लाल मानेची अमेरिका. :-)

आमच्या ऑफिसमधला एक जण बंदुका बाळगणारा, बंदूक प्रकरणावर प्रेम असलेला आहे. कामाच्या निमित्ताने अनेक महिने संपर्कात आल्यानंतर ज्या गप्पा होतात त्यातून हे सगळं क्रमाक्रमाने कळलेलं. आज या सहकार्‍याच्या आग्रहावरून - आणि खरं सांगायचं तर कुतुहल अनावर झाल्यामुळे - ऑफिसहून जवळपास असलेल्या शूटींग रेंजला जाण्याचा प्रसंग आला - किंवा संधी मिळाली असंही म्हणू. आम्ही एकंदर पाचजण होतो. त्यातला अजिब्बात अनुभव नसलेला मीच एकमेव. बाकी सर्वजण कमीअधिक फरकाने "त्यातले." एकजण तर मरीन कोअर मधे ८ वर्षं होता.

अमेरिका ही असंख्य विसंगती, विरोधाभास पोटात बाळगणारी खंडप्राय गोष्ट आहे हे वेगळं सांगायला नको. आज संध्याकाळी तासा दीड तासापुरत्या घेतलेल्या य अनुभवातून काही गमतीशीर, काही गंभीर वाटणार्‍या विसंगत असंगत गोष्टी दिसल्या त्या लिहाव्याशा वाटल्या. यातील काही बाबी तुम्हाला गमतीशीर वाटू शकतील. काही अगदीच मामुली वाटतील. (कुणास ठाऊक काही बाबी काहींना स्फूर्तीप्रद, अगदी थोर वगैरेही वाटू शकतील. कोण जाणे.)

तर आमचा हा सहकारी मॅट मूळचा पोलंड देशाचा. ग्रीनकार्डमार्गे अमेरिकन नागरिक बनलेला. याच्या जपानी ब्रांडच्या SUV वाहनाच्या मागे ट्रंपचे आणि Infowars चे बंपर स्टीकर्स आहेत. Smile

मरीन कोअर मधला असलेला दुसरा सहकारी अमेरिकेत जन्मलेला आणि मुस्लिम धर्माचा. दाढी राखणारा. तोही रीपब्लिकन आणि ट्रंप सपोर्टर आहे की नाही ते मला कळलं नाही आणि अर्थातच ते मी कदापि विचारणारही नाही Smile

मॅट बंदुकींबद्दल बोलत असतो तेव्हा बर्‍याच गोष्टी माझ्यासारख्या अडाण्याला पहिल्यांदाच कळतात. रिव्हॉल्वर आणि पिस्तुल (उच्चारी "पिस्टल") यातला फरक. त्यातील काडतुसांची मापं (काडतुसाला अ‍ॅम्युनिशन अर्थात् अ‍ॅमो असं म्हणायचं.) . त्यातला ग्लॉक् हा प्रकार. सेमी ऑटोम्याटीक आणि म्यान्युअल यातला फरक. बंदुक लोड कशी करायची. लोड झाल्यावर सेफ्टी ऑन ऑफ कशी करावी. पिस्तुतलवजा छोट्या आणि मोठ्या नळीच्या बंदुका असे ढोबळ प्रकार. त्यातल्या अचूक नेमबाजी करू शकणार्‍या नि न करू शकणार्‍या बंदुका. बंदुका कुठे मिळतात. कुठून घ्याव्यात. कुठे स्वस्त मिळतात. कितपत स्वस्त नि महाग असू शकतात. बंदूक वापरतानाच्या नाना प्रकारच्या काळज्या. बंदुका साफ कशा करायच्या. एकंदरच त्या हाताळायच्या कशा इत्यादि असंख्य आणि अनंत गोष्टी.

Range1

तिकडे रेंजवर गेल्यानंतर आमच्या लायसनची - म्हणजे साध्या ड्रायव्हिंग लायसनची - चौकशी. अपघात वगैरे झाले तर कंपनी जबाबदार नाही वगैरे आशयाची लांबलचक करारपत्रं आणि रेंजवर असताना घ्यायच्या काळजीचे अनेकविध धडे यांची उजळणी झाली. रेंजवर आत जायच्या आधी तुम्हाला पारदर्शक चश्मे आणि कानाला अजिबात ऐकू येणार नाही असे इयरप्लग् आणि हेडफोन असे दोन-दोन थर चढवणं हे प्रकार झाले. हे सर्व झाल्यावर मग आत रेंजवर प्रवेश केला.

