Skip to main content

भोजनकुतूहल - १

शीर्षकात दाखविलेले स्वयंपाक ह्या विषयावरचे ’भोजनकुतूहल’ हे पुस्तक मला DLIच्या संस्थळावर दिसले. असले विषय संस्कृत लिखाणात क्वचितच दृष्टीस येतात म्हणून कुतूहलाने ’भोजनकुतूहल’ उतरवून घेतले आणि चाळले.  त्यातून वेचलेले काही वेधक उल्लेख येथे दाखवीत आहे.

पुस्तक ’रघुनाथ’ नावाच्या लेखकाने १७व्या शतकाच्या शेवटाकडे लिहिले असावे.  त्याची मजसमोरील आवृत्ति १९५६ साली (तत्कालीन) त्रावणकोर विद्यापीठाच्या विद्यमाने मुद्रित झाली आहे.  पुस्तकाचा लेखनकाल, त्याचा लेखक रघुनाथ आणि त्याच्या अन्य कृति ह्याविषयी भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे डॉ.प.कृ.गोडे ह्यांनी केलेल्या संशोधनाचा सारांश ह्या लेखाच्या अखेरीस लिहिला आहे.

वेगवेगळे खाण्याचे पदार्थ कसे कसे करावे, त्यांच्यामध्ये कायकाय घालावे असे जे मार्गदर्शन सध्याच्या पाककृति ह्या विषयांवरच्या पुस्तकांमध्ये असते तसे ह्या पुस्तकात फार थोडे आहे.  काही ठळकठळक प्रकार कसे बनवायचे असे मार्गदर्शन देऊन त्या प्रत्येक गोष्टीचे शरीरावर काय परिणाम होतात त्याचे आयुर्वेदाच्या अंगाने विवेचन असे पुस्तकाचे स्वरूप आहे.  दिलेले प्रकारहि आजच्या पेक्षा काही फार वेगळे आहेत असे नाही.  तरीपण पुस्तक मनोरंजक वाटते ते अशासाठी की १७व्या शतकात लोक काय खात होते आणि काय खात नव्हते, कोणते अन्नघटक उपलब्ध होते आणि कोणते नव्हते ह्याचे सामाजिक इतिहासाच्या संदर्भात उपयुक्त असे दर्शन ह्यातून होते.  काही काही कृति वापरातून अजिबात गेल्या आहेत, काही काही वेगळ्या नावांनी पुढे येतात तर काही काहींचे दर्शक शब्द आता विस्मरणात गेले आहेत असे लक्षात येते.

पुस्तकाची काही प्रमुख प्रकरणे अशी आहेत:

१) शूकधान्यप्रकरण. ह्यामध्ये शूकधान्ये - शालि (तांदूळ), गोधूम (गहू), यव (जव) आणि यावनाल (ज्वारी) - ह्यांचे प्रकार.  ’शूक’ म्हणजे कणीस.  ही धान्ये कणसांमधून मिळतात.  ( पुस्तकातील वर्गीकरण हे पारंपारिक आयुर्वेदिक असून लिनेअसच्या वनस्पतिवर्गीकरणाशी काही संबंध ठेवत नाही हे ध्यानात ठेवायला हवे.). ह्या प्रत्येक धान्याचे आयुर्वेदाच्या दृष्टीने काय गुणदोष आहेत त्यांचे वर्णन सुश्रुत, भावप्रकाश, राजनिघण्टु, वाग्भट अशा ग्रंथांमधील अवतरणांच्या आधारे दिलेले आहे.  ह्यापुढे वर्णिलेल्या अन्य गोष्टींबाबतहि असेच केले आहे.

शूकधान्यांपैकी शालि आणि यावनाल ह्यांच्या अनेक पोटजाती दर्शवून त्यांना मराठीमध्ये काय म्हणतात ह्याचेहि एकेका शब्दात दिग्दर्शन आहे.  ( लेखक रघुनाथ हा मराठीभाषिक होता.  ह्याच्याविषयी पुढे अधिक माहिती येईलच.) शालिविषयात वेगवेगळ्या ग्रंथांमधून घेतलेली असे प्रकार पुढीलप्रमाणे -  राजशालि (महाराष्ट्रात रायभोग, आन्ध्रात राजान्न), कृष्णशालि (गोदातीर), रक्तशालि (तामसाळ?), स्थूलशालि अथवा महाशालि (कोळम, कृष्णा-तुंगभद्रा अंतर्वेदीमध्ये विख्यात), सूक्ष्मशालि, गन्धशालि किंवा प्रमोदक (कमोद), षाष्टिका (साठ दिवसात होणारी, मालव प्रान्तातील) आणि असेच आणखी काही.

