इसासून : नायजेरियन खाद्यसंस्कृती
इसासून : नायजेरियन खाद्यसंस्कृती
- रुची
माझ्या नेहमीच्या ट्यूबसाठी थांबले असताना एक बाई माझ्याकडे रोखून पाहत होती. वर्षभरापूर्वी टीव्हीवर माझा कार्यक्रम नुकताच प्रसारित झाला होता तेव्हा अनेकदा रस्त्यावर लोक ओळख द्यायचे, कोणी बोलून काहीतरी प्रतिक्रिया द्यायचे, कोणी सेल्फी काढून घ्यायचे, कोणी नुसतेच टक लावून पाहायचे. कार्यक्रमाचा पुढचा सीझन येईपर्यंत माझा चेहरा लंडनमधल्या इतर कृष्णवर्णीय चेहऱ्यांमध्ये मिसळून गेला आणि मी पुन्हा निर्धास्तपणे लंडनमध्ये फिरायला लागले.
त्या कुकिंग शोमध्ये भाग घ्यायची कल्पना खरी माझ्या बहिणीची; तिनंच मी माझ्या ब्लॉगवर नायजेरियन पदार्थांबद्दल लिहिलेला एक लेख आणि माझी माहिती शोसाठी पाठवून दिली. तिचं म्हणणं असं, की या कार्यक्रमात आजपर्यंत कोणीच नायजेरियन पदार्थांबद्दल बोललेलं नाही आणि आणि त्याबाबत काही परिणामकारक बोलणारं तुझ्याशिवाय तरी कोण आहे? मलाही ते तेव्हा पटलं, पण मग त्यानंतर प्रत्यक्ष बोलावणं आल्यापासून, शूटिंग पूर्ण होईपर्यंत अनेकदा आपण कशाला या भानगडीत पडलो असं होऊन जायचं. दरवेळी अबिके मला समजवायची, की तू ज्या हेतूने भाग घेत आहेस तो नक्कीच साध्य होईल. मी शेवटच्या चार स्पर्धकांच्या फेरीपर्यंत मजल मारली, पुढे कार्यक्रम प्रसारित झाला; पण तो पाहिल्यावर मात्र माझा पूर्ण भ्रमनिरास झाला. माझ्या नायजेरियनपणाचं, माझ्या ओळखीचं, नायजेरियन खाद्यसंस्कृतीचं व्यवस्थित सरसकटीकरण झालं, स्मरणरंजनाची फोडणी दिली गेली, देशविरहाची भावनिक पार्श्वभूमी, आम्हां बहिणीबहिणीतल्या प्रेमाची गोष्ट वगैरे झालरी लावून झाल्या; पण मला माझ्या खाद्यसंस्कृतीबद्दल जे सांगायचं होतं ते जवळजवळ सगळं कापलं गेलं. पुन्हा आफ्रिकन वंशाची स्त्री शेवटच्या फेरीपर्यंत गेली म्हणजे भेदभावच कसा केला गेला, तिला वाव देण्यामुळे दुसऱ्या, अधिक गुणवत्ता असलेल्या गोऱ्या माणसाला कसं डावललं गेलं वगैरे अपेक्षित विवादही निर्माण झाले. या सगळ्या प्रकारानंतर मला त्या कार्यक्रमाची कोणी आठवणही करून देऊ नये असं होऊन जाई, पण मिळालेली अल्पजीवी प्रसिद्धी मला पचवावीच लागली.
आताही ही बाई माझ्या दिशेने यायला लागल्यावर मला मनाची तयारी करावी लागली, पण तिने चक्क कार्यक्रमाचा थेट उल्लेखही न करता माझ्याशी संभाषण सुरू केलं. "अगं शाडे, मला तुझे आभार मानायचे होते, मला नायजेरियन खाद्यपदार्थांबद्दल 'जोलॉफ राईस' वगळता काहीच माहिती नव्हती, पण तू ज्या पद्धतीने त्याबद्दल बोलायचीस ते पाहून मी तुझा ब्लॉग वाचायला सुरुवात केली, आणि मला फारच मजा यायला लागली. आता मी वरचेवर जवळच्या आफ्रिकन स्टोअरमध्ये जाते, तिथला दुकानदार आधी माझ्यासारख्या गोरीला 'डावा-डावा' वगैरे मागताना पाहून बावचळायचा, पण तो आता माझा दोस्त झालाय. माझ्यातलं कुतूहल जागं केल्याबद्दल थँक्यू!" आम्ही ट्यूबमध्ये बऱ्याच गप्पा मारल्या. टेरेसा आफ्रिकेतल्या अनेक देशांत फिरली होती, तिचं वाचन खूप वेगवेगळ्या अंगांनी झालेलं असावं. तिचा स्वभावही अगदी मोकळा होता, त्यामुळे काही ओळख नसतानाही तिच्याशी गप्पा मारणं अगदी सहज आणि आनंददायी होतं. ती बोलता बोलता म्हणाली, "बहुतांश लोक नायजेरियन पदार्थांबद्दल कधी बोलतच नाहीत, बोलतात ते 'आफ्रिकन' पदार्थांबद्दल! जणू काही आफ्रिका हा एक छोटासा देशच आहे. तिथली एकच भाषा आहे, एकच जीवनपद्धती आहे, एकच खाद्यसंस्कृती आहे! या इतक्या मोठ्या खंडाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या कोट्यवधी लोकांच्या असंख्य सांस्कृतिक विविधतेला निव्वळ 'आफ्रिकन' अशा मथळ्याखाली खपवण्यातला वंशवाद आणि अज्ञान स्वतःला सुसंस्कृत समजणाऱ्या लोकांच्याही कसा लक्षात येत नाही!" मला जखमेवरची खपली निघाल्यासारखं वाटलं. मी तिला म्हणाले,
"नायजेरियन खाद्यसंस्कृतीबद्दल नायजेरियन लोकही अजून बोलायला लागलेले नाहीत. आपली खाद्यसंस्कृती म्हणजे सूपं आणि भरपूर कर्बोदकं ही सरसकट बोळवण तेही मान्य करून टाकतात. आमच्या पदार्थांचे फोटोदेखील अतिशय वाईट पद्धतीने काढले जातात. होय! आमच्या जेवणात बरीच सूपं असतात आणि बरीच कर्बोदकं असतात पण त्यापलीकडेही नायजेरियन अन्न आनंददायी आहे; त्या पाककृतींत असंख्य गोष्टी दडलेल्या आहेत; प्रचंड विविधता आहे; साध्या-सरळ, मिरवून न घेणाऱ्या पदार्थांच्या चवी जिभेवर रेंगाळत राहणाऱ्या आहेत. जगानं आजपर्यंत नायजेरियन पदार्थांकडे गांभीर्यानं पाहिलेलंच नाही." इतक्यात माझा स्टॉप आला आणि आमचं संभाषण अपुरं राहिलं; पण मी निघण्यापूर्वी तिने एका कागदावर आपलं नाव, इमेल, पत्ता, आणि नंबर लिहून माझ्याकडे दिला. म्हणाली, "अगं तू लिहीत का नाहीस या सगळ्याबद्दल? तूच सांग ना आम्हांला त्या पदार्थांना जडलेल्या गोष्टी!"
—
टेरेसाशी बोलणं झाल्यापासून माझ्या डोक्यातला किडा वळवळायला लागला होताच, त्यात आज अजून भर पडली. येरुबा भाषेत एक म्हण आहे - 'थप्पड मारण्याआधी त्या चेहऱ्याच्या मालकाची परवानगी घ्या'. या विचित्र वाटणाऱ्या म्हणीचा गर्भितार्थ तसा सरळ आहे; ज्याला टप्पल मारायची आहे त्याची आधी पूर्ण ओळख तरी करून घ्या! नायजेरियन सूपांच्या पाककृती इंग्रजी माध्यमांतून वाचताना मला ही म्हण पावलोपावली आठवत असते. आज एका जगभर प्रवास केलेल्या प्रसिद्ध इंग्रजी लेखकाच्या पाककृती पुस्तकात 'नायजेरियन रिव्हर प्रोव्हिन्स चिकन सूप'ची पाककृती वाचून माझी अशीच चिडचिड झाली. एकतर हे नायजेरियन रिव्हर प्रोव्हिन्स कुठे आहे याचा मला पत्ता नाही, पण माझं असं अनुमान आहे, की त्याला 'बायेलसा सूप' म्हणायचं असावं. नावापासूनच अशी सुरुवात झाल्यावर पुढे वाचून माझी फार निराशा झाली नाही. त्यात बारीक चिरलेला कांदा, सोलून बारीक चिरलेले टोमॅटो, छोट्या फोडी करून घेतलेलं चिकन, सोलून शिजवून घेतलेली कोलंबी, फ्रोझन पालक, तिखट पूड, पाम तेल वगैरे जिन्नस वापरले होते. लेखकाच्या म्हणण्याप्रमाणे पामऐवजी इतर कोणतंही तेल वापरलं तर चालण्यासारखं होतं. ही पाककृती 'नायजेरियन' या शीर्षकाखाली देणं म्हणजे घोर अपराध आहे याची त्या बिचाऱ्या लेखकाला कल्पनाच नसावी. एकतर कोणताही स्वाभिमानी नायजेरियन माणूस मांस परवडत नसल्यासारखं बारीक तुकडे करून वापरणार नाही; हे त्याच्यासाठी कमीपणाचं आहे. पाहुणेरावळे आले, की त्यांना दिवाणखान्यातून स्वयंपाकघरात शिजणारं मांस दिसलं पाहिले असं ठळकपणे वापरायची पद्धत आहे. भर म्हणून त्यात चिरलेले टोमॅटो, तिखट पूड, आणि पाम तेलाऐवजी इतर कोणतंही तेल! हे सगळं कमी होतं की काय म्हणून फ्रोजन पालक? ही पाककृती लिहिणाऱ्या माणसाला 'सूप' या सरळधोपट पाककृतीबद्दल माहिती असली, तरी 'नायजेरियन सूप' या प्रकारची किंचितही कल्पना नाही हे स्पष्ट आहे.