चष्मा आणि कानावरची आवरणं यांखेरीज आत जाणं म्हणजे डोळ्यांना, कानाना आणि एकंदर मेंदूला कायमची इजा होणं याची ग्यारंटी आहे हे आत गेल्यावर क्षणार्धात कळतं. प्रत्येक गोळी चालवली असतां साधारण सुतळी बाँब फुटावा इतका आवाज येतो आणि त्या प्रचंड लांब परंतु बंदिस्त वातावरणात साधारण १५-२० सेकंदांमधे एक गोळी निघतेच. थोडक्यात कानांवर काही घातलं नाही तर साधारण १० मिनिटात माणूस बहिरा होईल. आणि प्रत्येक गोळी चालवल्यावर तिचं शेल-केसिंग मागे उडतं. शेंगांची टरफलं मागे पडावीत तशी. फक्त ही टरफलं धातूची असतात आणि यातलं एकजरी डोळ्यावर आलं की डोळ्याची गच्छंती.

एकंदर आपल्या दिवाळीमधे जसा फटाक्यांच्या वास वातावरणात असतो तसाच वास रेंजमधे असतो. मात्र फटाक्यांचा होतो तसा धूर अजिबात नाही. थोडक्यात दिवाळीतल्या केपा उडवल्यावर जसा नि जितका वास आणि सुतळी बाँब उडवल्यावर जसा नि जितका आवाज त्यातला प्रकार.

शूटींग रेंजच्या रचनेची तुलना बोलींगशी करता येईल. तशाच लेन्स. फक्त बॉल टाकायच्या ऐवजी गोळीबार करणं. तुमची टारगेट्स तुम्हाला १० फुटांपासून ते अगदी २०० फुटांपर्यंत , टच-स्क्रीन कंट्रोलने पुढे मागे करता येतात. टारगेटच्या पुठ्ठ्यांवर निशाण्यांचे कागद स्टेपल करायचे. बंदुकांमधे गोळ्या भरायच्या नि चालवायच्या.

बंदुकांची नि गोळ्यांची हाताळणी, विविध प्रकारच्या बंदुकांमधे विविध प्रकारे गोळ्या लोड करणं, त्या करताना त्या योग्य मापातल्या निवडणं, त्या भरतानाही बंदूक उडणार नाही ना याची सावधगिरी बाळगणं, लोड झाल्यावर सेफ्टी ऑफ करणं, योग्य रीतीने - आणि दोन्ही हातांनी - बंदूक पकडणं, ट्रिगर वर बोट धरणं , नेम धरणं , बंदूक चालवणं, ती चालवल्यावर जो रिकॉईलचा धक्का बसतो त्यात आपला हात फार हलू न देणं. कुठल्याही परिस्थितीत बंदुकीची नळी रेंजकडेच ठेवणं. चुकूनही तिचा अँगल उलटा तर सोडा पण तिरकाही न होऊ देणं.

Range3

यात मी फक्त लोड करून दिलेली बंदूक चालवणं इतकंच केलं. एकंदर ३० गोळ्या चालवल्या असतील तर त्यातल्या पाचेक बाहेरील वर्तुळांमधे गेल्या. बाकी सर्व कोर्‍या कागदाच्या बाहेरच्या भागातच.

Range2

असो. एकंदर रेंजवर दिसलेलं यच्चयावत पब्लिक रेडनेक वाटत होतं. अनेक बंपर स्टीकर्सवर रीपब्लिकन, ट्रंप - आणि हो इन्फोवॉरच्या पाट्या. तिथला आवाज आणि शेल केसिंगचं मागे सतत पडणं, आधी मुळात बंदुकीच्या एका गोळीमधली हिंसक शक्ती याबद्दल जर तुम्ही संवेदनशील असाल तर शूटींग रेंज हा प्रकार हबकवणारा, नर्व्हस करणारा , हादरवणारा असेल हे मी स्वानुभवावरून सांगू शकतो. अमेरिकेतल्या बंदुकांसंबंधातला हिंसाचार पराकोटीला पोचलेला असतानाच्या या काळात बंदुकांबद्दल आपुलकी,आत्मीयता आणि एकंदर धार्मिक वाटतील अशा भावनांनी बोलणारं पब्लिक अगदी रोजच्या ऑफिसच्या उठाबशीत असणं यातल्या विसंगतीची दरी आणि त्यामुळे आमचा पूर्णवेळ वासलेला आ. याहून अधिक काय लिहायचं Smile

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

कितीतरी दिवसांनी असा छान, फक्त ऐकीव माहिती असलेल्या गोष्टींची माहिती करुन देणारा लेख वाचनी आला. तुम्ही अनुभव मस्त शब्दबद्ध केलेला आहे. अजून लेखांच्या प्रतिक्षेत.

