उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - २

उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले? : भाग १

आपण ऐसी अक्षरेचे सदस्य नवनवीन पुस्तके वाचत असतो, नवनवीन संगीत/व्याख्याने वगैरे ऐकत असतो, नाटके/चित्रपट/व्होडीयो/दृकश्राव्य कार्यक्रम बघत असतो. इतकेच नव्हे, तर त्याबद्दल ऐसीवर लिहून इतरांनाही जे जे उत्तम वाटले त्याबद्दल सांगून त्याचा आस्वाद घ्यायला उद्युक्त करतो, त्याच बरोबर जे जे अनुत्तम त्याबद्दल सावधही करतो. याच बरोबर आपल्यातील अनेक पाककृती आणि छायाचित्रणातही एकत्रितपणे काहीतरी उपक्रम राबवताना दिसतात. यासगळ्यात पदार्थ बनवणार्‍याप्रमाणे जातीच्या खवैय्याकडे दुर्लक्ष होऊ नये असे वाटले आणि त्यातूनच या धाग्याची कल्पना सुचली.

आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहितरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या/नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती? हॉटेलचा अ‍ॅम्बियन्स कसा होता वगैरे हवां ते लिहू शकता. पदार्थाचा फोटो असेल तर उत्तमच.

अर्थातच हे फक्त खाण्याबद्दल नाहि तर पिण्याबद्दलही आहे

भाग १ बराच लांबल्याने, वाचनाच्या सोयीसाठी, तेथील राधिका यांच्या प्रतिसादाचे रुपांतर, संपादकीय अधिकारात, पुढिल भागात करत आहोत.
======================
आजच आम्ही सांताक्रूज पूर्व भागातील किंग चिलीमध्ये गेलो होतो. हे हॉटेल चालवणारे लोक आहेत ईशान्य भारतातले. तेथील मेनूकार्डावर आपल्याला मुख्यत्वे चायनीज, काही मंगोलियन आणि काही थाई पदार्थ दिसतात. परंतु, 'तुमच्याकडचे पारंपारिक जेवण आम्हाला हवे आहे' असे सांगितल्यावर तिथे तांखुल नागा आणि मैतेई लोकांचे खास असे काही थोडे पदार्थ मिळतात. हे पदार्थ मेनूकार्डावर नसतात.

यातलेच तीन पदार्थ आम्ही आज चाखून पाहिले- इरुम्बा (की इरोम्बा. नेमका उच्चार आठवत नाही), उकळलेल्या भाज्या आणि पोर्क ग्रेव्ही. पैकी इरुम्बा म्हणजे बटाट्याचे तोंडीलावणे होते. हा मैतेई पदार्थ असून त्यात त्यांचे काही पारंपारिक पदार्थ घातले जातात. आम्ही खाल्लेल्या इरुम्ब्यात त्या भागात उगवणारी खास, वेगळी मश्रुम्स घातली होती. प्रत्यक्ष मश्रूमची चव जरी मला आवडली नसली, तरी त्यामुळे बटाट्याला जी थोडी वेगळी चव आली होती, ती मात्र आवडली. पोर्कसुद्धा उत्तम शिजले होते आणि खाताना मजा आली. या पदार्थांच्या चवी मला फारशा आवडल्या नाहीत, पण सर्व पदार्थांचा पोत खूप छान होता. एकूणच खूप वेगळ्या प्रकारचे जेवण जेवल्याचे समाधान मिळाले. तिथे परत एकदा भेट देऊन त्यांच्या पारंपारिक पद्धतीने बनवलेली चिकन खायचा आता माझा बेत आहे.

हे हॉटेलदेखील छोटेसेच आहे. स्वच्छ आहे. शांत आहे. आणि फारसे महागही* नाही.

*माणशी १७० रु. पण आम्ही मोठ्या संख्येने तेथे गेलो होतो. दोघे-तिघेच जण गेल्यावर माणशी खर्च बहुधा वाढेल.

0
Your rating: None

फेमस डेव्ह्ज

This comment has been moved here.

धागाकर्तीने इरोम्बा मधे पोर्क

धागाकर्तीने इरोम्बा मधे पोर्क असल्याचा उल्लेख केला आहे. साधारणतः एखाद्या प्रांताची डिश इतरत्र सादर करताना खानावळीचे मालक अशी सूट घेतात. पारंपारिक मणिपूरी इरोम्बा मधे केवळ ओला/सुका मासा असतो. चिकन देखिल नसते.

धर्मावर टीका करायची हौस व कला म्हणजे विज्ञान वा समाजशास्त्राचे ज्ञान नव्हे.

गैरसमज

धागाकर्तीने इरोम्बा मधे पोर्क असल्याचा उल्लेख केला आहे.

मी असे म्हटलेले नाही.

राधिका

पून्हा वाचल्यावर लक्षात आले.

पून्हा वाचल्यावर लक्षात आले. चूक सुधारल्यासाठी आभार.

धर्मावर टीका करायची हौस व कला म्हणजे विज्ञान वा समाजशास्त्राचे ज्ञान नव्हे.

