सन्मानाने मरण्याचा हक्क

जीवन व मृत्यु
आधुनिक मानवी जीवन हे एक अजब रसासन आहे. डॉक्टर्स, वैज्ञानिक, व संशोधकांसाठी हे चमत्कारसदृश जीवन एक न सुटणार कोडं ठरत आहे. जीवनाइतकेच मरणसुद्धा आजकाल वुचकळ्यात टाकत आहे. जीवन म्हटल्यावर मरण त्याचा पिच्छा सोडत नाही. फक्त मरण केव्हा, कुठे, कधी व ज्याप्रकारे येऊ शकतो याचा नीटसा अंदाज येत नाही. प्रत्यक्ष खून वा आत्महत्या यांचा अपवाद वगळता मरण स्वत:च्या हातात नसते. दुर्दैवी अपघात, मृत्युच्या दारात पोचवणारे दुर्धर आजार, जीव घेणारे शारीरिक डिसऑर्डर्स, आपल्या मृत्युला कारणीभूत ठरतात. मृत्युशी झुंज काही वेळा काही क्षणात आटपते. व काही वेळा संपता संपत नाही. एक मात्र खरे की काहीही करून जिवंत ठेवण्याच्या प्रयत्नात असलेले आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान व त्यावर बेतलेली रोगोपचार पद्धती दिवसे न दिवस अत्यंत वेदनामय ठरत आहेत. रुग्णाचा आपल्या प्रकृतीविषयीचा हेळसांडपणा, वेळीच न केलेले रोगनिदान, रोग निदान व उपचारातील एखादी छोटीशी, क्षुल्लक चूकसुद्धा रुग्णाला असह्य वेदनेत ढकलू शकते. रुग्णाला आपले प्राण, मान-सन्मान, प्रतिष्ठा पणाला लावूनच रोगोपचाराचा सामना करावा लागतो. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा वापर करताना रुग्णाला आपण एक निर्जीव वस्तु आहोत असे वाटू लागते. आपल्या भावना, समाजातील आपले स्थान, यांना पूर्णपणे विसरण्यास ही उपचार पद्धती भाग पाडते. अशा वेळीच आपल्याला हमखास स्वेच्छामरण (युथेनेशिया) आठवू लागते. परंतु बहुतेक वेळा असे आठवणे भावनेच्या आहारी गेल्यामुळे होते. खरोखरच स्वेच्छामरण - दयामरण याबद्दल सहानुभूती असल्यास निरोगी आयुष्य जगत असतानाच काही प्रयत्न करायला हवे होते. म्हणूनच ही चळवळ तरुणांची नव्हे, तर वृद्धांची, रुग्णांची आहे असे वाटू लागते.

'चांगले मरण'
मरण यातनेतून (कायमची) सुटका मिळण्याची अंधुकशी आशा या युथेनेशियातून आहे. परंतु याला अजूनही कायदेशीर मान्यता नाही. जागतिक स्तरावर युथेनेशियाची भरपूर वाहवा होत असली तरी आपल्या देशातील कायदे - कानून, तज्ञ व सामान्यांची मानसिकता या गोष्टीला अजिबात थारा देत नाहीत. युथेनेशिया हा शब्द ग्रीक भाषेतला असून त्याचा शब्दश अर्थ 'चांगले मरण' असा आहे. अत्यवस्थ रुग्णाला कुठल्या स्टेजपर्यंत ('जिवंत' ठेवू शकणार्‍या) वैद्यकीय सुविधा पुरवाव्यात वा मृत्युपर्यंतचा रुग्णाचा प्रवास शक्यतो वेदनारहित करण्यासाठी कुठले उपचार करावेत यासंदर्भातील मार्गदर्शक तत्व - नियम करणारी अधिकृत संस्था म्हणून इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केर मेडिसिन कमीटी या समितीला मान्यता आहे. परंतु या समितीच्या मते युथेनेशिया हे रुग्ण व इतरांना सुटका करण्यासाठी औषधोपचाराद्वारे डॉक्टरांनी केलेली हत्या असते.
मृणाल सरकार या नोयडा येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या वरिष्ठ वैद्यकीय सल्लागाराच्या मते युथेनेशिया ही एका प्रकारे जाणीवपूर्वक केलेली सक्रीय हत्या (active killing) असते. नैतिकतेच्या दृष्टिकोनातून व कायदेशीररित्या त्याला नाकारायला हवे. इच्छामरणाचे उदात्तीकरण करणारे या संदर्भात नवीन नवीन शब्दांची भर घालत असतात. त्यापैकी दयामरण, निष्क्रीय युथेनेशिया (passive euthenesia), या शब्दांनी अनेक सुशिक्षितांना आकर्षित केले आहे. या प्रकारात रुग्णाला जिवंत ठेवू शकणाऱी व्यवस्था (उदा अन्न - पाणी वर्ज्य करणे, व्हेंटिलेटर काढून टाकणे, औषधं बंद करणे इ, इ, ) नाकारून हृदयाला ऑक्सिजनचा वा मेंदूला रक्ताचा पुरवठा बंद करून रुग्णाला मृत्युच्या हवाली केले जाते. तरीसुद्धा डॉ. सरकार यांच्या मते युथेनेशिया व उपचार नाकारणे हे दोन्ही वेगवेगळे मुद्दे असून त्यांची सरमिसळ करता कामा नये.

