उड उड रे काऊ। पुन्हा नको मज शिवू॥

#संकीर्ण #हिस्टरेक्टोमी #आफ्रिका #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२३

उड उड रे काऊ। पुन्हा नको मज शिवू॥

- ३_१४ विक्षिप्त अदिती

रक्तवारुणीची बाटली उघडली. तिघांच्या पेल्यांत थोडीथोडी ओतली. तिला थोडी हवा लागू दिली. ठीकठाक शिराझ होती ती बहुतेक. एक घोट तोंडात ठेवला आणि त्याबरोबर 'याझ' घेतली. 'याझ' हे जेनेरिक औषधाचं नाव आहे 'द पिल', किंवा गर्भनिरोधक गोळीचं. ही शेवटाची सुरुवात होती, पण ते तेव्हा माहीत नव्हतं.

काही महिन्यांनी पाळीच्या वेळेस पोटात दुखायला लागलं. फार नाही; दोन तास मऊमऊ खुर्चीवर बसण्यापेक्षा अतीमऊ सोफ्यात बसता आलं तर बरं, इतपतच. म्हणून गायनॅकनं माझी अल्ट्रासाऊंड करवून घेतली. तेव्हा समजलं की मी बिनबापाचे तीन गोळे, युटेराईन फायब्रॉइड वाढवत होते.

आपल्याला हवा तेव्हा बिनदिक्कत प्रवास करता आला पाहिजे; आपल्या शरीरावर आपला ताबा पाहिजे ही राजकीय भूमिका माझ्या शरीराला झेपत नाही; यासाठी एक विदाबिंदू तेव्हा मिळाला.

अतिसंवेदनशील मनं असणाऱ्यांसाठी आणि बालकांसाठी पुढचा मजकूर नाही.

अल्ट्रासाउंड दोन प्रकारच्या असतात. पहिल्या अल्ट्रासाऊंडचा वाँड मजेशीर आकाराचा असतो. मश्रूम आणि गाजराला पोर झालं तर कसं दिसेल, तसा! त्यावर ऊबदार जेली लावतात. बाहेर खोलीत बराच अंधार असतो, पण स्क्रीन्स सुरू असतात, आणि त्यांचा काहीसा उजेड असतो, स्क्रीन दिसतात पण तो उजेड छान ऊबदार वाटत राहतो. आपल्याला झोपायला सांगतात. अधरीय म्हणून चादर अर्ध्या लुंगीसारखी. आपण आडवे झोपलेले, आरामात. कमरेखाली एक योग्य आकाराची उशी. आणि ती अल्ट्रासाउंड टेक्निशियन म्हणते, आता ऊबदार जेली लावलेला वाँड योग्य ठिकाणी, आपला आपणच सरकव बघू. नंतर टेक्निशियन वाँडचा ताबा घेते. "तुला त्रास तर होत नाहीये ना?" असं ती विचारते. वेगवेगळ्या इमेजेस घेण्यासाठी ती वाँड वेगवेगळ्या पद्धतीनं फिरवून वापरते. "कमरेखाली सुयोग्य आकाराची उशी किती सुखद वाटते!", असं मी तिला म्हणायचे, "शिवाय सगळं काम तर तूच करत्येस. मला कसला त्रास!" आता ही चाचणी करण्याची काही गरज नाही. एवढी एकमेव दुःखद गोष्ट आता आहे.

दुसरी पोटावरून वाँड फिरवून करतात त्यात गर्भाशयात काय सुरू असतं हे बघता येणं मला फार काला-जादू-छाप वाटतं. विशेषतः मॅमोग्राम करायला सुरुवात केल्यानंतर तर फारच. त्याचं असं आहे की मला एक प्रकारचं अपंगत्व आहे; मला वरचं क्लीव्हेज नाही. त्यात मॅमोग्रामसाठी स्तनाचं जे काही मांस असतं ते दोन जाड, वजनदार प्लेट्समध्ये चेपून (चेचून हे क्रियापदही चालेल) फोटो काढले जातात. त्यात स्तनांवर एवढा दाब येतो की त्यांचा आकार कायमचा बदलून पिरॅमिडसारखा होईल असे विचार माझ्या मनात येत राहतात. (विरोधी पक्षाच्या दडपणाखाली राष्ट्रप्रमुख कसे आपली भूमिका बदलत नाहीत!) अल्ट्रासाऊंडचं वेगळं पडतं. पोटावरच्या चरबीचा विचार करता जेवढ्या लांबून फायब्रॉइड्स बघतात, हे बघून झाडाच्या फांद्या हवेत हलवून भूत उतरवतात किंवा कॅन्सर बरा करतात, यातही तथ्य असू शकेल अशी शंका येते. खरं सांगायचं तर ती पहिली अल्ट्रासाऊंड फार छान असते. ती आता करणार नाहीत, या दुःखापोटी मी हे असले आरोप करत्ये.

"त्या फायब्रॉईडांचा आकार वाढला नाहीये ना? मी त्यांचं पोषण करत नाहीये ना? मी त्यांची कुमाता आहे ना? प्लीज, मला आदर्श माता होण्याची हौस नाही. हे बिनबापाचे गोळे आता आहेत, पण तो काही माझा निर्णय नाही."

मी दर वर्षी हा प्रश्न न चुकता विचारला. दहा वर्षं. कदाचित नऊ असेल. एखादं काम आवडत नसेल तर एवढं वाईट पद्धतीनं करायचं की कुणी पुन्हा ते सांगत नाही. मी एकदा एका मित्राला चहा पाजला होता. त्यानं अख्ख्या मित्रमंडळाला सांगून टाकलं, "अदिती एकटी असताना घरी जाणार असाल तर तिला घेऊन बाहेर जा, आणि तिकडचा चहा प्या!" कॉलेजात होते तेव्हा अपघातानंच हा शोध लागला होता. आळस ही शोधाची जननी असते, असं म्हणतात ते काही खोटं नाही! असो.

ह्या वर्षी अल्ट्रासाऊंड करणारी मुलगी गर्भार होती. आणखी एक महिन्यात ती सुट्टीवर जाणार होती. मी तिला तोच प्रश्न विचारला, "मी वाईट आई आहे ना?" तिनं फार उत्तर दिलं नाही. मी खरंच तिच्याबद्दल बोलत नव्हते. स्वप्रेम काय फक्त राष्ट्रप्रमुखांसाठी राखीव ठेवलेलं असतं का!

म्हणून मला गायनॅक आवडते; ती अनुभवी स्त्री आहे. आता ती अर्धवेळ काम करते. मला तिच्याबद्दल थोडी असूयाही वाटली. मलाही चालेल फक्त अर्धाच वेळ काम करून अर्धाच पगार मिळणारी नोकरी. (मग मला बरा अर्धा कमावती अर्धी म्हणेल का?) गायनॅक सांगत होती, "तुझे फायब्रॉइड गेल्या वर्षात तिप्पट आकाराचे झाले आहेत. काही वर्षांपूर्वी तू सर्जरीला नकार देत होतीस. आता तुझं काय मत आहे? मूल नको या निर्णयाबद्दल ठाम असलीस तर आता सर्जरी करावीस असं मला वाटतं."

तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्टच दिसत होती. मी लगेच होकार दिला. तिनं बरीच माहिती दिली. फायब्रॉइड आणि कॅन्सरचा संबंध असू शकतो; पण आणखी ३० वर्षं हे काही समजणार नाही; शिवाय हे संशोधन हवं तितकं ठोस नाही; वगैरे. मला नंतर आठवलं ते 'ब्रेकिंग बॅड'मध्ये कॅन्सरचं निदान समजल्यावर तो वॉल्ट कसा डॉक्टरच्या एप्रनवरच्या पिवळ्या, राईच्या डागाकडे बघत असतो. तो वॉल्टर व्हाईट आणि माझ्यात बरंच साम्य आहे. दोघेही थंड काळजाचे, मेलोड्रामाद्वेष्टे, रोबॉट!

"सर्जरी झाल्यानंतर किती काळ मी आडवी असेन?"

"चोवीस तास हॉस्पिटलातच राहा. तू घरूनच काम करतेस ना? मग आठवड्याच्या आत तुला कामावर जाता येईल. आतून सगळं पूर्ण भरून यायला साधारण सहा आठवडे लागतात. तुला आत्ता लगेच सर्जरी करायची नसेल तर सहा आठवड्यांनी पुन्हा ये, आपण पुन्हा अल्ट्रासाऊंड करू. फायब्रॉइड फार वाढलेले नसतील तर उन्हाळ्यात सर्जरी कर."

मला हे लॉजिकच समजेना. जर सर्जरी करायचीच हे ठरवलं आहे तर उन्हाळ्यात कसला मुहूर्त निघणार आहे? मुख्य महत्त्वाची गोष्ट अशी की अल्ट्रासाऊंडचे बरेचसे पैसे माझ्या पाकिटातून जातात, इन्शुरन्स देत नाही. तर मग वाढीव अल्ट्रासाउंड कशाला करायची? आठ-दहा मिनिटं चालणाऱ्या चाचण्यांचे पैसे फार असतात! उन्हाळ्यात शाळांना सुट्ट्या असतात. पण मला काय त्याचं! मला पोरंच नाहीत! एक खरं आहे. टेक्सासी उन्हाळ्यात बाहेर पडायची फार सोय नसताना सर्जरी करण्यात शहाणपणा आहे. ठरवलंय तर आत्ताच करून टाकू!

