अलीकडे काय पाहिलंत? याच्या सहाव्या भागात १००हून अधिक प्रतिसाद झाल्याने हा नवीन भाग सुरू करत आहे.
याआधीचे भाग:१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७
मुक्ता बर्वेच्या निर्मितिसंस्थेचं पहिलं नाटक 'छापाकाटा' पाहिलं. इरावती कर्णिकचं नाटक. ज्यांना गोष्टीबद्दल उत्सुकता कायम ठेवायची आहे, त्यांनी पुढे वाचायचं टाळलेलं बरं.
गोष्ट वेगळी आहे. एक आजारी आई नि तिची अविवाहित तरुण मुलगी यांची ही गोष्ट. आई-मुलीचं नातं म्हटल्यावर जे काही गोडमिट्ट डोळ्यांसमोर येतं त्यातलं हे नातं नाही. एकटेपणातून येणारी असुरक्षितता, अगतिकता, एकमेकींना घट्ट पकडून ठेवू पाहणं, त्याच वेळी सुटायसाठी धडपडणं, लहान गावात / जुन्या घरात / कर्तृत्वाला वाव नसलेल्या अवकाशात घुसमटत राहणं, परिणामी एकमेकींना ओरबाडणं... हे सगळं आहे. नि तरीही एकमेकींबद्दल कर्तव्याचा नि प्रेमाचा धागाही शिल्लक आहे. इथे ही गोष्ट आई-मुलीची आहे. पण ती कुठल्याही दोन व्यक्तींमधल्या नात्याची असू शकतेच... इतकं गुंतागुंतीचं, क्रूर आणि चाकोरीबाहेरचं काही लई दिवसांत पाहिलं नव्हतं.
हे सगळं रीमा आणि मुक्ता बारीक जागांतून भरत राहतात. (त्यांच्या अॅक्टिंगबद्दल काय बोलावे? त्याबद्दल एक स्वतंत्र लेख लिहावा लागेल. केवळ तेवढ्यासाठी मी नाटक पुन्हा पाहणार आहे.) श्वास घ्यायला जागाही न देता.
पण म्हणून नाटक चोख दोषरहित आहे असं अजिबात नाही. आईची व्यक्तिरेखा चक्क काळीकुट्ट वाटते. तिला यत्किंचितही सहानुभूती द्यावीशी वाटत नाही. शेवटाकडे तिच्यातलं आईपण जागं होईस्तोवर. शेवटी आई जो निर्णय घेते, तो घेईपर्यंतचा तिचा असा काही प्रवास असेल की नाही? की केवळ लेखकाला वाटलं, आता टेन्शन बास, नि आईला शहाणपण आलं? तसंच मुलीचंही. मेलेल्या बापाशी या मुलीची इतकी घट्ट बांधीलकी आहे, हे अगदी शेवटी शेवटी मुलगी सांगेस्तोवर कुठेच दिसत नाही.
एखादी मस्त मालिका तब्बेतीत काढायला घ्यावी, चांगली मजा यायला लागावी नि मग एकदम ट्यार्पी मिळत नाही, म्हणून गोष्टीच्या शेवटाकडे नेऊन सगळ्यांना सुखी करून मोकळं व्हावं, तसं काहीसं शेवटी वाटलं. अर्थात याचा दोष कलाकारांकडे नाही, हे पुन्हा आवर्जून नमूद करावं इतकी मजा रीमा नि मुक्ताची जुगलबंदी पाहताना, मुक्ता नि आशीष कुलकर्णीचे सीन्स पाहताना येते.