इतर देशातील स्थिती
आपल्या देशातील व इंग्लंड - अमेरीकेतील या विषयीचे कायदे व नियम यांची तुलना केल्यास काही गोष्टी स्पष्ट होतील. या देशात ICU मधील रुग्ण यानंतरच्या कुठल्याही उपचाराला प्रतिसाद देत नसल्यास रोगोपचार नाकारणे वैद्यकीय दृष्ट्या समंजस गोष्ट ठरू शकते. या प्रगत राष्ट्रातील डॉक्टर्स नेहमीच हा समंजसपणा दाखवत आले आहेत. या देशात अती दक्षता विभागा (ICU )तील 80-90 टक्के रुग्णांचा मृत्यु रोगोपचार नाकारल्यामुळे वा बुद्ध्यापुरस्कर बंद केल्यामुळे होत असतात. अनुभवांती मिळालेल्या ज्ञानाची ही फलश्रुती आहे व आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतीला हे मान्य आहे. त्यामुळेच तेथील कायदे - नियम याला अनुकूल आहेत. डॉक्टर्सचा रुग्णाविषयीचा निर्णय अंतिम ठरतो. परंतु आपल्या येथे मात्र यासंबंधी कुठलेही लिखित वा अलिखित असे कायदे, मार्गदर्शी तत्व, नियम नाहीत. रोगोपचार कुठपर्यंत चालू ठेवावीत वा केंव्हा बंद करावीत यासंबंधी कायदा मौन बाळगून आहे. त्यामुळेच भारतीय डॉक्टर्स याविषयी कुठलेही नि:संदिग्ध निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नसतात. कायद्याच्या कचाट्यात सापडू नये म्हणून (महागडी) रोगोपचार सुरू ठेवतात. यात स्वत:चे श्रम, प्रतिष्ठा, वेळ व रुग्णाचा पैसा वाया घालवत राहतात. अशा सुविधांचा तुटवडा असताना इतर रुग्णांना तातडीच्या उपचारापासून वंचित ठेवतात. काही आजारांना (आता तरी) कुठलेही औषधं नाहीत याची माहिती असूनसुद्धा काही चमत्कार घडण्याची वाट पाहतात. कायद्याच्या बडग्यातून वाचण्यासाठी रुग्णाला (व त्याच्या नातलगांना) खोटी आशा दाखवत राहतात. भरमसाठ पैसे खर्च करायला भाग पाडतात. इतर प्रगत देशामध्ये मात्र (शक्य असल्यास) रुग्णाची संमती वा जवळच्या नातेवाइकांच्या संमतीने निर्णय घेवून उपचार थांबवले जातात. काही वेळा डॉक्टर्स व रुग्ण (वा नातेवाईक) यांच्यात एकमत होत नसल्यास त्या देशातील न्यायालये या संबंधी निर्णय घेऊ शकतात. आपल्या देशातसुद्धा या प्रकारच्या लवचिकतेची आता अत्यंत गरज आहे. उपचार बंद करणे म्हणजे युथेनेशियाला आमंत्रण असा अर्थ न काढता वास्तवाचा स्वीकार करणे असा असावा. प्रसिद्धी माध्यमं या दोन्हींची सरमिसळ करत असल्यामुळे जनसामान्यापर्यंत चुकीचा संदेश पोचत आहे.

आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धती
आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धती आता संक्रमणावस्थेतून जात आहे. कालमान परिस्थितीनुसार हा व्यवसायही बदलत आलेला आहे. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला जात आहे. आताच्या डॉक्टर्संना फार मोठी जवाबदारी पेलावी लागते. व्यवसायातील बारकावे व गुंतागुंतीचे मुद्दे वाढत आहेत. डॉक्टर्स नेमके काय करत आहेत हे समजून घेण्यासाठी रुग्ण, त्याचे नातेवाईक, (व काही वेळा न्यायालयांचेसुद्धा) प्रथमिक ज्ञान अपुरे पडत आहे. त्यामुळे उपचाराला प्रतिसाद न देणाऱ्या रुग्णाचे काय करायचे हा एक यक्षप्रश्न ठरत आहे. अशा रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स सातत्याने युथेनेशियाची बाजू घेत असतात व या गोष्टींचा अनुभव नसणारे डॉक्टर्स मात्र युथेनेशियाला नेहमीच विरोध करत आलेले आहेत. 2000 वर्षापूर्वीच्या हिपोक्रेटसच्या आणा-भाकांना ("इतरांना खुश करण्यासाठी रुग्णाला मरण यावे म्हणून मी प्राणघातक औषध देणार नाही") चिकटून राहिल्यास व सर्व डॉक्टर्स त्याप्रमाणे तंतोतंत वागू लागल्यास युथेनेशिया व त्याचे इतर प्रकार चुकीचे ठरतील. नैतिकतेच्या व्याख्या बदलत आहेत. या बदलत्या नीतीमूल्यांच्या आधारावरून युथेनेशियाचे मूल्यमापन करणे योग्य ठरेल.

युथेनेशियातील प्रकार
कुठल्या परिस्थितीत युथेनेशियाला शरण जावे असे वाटते या प्रश्नाचे उत्तर तितकेसे सोपे नाही. डॉ. सुनील श्रॉफ यांच्या नीरिक्षणानुसार युथेनेशियाची विनंती करणऱ्यात दोन प्रकार आहेत. कर्करोगासारख्या दुर्धर रोगाने जर्जरित झालेला व अशा रोगामुळे टोकाची वेदना भोगत असलेला आणि अशा रोगातून सुटका होण्याची शक्यता नाही याची खात्री असलेला एक वर्ग आहे. त्यांना त्यांच्या वेदना सहन होत नसल्यामुळे युथेनेशिया हवीहवीशी वाटते. परंतु अशा वेदना कमी करणारे हॉस्पिटल्स आपल्या देशात आहेत. फक्त त्यांची संख्या तुरळक व त्यासाठीचा खर्च न परवडणारा असल्यामुळे मरणाची याचना केली जाते. कही वेळा ही याचना खुद्द रुग्ण वा त्याच्या जवळच्या नातेवाईकाकडून केली जात असते. अशा प्रसंगी उपचार करणारे डॉक्टर्स वेदनाशामक डोझमध्ये वाढ वा गुंगी य़ेणार्‍या औषधांचा मारा करून रुग्णाला मृत्युच्या दारी नेऊ शकतात. परंतु आपल्या देशातील कायद्यानुसार असे काही करणे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ठरू शकतो व डॉक्टरला अटक होऊ शकते.
दुसर्‍या प्रकारात रुग्ण पूर्णपणे कोमावस्थेत गेलेला असल्यामुळे रुग्णाला हॉस्पिटल व्यतिरिक्त इतर कुठेही ठेवणे अशक्य असते. ही कोमावस्था किती काळ असेल याचा अंदाज नसतो. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकावर मानसिक व आर्थिक ताण पडतो. त्यातून सुटका करून घेण्यासाठी युथेनेशियाची याचना केली जाते.