यावनाल म्हणजे ज्वारी हिच्या उपप्रकारांमध्ये पांढरी (लटोरा, मोल्सवर्थने ह्याचा अर्थ अरगडी असा दिला आहे), तांबडी, शारद म्हणजे हिवाळ्यात होणारी (शाळू) आणि मका (मक्का, हा बालप्रिय असल्याचा उल्लेख आहे म्हणजे मक्याची कणसे भाजून खायचा उद्योग असणार) इतके प्रकार दर्शविले आहेत.  मका ज्वारीखाली टाकला आहे ह्याबाबत काही लिखाण नंतर येईल.  अखेरीस बाजरीचाहि अस्फुट उल्लेख ज्वारीखालीच केला आहे.  रघुनाथाने त्याला त्रोटकपणे ’सजगुरे’ असे म्हटले आहे आणि मोल्सवर्थप्रमाणे ह्याचा अर्थ ’बाजरी’ असा आहे.

२) शिम्बीधान्यप्रकरण - शेंगांमधून मिळणारी धान्ये.  ह्यामध्ये मुद्ग (मूग), मसूर, माष (उडीद), चणक (हरभरे), लंका (लाख) - एक गुलाबी डाळ, ही खाल्ल्याने लकवा होतो अशी समजूत आहे.  उत्तर भारतात हिचा वापर आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांमधे अधिक होतो - तुवरी (तूर), कुलित्थ (कुळीथ), मकुष्ठ (मोठ म्हणजे मटकी), तिल (तीळ), सर्षप (मोहरी), निष्पाव (वाल?), अतसी (जवस), कलाय (मटार) इत्यादींचा समावेश आहे.  ’शेंग’ हा शब्द ’शिम्बी’चाच अपभ्रंश दिसतो. शेंबी असाहि शब्द मी ऐकला आहे आणि मोल्सवर्थ इ. कोशांमधून त्याचा अर्थ ’टोपण’ अशा अंगाने दिला आहे.  तोहि येथून निघाला असावा.

३) तृणधान्यप्रकरण - ह्यामध्ये प्रियंगु (राळे), कोद्रव (हरीक), वरक (वरई), श्यामाक (सावे) अशी काही गवताच्या बियांसारखी असणारी धान्ये दिली आहेत.

४) चौथ्या प्रकरणात धान्यांपासून काही प्रक्रियेने होणार्‍या वस्तु, म्हणजे भाजून केलेल्या लाजा (लाह्या), कुटून केलेले पृथुक (पोहे), अर्धपक्व धान्ये गवतावर भाजून होलक (हुरडा), धान्य भिजवून केलेले कुल्माष (घुगर्‍या), यन्त्रपिष्ट (जात्यामध्ये धान्य भरडून केलेले) सक्तु (सत्त्व), भाजलेले चणे (फुटाणे), मिठाचे पाणी शिंपडून भाजलेले (मिठाणे), तेच तेलात तळलेले (उसळे) अशा गोष्टी आहेत.

अशा ह्या सर्व प्रकारच्या धान्यांचे उल्लेख भारतीय प्राचीन वाङ्मयात अनेकदा मिळतात.  यजुर्वेदान्तर्गत अशा प्रसिद्ध रुद्रसूक्तात सूक्तकार रुद्रांकडून ज्या ज्या अनेक गोष्टींची प्रार्थना करतो त्यांमध्ये ’व्रीहयश्च मे यवाश्च मे माषाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियंगवश्च मेऽणवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे’ अशाहि मागण्या आहेत.

५) ग्रन्थकर्ता ह्यापुढे शिजवलेल्या अन्नाकडे वळतो.  येथे नाना प्रकारचे भात, खिरी, पोळ्या, सूप म्हणजे आमटी, क्वथिका म्हणजे कढी, वटक (वडे), शिखरिणी, जिलबी, शंखपाल (शंकरपाळे), मांसाचे प्रकार, मद्य इत्यादींची वर्णने आहेत.  ह्या मनोरंजक विषयांकडे आणि उर्वरित ग्रंथाकडे पुढील भागामध्ये पाहू.

मिरची, बटाटा, भुईमुगाच्या शेंगा, टोमॅटो ह्या आजच्या मराठी - किंबहुना भारतीय -आहारातील महत्त्वाच्या घटकांचा ग्रंथामध्ये मुळीच उल्लेख नाही.  ग्रंथातील सर्वात अधिक तिखट गोष्ट म्हणजे मरीच किंवा मिरी.  तिचे उल्लेख मुबलक आहेत.  आर्द्रक म्हणजे आलेहि ह्या संदर्भात अनेकदा दिसते पण मिरची कोठेच नाही.  ह्याचे कारण असे की स्पॅनिश विजेत्यांना ह्या दक्षिण अमेरिकेतील मूळच्या गोष्टी तेथे माहीत होऊन त्या युरोपात पोहोचायला १५व्या शतकाची अखेर आली आणि तेथून त्या पोर्तुगीज-स्पॅनिश वसाहतकारांबरोबर आफ्रिका-आशियात पसरल्या.  रघुनाथाने प्रस्तुत ग्रंथ लिहीपर्यंत त्या दक्षिण भारतात पुरेशा प्रसार पावलेल्या नसाव्यात.  अपवाद दोन गोष्टींचा - मक्याचा उल्लेख यावनाल (ज्वारी) प्रकारात आला आहे हे वर उल्लेखिलेले आहे.

