आमच्या ऑफिसमधला एक जण बंदुका बाळगणारा, बंदूक प्रकरणावर प्रेम असलेला आहे. कामाच्या निमित्ताने अनेक महिने संपर्कात आल्यानंतर ज्या गप्पा होतात त्यातून हे सगळं क्रमाक्रमाने कळलेलं. आज या सहकार्याच्या आग्रहावरून - आणि खरं सांगायचं तर कुतुहल अनावर झाल्यामुळे - ऑफिसहून जवळपास असलेल्या शूटींग रेंजला जाण्याचा प्रसंग आला - किंवा संधी मिळाली असंही म्हणू. आम्ही एकंदर पाचजण होतो. त्यातला अजिब्बात अनुभव नसलेला मीच एकमेव. बाकी सर्वजण कमीअधिक फरकाने "त्यातले." एकजण तर मरीन कोअर मधे ८ वर्षं होता.
अमेरिका ही असंख्य विसंगती, विरोधाभास पोटात बाळगणारी खंडप्राय गोष्ट आहे हे वेगळं सांगायला नको. आज संध्याकाळी तासा दीड तासापुरत्या घेतलेल्या य अनुभवातून काही गमतीशीर, काही गंभीर वाटणार्या विसंगत असंगत गोष्टी दिसल्या त्या लिहाव्याशा वाटल्या. यातील काही बाबी तुम्हाला गमतीशीर वाटू शकतील. काही अगदीच मामुली वाटतील. (कुणास ठाऊक काही बाबी काहींना स्फूर्तीप्रद, अगदी थोर वगैरेही वाटू शकतील. कोण जाणे.)
तर आमचा हा सहकारी मॅट मूळचा पोलंड देशाचा. ग्रीनकार्डमार्गे अमेरिकन नागरिक बनलेला. याच्या जपानी ब्रांडच्या SUV वाहनाच्या मागे ट्रंपचे आणि Infowars चे बंपर स्टीकर्स आहेत. :-)
मरीन कोअर मधला असलेला दुसरा सहकारी अमेरिकेत जन्मलेला आणि मुस्लिम धर्माचा. दाढी राखणारा. तोही रीपब्लिकन आणि ट्रंप सपोर्टर आहे की नाही ते मला कळलं नाही आणि अर्थातच ते मी कदापि विचारणारही नाही :-)
मॅट बंदुकींबद्दल बोलत असतो तेव्हा बर्याच गोष्टी माझ्यासारख्या अडाण्याला पहिल्यांदाच कळतात. रिव्हॉल्वर आणि पिस्तुल (उच्चारी "पिस्टल") यातला फरक. त्यातील काडतुसांची मापं (काडतुसाला अॅम्युनिशन अर्थात् अॅमो असं म्हणायचं.) . त्यातला ग्लॉक् हा प्रकार. सेमी ऑटोम्याटीक आणि म्यान्युअल यातला फरक. बंदुक लोड कशी करायची. लोड झाल्यावर सेफ्टी ऑन ऑफ कशी करावी. पिस्तुतलवजा छोट्या आणि मोठ्या नळीच्या बंदुका असे ढोबळ प्रकार. त्यातल्या अचूक नेमबाजी करू शकणार्या नि न करू शकणार्या बंदुका. बंदुका कुठे मिळतात. कुठून घ्याव्यात. कुठे स्वस्त मिळतात. कितपत स्वस्त नि महाग असू शकतात. बंदूक वापरतानाच्या नाना प्रकारच्या काळज्या. बंदुका साफ कशा करायच्या. एकंदरच त्या हाताळायच्या कशा इत्यादि असंख्य आणि अनंत गोष्टी.
तिकडे रेंजवर गेल्यानंतर आमच्या लायसनची - म्हणजे साध्या ड्रायव्हिंग लायसनची - चौकशी. अपघात वगैरे झाले तर कंपनी जबाबदार नाही वगैरे आशयाची लांबलचक करारपत्रं आणि रेंजवर असताना घ्यायच्या काळजीचे अनेकविध धडे यांची उजळणी झाली. रेंजवर आत जायच्या आधी तुम्हाला पारदर्शक चश्मे आणि कानाला अजिबात ऐकू येणार नाही असे इयरप्लग् आणि हेडफोन असे दोन-दोन थर चढवणं हे प्रकार झाले. हे सर्व झाल्यावर मग आत रेंजवर प्रवेश केला.