जीवन ही देवाची देणगी
शेवटची घटका मोजणार्‍या रुग्णांना दिलासा देणार्‍या जीवोदय या हॉस्पाइस संस्थेच्या ललिता थेरेसा यांना युथेनेशियाच्या भलेपणावर अजिबात विश्वास नाही. “आपण कसे काय रुग्णांचा जीव घेऊ शकतो. जीवन ही देवाची देणगी आहे. त्याला मातीमोल करता कामा नये. मृत्यु ही एक अत्यंत नैसर्गिक घटना आहे. व तिचा शांतपणे स्वीकार करायला हवा. आमच्यासारख्या संस्था मृत्युशी सामना करण्यासाठी रुग्णांचे मन वळवू शकतात. शांतपणे सुख-समाधानाने शेवटचा श्वास घ्यावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. मृत्यु अटळ आहे याचा अर्थ माणसाला जिवेनिशी मारणे असा होत नाही. युथेनेशिया त्याचे उत्तर होऊ शकत नाही. अतीव प्राणांतिक वेदनेमुळे रुग्णाची मानसिकता लवकरात लवकर मरण याकडे वळत असले तरी उद्या हाच रुग्ण आपली इच्छा बदलू शकतो. रुग्णाच्या मानसिकतेचा वेध घेणे सोपे नाही. मुळात मृत्यु कुणालाही नको असतो.”
फोर्टिस हॉस्पिटलचे कर्करोगतज्ञ डॉ अमित अग्रवाल यांच्या मते जनसामान्यातील युथेनेशियाविषयीचे कमालीचे अज्ञान व संवेदनांचा अभावच समस्या ठरत आहे. टर्मिनल रुग्णांचे नेमके काय करायचे यासंबंधीचे कायदे, मार्गदर्शक तत्व, सुस्पष्ट नाहीत. रुग्णाविषयीचे सर्व वैद्यकीय उपचार थकले आहेत अशी स्पष्ट कल्पना डॉक्टर्स रुग्ण वा रुग्णाच्या नातेवाईकांना देऊ शकतात. रुग्णाच्या यातना कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करू शकतात. परंतु यानंतरची जवाबदारी डॉक्टर्सवर न ढकलता रुग्ण वा त्यांच्या नातेवाईकांनी ध्यायला हवी.

आपल्या देशातील कायदा
कर्नाटक उच्च न्यायालयातील अड्व्होकेट कोठारी यांच्या मते आपल्या देशात स्वेच्छामरण वा दयामरण यांना कायद्याची मान्यता नाही. अशा प्रकारच्या गोष्टींना कुणी मदत करण्याच्या प्रयत्नात असल्यास त्यांच्यावर आत्महत्येला प्रोत्साहन या कलमाखाली भारतीय दंड विधान 306 वा खून करण्याचा प्रयत्न यासाठीचा भारतीय दंड विधान 304 नुसार अटक व शिक्षा होऊ शकते. अशाविषयी डॉक्टरांचा पुढाकार असल्यास भारतीय दंड विधान 300 नुसार अटक-दंड-शिक्षा होऊ शकते. म्हणूनच गेली अनेक वर्षे कोमात असलेल्या अरुणा शानभाग हिचे अन्न पाणी बंद करण्यासाठी तिच्या हितचिंतक मैत्रिणीने कोर्टाकडे धाव घेतली आहे. कोर्टाने परवानगी नाकारल्यास तिचे अन्न पाणी बंद करता येत नाही. अमेरिका - इंग्लंडमध्ये टर्मिनल रोग्यांच्या ( वा त्यांच्या नातलगांच्या) संमतीने औषधोपचार बंद केल्यास डॉक्टर्स वा नातेवाईकांना जवाबदार धरले जात नाही. परंतु आपल्या येथील कायद्याचे स्वरूप pro-life असल्यामुळे अशा प्रकाराना अनुमती नाही. घटनेने आपल्याला सन्मानाने जगता यावे यासाठी काही हक्क व तरतुदी बहाल केल्या आहेत. परंतु त्यात सन्मानाने मरण्याच्या हक्काचा उल्लेख नाही. म्हणूनच याविषयी येवढा गदारोळ केला जात आहे.

युथेनेशिया ही एक नैतिक समस्या
युथेनेशिया ही एक नैतिक समस्या आहे. विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आजच्या समाजाला अनेक प्रकारच्या नैतिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अत्याधुनिक सोई-सुविधांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असला तरी समाजामधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभावच या परिस्थितीला कारणीभूत ठरत आहे. बहुतेकांची मानसिकता रूढी -परंपरांना चिटकून रहाण्याकडे आहे. डॉक्टर्सही याला अपवाद नाहीत. रुग्णाचे प्राण वाचवणे यासाठी शर्थीचे प्रयत्न करणे हाच वैद्यकीय शिक्षणाचा मूळ गाभा असल्यामुळे बहुतेक प्रशिक्षित डॉक्टरांची मानसिकता युथेनेशियाच्या विरोधी जात आहे.
जगभरातील बहुतेक धर्मांचा कलसुद्धा जीवन हे पवित्र असून कुणाचाही जीव घेण्याचा कुणालाही हक्क नाही अशीच शिकवण धर्म देत असतात. रुग्णाच्या वेदना त्याच्या (या जन्मीच्या वा पूर्व जन्मीच्या) पापाचे भोग आहेत व यातना भोगल्याशिवाय मुक्ती नाही असेच (काही) धर्म मानतात. युथेनेशियाला धर्मांचा हा अडसर पार करणे गरजेचे आहे.
वैयक्तिक स्वातंत्र्यावषयी जागरूक असणारे मात्र आपापल्या जीवनपद्धतीप्रमाणेच आपली मृत्युची वेळ व म्रृत्युची तऱ्हा कशी असावी याचा विचार करत आहेत. त्यांच्या मते टर्मिनल रुग्णांना जिवंत ठेवण्याचा अट्टाहास त्यांच्या असहायतेचा फायदा घेत त्यांना वेदनामय, प्रेतवत जिणे जगण्यास भाग पाडत आहे. अशा रुग्णांना विनाकारण मृत्युपासून दूर ठेवले जात आहे. सन्मानाने मरण्याचा हक्क मागणाऱ्यांना प्रत्येक व्यक्तीला स्वत:चे जीवन सन्मानाने जगता यावे हे मान्य आहे. परंतु जर शक्य नसल्यास सन्मानाने मरण्याचा हक्कही असावा. कृत्रिम उपायाने प्रेतवत जिवंत राहण्यापेक्षा मरण पत्करण्याची मुभा असावी व या सर्व गोष्टींना कायद्याचे अधिष्ठान लाभावे.