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

अमेरिका म्हणजे अजब रसायन आहे. मेल्टिंग पॉट मेल्टिंग पॉट म्हणतात खरे पण एका मुशीत सगळी विविधता कशी काय विरघळते आणि नांदते कुणास ठाऊक.
विषयाचे नावीन्य आणि लिहिण्याची पद्धत आवडली.
ता. क. : डेमॉक्रॅट्सना शस्त्रे आवडत नाहीत का? ते शस्त्रधारी नसतात का?

Smile खरे आहे राही. जर कोणाला विचारलं ना अमेरिकन माणूस दिसतो कसा, त्याची वेशभूषा काय, त्याची भाषा, संस्कृती काय तर खरच इतकी विविधता आहे की there is no such thing as a 'Typical' American man.

अगदी अगदी मामी . विविधता अणभव .. माझ्या मिडवेस्टी ( रिपब्लिकन , ट्रम्पवादी ,प्रोटेस्टंट वगैरे ) साध्या सरळ कुटुंबवत्सल सहकार्याला , एकंदरीत आचार विचार बघून खवचट प्रश्न विचारला होता , कि बाबारे , ते अमेरिकन कुठशीक राहतात अमेरिकेत म्हणे ... त्यालाही कळाले आणि या अर्थाचं म्हणाला की " हा , ते होय , ते तुमचे अमेरिकन न्यूयॉरकात रहातात .( अवांतर माहिती : त्याच्याकडेही बऱ्याच बंदुका पण होत्या )

मुक्तसुनीत राव , छान लेख . अमेरिकेचे अजून एक दर्शन दिल्याबद्दल धन्यवाद . ( अवांतर : दक्षिण मध्य , टिपिकली सदर्न अमेरिकेत कुणी राहत असेल आणि त्यांनी अशी काही निरीक्षणे दिल्यास वाचायला मजा येईल . एक मालक तिकडे राहतात म्हणे . अति अवांतर : दक्षिण मध्य लिहिलंय , सबब कॅपिटॅलिस्ट कॅलिफोर्निया , क्षमस्व )

अमेरिकेत फार विविधता वगैरे काही नाहीए. विशेषत:, भौगोलिक आकार आणि लोकसंख्या पाहीली तर फारच कमी. आणि भारतीयांना अमेरीकेत फार विविधता आहे असं वाटणं म्हणजे तर जरा गंमतच आहे. असो.

-Nile

निळेदादा, जगातील मेल्टिंगपॉटमध्ये विविधता नसेल तर कुठे असेल?

माझं नाव अदिती. अदिती म्हणजे देवांची आई. मी नास्तिक आहे. मला मुलं नाहीत. म्हणजे नास्तिक मुलीला अदिती असं नाव दिलं तेव्हाच स्वतःला नातवंडं असण्याचा मार्ग आईनं बंद केला ...

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मेल्टिंग पॉट नाव आहे म्हणजे विविधता आहेच असे नाही असे तुला म्हणायचे आहे. माझ्या मते जसा भारतीय माणूस बाह्य रुपावरुन ओळखता येतो तसा अमेरिकन मणूस येत नाही. पण तसं तर म्हणा फ्रेन्च आणि स्वीडिश आणि नि जर्मन अन आयरीश यांच्यातही मला फरक नाही करता येणार. Sad
मे बी माझे म्हणणे चूकीचे असेल. ( I can never be confident about a single word I speak. Major drawback! :()

काल मी एका ठिकाणी ब्रंचला गेले होते. त्याचं वर्णन 'अमेरिकन मेन्यू' असं होतं. अंडी, बेकन, सॉसेजेस, बटाटे, फळं, टोस्ट, पॅनकेक असं काही असेल अशी अपेक्षा होती. ते तसंच निघालं.

भारतीय ठिकाणी जेवायचं म्हणजे उत्तरेकडचं का दक्षिणेकडचं? मराठी खाद्यप्रकार भारतीय नाहीत का? गुजराती थाळी निराळीच. भारताच्या पूर्वकडचं मला फार माहीत नाही; ते निराळंच.

जी गोष्ट खाद्यसंस्कृतीची, तीच गोष्ट कपडे, केसांचा पोत, त्वचेचा रंग, सणवार, उभं का आडवं गंध, गंध लावणार का नाही, स्कूटर चालवताना डोक्यावर हेल्मेट घालणार का नाही घालणार, एक ना हजार. भाषा हा प्रकार तर बहुसंख्य लोकांना समजणारच नाही, तो सोडूनच देऊ. एकाच देशात एवढ्या भाषा असणं एखाद्या दक्षिण आफ्रिकेसारख्या देशाला समजेल.