"एप्रिलच्या शेवटी मी प्रवासाला जायचा बेत करत होते. ते जाता येईल का?"

"मार्चच्या मध्यापर्यंत सर्जरी केलीस तर फार अडचण येऊ नये. तिथे जाऊन अगदी उड्या मारता येणार नाहीत; तसा काही बेत नाही ना तुझा?"

गायनॅकच्या ऑफिसातून मी घरी यायला निघाले. संध्याकाळी ज्या रस्त्यावर कमी गर्दी असते, तिथे सिग्नल असतात; ते सहन करून घरी जायचं असं मी आधीच ठरवलेलं होतं. ते साफ विसरून मी सवयीच्या, आणि गर्दीच्या रस्त्यावर गाडी घातली. अमेरिकी हायवेचा बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजता झालेला पार्किंग लॉट होता. बंद डोकं सुरू करण्यासाठी ही चांगली व्यवस्था आहे. मग त्या हायवेवरून कशीबशी बाहेर पडले; सिग्नलवाल्या रस्त्याला गेलेच नाही. इतर कुणीही टोलचे पैसे देणार नसताना, घरी जायची घाई नसताना मी टोलवाल्या रस्त्यावर गाडी घातली! मला वाटते तेवढी काही मी स्थितप्रज्ञ, रोबॉट, शिळा वगैरे नाही, हे आत्मज्ञान झालं.

काहीही म्हणा, आत्मज्ञान हा शब्द चावट आहे. जाणणे, ज्ञान वगैरे शब्दांचं मूळ एखाद्या व्यक्तीला जाणणे, म्हणजे त्यांच्याबरोबर संग करणे, अशा वापरातून आलेला आहे. इंग्लिशमधला knowledge ह्या शब्दाचं मूळही तेच आहे म्हणे. 'खुद से प्यार जताऊं' म्हणजे आत्मज्ञान. जडजंबाल शब्द वापरणाऱ्यांना कुणी तरी हे सांगितलं पाहिजे.

पण आता जरा प्रॉब्लेमच होणार होता. मला ते अजून माहीत नव्हतं. हिस्टरेक्टोमीनंतर सहा आठवड्यांचा 'उपास' सांगितला जातो. पोहायचं नाही, बाथटबमध्ये डुंबून आंघोळही करायची नाही, असा 'निर्जळी उपास'. इंग्लिशमध्ये त्यासाठी खूप गोडगुलाबी शब्दप्रयोग आहे - pelvic rest.

मी सर्जरीला होकार तर दिला; पण पहिली भीती वाटली ती कागदपत्रांची. अमेरिकेत आरोग्यविमा असणं आता सक्तीचं आहे – थ्यँक्यू ओबामा. कोण त्या लोकांना फोन करणार! "मरो ते! उद्या बघू" असा उदात्त विचार केला आणि बऱ्या अर्ध्याला बातमी दिली. वॉल्ट त्या डॉक्टरच्या कोटवरच्या पिवळ्या डागाकडे कसं लक्ष देत होता, हे आता मला बऱ्या अर्ध्याकडे बघून समजलं. त्याचा चेहरा एवढा उतरलेला मी आजवर बघितलेला नाही.

त्यालाही भविष्य समजत असावं. त्याला गाड्या उडवायची हौस आहे. त्याचं वयमध्य, मध्यवय, मिडल एज, जे काही ते नाम आहे, ते माझ्या आधी आलं आहे. कदाचित अकालीच आलं आहे. त्यानं काही वर्षांपूर्वी स्पोर्ट्सकार घेतली. त्या गाडीमुळे मला भारताची आठवण कमी येते! गाडीत बसल्यावर एस्टीसारखी गर्दी, रस्ता कितीही गुळगुळीत असला तरी बसणारे धक्के, काय विचारू नका! ही गाडी त्याची आवडती गाडी आहे (होती; पण ती गोष्ट निराळी). सर्जरीनंतर त्या मिडएज क्रायसिस गाडीतून फिरताना पोटात किती गोळे येणार … हे बऱ्या अर्ध्याला कसं समजलं, कोण जाणे! पण त्याशिवाय का सर्जरीची बातमी दिल्यावर त्याचा चेहरा उतरला असणार!

मला कागदी घोडे नाचवण्याची थोडी भीती वाटते. सुदैवानं इन्शुरन्सशी फोनाफोनी करण्याची तसदी हॉस्पिटलवाल्यांनीच घेतली. पण त्यात नवीन अरिष्ट समजलं. मार्चमधल्या एका रम्य सकाळी ११ वाजता माझी सर्जरी असणार होती. त्यासाठी ९ वाजता हॉस्पिटलात जायचं होतं. पण आदल्या रात्री १२नंतर काहीही खायचं-प्यायचं नव्हतं. सकाळी उठायला पाच मिनीटं उशीर झाला तरी जागी झाल्याझाल्या पहिली गोष्ट मला समजते – भूक लागल्ये. मी पुढचे चार दिवस चिकार चुकारपणा केला; आणि मॅनेजरनं विचारल्यावर, "सर्जरी आहे, चलबिचल खूप होत्ये", असं कारण डकवून दिलं.

(अत्यंत सुंदर सबब आहे ही! वापरून पाहा कधी तरी! खरोखर सर्जरी नसेल तरीही सांगून पाहा लोकांना! आईशप्पथ!! गर्भाशय, स्प्लीन, अपेंडिक्स असे अवयव भांडवलशाहीत सबबी तयार करण्यासाठीच देवानं दिले आहेत. लहानपणी डोकं दुखल्यामुळे मी शाळा बुडवायचे. मी नक्की मोठी झाले आहे.)

सर्जरीला आठवडा असताना सर्जननं भेटायला बोलावलं होतं. तिनं सर्जरीची बरीच माहिती दिली. आता रोबॉटिक सर्जरी असणार, त्यामुळे पोटावर फक्त चारच ठिकाणी छेद देणार. गर्भाशयाचा रक्तपुरवठा आणि नसा आधी कापणार. मग तिनं तिच्या ऑफिसातल्या आकृत्या दाखवून हे-हे भाग कापणार, हे-हे भाग ठेवणार, असं दाखवलं. शिवाय आकृतीत अंडाशयं, म्हणजे ओव्हऱ्या, फक्त फॅलपियन ट्यूब्जना जोडलेल्या दाखवलेल्या आहेत. प्रत्यक्षात तिथे कार्टिलेज का कायसंसं असतं. त्यामुळे त्या काही पोटाच्या पोकळीत तरंगत राहणार नाहीत, याची हमी दिली. खोटं कशाला बोलेल ती!

रोबॉटिक सर्जरी
चित्रश्रेय - ३_१४ विक्षिप्त अदिती

"तुझे फायब्रॉइड आता बरेच मोठे आहेत. सगळ्यांत मोठा दहा सेंटीमीटरचा आहे." मला जुना आकडा आठवत होता, तीन सेंटीमीटर. गेल्या वर्षात मी अचानक सुमाता झाले होते. सर्जरी करून घेण्याचा निर्णय योग्य असल्याचं स्वतःलाच का सांगत होते? सर्जन सांगत होती, "हे फायब्रॉइड खूप मोठे आहेत, त्यामुळे पोटावर छेद देऊन तिथून ते काढावे लागतील. लहान असतील तर ते योनीमार्गावाटेच बाहेर काढता येतात."

"हां, म्हणजे हे बिनबापाचे फार मोठे केल्यामुळे मी गर्भाशयाला जन्म देऊ शकत नाही. समजलं." (मी आई नाही हेही मी एवढ्या ठासून ठासून स्वतःलाच सांगत होते का?)

सर्जरी संपताना पोटात वायू भरतात. त्यामुळे आणखी काही मोडलं असेल तर ते बघणं सोपं होतं; काही दुरुस्ती करायची असेल तर तीही तेव्हाच करतील असं ती म्हणाली. "जमेल तेवढा वायू आम्ही बाहेर काढतो. पण थोडा राहतोच. आणि त्यामुळेही दुखतंच. सर्जरीचं दुखणं निराळं. त्या वायूमुळे खांद्यातही दुखू शकतं."

"सर्जरीनंतर वेदना खूप होतात. तेव्हा तुला ओपिऑइड्स घेता येतील," असं ती म्हणाली.

"तू नवनवीन कल्पना माझ्या डोक्यात का भरवत्येस?"

"काय विचारू नकोस! माझ्या आईची सर्जरी झाली त्यानंतर तिला याचं व्यसन लागलं होतं. तीनेक आठवड्यांत ते लक्षात आलं. मग तिला हळूहळू सोडायला लावली. तेव्हा तिला उलट्या वगैरेही झाल्या."

