटीच कुठे जाणार?" मग त्यांनी तिलाही मारून टाकले व निघून गेले. अशा तऱ्हेने मारी-लुइजचा त्यांना विसर पडला व ती तेव्हा वाचली. तिला एक अनाथ झालेला मुलगा दिसला. त्याला घेऊन तिथे असलेल्या एका शिडीवरून तिने शेजारच्यांच्या अंगणात उडी मारली. तिथे कोणीही नव्हते. मग तिने त्या मुलाला लाकडांच्या ढिगात लपवले आणि स्वतः कुत्र्याच्या खोपटात लपली. तिसऱ्या दिवशी सकाळी तिचा शेजारी फ्लोरिआँ परत आला. तो हुतु होता. तिला पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याने तिला सांगितले, सगळे तिचा शोध घेत आहेत, ती त्याच्याकडे सापडली तर त्यालाही मारतील. ती म्हणाली, मग मला मारून टाक. मृत्यू लगेच होईलसे बघ. पण त्याऐवजी त्याने तिला दुसऱ्या एका हुतु बाईच्या घरी सोडले. तिने काही तुत्सींना आपल्या घरात लपवले होते. तिथेही काही दिवसांनी अँतेरामवे आले. त्यांना देण्यासाठी तिने पैसे मागितले. मारी-लुइजने आपल्याबरोबर घरातले पैसे घेतले होते. त्यातले तिला दोनदा थोडेथोडे दिले. एक दिवस फ्लोरिआँ तिला म्हणाला की तुझा शोध जारीने सुरू आहे, तू इथून जा. मग त्याने सैन्याच्या एका ट्रकमधून तिची बुरुंडीपर्यत जाण्याची व्यवस्था केली. त्यासाठीही अर्थातच तिनेच पैसे दिले. मग तो म्हणाला मला काय, त्यावर तिने दोन घरे, मुख्य रस्त्यावरचे दुकान त्याला लिहून दिले. सैन्याचा ट्रक असल्याने त्यांना कोठे अडवले नाही, पण तिचा प्रवास एका पोत्यात बसून झाला. एका जंगलात ट्रक थांबला व तेथून तिला पुढे न थांबता चालत जायला सांगितले. बरेच अंतर कापून ती जंगलाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या सरहद्दीवर पोहोचली आणि माणसांचे आवाज ऐकून थकून जमिनीवर अंग टाकले आणि तिला झोप लागली. नंतर शरणागतांच्या वस्तीत तिला भेटायला आलेला तिच्या नवऱ्याचा मित्र तिला पाहून ओळखूच शकला नाही. तिचे वजन २० किलोंनी कमी झाले होते, रया पार गेली होती, अंगावर जाडाभरडा कपडा, पाय सुजले होते, अस्वच्छतेने डोक्यात उवा भरल्या होत्या. फ्लोरिआँवरही आता खटला भरला आहे असे तिला कळले. तिने त्याच्या घरात सुरे, चाकू यांची चळत पाहिली होती. तोही दोषी होताच. पण त्याच्याविरुद्ध साक्ष न देण्याचे तिने ठरवले. न्यामाताला परतल्यावर सगळे उजाड, भकास होते. त्यांची संपत्ती तर काही उरलीच नव्हती, ना स्थावर ना जंगम. एक दिवस काही मित्रमंडळींनी तिला थोडे पैसे दिले. त्यातून तिने आपले छोटे दुकान पुन्हा सुरू केले. तिथे लोक तिला संहाराच्या कर्मकहाण्या सांगतात तेव्हा माणसे इतकी स्वार्थी, क्रूर का होतात याची तिला संगती लागत नाही. ती आला दिवस साजरा करते पण आता तिला कशातच रस वाटत नाही. हुतु बायकांशी बोलताना त्या आपला नाइलाजाचा राग आळवतात. कोणीही हुतु कसले पातक केल्याचे कबूल करत नाहीत. त्यामुळे असे काही पुन्हा घडणारच नाही याची तिला खात्री वाटत नाही.

२२ वर्षांच्या ख्रिस्तीन न्यीरान्साबिमानाची आई हुतु, वडील तुत्सी होते. संहारानंतरच्या शांततेत मारान्युन्दोच्या टेकडीवर राहणारी ख्रिस्तीन बोलायला तयार झाली. ती आईवडिलांसोबत १९८०मध्ये ब्युजेसेरा प्रांतात आली. अजून तिथे थोडीफार जमीन मिळत होती. १९९४ साली ती पाचवीत होती. त्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच त्या भागात अनोळखी, उग्र दिसणारे लोक येऊ लागले होते. ते हुतुंच्या घरी जाऊन हवी ती भांडीकुंडी घेऊन जात. ते अँतेरामवे होते. त्यांनी चर्चला वेढा दिला आणि लोकांना मारले. काही अजून पूर्ण मेले नसतानाच त्यांना पुरले. तेव्हा इतर काहीजण चर्चवर पहारा देत होते. हुतुंनी तुत्सींच्या घरी लुटालूट केली. हे सगळे पाहून हबकलेले हुतुही होते, पण ज्यांनी आपल्या शेजारच्या ओळखीच्या तुत्सींना मदत करू पाहिले, त्यांनाही अँतेरामवेंनी मारून टाकले. चर्चवरील हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी अँतेरामवे तिच्या घरी आले आणि त्यांनी तिच्या तुत्सी वडिलांना आई आणि शेजाऱ्यांदेखत कापून काढले. ख्रिस्तीनने अनेक हुतुंनी अँतेरामवेंच्या बरोबरीने तुत्सी नातेवाईक, शेजारीपाजारी, ओळखीचे यांना मारताना पाहिले. संध्याकाळी ते गर्वाने आपला टेकडीवरचा किंवा दलदलीपासचा पराक्रम सांगत. त्यांच्या बायका मांस शिजवत, कारण त्यांनी तुत्सींच्या गायीही मारलेल्या असत. शिवाय मृतांच्या अंगावर मिळालेल्या पैशांतून ते दारू पीत. कोणी किती मारले याची त्यांच्यात चढाओढ लागे. जे मारत नसत तेही आपण मारल्याचे सांगत, नाहीतर त्यांचेही मरण ओढवले असते. रोज सकाळी ते त्यांचा म्होरक्या व्हँसाँ गोलिआथ याच्यापाशी जमत, तो त्यांना त्या दिवसाचे लक्ष्य सांगे – ठिकाण, कसे जायचे आणि किती मारायचे. जे आज्ञा पाळायचे नाहीत, शेतीच्या कामांचे कारण देऊ पाहायचे, त्यांनाही सहज जाताजाता गोळ्या घातल्या जात. जे रक्तरंजित सुरे दाखवू शकत नसत त्यांना लुटीतला वाटा मिळत नसे. मारले, असे नुसते सांगून चालत नसे, दुसऱ्या दिवशी दाखवायला लागे. म्हणूनही कोणाला पुरून टाकत नसत. ख्रिस्तीनला तुत्सी रक्ताची म्हणून काहीजण हिणवत, ती स्वतःला हुतु म्हणवून घेई. एक दिवस काही अँतेरामवे त्यांच्या घरी आले, त्यांनी बरीच लुटालूट केली, तिच्यावर बलात्कार केला. त्यातून तिला दिवस राहिले.