खूप दिवसांनी आज कैरीचे झटपट

खूप दिवसांनी आज कैरीचे झटपट लोणचे अन रायते (कैरीचा गर + गूळ अन वर हिंग, मोहरी, कढीलिंबाची फोडणी) बनविले. फार मस्त झालं होतं. आंबेमोहोर भात मिस केला पण असो जे मिळाले तेही नसे थोडके : )

कैरीचे लोणचे!!!!

कैरीचे लोणचे!!!! तोंपासू!!!!!!!!!!!

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

न्याहरी.

हा स्मूदी प्रकार अलिकडे फारच आवडायला लागला आहे. अनेकदा अननस, आंबा अशी फळे कापली की मी ती फ्रीजरमध्ये टाकून देते, स्ट्रॉबेरीज, ब्लूबेरीज वगैरे फळेही छान फ्रीज होतात. स्मूदी बनवताना ही अशी फ्रोजन फळे, थोडेसे दही, गोडीला मध किंवा अगावे सिरप किंवा साखर वगैरे घालून ब्लेंडरमधे थोडे फिरवले की झाले. या स्मूदीलाच पूर्ण न्याहरी बनवायचे झाले तर त्यातच थोडे ग्रनोला घालाता येते. बागेतले थोडे पेपरमिंट तोडून आणून त्यावर छान दिसेल म्हणून घातले तर त्याचा स्वादही मस्त लागला (नेहमीच्या पुदीन्यापेक्षा या पेपेरमिंटचा स्वाद थोडा वेगळा असतो जो थोड्या गोड पदार्थांबरोबर चांगला लागतो). हा फोटू,

Brekie

हा फटू पाहून भूक चाळवल्या

हा फटू पाहून भूक चाळवल्या गेली आहे!!! हे अस्ले फटू टाकून जळवल्याबद्दल निषेध असो!!!

तरी बरं, अस्सल, मऊ अन जबर्दस्त, एकदम तोंडात टाकल्यावर वितळणारा असा मैसूरपाक नुकताच खाल्ला नैतर आमचं काही खरं नव्हतं बघा Evil

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

कूल !

'आता रूचीचे चांगल्या खटकेबाजीबद्दल कितीवेळा हाबार्स मानायचे!' (प्रेरणा) (स्माईल)

आहाहा!!

सुंदर फोटू!!

२५ रु.त सामिष जेवण

टीपटॉपमध्ये ४० रु.त चिकन इ.चे कबाब खायला मिळतात असं कळल्यावर मी आणि माझी एक मैत्रीण त्या भागात मुद्दाम काहीतरी काम काढून तिथे गेलो. तिथे आम्ही बीफ कलेजाचे कबाब खाल्ले. एका प्लेटमध्ये कलेजाचे मध्यम आकाराचे पंधराएक तुकडे. सोबत हिरवी चटणी. मस्त चव. चिकन आणि मटणाच्या कलेजापेक्षा थोडा उग्र वास वाटला.

नंतर जवळच्याच एका रसवंती गृहातून उसाचा रस घेऊन (१० रु. ग्लास) प्यायलो. या दोन्हींमुळे माणशी २५ रु. इतक्या खर्चात छान, भरपेट जेवण झाले.

राधिका

चीजकेक

हल्ली चीजकेकचं अगदी वेडच लागलंय. 'फ्रेंड्ज'मधला एक भाग पाहिल्यापासून हा चीजकेक दिसतो कसा आननी अशी उत्सुकता होती. तो अखेर इथे खायला मिळाला. तिथे मी खाल्ला तो बेक्ड चीजकेक. त्याची चव स्वर्गीय आहे. आतापर्यंत दोनदा खाल्लाय. दोन्ही वेळी चव उत्तमच. आहे मात्र बराच महाग. एक तुकडा १४० रु.चा! दुर्दैवाने त्याचा फोटो माझ्याकडे नाही. तिथलाच ब्लूबेरी चीजकेक मात्र तद्दन बकवास (अगदी हाडाच्या गोडखाऊ मंडळींचंही हेच म्हणणं पडलं.)

भारीतला ब्लूबेरी चीजकेक खायचा असेल, तर सरण्यात जावे. 'सरण्या'बद्दल एक सविस्तर प्रतिसाद नंतर लिहायचाय. सध्या फक्त तिथल्या ब्लू.ची. बद्दलच (सोबतच्या फोटोतल्या) लिहिते. खाली बिस्किटाच्या चुर्‍याचा थर, त्यावर दाणाभर मीठ जास्त असलेलं चीज आणि त्यावर मस्तसा ब्लूबेरी सॉस. अहाहा! आत्तापर्यंत तीनदा खाल्लाय. तिन्ही वेळी तितकाच भन्नाट. हा वरचा चीजकेकच्या मानाने स्वस्त आहे. फोटोत दाखवलेला तुकडा ५० रु.ला मिळतो.

