उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - ५
आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहीतरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या/नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती? हॉटेलचा अॅम्बियन्स कसा होता वगैरे हवं ते लिहू शकता. पदार्थाचा फोटो असेल तर उत्तमच. अर्थातच हे फक्त खाण्याबद्दल नाही, तर पिण्याबद्दलही आहे
भाग ४ बराच लांबल्याने, वाचनाच्या सोयीसाठी, तेथील प्रतिसादाचे रुपांतर, नव्या भागात करत आहोत:
=======
या आगोदरच्या धाग्यात आलेल्या चीजकेकच्या उल्लेखावरुन गेल्याच आठवड्यात हिमाचल प्रदेशात नग्गर या गावी हिमालयाच्या अगदी दरीच्या टोकावर झक्कास जागी थाटलेल्या मोजून चार टेबले असलेल्या कॅफेमधे अॅप्रिकॉट चीजकेक खाल्ला. मला तरी इतका उत्कृष्ट चीजकेक खाल्याचं आठवत नाही. सर्वात चांगला भाग म्हणजे त्याचा ताजेपणा. सर्व घटकपदार्थ अत्यंत फ्रेश. तिथे सध्या तापमान -७ ते + ४ डिग्री सेंटिग्रेडच्या मधे दिवसभर राहात असल्याने बहुधा आणखीनच ताजे रहात असावेत पदार्थ.
या ठिकाणी आणखीही काही कॅफे आहेत, पण ओव्हरलुकिंग व्हॅली असं हे एकच आहे. नग्गर कॅसलच्या वळणावरच आहे. मालक अभिषेक आणि आदित्य शर्मा.
कॅफेमधे अत्यंत टुमदार दिसणारी रचना आहे आणि बस्स चार टेबल्स. या भागात कोणी पर्यटनासाठी गेलं तर नग्गर कॅसल पहाच, पण त्याच्या कोपर्यावर एका छोट्या मंदिराच्या खाली असलेलं हे कॅफेही मिस करु नका. नीट ओळखू यावं म्हणून आतल्या भागाचा एक फोटो:
शिवाय मनालीच्या माल रोडवर रस्त्याकडेची खादाडी सपाटून केली त्यात हे बोराएवढ्या आकाराचे गरमागरम, उकळत्या पाकातून उचलून द्रोणात टाकून दिले जाणारे गुलाबजाम लाजवाब होते.
म्यम् म्यम्
म्यम् म्यम्
ल्यप ल्यप
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
अहाहा
आता तो केक खाण्यासाठी हिमाचलला जावेसे वाटू लागले आहे.
राधिका
छान
केक आणि गुलाबजामची चित्रे आवडली.
मैय्याज् व नॉर्थ कर्नाटका मेस
काही काळ बेंगलोर ला जाणे झाले
मैय्याज् ह्या जयनगर की जयानगर पॉश एरियातील स्वच्छ बस ष्ट्यांडच्या जवळच हे ठिकाण आहे.
दाक्षिणात्त्य थाळी. किंमत रु१७५ फक्त. सबकुछ मिलाके. आधी १७५ सांगायचे, मग गिर्हाइक एकदा खाण्याच्या उद्देशाने आत आले की हळूच अमक्या ट्याक्सचे इतके, तमक्याचे इतके असे म्हणत १७५ चे थेट २५०च्या घरात नेउन सोडायचे असा प्रकार नाही. किंवा खायला सुरुवात केल्यावर समोर स्वीट्स्-डेझर्ट्स धरुन समोर उभे रहायचे व तिकडे पाहिले की लागलिच "दर स्वीट मागे २५ रुपये अधिकचा चार्ज पडेल" असे सांगण्याचा प्रकारही तिथे नाही.
१७५ म्हणजे १७५. स्वीट्स लिमिटेड असतील. इतर सर्व अनलिमिटेड हे जाण्यापूर्वीच मोठ्या बोर्डावर प्रवेशापाशीच लिहिलेलं. म्हटलं बरय.
थाली मस्त आहे.सांबार भात चविष्ट आहे. ह्याशिवाय त्या त्या दिवसच्या हिशेबाने, त्या त्या वाराच्या हिशेबाने चित्रान्न, बिशीबिळ्ळे, मसाला भात ह्यापैकी काही तरी एक असते.
मागाहून दहिभात येतो.शिवाय सुरुवातीलाच बटाटयची भाजी आणि पुरी ह्यांचा रतीब सुरु होतो.
साउथ इंदियन रेस्टॉरंटात तिथलेच खास पदार्थ चाखायचे, आवडले तर तेच दडपून हाणायचे असा प्लॅन असल्याने पुरी-बटाटा ह्यांना हातही लावला नाही.
माझे परमप्रिय आइसक्रिम डेझर्ट म्हणून आले असता, हे नंतर इतरत्रही मिळू शकते असे म्हणून त्यावरही हात मारला नाही.
फक्त दाक्षिणात्य पद्धतीची तांदलाची खीर तेवढी वाटीभर खाल्ली.
स्वच्छ, पॉश ठिकाण. सहकुतुंब जावं असं. दक्षिणी स्टाइलमधील सुकांता - थाट्-बाट -दुर्वांकुर ह्यांना समांतर असं.
.
.
दिवसातून एकदा इथे तर दुसर्यांदा "नॉर्थ कर्नाटका मेस" ह्या ठिकाणी गेलो. हे मेस सारखं वातावरण. थोडंफार पुण्यातील "बाद्शाही"ची आठवण यावी असं.
किम्वा थोडंफार "आंध्रा मेस" ज्या हल्ली जागोजागी उघडल्यात; त्यासारखं.
ठिकठाक माहौल,; फार पॉश असं कही नाही. किंचित कळकट टेबल.
तिथे मी भात ऑल्मोस्ट खाल्ल्लाच नाही!
ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी , तांदलाची भाकरी, फुलके.... हे सगळ्म उपलब्ध होतं.
खास गावाकडे किंचित जळालेल्या खरपूस वांग्याला एक चव असते. त्या चवीतील वांग्याची एक भाजी, भरित.
एक बटाटा भाजी, सोबत भरपूर सांबार असा बेत होता.
ताकही होतं. साधसंच पण चविष्ट. सांबांरमधील भाज्यांमध्ये कसूर केली नव्हती.
किंमत :- रुपये८० फक्त. (अनलिमिटेड थाळी.)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
छान
नॉर्थ कर्नाटकाची खाद्यसंस्कृती बरीचशी दक्षिण महाराष्ट्राशी जुळावी. ती काही टिपिकल सौदिंडियन नव्हे!
यप्स...
चार दक्षिणी राज्य म्हटले की सहसा "भात" हाच प्रकार डोळ्यासमोर येतो.
पण कर्नाटक व आंध्र प्रदेश मधील कित्येकांचे भाकरी, त्यातही ज्वारीची भाकरी हे प्रमुख अन्न, स्टेपल फुड आहे.
तेलंगणा विरुद्ध उर्वरित आंध्र प्रदेश ह्यातील संस्कृतिक झगड्याचा एक भाग हा ही आहे की तेलंगणातील लोकांचे प्रमुख अन्न भाकरी. संस्कृती थोडीफार वेगळी(निजामी प्रभावामुळे असेल.)
पण कल्चरल रिप्रेझेंटशन म्हटलं की हे कुठे दिसत नाहित, उगीच उर्वरित आंध्रवाले मिरवून घेतात; असे ऐकले आहे.
बेल्लारीकराम्स काही आयड्या असावी काय ह्याची?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
दोआब
कृष्णा आणि गोदावरी यांच्या खोर्यातल्या ह्या प्रदेशांच्या - म्हणजे दक्षिण महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि तेलंगण या भागाच्या - संस्कृतिसाधर्म्याबद्दल दुर्गाबाई भागवत यांनी केलेलं भाष्य आठवलं.
बाकी बेल्लारीकरांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.
भात
गोव्यासहित महाराष्ट्राची कोकणपट्टीदेखिल भातावरच जगते की!
(म्हणूनच पश्चिम महाराष्ट्रात कोकण मोडत नाही!!)
आंध्र प्रदेशात वर्चस्व आहे ते
आंध्र प्रदेशात वर्चस्व आहे ते उर्वरित आंध्र प्रांताचे. तेलंगण प्रांत पिछाडलेला आहे अन ते सर्व कल्चरली देखील दिसते. पिच्चरमध्ये भाषा दिसते तीही उर्वरित आंध्राकडची. इ.इ.इ.
कर्नाटकातही दक्षिण कर्नाटक म्हणजेच जुन्या म्हैसूर प्रांताचे वर्चस्व आहे. ते लोक उत्तर कर्नाटकवाल्यांचे कन्नड कमअस्सल समजतात. तिकडे गेलो असताना "तुमचे कन्नड फारसे खास दिसत नाही, तुम्ही धारवाड-विजापूरकडचे आहात काय?" अशी पृच्छा मला एकदा करण्यात आली होती. जण्रल डिव्हेलपमेंटही दक्षिण कर्नाटकात जास्त असावी.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पच्चिम
म्हणजे महाराष्ट्रात कसं "पच्चिम" म्हाराष्ट्राचं वर्चस्व आहे तसं दिसतय. गरिब बिचार्अय मराठवाडा,खान्देशला प्रतिनिधित्व मिळतच कुठं?
मराठवाडयवरही निमाजाचा अंमल, कर्नाटकातील मागास भागांवरही निजामाचा अंमल. तलंगणा तर त्याच्या राज्याचे heartland. ते ही गंडलेलं.
थेट ब्रिटिश सत्तेखालील ठिकाणे अधिक सुब्बत्तापूर्ण्,पुढारलेली झाली काय?
पण शिंचं म्हैसूर हे संस्थान होतं, थेट ब्रिटिश अमंलाखाली नव्हतं; असंही म्हणता येतं.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
थेट ब्रिटिश सत्तेखालील ठिकाणे
साधारणपणे, हो. पण नॉट ऑलवेज. राजा कसा आहे यावर बरेच काही अवलंबून होते. उदा. केरळ, गुजरातेतील बडोदा, इ.इ.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आंध्र-कर्नाटकाचे पुणे
थोडक्यात, विजयवाडा आणि मैसूर या शहरांना अनुक्रमे आंध्र आणि कर्नाटकाचे "पुणे" म्हणावे काय?