प्रस्तुत ग्रंथाचा लेखक रघुनाथ कोण असावा? ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये पूर्वी भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटचे बरीच वर्षे क्यूरेटर असलेले डॉ.प.कृ.गोडे ह्यांच्या संशोधनाच्या आधारे असे लिहिले आहे की हा रघुनाथ नवहस्त (नवाथे) आडनावाचा एक महाराष्ट्रीय कर्‍हाडा ब्राह्मण समर्थ रामदासांच्या परिवारात होता आणि रामदासांनी त्याला लिहिलेली पत्रे उपलब्ध आहेत.  काही काळ चाफळच्या राममंदिराच्य़ा देखभालीचे काम त्याच्याकडे होते.  नंतर १६७८च्या सुमारास तो दक्षिणेकडे भोसले घराण्याच्या तंजावर शाखेच्या आश्रयास गेला. त्याचे अन्य सात संस्कृत आणि तीन मराठी ग्रंथ माहीत आहेत.

त्याचे हा तंजावर संबंध पाहता अशी शंका घेता येईल काय की नलदमयन्तीस्वयंवराचा कवि रघुनाथपण्डित तो हाच काय?  असे मी फार सावधपणे लिहीत आहे कारण डॉ गोडेंनी असे कोठेहि सुचविलेले नाही.  परन्तु विश्वकोशामधील रघुनाथपंडितावरील लेखन आणि महाराष्ट्रसारस्वताच्या पुरवणीमध्ये डॉ.शं.गो.तुळपुळे ह्यांचे त्याच्यावरील लिखाण ह्या दोहोंमध्ये तो तंजावरला १६७५च्या पुढे गेल्याचा उल्लेख आहे, तसेच तो रामदासांच्या परिवारातील एक होता असेहि म्हटले आहे. भोजनकुतूहलकार रघुनाथ आणि नलदमयंतीकार रघुनाथपंडित ह्यांच्या चरित्रांतील हे समान दुवे पाहता ते दोघे एकच व्यक्ति असण्याची शक्यता दृष्टिआड करता येईल काय?

(नलदमयंतीस्वयंवरातील हा श्लोक, कमीतकमी त्यातील शेवटची ओळ, बहुतेकांस माहीत असते:
तदितर खग भेणें वेगळाले पळाले।
उपवन जलकेली जे कराया मिळाले।
स्वजन गवसला जो त्याजपाशी नसे तो।
कठिण समय येता कोण कामास येतो?)

धाग्याचा प्रकार निवडा:

ऋषिकेश Fri, 28/03/2014 - 09:07

अतिशय रोचक.

मिरची, बटाटा, भुईमुगाच्या शेंगा, टोमॅटो ह्या आजच्या मराठी - किंबहुना भारतीय -आहारातील महत्त्वाच्या घटकांचा ग्रंथामध्ये मुळीच उल्लेख नाही.

हे वाचताना एक कल्पना मनात आली. जर श्री कोल्हटकर यात दिलेल्या पाककृतींपैकी काही अनोख्या/तुलनेने नव्या पाककृती तसेच काही माहितीतल्या परंतु पूर्णपणे/अंशतः वेगळ्या पद्धतीने केल्या जाणार्‍या पाककृती ऐसीवर देऊ शकत असतील तर आपल्याला ते पदार्थ घरी करून बघता येतील.

श्री कोल्हटकर यांना विनंती करतो की लेखमालेच्या पुढिल भागात किंवा हवंतर स्वतंत्र लेखात अश्या मोजक्या पाककृती द्याव्यात, ज्या ऐसीकर आपापल्या घरी करून बघतील आणि जमल्यास इथे त्यांची निरिक्षणे व फोटो टाकतील. तेवढेच १७व्या शकतातील पदार्थ बनत कसे होते याचा अंदाज येणे शक्य होईल :)

घनु Fri, 28/03/2014 - 14:36

In reply to by ऋषिकेश

श्री कोल्हटकर यांना विनंती करतो की लेखमालेच्या पुढिल भागात किंवा हवंतर स्वतंत्र लेखात अश्या मोजक्या पाककृती द्याव्यात, ज्या ऐसीकर आपापल्या घरी करून बघतील आणि जमल्यास इथे त्यांची निरिक्षणे व फोटो टाकतील. तेवढेच १७व्या शकतातील पदार्थ बनत कसे होते याचा अंदाज येणे शक्य होईल

+१

अतिशय रोचक माहिती. १२ व्या शतकातील खाद्यसंस्कृती थोडे वाचले आहे, त्यातली माहिती आणि दिलेल्या पाकृ देखील रोचक आहेत.