युथेनेशियाची प्रक्रिया
परंतु अशा प्रकाच्या कायद्याला मान्यता देण्यापूर्वी भरपूर काळजी घ्यायला हवी असा इशारा डॉ सुनील श्रॉफ देत आहेत. युथेनेशियाचा गैरफायदा घेत खून - आत्महत्या या संबंधीच्या कायद्याच्या कचाट्यातून सुटणे सहज शक्य आहे. डॉक्टरांशी संगनमत करून रुग्णाचा जीव घेणे सहज शक्य आहे. रुग्णहित व समाजहित या दोन्हींचा विचार करूनच कायद्याची रचना केलेली असावी. त्यात युथेनेशियाची सुस्पष्ट व नि:संदिग्ध व्याख्या असावी. युथेनेशियाला परवानगी देणारी प्रक्रिया जास्तीत जास्त अचूक असावी. त्यात कुठलेही पळवाटा नसावेत. सर्व साधक बाधक विचार करूनच एकमुखाने घेतलेला असा हा निर्णय असावा. हृदय, मूत्रपिंड, इत्यादी अवयवारोपणासाठी मेंदू-मृत रुग्णाच्या संदर्भातील नियामक समिती ज्याप्रकारे कार्य करते तशीच कार्य प्रणाली व निर्णय व्यवस्था युथेनेशियासाठी हवी. या नियामक समितीत रुग्णाच्या हितसंबंधीयांचा समावेश नसावा. शासन, समाज वा कुटुंब यांना नको असलेल्यांना कायमचे दूर करण्यासाठी या कायद्याचा गैरवापर होण्याची शक्यता असल्यामुळे यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. नियामक समितीच्या सदस्यांना आपण एका जिवाशी खेळत आहोत याचे स्पष्ट भान असायला हवे. प्रत्येक रुग्णाचा स्वतंत्र रीतीने गंभीरपणे विचार व्हायला हवा. क्षुल्लक कारणासाठी घाई गडबडीने लवकरात लवकर निर्णय प्रक्रिया उरकण्याचे प्रयत्न करत असल्यास युथेनेशियाच्या मूळ उद्देशालाच काळिमा फासल्यासारखे होईल.

युथेनेशियाला मान्यता
2002 साली नेदरलँड या देशाने सर्वात प्रथम युथेनेशियाला मान्यता दिली. परंतु त्यासाठी खालीलप्रमाणे अटी घातल्या.
• यापुढे रोगोपचार शक्य नाही याची खात्री
• रुग्ण प्राणांतिक वेदना सहन करत आहे याची जाणीव
• रुग्णाला मृत्युशिवाय पर्याय नाही याचे निदान व
• रुग्ण मरणाची याचना करत आहे याची शहानिशा
नेदरलँडप्रमाणेच बेल्जियम, लक्सेंबर्ग, स्वित्झर्लंड व थायलँड या राष्ट्रांनीसुद्धा काही (जाचक) अटी घलून मान्यता दिली आहे. अमेरिकेतील ऑरेगॉन व वॉशिंग्टन स्टेट या राज्यात डॉक्टरांनी रुग्णाला मरण लवकर येण्यासाठी मदत करण्यासंबंधी काही विशिष्ट अटी घालून मान्यता दिली आहे. उत्तर ऑस्ट्रेलिया येथे याविषयीचा कायदा पास झाला असला तरी त्याचा दुरुपयोग होत आहे हे कळल्यानंतर कायदा मागे घेऩ्यात आला आहे.

व्यंकटेश व अरुणा शानभाग यांची केस
युथेनेशियाच्या संदर्भातील आपल्या देशातील अलिकडेच घडलेल्या दोन उदाहरणांचा आढावा घेणे उचित ठरेल. 25 वर्षे वयाच्या के व्यंकटेश या राष्ट्रीय बुद्धीबळपटूला Duchenne's Muscular Dystrophy या दुर्धर आजारामुळे व्हेंटिलेटर वापरून कृत्रिमरित्या जिवंत ठेवावे लागले. त्याला स्वतला आपल्याला मृत्यु शीघ्रपणे यावा व मृत्युपश्चात आपले काही महत्वाचे अवयव इतर रुग्णांना अवयवरोपणासाठी द्यावे असे वाटत होते. त्याची ही अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या आईने पुढाकार घेवून आंध्र प्रदेश येथील अवयवरोपणासाठी मदत करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेला विनंती केली. परंतु रुग्ण हा ब्रेन डेड् नसल्यामुळे प्रचलित कायद्यानुसार हे शक्य नाही असे त्याच्या आईला कळवण्यात आले. तिने नंतर उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.परंतु न्यायालयानेही Human Organ Act, 1995 चा आधार घेत ब्रेन डेड् नसल्यामुळे अवयव काढून घेता येत नाही असा अंतिम निकाल दिला. या कायद्यानुसार मेंदू-मृत झाल्यानंतरच त्या रुग्णाचे हृदय, मूत्रपिंड, पुफ्फुस, यकृत (Liver) , अग्नीपिंड(Pancreas) इत्यादी अवयव काढून घेते येते. अल्झेमेर वा Duchenne's Muscular Dystrophy चे रुग्ण केवळ डोळे, हृदयाच्या जडपा, हाडांची उपास्थी यांचेच मृत्युपश्चात दान करू शकतात.
मुंबई येथील एका हॉस्पिटलमध्ये अरुणा शानभाग गेली तीस वर्षे कोमावस्थेत आहे. 1973 मध्ये एका सफाई कामगाराने तिच्यावर बलात्कार करून लोखंडी साखळीने तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला होता. त्या दिवसापासून ती त्या मानसिक धक्क्य़ापासून सावरू शकली नाही. ती आंधळी व बहिरी झाली आहे. व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये असले्ल्या अरुणाचा मेंदू बाह्य मदतीविना केवळ श्वासोच्छ्वास करण्याइतपत काम करू शकतो. इतर सर्व कार्य पूर्णपणे ठप्प झालेले आहेत. वैद्यकीय व्यवसायाला अरुणाची केस आव्हानात्मक वाटते. परंतु त्यात विशेष प्रगती झालेली नाही. अशा प्रसंगी नेमके काय करायला हवे? अशा रुग्णांना लवकरात लवकर मृत्यु यावा यासाठी काही प्रयत्न करायचे की मृत्यु येईपर्यंत वाट पहायचे? पिंकी विराणी या अरुणाच्या पत्रकार मैत्रिणीने अरुणाच्या दुखद आयुष्यावर एक पुस्तक लिहिले आहे. तिनेच अरुणाविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. पिंकीच्या मते अरुणा गेली 36 वर्षे कोमावस्थेत असून दिवसातून दोन वेळा बळजबरीने तिच्या पोटात अन्न पाणी ढकलत असल्यामुळे नाम के वास्ते ती जिवंत आहे असे म्हणावे लागेल. तिच्या या व्हेजिटेटिव्ह अस्तित्वात कुठलाही सन्मान नाही, अस्तित्वाची जाणीव नाही. माणूस म्हणवून घेण्याची तिची स्थिती नाही. गेल्या छत्तीस वर्षात तिचे भाऊ - बहिण वा कुणी नातलग तिच्याकडे फिरकले नाहीत. या असह्य जीवनातून तिची सुटका व्हावी यासाठी तिचे अन्न पाणी बंद करऩ्याची सक्ती करावी असे तिने अर्ज केला आहे.
यावरून युथेनेशियाचा प्रवास किती खडतर आहे याची कल्पना येईल.