हा हा हा आंध्राची केस अंमळ
हा हा हा
आंध्राची केस अंमळ वेगळी आहे.
पण म्हैसूर....कदाचित म्हणता यावे. "तुम्ही पुण्यामुंबैचे लोक" सारखे "तुम्ही म्हैसुरबेंगलोरचे लोक" असे म्हटल्या जाते पण त्यातही बेंगलोरचाच सिंहाचा वाटा आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मिनी वोक ओरीएन्टल किचन ह्या
मिनी वोक ओरीएन्टल किचन ह्या मॉडेल कॉलनी मधील एका अतिशय छोट्या पण अतिशय स्वच्छ ठिकाणी बर्मीज खो सुई ( उच्चारातील चू.भू.दे.घे.) हा एक अफलातून प्रकार खाण्यात आला.
(चित्र जालावरून साभार)
नारळाच्या दाट दुधातील ग्रेव्ही, नुसत्या लसूणावर परतलेले नूडल्स आणि बरोबर तळलेले नूडल्स , तळलेला कांदा,तळलेला लसूण, कांद्याची पात, लिंबू , बारिक चिरलेली मिरची इ. वेगळे मिळते.
नूडल्स वर ग्रव्ही ओतायची आणि मग तुमच्या आवडीप्रमाणे इतर पदार्थ वरून भुरभुरायचे...
अहाहा.... निर्मल आनंद(खूबसूरत मधल्या रेखा चा डायलॉग आठवा!)
किंमत फक्त २२० व्हेज ग्रेव्ही - दोन जणांना आरामात शेअर करता येईल(शिवाय आम्हाला कॉर्पोरेट डिस्काउंट म्हणून २०% टक्के सूट मिळाली.. दिल गार्डन गार्डन हो गया)
संपादकः width="" height="" क्षमस्व!
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
व्हेज ग्रेव्ही मधली अंडी
व्हेज ग्रेव्ही मधली अंडी पाहून दिल बाग बाग हो गया.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
इतके दिवस लोक नुसती
इतके दिवस लोक नुसती पदार्थांची वर्णनं टाकायची. त्यातूनही जळायला व्हायचंच. मात्र आता ते पुरेसं नाही म्हणून फोटो टाकण्याची हरामखोरी करतात. बरं, त्या जळवण्याची आग वाढवण्यासाठी नुसता तो पदार्थ नाही, तर कॅफेतून पार्श्वभूमीला दिसणारे हिमाच्छादित डोंगर, ती झाडं वगैरे वगैरे पण दाखवतात. शिरा पडो तुमच्या तोंडात लेकोहो. (आणि हा शिरा म्हणजे गोड शिरा नाही, शिळाचा मालवणी अपभ्रंश आहे!)
तुम्ही काय मंगळावर राहता का?
तुम्ही काय मंगळावर राहता का? तिथेही स्थानिक अन्न असेलच कि
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हल्ली कुठे आणि काय खाल्ले?
राजस्थानी मिठाईचे काही लाजवाब नमुने चाखले.
You have not yet discovered that you have a lot to give, and that the more you give the more riches you will find in yourself.
- Anaïs Nin
कुठे ते कोण हो सांगणार आँ
कुठे ते कोण हो सांगणार आँ
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बाँगो खाद्दो जात्रा
पारशे, रोहू, भेटकी हे मासे, चिकन, मटन, अस्सल कोलकात्यातील अप्रतिम चवीच्या पाणीपुर्या, खास शांतिपूर येथील प्रसिद्ध रसगुल्ले आणि नोलेन गुडेर शाँदेश व हिवाळ्याच्या दिवसांतच मिळणारा पोह्यांच्या लाडूसदृश 'जयनगरेर मोवा', मिल्क केक, इ. मिठाया हे पोटात भरून झाले आणि नंतर संस्थळावर न वावरतादेखील इनो घेऊन पडावे लागले.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
फटू. वी वॉण्ट फटू.
फटू. वी वॉण्ट फटू.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
अहो ते सर्व खाताना फटू
अहो ते सर्व खाताना फटू काढण्याचे भान नव्हते राहिले. ती खाद्यजत्रा इ. नव्हती. कोलकात्यात गेलो होतो तिथेच खाल्लेल्या पदार्थांचे वर्णन आहे हे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बाबा रे, इतके सगळे खाल्ले
बाबा रे, इतके सगळे खाल्ले म्हणून जालावर लिहित जाऊ नकोस. लोक जळतील, पोट दुखेल.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
भीमथडी
भीमथडीस गेलो रविवारी. ह्यावेळी फारसे हादडता आले नाही. पायास भिंगरी होती.
हुरड्याचे धपाटे खाल्ले; आवडले. खरंतरं< ती हुरड्याची चविष्ट थालीपीठंच होती, धपाटी का म्हणत असावेत कुणास ठाउक.
इतरही पदार्थ खाल्ले, पण सर्वात स्मरनीय हेच. धपाट्याला स्वतःची अशी एक चव होती. चटणी किंवा दही न लावताही ते नुसतच खाता येत होतं.
आवडलं.
पुण्याजवळ प्रतिबालाजी आहे. त्याचा तुपाळ गोग्गोड लाडू प्रच्चंड आवडतो. एका रपाट्यात दोन मोठे लाडू हाणले.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
धपाटे अन थालिपीठ यांत नक्की
धपाटे अन थालिपीठ यांत नक्की फरक काय?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
धपाटे पातळ असतात आणि त्यात
धपाटे पातळ असतात आणि त्यात ज्वारी पीठच प्रमाण जास्त असत. थालीपीठ जाड असतात आणि त्यात डाळीच्या पीठच प्रमाण जास्त असत.
धपाटे
शब्दांत सांगता येणं कठीण आहे, खाणार्अयच्या चष्म्यातून सांगतो.
धपाटे जरा कोरडे कोरडेच लागतात.
धपाट्यात इतर पदार्थ फार काही टाकलेले नसतात भुर्भुरलेले.
धपाटे दोन्ही साइडनी भाजतात.
धपाटे नुसते खाल्ले तर कोरडे कोरडे लागतात.
धपाटे पातळ असतात.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
नेमका फरक सांगितल्याबद्दल
धन्यवाद!!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
थालीपीठ आणि धपाटे.
धपाटे बाहेरगावी प्रवासाला जाताना बनवतात. ते बरेच दिवस (२-३) टिकतात. चव हा ते बनवण्याचा मुख्य हेतू नसतो. बहुतेक ते थोडे आंबटही असतात.
थालिपीठ चवणा म्हणून बनवले जाते. ते जास्त तेलकट तुपकट असते. त्याला तेल जिरण्यासाठी पाच सहा जागी भोके असतात. त्याच्यावर कढईच्या संपर्कात न येणारे लांब आकाराचे काहातरी घालतात. ते मऊ वा खरपूस बनवता येते. थालीपीठ तव्यावर वरखाली करत नाहीत. मध्यात तेल उरेल अशी कढाई लागते. थालीपीठे भावांशी भांडल्याशिवाय पोटभर मिळत नाहीत. थंडीपावसाच्या वेळी रात्री भूकेच्या वेळी गरम चविष्ठ थालीपीठे अंथरुणात खाऊ घालणारी आई भाग्यवंतानाच मिळते.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
थालीपीठेही २-३ दिवस
थालीपीठेही २-३ दिवस टिकतात.
चवणा म्हणजे काय?
अन फक्त थालीपीठे भावांशी भांडल्याशिवाय पोटभर मिळत नाहीत याच्याशी असहमत. खरे तर कुठलाही आवडता पदार्थ झगडा केल्याशिवाय अधिक मिळत नाही जर भावंड नामक प्रकार असेल तर. भावंड नसेल तर मग मात्र चंगळ असते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
थालीपीठे २-३ दिवस टिकत असावीत
थालीपीठे २-३ दिवस टिकत असावीत पण ती टिकू दिली जात नाहीत म्हणून टिकत नाहीत असे माझे ज्ञान झाले असावे. दुसर्या दिवशी ते निव्वळ बेक्कार लागते.
चवणा म्हणजे तोंडाची चव पुरवणे, अॅज अगेंस्ट भूक भागवणे.
माता कितीही प्रेमळ असली तरी ती चार भूकेल्या भावंडांची पोटे भरतील इतकी थालीपीठे बनवू शकत नाही. एक एक बनवायला २० मिनिटे लागतात.
थालीपीठांवर जे भुंडगुळे असतात, ते ३-४ असतात. (थालीपीठ बनल्या बनल्या आई वडीलांसाठी एक राखीव ठेवते.) मग उरलेल्या भुंडगुळ्यांसाठी कढईचे झाकण उघडताच भावंडे ज्या प्रकारे तुटून पडतात तो प्रकार तो प्रकार रोचक असतो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
धन्यवाद. चार भुकेली भावंडे
धन्यवाद.
चार भुकेली भावंडे प्रत्येकी ३ थालीपीठे खात असली तर १२ थालीपीठे बनवता येतात ठीकठाक वेळेत.
बाकी थालीपीठ हा प्रकार इतका जब्बरदस्त असला तरी फेमस नै म्हाराष्ट्राबाहेर. ते कार्य कुणीतरी केले पाहिजे.
(गुजरातेत बनवतात असे ऐकून आहे पण काही कल्पना नाही.)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
थालीपीठ?
अरे थालीपीठाचं काय घेउन बसलाय; तिकडे पंजाबात श्रीखंडही ठाउक नाही पब्लिकला.
पहिल्यांदा माझा विश्वासच बसेना. (पुरणपोळी, बाकरवडी , थालीपीथ हे खास मराठी आयटम समजत होतो.बाकी सर्व प्रमुख आयटम उर्वरित भारतात प्रचलित असतील असं वाटायचं.)
पण "श्रीखंड ठाउक नाही" असे म्हणणारा ज्योक करत नव्हता. पंचवीस तीस लोकांपैकी फक्त दोघांना ठाउक होतं, दोघं पुण्यात कैक वर्षे राहून आले होते.
इतरांना वर्णन करुनही असा काही पदार्थ असतो हेच गळी उतरत नव्हते.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
श्रीखंड
श्रीखंड हा प्रकार महाराष्ट्र, गुजरात आणि फार फार तर मध्यप्रदेश१ यापलीकडे फारसा ठाऊक असण्याबाबत साशंक आहे.