"तुला आणखी काही शंका आहेत का?" तिनं विचारलं.

"मी सर्जरी-व्हर्जिन आहे. ते कौमार्य तूच संपवणार. नक्की काय शंका विचारायच्या हेही मला माहीत नाही. पण माझी यादी काढते."

ती जोरदार हसली. "व्हर्जिन आहेस, तर चल आपण इतिहास घडवू!"

आता ह्या सर्जनवर माझा पूर्ण विश्वास बसला!

"दोन मुख्य शंका आहेत. सध्या मी आठवड्याचे पाच दिवस, प्रत्येकी चार ते पाच किलोमीटर धावते. सर्जरीच्या दिवशीही सकाळी वेळ असेल. पण नंतर तहान लागेल. तर दोन-तीन घोट पाणी प्यायलेलं चालेल का?" तिनं उदारपणे दोन-तीन घोट पाणी प्यायची परवानगी दिली. व्हर्जिनिटीच्या बदल्यात तर हा उदारमतवाद असेल का? आता मला शंका आहेत.

"पहिले सहा आठवडे व्यायाम नाही, वजनं उचलायची नाहीत हे ठीक. पुन्हा परत धावायला किती दिवस लागतील?"

तिनं काही धड उत्तर दिलं नाही. बारा तासांच्या उपासाचा निर्जळीपणा किंचित मोडायची परवानगी दिली; पण सहा आठवड्यांचा 'उपास' या पलीकडे ती काही म्हणेना.

एप्रिलच्या शेवटी ज्या मित्राबरोबर प्रवासाला जाणार होते, त्या जयदीपलाही ही बातमी दिली. अजून आम्ही तिकिटं वगैरे काढली नव्हती, हवेत बोलणी सुरू होती. तिकडे त्याला कदाचित काही सामान उचलावं लागेल; खूप लांब चालायला जायचे बेत कदाचित रद्द करावे लागतील, वगैरे.

"खर्च किती होणारे तुझा? आमच्याकडे, कॅनडात हे सगळं फुकटातच होतं."

"काही हजार डॉलर जातील, असा अंदाज आहे माझा. किमान तेवढ्यावर कर भरावा लागणार नाही."

"पोर झालं तर यापेक्षा बराच जास्त खर्च होईल. तेव्हा ठीकच आहे."

या मित्राला मूल नाहीच; शिवाय त्यानं बिनबापाचे गोळेही पोटात वाढवले नसणार!

अल्ट्रासाऊंडवाली म्हणत होती, "आम्ही फक्त तीन मोठे किती आकाराचे आहेत ते मोजतो." आतापर्यंत माझा समज होता की मी फक्त तीनच वाढवत्ये, किंवा वाढवत नव्हते. मुळात आईपणाची हौस नसताना एकसुद्धा लेकुरे उदंड झाली. आता अचानक एक दिवस त्यांच्यासाठी सुमाता! हे प्रतिमाभंजन थांबवणं क्रमप्राप्त होतं.

आणखी तीन मित्रांना एकत्र सांगितलं, की आणखी दोन आठवड्यांत माझी हिस्टरेक्टोमी करणार आहेत.

सर्जरी झाली; सहा आठवड्यांचा 'उपास' सर्जननं संपवला; मी हात-पाय-पाठ मोडेस्तोवर बागकाम करायला लागले. तिघांपैकी एक मित्र म्हणे दुसऱ्याला फोनवर कायम "अदितीचं कसं सुरू आहे" विचारत असतो. उद्या मला ॲम्निशिया, अल्झायमर्स वगैरे काही झालं आणि मी माझी ओळखही विसरले तरी माझी हिस्टरेक्टोमी झाली आहे हे विसरण्याची सुतराम शक्यता नाही.

तिसऱ्या मित्राचं तिसरंच काही. तो म्हणे, "खानेसुमारीची ओळ वाचवलीस हो, पोरी!"

सुमी (का मनी, का टनी, का कोण ती) गेली, तिचं इवलंसं गर्भाशय गेलं; खानेसुमारीची ओळ वाचली वगैरे. मी खानेसुमारीची ओळ वाचवली म्हणजे मी जिवंत आहे का?

फेसबुकनं मला ball shaverच्या जाहिराती दाखवायला सुरुवात केली आहे. म्हणजे मी जिवंत असेन तर मी नक्कीच पुरुष असणार.

जवळपास राहणाऱ्या आणि काही जवळच्या मैत्रिणींनाही सांगितलं. सई म्हणाली, "शांता गोखलेही म्हणतात की एकदाच्या जबाबदाऱ्या संपल्यानंतर त्यांना लेखनाला वेळ मिळाला. रीटा वेलिणकर'मध्ये एक प्रसंग आहे ज्यात तिला एक माणूस सतत तिच्या छातीकडे बघून बोलतो असं वाटत असतं. त्यावर ती म्हणते की "ब्रेस्ट्स detachable असते तर किती बरं झालं असतं!" ती ओळ मी अनेक कारणांमुळे कधीच विसरणार नाही. माझ्या एका मामीला तिसऱ्यांदा ब्रेस्ट कॅन्सर झाला आणि तिचं जे शिल्लक होतं ते एक स्तनही काढून टाकल्यावर म्हणाली होती, "तिशीत पहिल्यांदा कॅन्सर झाला तेव्हा एक ब्रेस्ट आणि (कीमोमुळे) पाळी गेली. आता दुसरं काढल्यानं माझ्या शरीराला पुन्हा सिमेट्री आली! आता मी पूर्णपणे मोकळी झाले!"" आणि मग ओळखीच्या वयस्कर स्त्रियांपैकी ज्या कुणी आवडतात त्या कशा बॅडॅस आहेत आणि त्यांचे तरुणपणाचे फोटो फार आवडत नाहीत, आताचेच फोटो आवडतात यावरून आम्ही गप्पा मारल्या.

सर्जरीला मी तयार झाल्यावर गायनॅक म्हणाली होती, "आता आपल्या आयुष्याचा दर्जा कसा राखता येईल याचा विचार करायचा." मला ती बाई फार आवडते. ताठ खांदे आणि डोळ्यांत मऊ करारीपणा आहे तिच्या! वयस्कर आहे ती, पण मला तिचा अनुभवच जाणवत राहतो. सईशी बोलताना मला तीही आठवत होती.

मागच्या उन्हाळ्यात चार दिवस न्यू यॉर्क शहरात मी आणि जयदीप भटकत होतो. अमेरिकेत गर्भपात हा घटनादत्त अधिकार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं त्याच्या आधीच्याच आठवड्यात दिला होता. जागोजागी ह्या निर्णयाचा निषेध करणारे फलक, काळ्या फिती दिसत होत्या. आम्ही संध्याकाळी ब्रुकलिन भागात फेरफटका मारताना एका इमारतीत, तिसऱ्या-चौथ्या मजल्यावर एक म्हातारी बाई बाल्कनीत उभी असलेली दिसली. इतालियन मूळ असलेली वाटत होती. गोऱ्या बाईचा रापलेला लाल चेहरा, कदाचित सिग्रेटमुळे वयापेक्षा थोड्या जास्तच सुरकुत्या, मेनोपॉजलाही १०-१५ वर्षं झाली असतील. जगाची काही पडलेली नाही अशा थाटात ती तिच्या बारक्या बाल्कनीतून जगाकडे बघत होती. तिच्याकडे कुणी बघावं अशी तिची अपेक्षाच नव्हती. तिला जगाकडे तिच्या नजरेतूनच बघायचं असावं, अशी ती तिथे होती. "हिला निषेध वगैरे नोंदवायची गरजच नाही ना!", मी जयदीपला म्हणाले.

म्हातारपणाबद्दल माझ्या खूप रोमँटिक कल्पना आहेत. कुठल्याशा मालिकेत एक म्हातारी तक्रार करत होती, "म्हाताऱ्यांकडे कुणीही पुन्हा वळून बघत नाही." मला हा प्रकार फारच आवडला. आता मीच अर्ध-औपचारिक म्हातारी आहे. औपचारिक मेनोपॉज अजून आलेला नसला, साधारण चार-पाच आठवड्यांनंतर गोड खाण्याची लहर येत राहिली तरी आता रक्तस्रावाची कटकट संपली. आता सुंदरबिंदर दिसायचं ओझं बाळगायची काहीही गरज नाही. मला तशीही ती हौस असलीच तर साधारण सव्वातीन मिनिटं टिकली असेल; सौंदर्यासाठी फार कष्ट होतात. आता कुणी अपेक्षाही बाळगणार नाही. सुंदर जगातली ही आणखी एक दुर्लक्षणीय म्हातारी म्हणून लोक माझ्याकडे दुर्लक्ष करतील आणि मला जे काही करायचं आहे ते करायचं आणखी जास्त स्वातंत्र्य मिळेल.