आता थिओब्रोमा, चीजकेक रिपब्लिक, लव्ह अँड चीजकेक आणि ससानिया (इथला लेमन चीजकेक मिळतो फक्त ३० रु.त) येथे जायचे आहे. जमेल तसतसे फोटो टाकेनच. (स्माईल)

राधिका

आणखी दोन ठिकाणे

गेल्या महिन्यात आणखी दोन ठिकाणचे चीजकेक खाल्ले. थिओब्रोमामधला न्यू यॉर्क ची.के. अगदीच गोग्गोड आणि बकवास होता. लव्ह अँड चीजकेक येतील चीजकेक (कोल्ड लेमन आणि बेक्ड ब्लूबेरी) चांगले होते पण उगाच महाग होते.

एकूणात सरण्या आणि पाटीसेरी यांना पर्याय नाही असं सध्यातरी वाटतंय.

राधिका

पास्ता !!!

घरातील मोठ्यांना नमस्कार, लहान भावंडांना आशीर्वाद...
परवाच पुना क्लब मधे पास्ता खाण्याचा योग आला... आवडला!!!!

बघा पट्तोय का....

पॅनकेक्स

आज सकाळचा नाश्ता: मध आणि लँगडा आंब्यांसहित ताकातले पॅनकेक्स:

मध आणि आंबा??

मध आणि आंबा?? इतकं गोडट्ट!!!! कसं खाता बुवा?
अवांतर: लँगडा पहिल्यांदा कळलं नाही. मराठी पद्धतीने लंगडा लिहावे असे वाटते.

आम्हाला आवडतं बुवा! आधी मध

आम्हाला आवडतं बुवा! आधी मध घातलं, मग शेजारी आंबा चिरून ठेवला होता, तोच "टॉपिंग" म्हणून घातला. छान लागला. (स्माईल)

ऋ - मी "बटरमिल्क पॅनकेक" ला ताकातले पॅनकेक म्हटले, एवढेच. कृती मार्था स्टीवर्ट ची वापरली, पण घरी ताक होतं ते वापरलं.

पाककृतीत अंडं आणि ताक एकत्र

पाककृतीत अंडं आणि ताक एकत्र पाहून जरा विचित्र वाटलं. 'ऑल परपझ फ्लोर' म्हणजे नक्की कसलं असतं? मैदा,तांदळाचं पीठ , की आणि काही?
दिसायला छान आहेत धिरडी.

ऑल पर्पज फ्लोर म्हणजे मैदा.

ऑल पर्पज फ्लोर म्हणजे मैदा.

अमेरिकेतलं "बटरमिल्क" म्हणजे दुधात लॅक्टिक अ‍ॅसिड बॅक्टेरिया घालून फरमेंट केलेलं पेय - त्याची चव ताकापेक्षा थोडी अंबट-कडवट असते. अमेरिकेतील दक्षिणेकडच्या बर्‍याच बेकिंग कृतींमधे अंड्यांबरोबर वापरले जाते.

मी सहज ताक वापरून पाहिलं, पण चवीत फारसा फरक जाणवला नाही.

अवांतरः बंगाली घरात ताक कितपत

अवांतरः बंगाली घरात ताक कितपत बनते? कोलकात्यात असताना बहुतेक सर्व जण्रल हाटेलात दोयिर घोल ऊर्फ ताक मिळत नसे तस्मात शंका होती/आहे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

फारसे बनत नसावे. मी तरी

फारसे बनत नसावे. मी तरी पाहिलेले नाही. याचे कारण काय नक्की माहित नाही, पण तूप कढवायची कृती इथे वेगळी असते - सायीचं लोणी (आणि ताक) न काढता सायीलाच विरजण लावून ते कढवले जाते असे कोणीतरी सांगितले होते. पण हे ही प्रत्यक्षात पाहिले नाही. दोईएर घोल म्हणजे फक्त घुसळलेले पातळ लस्सी सारखे असते - टेक्निकली ताक नसते.
पनीर करताना राहिलेले पाणी जिरे-मीठ अथवा साखर घालून खायची मात्र प्रथा सर्वत्र आहे.

धन्यवाद

शंकानिरसनाबद्दल धन्यवाद. दोईएर घोल म्हंजे पातळ लस्सीच-बरोब्बर, आत्ता लक्षात आले. डनलॉप ब्रिजजवळच्या एका गल्लीतला दूधवाला, ताक मागितले तर तसे करून द्यायचा. ते टेक्निकली ताक नव्हेच. तिथे ताकासाठी दाही दिश्या फिराव्या लागत असल्याने डॉस्के फिरत असे अधूनमधून.

विरजणाची पद्धतच वेगळी आहे हे रोचक आहे.

पनीर करताना राहिलेले पाणी जिरे-मीठ अथवा साखर घालून खायची मात्र प्रथा सर्वत्र आहे.

रोचक आहे. हेही कधी ऐकले नव्हते. बाकी या स्लिपला बांग्ला स्लिप म्हणावे काय (डोळा मारत) खावार जॉलवरून मजेशीर आठवणी जाग्या झाल्या.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

तिथे ताकासाठी दाही दिश्या

तिथे ताकासाठी दाही दिश्या फिराव्या लागत असल्याने डॉस्के फिरत असे अधूनमधून.