(थोडं अवांतर - १२ व्या शतकातील खाद्यसंस्कृती मधे पाण्याचे पण वेगवेगळे प्रकार आणि त्याचे गुणधर्म दिले आहेत, त्यात सारस हे पाण्याच्या प्रकाराचं नाव आहे असं दिसून येतं, जे पाणी पर्वतावरून येतं आणि तळ्यामधे साचतं त्या पाण्याला/प्रकाराला सारस असे म्हणतात असा उल्लेख आहे. सारसबागेचं नाव हे त्या पाण्याच्या प्रकारावरुनच पडलं असावं - पर्वती वरून आलेलं पाणी त्या बागेतल्या तळ्यामधे साचतं म्हणून त्या बागेला सारसबाग म्हणत असावे :) )

बॅटमॅन Fri, 28/03/2014 - 16:06

In reply to by घनु

१२ व्या शतकातील खाद्यसंस्कृती थोडे वाचले आहे

बाय एनी चान्स त्यात 'मानसोल्लास' अथवा 'अभिलषितार्थचिंतामणी' या ग्रंथाचा उल्लेख आला आहे काय? हा ग्रंथ लै गोष्टींत महत्त्वपूर्ण मानला जातो.

घनु Fri, 28/03/2014 - 17:04

In reply to by बॅटमॅन

मी अगदी धावतं वाचन केलय ह्या पुस्तकाचं. त्यात लायब्ररीरचं असल्यामूळे (ते ही मैत्रिणीच्या [केतकी आकडे] खात्यावरून आणलेलं पुस्तकं) लगेच द्यावं लागलं पण पुन्हा मिळालं तर नक्की बघेन ही माहिती त्यात आहे का ते आणि त्याप्रमाणे कळवेन.

केतकी आकडे Fri, 28/03/2014 - 17:14

In reply to by बॅटमॅन

आहे उल्लेख! ही घे बुकगंगाची लिंक. पुस्तकाच्या माहितीमधे लिहीलंय की पुस्तकात "मानसोल्लास या जगातील पहील्या ज्ञानकोषातील खाद्यसंस्कृतीविषयी रंजक माहिती, पाककृती आणि शास्त्रीय मागोवा" आहे.

बॅटमॅन Fri, 28/03/2014 - 17:18

In reply to by केतकी आकडे

वाटलेच होते. बहुत धन्यवाद :)

त्याचे समग्र भाषांतर कुठे मिळेल की. पाहिले पाहिजे. मराठी बायका जात्यावर धान्य दळत असताना ओव्या म्हणतात याचा पहिला उल्लेख या ग्रंथात असून नुस्ता उल्लेख नै, तर दोनचार उदा. सुद्धा आहेत म्हणे! अन काळ आहे इ.स. ११२९ चा, म्हणजे महानुभाव पंथाअगोदरही शंभरसव्वाशे वर्षे.

मन Fri, 28/03/2014 - 21:25

In reply to by बॅटमॅन

काही गोष्टी लिखित नाहित, म्हणून त्या अस्तित्वातच नाह्हित असे कधी कधी तार्किक/तर्कप्रेमी लोक मानतात त्यामागची भूमिका ठीकच आहे.
पण पूर्णतः योग्य नाही. माणूस लिहायला लै उशीरा लागला.
आधी गोश्टी "घडतात " , "बोलल्या" जातात.
त्या बर्‍याच रूढ झाल्या की मग लिखाणात दिसतात.
(लिखाणात दिसण्यापूर्वीही कैक काळ त्यांचे सुप्त अस्तित्व शक्य आहे; असतेच.)
असे मागे एका मित्राशी बोलताना म्हणालो होतो.
बोलल्या, गायल्या जाणार्‍या ओव्या आधी व विविध संप्रदायांचे लिखित साहित्य मागाहून ; असे सांगण्यासाठी हे उदाहरण दाखला मानता येइल काय ?

बॅटमॅन Sat, 29/03/2014 - 01:34

In reply to by मन

लिखाणाचा शोध नंतर लागला हे तर सर्वमान्य असल्याने आधी मौखिक अन मग लिखित, व लेखनाचा शोध लागल्यावर मग दोन्ही एकाचवेळी इ.इ. कारणमीमांसा तशी स्वयंस्पष्टच आहे, नै का?

मन Fri, 28/03/2014 - 09:12

छान माहिती.
मिरची, बटाटा, भुईमुगाच्या शेंगा, टोमॅटो ह्या आजच्या मराठी - किंबहुना भारतीय -आहारातील महत्त्वाच्या घटकांचा ग्रंथामध्ये मुळीच उल्लेख नाही.
भारतातच नाही तर आख्ख्या old world मध्ये फार मोठे अन्नबदल columbian exchange ने घडवून आणले असं म्हणता यावं.
एक बाब अशी की बॅट्याशी बोलताना हा विषय निघाला होता.
त्याच्या म्हणण्याप्रमाणे आसाम प्रांतात कोणती तरी अतिअतितिखट, तिखटजाळ अशी मिरची आहे. ( त्या मिरची प्रजातीचे नाव विसरलो; हे नाव अरुण जोशींनाही बहुतेक माहित आहे.)
ती मिरची स्थानिक आहे; स्थानिक आसामातील आहे; असे बॅटमनला वाटते. (मागे पेप्रात त्या मिरचीवर एक लेखही माझ्या वाचणयत आल्ता.)
त्याचा व्यासंग पाहता त्यामागे कायतरी लॉजिक असावे असा माझा तर्क.