पूर्व प्रसिद्धी: उपक्रम, मे, २०१०

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

पिंकीच्या मते अरुणा गेली 36 वर्षे कोमावस्थेत असून दिवसातून दोन वेळा बळजबरीने तिच्या पोटात अन्न पाणी ढकलत असल्यामुळे नाम के वास्ते ती जिवंत आहे असे म्हणावे लागेल. तिच्या या व्हेजिटेटिव्ह अस्तित्वात कुठलाही सन्मान नाही, अस्तित्वाची जाणीव नाही. माणूस म्हणवून घेण्याची तिची स्थिती नाही. गेल्या छत्तीस वर्षात तिचे भाऊ - बहिण वा कुणी नातलग तिच्याकडे फिरकले नाहीत. या असह्य जीवनातून तिची सुटका व्हावी यासाठी तिचे अन्न पाणी बंद करऩ्याची सक्ती करावी असे तिने अर्ज केला आहे.

याचिका फेटाळली असली तरी पॅसिव्ह युथेनेशियाबद्दलच्या गाईडलाईन्स कोर्टाने ठरवून दिल्या आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नुकतीच एक बातमी वाचली होती की स्वेच्छामरण स्वीकारण्यासाठी जगभरातले पर्यटक स्वित्झर्लंडला जातात. कारण तिथे अशा इच्छुक लोकांना वैद्यकीय मदत करणार्‍या संस्था आहेत. एका इंजेक्शनने वेदनारहित मरण येते. त्यामुळे स्विस वारीसाठी(एकमार्गी) आत्तापासून पैसे साठवायला सुरवात केली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही जंतुंची इतकी गर्दी जगात आहे का रास्त |
भरती विषाणुंचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त ||

डॉक्टर अॅन टर्नर यांच्या आयुष्यावर बेतलेला 'अ शॉर्ट स्टे इन स्वित्झरलंड ' एकूणच अतिशय विवादास्पद अश्या इच्छामरणाच्या विषयाला विविध अंगांनी स्पर्श करणारा हा अप्रतिम सिनेमा त्यात डॉ.अॅन टर्नर यांना असिस्टेड मृत्यू मिळवण्याकरीता स्वित्झरलंडला जावे लागते. अत्यंत हृद्य प्रसंग आणि संवाद . डॉ. अॅन टर्नर चे काम करणाऱ्या ज्यूली वॉल्टर्स बाईंचा तितकाच संवेदनशील आणि थोर अभिनय. पहावाच असा सिनेमा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परंतु याला अजूनही कायदेशीर मान्यता नाही.

सरकारने हा अधिकार जबरदस्तीने/आपणहून स्वतःकडे घेतलेला आहे - की ज्याद्वारे सरकारला हे कायदेशीर व ते बेकायदेशीर ठरवता येते.

म्हणे - We will err on the side of life rather than death. पण सरकारला ही परमिशन कुणी दिली ??? Erring on the side of life and denying the individual the option to end his/her life amounts to forcing an individual to live for the sake of others. And those OTHERS are a large number of individuals. So we have majority ganging up against 1 person.

म्हणे - आपला समाज तेवढा प्रगल्भ नाही. काय बकवास आहे यार ???

म्हणे - याचा दुरुपयोग होईल. कशावरून ????

Individual owns his/her body and Individual does not need permission from Govt to terminate his/her life.

---

संभाव्य आक्षेप -

१) गब्बर हे वाटते तितके साधे सोपे सरळ नैय्ये. क्लिष्ट आहे.
२) गब्बर चा टोकाचा व्यक्तीस्वातंत्र्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अंशतः सहमत आहे.
स्वेच्छा जन्म-मृत्यू नियंत्रण कायद्याने कंट्रोल करण्याची गरज दिसत नाही.
मात्र सदोष मनुष्यवधाची व्याख्या स्पष्ट हवी नी त्याला मात्र कायद्याने शासन हवे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषीकेश नानावटींच्या लेखातील (http://www.mr.upakram.org/node/2074) पुढील उतारा वाचा -

ज्या समाजाने उघड उघड धर्म व नीतीचे निमित्त करून सती पद्धतीचा पुरस्कार करत स्त्रीला स्वत:ला जाळून घेण्यास भाग पाडत होते त्या समाजाच्या हाती इच्छामरणाचे वा दयामरणाचे हत्यार दिल्यास हा समाज कुठल्या थराला जाईल याची कल्पना न केलेली बरी. काहीना हा लांछनास्पद इतिहास उकरून काढण्याची गरज नाही असे वाटेल. परंतु माणूस स्वार्थासाठी किती क्रूर होवू शकतो याची शेकडो उदाहरणं आपण रोज वाचतच असतो. मालमत्ता हडप करण्यासाठी, भाऊबंदकीतील सूड उगवण्यासाठी, नको असलेल्यांचा काटा काढण्यासाठी किंवा अशाच एखाद्या क्षुल्लक कारणासाठी इच्छामरण व दयामरणाच्या कायद्याच्या तरतुदीचा वापर करून सर्व काही कायद्याच्या चौकटीतच आहे असे बतावणी करत खून करण्यासाठीसुद्धा हितसंबंधीय मागे पुढे पाहणार नाहीत. डॉक्टर व नातेवाईक संगनमताने इच्छामरण वा दयामरणाच्या कायद्याच्या आधारे एखाद्याचा खून करणार नाहीत याची खात्री देण्याइतका समाज प्रगल्भ झालेला नाही. तत्व म्हणून इच्छामरण वा दयामरण यांना मान्यता देता येईल. परंतु त्याची प्रत्यक्ष कार्यवाही सामाजिक, आर्थिक, व कौटुंबिक समस्यांच्या जंजाळात अडकून पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वरील विवेचनावरुन, मला हे तंतोतंत पटते. इच्छामरण दिले जाऊ नये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सदर उतारा हा पुन्हा एकदा सुखांत या लेखातील आहे
या परिच्छेदा च्या पुढे असेही म्हटले आहे
"कायद्याची अंमलबजावणी नीट होत नाही वा कायद्यातील पळवाटांच्या आधारे त्याचा दुरुपयोग केला जाईल ही भीती प्रत्येक नवीन कायद्याच्या वेळी हमखास उपस्थित केला जातच असतो. म्हणून कायदाच करू नये वा समाज प्रगल्भ होण्याची (दीर्घकाळ) वाट पहावी हे न पटणारे मुद्दे वाटतात."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

- जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे. - गडकरी
- बाबुमोशाय, जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही - आनंद
सगळे सुरळीत चालू आहे, कुठलाही विकार, आजार नाही, मानसिक अवस्था उत्तम आहे, पण आता इथून पुढे सगळा उतारच असणार आहे. उद्याच्या दिवसाची गुणवत्ता आजच्यापेक्षा कमी असणार आहे. म्हणून सगळे चांगले ते सगळे जगून झाले, आता कुरुप, दुखणाईत, वेदनादायी, सलाईनी एन्डोस्कोपिष्ट सर्जिकल आयुष्य नको असे वाटू लागले आहे. म्हणूनच स्वेच्छेने, आनंदाने सहज कोपर्‍यावरुन वळून एक हात उंचावून एखाद्या मित्राला 'येतो रे, गुड नाईट' म्हणावे तसे (श्रेयअव्हेर) या जगातून निघून जावे यासाठी काही तरतूद असणार नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

अगदी पर्फेक्ट मांडलंत.
एखाद्या युटोपियात अशी सोय असावी!
जगण्यातलं सुख उपभोगून झालेलं आहे. कृतार्थ वगैरे म्हणता येईल अशी अवस्था असतानाच जगणं संपवावं असं वाटलं तर त्यात काय चूक?
शंका - अशा मरणाला आत्महत्याच म्हटलं जाईल ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://mashable.com/2014/10/07/brittany-maynard-death-with-dignity/

ह्या युवतीने तिचे सर्व सेन्सेस शाबूत असताना घेतलेला निर्णय आणि एखादी व्यक्ती कोमात असताना तिच्या नातेवाईकांनी घेतलेला निर्णय ह्या दोन्हीत फरक आहे असे मला वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुंबई येथील एका हॉस्पिटलमध्ये अरुणा शानभाग गेली तीस वर्षे कोमावस्थेत आहे. 1973 मध्ये एका सफाई कामगाराने तिच्यावर बलात्कार करून लोखंडी साखळीने तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला होता. त्या दिवसापासून ती त्या मानसिक धक्क्य़ापासून सावरू शकली नाही. ती आंधळी व बहिरी झाली आहे. व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये असले्ल्या अरुणाचा मेंदू बाह्य मदतीविना केवळ श्वासोच्छ्वास करण्याइतपत काम करू शकतो. इतर सर्व कार्य पूर्णपणे ठप्प झालेले आहेत. वैद्यकीय व्यवसायाला अरुणाची केस आव्हानात्मक वाटते. परंतु त्यात विशेष प्रगती झालेली नाही. अशा प्रसंगी नेमके काय करायला हवे? अशा रुग्णांना लवकरात लवकर मृत्यु यावा यासाठी काही प्रयत्न करायचे की मृत्यु येईपर्यंत वाट पहायचे? पिंकी विराणी या अरुणाच्या पत्रकार मैत्रिणीने अरुणाच्या दुखद आयुष्यावर एक पुस्तक लिहिले आहे. तिनेच अरुणाविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. पिंकीच्या मते अरुणा गेली 36 वर्षे कोमावस्थेत असून दिवसातून दोन वेळा बळजबरीने तिच्या पोटात अन्न पाणी ढकलत असल्यामुळे नाम के वास्ते ती जिवंत आहे असे म्हणावे लागेल. तिच्या या व्हेजिटेटिव्ह अस्तित्वात कुठलाही सन्मान नाही, अस्तित्वाची जाणीव नाही. माणूस म्हणवून घेण्याची तिची स्थिती नाही. गेल्या छत्तीस वर्षात तिचे भाऊ - बहिण वा कुणी नातलग तिच्याकडे फिरकले नाहीत. या असह्य जीवनातून तिची सुटका व्हावी यासाठी तिचे अन्न पाणी बंद करऩ्याची सक्ती करावी असे तिने अर्ज केला आहे.

१. पिंकी विराणी ही अरूणाची "मैत्रीण" नाही. त्या दोघी पहिल्यांदा संपर्कात येण्याआधी कित्येक वर्षे अरुणा शानभाग व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये आहेत.
२. पिंकीच्या ऐकण्यात ही केस आली व अरुणा शानभागला भेटल्या/पाहिल्यानंतर अशा प्रकारे जगण्यात काही अर्थ नाही असे "पिंकी"ला वाटत असल्याने तिने युथनेशिया वगैरे साठी अर्ज केला.
३. व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हण्जे "कोमा" नाही.
४. बलात्कारानंतर "मानसिक धक्का" नव्हे तर गळ्याभोवती चेन आवळल्याने मेंदूला काही काळ रक्तपुरवठा न झाल्याने मेंदूचे न भरून येणारे नुकसान होऊन ती व्हेजिटेटिव्ह स्टेट मध्ये आहे.
५. अरुणा शानभाग कोणत्याही प्रकारच्या लाइफ सपोर्ट सिस्टिमवर नाहीत. त्यांना बळजबरी अन्न ढकलावे लागत नाही परंतु चावण्याइतकी सेन्सरी पॉवर न राहिल्याने त्यांना लिक्विड अथवा अगदी मऊ अन्न देण्यात येते.
६. गाणी लावल्यावर त्यावर कधीतरी किंचित मान डोलवणे, हसणे, बेसिक हातपाय हलवणे या गोष्टी त्या करू शकतात. एकूण ५-६ महिन्याचे बालक जितके प्रिमिटिव्ह रिस्पॉन्स देऊ शकते, हालचाल करू शक्ते तितकी आणि तशी त्यांची अवस्था आहे.
७. ज्या प्रकारे या प्रकाराची प्रसिद्धी करण्यात आली, नंतर पिंकीच्या मित्राने यावर एक फिल्म बनवणे इत्यादी झाले - माझे मत असे झाले की त्यात फक्त १०% सहानुभुती, अनुकंपा यांचा भाग आहे. ९०% हे प्रसिद्धी मिळवणे आहे. हे सगळे प्रकरण होण्याआधी पिंकी विराणी हे नाव किती लोकांना माहित होते?
८. भाऊ-बहिण, आई वडिल नसले तरी तिथल्या नर्सेसच्या कित्येक बॅचेस स्वेछेने अरुणा शानभागची काळजी घेतात. त्या तिच्या नातलगांपेक्षा कितीतरी जास्त आहेत. त्यांपैकी कोणालाही पिंकी विराणीला आलेला पुळका आवडलेला नव्हता. कोर्टाने अरुणा शानभाग यांना दयामरण नाकारल्यावर नर्सेसनी पेढे वाटून आनंद साजरा केला होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