खरं तर, बायका लवकर म्हाताऱ्या होतात, दिसतात ही गोष्ट अत्यंत सुंदर आणि न्याय्य आहे. जरा समज यायला लागल्यापासून 'जग काय म्हणेल' याची भीती बाळगत जगायचं तर किमान त्यापासून सुटका तरी लवकर व्हावी. आपल्याला हवे तसे कपडे घालायचे; हवे तसे केस कापायचे. आणि कुणीही आपल्याकडे वळून बघणार नाही!

एक तुच्छ प्रश्न आहे. हिस्टरेक्टोमीनंतर फक्त पाळी येत नाही; पण हिस्टरेक्टोमी म्हणजे मेनोपॉज नाही; त्या दोन्हींचं घड्याळ (किंचित) निराळं असतं. मग जेव्हा महिन्यातले दोन दिवस गोडाची इच्छा होते तेव्हा देवळात गेलेलं चालतं का? पण मी नास्तिक आहे. मला कशाला हव्येत या भोचक चौकश्या!
उड उड रे काऊ।
पुन्हा नको मज शिवू॥

जवळच राहणारी एक नवी मैत्रीण म्हणाली, "तुला खूप आनंद होईल पाहा. माझीही हिस्टरेक्टोमी झाली आहे. मी दुसऱ्या दिवशी चालायला गेले होते. अत्यंत योग्य निर्णय होता हा माझा!" … आणि शर्ट थोडा वर करून तिनं तिच्या पोटावरच्या सर्जरीच्या खुणा दाखवल्या.

जवळ राहणाऱ्या यच्चयावत सगळ्या मैत्रिणी लगेच "काही लागलं तर नक्की कळव", असं आवर्जून आणि प्रेमानं म्हणाल्या.

पण एका तैवानी मैत्रिणीनं विचारलंच. "सेकंड ओपिनीयन घ्यावंसं नाही का वाटलं तुला?" ही मैत्रीण साठीची आहे. ती ॲक्युपंक्चरिस्ट आहे; ॲक्युप्रेशरही करते. मला हा प्रश्न थोडा गमतीशीर वाटला. ती ना डॉक्टर, ना पेशंट. माझं गायनॅकबद्दल काय मत आहे, याचीही तिला चौकशी नव्हती. तिला तिच्या आरोग्यविषयक तक्रारींवर तिच्या डॉक्टरांनी काही औषधं दिली की त्याबद्दल ती माझं मत विचारते; मी मत दिलं नाही की ती 'मी दुसरे डॉक्टर शोधू का' असा प्रश्नही हमखास विचारते. 'चिनी औषधांवर चिनी लोकांपेक्षा अमेरिकी लोकांचाच जास्त विश्वास असतो', असंही तिनं मला मोठ्या आत्मविश्वासानं सांगितलं होतं. तिच्या वागण्याबोलण्यातून तर्कसंगती काढायचा प्रयत्न मी करत नाही.

मला बाबांची सगळ्यांत धाकटी बहीण आठवली. ती मानसिकदृष्ट्या विकलांग होती. कदाचित ऑटिस्टिक असेल. आजीला तिचं होईनासं झालेलं होतं. आई आणि काकूलोकांना तिचं काही करायची हौस नव्हती. आईनं सुचवलं की तिच्या एका मैत्रिणीच्या संस्थेत आत्याला पाठवता येईल; पण आत्याची 'पिशवी' काढावी लागेल. हे सगळं झालं तेव्हा माझं वय यातलं काही समजण्यासारखं नव्हतं. पण आजीला ही कल्पना अजिबात आवडली नव्हती, हे मला स्पष्ट आठवतं. 'अशी कशी पिशवी काढायची!'

सहज म्हणून मी ही हिस्टरेक्टोमीची गोष्ट आणखी एका मित्रमंडळींच्या ग्रूपात सांगितली. मृण्मयी म्हणाली, तिचीही हिस्टरेक्टोमी काही वर्षांपूर्वी झाली आहे. तिलाही आधी फार त्रास नव्हता; पण फायब्रॉईड्स होते; आणखी मुलं नको होती. मुख्य म्हणजे ही मैत्रीण कर्तबगार आहे. कामासाठी बराच प्रवास करायची, आणि करते. ती म्हणाली, "एकदा प्रवासात असताना अशी अचानकच पाळी आली. ती बराच काळ चालली. हे एकदा झालं ठीक; प्रत्येक वेळेस कोण ते लचांड सांभाळत बसणार!"

तिला तिच्या आयुर्वेदिक वैदूनं भलताच सल्ला दिला होता. म्हणे, "रस्त्यावरून जाणाऱ्यायेणाऱ्या बायकांना विचार, कुणाकुणाला फ्रायब्रॉईड आहेत. दहातल्या आठ सांगतील फायब्रॉईड असल्याचं! यासाठी लगेच हिस्टरेक्टोमी कशाला!" मैत्रीण मला हे म्हणत होती, "दहातल्या आठ हा त्रास सहन करतही असतील; म्हणून काय त्रास सहन करण्याचं प्रिस्क्रिप्शन देणार का! मेडिकल सायन्सचं काम आपलं आयुष्य सुखकर करणं हे नाही का! आता इतर बायका सहन करतात म्हणून मीही का सहन करायचं? मला नाही सहन करायचं! मला नाही दुखण्याची हौस. आपल्याकडे बायकांना सहन करण्याचा आजार झालेला असतो!"

आणखी एका नातेवाईक स्त्रीची गोष्ट समजली; ती माझ्यापेक्षा वयानं थोडी लहान. तिचे फायब्रॉईड गर्भाशयाच्या बाहेर होते. तिची रिक्षा खड्ड्यावरून गेली तरी तिला रक्तस्राव होत होता. फायब्रॉईडमुळे तिला फार जेवण जात नव्हतं; तरीही पोटातल्या ह्या गोळ्यांमुळे पोट वाढलेलं; त्यात रक्तस्राव. एकदा चक्कर येऊन ती पडली. तेव्हा तिला ॲनिमिया असल्याचं लक्षात आलं. कारण फायब्रॉईड. वर वेदना तर नेहमीच्याच. माझ्या सर्जरीच्या बातमीनंतर ती माझ्याशी फोनवर बोलत होती, "तू एवढा टोकाचा निर्णय कसा काय घेतलास?" मी तिला विचारलं, "माझं सोड. मी जरा टोकाचाच विचार करते. तू हे एवढं सहन करत्येस, हे टोकाचं आहे असं वाटत नाही का? तुला आणखी मुलं नको असतील तर नक्की कशासाठी एवढा त्रास सहन करतेस?"

ती म्हणाली, "मला खूप पूर्वीपासूनच पाळीच्या वेळेस त्रास होतो. आपली तब्येत अशीच तापदायक म्हणून मी ते सहन करत होते." शिवाय ती म्हणाली, "तुझा विश्वास नाही मला माहित्ये, पण मी होमिओपथी आणि आयुर्वेदिक औषधं घेत होते, त्यामुळे वेदना कमी झाल्या." मी जरा माणसाळलेली असते तर माझा जीव तुटला असता हे ऐकून!

मला जमेल तितपत विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचं महत्त्व तिला सांगायचा प्रयत्न केला. आव्होगाड्रोच्या आकड्याचा विचार करता, होमिओपथी म्हणजे औषध नसतं फक्त पाणी असतं. होमिओपथी आणि आयुर्वेदिक औषधांच्या डबल ब्लाईंड चाचण्या होत नाहीत. अल्ट्रासाउंड करून खरोखर किती मोठे फायब्रॉईड आहेत; ते किती वेगानं वाढत आहेत हे समजतं; ते फायब्रॉईड नक्की कुठे आहेत त्यामुळे तिला वेदना होतात आणि मला काहीच त्रास नव्हता; हे सगळं समजलं. हे आधुनिक वैद्यकामुळेच. आयुर्वेद किंवा होमिओपथीमुळे वेदना कमी झाल्या पण मूळ विकार समूळ बरा करण्यासाठी विज्ञानाला, आधुनिक वैद्यकाला पर्याय नाही. फायब्रॉईडचा त्रास बरा करणार म्हणजे काय हे फक्त आधुनिक वैद्यक शिकलेलेे डॉक्टरच सांगतात. औषध घेतलं किंवा फक्त फायब्रॉईड सर्जरी करून काढले तरी फायब्रॉईड कायमचे नाहीसे होतील याची काहीही खात्री नाही, हेही डॉक्टरच सांगतात.

मला सल्ले द्यायचे नव्हते, पण राहवलं नाही, "तुला तुझ्या गायनॅकनं सर्जरीचा सल्ला दिला नसेल तर तू गायनॅक बदल!"

तेव्हा ती म्हणाली, "सर्जरी हा उपाय टोकाचा वाटत होता. म्हणून मी आयुर्वेदिक डॉक्टरकडे जात होते . मी उद्याच सर्जरीची अपॉईंटमेंट घेते."

तिनंही हिस्टरेक्टोमी करवून घेतली. तिच्या जखमा भरून यायला माझ्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागला, असं म्हणाली.

"तू मला हॉस्पिटलात सोडायला आणि आणायला आलास तर बरं होईल," मी बऱ्या अर्ध्याला म्हणाले. तो लगेच तयार झाला. त्याला सुट्टी घेण्यासाठी निमित्त हवं होतं, का कुतूहल आणि anxiety यांचं गमतीशीर मिश्रण होतं, हे सांगणं कठीण आहे.