टिपिकल अमेरिकी माणूस म्हणजे भारीभक्कम ते आत्यंतिक जाड असा आकार, उन्हाळ्यात टीशर्ट-शॉर्ट्स आणि एरवी मोठे कपडे घालणारे, पुळकावणी कॉफी पिणारे, बाहेर बर्फाचे ढिगारे असतानाही बर्फाळ पाणी पिणारे, किंवा बाहेर ३७-३८ अंश सेल्सियस तापमान असतानाही एसीच्या बाहेर बसण्याचा आग्रह धरणारे, रविवारी नेमानं चर्चात जाणारे; चर्चात कोणाला बोलावायचं असेल तर कपडे कसे हवेत याबद्दल बंधनं आहेत का नाहीत, याची पूर्वसूचना देणारे. अल्पसंख्येनं सापडणाऱ्यांतले लोक म्हणजे ऐशी वर्षांचं वय असलं तरी जमेल तितपत धावणारे, शब्दशः कमरेचा आकार तीन वीतभर असेल असे फिट लोक.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वरील नीरीक्षणे खरी आहेत.

गल्लीतल्या क्रिकेटच्या कपाला वर्ल्ड चॅंपियनशिप म्हटलं म्हणजे लगेच काही तो वर्ल्ड इव्हेंट होत नाही काकू!

-Nile

अमेरिकेतही वर्ल्ड सिरीज का कायशिशी अस्ते ना? ज्यात अमेरिका क्यानडा एव्ढेच असतात म्हणे.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

https://www.washingtonpost.com/news/politics/wp/2018/08/13/this-is-what-...
आजच हा लेख वाचनात आला -
सर्वसासधारण अमेरिकन मनुष्य ही एन्टिटी पुरुष नसून, स्त्री आहे. ५२ वर्षिय , विवाहीत, बॅचलर्स डिग्री असलेली, शहरी शक्यतो डेमोक्रीटिक्स ना मत देणारी गोरी स्त्री.
________________
अजुन एक -
https://www.cnbc.com/2018/02/07/tom-corley-heres-what-average-looks-like...

कालच रन अवे ज्युरी बघितला. त्या आधी अमेरिकन Sniper. (यातल्या ख्रिस कायल या ज्या अमेरिकन सैनिकावर सिनेमा आहे त्याचा प्रत्यक्ष आयुष्यात खून शूटींग रेंजवरच झाला.)
त्या पार्श्वभूमीवर अजून संदर्भ जाणवले.

- ओंकार.

रन वे ज्युरी मस्त आहे.

_______________________
काहीजणांना रेडनेक असल्याचा अभिमान असतो. ती एक जीवनशैली आहे मला वाटतं.

मी अमेरिकी नागरिक नसल्यानं मला बंदूक बाळगता येत नाही. मी निराळ्या ठिकाणी नोकरी करत होते, तेव्हा इथल्या ऑफिस मॅनेजरनं, गाबोनं, मला मस्करीत लग्नाची मागणी घातली होती. "माझ्याशी लग्न कर, म्हणजे तुलाही बंदूक बाळगता येता येईल."
मी: तुझ्याकडे एक निराळी बंदूक आहे?
तो: हो.
मी: दोन-दोन बंदुका बाळगणाऱ्याशी मी नाही लग्न करणार.

हा विनोद त्याला झेपला नव्हता.

आजच आमचं बोलणं झालं, ३-डी प्रिंटेड बंदुकांचं डिझाईन छापणाऱ्याबद्दल. लैंगिक प्रकारचे गुन्हे केले म्हणून कालपासूनच पोलिस त्याच्या मागे लागले आहेत. तो पळून तैवान का कुठेसा गेलाय. हे डिझाईन विकण्याचा हक्क त्याला आहे, तो अजूनही पेन ड्राईव्हवरून तो कोड विकू शकतोच, अशी आमची चर्चा आज झाली. गाबो या इसमाचा मोठा समर्थक आहे.

---

गेल्या वर्षी जिथे तीन-महिन्यांत-विदाविज्ञान शिकले, तिथला प्रोग्रॅम डिरेक्टर. पहिल्याच दिवशी स्वतःची ओळख करून देताना म्हणाला, "गे असून NRA (National Rifle Association)चं समर्थन करणारा मी एकटाच असेन बहुदा." त्याचे विनोद फार बोचरे असतात, असं एका ब्रिटिश मित्राचं म्हणणं आहे. मला तो बऱ्यापैकी मजेशीर वाटतो. बागकाम आणि जेंगाचा मोठा मनोरा रचणं यावरून आमच्या चिकार चर्चा होतात.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला खात्री नाही पण बहुतेक कंबरेखालचे जोक हे कामाच्या ठिकाणी स्ट्रिक्टली नो-नो असतात. अर्थात असा काही नियम नाही बट जस्ट टु बी ऑन सेफर साईड. काही तत्वे मी पाळते पैकी अजुन एक म्हणजे आपल्या बॉसबद्दल एकही शब्द अगदी कुणाहीकडे वाकडा काढायचा नाही, निंदा करायची नाही.