नायजेरियन सूप हा सरळ-धोपट पदार्थ नव्हे! हा एक रसरशीत जिवंत प्रकार आहे, त्याला एकात एक लपलेली अनेक दारं आहेत. त्याला खोली आहे; व्यामिश्रता आहे आणि मुख्य म्हणजे सांस्कृतिक संदर्भ आहेत. होय, ही पाककृतीदेखील माणसामाणसानुसार बदलते. त्यात एकाऐवजी दुसरा जिन्नसही वापरता येतो पण इथेही काही ठळक नियम आहेत. एका झाडाला असलेल्या अनेक फांद्यांप्रमाणे नायजेरियन सूपांचे प्रकार आहेत.
एखाद्या फांदीचा आपण पाठपुरावा करत गेलो तर आपल्या लक्षात येतं, की ही फांदी एका विशिष्ट स्वादासाठी आणि त्यातल्या परिपूर्णतेसाठी राखीव आहे. इथे 'पाम तेलाला' पर्याय नाही! मी वाढले त्या योरूबा संस्कृतीत पाम तेलाला खूप मानाचं स्थान आहे. इथल्या समजुतींनुसार हे तेल विषप्रयोगावर, भूतबाधेवर हमखास उपाय असलेलं 'लाल अमृत' आहे. रक्तासारखं हे लाल तेल आमच्या धमन्यांतून वाहतं, ते आमच्या सूपांना एक विशिष्ट चव आणि रंग देतं, त्याला पर्याय उपलब्ध नाही. आमच्या पाककृतींत, उत्तम प्रतीचं लाल पाम तेल हा एक मुख्य जिन्नस आहे.
'डावा-डावा' किंवा 'इरु' हा असाच एक वैशिष्ट्यपूर्ण जिन्नस आहे. आफ्रिकन लोकस्ट बीन्स आधी पंधरा-सोळा तास शिजवून, मग सोलून, दोन-तीन वेळा धुवून मग सावकाशीने निवडल्या जातात. या निवडलेल्या बिया मग दोनतीन दिवस आंबवल्या जातात आणि शेवटी खारवल्या जातात. या विशिष्ट वासाच्या आणि चवीच्या जिन्नसाशिवाय बनलेलं सूप अनेक लोक तोंडीसुद्धा लावत नाहीत. अनेक दिवस निगुतीने बनवलेल्या या जिन्नसानं नायजेरियन सूप्सना 'उमामी' मिळते. (जपानी शास्त्रज्ञांनी उमामीसाठी मोनोसोडियमग्लुटामेट (MSG) बनवणं सुरू केल्यापासून 'मिनिटांत तयार' होणारी उमामी हाताशी आली आणि नायजेरियन जनता या मॅगीला शरण गेली. चवीचं इतकं सपाटीकरण झाल्याने आपल्या खाद्यसंस्कृतीचं नुकसान होतंय आणि आपल्या सूपांमधलं वैविध्य कमी होतंय याची जाणीव माझ्यासारख्यांना जाणवत असली, तरी बहुतांश नायजेरियन घरात आता मॅगी क्यूबशिवाय पान हालत नाही.)
सूपांमध्ये ज्या पालेभाज्या वापरल्या जातात त्यांनादेखील एक विशिष्ट स्वाद असतो. ॲफॅंग, मायाळू (मलाबार पालक), भोपळा (टोकदार दोडक्यासारखा आफ्रिकन भोपळा), एवेडू (ज्यूट) अशा अनेक भाज्यांची पानं वापरली जातात, पण 'फ्रोजन पालक' या गटात नक्कीच येत नाही. स्वादासाठी तुळस आणि पुदिना यांच्या मधला 'इफीरीन' (बुश बॅझिल) नावाचा पाला वापरला जातो. काही पानं सुवासासाठी वापरली जातात, काही किंचित गोडसर किंवा कडवट स्वादासाठी आणि काही त्यातून मागे रेंगाळणाऱ्या किंचित तिखट चवीसाठी.
जे मांस वापरलं जातं तेही अनेक प्रकारचं असू शकतं आणि एकाच सूपात अनेक प्रकारचं मांस वापरलं जाऊ शकतं. शेळीचं किंवा बुशमीट, शंख, शिंपले, गोगलगाय, सुकवलेले मासे (स्टाॅकफिश), पाकट मासा असं अनेक प्रकारचं मांस वापरलं जातं. अनेक प्रकारचे ताजे, सुकवलेले, धूर दिलेले किंवा केळीच्या पानांत बरेच दिवस आंबवलेल्या अळंब्यादेखील (मश्रूम) वापरल्या जातात.
प्रत्येक घरात प्रत्येकाच्या प्रकृतीला पचतील, वयाला मानवतील, चवीला आवडतील अशा पाककृती वापरल्या जातात. ज्याप्रमाणे लहान्या मुलांना आवडतील अशी सूपं बनवली जातात त्याचप्रमाणे सुहागरातीला नवऱ्या मुलाला 'बळ' देतील किंवा नवऱ्याला 'सूचक' संदेश देतील अशा पाककृतीही आहेत. या सगळ्या सूपांंमधलं वैविध्य काही सरधोपट आणि खास व्यक्तिमत्त्व नसलेल्या जिन्नसांतून कसं मिळावं? जे जिन्नस फक्त स्थानिक भागांतच उपलब्ध असतात आणि ज्यांच्यासाठीचे शब्द स्थानिक भाषेतच अस्तित्वात असतात, त्या जिन्नसांपासून बनलेल्या पाककृती इतरांपर्यंत पोहोचवायच्या असतील तर त्यासाठी चिकाटी हवी, जिज्ञासा हवी, आदर हवा, आणि कल्पकताही हवी. जागतिकीकरणाच्या रेट्यात आपण जिथे राहतो, तिथे उपलब्ध असलेल्या गोष्टींत नवनवीन प्रकारच्या खाद्यसंस्कृतींचा आस्वाद घ्यावासा वाटणं साहजिक आहे आणि जे पदार्थ उपलब्ध नसतील त्याला पर्याय शोधणंही साहजिकच आहे. तिढा असा आहे, की ज्या खाद्यसंस्कृतींबद्दल त्या त्यांच्या मूळ स्वरूपात कशा आहेत याचं मूळ ज्ञानच आपल्याकडे येत नाही त्याचा आस्वाद आपण कसा घेऊ शकू किंवा त्याबाबत आपण मते कशी बनवू शकू? जगभरातल्या सर्वच खाद्यसंस्कृतींना या प्रकारच्या विपर्यासाला थोड्याबहुत प्रमाणात सामोरं जावं लागतं; पण इटालियन, फ्रेंच किंवा अगदी भारतीय अशा लोकप्रिय खाद्यसंस्कृतींबद्दल इंग्रजीत मुबलक आणि उत्तम लिखाण झालं आहे. त्यामुळे कोणी अमुक एक पदार्थ बिनधास्तपणे अमुक एका प्रकारचा आहे म्हणून सांगू लागलं, तर त्याला खडसावणारे अनेक आवाज आजूबाजूला आहेत, या खाद्यसंस्कृतींतले मूळ संदर्भ सांगायला अनेक लेखण्या सरसावलेल्या आहेत. नायजेरियन अन्न म्हणल्यावर जोलॉफ राईस, इगुसी, पफपफ्स आणि किकिफे यांच्या पलीकडे कोणी जातच नाही किंवा जाऊ इच्छित नाही. जे जातात ते आमच्या उपरोक्त लेखकाप्रमाणे वाट्टेल तसे पर्याय सुचवतात आणि आमच्या खाण्यातला आत्माच काढून टाकतात, त्यामागच्या सुरस कथाच पुसून काढतात.