सुनील Fri, 28/03/2014 - 09:15

In reply to by मन

जलोकिया असे त्या प्रजातीचे नाव आहे, असे वाटते.

जर मिर्ची हा प्रकारच दक्षिण अमेरिकेतून जगात गेला तर तो आसामात तर्पूर्वीच कसा काय पोचला होता?

मन Fri, 28/03/2014 - 11:30

In reply to by सुनील

तीच ती जलोकिया.
पण बॅट्याने आता सोयीस्कर मौन घेतलेलं दिसतय त्याबद्दल

बॅटमॅन Fri, 28/03/2014 - 12:05

In reply to by मन

काय संबंध सोयीस्कर मौन घेण्याचा? जणू कुठलं पेटंट लपवतोय =))

एनीवे, माझा तो फक्त तर्क आहे, बाकी काही नाही.

तर्काला आधार इतकाच, की अन्य मिरच्या अन जलोकिया यांच्या तिखटपणात फार म्ह. फारच फरक आहे. इतका फरक मुद्दाम घडवून आणायचा तर आर्टिफिशियल सिलेक्शनलाही बरीच वर्षे लागावीत. फक्त ५०० वर्षांत हे शक्य आहे असे वाटत नसल्याने ती स्थानिक असावी असे वाटते.

(आता कुणी गाजराचे उदा. देईल की गाजर मूलतः जांभळ्या कलरचे होते, डचांनी त्याचा रंग बदलला कधीतरी १७व्या शतकात. पण तसे इथे झालेय की कसे याबद्दल कधी वाचनात आलेले नाही म्हणून शंका बलवत्तर होते इतकेच.)

जाणकारांच्या मतांच्या प्रतीक्षेत.

मन Fri, 28/03/2014 - 14:02

In reply to by बॅटमॅन

गाजर ?
रंग बदललेले आहे ?
बादवे, नेमके काय झाले ? गाजर आधीपासूनच old world ला माहित होते; आणि मग त्याचा रंग बदलला.
की
गाजर हेसुद्धा अमेरिका खंडातून आले columbian exchange दरम्यान ?
(मी त्याला कंद मुळांचाच एक प्रकार समजत होतो.)
टोमॅटो, मिरची,शेंगदाणे हे ही ठीक आहेत. पण ते गाजरसुद्धा बाहेरून आलेले असेल तर कमाल आहे!
गाजर नसताना भारतातले ससे नेमके काय खात असावेत ?
शिवाय आजकालच्या हापिसात प्रमोशनचे गाजर दाखवितात तसे त्या काळात प्रमोशनचे किंवा जहागिरीचे आंबा,काकडी असे काही दाखवित असावेत काय ?
(प्लीझ. काकडी बाहेरून आलेली आहे असे म्हणू नका आता.
तशी कोणत्याही समाजाची हिष्ट्री तपासली तरी असेच होते. हजार ते बाराशे वर्षापूर्वीच सगळे त्या-त्या भागात रहायला आलेले असतात.
अरे ?
बाराशे वर्षापूर्वीच्या काळात कुणी तिथे रहातच नव्हते का ?

)

बॅटमॅन Fri, 28/03/2014 - 16:13

In reply to by मन

हे वाचा.

http://en.wikipedia.org/wiki/Carrot#History

ओल्ड वर्ल्डला माहिती होते अगोदर.

तशी कोणत्याही समाजाची हिष्ट्री तपासली तरी असेच होते. हजार ते बाराशे वर्षापूर्वीच सगळे त्या-त्या भागात रहायला आलेले असतात.
अरे ?
बाराशे वर्षापूर्वीच्या काळात कुणी तिथे रहातच नव्हते का ?

समाजात स्थित्यंतरे होऊ नयेत का? चर्चिलने ब्रिटिश समाजाचा इतिहास की कायसासा लिहिलाय. ते थोडं पाहिलं तर ब्रिटिश ही आयडेंटिटी मोनोलिथिक कधीच नव्हती, हे कळून येतं. सर्वांत अगोदरचे केल्ट्स, पिक्ट्स, इ.इ. मग आले रोमन्स. रोमन साम्राज्य नष्टल्यावर ते गेले, मग आले अँगल्स आणि सॅक्सन्स. त्यांच्यानंतर व्हायकिंग्स, मग नॉर्मन्स अन मग ते सगळं स्टॅबिलाईझ झालं जरा. टीचभर ग्रीसचीही तीच कथा आहे. जितके प्राचीन काळापर्यंत जाऊ, तितक्या आयडेंटिटीज बदलतात. कैकदा भाषाही बदलते. त्यात अनाकलनीय असे काहीच नाही.