१ फारा वर्षांपूर्वी झुकझुकने प्रवास करताना मध्यप्रदेशातील कुठल्याशा स्टेशनावर स्थानिक ब्र्याण्डचे श्रीखंड खाल्ल्याचे अंधुकसे स्मरते.
बाकी थालीपीठ हा प्रकार इतका
मुळात मराठी जेवण हाच प्रकार फेमस नाही महाराष्ट्राबाहेर.
soft power
soft power मध्ये मराठी संस्कृती मागे पडते आहे काय?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
प्रतिप्रश्न
soft powerमध्ये मराठी संस्कृती नेमकी कधी पुढे होती?
सॉफ्ट पॉवर म्हणजे काय?
सॉफ्ट पॉवर म्हणजे काय?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
प्रयत्न
मारामारी न करता(सुद्धा) आपली पद्धत इतरांच्या गळी उतरवण्याची शक्ती?
अच्छा. म्हणजे मुघलांकडे
अच्छा. म्हणजे मुघलांकडे स्थापत्यशास्त्र, संगीत, नृत्य यांच्या स्वरूपातली सॉफ्ट पॉवर होती... असं?
दडपशाहीविना सांस्कृतिक प्रभाव पाडण्याची क्षमता.. असं?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
+
हो.
महाराष्ट्र राज्याची स्थापना
महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्याअगोदर काही अंशी होती असे म्हणावयास वाव आहे. झुणका/पिठले हा पदार्थ तमिळनाडू/केरळात काही ठिकाणी बनवतात त्याची प्रेरणा मराठीच-व्हाया तंजावर.शिवाय महानुभाव पंथाचा पार पंजाबपर्यंत झालेला प्रसार, नामदेवांची वचने गुरु ग्रंथसाहेबात घेणे, इ. उदाहरणेही आहेत. बालगंधर्वांचे पेट्रन्सदेखील गुज्जू व्यापारी बहुसंख्येने होते. एमपी वैग्रे ठिकाणी जिथे मराठी लोकांची बहुसंख्येने वस्ती होती तिथे मराठी नाटकांना हिंदीभाषक लोकही हजेरी लावत असे ऐकून आहे. इ.इ.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
धपाटे बहुदा पाण्यासोबत थोडे
धपाटे बहुदा पाण्यासोबत थोडे ताक घालून भिजवलेले असतात. लागतात चविष्टच
मात्र जितके दिवस जातात तितका आंबटपणा किंचीत वाढतो मात्र आंबत नाहीत (आंबणे/खराब होणे/फर्मेंट होणे) या अर्थी.
शिवाय धपाट्यांना तेलाचा वापर अधिक असावा.. अधिक टिकतात.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
इम्बिस, कुलाबा
वांद्र्याच्या इम्बिसमध्ये ४-५ वेळा जाऊन आल्यावर कुलाब्याच्या इम्बिसमधले पदार्थ खाऊन पहायची फारा दिवसांची इच्छा होती. ती इच्छा अखेर या रविवारी पूर्ण केली. तिथे नववर्षाच्या निमित्ताने खास मेनू ठेवला होता, त्यातलेच पदार्थ खायचा बेत होता. भरपूर पदार्थ खाता यावेत म्हणून ६ जणांचा कंपू जमवायचे प्रयत्न केले, पण एकूण चारच टाळकी जमली. चौघांनी मिळून रोस्ट टर्की, ब्रेज्ड गिनी फोल, रॅबिट टेरिन आणि ऑक्स टेल पास्ता (बैलाच्या शेपटीची मांस घातलेला पास्ता) असे पदार्थ हाणले.
यांतला ऑक्स टेल पास्ता खाणे हा एक मजेशीर अनुभव होता. बाकी रॅबिट टेरिन सोडता सर्वच पदार्थ सर्वांनाच आवडले. मी मात्र चवीच्या दृष्टीने क्रमांक द्यायचे झाले, तर रॅबिट टेरिनला पहिला आणि गिनी फोलला दुसरा क्रमांक देईन; तसेच टर्की आणि पास्त्याला तिसरा क्रमांक विभागून देईन. परंतु माझ्यासाठी सर्वांत आवडता पदार्थ ठरला तो म्हणजे टर्की. टर्कीच्या मांसाचा पोत मला भयंकरच आवडला.
वांद्र्याप्रमाणेच येथेही बसण्यासाठी वेगवेगळ्या रचना होत्या. इथलीही सजावट छान होती. कुलाब्याच्या आणि वांद्र्याच्या या दोन शाखांमध्ये दोन महत्त्वाचे फरक आहेत. एक म्हणजे, कुलाब्याला वांद्र्यापेक्षा खूप जास्त व्हरायटी आहे. आणि दुसरे म्हणजे कुलाब्याशी शाखा बरीच महाग आहे.
एकूणात अनुभव तिथे पुन्हा पुन्हा जायची इच्छा होण्याइतका चांगला होता. या सगळ्यात खटकण्यासारखी एकच गोष्ट म्हणजे तिथे एकूण बिलावर लावलेला जवळजवळ २५% कर. त्या करामुळे आमचा माणशी खर्च जवळजवळ ४०० रु. झाला.
जाता जाता, तेथे जायची इच्छा असणार्यांसाठी एक सूचना- ही शाखा गुरुवारी बंद असते.
राधिका
कित्ती कित्ती जळवावं! वैट्ट
कित्ती कित्ती जळवावं! वैट्ट वैट्ट कुठली!
जोक्स अपार्ट, या अशा धाग्यावर मी सर्वाधिक कोणाच्या प्रतिसादाची वाट पाहत असेन तर ती तुमच्या!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
धन्यवाद!
पण आता यामुळे माझ्या प्रतिसादांची संख्या वाढली तर त्याचं खापर तुमच्या माथी.
राधिका
TJ's BrewWorks - पुणे
बीयर ज्यांना आवडते त्यांच्यासाठी हे ठिकाण म्हणेज 'मस्ट गो'!
खराडी - नगर बायपास रोडवर अॅमनोरा पार्क टाउन मॉलच्या ईस्ट ब्लॉकमध्ये असलेल्या TJ's BrewWorks मध्ये बीयर इन हाउस ब्रु केली जाते. ड्राफ्ट बीयरचा लुत्फ इथे घेता येऊ शकेल. सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७:३० पर्यंत हॅप्पी अवर अंतर्गत ५०% फ्री बीयर मिळेल. म्हणजे १ लीटर बीयरच्या पैशात १.५ लीटर बीयर. अॅम्बीयन्स उत्कृष्ट आहे. स्टाफ आणि सर्व्हिस उत्तम. आयफोन अॅपने ऑर्डर देणे वगैरे हाय फाय प्रकार आहेत, वायफाय ही उपलब्ध आहे. खाण्याचे पदार्थ 'तोंपासु' कॅटेगरीतले असले तरीही जरा महाग आहेत. मेनु इथे चेक करता येईल.
एल आणि लागर दोन्ही प्रकारातल्या आणि सायडर, जर्मन व्हीट, बार्लीच्या बीयर्स ही इथली खासियत. "डेविल'स डार्क" हा स्टाउट प्रकारातला डार्क बीयरचा प्रकार माझा फेवरीट, आहे बोले तो एकदम झकाsssस!
आणि माझा आवडता "डेविल'स डार्क"
- (साकिया) सोकाजी
ब्लॉग हा माझा...
साधारण किंमतपण सांगा न
साधारण किंमतपण सांगा न सोकुभाउ. एका पिचरची. म्हणजे असं नाही ना की ५०% फुकट पण आधीची पिचर कहिच्यकाही किमतीला.
आणि पुण्यात बहुदा अजून एक असलच brewery + restaurant आहे. कोंढवा साईडला. पण नाव नाही आठवते.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
दोन
पुण्यात अजुन दोन ठिकाणे आहेत:
१. कोरिंथियन्स क्लब - कोंढवा
२. बार्लीज - सीजन्स मॉल, मगरपट्टासीटी (हा आणि एक वैताग, घरापासून मोजून १०० पावलांवर आहे)
डेविल्स डार्क च्या किमती मी मागे जेव्हा गेलो होतो तेव्हा अशा होत्या:
३३० मिली - २२५/-
५०० मिली - ३४०/-
१ लि. - ६७५/-
+ १२.५% वॅट + ४.९४% सर्विस चार्ज.
लेटेस्ट किमती आठवत नाही पण नक्कीच वाढल्या असाव्यात. (म्हणजे कार्ड स्वाइप केले होते फक्त, बाकीचे आठवत नाही.
)
ब्लॉग हा माझा...
टीजे'ज मध्ये जाऊन आलो. मस्तं
टीजे'ज मध्ये जाऊन आलो. मस्तं आहे. फ्लेमीश एल एक नंबर होती. हॅपी अवर्सचा फायदा उठवला. फक्त पार्कींग केल्यावर सेक्टर आणि रो लक्षात ठेवावी. नंतर शोधण अवघड असतं.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
महालक्ष्मी सरस
वांद्र्याला दरवर्षीप्रमाणे महालक्ष्मी सरस हे प्रदर्शन भरले आहे आणि नेहमीप्रमाणे तिथे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लागले आहेत. मी तिथे हुरड्याचं थालीपीठ (ठीक), मिरचीचा ठेचा (मस्त तिखटजाळ), तांबडा (ठीक) आणि पांढरा (चांगला नाही) रस्सा, शेवपुरी (तद्दन बकवास- ग्राहकांची फसवणूक), कांदाभजी (वाईट), भाजीवडा (ठीक) असे पदार्थ खाल्ले. यात वाईट अनुभवांचा भरणा बराच असला, तरी सगळ्या मिळून फारच थोडक्या स्टॉल्सवरील पदार्थ चाखले आहेत हे लक्षात घेता इतर सर्व स्टॉल्सवर मी काट मारणार नाही.
या पदार्थांखेरीज तिथे वर्हाडी चिकन आणि मटण, खानदेशी पदार्थ, मांडे (दोन वेगवेगळ्या पद्धतींचे), सावजी मटण, धपाटे असे मुंबईत नेहमी न मिळणारे पदार्थ मिळत आहेत. ते न खाऊन हळहळण्यापेक्षा खाऊन हळहळलेले बरे असा सूज्ञ विचार करून मी हे पदार्थ खाण्यासाठी परत एकदा तिथे जाणार आहे.