१. अरुणा शानभाग यांनी medical power of attorney कुणाला दिली होती का आणि मरणाबद्दल त्यांचे विचार जाहीरपणे प्रकट केले होते का? ते पण बघावे लागेल.
२. अरुणा शानभाग यांना रिप्रेझेंट करण्याची पिंकी विराणी यांची काही कॅपॅसिटी नाही. मग मुळात कोर्टाने ही केस ऐकूनच का घेतली ते मला कळत नाही. Locus Standi नुसार त्यांनी ही केस फेटाळली का नाही?
३. व्हेजिटेटिव्ह स्टेट हे Beyond a reasonable doubt सिद्ध झाले का? तुमच्या ५ व्या आणि ६ व्या मुद्द्यावरून तरी तसे वाटत नाही.
अशा परिस्थितीत कोर्टाने दयामरण स्वीकारले असते, तर तो चुकीचा निर्णय ठरला असता.
याउलट टेरी शायवो हिची अन्ननळी काढून तिला दयामरण दिले, हा निर्णय योग्य होता असे मला वाटते.

मी स्वतः medical power of attorney बनवली आहे, माझ्या मृत्यूनंतर शक्य ते आणि शक्य तितके अवयव रोपणासाठी वापरावे व त्यानंतर माझे शरीर मेडिकल रिसर्चसाठी देण्यात यावे ते सांगितले आहे. जर जिवंतपणी कोणी medical power of attorney दिली असेल, स्वतःचे मत जाहीरपणे सांगितले असेल तर माझ्यामते दयामरण किंवा इच्छामरण (पॉलिटिकली जे योग्य आहे ते निवडावे) हे योग्य आहे, असे माझे स्पष्ट मत आहे.

समजा अशी medical power of attorney नसेल किंवा मरणाबद्दलचे विचार beyond a reasonable doubt सिद्ध करता येत नसेल, तर त्या व्यक्तीची जगायची इच्छा आहे, असे समजावे. केवळ त्या व्यक्तीला तसा विचार सांगता येत नाही, म्हणून त्या व्यक्तीच्या नावाने निर्णय घेऊ नये.

डेथ पेनल्टी दिली जाते, तेव्हा कोर्टाने विचार करून निर्णय दिलेला असतो, त्यामुळे त्याला माझा पाठिंबा आहे. उदा. स्कॉट पिटरसन केस.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

५-६ महिन्याचे बालक जितके प्रिमिटिव्ह रिस्पॉन्स देऊ शकते, हालचाल करू शक्ते तितकी आणि तशी त्यांची अवस्था आहे.
आपल्याला अतिशय वेदना होत आहेत हे ५-६ महिन्याचे बालक रडून-भेकून व्यक्त करु शकते. शानभाग यांना हे करता येते का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

हा प्रश्न उत्तर नसलेला आहे.

त्यांना रडता येत नाही की त्यांना वेदना होत नाहीत हे कसे कळेल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

होय.

जास्त लोक रूम मध्ये आल्यावर अस्वस्थपणाची लक्षणे दाखवणे, हळूवार स्पर्श केले - थोपटले की शांत होणे, आवडते अन्न दिले की हसणे, हातवारे, आवाज काढून यातून आनंद व्यक्त करणे - इत्यादी त्या करतात.

वर सांगितलेल्या कारणांमुळेच कोर्टाने अर्ज फेटाळला आहे.

http://www.ndtv.com/video/player/news/aruna-case-court-rejects-euthanasia-plea/192862

http://www.youtube.com/watch?v=qkzzKWv4Alg

ह्या लिंकमध्ये ब-याच गोष्टी कळतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

या विराणीबाईंचे म्हणणे काही असो, मुळात शंका अशी, की अरुणा यांच्या वतीने अन्यच अनरिलेटेड व्यक्ती (पिंकी विराणी) हा हक्क कसा मागू अथवा मिळाल्यास एक्झेक्यूट करु शकतात?

माझ्यामते स्वतःचा जीव संपवण्याचा हक्क बिनशर्त असावा. त्यासाठी आजारीच असले पाहिजे किंवा तत्सम काही अटी किंवा मरणासाठी योग्य कँडिडेट असल्याचे कोणा त्रयस्थ व्यक्तीचे सर्टिफिकेट लागू नये. पण व्यक्ती संपली की तिच्यावरचे क्रिमिनल खटले संपतात. बर्‍याच बाबतीत कर्जेही बुडतात. अशा वेळी खालील काही उपाय करुन मग अश्या आत्मविसर्जनास परवानगी द्यावी:

१. कोणत्याही प्रकारचे कर्ज शिल्लक नसल्याची खात्री
२. कोणतीही कायदेशीर जबाबदारी नसल्याची खात्री. असल्यास ती स्वतःवर घेण्याचे डिक्लेरेशन देणारी अन्य जामीन व्यक्ती आणणे.
३. व्यक्ती स्वतःच धड असतानाच ही मागणी (भविष्यकालीन परमिटसुद्धा चांगले असतानाच घेणे) करु शकणे. तिच्या वतीने कोणी अन्य लोकांनी ती मागणी करुच न शकणे.
४. आत्मविसर्जन करण्याची इच्छा पहिल्याच फटक्यात पूर्ण न करता येणे (मूडच्या झटक्यात न करता येणे). त्यासाठी प्रथम नोटीस दिल्यानंतरही ठराविक दिवसांनंतर हजर होऊन दुसरी आणि नंतर तिसरी स्वतंत्र नोटीस देऊन तिन्ही वेळी पुन्हा एकदा मरणाला सहमती दर्शवणे. हा मधला काळ बहुतांश लोकांना उगीचच आत्मघात करण्यापासून थांबवेल.
५. अशा सहमतीपूर्वी मनुष्य कोणत्याही नारकॉटिक अंमलाखाली नसल्याचा मेडिकल चेकअप.
६. मृत्यू आणण्याची स्टँडर्डाईझ्ड पण काही प्रमाणात वेदना असलेली पद्धत. उथळपणे आत्मघाताची इच्छा व्यक्त करणार्‍यांना मरण म्हणजे सोप्पी सुटका नव्हे हाही एक डेटरंट होऊ शकतो. (मेथिलेटेड स्पिरिट लॉजिक).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नुसती श्रेणी देऊन समाधान होईलसे वाटेना (म्हणून दिलीच नाही Wink )
प्रतिसाद आवडला