इथे एक बिनमहत्त्वाचा मुद्दा आहे की तेव्हाच माझी पाळी सुरू होती. आदल्या दिवशीच. त्यामुळे वजनही किंचित वाढलं होतं. सर्जरीच्या वेळेस पाळी सुरू असली तरी काही फरक पडत नाही, अशी हमी मला देण्यात आली होती. मी आधी थोडा विचार केला. आता ही पाळी येईल ती शेवटची. मला तिचा पूर्ण उपभोग घ्यायचा … मी स्वतःशीच विचार करताना दचकले. पाळीचा उपभोग?

सर्जरीच्या आधी सर्जननं काय, कसं कापणार; नसा, मज्जातंतूंची काळजी कशी घेणार वगैरे सांगितलं होतंच. हॉस्पिटलात आडवी झाल्यावर भूलतज्ज्ञानं काय-कशी भूल देणार हे सांगितलं. "तुला जाग आल्यावर मध्ये किती वेळ गेला हे समजतंय का पाहा", बऱ्या अर्ध्यानं माझ्या डोक्यात किडा सोडला.

मला सर्जरीसाठी हलवायला लागले. बरा अर्धा निघाला. मला आयुष्यात पहिल्यांदाच कुणी तरी असं ढकलून दुसरीकडे नेत होते. मला काहीही, कुठेही दुखत नव्हतं. आणि पुरेशी जागही होती. त्यापेक्षा झोपाळ्यावर बसून जास्त मजा येते, हे मी शपथेवर सांगेन. शेवटी ज्या खोलीत आम्ही थांबलो तिथे बाहेर 'दा विंची' नावाचा रोबॉट दिसला; सर्जरीसाठी तो वापरतात. सातेक फूट उंच आणि पाचेक फूट रुंद प्रकरण असेल ते. त्या खोलीत पांढरे दिवे होते. मला ढकलून नेणारी एक बाई आणि एक बुवा तिथे होते. त्या खोलीत खूप पांढरा, ट्यूबलाईटसारखा प्रकाश होता, अमेरिकेत एरवी बहुतेक ठिकाणी पिवळे दिवे असतात.

"किती वाजले?" मी विचारलं.

"४:११ झालेत." असं उत्तर आलं. शिवाय खूप मोठा, वरच्या पट्टीतला बीप-बीप आवाज येत होता. मी त्याच पांढऱ्या प्रकाशाच्या खोलीत होते.

"हा बीप-बीप आवाज माझ्या हृदयाचा आहे ना? फार त्रासदायक आहेत माझे हार्टबीट्स."

मग मला जाग आली. मी एका बारक्या खोलीत होते. तिथे पिवळट आणि मंद, सुखद प्रकाश होता. मगाशी तळमजल्यावर होते, पण आता खिडकीतून बाहेर बघितलं तर जरा वरच्या मजल्यावर असल्यासारखं वाटलं. शेजारी वेगळीच बाई होती. मी तिला हाय केलं.

"तुला काही दुखतंय का? भूक लागल्ये का?" तिनं तिची ओळख करून दिली; ती निराळी नर्स होती.

"मला फार काही जाणवत नाहीये. त्यांनी नक्की गर्भाशय काढलं ना का भूल देऊन तसंच सोडून दिलं?"

ती हसली. "तू विनोदी असल्याचं मला त्यांनी सांगितलं." मला त्या बीप-बीपचा खरंच त्रास होत होता!

बरा अर्धा तिथेच होता. त्या नर्सनं मला प्रश्न विचारायला सुरुवात केली. "तुला घरी कुणी काही त्रास देतं का?" मी हे प्रश्न विसरलेच होते; बऱ्या अर्ध्यानं नंतर आठवण करून दिली. तो म्हणे, "हा प्रश्न विचारायचा तर माझ्या मागे विचारायचा ना!" मी काय उत्तर दिलं हे मला आठवत नव्हतं. शुद्धीत असते तर म्हणाले असते, I am not in danger; I am danger. "तिनं तुला फार्मसीचा पत्ताही विचारला, तेव्हा तू माझ्याकडे बोट दाखवलंस. नंतर तिनं तुला विचारलं, तुझं शिक्षण किती? … आणि तिचा प्रश्न पूर्ण व्हायच्या आत तू तिला, फट्कन उत्तर दिलंस." हिस्टरेक्टोमीमुळे झालेला आणखी एक फायदा, मला शिक्षणाचा गर्व आहे हे आत्मज्ञान झालं.

एकंदरच सर्जरीच्या दिवशी गॅसचा थोडा त्रास वगळता मुद्दाम लिहिण्यासारखं काही घडलं नाही. त्या त्रासामुळे मी नर्ससमोर शिव्या दिल्या; त्याबद्दल तिची माफी मागितली; आणि मला हायड्रोकोडोन नावाच्या दोन ओपिऑइडच्या गोळ्या मिळाल्या. त्यांची चव काही मोदक किंवा तिरामिसूसारखी नव्हती. त्यामुळे व्यसनांच्या बाबतीत मला अजूनही फार काही समजत नाही, ही परिस्थिती बदललेली नाही.

हा शिवीगाळीचा प्रकार घडला तेव्हा बरा अर्धा तिथे नव्हता; तो परत आला तो माहिती घेऊनच. गर्भाशयाचा आकार साधारण मूठभर असतो, आणि नेहमीचं वजन ६०-१०० ग्रॅम असतं ह्या माहितीचं 'संशोधन' त्यानं इंटरनेटवर केलं होतं. माझ्या पोटातून तीन पाऊंड म्हणजे १३५० ग्रॅम काढले; आणि रक्त फार तर २०० मिली गेलं असेल, त्यामुळे रक्त चढवण्याची गरज नव्हती, अशी माहिती त्याला सर्जरी झाल्यावर सर्जननं फोनवर दिली होती.

"म्हणजे अर्धं पोर काढलं की तुझ्या पोटातून!" सई नंतर म्हणाली.

यावर आणखी एक मैत्रीण म्हणाली, "आमची पोर जरा लवकरच जन्माला आली. त्यामुळे पूर्ण पोर काढलं पोटातून, असंही म्हणता येईल."

"तुला आता हलकं वाटतंय का?" मला हा प्रश्न विचारण्यात बऱ्या अर्ध्याचा पहिला नंबर लागला. आणि पुढे किती स्त्रियांनी हा प्रश्न विचारला! फायब्रॉइड असणाऱ्या सगळ्यांनी हा प्रश्न विचारलाच, सर्जननंही नंतर विचारला. मला आधी जड वाटत नव्हतं, त्यामुळे आता हलकं वाटणं कठीण आहे. मी तर्क म्हणून काही सांगते, तेही लोकांना विनोदी वाटतं. तर्काचा ऱ्हास केला की जोक होतो, पण एकदा कानफाटी म्हणून नाव पडल्यावर …

फायब्रॉईडमुळे आधी ओटीपोट अत्यंत कडक होतं. सर्जरीची सगळी तयारी झाल्यावर मी बऱ्या अर्ध्याला आवर्जून ते दाखवलं. त्यानं घाबरत घाबरत दाबून बघितलं. मला खरंच आधी काही त्रास नव्हता; आणि माझ्यावर कुणीही विश्वास ठेवत नव्हते. त्रास होत असेल तर मुकाट सहन करण्याऱ्यांतली मी आहे, असं बरा अर्ध्याला वाटावं! हा हंत हंत …

आधी ओटीपोट एवढं कडक होतं की कुणी पोटात गुद्दे घातले असते तर त्यांचीच हाडं मोडली असती आणि कष्टेविन ते लोक ट्रोल झाले म्हणून मी आणखी हसले असते. सर्जरीनंतर मी हळूच तपासून बघितलं. पोटाचा कडकपणा गायब झाला होता. आता तिर्री मांजर माझ्या मऊ पोटावर कणीक मळू शकते या कल्पनेनं मला हसायला आलं. किमान काही दिवस हसायची सोय नव्हती.

तिर्री मांजर आमच्या घरी आली तेव्हा जवळजवळ एक वर्षाची होती; आणि तिनं एकदा पोरं जन्माला घालून झालं होतं. मी बऱ्या अर्ध्याला म्हणाले, "आता तिर्री आणि माझ्यात एक साम्य आहे. दोघींची गर्भाशयं आणि नळ्या काढल्या आहेत. तिच्या ओव्हऱ्याही काढल्यात, त्यामुळे ती अखंडकुमारी आहे. पण किमान आमच्यात अर्धी पॅरिटी आली असं म्हणता येईल." गर्भाशय वगैरे विषय काढले की पुरुष गप्प बसतात. मला मजा येते!