चष्मा आणि कानावरची आवरणं यांखेरीज आत जाणं म्हणजे डोळ्यांना, कानाना आणि एकंदर मेंदूला कायमची इजा होणं याची ग्यारंटी आहे हे आत गेल्यावर क्षणार्धात कळतं. प्रत्येक गोळी चालवली असतां साधारण सुतळी बाँब फुटावा इतका आवाज येतो आणि त्या प्रचंड लांब परंतु बंदिस्त वातावरणात साधारण १५-२० सेकंदांमधे एक गोळी निघतेच. थोडक्यात कानांवर काही घातलं नाही तर साधारण १० मिनिटात माणूस बहिरा होईल. आणि प्रत्येक गोळी चालवल्यावर तिचं शेल-केसिंग मागे उडतं. शेंगांची टरफलं मागे पडावीत तशी. फक्त ही टरफलं धातूची असतात आणि यातलं एकजरी डोळ्यावर आलं की डोळ्याची गच्छंती.
एकंदर आपल्या दिवाळीमधे जसा फटाक्यांच्या वास वातावरणात असतो तसाच वास रेंजमधे असतो. मात्र फटाक्यांचा होतो तसा धूर अजिबात नाही. थोडक्यात दिवाळीतल्या केपा उडवल्यावर जसा नि जितका वास आणि सुतळी बाँब उडवल्यावर जसा नि जितका आवाज त्यातला प्रकार.
शूटींग रेंजच्या रचनेची तुलना बोलींगशी करता येईल. तशाच लेन्स. फक्त बॉल टाकायच्या ऐवजी गोळीबार करणं. तुमची टारगेट्स तुम्हाला १० फुटांपासून ते अगदी २०० फुटांपर्यंत , टच-स्क्रीन कंट्रोलने पुढे मागे करता येतात. टारगेटच्या पुठ्ठ्यांवर निशाण्यांचे कागद स्टेपल करायचे. बंदुकांमधे गोळ्या भरायच्या नि चालवायच्या.
बंदुकांची नि गोळ्यांची हाताळणी, विविध प्रकारच्या बंदुकांमधे विविध प्रकारे गोळ्या लोड करणं, त्या करताना त्या योग्य मापातल्या निवडणं, त्या भरतानाही बंदूक उडणार नाही ना याची सावधगिरी बाळगणं, लोड झाल्यावर सेफ्टी ऑफ करणं, योग्य रीतीने - आणि दोन्ही हातांनी - बंदूक पकडणं, ट्रिगर वर बोट धरणं , नेम धरणं , बंदूक चालवणं, ती चालवल्यावर जो रिकॉईलचा धक्का बसतो त्यात आपला हात फार हलू न देणं. कुठल्याही परिस्थितीत बंदुकीची नळी रेंजकडेच ठेवणं. चुकूनही तिचा अँगल उलटा तर सोडा पण तिरकाही न होऊ देणं.
यात मी फक्त लोड करून दिलेली बंदूक चालवणं इतकंच केलं. एकंदर ३० गोळ्या चालवल्या असतील तर त्यातल्या पाचेक बाहेरील वर्तुळांमधे गेल्या. बाकी सर्व कोर्या कागदाच्या बाहेरच्या भागातच.
असो. एकंदर रेंजवर दिसलेलं यच्चयावत पब्लिक रेडनेक वाटत होतं. अनेक बंपर स्टीकर्सवर रीपब्लिकन, ट्रंप - आणि हो इन्फोवॉरच्या पाट्या. तिथला आवाज आणि शेल केसिंगचं मागे सतत पडणं, आधी मुळात बंदुकीच्या एका गोळीमधली हिंसक शक्ती याबद्दल जर तुम्ही संवेदनशील असाल तर शूटींग रेंज हा प्रकार हबकवणारा, नर्व्हस करणारा , हादरवणारा असेल हे मी स्वानुभवावरून सांगू शकतो. अमेरिकेतल्या बंदुकांसंबंधातला हिंसाचार पराकोटीला पोचलेला असतानाच्या या काळात बंदुकांबद्दल आपुलकी,आत्मीयता आणि एकंदर धार्मिक वाटतील अशा भावनांनी बोलणारं पब्लिक अगदी रोजच्या ऑफिसच्या उठाबशीत असणं यातल्या विसंगतीची दरी आणि त्यामुळे आमचा पूर्णवेळ वासलेला आ. याहून अधिक काय लिहायचं :-)