—
आज माझ्या एका भारतीय मित्राला मेफेअरमधल्या एका भारतीय रेस्तराँत भेटले होते. हा माझा जुना रूममेट पक्का खवय्या आहे. आमच्या स्वयंपाकघराचा ताबा त्याने घेतलेला असायचा आणि जवळजवळ रोज आम्हां सर्वांसाठी भारतीय जेवण रांधायचा. त्यानेच मला मेथी, कलोंजी, आणि भारतीय पदार्थांत वापरायच्या इतरही अनेक प्रकारच्या मसाल्यांची ओळख करून दिली होती. इतका पक्का खवय्या असला, तरी त्याने मात्र मला कधीच नायजेरियन पदार्थांबद्दल विचारलंही नाही आणि अजूनही आम्ही भेटलो, की भारतीय रेस्तराँतच भेटणार हे नक्की असतं. आम्ही सुरुवातीला काही पदार्थ मागवले ते भारतात रस्त्यावर हातगाड्यांवर विकतात असं तो उत्साहानं सांगत होता. त्यातला एक तळलेला पदार्थ आत वॅक्सपेपरमध्ये आणि बाहेर एका वर्तमानपत्राच्या द्रोणात गुंडाळून दिला होता. तो पदार्थ पाहताच माझ्या मनात असंख्य आठवणी धावत आल्या. लेगॉसमध्ये राहायचे तेव्हा सकाळी साडेसात वाजायच्या आत ऑफिसला जाताना वाकडी वाट करून सी.एम.एस. मरीनाला जायचे. तिथे वर्तमानपत्राच्या पुडक्यात गरम गरम तळलेले पफपफ घ्यायला रांग लागलेली असे. त्या जुन्या शाईच्या स्वादामुळे की काय पण त्या गरमगरम पफ्सची चव काही औरच असायची. बातम्या जितक्या दुःखद, धक्कादायक, अविश्वसनीय तितका स्वाद अधिक! ही शाई प्रकृतीसाठी घातक असते, त्याने कर्करोगाच्या शक्यता वाढतात वगैरे ज्ञानकण प्राप्त होण्याच्या अगोदर मनात तयार झालेली गोड स्मरणरंजनाची घडी काही मोडायची नाही. माझ्या डायरीतली पाककृतीही 'वर्तमानपत्री शाईच्या वासाचे पफपफ्स' अशीच आहे. मैदा, यीस्ट, साखर, जायफळ, मीठ, आणि चवीला किंचित तिखट! हे डोनटसारखे असले, तरी डोनट्स नव्हेत; त्यांना स्वतःची खास नायजेरियन ओळख आहे. त्यांना नायजेरियन बातम्यांची चव असते!
पफ्पफ - फोटोचा स्रोत
एकूणच, पाककृती स्मरणरंजनात खोलवर बुडलेल्या असतात किंवा त्या आपल्या आठवणींतून बाहेर काढून वापरल्या तर त्या बेवारस होतात. माझ्या लहानपणीच्या सुट्ट्या माझ्या आजोळी इबादानमध्ये जायच्या. घराच्या बाल्कनीतून फेरीवाल्यांच्या हाका ऐकत दिवस कसा जायचा ते कळतच नसे. 'ताजा पाव'वाले, (फारसं ताजं नसलेलं) मांस विकणारे, संत्री विकत घेतली, की ती सराईतपणे सालांच्या लांब रिबिनी काढून सोलून देणारे, भाजलेले शेंगदाणे किंवा भाजलेल्या कणसाचे दाणे विकणारे, ईव-इरन पानांत सुबकपणे बांधून उकडलेले आणि पाम तेलात चमकणारे सुंदर मोईन मोईन विकणारे, 'ओगी बाबा' अश्या आरोळ्या ठोकून साध्या ज्वारीच्या ओगीना खूपच भारदस्तपणा देणारे, पांढऱ्याशुभ्र कणसाच्या उकडीचे मऊशार इको विकणारे असंख्य फेरीवाले रस्त्यांवरून फिरत असत. आपल्याकडे अगदी विश्वामित्राचा संयम असला, तरी काहीतरी विकत घेतल्याशिवाय रस्त्याला लागणे काही कोणाला जमत नसे. हे फेरीवालेही आपल्याच खास धीम्या चालीने चालत राहायचे आणि तुम्ही हाक दिल्याशिवाय काही थांबायचे नाहीत किंवा तुम्ही काही विकत घ्यावं म्हणून रेंगाळायचे नाहीत. या असंख्य फेरीवाल्यांच्या हाकांबरोबरच घराघरांतून येणारा कंद कुटण्याचा आवाज मिसळलेला असे. यांपैकी कोणत्याच पदार्थाला या आवाजांच्या आणि आठवणींच्या कल्लोळाशिवाय माझ्या डोक्यात थारा नाही.
लहानपणी आमच्याकडे वरचेवर दिवे जायचे. आई म्हणायची, की मोठ्या आवाजात प्रार्थना म्हणून जिजसची माहिती गायली की दिवे येतात, म्हणून मग संध्याकाळी स्वच्छ होऊन बसलो, की आम्ही जोरजोरात प्रार्थना म्हणायचो. मग गोष्टी सांगितल्या जायच्या. आईच्या गोष्टींची मजल सगळ्या नाठाळ मुलांना ज्या टोपो बेटावर पाठवलं जायचं त्या बेटावरच्या भीतीदायक गोष्टींपर्यंतच जायची, पण माझी मावशी फार भारी हातवारे आणि आवाज करून मस्त गोष्टी सांगायची. त्यात आजापा नावाच्या धूर्त कासवाच्या गोष्टी असायच्या. आजापा आपलं संथ आयुष्य आपल्या चातुर्याच्या आणि धूर्तपणाच्या जोरावर यशस्वीपणे इतरांवर मात करून जगायचा. आजापाकडे अनेक प्रकारच्या क्लृप्त्या आणि कौशल्यं होती आणि तो वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवण्यातही तरबेज होता. त्यातली आजापा आणि 'अकारा'ची गोष्ट आमच्या फार आवडीची होती. त्यात हे कासव त्याला त्रास देणाऱ्या चिंपांझीचा काटा एका सिंहामार्गे काढतो आणि चिंपांझीला छान धडा शिकवतो. सिंहाला आपल्या मतलबासाठी वापरुन घेण्यासाठी तो जी खास पाककृती वापरतो ती म्हणजे 'मधात बुडवलेला आकारा'. 'आकारा' हे एका प्रकारे भारतीयांच्या वड्यासारखे असतात. पांढऱ्या चवळीचे दाणे भिजवून, सोलून, वाटून, घोटून मग हे पीठ तळतात आणि त्याचे वडे बनतात. प्रत्यक्षात लहान मुलं सोडून क्वचितच कोणी हे वडे मधात बुडवून खाईल. नायजेरियन लोकांचं साखरेशी नातंच थोडं मजेशीर आहे. एकीकडे परकीयांच्या प्रभावाखाली लग्नकार्यांत, वाढदिवसांसाठी वगैरे मोठमोठ्ठाले अनेक मजली केक आणि त्यावर आयसिंगचे थर बनवले जातात, पण प्रत्यक्षात खाताना मात्र आयसिंग बाजूला काढून टाकलं जातं. साखर खाल्ल्यानं मूळव्याधीचा त्रास बळावतो, साखर विषारी आहे वगैरे समजुतीही असल्यामुळे गोड पदार्थ खाल्ले, तर त्यावर उतारा म्हणून 'आगबो जेडी'चा काढा प्यायचा असं केलं जातं. अनेक खाद्यसंस्कृतीत दिसणारी 'आंबट-गोड' चव योरूबा संस्कृतीत दिसत नाही पण माझ्यावर 'आजापा'चा एवढा प्रभाव आहे, की आजही मी आकारा केला, की मधात बुडवून खाते. कितीही छान लागत असले, तरी दोन-चार खाऊन झाले की मग त्या चवीचा कंटाळा येतो. मग थोड्या पिठात मिरची घालून ते तिखट बनवायचे किंवा चक्क कोळंबी घालून तळायचे. कोणतीही गोष्ट त्यातल्या अनपेक्षित वळणांनी रंगतदार बनते म्हणून या 'आकारा'ची गोष्टही आपल्या मनाप्रमाणे वळवायची आणि त्याची चव आपल्याला हवी तशी फिरवायची; पण मूळ गोष्टींपासून दूर केल्या तर पाककृती पोरक्या होतात.