हां आता एखादे एकीकडचे बेट इ. असेल तर गोष्ट वेगळी, पण तिथेही कोणी काडीबाज लोक जाऊन तिथला र्‍हिदम बिघडवतातच.

बॅटमॅन Fri, 28/03/2014 - 11:03

भोजनकुतूहल मलाही कैक दिवस आधी नेटवर दिसला होता. त्याबद्दल आयते लिखाण वाचावयास उपलब्ध करून दिल्याबद्दल अतिशय धन्यवाद!!!!पुढील भागांचा आतुरतेने इंतजार करीत आहे.

आता रघुनाथपंडितांबद्दल चरित्रात्मक माहिती पहावयाची तर महाराष्ट्र सारस्वतात असा उल्लेख आहे की अनंततनय आणि रघुनाथपंडित हे दोघे व्याही व्याही होते. त्या उल्लेखावरून काही माग लागतो किंवा कसे, ते पहावे लागेल.

रघुनाथपंडितांसंबंधी खालील श्लोक तंजावर प्रांतात फेमस आहे असे सारस्वतकार सांगतातः

म्हातारा बहु जाहलो, कवणही त्राता नसे भेटला |
भाताची तजवीज तेच उदरी, भाता गमे पेटला |
हातामाजि नसेच येक कवडी, हा ताप आता हरी |
दातारा! मज वाचवी, सदय हो माता पिता तू हरी ||

शिवाय रघुनाथपंडित किंवा अनंततनय यांपैकी एकाच्या काव्यात

"कंगाल ते ब्राह्मण आरणीचे | परंतु ते शूर रणांगणीचे ||" असा उल्लेख आहे. हा कोणासंबंधी आहे, ते सध्या आठवत नाही.

बाकी भोजनकुतूहल ग्रंथ मोरोपंतांनी वाचल्याचा उल्लेख त्यांच्या एका मित्रास त्यांनी लिहिलेल्या पत्रांत आहे. हे पत्र व तो उल्लेख हे दोन्हीही पंतांच्या ल.रा.पांगारकरकृत बृहत् चरित्रात आहे. तेव्हा तंजावराहून बारामतीपर्यंत याचे १८व्या शतकात सर्क्युलेशन झाले (१७५०-१७९४ या काळात) हे उघड आहे.

सरतेशेवटी मायबोलीवरची अन्नं वै प्राणा: ही अतिविस्तृत आणि जबराट लेखमालिका पहावी असेही सुचवितो-जर अगोदर पाहिली नसेल तर. त्यातही या ग्रंथाचा उल्लेख आहेच.

http://www.maayboli.com/node/44335

अरविंद कोल्हटकर Fri, 28/03/2014 - 20:17

@घनु - सोमेश्वराच्या ’मानसोल्लास’ नावाच्या ग्रंथातील तिसर्‍या विंशतीमधील १४ व्या अध्यायात राजाने पिण्यायोग्य पाण्याचे विवेचन आहे. त्यामध्ये पाणी नऊ प्रकारचे सांगितले आहे. आन्तरिक्ष ( आकाशातून पडलेले पावसाचे, नादेय म्हणजे नदीचे, नैर्झर म्हणचे झर्‍याचे इ. असे हे ९ प्रकार आहेत. त्यापैकी एक ’सारस’. सरस् म्हणजे सरोवर. (सरोवर = सरस् + वर, श्रेष्ठ सरस्, सरसिज -सरसि जायते- सरोवरात जन्मते ते कमळ) 'सरस्'चे पाणी म्हणजे सारस जल. त्याचा सारस पक्षाशी संबंध नाही. उलट, सारस म्हणजे सरोवराच्या आश्रयाने राहणारा पक्षी. अशा रीतीने सारस जल आणि सारस पक्षी ह्या दोघांचे अर्थ ’सरस्’शी संबंधित आहेत.

अवान्तर - ’सरसिज’वरून कालिदासाचा शाकुन्तलातील प्रसिद्ध श्लोक आठवला.

सरसिजमनुविद्धं शैवलेनापि रम्यम्।
मलिनमपि हिमांशोर्लक्ष्म लक्ष्मीं तनोति।
इयमधिकमनोज्ञा वल्कलेनापि तन्वी।
किमिव हि मधुराणां मण्डनं नाकृतीनाम्॥

(मृगयेला निघालेला दुष्यंत कण्वमुनींच्या आश्रमापाशी पोहोचतो आणि दुरूनच दिसलेल्या शकुन्तलेच्या दर्शनाने मोहित होऊन तो म्हणतो) सरोवरात ज्याचा जन्म आहे असे कमळ शेवाळाने वेढलेले असले तरी सुंदरच दिसते. चंद्रावरील मळकट डागहि त्याचे सौंदर्य वाढवतो. ही तन्वी वल्कलामध्येहि मन वेधून घेत आहे. सुंदर शरीरांना कोणती गोष्ट शोभादायक नसते? (जातीच्या सुंदरा काहीहि शोभते!)