असले लेख पाहिजेत.
पिच्चरमधली बंदुकबाजी फारच सोपी दाखवतात का?
-
बारमध्ये बिअर पिऊन तो ग्लास मागे फेकायचा आणि पटकन वळून पिस्तुल कमरेचं काढून तो ग्लास हवेतच गोळी मारून फोडायचा ( काउबॅाइ मुविज) हे पाहणं मजेदार असायचं.
साइलेन्सर पिस्तुल म्हणजे?

अशा ठिकाणी, समजा, एखादा अचानक माथेफिरु झाला आणि सगळ्यांवर गोळीबार करु लागला तर इतर त्याला संपवतील का ? असा एक भयानक विचार आला.

अमेरिकेत म्हणे ट्रॅफिक पोलिसाने अडवल्यावर तुम्ही हात डोक्यामागे ठेवून गाडीतून उतरायचे असते. नाहीतर पोलीस तुम्हाला शूट करू शकतात.
-------------------------------------------
स्टेटच्या टायरनीपासून संरक्षण म्हणून म्हणे प्रत्येकाला बंदूक ठेवण्याचा अधिकार आहे.

या दोन गोष्टी विसंगत नाहीत?

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

महात्मा गांधी गन ओनरशिपचे समर्थक होते म्हणतात. ही देखील विसंगती आहे काय?

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

होय ? कुठशीक , काही सांगाल का ?

भारतात बंदुक बाळगण्याचे अधिकार नेटिव्हांना नव्हते. (लायसन शिवाय) ब्रिटिशांना होते. गांधींना तो ॲक्ट मंजुर नव्हता.
"Among the many misdeeds of the British rule in India, history will look back upon the Act depriving the whole nation of arms as the blackest"

===
गुगल करता करता ही धमाल मीम सापडली.
a

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अच्छा अच्छा , असा ओढून संदर्भ आहे होय .
म्हणजे त्यांना फक्त गोर्यांना अधिकार होता , नेटिव्हांना नाही हे मंजूर नव्हते असा होय , बार ..

आणि ओबामाचा देश कोणता दाखवला आहेत ते वाचलंत का? किती ताज्या दमाच्या डोक्यांतून "धमाल" मीम आलंय, हे लगेच समजेल.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पोलिसाने सांगितल्याशिवाय उतरू नये. दोन्ही हात खिडकीतून आत बघणाऱ्याला स्पष्ट आणि रिकामे दिसतील अशा तऱ्हेने चाकावर अलगद ठेवलेले असावे (म्हणजे गाडी चालवताना चाक नीट धरलेले असते, तसे नव्हे.)

पोलिसाने कागदपत्रे मागितल्यावरच एका हाताने खान्यातून कागदपत्रे काढून द्यावीत.

एका हातानं _कप्प्यातून_ कागदपत्रं काढून द्यावीत.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अमेरिकेत म्हणे ट्रॅफिक पोलिसाने अडवल्यावर तुम्ही हात डोक्यामागे ठेवून गाडीतून उतरायचे असते. नाहीतर पोलीस तुम्हाला शूट करू शकतात.

.
खाली उतरायचेच नसते. पोलिस तुमच्याकडे येतो व लायसन्स वगैरे मागतो. तुम्ही गाडीतच बसून रहायचे असते.
खाली उतरणे हे ॲग्रेसिव्ह पोस्चर मानले जाते - असं ऐकलंय.
.
.

स्टेटच्या टायरनीपासून संरक्षण म्हणून म्हणे प्रत्येकाला बंदूक ठेवण्याचा अधिकार आहे.

.
हो.
.
व हे योग्यच आहे. माझा याला पूर्ण पाठींबा आहे.
.
.

बंदुक वापरण्याआधी तुम्ही या काळज्या घेतल्या का मुसु?

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कसलं भारी! एक नंबर! लय आवडला लेख. कधीतरी हे करायची जाम इच्छा आहे.

(उत्सुक) बॅटमॅन.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नक्की करुन बघ. ज्याम मजा येत्ये. मी ते केल्यानंतरच बंदुकीला घाबरायला लागलो. नाहीतर माझंही द्न्यान सिनेमात पाहिलेल्यापुरतंच मर्यादित होतं.

एक वेगळेच फिलींग येते

एणशीशी मुळे आम्हाला, साध्या बंदुकीतून , अशा पाच-पाच गोळ्या उडवायला मिळायच्या!