आकारा - फोटोचा स्रोत
—
आज सकाळी गडबडीत आवरून डेन्टिस्टकडे पोहोचेपर्यंत माझी बरीच धावपळ झाली. तिथे पोहोचल्यावर मात्र माझा नंबर यायला तास तरी लागणार होता. तिथे कंटाळून बसले तर अबिकेचा फोन आला; ती तिच्या लेकीवर आणि तिच्या शिक्षिकेवर जाम भडकली होती. झालं असं, की माझ्या भाचीने वर्गात सगळ्यांना सांगितलं, की आमच्या घरी हाडं खातात! याचा तिच्या शिक्षिकेला एवढा धक्का बसला, की शाळा संपल्यावर ती भोचकपणे अबिकेकडे चौकशी करायला आली. आता मुलं कुठे काय बोलतील याची शाश्वती नाही, पण निदान तिच्या सुसंस्कृत शिक्षिकेला तरी भान हवं ना की आपण असल्या चौकश्या करू नयेत! अबिके संतापून म्हणाली, "यांना काय वाटतं की आम्ही काय नरभक्षक लोक आहोत आणि आम्ही काय जेवताना कडाकड हाडं तोडून खातो!" मला फिस्सकन हसायला आलं. मला अनेकांकडून माझे दात फार सुंदर आहेत आणि आफ्रिकन लोकांचे दात फार मजबूत असतात, असे शेरे ऐकून घ्यावे लागले होते. ही असली मिथकं कशी तयार होत असतील? आफ्रिकन लोक रानटी आहेत म्हणून तरतऱ्हेचे कठीण पदार्थ कडकड फोडून खातात असं वाटत असावं की आमच्या काळ्या वर्णामुळे पांढरे दात अधिक उठून दिसत असावेत? हे सगळं मी दाताच्या डॉक्टरकडे दुखरी दाढ घेऊन आलेली असताना जाणवल्याने मी स्वत:शीच फिदीफिदी हसले आणि इतरांच्या नजरा माझ्याकडे वळल्या. माझ्या भाच्चीनं ज्या हाडांचा उल्लेख केला होता ती नायजेरियन देशी वाणाच्या कोंबडीची हाडं असावीत. लंडनच्या ब्रिक्स्टन बाजारात अशा काही 'देशी' वाणाच्या कोंबड्या मिळतात, त्या मोकळ्या उंडारलेल्या असल्याने त्यांच्या पायांचे स्नायू चांगले घट्ट झालेले असतात. या कोंबड्या विकत घेताना दुकानदाराला त्यांचे पाय तसेच ठेव अशी ताकीद द्यावी लागते. या कोंबड्यांचा रंग हळदीसारखा पिवळसर असतो. या कोंबड्या भाजायच्या नसतात. त्यांना जिरे, काळे आणि हिरवे वेलदोडे, बदामफूल, लवंगा, मिरे, तिखट मिरच्या वगैरे मसाल्यांसह भरपूर पाण्यात दीडेक तास शिजवायचं असतं. मी या पाण्यात आलं, लसूण, आणि बागेतला गवती चहादेखील घालते. हे सगळे मसाले त्या चिकनमध्ये पूर्ण मुरतात. मग गार होईपर्यंत, दुसऱ्या दिवशीपर्यंत हे चिकन त्या रसात मुरू द्यायचं. त्यांच्या हाडांपर्यंत तो रस मुरायला हवा. खायच्या वेळी ते पुन्हा किंचित गरम करायचं आणि मग त्याचा आस्वाद घ्यायचा. या चिकनची हाडं आता मऊ झालेली असतात, ती चघळून त्यांतला रस चोखायला मजा येते. आणि हो, त्याचा उरलेला चोथा कोणी गिळत नाहीत, तो टाकूनच द्यायचा असतो! चिंचिन, कुलीकुली, कोको, गुरूंडी असे अनेक पदार्थ जरा कडक असतात आणि ते चावून खायला दात वापरावे लागतात, पण त्यातच त्याची मजा असते. लहानपणी ऊस तोडून खायला पण अशीच मजा यायची. पण या सगळ्या गोष्टींचा 'आफ्रिकन लोकांचे दात मजबूत असतात' या विचित्र मिथकाशी काहीच संबंध नाही.
टेरेसाची भेट झाल्यापासून जसं सुचेल तसं लिहीत गेले आणि मनोमन तिचे आभार मानत राहिले. पण तिला फोन काही केला नव्हता. तिच्याशी झालेल्या गप्पांनी माझ्या मनात अनेक दिवस साचून राहिलेल्या आणि स्वतःशी केलेल्या संभाषणाला शब्द फुटायला लागले, म्हणून मी लिहिलेलं एक टिपण तिला पाठवलं होतं. आज अखेर तिच्याशी बोलले, फोनवर गप्पा लांबायला लागल्या, तर म्हणाली, "आपण लंचला भेटू या का? माझं ऑफिस पिमलिको ट्यूबस्टेशनच्या जवळ आहे. आपण 'लॉर्न'मध्ये भेटू शकतो." इतक्या महागड्या ठिकाणी जेवणाचं आमंत्रण मिळाल्यावर मला जरा आश्चर्यच वाटलं, पण मला अनेक दिवसांपासून तिथे जेवायचं होतं त्यामुळे मी ते तात्काळ स्वीकारलं.
इतक्या तारांकित रेस्तराँतलं जेवणही नावाला शोभेल असंच होतं. मी मागवलेल्या एका पदार्थावर वाढतेवेळी टेबलापाशी येऊन ट्रफलचे बारीक काप घातले गेले. ते अत्यंत महाग मश्रूम पाहिल्यावर आठवलेला कालबारच्या बाजारातला एक किस्सा मी टेरेसाला सांगितला. एकदा एका टपरीवजा दुकानात काही मसाले वगैरे गोष्टी विकत घेत असताना माझं लक्ष त्या दुकानदार बाईच्या मागे असलेल्या एका टोपलीकडे गेलं. त्यात मोठ्या लिंबाच्या आकाराचे काही मातकट कंद दिसले. त्याचा आकार आणि रंगरूप पाहून माझी उत्सुकता चाळवली. ते दिसायला हुबेहूब ट्रफल मश्रूमांसारखे दिसत होते. मी तिला विचारलं, की हे काय आहे, तर म्हणाली, "ऊसू." माझा पुढचा प्रश्न - "म्हणजे काय?" त्यावर तिचं तितकंच त्रोटक उत्तर - "हे जंगलात जमिनीखाली वाढतात, त्यातलाच एक तुकडा जमिनीत टाकला, की अजून वाढतात". मी अवाक! ज्या मश्रूमांच्या बारीकश्या गोळ्यासाठी पाश्चिमात्य लोक हजारो डॉलर्स मोजतात आणि ज्यांच्या शोधात शेकडो डुकरं मारली जातात ते ट्रफल्स ही म्हणते की जमिनीवर असेच वाढतात! मी तिला विचारलं, की ह्याचं काय करायचं? हे कसे वापरायचे? तर म्हणाली, "हे कुटून इगुसीत घाल; मांसाऐवजी हे घातलं तर चांगलं लागतं." घ्या! म्हणजे हा शाकाहारी लोकांसाठी असलेला पर्याय आहे तर! मी ते विकत घेतलं आणि घरी आल्यावर त्याबद्दल थोडी माहिती मिळवली. हे मश्रूम जंगलात पडलेल्या झाडांच्या मुळांजवळ वाढतात, जमिनीच्या वरच्या भागावर ऑयस्टर मश्रूमसारख्या दिसणाऱ्या अळंब्या येतात आणि जमिनीखाली हे कंद वाढतात. हे ट्रफलसारखे दिसत असले तरी ट्रफल नव्हेत. वापरण्यासाठी त्याची पूड करून इगुसीत घालायची, शिजल्यावर त्याला मांससदृश्य पोत येतो.