खाद्यपदार्थांखेरीज तिथे देशातल्या विविध ठिकाणच्या हस्तकलेचे स्टॉल्स लागलेले आहेत. अशा प्रकारची प्रदर्शने वर्षभर लागतच असतात. परंतु मला महालक्ष्मी सरस अधिक आवडते कारण-
१. तेथे हस्तकलेसोबत खाद्यपदार्थही मिळतात.
२. हे प्रदर्शन भव्य असते आणि मध्ये चालायाला मोकळी जागा बर्यापैकी असते.
३. हे प्रदर्शन मैदानात भरते त्यामुळे बंदिस्त जागेत गर्दी झाल्यावर जे त्रास होतात ते इथे टळतात.
राधिका
मसाला दूध
दअरवेळीच हवं तेव्हा मसाला दूध घरी बनवत बसणं जमतं असं नाही.
गावात कधीही गेलो की भरत नाट्यमंदिराच्या समोरच्या लायनीत एक डेअरी सदृश प्रकार आहे.
त्याच्याकडील लस्सी वगैरे आयटाम कुठल्याही बर्यापैकी डेअरीवाल्याकडे असतील तितके चांगले आहेत.
(हल्वाई लोक लस्सीच्या नावाखाली पॅकेज्ड ताक विक्तात. हे इथेच नाही तर भारतभरात आहे.चंदीगडातही तेच, खुद्द इंदौरातही तेच.
ते चविष्ट असेलही. पण पॅकेज्ड लस्सी व सुट्या सुट्या ग्लासात मिळणारी लस्सी हे संपूर्णतः दोन वेगळे प्रकार आहेत.)
तर सांगायचे म्हणजे, ह्या लस्स्या चाम्गल्या कुठल्या ?
कोथ्रुडात एक दोन थिकाणी मिळत, वनाज कॉर्नरपाशी , लोकमान्य कॉलनी परिसर, किनारा हाटेलजवळ.
नवी सांगवी परिसरात अशा बर्यच डेर्या आहेत. घट्ट लस्सी, त्यात झकास क्रीम .
दिवस मस्त जातो साला, दोन चार ग्लास मारले की.
असॉ. अवांतर होतय.
तर बह्रत नाट्य मंदिरासमोरच्या लायनीत डेअरी आहे तिथे नुसती लस्सी, ताक, दही हेच आयट्म आहेत असे नव्हे तर झकास मसाला दूधही मिळते.
मस्त साय घालून देतो.
तिथं जाणं होतं, तेव्हा अधून मधून चाखत असतो.
शिवाय लक्ष्मी रोडवर एक अप्रतिम ठिकाण होतं, नाव विसरलो आता, बहुतेक दुग्ध केंद्र का काहीतरी नाव होतं.
त्याचंही मसाला दूध बरं होतं.
त्याच ठिकाणचा त्याचा तिखट सांजा, हा उपम्याचा ताजा लुसलुशीत भाउ चविष्ट होता.
ज्यांनी चाखलं नाही, they have missed it.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
शिवाय लक्ष्मी रोडवर एक
जनसेवा नाव त्याचं
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
यस्स....
यस्स, तेच.
थ्यांक्स
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
जमसेवा
तिथे काचेच्या लहान बाट॑लीत प्याक केलेली लस्सी आणि दूध मिळे, जे लहानपणी मला आणि माझ्या भावला आवडत असे, विशेषतः त्या छोट्या बाटलीमुळे.
+
पियूष. ("कारण शेवटी आम्ही..." इ. इ. - पु.ल.१!)
शिवाय, मेनूच्या सुरुवातीलाच १. साधे गरम दूध, २ साधे गोड गरम दूध आणि ३. केशरी मसाल्याचे दूध असे तीन पदार्थ असत, पैकी तिसर्या क्रमांकाचा प्रकार खास असे.
तिथल्यासारखा नारळीपाक (खोबर्याची वडी) त्रिभुवनात अन्यत्र खाल्लेला नाही. सुटे दही विकत, तेही अत्युच्च प्रतीचे असे. आठवड्यातून एक दिवस (मला वाटते बुधवारी - चूभूद्याघ्या.) साबूदाण्याची खिचडी विकत, तीही छान असे.
बाहेरच "गिर्हाइकास विक्री करून तुम्ही गिर्हाइकावर उपकार करत नसून, विक्री करण्याची संधी तुम्हांस देऊन गिर्हाईक तुमच्यावर उपकार करत असतो" अशा अर्थाचे महात्मा गांधींचे सुभाषित इंग्रजीतून लिहिलेली निळ्या रंगाची पाटी असे, आणि त्या पाटीच्याच खाली त्या पाटीच्या मजकुराशी अत्यंत फटकून व्यवहार चाले. पण क्वालिटीपोटी तोही पचवून घेतला जात असे.
अवांतर: तिथल्या कागदी मेनूवर 'रिमझिम मसाला डोसा' अशी छापील एण्ट्री हाताने खोडून 'रिमझिम मसाला सोडा' अशी 'दुरुस्त' केलेली असे, ते आजही आठवते.
=====================================================================================================================
१ पु.लं.च्या मते पियूष बोले तो श्रीखंडाची धुवून काढलेली पातळ आवृत्ती. (पहा: 'माझे खाद्यजीवन' - हसवणूक.) पण आम्हाला हा प्रकार जाम आवडायचा. कारण शेवटी आम्ही... असो.
खान्देश
खान्देशी नावाची दोन तीन हाटेलं आहेत पुणयत.
ही सगळी टपरास्टाइल पण चविष्ट आहेत. फ्यामिली वाल्यांना जायला संकोच वाटू शकेल. (तरी आम्ही जातोच.)
एक आहे कोथरुडात वनाज कंपनीच्या कर्ण विरुद्ध दिशेला (diagonally opposite)
दुसरं आहे जुन्या सांगवीत, पेट्रोल पंपाच्या थोडं पुढं.
पेट्रोल पंपाहून नव्या सांगवीत जाताना ते लागतं.
भरीत भाकर मस्त असते त्याची.
शिवाय भाकर असते ती "कळणा".
कुठली तरी चार पाच धान्य एकत्र करुन करतो म्हणे, प्रकार चविष्ट आहे, पण पचण्यास थोडा जड, किंचिंत उष्ण आहे कळणा.
आपापल्या जिम्मेदारीवर खावा. व्यायाम बहुत असेल तय काळातच मी हादडातो बिंदास, एरव्ही जरा जपूनच असतो.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
गनबोटे चिवडा
घरगुती चवीचे चिवडा - फरसाण वगैरे आयटम्स बनवनारे बरेच गट, संस्था आजकाल अस्तित्वात आहेत. नोकरदार स्त्रियांना त्यांची बरीच माहिती असेल.
मला त्यातील गनबोटे चिवडा आवडतात.
दिवाअळीचा असतो तसा पोह्यांचा चिवडा मिळतो, तसाच मक्याचं कणीस असतं, corn , त्याचाही चिवडा असतो, oil free प्रकारचाही एक चिवडा असतो.
हे असलं हेल्थ फूड शक्यतो मला आवडत नाही, तब्य्तीसाठी चवीत तडजोड केल्यासारखं वाटतं.
पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांच्याकडील तोच चिवडा मला प्रचंड आवडला.
तोंडाला तोबरा लावल्यासारखा हदडात असतो.
मस्त चिवडा हाणायचा. जाता येता श्रीकृष्ण डेअरीमधली लस्सी हाणायची.
वर्ष होत आलं, पण दिनचर्येचा अज्याबात कंटाळा आलेला नाही.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
'घरगुती' चवीच्या गोष्टी विकत घेऊन का खातात?
फक्त मनोबाला उद्देशून नव्हे पण त्याच्या प्रतिसादांमुळे बरेच काळ पडत आलेला एक प्रश्न.
मला हा एक प्रश्न नेहमी पडतो. 'घरगुती' चवीच्या गोष्टी विकत घेऊन का खातात?
गंमत नै मला खरच हा प्रश्न पडतो.
मला घरी "हॉटेलसारखं" जेवण बनवायचा प्रयत्न/अट्टाहास आणि बाहेरून 'घरगुती' खाणं आणायचं यांचा सोस का असावा हे कै नै समजत.
अवांतरः मी ही करतो क्वचित असा अट्टाहास नी मग मलाच माझंच हसु येतं
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सारच
घरगुती चवीचं हवं ते सारच हवं तेव्हा घरीच मिळेल असं नाही; म्ह्णून त्याचं कौतुक.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
'घरगुती' चवीच्या गोष्टी विकत
फुकट देत असतील कोणी तर मी त्याही खायला तयार आहे.
वेळ नसेल किंवा स्वयंपाकाचा कंटाळा असेल तर बाहेरचं तेलकट, मसालेदार खाण्यापेक्षा घरगुती चवीचं, comfort food विकत घेऊन खाल्लं जातं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
काल कोरेगव पार्कातील 'कॉपर
काल कोरेगव पार्कातील 'कॉपर चिमनी' ला गेलो होतो.
तेथे कबाब फेस्टिव्हल चालु आहे. बलुची कबाब नावाचा 'बलुचीस्तानाच्या विशेष फ्लेवरचा कबाब' असं लिहिलं होतं म्हणून तो कबाब मागवला. अतिशय रुचकर, व्यवस्थित शिजलेला चिकनचा एक मोठ्ठा लेगपीस आणि एक ब्रेस्टपीस आला. दहि, भरपूर मिरे, काही वेगळ्या वासाचे अर्ब्ज यांनी मॅरीनेट करून तंदूरमध्ये भाजून त्यात धुराची चव मिसळली होती. अतिशय रुचकर!
मेनकोर्सला बर्याच दिवसंनी (खरंतर वर्षांनी) रेड मीटकडे वळलो. "रोगन जोश" मागवले होते आणि पश्चात्ताप झाला नाही. अतिशय रुचकर आणि अनवट ग्रेवी, पर्फेक्ट शिजलेले मटण, सिनॅमन आणि वॅनिला(!)चा मंद कळेल ना कळेल असा फ्रॅग्नन्स, आणि अतिशय भरपूर क्वांटिटी, छान पापुद्रे सुटलेले नान वगैरे सोबत मजा आली!