आमचे गाव निदान विस्कॉन्सिन - मिनेसोटा चा हा भाग शेती प्रधान आहे, मोठे मोठे धान्य भरायचे सायलोज /सिलोज (https://en.wikipedia.org/wiki/Silo) आहेत. भरपूर जहाजाशी संबंधित कामे होतात. बसने प्रवास करत असल्याने, मला शेतकरी आणि मजूर वर्ग प्रचंड प्रमाणात दिसतो. किंबहुना घामट वासाची, काळे वंगण, किंवा रंग उडालेले कपडे घातलेल्या पण 'वर्कमन बूट्स्' अगदी कणखर बूट घातलेल्या लोकांची प्रचंड सवय झालेली आहे. इतकेच काय ऑफिसातील बायकांकडेही कित्येक कोंबड्या, घोडे आहेत. अशा माझ्या स्त्री सहकाऱ्यांनी ४-५ डझन अंडी फुकट ऑफिसात वाटण्याची सवय झालेली आहे. ऑफिसात फुकट वाटपासाठी ठेवलेले बागेत/शेतात् उगवणारे चेरी टोमॅटो, केल, र्हुबार्ब ऑफिसातुन घरी नेण्याची सवय लागलेली आहे. बायकाही भरपूर राकट आणि कष्टाळू असतात असे लक्षात् आलेले आहे.. नटव्या वा नाजूक फारशा दिसतही नाहीत. प्रचंड कडाक्याच्या थंडीत, बर्फी वादळातही येथील जीवनमान ठप्प होत नाही. म्हातारे खरच जख्ख म्हातारे बाया, पुरुष तस्से वॉकर घेउन बर्फातही ग्रोसरी करतात, काम करतात. कौतुकाचीच गोष्ट आहे.
रेडनेक असल्याचा अभिमान असल्याचेही काहीजण प्रच्छन्न सांगतात.
फ्लीट फार्म आदि चेन स्टोअर्स च्या बाहेर अमेरीकेचे मोठ्ठाल्ले झेंडे असतात, देशभक्ती अगदी उतू गेलेली असते. हे या लोकांना आवडते. ट्रक्स, डस्ट रोडस(धुळीचे रोड जिथुन हे ट्रक्स शेतात जातात), विस्तिर्ण शेते, जंगलात वसलेली एकांडी घरे, एवढेच काय मातकट रंगाचे लहानुले ससे, अस्वले, कोल्हे व हरीणे भरपूर आहेत. अस्वले अगदी ग्रिझली बेअर्स (काळी उंच रानटी) नसतात, सहसा लहानशीच आढळतात. या अस्वलांना घराबाहेर कचरापेटीत (बंद का असेना) जे उरलेसुरले अन्न टाकतो त्याची सवय लागते. ती लागू नये या दृष्टीने काळजी घ्यावी लागते. दगड मारुन अस्वलांना हाकलणे कॉमन आहे असे लक्षात आलेले आहे.
धार्मिक भाग आहे. जिकडेतिकडे प्रो-लाईफ पोस्टर्स लावलेई आहेत, जि-क-डे ति-क-डे. बसमध्येही एकदा एक चर्चा ऐकून खूप मनोरंजन झाले होते ज्यामध्ये एकच एकांडी बाई प्रो-चॉइस होती आणि सर्व (४-५) मुली तिला तावातावाने प्रो-लाइफ मुद्दा पटवुन देत होत्या.

आधी मुळात बंदुकीच्या एका गोळीमधली हिंसक शक्ती याबद्दल जर तुम्ही संवेदनशील असाल तर शूटींग रेंज हा प्रकार हबकवणारा, नर्व्हस करणारा , हादरवणारा असेल हे मी स्वानुभवावरून सांगू शकतो. अमेरिकेतल्या बंदुकांसंबंधातला हिंसाचार पराकोटीला पोचलेला असतानाच्या या काळात बंदुकांबद्दल आपुलकी,आत्मीयता आणि एकंदर धार्मिक वाटतील अशा भावनांनी बोलणारं पब्लिक अगदी रोजच्या ऑफिसच्या उठाबशीत असणं यातल्या विसंगतीची दरी आणि त्यामुळे आमचा पूर्णवेळ वासलेला आ. याहून अधिक काय लिहायचं Smile

बरोबर नीरीक्षण आहे. हा लेख आवडला.

सध्याच्या ऑफिसातला एचेआरवाला धार्मिक आहे, कॅथलिक ख्रिश्चन. अगदी गोड-गोड ख्रिश्चन असतात, तसलाच. सगळ्यांशी छान बोलणारा, सगळ्यांचं भलं व्हायला पाहिजे, असं वाटणारा. आपल्याला समजतं तेच सगळ्या लोकांसाठी चांगलं आणि आपल्याला समजते तेवढीच नैतिकता, यासकट सगळा गोडगोडपणा.