टेरेसाचं कुतूहल फारच चाळवलं गेलं आणि मग मला इगुसी बनवायची कृतीही सांगावी लागली. आधी मांस, क्रेफिश, कांदा, मीठ, मिरपूड पाणी वगैरे टाकून याखनी बनवायला घ्यायची. मग मिक्सरमध्ये कांदा, ताजी लाल मिरची यांचं वाटण करून घ्यायचं आणि मग त्यात इगुसीची (टरबुजाच्या बियांची) पूड मिसळायची आणि त्याचं किंचित दाट पण सरबरीत मिश्रण करून घ्यायचं. एका जाड बुडाच्या पातेल्यात उत्तम प्रतीचं लाल पाम तेल घालायचं आणि तापल्यावर त्यात बनवलेली याखनी मांस बाजूला काढून घालायची. त्याला उकळी आली, की त्यात बनवलेलं वाटण चमच्याचमच्यानं घालायचं. जास्त लगदा न करता हळुवारपणे हलवत ते खाली पातेल्याला लागणार नाही याची खात्री करून घ्यायची. वीस-पंचवीस मिनिटांत त्याला तेल सुटायला लागतं आणि इगुसी शिजते. आता त्यात बाजूला काढलेलं मांस घालून सारखं करून घ्यायचं. शेवटी त्यात भोपळ्याची किंवा मायाळूची पानं घालायची आणि झाकण ठेऊन एक वाफ काढायची. मग त्यात ईयरो (बिटर लीफ) घालून अजून साताठ मिनिटं शिजवायचं, की झाली इगुसी तयार!
इगुसी स्ट्यू - फोटोचा स्रोत; इगुसीची पाककृती
जेवताजेवता आमच्या गप्पा मस्त रंगल्या, खरं म्हणजे मीच बोलत होते नायजेरियन पदार्थांबद्दल! टेरेसा माझं बोलणं अगदी लक्षपूर्वक ऐकत होती, मध्येच एखादा प्रश्न विचारायची पण त्यामुळे माझ्या विचारांची साखळी न तुटता उलट बोलण्यासाठी अधिकाधिक गोष्टी सुचत गेल्या. ती एका प्रकाशनासाठी काम करते हे मला माहीत होतं पण तिचे नेमके प्रश्न आणि त्यांमागची सुसूत्रता एखाद्या मुरलेल्या संपादकासारखी वाटत होती. मी तिला त्याबद्दल विचारलं, तर ती म्हणाली, "मी आज तुला भेटायला बोलावलं त्यामागे माझा एक छुपा हेतू होता. तू मला मेलवर पाठवलेलं टिपण मला इतकं आवडलं, की मला वाटतं यामागे एक पुस्तक दडलेलं आहे. ते तुझ्याकडून लिहून व्हावं असं मला वाटतं, तू विचार करशील का याबद्दल?" माझ्या टीव्ही कार्यक्रमाच्या अल्पजीवी प्रसिद्धीनंतर माझ्याशी अनेकांनी संपर्क साधला होता कारण माध्यमांना एक आकर्षक कृष्णवर्णीय चेहरा हवा होता. टीव्हीसाठी, इतर समाजमाध्यमांसाठी किंवा चकचकीत आवरणाच्या पाककृती-पुस्तकासाठी अनेकांनी प्रस्ताव पाठवले होते; पण एकदा त्या अनुभवातून गेल्यावर मी फार प्रयत्नपूर्वक त्या सगळ्याकडे पाठ फिरवली होती. पण हे फार निराळं होतं, माझ्या खऱ्या प्रामाणिक आवाजाला माध्यमात स्थान मिळालं, तर ते मला अर्थातच आवडण्यासारखं आहे आणि टेरेसाही खूप प्रामाणिक आहे, चांगलं लिहायला प्रवृत्त करणारी आहे. मी तिला म्हणाले, की मी विचार करेन त्यावर; पण मग माझ्या लक्षात आलं, की मी हे पुस्तक माझ्या मनात रोजच लिहिते आहे की! त्यात कसला विचार करायचा!
—
आज घरी परत जाण्याआधी पिमलिकोच्या बाजारात गेले होते. सप्टेंबरमध्ये सुगी सुरू झाली, की शेतकरी-बाजार भरभरून वाहू लागतात. अगदी छोट्यामोठ्या सुपरमार्केटमध्येही ताजी फळफळावळ, भाज्या पाहून हे घेऊ की ते असं होऊन जातं. आज ताजी कणसं पाहिल्यावर मला इकोकी खायची लहर आली. सुदैवानं फ्रीजरमध्ये मोईमोई (एवे इरान) पानं होती. ती नसती, तर केळीची पानंही चालली असती पण त्याने चव वेगळी लागतेच. पूर्वी लंडनमध्ये या गोष्टी कुठे मिळतात याचा पत्ता लागण्यापूर्वी नायजेरियातून येताना अनेक गोष्टींची तस्करी करावी लागत असे. माझ्या एका मैत्रिणीचा नवरा खूप उच्चभ्रू आहे. त्याचा देखणा, उंचापुरा, सडसडीत बांधा, राहणी, भारी कपडे, किमती घड्याळ, बूट वगैरे पाहिलं, की विमानतळावर कोणाला संशयही येत नसे की त्याच्या महागड्या बॅगेतून तो काही बंदी असलेले खाद्यपदार्थ आणत असेल. आम्ही त्याला नेहमी काही खास दर्जाचं डॉवाडॉवा, मोईमोई पानं, ॲफॅंग वगैरे काहीबाही आणायला लावायचो. तो जरा किरकिरायचा पण त्याला पदार्थ खाऊ घ्यायचं आमिष दाखवलेलं असल्याने मोठ्या आत्मविश्वासाने एअरपोर्टवर वावरत कस्टम्समधून खाद्यपदार्थांची तस्करी करायचा.
खाद्यपदार्थांबाबत तडजोड करणं आम्हांला जमत नाही. आताही हव्या त्या जिन्नसांसाठी दोन-दोन तास प्रवास करून जायची माझी तयारी असते पण एरवी मला पंधरा मिनिटांच्या प्रवासाचाही कंटाळा असतो! एकूणच माझ्याकडे एरवी नसलेली चिकाटी स्वयंपाकाबाबत मात्र उफाळून येते! कणसं आणल्यावर कोणी किसतात, कोणी चाकूने खरवडून काढतात पण मी फार सावकाशपणे हाताने त्याचे सगळे दाणे सुटे करून घेते. हे सोललेले कणसाचे दाणे, कांदा, मिरच्या, लीक्स, धूर दिलेला क्रेफिश, आलं, लसूण, मीठ, आणि लागेल तसं पाणी घालून छान बारीक वाटून मग त्यात लाल पाम तेल मिसळते. सगळी तयारी झाली, की मग मोईमोई पानांचा कोन करून त्यात हे वाटण भरते, कोन मागच्या बाजूने दुमडून घेते आणि मग त्याची एक थप्पी रचून मस्त उकडून घेते. "एकावेळी दोन पानं वापरायची- एक मोठं आणि आणि एक त्याच्या आतलं. कोन करून पानं खालून आणि वरतून नीट दुमडून घ्यायची.. गळके द्रोण बनवायचे नाहीत!" पदार्थ बनवत असताना माझ्या कानात आजीचा करडा आवाज घुमत असतो. ज्या मुलीला मोईमोईसुद्धा नीट बांधता येत नाही तिचं पुढं कसं होणार याची काळजी एकजात सगळ्या आयांना आणि आज्ज्यांना असायची. आजी आमच्याकडे आली, की मला गृहकृत्यदक्ष बनवायच्या उद्योगाला लागायची. मी एकदा स्वत:साठी काही बनवायला लागले होते, तर तिनं मला विचारलं, "तुझ्या भावंडांना विचारलंस का काय हवंय ते?" मी लगेच म्हणाले, "मी का म्हणून विचारायचं?" त्यावर तिचं सोपं उत्तर - "त्यानं तुला सवय लागेल. उद्या तुझ्या अंगावर जबाबदाऱ्या आल्या, की तुला ते अवघड वाटणार नाही." लहानपणापासून मुलींना असं वळण लावायची ही पद्धत आता आम्हा स्त्रीवाद्यांच्या अंगावर येते पण मला व्यक्तिश: या शिकवणीचा फायदाच झालाय.