@मन - स्कोविल नावाच्या औषधतज्ज्ञाने मिरच्यांचा तिखटपणा मोजण्याचे एक मानक तयार केले त्याला स्कोविल स्केल म्हणतात. त्याचे विकिपीडिया पान येथे आहे. ह्या पानावरील चित्र मोठे करून पाहिले तर त्यात अनेक प्रकारच्या मिरच्या दिसतील. अतितिखट हाबान्येरो मिरच्यांपासून अजिबात तिखट नाहीत अशा बेलपेपर्सपर्यंत अनेक प्रकार तेथे उतरंडीने लावून ठेवले आहेत. भारतीय हिरव्या मिरच्या तेथे साधारण मध्यावर बसतात. आपल्याकडील जांबाच्या आकाराच्या पण तांबडया वा पिवळ्या रंगाच्या थाई मिरच्या फार तिखट असतात असा माझा अनुभव आहे आणि त्याहि ह्या चित्रात दिसतात. ज्यांना भारतीय मिरच्याहि तिखट वाटतात - उदा. मी स्वत: - मला कोशिंबिरीतील मिरची दाताखाली येणे अजिबात आवडत नाही - त्यांना चालतील अशा थोडयाच तिखट हालापिन्यो मिरच्याहि तेथे दिसत आहेत.

रुची Fri, 28/03/2014 - 21:45

नेहमीप्रमाणेच रोचक आणि माहितीपूर्ण लेख. या लेखाचा विषय खास आवडीचा असल्याने उत्सुकतेने पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
एक प्रश्न, तृणधान्य प्रकरणात 'राजगिरा'चा उल्लेख आहे काय? दक्षिण अमेरिकेत वापरला जाणारा अ‍ॅमरंथ म्हणजेच आपल्याकडचा राजगिरा हे समजल्यापासून या धान्याबद्दल आणि तो कोणत्या ठिकाणी स्थानिक असावा याबद्दल बरेच कुतुहल आहे.

मी Fri, 28/03/2014 - 23:43

In reply to by रुची

ह्यावरुन उपवासाला चालणार्‍या आणि न चालणार्‍या पदार्थांबद्दल निर्णय कसा झाला हि माहिती कोल्हटकर किंवा इतर कोणी देउ शकेल काय? उदा. साबुदाणा चालण्याचे कारण काय?

'न'वी बाजू Sat, 29/03/2014 - 01:40

In reply to by मी

...अर्थात वाइल्ड गेस (जालीय परिभाषेत 'अटकळ'. अर्थात, कोणत्याही पुराव्याविना वा आग्यापिछ्याविना ठोकून द्यावयाचे विधान.) पुढीलप्रमाणे.

निरीक्षण केल्यास असे आढळेल, की उपवासाला चालणार्‍या बहुतांश पदार्थांचा उगम 'नव्या जगा'तील आहे. जसे: साबूदाणे, बटाटा, शेंगदाणे, मिरच्या (सर्व साबूदाण्याच्या खिचडीचे साहित्य), रताळे, झालेच तर राजगिरा, वगैरे वगैरे.

आता विचार करून पाहा. समजा, मी धर्मशास्त्री आहे, नि उपवासाचे नियम बनविण्याच्या कमिटीवर मला बशिवलेले आहे. आता, 'उपवासाच्या दिवशी काहीही खायचे नाही', असा नियम जर मी केला, तर पब्लिक प्रस्तुत नियमास आणि एकंदरीत धर्मासच फाट्यावर मारेल, याची मला खात्री आहे. मग मी काय करतो, थोडी चालूगिरी करतो. 'अमूक अमूक अमूक अमूक पदार्थ सोडून बाकी काहीही खावयास हरकत नाही' असे म्हणून वर्ज्य पदार्थाची यादी करतो, आणि ती शक्य तेवढी सर्वसमावेशक / एक्झॉस्टिव करण्याचा प्रयत्न करतो. जे जे म्हणून खाद्यपदार्थ ज्ञातविश्वातील (मला ज्ञात) मानवजातीस ठाऊक आहेत, ते ते सर्व पदार्थ मी यादीत घालून टाकतो, आणि 'कसे पब्लिकला गंडवले' म्हणून शांतपणे झोपी जाण्यास मोकळा होतो.

त्यानंतर दीर्घकाळापर्यंत सर्व सुरळीत चालते. पब्लिक तेवढेही हुशार नसल्याकारणाने इमानेइतबारे उपासाच्या दिवशी काहीही न खाऊन राहते, फक्त (मी उदार मनाने चालू दिलेले) पाणी पिऊन राहते.

माझ्या चिरनिद्रेस आता पुष्कळ काळ उलटून गेलेला असतो. तिथे 'कोलंबस' नावाचा कोणीतरी उपद्व्यापी प्राणी भटकायला निघतो, तो वाट चुकून कुठेतरी भलतीकडेच कडमडतो, तिथून कायकाय जिनसा घेऊन येतो, त्यातल्या काही त्याचे भाऊबंद माझ्याही देशात आणतात. आणि इथेच घात होतो.