त्याचं म्हणणं, "आपण टीम आउटिंगसाठी कुऱ्हाडी फेकायला जाऊ." खरोखर कुऱ्हाडी फेकणं, यात काही शर्करावगुंठन वगैरे नाही. मला तो प्रकार ऐकूनच ... असो. मी माझ्या लॅपटॉपवरचा आलेख त्याला दाखवत, आलेखाचे अक्ष - axes असला विनोद केला. तो त्याच्या डोक्यावरून गेला.

खरोखर हे असं कधी सुचवलं तर मी उलट प्रस्ताव मांडणार आहे. "एवढे कष्ट करण्यापेक्षा आपण सामुदायिक मॅनि-पेडीसाठी जायचं का? होलसेल डिस्काउंटही मिळेल."

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपल्याला समजतं तेच सगळ्या लोकांसाठी चांगलं

होय हे मात्र मी ही अनुभवलय. विशेषत: धार्मिक व्यक्तींच्या बाबतीत.

आपल्याला समजतं तेच सगळ्या लोकांसाठी चांगलं आणि आपल्याला समजते तेवढीच नैतिकता, यासकट सगळा गोडगोडपणा.

Biggrin

सदैव शोधात..

अमेरिकेत ज्यांना रेडनेक म्हणतात त्यांची भारतीय आवृत्ती कुठची असावी? गो रक्षक? लाठ्या-काठ्या, तलवारी, बंदुका घेऊन मिरवणुका/मोर्चे काढणारे, की असल्या गोष्टींचा निषेध करणार्या सुशिक्षित, विचारी मंडळींना सोशल मीडियावर फुर्रोगामी म्हणून चिडवणारे?

हा केवळ चिडवायचा शब्द नाही. भारतात, पुरोगामींसारखी ती ही एक वेगळी एंटिटी आहे. फक्त, त्यांना मात्र, आपण पुरोगामीच आहोत, असं वाटत असतं!

अगदी अगदी.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जर कोणी मुस्लिमांवर सपाटून टीका केली, परधर्मीय धर्मोपदेशकाविरुद्ध मेणबत्तीमोर्चे काढले तर ते पुरोगामी. आणि ही चाचणी उत्तीर्ण व्हायच्याआधीच आपले घर साफ करायला घेतले तर ते फुर्रोगामी अशी व्याख्या आहे. आधी दुसऱ्यांच्या घरात केर-सेवा करून पुण्य मिळवा आणि मगच आपले घर लावायला घ्या अशी प्रीकन्डिशन असते.

माझा मूळ प्रश्न होता की भारतात आपले खास देशी 'रेडनेक' म्हणवता येण्यासारखे लोक आहेत का? असल्यास त्यांची व्यवच्छेदक लक्षणं कोणती? फुर्रोगामी शब्दाची काय चिकित्सा करता? तो वापरणारे रेडनेक नाहीत असं तुमचं मत दिसतं आहे. ठीक आहे, पण रेडनेक आहेत की नाहीत, असल्यास कोण ते सांगा.

आपल्याकडे वेगवेगळे लालमान्ये असतात. 'यमला पगला दीवाणा' वाले जट्ट, सोन्याच्या चैनी घालणारे जीएसटी (गण्या, संत्या, टॉम्या), करणी सेनावाले राजपूत, वगैरे.

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मरहट्ट्यांचेही एखादे स्पेसीफीक उदाहरण सांगून सोडा की राव ! त्याशिवाय मज्जा नाही !

संभाजी ब्रिगेडला विसरल्याबद्दल आदूबाळ यांचा निषेध.

रेडनेक लोकं हे विषारी नसतात. ते भडकपणे देशाभिमानी असतील. त्यांची जीवनशैली काहीशी राकट असेल. पण हे लोक, संभाजी ब्रिगेडसारख्या विषारी पाली नसतात.

ट्रंपला निवडून देणारे, ब्रेट कॅव्हनॉ धुतल्या तांदळासारखाच आहे असं मानणारे, बंदुकांचा पुरस्कार करणारे लोक विषारी नसतात? ऐकावं ते नवलच!