तरीही मी एकूण अनुभवाबद्दल अॅवरेजच समाधानी होतो. म्हणजे खाद्यपदार्थ छान असले तरी काही 'कॅपिटल ऑफेन्स' म्हणाव्या अशा मुदलातील तृटी होत्या:
-- पाणी प्यायच्या ग्लासेसना अंड्याचा म्हणा किंवा एकूणच नॉनव्हेजचा म्हणा वास येत होता. हे अगदीच शॉकिंग नी टर्न डाऊन करणारे होते.
-- डेसर्ट्स आणि मॉकटेल्सची नाममात्र व्हरायटी होती. तरी मुलीसाठी जे चॉकलेट मूज् मागवले होते त्यालाही अंड्याचा वास येत होता. ते परत करावे लागले.
या अशा अस्थेटिकल आघाड्यांवर काळाघोडा येथील कॉपर चिमनी अधिक चांगले वाटले होते.
तरी सुद्धा त्या 'रोगन जोश' मुळे कधी तिथे जावे लागले तर नाही म्हणणार नाही.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अनवट म्हणजे?
अनवट ग्रेवी म्हणजे? असो.. अनवट या शब्दाचा जालावर होणारा वापर छापील पुस्तकांत फारसा आढळत नाही असे वाटते.
मी अनवट हा शब्द अनोखी किंवा
मी अनवट हा शब्द अनोखी किंवा वेगळ्याच मार्गाने जाणारी या अर्थी वापरल आहे. अर्थात अशाच अर्थाने वाचनात आला होता.
तुम्ही म्हणाल्यावर शब्द कोश बघितल्यावर अनवट म्हणजे पायाच्या अंगठ्यात घालायच्या चांदीच्या जोडव्या असा अर्थ दिसला. अनेक आभार. हा शब्द यापुढे वापरताना काळजी घ्यायला हवी ही खुणगाठ बांधुन ठेवतो.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मी अनवट हा शब्द अनोखी किंवा
+१. मी अप्रचलित अशा अर्थाने वापरलेला पण पाहिला आहे.
मुलीसाठी जे चॉकलेट मूज्
चॉकलेट मूजच्या पाकृ.त कच्चे अंडे (पांढर्या भागाचा फेस) वापरतात, निदान मी जी पाकृ. वापरते त्यात वापरतात, अर्थात डार्क चॉकलेटच्या तीव्र स्वादामुळे आणि व्हनिला, कॉफी वापरली असल्यास कॉफीच्या वगैरे वासामुळे अंड्याचा वास पूर्णपणे लपतो. डार्क ऐवजी मिल्क चॉकलेट वापरले किंवा जास्त प्रमाणात अंडे वापरले तर मात्र तो वास त्रासदायक होऊ शकतो.
चॉकलेट मूजची, ज्युलिया चाईल्डची मस्त रेसिपी इथे आहे.
लॉ कॉलेज रोड आयडीया शोरुमपाशी
लॉ कॉलेज रोड आयडीया शोरुमपाशी ९९रुपयात अनलिमीटेड ब्रेकफास्ट मिळतो तो कोणी ट्राय केलाय का? एकच पदार्थ असतो की व्हरायटी असते?
'कृष्णा डायनिंग'च्या इथला
'कृष्णा डायनिंग'च्या इथला म्हणत असशील तर हो. चांगला असतो. साधारण बर्याच हॉटेलांमध्ये जो बफे ब्रेकफास्ट असतो त्यासारखा असतो.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
त्यांना अॅमिगो म्हणायचे
त्यांना अॅमिगो म्हणायचे असावे.
ओके धन्यवाद कृष्णा डायनिँग
ओके धन्यवाद
कृष्णा डायनिँग हॉल माहित नाही. मी या ब्रेकफास्ट जॉइंटची प्रोमो अॅड फेसबुकवर पाहिलेली. २६जानेवारीला ६५रुपयात होता :-). मला त्या जागेच नावपण आठवत नाहीय. पण पत्ता आयडीया शोरुम शेजारी असाच होता.
विष्णू जी की रसोइ
विष्णू जी की रसोइ ह्या ठिकाणी मागील वीकांतास गेलो मित्रासमवेत.
तो फक्त तीनच दिवस होता इथे. त्याचीही आवड पक्की माझ्याशीच जुळणारी असल्याने एक दिवस बादशाही येथील साधीसुधी पण छान थाली, एक दिवस बापट उपहार गृह येथील पिठलं , थालीपीठ वगैरे आयटम्स आणी तिसर्या दिवशी विष्णू जी की रसोइ इथे गेलो.
मागे कट्ट्याच्या धाग्यात बोलल्याप्रमाणे ठिकाण नळ स्टॉपला असल्यानं ऐन शहरी भागात आहे. पोचणं सोपं आहे.
दीड एक वर्षानंतर जाणं होत होतं. तीनशे रुपये दरडोइ खर्च होता. (हा "साउथ इंडिज"च्या जवळजवळ निम्मा आहे.
दुर्वांकुर,सुकांता,थाटबाट ह्याहून किंचित अधिक आहे.
चोखी धानी , अॅमानोरा मधील व्हिलेज ह्यापेक्षा जरा कमी आहे.
)
तर ही थाली म्हणजे "शाही थाली" असते ना थाट्-बाट, दुर्वांकुर, सुकांता, मयुर व्हेज वगैरे; थोडीफार त्याच धर्तीवर. पण एक मोठा फरक आहे.
"विष्णू जी की रसोइ " हे विस्तीर्ण लॉनवर , हिरवळीवर पसरलं आहे.
तिथं लॉनच्या काही भागात खुर्च्या टेब्लं टाकली आहेत. ज्यांना हवं ते त्यावर बसून आरामात खाउ शकतात.
आता लॉन अ नाहिये, नुसतच छोटसं मैदान, पटांगण आहे. त्यावर सभेला अंतह्रतात तसं पॉलीस्टर/ताडपत्री जाजम अंथरलं आहे.
ज्यांना फिरत चुरडणं आवडतं ते चालत बोलत बुफे स्टाइल खाउ शकतात.
बुफेमध्ये स्टार्टर्स, सूप वगैरे होतेच. सूप लाइव्ह टमात्याचं बनवलं असल्याकारणानं तयत टामाट्याचं ताजे पार चुरलेले, ग्राइंड केलेले तुकडे होते.
(हे असच केलं गेलं असावं, हा माझा अंदाज. कारण इतरत्र येण्यार्या सूपमधला कृत्रिम स्मूथपणा त्यात नव्हता.
ह्यांनी तसेच केले आहे की नाही, ह्याची कल्पना नाही.)
concentrate, भुकटी वापरुन केचपस्टाइल सूप बनवायची पद्धत सर्वत्र स्वीकारली गेली असताना, हा ताजेपणा आवडला.
पण सूपमध्ये अशी अल्लाद अल्लाद का असेना टमाट्याची साल येणं कैकांना आवडतही नसेल. तयंना हा टर्न ऑफ ठरु शकतो.
सोबत भजी तळली जात होती. ती पाहली आणि फारसे अप्रूप नसल्याने सोडून दिली.
.
.
पंजाबी आयटम :- जिरा राइस , दाल फ्राय , पनीर ची कोणतीतरी सब्जी , रोटी इत्यादी होतं.
पंअजाबी पदार्थ ही ह्यांची खासियत नाही. त्यामुळे त्याला हातही न लावता मराठी पदार्थांकडे वळलो.
पंजाएवढी इलुशी गरम भाकर (ही समोर बनवून दिली जात होती) व फुलकेही (हे ही दोन मावशा समोर बनवून देत होत्या) उचललं.
सोबतीला बेसन/झुणका* व एक पातळ भाजी होती. बेसन/झुणका म्हणजे आपलयाल वाटते तसे पिठले नव्हे.
पिठले पाणी/दही/ताक घालून करतात. झुणका म्हणजे नुसते बेसन तेलासोबत परतायचे, व त्यावर चटणी/फोडणी टाकून खायचे ; no पाणी at all.
ते तसे खाल्लेही पण कोरडे कोरडे वाटल्याने अधिक घेतले नाही.
कढी आणि ताकही होते. ताक इतरत्रही बरे मिळत असल्याने मला त्याचे अप्रूप नव्हते.
कढी भरपूर ओरपली. वाट्यामागून वाट्या संपवल्या.
इवल्य इवल्या आकाराचे, तळव्याएवढे थालीपीठ होते.
समोर दोन मावशा बनवून देत होत्या. थालीपीटहंचाही सपाटा लावला.
मस्त चव होती.( बापट उपहार ग्रुह, मथुरा, सोहम, गिरिजा अशा ठिकाणच्या थालिपीटहंपेक्षा ही थालिपीठे आवडली चवीला.)
हवे त्याला भाकरी व फुल्क्यावर तूप घेता येत होते. मी तूप घेतले नाही.
ओळिने चटण्या मांडून ठेवल्या होत्या. शेंगदाणा, जवस , मिरची ठेचा, फोडणी वगैरे होते.
मस्त आंबा-लिंबू एकत्रित लोणचे होते. जवस चटणी, व हे लोनचे थोडे घेतले.
बाजूलाच गुळमट चवीचे काळपट चॉ़कलेटी रंगाचे पंचामृत होते.
ते प्रचंड खाल्ले.(निदान वाटीभर.)
शेवटी डेझर्ट म्हणून मुगाचा हलवा होता. तो घेतला नाही.
उत्तर भारतीय पनीरच्या भाज्या वगैरे त्यांना तितक्याशा जमल्या नव्हत्या. मराठी आयटम्स जमले होते.
पण वातावरण एकूणच गप्पा टप्पा करण्यासाठी छान वाटले.
जातान बैलगाडीत** पान बनवण्याच्या वस्तू होत्या. स्वतः पान बनवून घ्यायचे होते.
ही बैलगाडी म्हणजे बैलगाडीचा सांगाडा होता. प्रत्यक्ष बैल तिथे नव्हते.
मराठी घरात सणाला "विडा" लावून खातात ना घरी; तशीच चव होती.
विड्याची पने, चुना, कात आणि एका भुरुन घ्यायची डबीत कसलातरी पानावर भुरभुरून टाकायचा मसाला होता.
(बहुदा पावडर सुपारी होती,अंधारात समजले नाही.) बडीशेपही होती.