हे नवीन पदार्थ लोकांना 'उपवासाला टाळण्याच्या पदार्थां'च्या यादीत काही सापडत नाहीत. त्यामुळे, 'ज्या अर्थी हे पदार्थ उपवासाला वर्ज्य आहेत, असे म्हटलेले नाही, त्याअर्थी हे पदार्थ उपवासाला चालतात', असा अर्थ लावून, ते पदार्थ उपवासाच्या दिवशी खायला (आणि वाट्टेल तितके खायला) पब्लिक मोकळे होते.

अशा रीतीने धर्म बुडतो, पण (धर्मपालन करणारे) पब्लिक (भुकेपासून) वाचते.

तात्पर्य: तर मुलांनो, अशा रीतीने हिंदू धर्माचा नाही, तरी हिंदूंचा एक आद्य त्राता ख्रिस्तोफर कोलंबस आहे. पुढल्या वेळेस एकादशीला साबूदाण्याची खिचडी हादडण्याकरिता वदनिं कवळ घेण्यापूर्वी नाम जरूर घ्या ख्रिस्तोफराचे!

(अवांतर: उपवासाच्या सवडशास्त्रात वर्‍याचे तांदूळ उर्फ भगर हा प्रकार कसा मोडतो, त्याचे स्पष्टीकरण देण्याकरिता प्रस्तुत थियरी असमर्थ आहे. अधिक गूगलसंशोधनाअंती, वरी हे आर्यावर्तातीलच (आणि एकंदर जम्बुद्वीपातील) एका रानटी वनस्पतीचे फलित आहे, असे कळते.)

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हा हा हा. ज्या कुठल्या धर्माचा मी शास्त्री असेन, त्या धर्माचे कल्याण होवो. किंवा, झालेच म्हणून समजा.

डबल हा हा हा. (किंवा, हा हा हा हा हा हा.)

माझे टाळके ठिकाणावर आहे काय?

पब्लिकला अक्कल आहे.

जगातील तमाम धर्मशास्त्री - कोणत्याही धर्माचे - आजतागायत हेच करत आलेले आहेत, असे आमचे प्रामाणिक मत आहे.

कोठल्या सुरळीत, ते विचारू नये. उत्तर ऐकवणार नाही.

या ठिकाणी 'बिचारे' अशा एका शब्दाची योजना जनरीतीस अनुसरून करणार होतो, पण विचार रहित केला. माझ्या चालू योजनेस भीक घालणार्‍या मूर्खांप्रति कोणत्याही सिंपथीज़ नाहीत. ('कारण शेवटी आम्हीं भटेंच७अ. त्याला काय करणार?' - पु.ल.)

७अ 'धर्मशास्त्री' अशा अर्थाने.

व्हॉट अ प्लेझंट आयडिया!

त्याबद्दल 'निघताना रस्ता नीट बघून पक्का करून घ्यायला काय झाले होते?' आणि 'वाटेत कोणाला पत्ता विचारला असतात, तर काय जीभ झडली असती का? चारचौघांत तोंड उघडून प्रश्न विचारायला लाज कसली वाटावी ती?' अशी बोलणी बायकोकडून९अ खातो तो खातोच.

९अ कोठल्या बंदरातली, हा मुद्दा येथे गौण आहे.

अरविंद कोल्हटकर Fri, 28/03/2014 - 22:33

In reply to by रुची

राजशाकिनी आणि स्थूलशाकिनी अशा दोन पालेभाज्या 'पत्रशाक' विभागामध्ये आहेत आणि त्यांचा मराठी अर्थ 'दोन्ही राजगिरे' असा दिला आहे साहजिकच रघुनाथ ह्याकडे लाडू करण्यास योग्य असा राजगिरा असे पाहात नाही. परिशिष्टात त्यालाच Amaranthus polygamus असे म्हटले आहे.

वनस्पतींच्या संस्कृत नावांचा नक्की आधुनिक अर्थ काढणे हा एक प्रकारचा आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ असतो. 'शब्दकल्पद्रुम' ह्या ज्ञानकोषवजा संग्रहात 'राजशाक' ह्याचा अर्थ 'वास्तूक' असा दिला आहे. रघुनाथानेहि 'वास्तूक'अशी पालेभाजी दाखविली आहे पण तिचा अर्थ 'चाकवत' असा दिला आहे.

ध्वनिसादृश्यांमुळे मला रघुनाथाचे दोन्ही अर्थ पटण्याजोगे वाटतात.

'न'वी बाजू Sat, 29/03/2014 - 07:52

In reply to by अरविंद कोल्हटकर

वनस्पतींच्या संस्कृत नावांचा नक्की आधुनिक अर्थ काढणे हा एक प्रकारचा आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ असतो.

'आंधळी कोशिंबीर' या खेळाच्या नावात 'कोशिंबीर' कोठून आली असावी?