वा वा इंद्राचं अन तुझं दु:ख समान झालं की बॅट्या. (संस्कृतेमध्ये श्लोक आहे ना तक्र शक्रस्य दुर्लभम का काहीतरी (जीभ दाखवत))

भोजनान्ते च किं पेयम्?१

भोजनान्ते च किं पेयम्? जयन्त: कस्य वै सुतः?
कथं विष्णुपदं प्रोक्तम्? तक्रम्, शक्रस्य, दुर्लभम् ||

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

स्लिप् ऑफ् बंग !

या स्लिपला बांग्ला स्लिप म्हणावे काय
..............नव्हे.. स्लिप् ऑफ् बंग ! (स्माईल)

आवडल्या गेले आहे!

आवडल्या गेले आहे!

पण शुद्धलेखनात गडबड झालेली दिसतेय, ते बङ्ग पाहिजे ना (डोळा मारत)

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

बंग - बङ्ग

शुद्धलेखनापेक्षा शुद्धोच्चारांच्या प्रयोगाची गुडचापी गुंडाळून बरेच दिवस झाले. मिहिरसाहेबांना विचारा. (स्माईल)

नेहमीप्रमाणे परसवर्णप्राधान्य

नेहमीप्रमाणे परसवर्णप्राधान्य इथे दिसले नाही म्हणून विचारले (डोळा मारत)

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

हे कसे करता?

ताकातले पॅनकेक्स

हे कसे करता?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ताकातली धिरडी असा देशी

ताकातली धिरडी असा देशी शब्दप्रयोग करण्याऐवजी त्यांनी पॅनकेक म्हटले असावे. केळ्याच्या थालीपीठालाही बनाना पॅनकेक म्हणतात काहीवेळा.

थोडं जाड धिरडं घातलं की पॅनकेक.. (स्माईल)

असं मला वाटत आलेलं आहे.

यंदा आम्ही उकडीच्या मोदकांना डेसिकेटेड कोकोनट डंपलिंग्ज म्हणण्याचे योजत आहोत. त्यावरील रवाळ तुपाला फाईन डाईन शब्द सुचवा.. (डोळा मारत)

किंबहुना, धिरडे, घावणें, पानग्या,फदफदे, सागुती (याचे इंग्रजी मेन्यूकार्डावर xacuti बनल्याचे ऑलरेडी पाहिले आहेच), उंडे, सांदण, धपाटे, घारगे अशा असंख्य पदार्थांना फा.डा. आल्टर्नेट शोधायला हवेत..!! (स्माईल)

सदासर्वदा योग तूझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा |

ही आयडिया छान आहे! रवाळ

ही आयडिया छान आहे!
रवाळ तुपासाठी "क्लॅरिफाइड बटर ग्लेझ" चालेल का? "कोकोनट डंपलिंग्स विथ क्लॅरिफाइड बटर ग्लेझ"? आधी "हँड क्राफ्टेड" किंवा "आर्टिसनल" जोडले तर उत्तमच.

तो लू मल्नाती आहे. मलाही

तो लू मल्नाती आहे.
मलाही डीप-डिश आवडत नाही, पण शिकागोमधला थिन-क्रस्ट खास नसतो, म्हणजे न्यु-यॉर्क स्टाईल आवडत असेल तर. शिकागो थिन-क्रस्ट जरा क्रिस्पी असतो.
विंडि-सिटी स्पेशल खायचे असेल तर (आणि बीफ चालत असेल तर) इटालियन बीफ सँडविच खाणे हे माझे रेकमेंडेशन. आठवणीने आत्ताच भूक लागली (स्माईल)

'लोऊ माल्नाती'चा 'डीप डिश् पीत्सा'

शिकागोला जाऊन 'लोऊ माल्नाती'चा 'डीप डिश् पीत्सा' खाल्ला नाही तर आग्र्याला जाऊन ताजमहाल न बघता परतण्यासारखे आहे, असे म्हणतात. तेंव्हा यावेळी तो हादडायचाच असा चंग बांधून गेलो. हाटलात पिवळे-लाल असे उष्ण रंग आणि एक प्रकारचा उबदारपणा. शिकागोत वारं भारी. त्यामुळे कुठलाही उबदारपणा हवाहवासाच वाटतो. त्यात भर म्हणून पीत्स्याचा दरवळ !
मग मेनुकार्डावर एक भिरभिरती नजर - किंमतींवर. तो प्रसिद्ध 'बटरक्रस्ट डीप डिश् पीत्सा' यू.एस्.डी. ८ ला. तो मागवला, तशी वेट्रेस म्हणाली, की या पीत्स्यासाठी अर्धा तास वेळ लागेल. मग इकडे तिकडे इतरांचे पीत्से न्याहाळत, कॅमेरा तय्यार करत वेळ घालवला. भिंतींवर 'लोऊ माल्नाती' चा छोट्या दुकानापासूनचा पीत्साप्रवास छायाचित्रांतून होता. (मला एकदम 'पुष्पक विमानम्' चित्रपटातल्या हॉटेल मालकाची आठवण झाली (स्माईल) ). मग खरोखरीच अर्ध्या तासाने तो ६ इंच व्यासाचा आणि १ इंच खोल असा तबकडीदार पीत्सा पुढ्यात आला.