सगळ्या गदारोळात एक दिवस तिनेही तिथून पळून जायचे ठरवले. अंगावर दोनतीन पान्य, एक स्वेटर चढवला आणि पळणाऱ्यांच्या गटात सामील झाली. ते सलग सहा आठवडे पळत होते. कारण युगांडातून तुत्सी चाल करून येत असल्याच्या बातम्या पसरत होत्या. ते सारे जिझेन्यामार्गे कोंगोला पोहोचले. तिथे म्युगुंगा येथील निर्वासितांच्या छावणीत ती दोन वर्षे राहिली. त्या छावणीतले लोक जमेल ते काम करत. ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी छोटा व्यापार सुरू केला. ख्रिस्तीन दहा किलोमीटरवर अंतरावरच्या गोमा या गावी चालत जाऊन धुणीभांडी करू लागली, किंवा कधी कोणाच्या शेतात राबू लागली. त्याबदल्यात तिला काही केळी, कंदमुळे मिळत. त्या छावणीत तिची तीच बाळंत झाली. कोणीही तिला आधार द्यायला, देखभाल करायला नव्हते. बाळ-बाळंतीण सुखरूप असले तरी तिची अन्नावरची वासनाच उडाली. तिला घरची आठवण येत होती पण अँतेरामवे भीती घालत की, परतलो तर आपल्याला ठार मारतील. दोन वर्षांनंतर काँगोतील बान्याम्युलिंगे या तुत्सी संघटनेने बंदुकीच्या धाकाने त्यांना छावणी सोडायला भाग पाडले. ते सारे मासीसीच्या डोंगरांकडे जाऊ लागले. पण बान्याम्युलिंगेंनी पुन्हा त्यांची वाट अडवली व एकाने तिला समजावले की रवांडामध्ये शांतता आहे, तिकडे परत जावे. तिने कोणाला मारले नसल्याने तिला तिचे शेतही परत मिळेल. मग तिने उलटा प्रवास करून रवांडा गाठला. तिला तिच्या गावात आई आणि भाऊ भेटले. ते काँगोपर्यंत गेलेच नव्हते. त्यामुळे ते कितीतरी आधी घरी परतले होते. त्यांच्याबरोबर तिला अखेरीस घर गाठता आले. तिला अजूनही शेतातून काँगोच्या वाटेवर पायाखाली प्रेते तुडवत चालत असल्याची स्वप्ने पडतात.

ओदेत म्युकाम्युसोनी ही ख्रिस्तीनपेक्षा एखादे वर्ष आगेमागे. दोघी दोन शेजारच्या टेकड्यांवर राहायच्या, शाळेच्या, बाजाराच्या रस्त्यावर एकमेकींना दिसायच्या. पण त्यांच्यात बोलाचाली नव्हती. ओदेत तुत्सी. तिच्या सगळ्या नातेवाइकांची कत्तल झाली. तिच्या मुलाचा बाप नंतर काँगोला निघून गेला. ती बोलायला तयार झाली, पण तिची तपशीलवार वर्णने रोज बदलत.

ओदेतच्या वडिलांकडे आठ गायी होत्या. पण त्यांनी तिला जास्त शिकू दिले नाही कारण ती चौथी मुलगी होती. युद्धापूर्वीच ती घरकाम, शेतीकाम करू लागली होती. विमान पडले तेव्हा ती किगालीच्या सधन न्याकाबांदा वस्तीतील एका कुटुंबात मोलकरणीचे काम करत होती. मालकीणबाई – ग्लोरिया - तुत्सी होती आणि मालक – जोजेफ – हुतु. मालक कामासाठी केनियाला गेला होता. अँतेरामवे आले, त्यांनी ग्लोरियाला मारले. तिच्या दिराने तिला वाचवण्याचा निष्फळ प्रयत्न केला. ओदेत छोट्या कोठीच्या खोलीत जमिनीवर पडून लपून राहिली. अँतेरामवे घरभर फिरले नाहीत. त्यांना हुतु नवऱ्याच्या अनुपस्थितीत त्याची तुत्सी बायको मारून टाकायची होती, तेवढे करून ते गेले. काही तासांनी मग ते घर लुटायला दुसरे हुतु आले आणि त्यांना ओदेत सापडली. ते तिला मारणारच होते, पण त्यांचा म्होरक्या कालिक्स्त याने त्यांना थांबवले. त्याच्याकडे बंदूक होती. त्याने तिला आपल्यासाठी ठेवून घेतले. त्याच्या घरी चालणाऱ्या चर्चांतून तिला कळले की उन्हाळा येईपर्यंत सगळे तुत्सी मेलेले असतील. मग तिने उगाच बाहेर पडण्याचा धोका पत्करला नाही. जुलैमध्ये अँकोतान्यी येईपर्यंत ती कालिक्स्तकडेच राहिली. मग तो तिला आपल्याबरोबर काँगोला घेऊन गेला. वाटेत ते आधी जिझेन्यीला कालिक्सच्या नातेवाइकांकडे थांबले, काँगोतील म्यग्युंगाच्या छावणीत त्यांनी दीड वर्ष काढले. ती तुत्सी होती हे सगळ्यांना माहिती होते, पण कालिक्स्त अँतेरामवे होता. त्याचा दरारा होता. मात्र तो नसताना सगळे तिला हिणवत. १९९६च्या जून महिन्यात एका गोऱ्या मानवतावादी संस्थेचे ट्रक आले. ते सांगत होते की ज्यांना रवांडाला परत जायचे आहे त्यांनी ट्रकमध्ये बसून घ्यावे. त्यांना ते मोफत सोडतील. कालिक्स्त बाहेर गेला होता. ती एका ट्रकमध्ये चढली. रवांडाच्या हद्दीपर्यंत आल्यावर दुसऱ्या ट्रकमधून त्यांना न्यामातापर्यंत आणून सोडले. मग ती तिच्या कानाझीमधील घर, शेत यांकडे वळली. घर नावालाच शिल्लक राहिले होते आणि शेतजमीन शेतीयोग्य उरली नव्हती. ती काँगोहून परतली हे कळल्यावर तुत्सी तिच्याकडे संशयाने पाहू लागले. त्यामुळे मदत मागायची तरी कोणाकडे असा तिला प्रश्न पडला. एक दिवस तिने ऐकले की पाऊस आला की चर्चजवळ पुरलेले मृतदेह वाहून जातील. मग जे लोक तिथे जाऊन कसेतरी पुरलेले मृतदेह नीट बाहेर काढून त्यांची नीट ओळीने व्यवस्था लावणार होते त्यांच्यात ती सामील झाली. त्यातून मग सर्वांचे एक स्मारक करायचे ठरले. त्या कामात ती गवंड्यांना मदत करू लागली. थोडेफार गवंडीकाम येऊ लागल्यावर आता ती एका गवंड्याच्या हाताखाली छोटीमोठी कामे करते.