बस्स. इतकेच. पानवर टाकयचा गुलकंद वगैरे पानच्या टपरीवर असतात, तित्कए पदार्थ नाहित.
तरीही पान चांगले लागत ह ओते चवील.
तीन चार पाने खाल्ली.
अतिउत्साहात चुकून गर्दिच्या धक्क्यात आपण किती चुना लावत आहोत ह्याचे भान राहिले नाही.
थोडा जास्त चुना लावला गेला. झालं.
जीभ बेक्कार भाजली. डाव्या बाजूला टरारून फोड आला. (हे मागाहून समजले.)
पहिले दोन सेकंद काय होतय काहिच कळलं नाही. आधी जिभेला पानी सुटल्यासारखं वाटलं. मग थोड्यावेळानं खूप पाणी प्यावसं वाटू लागलं.
पुढील एक दिवस पाणी प्यायला गेलो तरी कचकच होत होती जिभेमध्ये.हावरटपणासाठी उत्तम धडा मिळाला होता.
इतर हाटेलांत तुम्ही बसलात की आसपास वेटर घोंघावू लागतील, काय हवे नको ते वाढतील. तुम्हाला बसून रहावे लागेल.
सगळे लक्ष खाण्याकडेच राहील. गप्पा मारण्याच्या हिशेबाने हा निगेटिव्ह पॉइण्ट आहे.
थोडक्यात, सुकांता-थाट बाट ही बैठी ठिकाणे व चोखी धानीचा शाही थाट असलेलं ग्रामीण राजस्थानी शाही बाज ह्यांच्या बरोबर मधलं हे ठिकाण आहे.
इथे चालत-बोलत खाता पिता येइल. ज्यांना बसून निवांत गप्पा मारायच्या आहेत, ते निवांत गप्पाही मारु शकतील.
मोकळ्या आभाळातला गोरज मुहूर्तावर लागलेल्या लग्नाच्या बुफेचा इफेक्ट इथे होता.
आता नवीन ठिअकणे हवी आहेत.
पुण्याबहेरची असली तरी चालतील.
किंवा काहीतरी नवीन.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
बाजूलाच गुळमट चवीचे काळपट
काळपट चॉकलेटी रंगाचे पंचामृत कशाचे बनलेले असते हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. मी आजपर्यंत पांढरट दिसणारे पंचामृतच प्यायलो आहे.
हो
मीही तेच खाल्ले होते.
पदार्थ नक्की कसा बनला होता ठाउक नाही.
चाट आय्टम्स मध्ये गुळमट चवीचे पदार्थ चिंचेचे असतात, तसा एक पदार्थ बनवून त्यास पंचामृत म्हटले असावे.(तिथे तसा बोर्ड होता.)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
खात्री झाली
खात्री झाली. पंचामृतच आहे ते.
वर्हाडी मित्राने नको नको म्हणत असताना नेमके तिथेच नेले.
ह्याही वेळी पंचामृत होतेच.
त्या पदार्थाला तो पंचामृत म्हणताच मी गचांडी धरुन त्याला पंचामृत पांढरे(दह्या-दुधाचे असते) असे काळपट चॉकलेटी नाही असे बजावले. त्याने प्रतिगचांडी धरत त्याला पंचामृतच म्हणायला सुरुवात केली.
हाणामारी सोडवायला आलेल्या इतर जाणकार वृहाडी काका काकूंकडून मिळालेली माहिती अशी :-
वर्हाड/विदर्भात पंचामृत हा चिंचेचा गुळमट पदार्थ असतो; जो सध्या ह्या विष्णू जी की रसोइ मध्ये सर्व्ह केला जात आहे.
उर्वरित आमच्यासरखे लोक ज्याला पंचामृत म्हणतात त्याला वर्हाडी ब्राम्हणी कुटुंबे "तीर्थ" म्हणतात; सणासुदीलाच खातात; अल्प, नावापुरते, शास्त्रापुरते खातात.
विष्णू जी की रसोइअचे माल्क कुटुंबीय नागपुरातील प्रस्थापित नाव आहे हे ठाउक असल्याने त्या पदार्थाच्या नावासमोर "पंचामृत" ही पाटी कशी ह्याचा उलगडा झाला. अधिक मारामारी न करता मी व मित्र आपापल्या घरी परतलो.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
?
मी वर्हाडी नाही.
"आमच्यात" त्या चिंचेच्या गुळमट काळपट चॉकलेटी पदार्थालाच नेहमी 'पंचामृत' म्हटले गेलेले ऐकलेले आहे.
हो.. आमच्यातही. खोबरं, दाणकूट
हो.. आमच्यातही.
खोबरं, दाणकूट इत्यादिचा यात सढळ वापर असायचा. आजीसोबत हा पदार्थही गेला.
(दही, तूप, मध आदि पदार्थ मिसळून पूजाप्रसंगी नेवैद्याचे पंचामृत करतात ते वेगळं.. )
आता याआधी एकदा इथे दिलेल्या प्रतिसादातल्या मजकुराविषयी पुन्हा अंडरलाईन.
आता याउपर पुन्हा एकदा स्पष्ट करणे आवश्यक आहे की त्या विष्णुजीकी रसोईतल्या पंचांमृताचे नाव जरी चुकले नसले आणि रंग जरी काहीसा मिळताजुळता असला तरी चव आणि घटकपदार्थ हे मी स्वतःच्या आणि अन्य विविध घरांत खाल्लेल्या पंचामृतापेक्षा पूर्ण वेगळं आणि उणं होतं.
अ टेल ऑफ टू पंचामृत्स
अगदी! (आणि, इफ़ आय रिमेंबर रैट्ट, किंचित्जळ्कट खोबर्याचा स्वाद बहार आणायचा.)
(१) दूध, दही, तूप, मध आणि (पाचवा पदार्थ विसरलो - बहुधा लोणी?) हे 'पंचामृतां'त गणले जातात, आणि
(२) या 'पंचामृता'चा पूजाप्रसंगी नैवेद्य होतो,
याची कल्पना होती.
मात्र, या पदार्थांचे पंचामृत "करतात" ही माहिती नवीन होती.
"आमच्यात" पूजाप्रसंगी हे पदार्थ शेपरेटली (बोले तो, एकमेकांत न मिसळता) देवापुढे ('पंचामृत' म्हणून) ठेवलेले पाहिल्याचे आठवते. (चूभूद्याघ्या.)
'विष्णुजीकी रसोई' नामक ठिकाणी कधी खाल्लेले नसल्याकारणाने - किंबहुना, 'विष्णुजीकी रसोई' नामक काही स्थानविशेषाच्या अस्तित्वाबद्दल प्रथमच कळल्याने - याबद्दल कल्पना नाही. सबब, पास.
(आणि, इफ़ आय रिमेंबर रैट्ट,
आत्यंतिक तीव्र सहमती.. मुख लाळावले.
बाकी ते विष्णुजी की रसोई इ इ इतरत्र अॅप्लिकेबल होते.. जाउंदे.
साखर
लोणी नै, साखर!
यस्स.
वॉव
आता याउपर पुन्हा एकदा स्पष्ट करणे आवश्यक आहे की त्या विष्णुजीकी रसोईतल्या पंचांमृताचे नाव जरी चुकले नसले आणि रंग जरी काहीसा मिळताजुळता असला तरी चव आणि घटकपदार्थ हे मी स्वतःच्या आणि अन्य विविध घरांत खाल्लेल्या पंचामृतापेक्षा पूर्ण वेगळं आणि उणं होतं.
this is a good news then.
सध्या तुमच्या किंवा अजून एखाद्या घरात हा पदार्थ बनत असेल तर तुमच्या किंवा इतरत्र जिथे हा पदार्थ बनतो त्या
घरात मैत्रीपूर्ण शिरकाव करुन हा पदार्थ चाखायची एखादी युक्ती सांगा बुवा.
मी खातोय त्याहूनही कैक पट चांगलं असं काही अस्तित्वात असणं हे मी शुभवर्तमान समजतो.
(मोगॅम्बो नाही का असं काही म्हणत :-
(प्रश्नार्थक किंवा कुतूहलजन्य प्रश्न म्हणून) mr india? (कोण मिस्टर इंडिया ह्या अर्थाने)
mr indiaaaaaaa? (ह्यातला इंडिया मधला शेवटचा स्वर अगदि लांबवलेला. चेहर्यावर काहीतरी गवसल्याचा आनंद दिसू लागतो.)
(मग घाबरुन जाण्याऐवजी खुश होत)
अगर ऐसा कोइ मिस्टार इंडिया है तो अच्छी बात है |
आज नही तो कल हमे वो गायब होने का फॉर्मूला मिल ही जायेगा |
)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
हे
हे आधी नाही का सांगायचत इथं वरती धुळवड सुरु होती पंचाम्रुताच्या नावानं तेव्हा.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
???
हे बरे आहे. म्हणजे, धुळवड करण्याची हौस तुम्हाला. आम्ही मध्ये काय म्हणून पडायचे?
शिवाय, आपल्या धूलिकावंदनानंदात आम्ही व्यत्यय का बरे आणायचा?
विष्णूजी की रसोईतील
विष्णूजी की रसोईतील थालिपिठाबाबत एकदम सहमत.
बाकीचे मराठमोळे म्हणून दिले जाणारे पदार्थ हे अजिबात मराठमोळे नसतात आणि मूळ मराठी चवीशी प्रामाणिक तर अजिबात नसतात हे मत नोंदवतो.
पाटवड्यांची आमटी, पंचामृत , झुणका इत्यादि पदार्थ आयदर कच्चे, उण्या चवीचे किंवा त्या त्या पदार्थांच्या ओरिजिनल व्हर्शनशी पूर्ण फटकून असलेले होते.
उत्तम गरमागरम थालिपीठे / फुलके-डाळ / बाजरीच्या छोट्या भाकर्या चापण्यासाठी ठिकाण उत्तम आहे, पण मग फक्त तेवढ्यासाठी एंट्री फी महाग पडते.
मागच्या आठवड्यात गोव्यामध्ये
मागच्या आठवड्यात गोव्यामध्ये होते.
पहिले एक दोन दिवस ज्या हॉटेलमध्ये राहात होतो तिथे खाल्ले पण मग जरा अस्सल गोवन चवीचे खावे म्हणून बाहेर सुद्धा गेलो. तेव्हा हे अफलातून ठिकाण सापडले.