तगडा पण अतिशय खरपूस असा बेस होता. लोणी वितळलेले वाहत होते. चीज, टोमॅटो, सलामी असा मसाला मध्यभागी भरलेले ते एक छोटे ताटच होते म्हणा ना ! चव सर्वसाधारण पीत्स्यासारखीच वाटली पण प्रचंड रसरशीत ताजेपणा होता. त्या जाड मिश्रणातून बेस पर्यंत दात रोवून तुकडा तोंडात मोडून घेतला की अगदी सहज विरघळतो. बेस हाच सर्वोच्च मानबिंदू वाटला.

केवळ ६ इंच असल्याने आणि एकाने समाधान न झाल्याने दुसरा मागविण्याचा विचार होता पण तो रहित केला. हाटलातून बाहेर पडल्यावर काही वेळाने तो योग्य निर्णय असल्याची खात्री पटली कारण त्या एकाच छोट्या पीत्स्याने पोट बरेच भरल्याचे थोडे उशीराच जाणवले. एकूण खूप काही थोर वाटला नाही पण अश्या प्रकारचा पीत्सा प्रथमच खाल्याने जरा वेगळेपणामुळे लक्षात राहिला. आता पुन्हा जाणे झाले तर थिन् क्रस्ट् पीत्सा मागवून पाहणार. 'लोऊ माल्नाती' सच्चा पीत्सावाला असल्याची खात्री तेंव्हाच पटेल. (स्माईल)

पिझ्झ्याचा विषय निघालाच आहे

पिझ्झ्याचा विषय निघालाच आहे तर पॉप टेट्समधल्या (ठाणे, मुलुंड, पवई इ इ) पिझ्झ्याचे हे दोन अप्रतिम प्रकारः अनुक्रमे पेशावरी चिकन पिझ्झा आणि फॅब फाईव्ह (पॉप टेट्स स्पेषालिटी)

सदासर्वदा योग तूझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा |

खत्री आहे एकदम!!!! वर्णन

खत्री आहे एकदम!!!! वर्णन वाचूनच पचंड तोंपासू. भारतात हे मिळत असण्याची शक्यता कमीच दिसतेय, आम्रिकेत अन त्यातही शिकागोत कधी चुकूनमाकून गेलोच तर हे लक्षात ठेवेन, धन्यवाद (स्माईल)

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

शिकागोला जाऊन 'लोऊ

शिकागोला जाऊन 'लोऊ माल्नाती'चा 'डीप डिश् पीत्सा' खाल्ला नाही तर आग्र्याला जाऊन ताजमहाल न बघता परतण्यासारखे आहे

अरेरे! "हन्त हन्त" वाटते आहे. Sad आम्ही माहितीअभावी या ताजमहालाचा अनंद घेतलाच नाहि म्हणायचा. आता योग येईल / येऊ देईनसे वाटत नाही Sad

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अरेरे! "हन्त हन्त"

अरेरे! "हन्त हन्त"
...........अहो, इतके काही मनास लावून घेवू नका बरे !
त्याऐवजी बिड्डफोर्ड (मेन) या ठिकाणी जाऊन ताजा लॉब्स्टर् किंवा लॉब्स्टर् रोल् मागवा, असे सुचवेन. पीत्से इथे-तिथे, मागे-पुढे कधीतरी मिळतील पण हे ताजे शेवंड तुमचे तुम्ही निवडून, तुमच्या समोर उकडवून घेवून योग्य प्रकारे फोडून कसलाही मसाला न लावता निव्वळ वितळविलेल्या खारट लोण्यात बुचकळून खाण्यात जी काही जिव्हातृप्ती होते, ती केवळ अवर्णनीय !

व्हीअेतनमीज सॅलड रोल्स रोल्स आणि अॅस्परॅगस सूप.

001
अलीकडेच भाजीबाजारात एका स्टॉलवर मिळणारे व्हीअेतनमीज सॅलड रोल्स खाल्ले आणि खूप आवडले, बनवायला खूपच सोपे आहेत हे लक्षात आले आणि मुलीनेही आवडीने खाल्ले. मुलीला कच्च्या भाज्या खाऊ घालायची एवढी नामी युक्ती समजल्यावर ते बनवून पाहणे सहाजिकच होते. बाजारात मिळणारे तांदळाचे कागद (राईस पेपर) आणायचे, पाण्यात दोन मिनिटे भिजवायचे आणि पोळपाटावर पसरून त्यात आवडणाऱ्या भाज्या, शेंगदाण्याचे भरड कूट, कोथिंबीर वगैरे सारण भरून त्याची सुबक वळकटी वळली की झाले तय्यार! हे रोल्स बुडवून खायला व्हिनेगर, गूळ, कोथिंबीर, मिरची वगैरे घालून एक आंबटगोड सॉसही बनवला होता.
सध्या सीझनमध्ये असलेले अॅस्परॅगस बाजारात छान, ताजे मिळताहेत त्यामुळे त्याचे सूप बनविले होते तेही छान झाले होते. 002