एदिथ युवानिलिंगिराचे बालपण अस्थिरच होते. बुरुंडीतून अँकोतान्यींनी रवांडात कोठेही हल्ले केले की त्याचा वचपा तिच्या एन्तारामा भागातील तुत्सींवर निघत असे. ब्युजेसरा प्रांत बुरुंडीला लागून असल्याने या चकमकी तेथे अधिकच होत. मेलेल्या तुत्सींची जागा हुतु शेतकरी घेत. तरी अंतर राखून का होईना, किमान सलोख्याचे व्यवहार होत असत. १९९१ साली पहिले नागरी युद्ध झाले, तेव्हा तिचे लहान मूल पोटातच दगावले. कारण दवाखान्यापर्यंत सरळ रस्त्याने जाणे शक्य नव्हते. तीन वर्षांनंतर जेव्हा राष्ट्राध्यक्षांचे विमान कोसळले तेव्हा रेडिओवरून बाहेर न पडण्याचा सल्ला मिळत होता. सुरुवातीला सगळेच गोंधळलेले होते. पण चार दिवसांनी सगळे पोलीस, सरकारी अधिकारी हुतुंना चिथावू लागले. "बघता काय? या झुरळाना चिरडून टाका!" "तुत्सींना आता थारा नाही. मारून टाका त्यांना तुम्हाला जमेल त्या पद्धतीने." "हे साप आहेत. ठेचा त्यांना. कोणालाही शिक्षा होणार नाही." मग सर्वसामान्य हुतु अँतेरामवेंना त्यांच्या माहितीतील तुत्सींची घरे दाखवू लागले. त्यावेळी एदिथला आठवा महिना होता. तिचे कुटुंब एका हुतु शेजाऱ्याच्या आश्रयाला गेले होते. पण पाचव्या दिवशी त्या शेजाऱ्याने त्यांना घराबाहेर काढले. मग ते आकान्यारु नदीच्या दिशेने निघाले. एका नावाड्याला भरपूर पैसे देऊन नदी ओलांडली आणि जितारामाच्या दिशेने चालत निघाले. अजून जितारामामध्ये हत्याकांड सुरू झाले नव्हते कारण तेथवर बातम्या पोहोचल्या नव्हत्या. सारे निराश्रित बाजाराच्या एका वळचणीला राहत होते. तिथेच एदिथ भर रस्त्यात, भर उन्हात, सर्वांसमोर बाळंत झाली. मग एक दिवस स्थानिक हुतु म्हणाले की तुत्सींना मारायला लोक येणार आहेत. बरेचसे तुत्सी एका फॅक्टरीत लपले. तिथे कोणी चाल करून यायच्या आधी तिथल्या पोलीसाने एका छोट्या टेंपोची व्यवस्था केली. त्यात एदिथसह तिचा नवरा, त्यांचा मोठा मुलगा, नवजात मुलगी, दोन बहिणी, आणि एक नोकर हेही चढले आणि काबागायीकडे जाऊ लागले. जागा नव्हती म्हणून ते सर्व उभ्याने प्रवास करत होते आणि वाटेत सर्वसामान्य हुतु यांना मारूनच टाकायला पाहिजे असे ओरडत होते, फक्त त्यांतल्या कोणी ते पाऊल उचलले नाही म्हणून टेंपो काबागायीपर्यंत गेला. तिथे आश्रितांची खूपच गर्दी होती. हुतुंच्या भीतीने आलेले तुत्सी आणि बुरुंडीतील RPFच्या भीतीने आलेले हुतु. पुरेसे अन्न कोणाला मिळत नव्हतेच. तरीही लहानलहान मुलेही कधी आजारी पडला नाहीत. त्यांनाही बहुधा समजले होते की आजारी पडणे म्हणजे मरण ओढवून घेणे. एक दिवस निर्वासित हुतु आणि तुत्सींमध्ये जुंपली. अँतेरामवेंनी कापाकापी सुरू केली. आंतरराष्ट्रीय फोटोग्राफर सुरक्षित अंतरावरून ती दृश्ये टिपत होते.