दुसऱ्या दिवशी सकाळी मी हॉस्पिटलमध्येच जागी झाले. नर्सनं हातावर टोचलेली सुई काढली. "आता जरा इथे कॉरीडोरमध्ये चालायला सुरुवात कर." मग एक-दोन फोन केले, एकीकडे खोलीतच फेऱ्या मारल्या; धाप लागत होती. मला ज्या खोलीत ठेवलं होतं, त्या भागाच्या शेजारीच बॅरियाट्रिक वॉर्ड होता. वजन कमी करण्याचे उपचार करणारा भाग. माझंही वजन कमी केलं होतं. शिवाय मला त्या लेबलाचा विटाळही नव्हता. हॉस्पिटलचा गाऊन घालून दांडीयात्रेला निघाल्यासारखी त्या मी कॉरीडोरमध्ये फिरत होते; आणि दोन्ही बाजूंना "चालाल तर चालाल", "नो पेन नो गेन" छापाची मोटीव्हेशनयुक्त दवणीय वाक्यं माझा पाठलाग करत होती.

कॉरीडोरच्या एका टोकाला वजनकाटा दिसला. कालच्यापेक्षा सव्वा किलो जास्त. पोटातून १३५० ग्रॅम काढले, शिवाय २०० मिली रक्त म्हणजे साधारण २०० ग्रॅम. किमान दीड किलो वजन असंच कमी झालं पाहिजे. शिवाय जवळजवळ दीड दिवस झाला, मी जेमतेम चार घास खाल्ले होते. तरीही वजन जास्त! "कालपासून तुझ्या शरीरात आयव्हीतून पाणी ढकललं जातंय!" नर्सनं खुलासा केला. मी अजूनही हॉस्पिटलच्या कपड्यांत होते. अंगभर, घोळदार गाऊन होता; बॅरियाट्रिक उपचारांसाठी आलेल्या लोकांनाही जे कपडे देतील तेच मी घातले होते.

तिसऱ्या दिवशी सकाळी घरी, घरच्या कपड्यांत वजन केलं. जवळजवळ तीन किलो वजन कमी झालं होतं. आता ते पुन्हा कमावलं आहे. असो, असो.

मी नुकतीच हॉस्पिटलातून घरी आले होते. सोफ्यात बसताना, सोफ्यातून उठताना (हो, हो, आमचे सोफे तसे किंचित मऊ आहेत आणि माझं वजन अगदीच तिर्री मांजरीएवढं कमी नाही; त्यामुळे सोफ्यावर बसले की मी सोफ्यात बसते. सर्जरीमुळे काय काय शोध लागलेत …) पोटाचे स्नायू वापरले जातात. आत्तापर्यंत मी त्याकडे तुंदिलतनू म्हणून बघत होते. पण तिथे स्नायूही असतात. आहेत. सर्जरीनंतर महिना झाला तरीही तिथे स्नायू आहेत. आई रक्ताची शप्पथ!

आदल्या दिवशीच पोट फाडलेलं असल्यामुळे मला शक्यतोवर पोटाचे स्नायू वापरायचे नव्हते. म्हणून उभ्याउभ्या पाणी प्यायले. दोन थेंब भलत्या नळीत गेले. जर देव असण्याविरोधात काही ठोस पुरावा हवा असेल तर तो म्हणजे श्वसननलिकेत पाणी किंवा अन्नाचे थेंब जाणं! कुठला भिकार** देव अशी रचना करेल? माझ्यासारख्या पाखंडी आणि स्त्रीवादी बाईला पुरुष-देव अशी शिक्षा देईल हेही ठीक. पण भल्याभल्या, पुरुष देवभक्तांना असा ठसका लागतो त्याचं काय! पुरुषच पुरुषांचे वैरी?

त्या काय पाव-पाऊण-दोन थेंबांनी खोकला आला आणि ब्रह्मांड आठवलं. (म्हणजे शब्दशः ब्रह्मांड नाही आठवलं. म्हणजे समजा बाई म्हणाली, "गोट्या कपाळात गेल्या" तर समस्त जंता त्या वाक्याचा जसा शब्दशः अर्थ लावते, तसा शब्दशः अर्थ लावणं इथे अपेक्षित नाही हं गडे! (मी फार अपेक्षा धरलेली नाही; त्यामुळे बुद्ध माझ्या दुःखाचं मूळ शोधू शकणार नाही.) मी अनेक वर्षांपूर्वी खगोलशास्त्रज्ञ होते तरीही कधीच ब्रह्मांड बघितलेलं नाही. ठाण्यात ब्रह्मांड नावाची सोसायटी आहे; तीही मी नाही बघितलेली. जे बघितलेलं, अनुभवलेलंच नाही ते आठवणार कसं! पण तरी आठवलं ब्रह्मांड!) मग आधी उशी शोधली. ती पोटावर धरली. आणि चेहऱ्यावरची माशीही हलणार नाही इतक्या जोरात खोकले.

ते इंग्लंडचे राण्या-राजे कसे वागत असतील, याची काहीशी अनुभूती आली. सगळ्यांचं सगळं गॉसिप माहीत असूनही, आता सोशल मिडियाच्या जमान्यातही कुठेही मत व्यक्त करत नाहीत ते लोक. खोकून लगेच ते नळीतले पाण्याचे थेंब बाहेर येतील हे माहीत असूनही खोकायची चोरी! मी आयुष्यात पहिल्यांदा रीतीभातीनं खोकले असेन!

मागे नंदननं एक व्हॉट्सॅप फॉरवर्ड सांगितलं होतं. उभं राहून पाणी प्यायलं की म्हणे थेट गुडघ्यात जातं. खरोखर उभ्याउभ्या प्यायलेलं पाणी थेट गुडघ्यात गेलं तर किती बरं झालं असतं; गुडघ्यातून पाणी काढताना किमान खोकला येणार नाही आणि पोटावरही ताण येणार नाही!

मग हा प्रकार बऱ्या अर्ध्याला सांगितला. "तुला कसं कळलं पोटावर उशी धरून खोकायचं?" मी म्हणाले, "हॉस्पिटलात मला नर्सनं सांगितलं. तिथेही चुकीच्या नळीत थेंब गेले होते, पण ठसक्याशिवाय काम भागलं." त्याला फार आश्चर्य वाटलं. ही गोष्ट डॉक्टरकडून समजली नाही आणि इंटरनेटवरूनही!

मी तशी शिवराळ आहे. पण संतापून किंवा असह्य होऊन शिव्या देणं असंस्कृत मानतात आमच्यांत. आमच्यांत म्हणजे मी आणि तिर्री मांजर. तिर्री चावे घेते ते प्रेमापोटीच. मी प्रेमानं शिव्या देते. दोनेक आठवड्यांनी मी मोठ्या अभिमानानं जाहीर केलं. आता खोकला आला तर फक्त दोन्ही हात पोटावर दाबून पुरतं; शिव्यांची गरज नाही.

रात्री मला कधी जाग आली; कधी किंचित घाम आलेला असतो. आजवर मला झोपेचा प्रॉब्लेम असा नव्हता. असलाच तर झोप अनावर होते आणि काळवेळ न बघता मी डुलक्या काढते असा होता. पण सर्जरीनंतर मध्येच सलग दोन आठवडे, दोनदोन रात्री असं झालं की रात्री कशामुळे जाग आली. आणि मग झोपच लागेना. तो हारून अल रशीद कसा रात्री वेशांतर करून आपल्या प्रजेचं कसं चाललं आहे हे बघायला बाहेर पडायचा, तसं बहुतेक मला झोप लागल्यावर माझं शरीर गर्भाशय शोधत फिरतं, असा माझा सिद्धांत आहे. (उगाच नाही मोदीजीसुद्धा १८ तास काम करत.)

हा सिद्धांत मी सर्जनला सांगितला. "शक्य आहे, हेही शक्य आहे; हे अशक्य आहे असं कुणी सिद्ध केलेलं नाही", ती म्हणाली. हो-ला-हो करणारे लोक काय फक्त राष्ट्रप्रमुखांनाच आवडतात का!

सर्जरीच्या चौथ्या दिवशी शनिवार होता. शनिवारी सकाळी मी आणि सूझन किमान तासभर चालायला जातो. मला तासभर चालता येईल याची खात्री नव्हती. ती म्हणाली, "तुला जमेल त्या वेगानं, जमेल तितकं चालून येऊ. मी आहे तुझ्या बरोबर." थोडं थांबत का होईना, आम्ही सव्वा तासात चारेक किलोमीटर चाललो. सर्जरीसाठी पूर्ण भूल देतात; त्यात फुफ्फुसांचं काम कमी होतं, म्हणून नळी लावतात. सर्जरीनंतर मला जाग आली तर मी आपली आपण श्वास घेत होते, पण पहिल्या दिवशी दहा पावलं टाकली तरीही धाप लागली होती. हॉस्पिटलात त्यांनी फुफ्फुसं फुलवण्यासाठी यंत्र दिलं होतं; त्यात फुगा फुगवल्यासारखी हवा तोंडानं भरायचा व्यायाम होता. सूझनमुळे चालायला गेल्यानंतर मी ते यंत्र शोभेपुरतं डेस्कवर ठेवलं होतं. मग त्यावर धूळ बसलेली दिसल्यावर टाकून दिलं.