मी आधी फोटो पाहिला, आणि

मी आधी फोटो पाहिला, आणि डावीकडे नाव दिसायच्या आधीच "हा रुचीचा असावा" असं वाटलं. बरोब्बर! (स्माईल) तुझ्या फोटोतल्या प्रकाश-मांडणीची आता छान ओळख झाली आहे. रोल्स मस्त दिसताहेत; इथे मिळाले तर करून पाहते, खूप दिवस खाल्ले नाहीत. बर्कलीत असताना नेहमी करून खायचे. त्यावर दाण्यांची पातळ चटणी, अर्थात पीनट सॉस लावून खायला ही खूप आवडतं. थोडी फोडणी घालून पचडी-स्टाइल करायलाही हरकत नाही, ना?

तीळदार 'होल्डॉल'

एकूण हे तीळदार 'होल्डॉल'च की ! मस्त दिसत आहेत.

धागा आवडला !

खाणं आणि गाणं याची आवाड असल्या मुळे हा धागा आवडला !
मी हि माझ्या ब्लॉग वर पुण्यातल्या काहि खाद्द भ्रमंतीन बद्दल लिहिलं आहे. http://veedeeda.blogspot.in/

खवय्यां कडुन मला माहिती अशी हवी आहे :

१) कच्च्या फणसाची भाजी कुठल्या हॉटेल / खानावळी मधे मिळते का ? पुणे-मुम्बई मधे ?
२) फणसाच्या वेगवेगळ्या पदार्थां साठि स्पेशल दुकान / हॉटेल कोणती ?
३) कोकणातल्या वेगवेगळ्या गावां-शहरां मधे शाकाहारी जेवणा साठि प्रसिध्द हॉटेल्स ची लिस्ट बनवतो आहे .. जर कोणाला माहित असेल तर कृपया सांगा !

धन्यवाद !

------
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे
भले तरी सोडू कासेची लंगोटी ,नाठाळाच्या माथी हाणू काठी
http://veedeeda.blogspot.in/

१) कच्च्या फणसाची भाजी

१) कच्च्या फणसाची भाजी मेन्यूवर रेग्युलर ठेवणारे हॉटेल माझ्या बर्‍यापैकी खाद्यभ्रमंतीत मी तरी पाहिलेलं नाही. पण साधारणतः घरगुती पोळीभाजी केंद्रे, खानावळी, इत्यादि ठिकाणी सीझनमधे प्रसंगोपात्त ही भाजी बनते. हुकमी हवी असेल तर अशा ठिकाणी आधी विनंती करुन / ऑर्डर देऊन काहीशा मोठ्या क्वांटिटीत बनवून मिळते. मी नुकतीच या मार्गाने किलोभर भाजी मिळवली (२०० रु किलो) दोन नातेवाईकांत मिळून पुरवली. कधीकधी हे लोक नेमकी केव्हा ही भाजी रेग्युलर जेवणात बनवणार आहेत तो दिवस तुम्हाला सांगतील, त्या दिवशी जाऊन पार्सल घेऊ किंवा तिथेच खाऊ शकता.

२) फणसाचे पदार्थ म्हणजे मुख्यतः तळलेले गरे, फणसपोळी हे कोणत्याही घरगुती पदार्थांच्या दुकानात मिळतात. योजक / देसाई वगैरे ब्रँडेड आणि असंख्य अनब्रँडेड उद्योगांतर्फे हे बनतात. मात्र फणसाचे आईसक्रीम "नॅचरल्स"च्या शाखांमधे आणि ठाण्यात "टेम्प्टेशन्स" - राम मारुती रोड इथे मिळते. (टेम्प्टेशन्समधे शहाळे, मिरची, विडा आणि अन्य अनवट फ्लेवर्सही मिळतात. सिताफळ मस्तानी मस्ट ट्राय.)

३) कोंकणातल्या हॉटेलांविषयी मिसळपाव संस्थळावर एक भरपूर मोठा धागा होता. म्हणजे तो धागा फक्त कोंकणातल्या हॉटेलांना वाहिलेला नव्हता. महाराष्ट्रात किंवा बाहेरही कोणती उत्तम हॉटेल्स आहेत याचं ते जबरदस्त मोठं आणि फर्स्टहँड कलेक्शन होतं (आहे). त्यात कोंकणातल्या हॉटेल्सचंही बरंच समावेशक कलेक्शन आहे.

धागा सापडला तर लिंक देतो.

.....

काही लिंका मिळाल्या..

http://misalpav.com/node/4731

http://www.misalpav.com/node/4710

आणखीही एक धागा होता. आता सापडत नाही.

ऐ अ वरची खुद्द ही चालू असलेली सीरीजही या बाबतीत उपयुक्त आहे. याचा आधीचा भाग पहा.