एक जूनपासून सैनिक एक बस घेऊन येत. त्यात तुत्सींना घालून नेत – सगळे उच्चशिक्षित, सरकारी कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक अशा शेलक्या लोकांना बसमध्ये चढवत आणि संध्याकाळी रिकामी बस परत येई. २९ जून रोजी एदिथचा नवरा जाँ-द-द्य एनिकुरुनझिझा याला नेले आणि तो नंतर कधीच दिसला नाही. तो एन्तारामामध्ये प्रोफेसर होता. एदिथही सियुगारोच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी एदिथ विधवाही झाली आणि अनाथही. तिचे आई-वडील, सासू-सासरे, भावंडे – कोणीच उरले नाहीत. फक्त मुलगा आणि मुलगी यांना घेऊन ती जेव्हा एन्तारामाला परतली तेव्हा नसलेल्या माणसांच्या आठवणींनी तिला तिथे राहणे नकोसे झाले. म्हणून ती न्यामाताला राहायला गेली. कशातच रस नाही, कोणाचा आधार नाही, कोणी भेटलेच तरी तीच तीच दुःखे उगाळणे यापेक्षा ती धार्मिक बनली. चर्चमध्ये जाऊन खड्या आवाजात येशूला आळवू लागली. आपला नवरा कसा मेला हे न कळण्यामुळे तिला अतीव दुःख होते. तिचा मुलगा तिला विचारतो तेव्हा ती सांगते त्याला अँतेरामवेंनी मारले. मात्र पुढची पिढी विखारी होऊ नये यासाठीही ती त्यांच्याशी त्यांना समजेल अशा शब्दांत त्यांचे प्रबोधन करते. तुत्सींच्या गुन्हेगारांचा गुन्हा माफीलायक नसला तरी तिने त्यांना माफ केले आहे ते तिला स्वतःला शांतता लाभावी म्हणून.

बेर्थ म्वानाकाबांदी हिला दोन भाऊ आणि नऊ बहिणी होत्या. लहानपणी ते सगळे बरोबरच जंगल तुडवत सियुगारोच्या शाळेत जायचे. शाळेत कधीही जमातींवरून विषय निघायचा नाही. विमान पडले त्या दिवशी ते सगळे घरीच होते. अँतेरामवे टेकड्याटेकड्यांवर जाऊन दंगा करून दहशत माजवत होते. एका केळीच्या बनात तिला त्यांच्या शेजाऱ्याला मारल्याचे कळले. मग ख्रिश्चन देवाच्या दारी काही करणार नाहीत अशा भावनेने सगळे कुटुंबीय टेकडी उतरून एन्तारामाच्या चर्चच्या आश्रयाला गेले. तिथे ते तीन दिवस होते. त्यांना वाटत होते की ते पुन्हा त्यांच्या शेतीच्या तुकड्यावर परत जातील. पण अँतेरामवे तिथेही आले, त्यांनी बाँब टाकून चर्चच्या भिंतीला भगदाड पाडले. आणि ते गाणी गात आत शिरून कापाकापी करू लागले. बेर्थ आणि काही धाडसी भावंडांनी तेथून पळ काढला आणि जे धावत सुटले ते न्यामविझाच्या दलदलीपर्यंत. रात्री मुसळधार पाऊस पडला मग त्यांनी जवळच सियुगारोच्या शाळेत आसरा घेतला. पुढचा महिनाभर तेच. दलदल, शाळा, दलदल. बेर्थ जी थोडीफार अन्नसामुग्री प्रत्येकाने बरोबर घेतली होती त्यातून रोज काहीबाही भावंडांना द्यायची, मग त्यांना दलदलीजवळच्या झुडुपांमध्ये लपवायची. पावसाची उघडीप पडून ऊन पडेल त्यादिवशी ते लपायची जागा बदलायचे कारण वाळलेल्या चिखलात त्यांची उमटलेली पावले दिसायची. हत्यारे गात येत त्यामुळे त्यांची चाहूल आधीच लागे. कधीकधी ते आवाज न करता येऊ पाहात, पण माकडांना त्यांची चाहूल लागून ते आवाज करू लागत. दुपारी साडेचारच्या सुमारास ते निघून गेले की वाचलेले बाहेर येऊन कोण मेले याचा धांडोळा घेत. जे दमलेले असत ते तेथेच दलदलीपासून थोडे दूर आडवे होत, काही शाळेपर्यंत जात. बेर्थच्या कुटुंबाचे शेत तेथून फार लांब नसल्याने ते कधी तिथवर जाऊन काही खायला मिळाले तर आणत. दलदलीमध्ये अनेक दिवस पाहण्यात असलेली एखादी व्यक्ती अचानक दिसेनाशी होई. ती पुन्हा दिसेलच याची शाश्वती नसे. शिवाय अस्वच्छता, डास यांनी अनेकजण आजारी पडत. कित्येकांना हगवण लागे. ३० एप्रिलला बेर्थच्या दोन लहान बहिणी रक्ताच्या थारोळ्यात आढळल्या. हा आघात बेर्थला सहन झाला नाही. ती वेड्यासारखे बडबडू लागली. तिला मरावेसे वाटू लागले. प्रत्यक्षात तिने लपून राहणे सोडले नाही याचेही तिला राहून राहून आश्चर्य वाटते. जेव्हा अखेरीस त्यांची सुटका झाली तेव्हा ते सारे मूर्तिमंत घाण होते. तीन महिने छावणीत राहिल्यानंतर ती ऱ्युगारामाच्या टेकडीवर परत गेली. सगळ्यांच्या शेतांत गवत माजले होते. आता आसपासची एकूण आठ लहान मुले शाळेत जातात, बेर्थनेही एका लहान अनाथ मुलाला ठेवून घेतले आहे. बेर्थला नर्स व्हायचे होते. पण आता तीही शेतीच करते. या संहाराने लोकांना एकलकोंडे केले आहे. त्यांचा माणुसकीवरचा विश्वास उडाला आहे. काही लहान मुले अँतेरामवे अँतेरामवे खेळतात, एकमेकांना मारण्याची भाषा बोलतात याने तिला धसकायला होते.

क्लोदीन कायीतेसी ही बेर्थची शेजारीण. तिच्या घराच्या भिंती कच्च्या आहेत. काही झाडांच्या फांद्यांवर माती लिंपून केल्या आहेत. पण तिचे घर थोडे वरच्या अंगाला असल्याने तिच्याकडे बेर्थसारखे पावसाचे पाणी साचत नाही. संहारक हल्ले झाले तेव्हा ती न्यीरारुकोब्वा इथल्या शाळेत आठव्या इयत्तेत शिकत होती. ती सांगते की तिला या घटनांमधून दोन धडे मिळाले. एक, तिच्या किन्यारवांदा भाषेत झालेल्या या संहारक कृत्याच्या क्रूरतेसाठी शब्दच नाही. दुसरा म्हणजे नंतरच्या काळात वाचलेले लोक – भले त्यांनी सारखीच दुःखे भोगलेली असतील, ऐन युद्धात एकमेकांना आधार दिला असेल, एकमेकांच्या डोक्यातल्या ढीगभर उवा काढल्या असतील – आता अत्यंत संकुचित मनोवृत्तीचे बनले आहेत. त्यांच्यात एकोप्याची, सहकार्याची भावना उरलेली नाही. ते खूप आत्मकेंद्री बनले आहेत.