नोरा एफ्रन ही पत्रकार आणि सिनेमा लेखिका-दिग्दर्शिका प्रसिद्ध आहे. नंदननं तिचं एक विधान सांगितलं. आयुष्यातून नकोशा झालेल्या तीन गोष्टी वजा कराव्यात - नोकऱ्या, माणसं आणि अवयव.

हिस्टरेक्टोमी म्हणल्यावर आधीच गायनॅक म्हणाली होती. "तुझी अंडाशयं, ओव्हऱ्या काढणार नाही. म्हणजे तुझा मेनोपॉज लगेच येणार नाही. महिन्याला वजन कमी-जास्त होणं, आणि महिन्याला शरीरात जे काही बदल दिसतात हे तू सांगतेस, ते सगळे तसेच राहणार. फक्त पाळी येणार नाही." मी जाम खुश झाले! "म्हणजे सगळी मजा करता येणार आणि त्याचे काहीच परिणाम नाही भोगावे लागणार! म्हणजे बाईसारखी बाई असूनही मला हवं तिथे, हवं तेव्हा शेण खाण्याची सोय करायचा सल्ला तू देत्येस?" तिनं फक्त डोळा मारला.

मी तेव्हा पुरेसा विचार केला नव्हता. तिर्री मांजरीला दर महिन्याला पिसवांचं औषध लावावं लागतं; पाळी येणं ही त्याची चांगली मासिक सोय होती. घरचं एस्प्रेसो यंत्र दर महिन्याला यथास्थित साफ करावं लागतं. त्याची आठवणही कशी राहणार? मी या विचारांनी घाबरून व्हॉट्सॅप बघितलं. नवे मेसेज नव्हते. पुरुषांनीच कॅलेंडरचं तंत्रज्ञान काढलं असणार यावर माझा आता साफ विश्वास बसला आहे.

माझ्या सर्जरीनंतर दोनच आठवड्यांत (लाडक्या) 'द न्यू यॉर्कर'नं याच विषयावर एक लेख छापला. जयदीपनं तो पाठवला. फोन आपलं बोलणं ऐकतो, आणि उदारमतवादी 'न्यू यॉर्कर'ही या कटात सहभागी आहे, याचा आणखी पुरावा तो काय हवा!

लेख वाचून मी त्याला लिहिलं की मला लेख नाही आवडला. तिला जेवढा त्रास होत होता, तसा काहीही मला झाला नाही. फायब्रॉइडमुळे शारीरिक त्रास नव्हताच. आणि जो अवयव उपयोगाचा वाटत नाही, झालाच तर त्याचा त्रासच होता, तो गेला म्हणून मानसिक त्रासही होत नाही. मला दुःख नाहीच, उलट मला नवनवे जोक होत आहेत.

"That is hysterical! This joke was begging to be made." त्याचं लगेच उत्तर आलं.

मला दुःख व्हायचंच तर हा जोक मला न होता, त्या-ला झाल्याचं दुःख आहे.

'मदर्स डे' आला; फेसबुकवर मातृप्रेमाचा पूर आला. मी माझ्या गेलेल्या गर्भाशयाला श्रद्धांजली वाहिली. 'No uterus, no opinion' असं एक मैत्रीण म्हणाली. काही तरी उपयोग झाला गर्भाशयाचा!

सर्जरीनंतर पाच आठवडे झाले होते, तेव्हा निना भेटली. आम्ही फार्ली नामक एका कुत्राद्वेष्ट्या कुत्र्याला फिरवत होतो. फार्ली चांगला आडदांड आहे; त्याला माणसं आवडतात. आपल्या जातीचे जीव न आवडणं, असं फार्ली आणि माझ्यात साधर्म्य आहे. रस्त्यात एका ठिकाणी थांबलो होतो, तिथे आणखी एक दांडगा कुत्रा आला. त्या कुत्र्यानं थोडा आवाज काढल्यावर फार्लीही चेकाळला. नशीब निना तिथे होती आणि ती माझ्यापेक्षा फूटभर उंच आहे. फार्लीला तिनंच आवरलं.

मी निनाला म्हणाले, "एरवी फार्लीला आवरणं मला जमलं असतं, पण जेमतेमच. सर्जरीला एकच महिना झाल्यामुळे अजून तेवढी ताकद नाही. आणि सध्या वजनं फार न उचललेलीच बरी."

निना गमतीशीर हसली आणि सांगायला लागली. ती हॉर्मोन्स घेते; तिच्या हातापायांवर फार केस आधीही नव्हते. पण चेहेऱ्यावरचे केस काढणं कटकटीचं होतंय. माझा उलट प्रॉब्लेम असल्याचं तिला सांगितलं. मी तिला वेगवेगळे प्रश्न विचारत होते; आणि ती आनंदानं मेकप, आणि शष्प-गप्पाही मारत होती. ह्या सगळ्याची मलाही खूप हौस आहे अशी ॲक्टिंग निमूटपणे केली. निना ट्रान्स असण्याचं मला फार कौतुक नाही; असा माझा समज आहे. सध्या तिची नोकरी गेल्यामुळे ती डिप्रेस्ड आहे; आधी एक आठवडाभर खूप दारू प्यायली; पॉट-ब्राऊनी चरत होती, वगैरे वर्णनं ऐकून मला काळजी वाटली. मग तिनं पुरुषी आणि बायकी प्लंबिंग हा विषय काढला. किमान काही बोलण्याची सोय झाली.

निनाला मी मैत्रिणीचा जोक सांगितला, 'No uterus, no opinion'. ती थोडी गंभीर झाली. नुकतीच बातमी आली होती की 'टार्गेट' नावाच्या एका दुकानात होमोफोबिक, ट्रान्सफोबिक लोकांनी काही कर्मचाऱ्यांवर हल्ला केला होता. निना कुणा उजव्या, सनातनी माणसाचं लेक्चर ऐकून आली होती. ट्रान्स स्त्रिया खऱ्या स्त्रियाच नाहीत, असं त्या उजव्याचं म्हणणं होतं. निनानं मला स्त्री या शब्दाची व्याख्या विचारली.

"व्याख्येमध्ये गणिती काटेकोरपणा अपेक्षित असतो. तेवढा मला जमलेला नाही. पण कुणी म्हणालं की मी स्त्री आहे, तर मी त्याबद्दल आक्षेप घेत नाही. माझ्या मैत्रिणीनं जोक केला, 'No uterus, no opinion'. हिस्टरेक्टोमीनंतर मी बाई ठरत नाही का? बाई म्हणजे तिची पुनरुत्पादनक्षमता नाही. अनेकींना कर्करोगामुळे ओव्हऱ्या काढाव्या लागतात; त्या बायका नाहीत का? ओव्हऱ्या, गर्भाशय, पाळी, गर्भधारणा यांमुळे बाईपण ठरत नाही. ठरावीक अवयव घेऊन जन्माला आल्यामुळेच व्यक्ती बाई ठरावी का? तर याचंही उत्तर नकारार्थी देता येईल. जन्मजात अंध असणाऱ्या व्यक्तींना डोळे मिळाले की ते लोक अंध राहत नाहीत. सध्या गर्भाशय, ओव्हऱ्या ट्रान्सप्लांट होत नाहीत; म्हणून पुढे होणारच नाहीत असंही नाही. स्तन तर सगळ्यांनाच असतात. आपण सस्तन प्राणी आहोत, सस्तन स्त्रिया आणि अस्तन पुरुष नाही. तू सिमोन द बोव्हारचं 'द सेकंड सेक्स' वाचलं आहेस का? त्यात ती म्हणते, स्त्री जन्माला येत नाही; स्त्री घडवली जाते. पुस्तकभर स्त्रीवादाबद्दल मूलगामी चर्चा करूनही ती स्त्री म्हणजे काय याची व्याख्या करायला जात नाही. कदाचित तिच्या काळात ट्रान्स लोक क्लोजेटमध्येच असतील."

स्त्रीवादाची ॲलर्जी असेल तर रने देकार्त नामक पुरुषानंही सोय करून ठेवली आहेच की - I think therefore I am!

पुढच्या शनिवारी निना पुन्हा भेटली. माझ्याशी भेटून, गप्पा मारून आनंद झाला असं म्हणाली. आम्ही एकत्र फार्लीला चालवायला निघालो. मग कपड्यांवरून विषय निघाला. माझी फॅशन तिला आवडते, असं ती म्हणाली. मला हसायलाच आलं. "हे, असं …?" मी स्वतःकडे बोट दाखवत म्हणाले. "मला नटामुरडायला अजिबात आवडत नाही. कंटाळाच येतो. त्यातून आपल्याकडे बहुतेकदा उकाडाच फार आणि मी वाढले त्या मुंबईतही. मला ढगळे, सुती, साधे कपडे आवडतात. धुवायचे कष्टही फार नाहीत."