कलंगुट मध्ये किनार्याच्या सर्वात जवळ असलेल्या चौकातून दोन बीच वर जाणारे रस्ते आहेत. एक कलंगुट बीचवर तर दुसरा बागा बीचकडे! बागा बीचकडे जाणार्या रस्त्यावर वळले की सुमारे ५० पावले चालत गेले की डाव्या हाताला Infantaria असे जरा चिवित्र नाव असलेले हॉटेल लागते.
मुळात फक्त एक बेकरी असलेल्या ठिकाणी ड्रिन्क्स आणि बाकी जेवण पण सर्व केले जाते. अॅम्बियन्स विशेष नाही आणि किंमती पण बाकीच्या जागांच्या मानाने खूपच कमी आहेत पण त्यामुळे अर्थात तुमची ऑर्डर घेऊन आणि तुम्हाला अन्न देऊन तुमच्यावर उपकार केल्याचा आर्विभाव करणारे, बर्याच वेळेला तुमच्याकडे दुर्लक्ष करणारे वेटर्स, संथ सर्विस असे पॅकेज डिल मिळते. पण विश्वास ठेवा पदार्थांच्या चवी हे सगळं सहन करावं या तोडीच्या आहेत.
तिथे ड्रिन्क्सवर बर्याच ऑफर्स होत्या - ३०० च्या वर खाद्यपदार्थांचे बील झाल्यास १०० रूपयात ५ बीअर वगैरे. पण मी तिकडे मुलीला घेऊन गेल्यामुळे आणि नवरा न पिणारा वगैरे "गुणी" वर्गात मोडत असल्याने ड्रिन्क्स ऑफर्सचा मला काही उपयोग नव्हता
जे एक दोन केकचे प्रकार आम्ही मागवले ते मी आजपर्यंत खाल्लेल्या सर्वात चविष्ट केकपैकी होते.
मग जेवण मागवले, माझ्यासाठी फिश फिलेट इन बेचामेल(?) सॉस (किंमत - ३३०/-)
आणि नवर्यासाठी व्हेज पिझ्झा (किंमत - २५०/-)मागवला.
माझी फिश डिश अप्रतिम होती. १० मिनिटात त्याचा चट्टामट्टा करून मी नवर्याच्या पिझ्झाकडे वळले. तोही अतिशय छान होता. कुरकुरीत आणि हलका बेस, भरपूर चीझ, वेगवेगळ्या भरपूर भाज्या आणि "भारतीयकरण न केलेला" चविष्ट पिझ्झा सॉस!
जेवण संपवायला बेबेंका (जरासे गरम केलेले) विथ आइस्क्रिम (किंमत - ७०/-) मागवले.
आहाहा... ते सिझलिंग ब्राउनी विथ आइस्क्रिम वगैरे झक मारतात या प्रकारापुढे!
मला हे प्रकरण इतके आवडले की परत दुसर्या दिवशी आम्ही तिथेच गेलो.
तेव्हा जेवायला मश्रूम्स, भाज्या,ऑलिव्ह तेलात मुरवलेल्या फिश फिलेटस (बाकी भात आणि भाज्या वगैरे होतेच बरोबर) मागवले होते. ते ही आधीच्या प्रकाराइतकेच चविष्ट होते. नवर्याने व्हेज सागुती मागवली होती, चांगली होती पण तिखट होती.
बेबेंका हे प्रकरण मला इतके आवडले की पुण्यात परत येताना अर्धा किलो पॅक करून घेऊन आलेय, पण ते दोन तीन दिवसात संपेल आणि इकडे पुण्यात हे काही मिळत नाही याचे मला आत्ताच वाईट वाटायला लागलेय.
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
व्हेज सागुती?
आरारारा
हा प्रकार बहुधा अल्कोहोल-विरहीत बियरबरोबर खावा आणि नंतर निकोटीन-विरहीत सिगरेट प्यावी!!
असो. गोव्यात गेल्यावर मासे तर हादडवावेतच. शिवाय, फारशी इन्हिबिशन्स नसतील तर, नेहेमीच्या चिकन-मटणाव्यतिरीक्त इतर* सामिष पदार्थांचाही आस्वाद घ्यावा!
* तुम्ही वर्णन केलेल्या जागेच्या जवळपासच (कदाचित अगदी तिथेचही असेल) सूकरमांसापासून बनवलेले सोरपोतेल खाल्ले होते. निव्वळ अप्रतिम!
पुण्यात परत येताना अर्धा किलो
याला मी आमत्रंण समजायला तयार आहे! कधी येऊ?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
तीन बेकर्या
Aaron's ही बेकरी माझ्या रोजच्या रस्त्यावर लागते आणि तिथे जायचा विचार गेली अनेक वर्षे मनात असूनही मुद्दाम बसमधून उतरून तिथे जाणं होत नव्हतं. गेल्या वर्षी मँगोज इथे गेले होतो, तेव्हा नंतर मुद्दाम Aaron'sमध्ये गेलो आणि तिथल्या पदार्थांची नावे आणि त्यांच्या किंमती पाहून हरखून गेलो. तिथे नेहमीच्या पेस्ट्रींच्या खेरीज सिनमन रोल्स, अॅपल पाय, चिकन कीश वगैरे बर्याच गोष्टी मिळतात. इतर महागड्या बेकर्यांइतकाच चांगल्या दर्जाचे असलेले हे पदार्थ इथे साधारण १५ ते ४० रु.ना मिळतात. इथल्या पेस्ट्रीज मात्र इतर बेकर्यांकडच्याच दराने मिळतात. मी आतापर्यंत दोनदा तिथे गेले आहे. दोन्ही वेळी चांगला अनुभव.
चांगल्या पण स्वस्त पेस्ट्रीज खायच्या असतील, तर त्याचीही सोय त्याच भागात होऊ शकते. Aaron'sच्याच जवळ असलेल्या सुंदर लेनमध्ये मालवणी कालवण नावाचं एक रेस्तरॉ आहे. त्याच्याच आवारात एक निनावी (मला कुठे नाव लिहिलेले दिसले नाही आणि पदार्थ पाहून डोळे दिपल्याने नाव विचारायचे लक्षात राहिलेही नाही) बेकरी आहे. या भागात उगाच पायी फिरत असताना मला हिचा शोध लागला. तिथे चॉकलेट आणि लेमन टार्ट्स (१५ रु.), चॉकलेट मॅडलिन (२५ रु.) डे अँड नाईट कुकीज (७ रु.) अशा अनेक गोष्टी मिळतात. इथल्याही पदार्थांचा दर्जा चांगलाच आहे.
गेल्या आठवड्यात आम्ही अशाच कालिना मार्केटमध्ये (सांताक्रूज पूर्व) भटकत होतो, तेव्हा 'फ्रॉम हिल्डा'ज किचन' या छोटाशा बेकरीचा शोध लागला. इथेही चिकनचे पदार्थ भलतेच स्वस्त होतो. आम्ही दोघींनी मिळून ९५ रु.त तीन पदार्थ खाल्ले- दोन मीटबॉल्स (प्रत्येकी १० रु.), चिकन कोरियन रोल (२५ रु.) आणि दोन नून खमेई (प्रत्येकी २५ रु.- चॉकलेट घातलेली एक पर्शियन पाककृती). इथल्याही पदार्थांचा दर्जा चांगला होता. शिवाय इथे दर वीकांताला काहीतरी खास बनवले जाते, आणि अधूनमधून नवनव्या गोष्टी प्रयोगादाखल ठेवलेल्या असतात. बेकरीच्या मालकाने या विकांताला चीजकेक बनवण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या शुक्रवारी पुन्हा तिथे एक खेप होईलच.
राधिका
दर्जा आणि किंमत.
हा प्रतिसाद तुमच्या वरच्या बेकर्यांशी किंवा त्या प्रतिसादाशी प्रत्यक्ष संबंधित नाही कारण मला त्यातल्या कोणत्याच बेकर्यांचा प्रत्यक्ष अनुभव नाही.
पण पेस्ट्रीच्या किंमती आणि त्याचा दर्जा हे एक रोचक समीकरण आहे असे मला वाटते. विशेषतः ज्यात पफ किंवा शॉर्ट्क्रस्त पेस्ट्री वापरलेली असते असे पदार्थ विकत घेताना मी जास्त जागरूक असते, पूर्णतः लोणी वापरून केलेली पेस्ट्री आणि शॉर्ट्निंग वापरून केलेली पेस्ट्री दोन्ही सारख्याच दिसतात आणि चवीलाही साधारण सारख्याच लागू शकतात पण त्यात वापरलेल्या जिन्नसांच्या प्रती फार वेगळ्या दर्जाच्या असतात. त्यामुळे पेस्ट्रीची किंमत फार कमी असेल तर मी जास्त साशंक असते. अर्थात जास्त किंमत देऊनही चांगल्या दर्जाचे जिन्नस मिळतील याचीही खात्री नसतेच आणि पूर्ण लोणी वापरून केलेल्या पेस्ट्रीज फारच मोजक्या ठिकाणी मिळतात.
शॉर्टनिंग म्हणजे नक्की काय?
शॉर्टनिंग म्हणजे नक्की काय? लोणी आणि शॉर्टनिंगची प्रत निराळी म्हणजे काय, आरोग्याच्या दृष्टीने?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
शॉर्टनिंगचा मूळ आणि व्यावहारीक अर्थ
शॉर्टनिंग हे पेस्ट्री खुसखुशीत करण्यासाठी वापरतात तो घटक. त्या न्यायाने मोहन म्हणून घातलेले तेलही किंवा लोणीही शॉर्टनिंगच असते पण व्यवहारात शॉर्टनिंग ही संज्ञा वनस्पती (हायड्रोजनेटेड) तूपासाठी वापरले जाते. परदेशात साधारणपणे 'क्रिस्को' या ब्रॅंडचे शॉर्टनिंग वापरतात, भारतात डाल्डा वगैरे इतरही असावेत. हे हायड्रोजनेटेड स्निग्ध पदार्थ स्वस्त असले तरी आरोग्यासाठी चांगले नसल्याने कमी दर्जाचे समजले जाते. विकीच्या पानावर खाली एक तक्ता दिला आहे तो रोचक आहे, त्यात वेगवेगळ्या स्निग्ध पदार्थांतले पॉली आणि मोनोसॅच्यूरेटेड फॅटचे प्रमाण दिले आहे.