विमान पडल्याची बातमी ऐकून क्लोदीनही किंकवीच्या जंगलात पळून गेली. त्यांनी हल्लेखोरांवर दगडफेक करून त्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला, शेवटी ते चर्चच्या आश्रयाला गेले. बाँब फुटला तेव्हा क्लोदीन चर्चच्या मागच्या दारात होती. टेकड्यांवर अँतेरामवे होते म्हणून ती दलदलीच्या दिशेने पळत सुटली. दलदलीबद्दल ती ऐकून होती, डासांचा सुळसुळाट, सापांचा वावर यामुळे कोणी तेथे शिरत नसत. पण त्यादिवशी जीव वाचवण्यासाठी सगळे त्या दलदलीत घुसले. रात्री निलगिरीच्या जंगलात आणि दिवसा दलदलीत असे त्यांचे आयुष्य चालू झाले. लहान मुलांना दोघातिघांच्या गटाने झाडीत लपवणे, दलदलीत आडवे पडून वरून पाने ओढून घेणे. प्यायला पाणी दलदलीतलेच, मृतांच्या मांसाच्या व्हिटामिन्सने समृद्ध !

अँतेरामवेंची चाहूल लांबूनच लागे. पहिल्या दिवशी त्यांनी काहींना मृदु आवाजात हाका मारल्या, "या बाहेर" म्हणाले, आणि जे खरेच बाहेर आले त्यांना मारून टाकले. तेव्हापासून कोणीही कितीही गलितगात्र असो, आजारी असो, आवाज न करता, त्यांच्या दृष्टीस न पडता लपून राहणे हेच साऱ्यांचे धोरण राहिले. संध्याकाळी जंगलात जी मिळतील ती फळे, कंदमुळे खाऊन तग धरायचा. दिवसभरासाठी काही नेता येण्यासारखी परिस्थिती नसल्याने रात्रीच काय ते खायचे. कोण कोण मेले याचा आढावा घ्यायचा आणि आळीपाळीने झोपून सकाळी पाच वाजताच दलदलीच्या दिशेने निघायचे. भीती मनात घर करून असायची. सुऱ्याचे वार झाले तर किती वेदना होतील याची कल्पना करणे हा क्लोदीनच्या मनाचा चाळा बनला. काही मुलींना लगेच न मारता अँतेरामवे आपल्याबरोबर घेऊन जात. काही दिवसांनी त्यांचा कंटाळा आला की दुसऱ्या. मात्र जिला अंगाखाली घेतले तिला ते स्वतः मारत नसत, दुसऱ्या कोणालातरी ते काम सांगत. मग त्या मुलींना खड्ड्यात, गटारात ढकलून देत. ३० एप्रिलला त्यांनी मोठ्या संख्येने संहार केला. संध्याकाळी प्रेतांचा आणि जखमींचा खच पडला होता. क्लोदीनला वाटले, आपणही दृष्टीस पडावे आणि एकदाचे मरून जावे. पण ना तिने ना दुसऱ्या कोणी अशा प्रकारे हाराकिरी केली. सगळे चिवट आशेवर दिवस काढत होते.

गोरे म्हणतात वंशसंहार हा वेडेपणा होता. क्लोदीन म्हणते ते नियोजनबद्ध कृत्य होते. हुतुंच्या डोळ्यांत तुत्सी सलत होते. त्यांना त्यांची जमीन घ्यायची होती, गुरे मारून खायची होती. त्यासाठी तुत्सींविरुद्ध विखारी प्रचार चालवला होता हेच खरे. गोरे दुतोंडी आहेत. ते या वंशसंहाराने भयचकित होतात, पण त्याचबरोबर तुत्सींनी हे ओढवून घेतले आहे अशी मल्लीनाथीही करतात. त्याचबरोबर बाकीच्या आफ्रिकन देशांनीही तुत्सींना आत्मीयता दाखवली नाही याचीही क्लोदीनला खंत वाटते. या सहानुभूतीच्या दुष्काळातच तुत्सी जगणार हे ती जाणून आहे. ती कधी चर्चमध्ये गेली तर एकच प्रार्थना करते, तिच्यात सूडाची भावना निर्माण होऊ नये. ती लग्न करणारच नाही असे नाही, पण तिच्याबरोबर असलेल्या आठ अनाथांसह तिला कोण कसे पत्करणार हेही वास्तव ती जाणते.

सिल्व्ही युम्युब्येयी ही रवांडाच्या नैऋत्य भागातील ब्युतार या विद्यापीठ असलेल्या गावची. ती युद्धबंदीनंतर न्यामाताला आली तेव्हा तिच्या ओळखीचे कोणीच नव्हते. आता ती तेथे सामाजिक कार्यकर्ती म्हणून काम करते. सगळीकडचा संहारक उन्माद एकाच वेळी संपला नाही. ब्युजेसेरातला आधी संपला म्हणून ती त्या भागात आली – ती, तिचा नवरा, दोन मुलं, एक ऐन धामधुमीत जन्माला आला होता, शिवाय तिची भावंडे. तेथे सगळ्याचीच चणचण होती. पाणी, अन्न, सरपण, काहीच मिळत नसे. मग तिला एका कॅनेडियन सेवाभावी संस्थेत कर्मचारी भरती होणार असे कळले म्हणून ती गेली आणि तेव्हापासून वाचलेल्या लोकांचे पुनर्वसन करण्यात ती गुंतली.