ती सांगत होती, "आता हॉर्मोन्स घेतल्यामुळे माझे आकारऊकार जरा दिसायला लागले आहेत. ते मिरवण्याची मला कधीमधी लहर येते. पण माझ्या आकाराचे कपडे सहज मिळत नाहीत." मी हसले, "तू उंच आहेस म्हणून, मी बुटकी आहे म्हणून; आणि दोघीही सपाट आहोत म्हणून!" तीही हसली.

मग स्वतःच्या पोटाकडे बोट दाखवून म्हणाली, "आता पोट थोडं आत गेलं तर बरं, असं वाटतं."

"वेलकम टू वुमनहुड!" आम्ही आणखी थोडा वेळ चालायचं ठरवलं.

ताजा कलम – निनाची Sex Reassignment Surgery सप्टेंबरमध्ये झाली. त्याआधी आम्ही भेटलो तेव्हा तिला सर्जरीबद्दल किंचित भीती होती. "ती डॉक्टरची परीक्षा असते; आपण तिथे फक्त वेळेत जायचं आणि झोपायचं असतं. नंतर आपल्याला जादू जमते. वस्तूकडे बोट दाखवलं की ती हातात येते! तुझी सर्जरी माझ्यापेक्षा जास्त किचकट आणि जास्त कापाकापीची असणार. तेव्हा मला दोन आठवडे बऱ्यापैकी त्रास झाला तर तुला आणखी जास्त काळ सहन करावं लागेल, असं धरून चालू सध्या. तू तुझ्या डॉक्टरला हे विचारच. पण असं पाहा, मला गर्भाशयाबद्दल फार प्रेम वा द्वेष नव्हता. तुझ्या सर्जरीनंतर तुला जसं शरीर हवं वाटतं तसं मिळणार आहे. सर्जरीनंतर चार-पाच महिन्यांत मला त्या वेदना अजिबातच आठवत नाहीत."

मी म्हातारी झाले आहे, असं लिहून डँस करून झाला. सर्जरीला सहा महिने झाले, आणि चेहऱ्यावर मोठी पुटकुळी. गर्भाशय असतं तर एक-दोन दिवसांत पाळी आली असती. अजूनही माझ्या शरीराला माझी राजकीय भूमिका झेपत नाही! पण पुढचा आठवडाभर पांढरी अधरीयं वापरण्याची सोय आहे; वाट्टेल तेव्हा प्रवासाला बिनदिक्कत जाता येतं.

निनाला पुटकुळी आणि राजकीय भूमिकेबद्दल सांगितल्यावर ती म्हणाली, "माझ्यासारखंच की!"

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

आफ्रिका खंड हे मानवजातीचं मूलस्थान असावं असा तज्ज्ञांचा कयास आहे. शिवाय आफ्रिकेचा आकार आणि सदरहू अवयवाचा आकार यांत उघडच सारखेपणा आहे. सबब हा लेखसुद्धा ‘संकल्पनाविषयक’मध्ये पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

धाडसी पण संयत, अनवट, अगदी वेगळ्याच विषयावर लेखन. स्टिरीओटाइप्स हलकेच मोडणारे नव्हे तर अगदी उध्वस्त करणारे. कौतुकास्पद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखिकेचे कौशल्य हे की अशा प्रसंगातुन जाऊनही आपली तिरकी विनोदबुद्धी त्या ऑपरेशनमध्ये गायब झाली नाहीये, हे समर्थपणे दाखवले आहे आणि त्याच वेळी मनाच्या तळाशी असलेले दु:खही लपवले नाहीये. ते कधीकधी ओझरते दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेगळाच लेख आहे. चांगला लिहिला आहे.
(एक उत्सुकता : त्या पेनकीलर्स चा अनुभव कसा होता? )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

वेगळाच लेख आहे. चांगला लिहिला आहे.

याबद्दल अर्थातच दुमत असू शकते. परंतु, ते एक असो.

मात्र,

(एक उत्सुकता : त्या पेनकीलर्स चा अनुभव कसा होता? )

अं… हे म्हणजे, अंमळ… एखाद्या बलात्कार झालेल्या व्यक्तीला, आत्यंतिक कुतूहलापोटी, How was the sex? म्हणून विचारण्यासारखे होत नाही काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो, अफू आधारित पेनकीलरबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या आहेत म्हणून विचारले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सुदैवानं मला फार पेनकिलर्स खावी लागली नाहीत.

पहिल्या दिवशी, जेव्हा गॅसमुळे अगदी शिवीगाळ करायची वेळ आली होती, तेव्हा दोन घास बळंबळं खाऊन दोन हायड्रोकोडोन घेतल्या. मग गादीतून बाहेर यायला किंचित कष्ट झाले; पण हॉस्पिटलचा बेड थोडा वर येतो, आणि मग हातापायाचे स्नायू वापरून उठता आलं. मग जागच्या जागी चालले. वारा सरला.

नंतर पाच-सात तासांनीही काही दुखेना. तेव्हा मी नर्सना प्रश्न विचारून हैराण केलं, की हायड्रोकोडोनचा परिणाम किती काळ टिकतो! इंटरनेटवर काही धड माहितीही मिळेना. दुसऱ्या दिवशी सकाळी एका नर्सनं मला (बहुतेक दयेपोटी) सांगितलं की काल वारा सरला असेल, किंवा ढेकरा आल्या असतील तर सुटलीस तू!

हायड्रोकोडनचं प्रिस्क्रिप्शन डॉक्टरनं दिलेलं. पण आजूबाजूच्या वीस मैलांच्या अंतरात कुठल्याही मेडिकलमध्ये गोळ्या नव्हत्या तेव्हा. मग मी साध्याच गोळ्या आणल्या. कमी दुखलं तर टायलिनॉल (पॅरासिटामोल), जास्त दुखलं तर आयब्युप्रोफेन. पहिला आठवडा दिवसात दोनदा टायलिनॉल घेतली. मग दीड-दोन आठवडे दिवसात एकदा, संध्याकाळी जेवणानंतर घ्यायचे. आणि नंतर गरज नाही वाटली म्हणून बंदच केली.

पेनकिलर्समुळे पोट नीट साफ होत नाही. म्हणून स्टूल सॉफनरचं प्रिस्क्रिप्शनही होतं. टायलिनॉल बंद केल्यावर तेही बंद केलं.

सकाळी तासभर थोडं दुखायचं. उठण्याचे कष्ट, पोटातल्या बऱ्याच गोष्टी बाहेर पडतात; भूक लागलेली असायची; मग अन्न पोटात गेलं, अशा सगळ्या बदलांमुळे.

सर्जरीनंतर काही काळ माझी भूक आणि झोप दोन्ही जरा वाढलं होतं. किमान ९:३० तास झोपत होते दिवसाला. तसाही व्यायाम बंद होता, तो वेळ वाचायचा! हळूहळू आतल्या जखमा भरल्या तेव्हा बाहेर तापमान वाढायला लागलं होतं, भूक आणि झोप दोन्ही बऱ्यापैकी पूर्वीसारखे झाले. वजन वाढायला सुरुवात त्याच सुमारास झाली.

सर्जरीच्या नंतर सकाळी दिवाणातून उठताना खूप त्रास व्हायचा. तेव्हा काही दिवस बऱ्या अर्ध्याला झोपेतून उठवून, मला उठवून द्यायला सांगायचे. हा सगळा अनुभव मी घेतल्यामुळे निनाला बऱ्याच गोष्टींची तयारी करता आली. तिनं जमिनीवरच्या वस्तू उचलायला लांबडा चिमटा वगैरे आणून ठेवला. अमेरिकेत बरेच प्लग्स जमिनीलगत असतात; मग तिनं एक्स्टेंशन कॉर्ड्स वर, हाताशी असतील अशा ठेवल्या.

वजनं उचलायला सुरुवात केली ती तिर्री मांजरीपासून. ४.५-५ किलो वजन आहे तिचं. शिवाय खाली वाकावं लागतं. ते जमेल तितकं गुडघ्यांतून वाकत होते. तिला तसंही उचललेलं आवडत नाही. त्यामुळे ती खुशच असणार! पण वाकून तिचे लाड करायला, खायला देणंही पहिले ४-५ दिवस जमत नव्हतं. अशा गोष्टी टाळल्यामुळेही कदाचित पेनकिलर्सची गरज कमी पडली असावी. नंतर तिर्रीला किती वेळ उचललं तर मला जमतंय, अशी चाचणी सुरू झाली. तिला उचललेलं आवडत नाही, ती लाथा मारायला लागते; त्याचीही भीती होती. साधारण महिन्याभरात तिच्या लाथांनी काही होणार नाही याची खात्री वाटायला लागली.

मला आता त्या वेदना व्हायच्या तसं काही आठवतच नाही. बाहेर सुंदर हवा असायची; वसंतात इथे रानफुलं फुलतात; ते सगळं आजूबाजूला आहे; आणि मी सावकाश पावलं टाकत रस्त्यावरून चालत्ये, इतपतच आठवतं. हे तेव्हा लिहून ठेवलं नसतं तर आता लिहिणं अशक्य होतं, इतकं मी ते विसरले. अगदी निनाला सांगतानाही, ६ महिने झाले नसतील आणि मला वेदना आठवतच नव्हत्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.