दयामरणाबद्दल मी तळ्यात-मळयात आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रतिसाद आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चवथा मुद्दा सुभानल्ला!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>६. मृत्यू आणण्याची स्टँडर्डाईझ्ड पण काही प्रमाणात वेदना असलेली पद्धत. उथळपणे आत्मघाताची इच्छा व्यक्त करणार्‍यांना मरण म्हणजे सोप्पी सुटका नव्हे हाही एक डेटरंट होऊ शकतो. (मेथिलेटेड स्पिरिट लॉजिक). सन्मान इच्छामरणातील वेदनाविरहीत शांतपणे मृत्यु मुद्द्याला छेद देणारा हा मुद्दा आहे. आधुनिक वैद्यकीय उपचारात कमीत कमी वेद्ना होईल असे पहातात. एखाद्याला जर जगण असह्य केल तर कदाचित तो मरणाची वेदना त्यापुढे काहीच नाही असे वाटून तो तयार होईल. पण अशा केस मधे तो सन्मान इच्छामरणा पेक्षा आत्महत्येचा मार्ग स्वीकारेल.
>>मुळात शंका अशी, की अरुणा यांच्या वतीने अन्यच अनरिलेटेड व्यक्ती (पिंकी विराणी) हा हक्क कसा मागू अथवा मिळाल्यास एक्झेक्यूट करु शकतात? जनहित याचिकेत याचिका करणारा हा स्वतःच्या फायद्यासाठीच ती दाखल करत असतो असे गृहीत ध्ररणे योग्य वाटत नाही. तुम्हाला कायदेशीर तांत्रिक बाब म्हणायचे असेल तर तो वेगळा विषय आहे. सहसा अशा तांत्रिक बाबी आपल्याला सहमत नसणार्‍या गोष्टी हाणून पाडण्यासाठी प्रतिपक्षाकडून युद्ध कौशल्याचा भाग म्ह्णुन वापरल्या जातात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

+१ मलादेखील तो ६वा मुद्दा पटला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खेरीज.. पुरवणी..

जगण्याची इच्छा ही व्यक्ती व्हेजिटेटिव्ह आहे, वेदनेत आहे, अधू झालीय, हलू चालू बोलू शकत नाही, प्रतिसाद देऊ शकत नाही, तिच्या मेंदूतल्या अमुक टक्के पेशी मृत झाल्यात, एमआरआयमधे अमुक दिसतंय इत्यादि इत्यादि कशावरही अवलंबून नसते. ती त्या व्यक्तीच्या मनावर अवलंबून असते. अत्यंत विकलांग अवस्थेतही भरपूर जीवनेच्छा असलेले किंबहुना ती वाढलेले अनेक लोक पाहण्यात आहेत.

स्टीफन हॉकिंग्ज यांचा मेंदू आणि जाणिवा चालू आणि अत्यंत तीक्ष्ण असल्या तरी निव्वळ शारिरीक स्थिती पाहता आपल्यापैकी कोणीही तशा अवस्थेत जगू इच्छिल असे वाटत नाही. पण ते आनंदाने जगतात. जगाला त्यांनी भरपूर नवीन थिअरीज दिल्या. लॉक्ड इन सिंड्रोममधे शिरलेल्या काहीजणांनी पापणीच्या हालचालींनी किंवा तत्सम सिग्नल्सनी अक्षरे, शब्द बनवून लेख, पुस्तके लिहीली.

तेव्हा मरणाचा हक्क बजावताना ती खुद्द व्यक्ती किमान नि:संदिग्ध "हो" किंवा "नाही" म्हणण्याच्या शारिरीक स्थितीत असली पाहिजे.

जर ती ऑलरेडी निश्चलावस्थेत, कोमात, अनरिस्पॉन्सिव्ह अवस्थेत शिरली असेल तर दुर्दैवाने तिला हा हक्क उपयोगी असूनही देता येऊ नये असे मत आहे. कारण त्या व्यक्तीचे स्वतःच्या जीवनेच्छेबद्दल मत देण्याची तिची अवस्था नाही, आणि ते मत इतरांनी तर्काने आणि भौतिक पुराव्यांनी, आणि स्वतःच्या मानसिक विचारधारेने ठरवणे अजिबात योग्य नाही.

म्हणून धडधाकट असताना व्यक्तीने हे सर्व करुन ठेवण्याचीच तरतूद केवळ व्हावी. एकदा व्यक्ती विकलांग झाली की मग इतर नातेवाईकांनी विचार करुन निर्णय घेणे हे इच्छामरण नव्हे, दयामरण म्हणता येईल. पण एकतर्फी दयामरणाला माझा नेहमीच विरोध राहील.

पॅसिव्ह इच्छामरण माझ्यामते आजही अस्तित्वात आहे. यात व्यक्तीला केवळ उपचार थांबवून नैसर्गिकरित्या मरु दिले जाते. हा निर्णयसुद्धा प्रत्येकाने धड असतानाच रजिस्टर्ड रुपात घेऊन ठेवणे आवश्यक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गवि यांच्या दोन्ही प्रतिसादांशी सहमत आहे.

एक सुधारणा "मुळात शंका अशी, की अरुणा यांच्या वतीने अन्यच अनरिलेटेड व्यक्ती (पिंकी विराणी) हा हक्क कसा मागू अथवा मिळाल्यास एक्झेक्यूट करु शकतात?" इथे अनरिलेटेड असो की रिलेटेड दोन्हींसाठी हे लागू आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सन्मान इच्छामरण या विषयावर पुण्यात यशवंतराव नाट्य गृह कोथरुड येथे सोमवार दि १३ ऑक्टोबर २०१४ ला सायंकाळी ५.३० वाजता एक परिसंवाद आहे. विद्या बाळ, डॉ शिरिष प्रयाग, मंगला आठलेकर, अ‍ॅड असीम सरोदे , ज्योति सुभाष त्यात सहभागी होणार आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/