सकाळी आठच्या सुमारास त्यांना एक गाडी झुडुपांपाशी सोडे आणि संध्याकाळी पाच वाजता न्यायला येई. मग दिवसभर जंगलात, टेकड्यांवर विखुरलेल्या अनाथ मुलांचा शोध घेत, त्यांना छावणीवर घेऊन येत. ती सर्व मुले हबकलेली होती. काहींना व्यक्त होता येत होते, काहींना ते जमत नव्हते. ती नुसती रडत राहात. त्या मुलांना बोलते करण्यासाठी सिल्व्ही त्यांना सांगत असे की, ती त्यांच्यासारखीच या हत्याकांडातून वाचली आहे, तिनेही तिची माणसे गमावली आहेत, अँतेरामवेंना काही फुटांवरून कोणाला तरी भोसकताना पाहिले आहे. मग हळूहळू ते त्यांच्या कहाण्या तिला सांगत. एकदा सांगून झाले की ती मुले अधिकच गप्प होऊन जात. या वाचलेल्या मुलांना आसरा देणे, गरजेच्या वस्तू देणे आणि पोटाला अन्न देणे, गरजेनुसार औषधपाणी करणे हेही तितकेच महत्त्वाचे होते. लहानलहान मुले या धक्क्यातून तशी लवकर सावरली. पण दहाबारा वर्षांच्या पुढची मुले आणि म्हातारी माणसे यांना हे सारे खूप जड जात असल्याचे सिल्व्हीला दिसले. आपण काहीही केलेले नसताना अँतेरामवेंनी आपल्याला का नष्ट करू पाहिले हे त्यांना कळत नाही. जीवनाच्या उंबरठ्यावर असलेले नवतरुण प्रौढांचे आयुष्य जगायला बिचकत आहेत किंवा कसलाही विचार न करता आला दिवस ढकलत आहेत, नवतरुणी कशाही प्रकारे गर्भार राहात आहेत, त्यांना होणाऱ्या बाळाच्या भविष्याची चिंताच नाही असेही सिल्व्हीला दिसले. मात्र जे नवतरुण एकमेकांशी संवाद साधतात, काहीजण तर हुतु मुलांशीही बोलतात, त्यांच्यात तिला आशेचा किरण दिसतो. काँगोहून परतलेली हुतु मुले धड शाळेत जात नाहीत, नुसती भटकत असतात. विचारले, तर त्यांच्या प्रवासाबद्दल सांगतात पण हत्याकांडाचा विषय निघाला की गप्प बसतात. ती कधी कोणाच्या डोळ्याला डोळा भिडवून बोलत नाहीत. काहींचे नातेवाईक मेले आहेत, काहींचे तुरुंगात आहेत. का आहेत तुरुंगात असे विचारले, तर उत्तर देत नाहीत. आम्हाला काही माहिती नाही, आजारी होतो, इथे नव्हतोच असेच काहीतरी सांगतात. सिल्व्हीला वाटते की, जोवर ती मुले त्यांच्या भावनांचा नीट निचरा करणार नाहीत तोवर त्यांना मनःस्वास्थ्य लाभणार नाही. त्यासाठी ती त्यांना पुन्हापुन्हा भेटते. तुत्सींनाही आणि हुतुंनाही. रात्री अनेक मुले दचकून जागी होतात, किंचाळतात. त्याने इतर मुलेही जागी होतात मग सारेच आपली दुःस्वप्ने जगतात.

सिल्व्हीची स्वतःची कहाणी औरच आहे. नऊ मुलांतली ती दुसरी. तिचे वडील रवांडाच्या राष्ट्रीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल होते, आई प्राथमिक शाळेत शिक्षिका. ब्युतारपासून १८ किलोमीटरवरील ऱ्युन्युन्या या उपनगरात एकूण बारा घरांत तिचे सगळे मिळून दोनशेच्यावर नातेवाईक राहात. सर्व प्रकारचे आजी आजोबा, काका, मामा, भावंडे यांच्यात सिल्व्हीचे बालपण आनंदात गेले. त्यांचे शेत असल्यामुळे त्यांना काहीच विकत आणावे लागत नसे. सिल्व्ही समाजशास्त्रात शिक्षण घेत होती, तिचे एका प्राध्यापकाशी लग्न झाले होते, तिने त्यांच्या बागेत फुलझाडे लावली होती.

ब्युतारे येथे हुतु आणि तुत्सी एकमेकांत मिसळत – विशेषतः शिक्षकवर्ग. पण राष्ट्राध्यक्ष आब्यारिमाना यांचे विमान कोसळले आणि सगळेच बदलले. सिल्व्ही म्हणते की तुत्सी आपसात कधी RPF आणि आब्यारिमाना यांच्यातील संघर्षाबद्दल बोलत नसत. बहुधा हुतु कायम राजकीय बाबींबद्दल आपसात बोलत असणार, मात्र त्यांनी त्यांचे विचार कधीच तुत्सींपुढे उघड केले नव्हते. त्यामुळे परिस्थितीला लागलेले वळण तुत्सींसाठी धक्कादायक होते. सिल्व्ही, तिचा नवरा, दोन मुले नेसत्या वस्त्रांनिशी आणि आपली सर्टिफिकेटस् बरोबर घेऊन निघाले. त्यांना दुसऱ्या एका कुटुंबासोबत बुरुंडीला जाण्यासाठी एक छोटा टेंपो केला. बुरुंडीची हद्द फार दूर नव्हती. वाटेत त्यांना काय हाहाकार माजला आहे त्याचे दर्शन झाले. प्रेते, मरणासन्न तडफडणारी माणसे आणि आसुरी आनंद व्यक्त करणारे अँतेरामवे. सरहद्दीवर शेवटचे फाटक लागले. तेथे पळून आलेल्या तुत्सींची एकच गर्दी झाली होती आणि तेथेही अँतेरामवे त्यांच्या मागे लागले होते. सिल्व्ही भीतीने गोठून गेली. ती म्हणते, भीतीने आलेल्या बधीरतेमुळेच ती भीतीवर मात करू शकली. जास्त न ताटकळता तिने व तिच्या नवऱ्याने मुलांना काखोटीला मारून पळायला सुरुवात केली आणि वाट काढत ते बुरुंडीच्या हद्दीत गेले. मागे अनेकजणांना रवांडाच्या हद्दीत प्राण सोडताना तिने पाहिले.