सदासर्वदा योग तूझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा |

धन्यवाद ग वि

१) अशा घरगुती खानावळी - हॉटेल्स मी शोधतोय पुण्या मधे .. फार फार पुर्वी बादशाहि (टिळक रोड)ला उन्हाळयात फणसाची भाजी हमखास असायची .. आज कल नसते ( महागाई ). तुम्हि कुठुन मिळवलीत १ किलो फणसाची भाजी ? त्या ठिकाणी मी हि चौकशी करुन पहातो.
२) नॅचरल्स मधलं फणसाचं आइस्क्रिम नक्कि ट्राय करीन .. आजच !
३) हो आता मिसळपाव.कॉम वर पण सदस्यता घेतली आहे .. वाचतो

मालवणी - कोकणी अश्या प्रकारची हॉटेल्स हि जास्त करुन सि-फुड , मासे वैगरे साठि असतात. मी त्यापैकि काहि हॉटेल्स मधे हि विचारुन पाहिले .. पण फणस भाजी मिळत ना..हि ! (स्माईल)
कोकणातल्या घरगुती खानावळींची एक वेगळीच चव असते ..मी लवकर कोकण सफरी ला जाण्याचा बेत आखतोय तेव्हा उपयोगी पडेल हि लिस्ट.

------
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे
भले तरी सोडू कासेची लंगोटी ,नाठाळाच्या माथी हाणू काठी
http://veedeeda.blogspot.in/

मला ठाण्यात मिळाली होती.

मला ठाण्यात मिळाली होती. पुण्याचे ठाऊक नाही. साधारणतः हे पोळीभाजी केंद्रवाले लोकलच असतात. गावाबाहेर फार प्रसिद्ध नसतात.

फणसाची उस्तवार फार असते आणि सोलण्याच्या बाबतीत ते एक मोठं किचकट (आणि चिकट) प्रकरण असल्याने सहजासहजी कोणी हॉटेलात त्याची भाजी करायला जात नाहीत. ज्यांना स्पेशालिटी ठेवायची आहे ते घरगुतीवाले एखाददोन वेळाच करतात पूर्ण सीझनमधे. तुम्ही सरळ "आम्हाला एकदीड किलोची आगाऊ ऑर्डर नोंदवायची आहे, तेव्हा बनवून द्या" अशा पद्धतीने मागून पहा. तीनचार घरात मिळून २ किलो वगैरे मागितलीत तर खास तुमच्यासाठीही करेल एखादी घरगुती बिझनेस करणारी व्यक्ती.

सदासर्वदा योग तूझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा |

पंचम पुरीवाला..

पंचम पुरीवाला या ठिकाणाविषयी मराठी संस्थळावर एकदोन लेख वाचून नुकताच खास तिथे गेलो.

बझारगेट, बोरीबंदर स्टेशनानजीक, या ठिकाणी हे हॉटेल आहे.

पुरीचे बरेच प्रकार गरमागरम ताजेताजे बनत असतात. मी मसाला पुरी आणि साधी पुरी हे पाहिले.

भरपूर वेगवेगळी तोंडीलावणी होती. लाल भोपळ्याची भाजी, पालक, कढी पकोडा, राजमा, बटाटा पातळभाजी, छोले, पनीर, मेथी, रायते, खीर, आमरस वगैरे

सर्व प्रकार पुरीसोबत खायचे अशी पद्धत. हे सर्व एकेक प्लेट मागवणे शक्य नसल्याने बर्‍याच मुख्य पदार्थांचा समावेश असलेली डिलक्स थाळी मागवली. मला वाटते साधी थाळी ५०, स्पेशल ८०, डिलक्स १००, पंचम थाळी १२०(यात आणखीही बरेच काही पदार्थ असतात) अशी रचना होती.

मी डिलक्स थाळी घेतली ती अशी:

यात मसाला पुरी होती. म्हणजे पुरीच्या आत कचोरीप्रमाणे मसाल्याचा एक थर. गरमागरम असल्याने पुर्‍या खुसखुशीत होत्या. नंतर आमरसही मागवला. त्यासोबत साधी पुरी. तीही छान होती.

मसाला पुरी;

अधिक बाजू:

-ताजे, गरमागरम अन्न, निदान पुर्‍या तरी ताज्या.(उपसा असल्याने)
-बरीच तोंडीलावणी उपलब्ध असल्याने चवीत व्हरायटी.. नुसत्या पुरी-बटाटा भाजीची चव चारपाच घासांनंतर मोनोटोनस होते.
-गर्दी, गरमी असूनही स्टाफ आणि मालक तुलनेच बरेच सौजन्यशील. सर्व्हिस अशा रोडसाईड ठिकाणाच्या मानाने अनपेक्षितरित्या चांगली.
उण्या बाजू:

- आजूबाजूला अस्वच्छता. खरकटी गटारं, दुर्गंधी.. यामुळे बाहेरच्या सेक्शनमधे बसून खाणं अशक्य होऊ शकतं. मला पोटमाळ्यावरची जागा मिळाली म्हणून तुलनेत बरं.
-बर्‍यापैकी गर्दी होती. एकेका अत्यंत छोट्या टेबलाला चारचार जोडीजोडीच्या कनेक्टेड लोखंडी खुर्च्या आणि अत्यंत अंग चोरुन जाण्याइतक्या छोट्या जागेत हॉटेल असल्याने स्पेशल टेबलची चैन नाही. तेव्हा तीन जणांची फॅमिली असेल तर चौथी खुर्ची आणखी कोणातरी अनोळख्यासोबत चिकटून बसत शेअर करावी लागेल. प्युअर खानावळ स्टाईल.
-सध्याच्या (उन्हाळा) दिवसात भट्टीसारखी उष्णता. पंखे बर्‍यापैकी निष्प्रभ. तितक्याश्या जागेतच सदैव मोठ्या शेगड्या आणि मुदपाकखाना चालू असल्याने शेगडीची अ‍ॅडिशनल उष्णता आणि तेलाचा धूर पसरलेला.

-आमरस प्रोसेस्ड /डबाबंद चवीचा होता. ताजा / चालू मोसमातल्या आंब्याचा वाटत नव्हता.

एकूणः प्रचंड आउट ऑफ द वर्ल्ड नाही. पण चविष्ट, पोटभरीची जागा. अँबियन्स वगैरेला फाट्यावर मारायचे झाल्यास एकदा जाण्यासारखी. किंबहुना, तिकडच्या भागात गेलोच असू तर मात्र आवर्जून एकदा जायला हरकत नाही.

सदासर्वदा योग तूझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा |

गेल्या काही दिवसांत ट्राय

गेल्या काही दिवसांत ट्राय केलेली ठिकाणे:

हाटेल कलिंगा निअर नळस्टॉप. सुरमई घस्सी विथ आप्पम अ‍ॅण्ड नीर दोसा. घस्सी ठीकठाक. नीर दोसा जब्री, पण आप्पम गंडलेला फुल्टू. नरमाईचा लवलेश नाही.

हाटेल तारीफ इन परिहार चौक औंध. चिकनं-मटनं. पाया सूप, रान मसाला आणि नॉनव्हेज प्लॅटर. चव खल्लास होती सगळ्याची. रान मसाला मात्र गंडला होता जरा.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

कुठे काय खाऊ नये!

हे 'तारीफ' प्रकर्ण घासफूस लोकांसाठी एकदम बिनकामाचं आहे. आपल्याबरोबर येणार्‍या लोकांच्या गप्पांमधे रस असून खाण्यात लक्ष जाणार नसेल तरच घासफूस लोकांनाही त्रास होत नाही.

एखाद्यावर/एखादीवर सूड घ्यायचा असेल तर परिहार चौकातल्या 'पोलका डॉट्स'मधे त्याला/तिला रिसोटो खायला घाला. आयुष्यभर तुम्हाला नावं ठेवली जाणार याची खात्री. (मी एकाला रिसोटो कसा सुंदर भात असतो वगैरे सांगितलं. नंतर "या इथला मला फार आवडला नाही; पण तुला हवं तर तू खाऊन पहा. तसंही तुला मसालेदार खायला आवडतं, मला आवडत नाही. प्रत्येकाच्या चवी वेगवेगळ्या...!" असं सांगितलं. आता कधीही पोलका डॉट्सचा विषय निघाला की तो माझ्या नावाने बोटं मोडतो म्हणे!)

---

ऑस्टीनातल्या कर्बी लेन कॅफेमधे लेमन-पॉपी सीड पॅनकेक खाल्ले. हे नेहेमी मिळतातच असं नाही, त्यामुळे असतात तेव्हा गोडासारखे खाल्ले जातात. नेहेमीच्या गोड घावनांमधे मधेच आंबट-गोड चव मस्त लागली. ते लिंबूस्वादाचं कसं काय जमवतात ते कोणाला माहित्ये का?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लिंबूस्वादाचं कसं काय जमवतात ..

..लिंबूस्वादाचं कसं काय जमवतात ..?

दोन प्रकारे.
१. पीठ तयार करतानाच लिंबाचा रस आणि बारीक सालटे टाकतात. हे पॅनकेक्स् जाड प्रकारातले.
२. पीठ नेमहीचेच मात्र पॅनकेक्स् घावनाप्रमाणे पातळ तयार करतात. मग साखरेचा पाक करून त्यात खूप लिंबाचा रस टाकून मिश्रण तव्यावर रटरटत असतानाच तयार पॅनकेकची चतकोर घडी करून तो आंबट-गोड मिश्रणात सोडतात आणि लपेटून टाकतात. मग थोड्या वेळाने ते आंबट-गोड मिश्रण शोषले गेले की पॅनकेक थेट आपल्या ताटात. या प्रकारचा पॅनकेक डेझर्ट् म्हणून अधिक खाल्ला जातो.

रान मसाला?

ये रान मसाला क्या हई?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बकर्‍याची अख्खी तंगडी

बकर्‍याची अख्खी तंगडी भाजून-शिजवून मसाले इ. लावून सर्व्ह केल्या जाते. ४-५ लोकांना रग्गड होतं ते प्रकरण.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.