शिवाय अगदी परंपरागत स्त्रीची भूमिका पाळणाऱ्या या आजीसारख्या स्त्रियांना 'हाऊसवाईफ' असं उपहासात्मक नाव मला कधी द्यावंसं वाटलं नाही. आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणाऱ्या त्या सक्षम स्त्रिया होत्या. त्यांच्या काळात नायजेरियन स्वयंपाकघरावर घरातल्या कर्त्या स्त्रीचं साम्राज्य असायचं, त्या स्वयंपाकघरात डांबल्या गेलेल्या, गरीब-बिचाऱ्या स्त्रिया नव्हत्या. त्यांच्या स्वयंपाकघरांत तरतऱ्हेची धारधार, तीक्ष्ण, आणि अवजड आयुधं असायची आणि ती त्यांना पूर्ण सामर्थ्यानिशी वापरता यायची. हवे तेव्हा, हवे त्याचे, हवे तसे तुकडे करण्याची त्यांची कुवत होती. त्या कर्त्या स्त्रीला आव्हान देणं येऱ्यागबाळ्याचं काम नसे. माझ्या आजीचा स्वतःचा व्यवसाय होता; ती अगदी नवीन फॅशनचे कपडे वगैरे घालायची. तिचे काही जुने कपडे मला आजही फॅशनेबल वाटतात पण तिच्या आदर्श स्त्रीच्या कल्पना मात्र अगदी स्वच्छ होत्या. स्त्री आदर्श आहे की नाही हे पडताळण्यासाठी तिच्याकडे काही खास कसोट्या होत्या. तिला चुलीवरचं भांडं चिमट्याशिवाय उतरवता येतं का? तिला हातातल्या हातात कंद आणि कच्ची केळी चिरता येतात का? हाताची जळजळ न होता मिरच्या वाटता येतात का? गरम तेलात कौशल्यानं सोडलेले तिचे 'आकारा' छान गोलसर आणि मऊशार फुलतात का? आणि हो, तिला मोईन मोईन पद्धतशीरपणे बांधता येतात का? या सर्वसाधारण कसोट्यांवर ती स्त्रियांना जोखायची.
माझ्या आईच्या काळात गोष्टी बदलल्या; त्यांनी शिक्षणं, नोकऱ्या केल्या पण त्यामुळे त्यांच्या सांसारिक जबाबदाऱ्या मात्र कोणी आपल्या अंगावर घेतल्या नाहीत. मग आपलं आयुष्य थोडं सुकर करण्यासाठी त्यांनी पर्याय शोधले. दळण्याची, कुटण्याची, निवडण्याची मानमोडी कामं एकतर यंत्रांवर सोपवली गेली किंवा घराबाहेर सोपवली गेली. माझ्या आईकडे अडीच डिग्र्या आणि वीस मिक्सर होते. म्हणजे अगदी एका वेळी नसले, तरी माझ्या बालपणात तिने निदान वीस तरी मिक्सर तोडले असावेत. इबादनसारख्या शहरी संस्कृतीत आल्यावर दगडी पाटा-वरवंटा, खलबत्ता वगैरे गोष्टींपासून माझी आई तातडीने दूर पळाली होती पण योरूबा लोकांना त्यांचा स्ट्यू अगदी गंधासारखा उगाळलेला लागतो. आईनं आणलेल्या कोणत्याच मिक्सरचा अर्धाअर्धा तास वाटण्यापुढे निभाव लागला नाही. एवढं करूनही त्या मिरच्यांच्या बिया आणि सालं अगदी बारीक वाटण्यात ते घरगुती मिक्सर कुचकामी ठरायचे. एकदा आमच्याकडे आईची दूरची बहीण राहायला आली होती. ही बया त्या पंधरा गाद्यांच्या चळतीवर झोपूनही खालचा वाटाणा टोचणाऱ्या राजकन्येसारखी होती. स्ट्यूमधल्या एकूण एक बिया बारीक दळल्याखेरीज ती त्याला हात लावत नसे. अशा प्रकारच्या वाटण्यासाठी मग व्यावसायिक कामासाठी असलेला भलामोठा ग्राईंडरच लागे. मी दहा वर्षांची असल्यापासून मला हे वाटणाचं सामान घेऊन दुकानात पाठवलं जायचं. आई मला टोमॅटो, मिरच्या वगैरे सगळं सामान नीट मोजून द्यायची आणि त्याबरोबर अगदी कडक सूचना असायच्या. दुकानदाराला अगदी ठाम आवाजात मशीन आधी स्वच्छ धुवायला सांगायचं. आधी कोणी आंबवलेलं कणीस वगैरे दळलं असेल तर त्याचा स्वाद आपल्या स्ट्यूला लागता कामा नये किंवा दुसऱ्या कोणाच्या तिखटजाळ मिरच्यांनी आपलं प्रमाण बिघडू नये म्हणून मग त्याला त्या मशीनमध्ये पदार्थ ढकलण्याचा दांडादेखील धुवायला लावाला जाई. एवढं करूनही भागायचं नाही. त्याला बजावून वाटण अगदी बारीक करायला लावायचं आणि यंत्रामधून एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर तीन वेळा घालायला लावायचं. मागे पंधरा लोकांची रांग लागली असेल, तरी डगमगून जायचं नाही आणि आईने सांगितल्याप्रमाणे दळून आणायचं. मला पाहिलं, की त्या दुकानदाराचा चेहरा वाकडा व्हायचा पण माझा नाईलाज होता. माझ्या व्हाईटामिक्समध्ये आता खरंतर स्ट्यूचं वाटण अगदी बारीक वाटलं जातं; तरी मला मध्येच कधीतरी त्यात बिया लागल्यासारख्या वाटतात. आईच्या करड्या ताकिदीची जरब मला अजूनही आहे!
—
आज मला टेरेसाने एका निबंधाची लिंक पाठवली. सिद्धार्थ मित्तरने लिहिलेला 'फ्री ओक्रा' हा लेख मी अनेक वर्षांपूर्वी वाचला होता आणि आम्ही भेटलो होतो त्या दिवशी आमचं त्याबद्दल थोडं बोलणं झालं होतं, पण मला नेमका संदर्भ सापडत नव्हता. भारतीय उपखंड, इजिप्त, टर्की, आफ्रिकेतले अनेक देश आणि इंग्रजांकरवी जिथे जिथे आफ्रिकन लोकांना गुलाम म्हणून नेलं गेलं तिथल्या अनेक खाद्यसंस्कृतीत भेंडी सहजपणे सापडते आणि आवडीने खाल्ली जाते. असं असतानाही भेंडीकडे पाहून जगात नाक मुरडलं जातं; चिकट आणि गिळगिळीत म्हणून संभावना केली जाते यामागे पाश्चात्त्य देशांची दादागिरी आहे असं मित्तर म्हणतो. ज्या गोष्टी आपल्या चवीला सहज रुचत नाहीत त्यांची जागतिक पातळीवर बदनामी करण्यामागे, त्या वेळी सत्ताधारी असलेल्या गोऱ्यांचा डाव होता असं मित्त्तर म्हणतो. तो निबंध वाचल्यावर मला मनातून भेंडीबद्दल असलेलं माझं नायजेरियन प्रेम उघड करण्याची सूट मिळाल्यासारखी वाटली; म्हणजे अशी सवलत कोणाला मागायला मला काही बंदी नव्हती त्या आधी; पण कुठेतरी कळतनकळत पाश्चात्त्यांनी आपल्यावर लादलेल्या मतांचं ओझं होतंच! भेंडीच्या चिकटपणाबद्दल दुमत नाही पण प्रश्न तो चिकटपणा आवडण्याचा आहे. बऱ्याच भारतीय पदार्थांत भेंडीचा चिकटपणा झाकून त्याला कुरकुरीत करण्यावर भर असतो, त्याच्या उलट नायजेरियन सूपमध्ये भेंडी तिच्या चिकटपणासाठी वापरली जाते. एकूणच नायजेरियन सूपमध्ये या श्लेष्मलपणाला, तार येण्याला महत्त्व आहे. स्टॉक, पाम तेल, क्रेफिशची पावडर यांमध्ये बारीक चिरलेली भेंडी आणि त्याच्या कुटलेल्या बिया घालायच्या आणि चांगली तार सुटेपर्यंत उकळायच्या. कोणी म्हणेल, की हे सूप डिंकासारखं लागतं तर ते बरोबरच आहे, पण तेच अपेक्षित असतं या प्रकारच्या ड्रॉ-सूपमध्ये! हे चमच्यात घेऊन त्याची तार मोडून खायला मनगटात शक्ती लागते आणि नायजेरियन जीभ लागते. हेच नव्हे, तर बरीच नायजेरियन सूपं कुटलेल्या कंदांबरोबर, गरीबरोबर किंवा फूफूबरोबर खातात. बाहेरून किंचित काटेरी आणि आतून सुंदर गोलगोल बिया असलेल्या ताज्या भेंड्या मिळाल्या, की मी लगेच ओक्रो सूपच्या तयारीला लागते आणि मनातल्या मनात मिस्टर मित्त्तरना सॅल्यूट ठोकते!