गोऱ्यांच्या एकूण वागणुकीबद्दल तिला राग येतो. त्यांनी कधी नीट आत्मीयतेने परिस्थिती समजून घेतली नाही. टीव्हीच्या प्रतिनिधींनी काँगोहून परतणाऱ्या हुतुंची बिचारे, युद्धात पोळलेले, अशी प्रतिमा केली. RPFने किगालीवर ताबा मिळवला तेव्हा जमातींचे युद्ध तुत्सींनी जिंकले असून ते हुतुंना पळवून लावत आहेत असे वार्तांकन केले. त्यांनी कधी या भयानक हत्याकांडातून हलाखीत तगून राहिलेल्यांच्या कहाण्या शोधल्या नाहीत. मग या तुत्सींची व्यथा सांगणार कोणाला ? त्यामुळे तिला जाँ आत्झफेल्डचे काम महत्त्वाचे वाटते. म्हणून ती त्यांना सहकार्य करायला तयार झाली.

या सगळ्या घटनांमागे तीन कारणे प्रामुख्याने पुढे येतात: पहिले म्हणजे गरिबी. दुसरे अज्ञान. तिसरे प्रचारक आणि प्रचाराला बळी पडणाऱ्यांची संख्या – ८० टक्के हुतु निरक्षर आहेत. त्यांना भडकवणे सोपे होते. या साऱ्यातून काय साधले हाही एक अनुत्तरित प्रश्न आहे. कोणीही हुतु कोणाही तुत्सीच्या डोळ्याला डोळा भिडवत नाही. कोणीही तुत्सी आपण आपला जीव वाचवला याबाबत अभिमानाने बोलत नाही. कोणालाच सुरक्षित वाटत नाही हे सिल्व्हीचे भाष्य त्या घटना घडून गेल्यावर ६ वर्षांनीदेखील रवांडातील परिस्थितीवर प्रकाश टाकते.

ऑगस्ट १९९४पासून आता रवांडात RPFची सत्ता आहे. त्यात तुत्सींचे वर्चस्व आहे. सन २०००पासून पॉल कागामे हेच रवांडाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. २००३साली राष्ट्रीय कौल (referendum) घेऊन नवीन राज्यघटना अस्तित्वात आली. त्यानुसार तेथे बहुपक्षीय व्यवस्था, लोकशाही, निवडणुका यांना स्थान आहे. प्रत्यक्षात कोणताही पक्ष अस्तित्वात येताना कलम ५४अन्वये कोणताही वंश, जमात, प्रांत, धर्म, लिंगभाव यावर किंवा इतर कोणत्याही दुजाभाव निर्माण करणाऱ्या आधारावर निर्माण झालेला नसावा असे म्हटले आहे. लोकसभा समकक्ष ८० जागांसाठी विविध आरक्षणे आहेत. त्यातील २४ महिलांसाठी असून त्यांची निवड स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी करतात. ३ जागा तरुणांसाठी व अपंगांसाठी आहेत, तर उरलेल्या ५३ जागांसाठी सार्वत्रिक निवडणुका होतात, मात्र त्यांत लोकसंख्येनुसार विविध समाजगटांना प्रतिनिधित्व आहे.

UN Security Councilने स्थापन केलेल्या International Criminal Tribunal for Rwanda चे काम अनेक टप्प्यांत होऊन अखेरीस २०१२ रोजी पूर्ण झाले. तोपर्यंत पॉल कागामे यांची सत्तेवरील पकड घट्ट झाली होती आणि एकानुवर्ती कारभाराचे फायदेतोटे रवांडातील जनता भोगत आहे. तेथील लोक अजून दारिद्र्यात आहेत, मात्र Transparency Internationalनुसार आफ्रिकेतील ४७ देशांपैकी रवांडा कमी भ्रष्टाचार असलेल्या देशांत मोडतो. 'स्वच्छ' देशांत त्याचा पाचवा क्रमांक आहे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

> ११ एप्रिल ते १४ मे १९९४ या काळात रवांडा देशातील ५९ हजार तुत्सी लोकांपैकी ५० हजारांपेक्षा जास्त लोकांची भोसकून हत्या करण्यात आली.

हे आकडे बरोबर आहेत का? मी (विकिपीडियासकट) इकडच्या तिकडच्या अनेक वेबसाईट्स पाहिल्या. मारल्या गेलेल्या तुत्सींची संख्या अनेक ठिकाणी पाच ते आठ लाख अशी दिलेली आहे. आणि रवांडातल्या तुत्सींपैकी ७० ते ७५ टक्के मारले गेले असंही म्हटलं आहे.
----

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

लल्लनटॉप युट्यूब चॅनल वर एक स्टोरी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