धन्यवाद
या माहितीसाठी धन्यवाद. हा धोका माहीत नव्हता. दोन प्रश्न-
१. शॉर्टनिंग वापरले आहे का हे स्वतःहून ओळखण्याची काही युक्ती आहे का?
२. शॉर्टनिंग वापरून केलेले पदार्थ हे २-३ महिन्यांतून एकदा खाल्ले तरी ते आरोग्यास फार हानिकारक ठरतील का?
राधिका
राधिका
शॉर्ट्निंग वापरलेल्या
शॉर्ट्निंग वापरलेल्या पदार्थाची चव वेगळी लागते. तो जास्त खुसखुशीत करण्यासाठी ते भरपूर घातले असेल तर खाताना जिभेला एक प्रकारचा पातळ राप बसल्यासारखे वाटते. तुपात, तेलात आणि डालड्यात तळलेल्या पुर्या जिभेवर वेगळ्या लागतात, तसे. शंकरपाळे, लाडू, नानकटाई अशा पदार्थांमध्ये भरपूर मोहन लागते. एकदा घरी करताना तूप आणि वनस्पती तूप वापरून करून बघितले तर हा जिभेला जाणवणारा राप लगेच लक्षात येतो.
पदार्थ खूप काळ टिकणारा असेल तर नक्कीच शॉर्ट्निंग/ वनस्पती तूप वापरलेले असते. पूर्ण लोण्यातला पदार्थ कमी टिकतो त्यामुळे भरपूर खप नसलेल्या ठिकाणी लोणी वापरत नाहीत.
मी एका बेकरीत केक सुशोभित करण्याचे काम केले आहे. तिथे, ( आणि बर्याच ठिकाणी) 'बटर' च्या पदार्थांतही लोणी व शॉर्ट्निंगचे मिश्रण वापरले जाते. तेव्हा बाहेरचे बेकरीचे पदार्थ विकत घेताना शॉर्ट्निंग/ हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑइल/ वनस्पती तूप नसलेले, शुद्ध तूप/ लोण्यातले पदार्थ मिळणे जरा कठीणच आहे.
काही भरपूर खपाच्या दर्जेदार बेकर्या क्रॉसाँ सारख्या पापुद्रेदार पदार्थात जास्त तलमपणा, हलकेपणा येण्यासाठी लोण्याऐवजी लार्ड वापरतात. लार्डचा पदार्थही जास्त टिकतो. पण वनस्पती तूप/ शॉर्टनिंग सारखा तोंडाला विशिष्ट राप बसत नाही.
पण महिन्यातून क्वचित कधी खाताना शॉर्टनिंग का लोणी अशी काळजी करण्याची गरज नाही. खुशाल खा
:-)
सविस्तर उत्तराबद्दल धन्यवाद.
राधिका
आयला असंय होय! आता लक्षात आलं
आयला असंय होय! आता लक्षात आलं असा अंमळ राप का बसत होता ते.
धन्यवाद.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
...
असेच काही नाही.
लार्ड१ नामक शॉर्टनिंगचा आद्यसामान्यप्रचलित प्रकार विसरलात वाटते.
अवांतर:
शॉर्टनिंगबद्दल विकीदुव्यातून:
"Shortening is any fat that is solid at room temperature and used to make crumbly pastry. Shortening is used in pastries that should not be elastic, such as cake.[1] Although butter is solid at room temperature and is frequently used in making pastry, the term "shortening" seldom refers to butter, but is more closely related to margarine."
"Originally, shortening was synonymous with lard, and with the invention of margarine by French chemist Hippolyte Mège-Mouriès in 1869, margarine also came to be included in the term. Since the invention of hydrogenated vegetable oil in the early 20th century, "shortening" has come almost exclusively to mean hydrogenated vegetable oil." वगैरे वगैरे.
मार्जरीनबद्दल विकीदुव्यातून:
"Margarine... is an imitation butter spread used for spreading, baking, and cooking. It was originally created as a substitute for butter from beef tallow and skimmed milk in 1869 in France by Hippolyte Mège-Mouriès."
"Modern margarine is made mainly of refined vegetable oil and water. While butter is made from the butterfat of milk, modern margarine is made from plant oils and may also contain milk." वगैरे वगैरे.
अतिअवांतर:
मेक्सिकन उपाहारगृहांतून (मुख्य पदार्थांसोबत बाजूस वाढून) सर्रास मिळणारा 'रीफ्राइड बीन्स' नामक (वरकरणी शाकाहारी वाटणारा) लगदा हा अनेकदा (परंतु नेहमी नव्हे२) परंपरेस अनुसरून लार्डमध्ये शिजविलेला असतो, असे कळते.
बाकी चालू द्या.
---------------------------------------------------------------------------------------------------
१ डुकराच्या स्पेअरपार्ट्समधून जमवलेली प्रक्रियीकृत चरबी.१अ
१अ वस्तुतः, 'स्पेअरपार्ट्स'पेक्षा 'सुटे भाग' अशी शब्दयोजना करणे येथे अधिक सयुक्तिक ठरावे. एखादे जितेजागते डुक्कर नादुरुस्त होऊन त्याचा एखादा भाग निकामी झाल्यास त्या (निकामी झालेल्या भागाच्या) ठिकाणी असा एखादा सुटा भाग बसवून प्रस्तुत (मोडलेले) डुक्कर दुरुस्त करता येत नाही; सबब 'स्पेअरपार्ट्स' या शब्दाचा प्रयोग येथे खरे तर समर्पक ठरू नये; मात्र, 'स्पेअरपार्ट्स' हा शब्दप्रयोग आधुनिक मराठीत बहुतकरून 'सुटे भाग' अशाच अर्थी वापरला जातो, ही वस्तुस्थितिदर्शक बाब या निमित्ताने येथे अधोरेखित करू इच्छितो. आभारी आहे.
२ शुद्ध शाकाहारी घटकांपासून बनवलेले रीफ्राइड बीन्स उपाहारगृहांतून मिळणे क्वचित्प्रसंगी अशक्य नसावे.
शॉर्टनिंग
पूर्णतः सहमत. खारी, पफ, पॅटिस वगैरे स्वस्तात विकणारं ठिकाण भारतात पाहिलं की माझ्या मनात हीच शंका येते.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
सहमत. पण (फार फार तर)
सहमत.
पण (फार फार तर) पंचताराकित / तत्सम बेकर्या सोडून आणखी कुठल्या बेकरीत शॉर्टनिंग/ वनस्पती तूप न वापरता खारी बनवतात असे वाटत नाही. निदान चांगल्या बेकरीत शॉर्ट्निंग तरी चांगल्या तेलाचे, भेसळ नसलेले वापरत असावेत. पंचतारांकित हॉतेलांतही असे कितीतरी पदार्थ बाहेरून, पण चांगल्या ठिकाणाहून घेतले जातात.
अधिकृत माहिती
आजकाल काही ठिकाणी पॅक केलेली खारी वगैरे मिळतात. घटक पदार्थ आणि त्यांचं पोषणमूल्य सरकारी नियमानुसार पाकिटावर रीतसर लिहिलेलं असतं. त्यात ट्रान्स फॅट, हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑईल वगैरे आहे का ते दिलं जातं. ते खरं असतं का ते माहीत नाही; घशाला तो रापट अनुभव मात्र येत नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मुंबई, सँठॅक्र्यौज... लंकेत
मुंबई, सँठॅक्र्यौज... लंकेत सोन्याच्या विटा.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
!!!! स्लर्प स्लर्प !!!! नाही
!!!! स्लर्प स्लर्प !!!!
नाही गं असं नसतं! असं मेघनासारखं म्हणावंसं वाट्टंय! लंकेत सँठख्र्युज हेच खरं
/span>
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आयला, मी कधी म्हंटलं असं?
आयला, मी कधी म्हंटलं असं? :~ :-S
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
भाजलेले रेशीमकिडे खाल्ले. चव
भाजलेले रेशीमकिडे खाल्ले. चव चांगली वाटली (किंचित तळलेल्या 'एदामामे' सारखी वाटली). साम्बाल नावाची चटणी लावून तळलेले छोटे-छोटे कुरकुरीत खेकडे (गोड्या पाण्यातले) खाल्ले. उत्कृष्ट वाटले.
कुठे?
धन्यवाद.
कुठे मिळाले? भाव काय पडतो साधारणपणे? (पुढल्या वेळेस जमेल तेव्हा प्रयोग करून पाहायला हवा. आजवर गायींपासून ते गोगलगायींपर्यंत मिळेल ते, वाटेल ते खात आलो, पण तेवढे एक खायचे राहून गेले आयुष्यात!)
पण... पण... 'एदामामे' हा बियांचा / शेंगांचा प्रकार असतो ना? किडे चवीला बियांसारखे?
माझ्या व्हिएतनामी सहकार्याने
माझ्या व्हिएतनामी सहकार्याने आणले होते त्यामुळे किंमत काय ते कळले नाही.
होय. एदामामे म्हणजे सोयाबीनच्या शेंगा असतात असे वाटते. त्यात आणि या किड्यांमध्येही भरपूर प्रोटीन असते त्यामुळे चव सारखी वाटत असावी. टेक्श्चर मात्र दोन्हीचे पूर्ण वेगळे आहे. किडे भुसभुशीत असतात.
आयला!
किड्यांचा जातो जीव अन् खाणारा म्हणतय भुसभुशीत असतेत.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
नागपुरी जाळ
काल नागपुरात आनंदा म्हणून हॉटेल आहे, तिथे जेवले. ( एकदिवशी प्रवासात भल्या पहाटे उठून जावे लागते, रात्रीही उशिरा पोचतो, तब्येतीची वाट लागते, म्हणून मी साधे वरण भात भाजी पोळी (बट नॉट थाली) घेतले). भयंकर तिखट जेवण होते. हा प्रकार मला पुण्यातल्या प्रतिष्ठित हॉटेलात तिखटजाळ जेवण असावे असा वाटला. नागपुरकडे इतके तिखट जेवण असते का? तरीही मला त्याने इतका फरक पडत नाही. माझ्या केरळी सहकार्याची तारांबळ उडाली नाक पुसता पुसता.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
भेकरापासून डुकरापर्यंत आणि
This comment has been moved here.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!