—
इथल्या शेतकरी बाजारातून फार शब्दांची देवाणघेवाण न करता विनासायास गोष्टी विकत घेताना मला माझे लागोस आणि कालबारच्या बाजारातले अवघडलेले अनुभव आठवतात. नायजेरियन बाजार म्हणजे काही फक्त भाजी-पाला-मांस-मच्छी-वाणसामान घेण्याची जागा नसते आणि बाजारात जाऊन हवं ते, हवं तसं आणि हव्या त्या किंमतीत विकत घ्यायला जो आत्मविश्वास आणि जी सूक्ष्म कौशल्यं लागतात ती दुर्दैवाने माझ्याकडे नाहीत. बाजाराला जाताना त्याच्या अंतर्विश्वात सामावून जाण्यासाठी योग्य पोशाख करावा लागतो, त्या-त्या भागानुसार भाषेची योग्य वळणं आत्मसात करावी लागतात, ताठ मानेनं आणि आत्मविश्वासानं हुज्जत घालावी लागते, दुकानदाराच्या घरादाराची चौकशी करावी लागते. मला त्यांतलं काही फार जमत नसे म्हणून बाजाराला जाताना मी माझ्या शेजारणीबरोबर तिची लांबची आणि मुकी बहीण असल्याचं सोंग वठवून सावलीसारखी तिच्यामागे फिरायचे. माझ्या शेजारणीच्या डोक्याला दिमाखात बांधलेला स्कार्फ, विवाहित असल्याची साक्ष देणारी बोटातली अंगठी, तिचा हजरजबाबीपणा, हुज्जत घालण्याची कुवत, हवं तेव्हा हसून एखाद्याला वश करणं आणि चटपटीतपणा यांमुळे ती बाजारात आत्मविश्वासाने फिरत असते. दुकानदाराने सांगितलेली किंमत अर्ध्यावर सहजपणे आणतेच आणि शिवाय हाताशी पोर असल्यानं तिला त्याच्या सूपसाठी फुकटात भेंडी, गाजर, जास्तीचा मासा वगैरे गोष्टी मिळतात. माझ्याकडे मात्र 'गावाकडनं आलंय येडं' अश्या नजरेनं पाहिलं जातं. मालाची किंमत विचारायची आणि माल पिशवीत भरायचा असा हा सोपा मामला नसतो. सुरुवात दुकानदाराच्या घरादाराची चौकशी करून करायची असते, मग आपल्या कुटुंबीयांची माहिती पुरवायची असते. मग सुरू होते ती घासाघीस, ज्या कामासाठी मी अगदीच कुचकामी आहे. मासा विकत घेताना मला हव्या त्या कापासाठी कोळिणीनं तोंडाला येईल ती किंमत सांगितल्यावर मी जर हुज्जत घातली की, 'बाई, मला त्या एवढ्या तुकड्यासाठी आख्ख्या माशाची किंमत का लावतेस?' तर ती मला 'फिश नो डे' म्हणून काहीतरी गोष्ट सांगून सरळ गुंडाळते! कधी आज बोटी आल्याच नाहीत, नाहीतर कोणत्या व्यापाऱ्यांनी सगळे मासे विकत घेतले, नाहीतर अजून काहीतरी. मला सांगितलेली गोष्ट खरी आहे की गंडवागंडवी आहे याचा मला कधी थांगपत्ता लागत नाही. चांगला, ताजा माल स्वस्त दरात मिळवण्याचं कसब माझ्याकडे नसलं, तरी मला बाजारात जायला आवडतं. नायजेरियन बाजार म्हणजे रंगांचा, आवाजांचा, भल्याथोरल्या गोष्टींचा मेळा असतो. याच बाजारात मला एकदा देखणे, पोवळ्यातले खेकडे (कोरल क्रेफिश) दिसले होते; एकदा सुकवण्याआधीचे लाल असणाऱ्या काळ्या मिरीचे भारे दिसले होते; एकदा फिकट गुलाबी रंगाचं स्थानिक सफरचंदासारखं फळ (आफ्रिकन स्टार) मिळालं होतं. एकदा मी बारकुडा विकत घेत असताना शेजारच्या बाईने विचारलं, "याचं काय बनवणार आहेस?" मी सहजच म्हणाले, "अजून काही ठरलं नाही पण बहुतेक स्ट्यू बनवेन." त्यावर तिचं तोंड वाकडं झालं, ती अधिकाराने म्हणे, "स्ट्यू? पेपर सूप बनवायचं सोडून स्ट्यू कशाला बनवतेस? माझी मुलं तर स्ट्यूला हातही लावत नाहीत!" मी योरूबा असल्याचं तिला सांगितलं नाही. या क्रॉस रिव्हेरियन कालबार भागात स्ट्यूकडे जरा वाकड्या नजरेनंच पाहिलं जातं. तिने मला लगेच तिच्या पेपर सूपची कृतीही सांगून टाकली - "भरपूर पाण्यात मासा, कांदा-लसूण-मिरचीचं वाटण, क्रेफिशची पूड, आणि पेपर सूपचा मसाला टाकायचा आणि झाकण ठेऊन शिजवायचं. शिजल्यावर त्यात इफ्रिन किंवा उझीझाची पानं चिरून घालायची." हे पेपर सूप आणि त्याचा मसाला प्रत्येक घरात थोड्याफार वेगळ्या प्रमाणात बनवतात पण या मसाल्यात तीन मुख्य घटक असतात - उलिमा (ॲलीगेटर पेपर), उडा बिया (सेलिम पेपर) आणि इहिरी म्हणजे कलाबाश जायफळ. आफ्रिकेच्या वेगवेगळ्या भागांत या मसाल्यांना वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं, पण या तीन मसाल्यांची पूड करून ती पेपर सूपमध्ये वापरली जाते. मी माझ्या पेपर सूपमध्ये आलंदेखील वापरते. थंडीच्या दिवसात हे गरमगरम सूप केलं, की मला कालबारच्या बाजारात भेटलेली ती भोचक ताई नेहमी आठवते.
फिश-पेपर सूप - फोटोचा स्रोत
—
गेल्या काही दिवसांत सुचेल तसं, ताप चढल्याप्रमाणे झपाटल्यासारखं लिहितेय. जेव्हा लिहीत नसते तेव्हाही मनातल्या मनात नोंदी करत असते, पदार्थ बनवत असते. धरबंध नसलेल्या पुराच्या पाण्यानं रस्त्यात आलेला प्रत्येक अडथळा ओलांडून आपली सत्ता सर्वत्र पसरावी, तसं लागोस, इबादान, कालबार, अनेक वर्षं राहिले होते ती सगळी ठिकाणं, व्यक्ती, संभाषणं, बाजार, तिथून विकत घेतलेल्या वस्तू यांचा मनात नुस्ता कल्लोळ कल्लोळ होतो आहे.
एकदा मला सूप बनविण्यासाठी ठरावीक साच्याचं, आकाराचं आणि कच्च्या मातीचं भांडं हवं होतं. मला डोळ्यांसमोर हे खास भांडं स्वच्छ दिसत होतं; ज्या हातांनी ते सुबक भांडं बनवलं होतं ते हात दिसत होते; नायजेरियन स्त्रियांच्या पुष्ट, गोल पार्श्वभागासारखा आणि वर निमुळता होता गेलेला, त्याचा घाटदार वळणांचा आकार दिसत होता. स्थानिक माती, पाणी, हात, आणि पुरातन ज्ञानातून तयार झालेलं; आगीत तावून सुलाखून खास आमच्या पदार्थांसाठी बनवलं गेलेलं हे खास भांडंच मला हवं होतं.
हे भांडं विस्तवावर ठेवलं, की ते किंचित गडगडतं कारण त्याचं बूड गोलाकार असतं. त्या भांड्यात जोलॉफ राईस बनवला, की आधी तो तळाशी किंचित लागतो आणि मग वरपर्यंत आच सावकाश पोहोचते. हीच खरपूड त्या भातासाठी एक सुरक्षाकवचही बनते आणि भाताला अधिक स्वादही देते. खरपूड खाण्याचा अधिकार स्वयंपाक करणाऱ्याचा असतो, ती त्याला मिळालेली बक्षिशी असते. हे साधं पण सुरेख आणि सुबक भांडं जिथे विकलं जातं तो भाग 'ईफाक सटान' (सैतानाचा रस्ता) म्हणून ओळखला जातो. माझ्यासारख्या स्त्रीला या भागात जाण्याची जोखीम घेणं म्हणजे धाडसाचं काम! इथल्या अंधाऱ्या कोपऱ्यांवर कधी काय समोर येईल याचा भरवसा नाही. आजूबाजूला मुख्यतः पुरुषांचीच गर्दी! गंडेदोरे, जादूटोणा, साप, काळी जादू यांचं साम्राज्य. अन्नसा, ईसू लालू अश्या कडक आणि बिनभरवशाच्या आणि तापट दैवतांना आवाहन करण्यासाठी मिळणारी उपकरणं! मी माझ्या एका मावशीच्या आधारानं आणि माझ्या भांड्याच्या लालसेनं जीव मुठीत धरून एकदा या बाजारात गेले होते. तिथे घेतलेलं हे मातीचं भांडं आता माझ्या स्वयंपाकघराचा आणि माझ्या नायजेरियन असण्याचा अविभाज्य भाग आहे. वापरत गेलं, की हे भांडं त्याच्या रंध्रांत वेगवेगळे स्वाद आणि वास साठवत जातं, अधिकाधिक मुरतं आणि अधिकाधिक प्रगल्भ बनत जातं. यात नुसतं पाणी गरम करायला ठेवलं, तरी खास नायजेरियन स्ट्यूचा गंध सगळ्या घरात दरवळतो. तऱ्हेतऱ्हेचे मसाले आणि जिन्नस आमच्या स्ट्यूला समृद्ध करत जातात पण स्ट्यूला अधिक गहिऱ्या चवीचं बनवण्यात या भांड्याचाही वाटा असतो. हे भांडं 'इसासून', माझ्या घराचा राजा आहे; माझ्या संस्कृतीने हे भांडं घडवलंय, त्याला माझी भाषा समजते. या भांड्याला इतिहास आहे, त्याला स्वतःची खास आणि वेगळी ओळख आहे, त्याच्या रंध्रांत आधीच्या सर्व स्वादांची स्मृती आहे, हे भांडं सर्वार्थाने माझं स्वतःचं आहे. माझं पुस्तक जेव्हा प्रकाशित होईल तेव्हा होईल, पण त्याचं शीर्षक माझ्या मनात पक्कं आहे!