ही माहिती सदर पुस्तकाच्या पहिल्या पानावर आहे. इतरत्र शोधले मात्र नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार.
शतकानुशतकं या दोन जमातींचे समाज एकमेकांच्या आसपास नांदत असावेत.
असं, इतक्या भीषण हत्याकांड होण्याचं मूलभूत कारण काय असावे ?
सध्या त्या भागात काय परिस्थिती ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आसपास नांदत होते, आणि चकमकीही होत होत्या. पण संपूर्ण वंशसंहार करण्याची आकांक्षा (आणि तो अंमलात आणण्याची शक्यता) आधुनिक काळातल्या काटेकोरपणे विभागलेल्या वांशिक कप्प्यांमुळे उद्भवल्या असाव्यात.(ममदानी सुदानबद्दल असेच म्हणतात) रवांडातच नाही तर अनेक ठिकाणी (अगदी लेटेस्ट गाझा पट्टीत) एकदाचं 'फायनल सल्यूशन' साधून एकवंशीय राष्ट्र स्थापन करण्याचे प्रयत्न झाले आहेत..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख वाचताना "Hotel Rwanda" या सिनेमाची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Dian Fossey यांनी लिहिलेलं Gorrilas in the Mist हे पुस्तक वाचतोय. जॉर्ज शेलरनंतर माउंटन गोरिला संशोधक म्हणून यांचे मोठे नाव आहे. यांची रिसर्चप्रोजेक्ट साईट कॉंगो आणि रवांडा बॉर्डरवर होती.त्यातील या लेखाशी संबंधित काही भाग इथे उद्धृत करतो.
" The porters were mainly Bahutu people of Bantu race, the main agriculturists of the area. More than four centuries previously the Watutsi people of Hamitic race came down from the north and subjugated the Bahutu who were living in the region that came to be known as Rwanda. A type of feudalism developed as Watutsi who owned the cattle,took over land. The Bahutu then had to pay
in service or goods for the right to use the cattle and the pastureland. In time the Bahutu became the serfs of the Watutsi Kings.
The two castes remained distinct throughout most of the German and Belgian colonial period until 1959, when the Bahutu overthrew their Watutsi masters. Rawanda became independant of Belgian rule with Bahutu in power. The revolution and its aftermath lasted well into 1973 and caused the slaughter of thousands of Watutsi and the exodus of many thousands more. To this day some betterness remains between the two races.
Many of the Watutsi who remained in Rwanada tended cattle and because of land scarcity, were grazing vast herds illegally within the park when I arrived in 1987. "
या संशोधकाचा १९८५ साली खून झाला.
अवांतर माहिती: २०००साल पासून रवांडाचे अध्यक्ष असलेले पॉल कागामे हे तुत्सी आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हुतू आदिवासी होते, मग तुत्सी आले, त्यांनी राज्य केलं, त्यांना युरोपीयन लोकांनी आश्रय दिला, आणि मग स्वातंत्र्य मिळाल्यावर शतकानुशतके पिळवणूक झालेले हुतु जागे झाले..... हे सुद्धा पुष्कळ गुंतागुंतीच्या इतिहासाचे थोडे सरसकतीकरणच असावे. "The two castes remained distinct" हे राजकीय दृष्ट्या सत्य असले तरी, आणि वंश, कुल निराळे ठेवूनही त्यांच्यात सामाजिक संबंध, लग्नसंबंध होतेच की. तरी असे झाले. हुतु पुरुषांच्या तुत्सी बायकांनाही मारले गेले. त्यामुळे शिरकणाची कारणं खोल इतिहासात न शोधता अलीकडच्या राजकीय समीकरणांमध्ये शोधायला हवीत, आणि राजकीय ओळखींनी पूर्ण सामाजिक देवाणघेवाण काशी व्यापली हे समजून घ्यायला हवे, असे काही संशोधकांचे मत आहे. पण कितीही कीस पाडला तरी या प्रमाणावर झालेल्या हिंसाचाराचा अर्थ लावणं अशक्यच वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थात.
हे एका अमेरिकनाच्या दृष्टीने लिहिलेले वर्णन आहे. सरसकटीकरण आहेच..एकीकडे या लेखिकेचा गोरिला विषयक अभ्यास चांगला मानला जातो ( आणि त्याबरोबरच त्यांचे चेन स्मोकिंग alcoholic रेसिस्ट असेही वर्णन केले जाते. माणूस याबाबतीत एका बाजूचा असला की त्याच्या लिखाणात वस्तुनिष्ठता कितपत राहते हे समजत नाही.
सो हे लिहिलेले सरसकटीकरण म्हणूनच घेतले, घ्यावे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चारशे वर्षांपूर्वीपासूनच्या घटना वाचनात आल्या नाहीत. सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे वर्णाने हुतुंपेक्षा उजळ असल्याने वसाहतवादी बेल्जियन लोक तुत्सींना झुकते माप देत हे आहेच. पण तुत्सी आक्रमक नसावेत असे एकंदर पुस्तक पाहता वाटते. आत्सफेल्ड यांनीही त्यांचे दुसरे पुस्तक हुतुंच्या मुलाखतींवर आधारित लिहिले (२००३) ते आमच्या ग्रंथालयात नाही. आणि त्यांना तिसरे पुन्हा तुत्सींकडे झुकलेले लिहावे वाटले (२००७). ते तिसरे मी वरवर चाळले फक्त. पहिले वाचून आलेली हताशा आणि तिसऱ्या पुस्तकाच्या ब्लर्बवर लिहिलेले 'तुत्सी लोक या वांशिक कत्तलीनंतर कसे जगत आहेत आणि हुतु व तुत्सी जमातींत सलोखा कसा दुरापास्त आहे' वाचल्यानंतर धीर झाला नाही. (लिहायचंही होतंच).
मी शेवटच्या परिच्छेदात महटल्याप्रमाणे चौकशी समितीचे काम भरपूर लांबले. (त्यातून आकडेवारीवरही नवीन प्रकाश पडला असेल.) या सगळ्यातून अध्यक्षांची सत्तेवर पकड घट्ट झाली असे दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ज्याचा इतिहास सरळसोट आणि सोप्पासोप्पा आहे असा मानवी समाज माझ्या समजुतीप्रमाणे कधीही आणि कुठेही अस्तित्वात नव्हता. राजकीय, सामाजिक, वांशिक, आर्थिक, भाषिक अंगाने प्रचंड गुंतागुंत ही सगळीकडे असते. तेव्हा काही प्रमाणात सरसकटीकरण अपरिहार्य आहे असं मला वाटतं. ते पूर्णपणे टाळायचं आणि प्रत्येक कंगोऱ्यात खोल शिरायचं असं ठरवलं तर कासेगाव खुर्द ग्रामपंचायतीचा इतिहास पंचवीस हजार पानी होईल. तेवढा तो वाचायचं ठरवलं तर रोमन साम्राज्याच्या इतिहासाचं एकोणीस लाख पानी पुस्तक उघडायला वेळ कुठे उरणार मग?
---

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

ज्याचा इतिहास सरळसोट आणि सोप्पासोप्पा आहे असा मानवी समाज माझ्या समजुतीप्रमाणे कधीही आणि कुठेही अस्तित्वात नव्हता. ... तेव्हा काही प्रमाणात सरसकटीकरण अपरिहार्य आहे असं मला वाटतं.

कोठलाही/कोणाचाही इतिहास हा गुंतागुंतीचाच असतो, हे (सरसकटीकरण? चूभूद्याघ्या.) मान्य आहे. आणि, कितीही म्हटले, तरी, कोठे ना कोठे, काही ना काही प्रमाणात सरसकटीकरण हे, इतिहास कोणाचाही नि कोणीही लिहिला, तरीही, (जाणूनबुजून नव्हे, नि अनवधानाने का होईना, परंतु) टाळता येत नाही टाळले जात नाही, हेही समजण्यासारखे.

उलटपक्षी, कोठल्याही (कोणाच्याही, कोणीही लिहिलेल्या) इतिहासाचे Four legs good, two legs bad स्वरूपाचे सरसकटसुलभीकरणही (अनवधानाने वा जाणूनबुजून) करता येतेच, हाही भाग आहेच.

The truth should lie somewhere in between. The closer to the former, the better.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0