सगळे लालमान्ये विषारी नसतात, हे ठीक.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अजिबात नाही 'बंदुकीचा पुरस्कार करणे' हे एक मत झाले त्यात विषाचा संबंध नाही. अनेकांचे हे मत आहे की जर वाईटांना बंदुक कशीही उपलब्ध होणारच आहे तर आम्हाला आमचे रक्षण करावयास का नको? ही एक सिन्सिअर विचारसरणी आहे. तसेही यु के मध्ये तरुण खूप पीढी वाया गेलेली आहे असे मी ऐकून आहे. का तर तिथे हा वचक नाही. की आपण कोणास त्रास दिला तर समोरचा बंदुक काढुन स्वत:चे रक्षण करु शकेल.
मी स्वत: बंदुकी बाळगण्याचा पुरस्कार करते. यात विष काही नाही तर वरील मुद्द्यांवरुन बनलेल ते मत आहे.
__________
याउलट दादोजी कोंडदेवांचा उल्लेख आला की 'अरे मी दादा कोंडकेच ऐलकलं' खी:खी: वगैरे घाणेरडी मुक्ताफळे उधळणारे, स्वामी समर्थ (रामदास स्वामी) हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हतेच असा खोटा प्रवाद पसरविणारे, अशा लोकांच्या मनात ब्राह्मणद्वेषाचे वीष होय विषच आहे. हे लोक साप म्हणायच्याही लायकीचे नाहीत. या तर झाल्या पाली.

शुचि च्या प्रतिसादाला जोरदार सहमती.

तसेही यु के मध्ये तरुण खूप पीढी वाया गेलेली आहे असे मी ऐकून आहे. का तर तिथे हा वचक नाही. की आपण कोणास त्रास दिला तर समोरचा बंदुक काढुन स्वत:चे रक्षण करु शकेल.

हा हा हा... असतात एकेकीची, एकेकाची मतं.

स्वामी समर्थ हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हतेच

समर्थ रामदास. स्वामी समर्थ निराळे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

समर्थ रामदासच म्हणायच होतं. वरील माझ्या प्रतिसादात सुधारणा केलेली आहे.

हा हा हा... असतात एकेकीची, एकेकाची मतं.

इथे कोणी यु के चे असतील तर अधिकारवाणीने सांगू शकतात. पण मूळ मुद्दा हा आहे की तरुण पिढी वाया गेलेली नसेलही पण एकंदर कोणी आपल्याला त्रास देउ लागले आणि आपल्याकडे बंदुक असेल तर स्वसंरक्षण नीट करता येते.

एकंदर कोणी आपल्याला त्रास देउ लागले आणि आपल्याकडे बंदुक असेल तर स्वसंरक्षण नीट करता येते.

.
जोरदार सहमती.
.

अरे खरच नवरा तिथे एम एस करायला गेला होता आणि एक तरुण मुला-मुलींचं टोळकं 'पाकी बास्टर्ड्स' वगैरे ओरडत हॉकी स्टिक्स वगैरे घेउन मागे लागले होते. आणखीही काही विदा आहे. पण ते असोच. नसेल गेली ना तरूण् पिढी वाया पण काही गणंग तर असतात ना. आपल्याला आपलं संरक्षण तर करावं लागतं ना.
_______________
अमेरीकेत मारे बंदुक-बंदी केली तरी सगळेच्या सगळे , झाडून सगळे लोक सरेन्डर करणारेत का गन्स? अजुनही काही स्किम्स चालतात जशा बंदुकी सरेंडर करा आणि $२०० ची ग्रोसरी कुपॉन्स घेउन जा वगैरे. मला नाही वाटत खरे वाईट लोक भीक घलत असतील.

एक तरुण मुला-मुलींचं टोळकं 'पाकी बास्टर्ड्स' वगैरे ओरडत हॉकी स्टिक्स वगैरे घेउन मागे लागले होते

.
पाकी लोकांचं रेप्युटेशन जबरदस्त आहे
मोठ्या कष्टानं बनवलंय त्यांनी ते.
.

मोठ्या कष्टानं बनवलंय त्यांनी ते.

हाहाहा अगदी अगदी.

तरुण मुला-मुलींचं टोळकं 'पाकी बास्टर्ड्स' वगैरे ओरडत हॉकी स्टिक्स वगैरे घेउन मागे लागले होते.

त्यांना माफ करा. आम्ही इथे भारतात देखील पुर्वेकडील लोकांना चायनिज म्हणतो.

अमेरिकेत बंदुका असल्यामुळे अमेरिकेतल्या गोऱ्या पोरांना प्रचंड शिस्त लागते. या शिस्तीपोटी ते सरळ भारतीय माणसाचा खून करतात. (बातमी.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ट्रंपला निवडून देणारे, ब्रेट कॅव्हनॉ धुतल्या तांदळासारखाच आहे असं मानणारे, बंदुकांचा पुरस्कार करणारे लोक विषारी नसतात? ऐकावं ते नवलच!

.
Innocent unless proven guilty - हा बकवास आहे, असतोच, व असायलाच हवा.
.

च्यायला, मी केव्हाचं रेडनेक म्हणजे रेमडोके असे का समजतो आहे ?

?