मराठी ही एक प्रगत भाषा आहे असे मानले जाते. (ती अभिजात भाषा आहे की नाही यावर माझा पास). मराठीभाषिक समाज दहा कोटींच्या घरात आहे आणि जगाच्या सर्व भागांत तो पोचलेला आहे.
एखाद्या 'प्रगत' भाषेमध्ये, रोजच्या आयुष्यातील काही महत्वाच्या संकल्पनांसाठी जर शब्दच अस्तित्वात नसले, तर? विशेषतः लिंगासारख्या मूलभूत विषयाशी संबंधित संकल्पनांसाठी?
काही उदाहरणे: (माझ्या माहितीप्रमाणे. या निरीक्षणांत चुका असल्यास त्या दुरुस्त करेन)
१. महापुरुष, पुरुषोत्तम, युगपुरुष, वास्तुपुरुष, महात्मा, देवमाणूस, नटसम्राट आणि तत्सम शब्द मराठीत सर्रास वापरात आहेत. पण तश्याच प्रकारच्या स्त्रीवाचक शब्दांचा मराठीत दुष्काळ आहे. ते एक तर नव्याने बनवावे लागतात, किंवा बहुतकरून तो अर्थ व्यक्त करण्यासाठी मग थोर इ. विशेषणे "स्त्री" या शब्दाच्या मागे योजावी लागतात.
२. Sex आणि gender यांतील फरक ठळकपणे दाखविणारे शब्द मराठीत प्रचलित नाहीत.
३. लैंगिक प्रवृत्तींशी संबंधित अचूक आणि अर्थवाही शब्द मराठीत उपलब्ध नाहीत. "समलिंगी" चा मूळ अर्थ "समान किंवा त्याच लिंगाचे". पण "समान लिंगाच्या व्यक्तींकडे प्रणयाकर्षित होणाऱ्या व्यक्ती" किंवा "समान लिंगाच्या व्यक्तींशी संभोग करणाऱ्या व्यक्ती" या संकल्पनांसाठी मराठीत अचूक शब्द नाहीत. त्यासाठी "समलिंगी" हाच शब्द वापरला जातो. त्यातही "समलिंगी" पुरुषांबाबत थोडेतरी बोलले/लिहिले जाते. "समलिंगी" स्त्रियांबद्दल तेवढेही नाहीच. भाषेने इथेच मर्यादा गाठली, तर मग LGBTQ+ वगैरे बारकाव्यांचा तर आनंदीआनंदच.
आणखीही उदाहरणे देता येतील.
मराठी भाषेच्या या मर्यादा गंभीर आहेत. आणि 'मागणी तसा पुरवठा' या नियमानुसार असे म्हणावे लागेल, की मराठीभाषिक समाज ह्या कल्पनांबद्दलच उदासीन आहे, किंवा वरील कल्पनांना मराठी समाजात अनुल्लेखाने मारले जात आहे. त्यांना मराठीभाषिक समाजात प्राधान्य नाही. त्या दडपल्या जात आहेत की काय अशी शंका घेण्यासही वाव आहे. स्त्रिया आणि "समलिंगी" लोकांची यामुळे कुचंबणा होत असण्याचा धोका संभवतो. यांत कार्यकारणभाव आहे काय, आणि असल्यास तो कोणत्या दिशेने (कारण कोणते आणि कार्य कोणते) आहे?
इंग्रजीमधील तांत्रिक किंवा पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द शोधण्याचा उत्साह काही मराठीभाषिक दाखवतात. माझ्या अनुभवानुसार हे लोक बहुतकरून मध्यमवयीन (खरेतर वृद्ध), मध्यमवर्गीय, अभिजन (साधारणतः ब्राह्मण) असतात. त्यातही पुरुष बहुसंख्य. असे मराठी प्रतिशब्द संस्कृतशी कुस्ती करून बनवले जातात (कारण ते संस्कृतमध्येही नसतातच!). पण मराठीतील उपरोल्लेखित लिंगविषयक शब्दांचे दारिद्र्य दूर करण्यास त्यांच्या "अजेंड्यामध्ये" प्राधान्य दिसत नाही. हे मुद्दाम होते असे मी ह्मणणार नाही, पण हे लक्षणीय आहे असे मला वाटते.
मराठी भाषेतील या 'शाब्दिक वाळवंटांबद्दल' आपणांस काय वाटते? त्यांचे निर्मूलन कसे करावे, आणि मुद्दलात करावेच का? की शक्य तिथे सरळ इंग्रजी शब्दांचाच वापर करावा?
थोड्याफार फरकाने इतर भारतीय भाषांतही हीच परिस्थिती असावी असा माझा अंदाज आहे (हिंदीव्यतिरिक्त इतर भारतीय भाषांचा मला अनुभव नाही). पण आपल्या माहितीनुसार इतर भारतीय भाषांत असे शब्द रुजले आहेत काय? त्यातून मराठीसाठी उपयोगाचे काही निघू शकेल काय?
-------------------------------------------------------------------
जाताजाता: नव्या लिखाणासाठी "ऐसी" वर सध्या उपलब्ध असलेल्या categories (मौजमजा, ललित, इत्यादि) पैकी कुठल्या category त हा लेख टाकावा ते न समजल्यामुळे सध्यापुरता तो "समीक्षा" या category त टाकला आहे. इतर कोणती category यासाठी योग्य होईल याबद्दल संपादकांनी सल्ला द्यावा.