—
हा लेख किंवा ही गोष्ट येमिसी अरीबिसला या नायजेरियन लेखिकेच्या 'लाँगथ्रोट मेम्वार्स' या पुस्तकावर आधारित आहे. या लेखातल्या दैनंदिन गोष्टी काल्पनिक आहेत पण पदार्थांची वर्णनं, विचार, माहिती सर्व काही येमिसीच्या पुस्तकावर आधारित आहेत, हा येमिसीचा आवाज आहे. हा अनुवाद नव्हे, भाषांतर नव्हे किंवा स्वैर रूपांतरही नव्हे, तर एका नॉनफिक्शन पुस्तकाचं फॅनफिक्शन असं याला म्हणता येईल. 'लॉंगथ्रोट मेम्वार्स'ला २०१६मध्ये 'आंद्रे सायमन फूड अँड ड्रिंक अवॉर्डस्'मध्ये 'जॉन एव्हरी' या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
प्रतिक्रिया
अतिशय ओघवत्या भाषेत आणि तरीही
अतिशय ओघवत्या भाषेत आणि तरीही तपशीलवार लिहिलं आहे. फार आवडलं.
फोटो सुंदर दिसतायत.
छान लिहिलंय
आवडलं.
लेख वाचून दोन घास जास्तच गेले.
छान लिहीलंय.
आज डाळ भात आणि कोलंबीच्या लोणच्याचं साधंच जेवण होतं. पण लेख वाचून दोन घास जास्तच गेले.
अभिनंदन
लेख खूप आवडला. अशा स्वरूपात पुस्तकाचं रसग्रहण पहिल्यांदाच वाचलं, छान जमलं आहे. खूप नवीन माहिती मिळाली, आणि आता एखादा सूप (मॅगी क्यूब न घालता) करून बघावासा वाटतोय. सोबत चित्रही छान आहेत.
आभार
अभिप्रायाऺबद्दल सर्वाऺचे आभार. अलिकडेच नेटफ्लिक्सवर "How African American Cuisine Transformed America" ही मालिका पाहिली. या लेखात आलेले बरेच साऺस्कृतिक सऺदर्भ, पाककृती आणि त्यातलऺ सूक्ष्म राजकारण या मुद्द्याऺशी ही मालिका समाऺतर आहे. सऺयत आणि तरी ठाम असलेलं निवेदन आणि जेसिका हॅरिस या खाद्यसऺस्कृतीच्या अभ्यासिकेने केलेलऺ विश्लेषण असलेली ही मालिका आवर्जून पाहाण्यासारखी आहे. https://www.netflix.com/ca/title/81034518
…
‘आ.अ. क्यूझीन’ बोले तो, ज्याला ‘सोल फूड’ म्हणतात, ते? आत्यंतिक दळभद्री (तथा त्याचबरोबर आत्यंतिक अनहेल्दी) प्रकार! त्याची तुलना मेनस्ट्रीम आफ्रिकी (उदा., इथियोपियन, नायजीरियन, किंवा तत्सम) खाद्यसंस्कृतींशी (किंवा अगदी मेनस्ट्रीम आफ्रिकी जरी म्हणता नाही आले, तरी जमैकन वगैरे खाद्यसंस्कृतींशीसुद्धा) करणे म्हणजे त्या-त्या खाद्यसंसकृतींचा घोर अपमान आहे.
नाही म्हणजे, अमेरिकेतील आफ्रिकी गुलामांना जे अत्यंत निकृष्ट दर्जाचे अन्न, बचेकुचे मांसाचे तुकडे (उदा. डुकराचे कान अथवा पाय, किंवा तत्सम, ज्याला पांढरा माणूस चुकूनसुद्धा तोंड लावणार नाही, असे भाग) वगैरे शिधा म्हणून मालकांकडून पुरविण्यात येत असे, त्यातून केवळ नाइलाजास्तव उभी राहिलेली पाकसाधना, याहून अधिक महत्त्व वा ‘कॅरेक्टर’ या प्रकाराला नसावे. (आणि त्यात पुन्हा ज्यातत्यात – अगदी वरकरणी शाकाहारी भासतील, अशा पदार्थांतसुद्धा! – डुकराचे बारीक तुकडे! नाही, Don’t get me wrong – मी तत्त्वतः शाकाहारीही नाही, नि डुकराचे मला वावडेसुद्धा नाही. मात्र, चवळीच्या उसळीत किंवा एखाद्या पालेभाजीत वगैरे विनाकारण डुकराचे बारीक तुकडे आढळले, तर अंगावर शहारे येतात! बरे, ते डुकराचे तुकडे काहीतरी साध्य करीत असतात – जसे, रुचिवर्धन वगैरे – अशातलाही भाग नव्हे. आधीच मुळातल्या बेचव पदार्थात उगाच टाकायचे म्हणून टाकायचे. But, as far as this aspect is concerned, perhaps I am confusing general Southern food – another worthless cuisine, in general, but not particularly related to African Americans – with soul food; असो.) एके काळचा तत्कालीन परिस्थितीतला नाइलाज वगैरे समजू शकतो, परंतु, या प्रकाराला पुढे ‘अभिमान’ वगैरे जोडला जाऊन नसत्याचे ग्लोरिफिकेशन झाले, ही दुर्दैवी बाब आहे. हे म्हणजे, गिरगावातल्या (किंवा दादरमधल्या) चाळीतल्या जीवनाइतके सर्वोच्चस्तरीय जीवन अथवा हायक्लास संस्कृती नाही, असे म्हणून, सकाळीसकाळी (किंवा फॉर्दॅट्मॅटर कोठल्याही प्रहरी) लोक कसे हातात टमरेल घेऊन खाजगी इराद्यांचे सार्वजनिक प्रकटीकरण करीत जातात (‘तुमच्या ब्लॉक नि बंगले संस्कृतीत इतका मनमोकळेपणा सापडेल काय?’), याचे गोडवे गाण्यासारखे आहे.
अहो, इथियोपियन, नायजीरियन, झालेच तर जमैकन वगैरे खाद्यसंस्कृतींना काही ‘कॅरेक्टर’ आहे हो! उगाच कधीकाळी आफ्रिकेतून आणलेल्या कृष्णवर्णीय लोकांशी संबंध आहे, म्हणून त्याच श्वासात आ.अ. खाद्य‘संस्कृती’चा उल्लेख करून त्यांची बदनामी करू नका!
रोचक.
रोचक.
पावभाजी, मिसळ यासारख्या पदार्थांबाबत देखील असे ऐकले आहे की मुळात स्वस्त, निकृष्ट, मंडईत उरलेल्या शिळ्या भाज्या वापरून त्यांची ओळख अथवा शिळे रूप अथवा शिळा स्वाद उरू नये म्हणून खूप मसाला टाकून चेचून पार लगदा करणे अशी सुरुवात. किंवा मिसळीबाबत उरलेल्या पदार्थांची रश्श्यात, उसळीत, फरसाण, कांदा आणि काही काही मिसळून पोटात बोळवण .. असे ऐकले वाचले होते.
खरे खोटे नक्की माहीत नाही. अर्थात या पदार्थांचे आताचे स्वरूप मात्र (चांगल्या हॉटेलांत तरी) तसे नाही असे म्हणता येईल. शिवाय त्यात कोणावर अन्यायातून काही उद्भवले असे म्हणता येणार नाही.