इमले अक्षरतेचे, अर्थात अष्टाश्वमेध नाटक - २

#ललित #संसर्ग #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२०

इमले अक्षरतेचे,
अर्थात अष्टाश्वमेध नाटक - २

- जयदीप चिपलकट्टी

पहिला अंक

अंक दुसरा

(त्याच दिवसाची दुपार. दिवाणखान्यात कोणीही नाही. ग्रॅन्डफादर क्लॉकमध्ये चारला पाच मिनिटं कमी आहेत. नंदिनी येते आणि घड्याळाकडे निरखून पाहात राहते.)

नंदिनी : (स्वत:शी) मस्त आहे! आपल्याला आवडलं. टिक-टॉक! टिक-टॉक! हे-वा! हे-वा! (स्वत:शीच हसते. मग घड्याळासमोरून बाजूला जाऊन दिवाणखान्यात इकडेतिकडे निरुद्देश हिंडते. बुद्धिबळाच्या मोहऱ्यांशी चाळा करते. बंदुकीला हलकेच बोट लावून पाहते. अचानक मधुरा आत येते. ती पोपटी रंगाची साडी नेसलेली आहे.)

नंदिनी : मधुरा! तू इथे कशी? (चूक उमगून चेहरा झाकून घेत) अगं, सॉरी! मला तसं म्हणायचं नव्हतं. तुझंच तर घर आहे.

मधुरा : उगीच तुझ्या मागोमाग आले! (तिच्या जवळ जाऊन तिच्या साडीला हात लावत) छान दिसतेय तुला. (ही काल रात्रीचीच साडी आहे.)

नंदिनी : अगं, कसलं काय? आम्हा झुंजार पत्रकार मंडळींचा हा युनिफॉर्म असतो. त्याशिवाय अन्यायाविरुद्ध लढा द्यायला स्फुरण येत नाही. पण आज तू सुद्धा कशी काय साडी नेसलीस? किती क्यूट दिसतेयस!

मधुरा : असंच. तू नेसतेस म्हणून. (दोघी काही वेळ एकमेकींची नजर चुकवण्याचा प्रयत्न करत नि:शब्द उभ्या राहतात. मग तंद्री मोडते.) नंदिनी, एकदा मी तुझ्याबरोबर येऊ?

नंदिनी : कुठे?

मधुरा : असंच. तुझं काम बघायला?

नंदिनी : अगं, त्यात काय बघायचंय?

मधुरा : मला एकदा बघायचंय. (थांबून) तुला सांगू का नंदिनी, मी रोजचा पेपरपण धड वाचत नाही. त्यातल्या बऱ्याच गोष्टी माझ्या डोक्यावरून जातात. ते राजकारण मला कळत नाही. बाहेरच्या जगात एवढं काही ना काहीतरी चालू असतं त्याची मला नीट माहिती नसते. आज ब्रेकफास्टला तू आणि पप्पा इतकं भरभरून बोलत होतात. लेबर लॉ, कॉन्स्टिट्यूशनल राईट्स असं काही काही. मी आपली केजरीचा तोबरा भरून तुमच्याकडे टकमक बघत बसले होते. पण नुसतं ऐकत राहायला इतकी मजा आली. तुझं खूप कौतुक वाटतं गं. इतकं करतेस तू. You have such charge. मी आपली वेड्यासारखी नुसती बॅडमिंटन खेळते आणि पप्पांचे पैसे खर्च करते. असं काय उपयोगाचं ना? म्हणून म्हणतेय. तुझं काम कसं असतं मला खरंच समजून घ्यायचं आहे. कुठेकुठे फिरतेस, काय पाहतेस, इतक्या माणसांशी बोलतेस कशी, काय लिहायचं ते कसं ठरवतेस — सगळंच. मला नेशील?

नंदिनी : अगं, त्यात काय?! जरूर नेईन. पण एक सांगू का, त्यातलं खूपसं काम किचकट आणि तेच तेच असतं. ग्लॅमरस असं काही नसतं त्यात..

मधुरा : प्लीज, तसं समजू नकोस. मी काही सारखी ग्लॅमरच्या मागे धावते असं नाही.

नंदिनी : तसं नाही, तू कंटाळशील म्हणून म्हटलं..

मधुरा : (हसून) तू बरोबर असताना कंटाळेन कशी?

(अचानक दोघी नाक वाकडं करतात आणि एकमेकींकडे बघून हसत 'बसवण्णा!' असं एकदमच म्हणतात. बिडीचा धूर पांगावा म्हणून हातवारे करतात. नंदिनी मधुराला 'पटकन लप कुठेतरी' अशा अर्थाची खूण करते. मधुरा बावचळते आणि अलमारीत शिरून दार लावून घेते. बसवण्णा बिडी ओढत आत येतो. त्याच्या उजव्या हातात तीन वेगवेगळ्या रंगाच्या गुलाबांचा गुच्छ आहे.)

बसवण्णा : मॅडम, हे तुमच्यासाठी रोजचं बुके आणलं आहे. माथाडी कामगार संघात आमचं जमखंडीकडचं दोस्त असतं. ते म्हणालं तुम्ही त्यांना खटला जिंकून दिलंत म्हणून. आय वांट टु थॅँक यू ऑन देअर बिहाफ, मॅडम. दे आर पूअर पीपल, मॅडम. लेबर मिळतं म्हणून घरदार सोडून इथे येतं. पुण्यात फिट बसायचं म्हणजे त्यांचं अवघडच की हो. काय चार पैसे मिळेल त्यातलं एक पैशात भागवून तीनचं बायकोला मनीऑर्डर घालून सोडतं. तुम्ही बॉम्बेला जाऊन त्यांच्यासाठी स्ट्रगल केलं म्हणजे मोठं काम केलं बघा.

नंदिनी : थॅँक यू, बसवण्णा! फार छान आहेत फुलं.

बसवण्णा : मॅडम, रोज इस माय स्पेशल्टी. पूना जिमखाना क्लबचं फॉर सेवन स्ट्रेट इअर्स फर्स्ट प्रैझ मीच मिळवतं.

नंदिनी : येस, बसवण्णा. तुझी स्पेशल्टी सगळ्यांना ठाऊक आहे.

बसवण्णा : आमच्या गावात एक फादर होतं. आमचं फादर नव्हे हो. चर्चात राहतं ते फादर म्हटलं तर. ते बोलून सांगायचं की दि नंबर थ्री स्टॅन्ड्स फॉर परफेक्शन इन द आईज ऑफ गॉड. म्हणून तीन कलरचं रोज कंबाईन केलं: पिंक रोज, यलो रोज ॲन्ड व्हाईट रोज.

नंदिनी : खरंच छान दिसताहेत फुलं.

बसवण्णा : पुढच्या वेळी होम व्हिजिटला जातंय तेव्हा तुमच्यासाठी बेळगावचं कुंदा घेऊन येईन बघा. कसं प्रिप्रेशन करायचं ते इथे पुण्यात कुणाला पण नॉलेज नाही बघा. बट आय विल गो बॅक टु माय गार्डन नाऊ. थॅँक यू अगेन, मॅडम. कीप फैटिंग.

नंदिनी : येस, बसवण्णा.

(बसवण्णा जातो. नंदिनी हळूच अलमारीकडे जाऊ लागते, पण तेवढ्यात हाक येते.)

तनय : नंदिनी! नोनो! माझी लाडाची जाज्वल्य पत्रकारिणी ती! कुठे आहेस?!

(तनय आत येतो. तो आणि नंदिनी एकमेकांना आवेगाने मिठी मारून चुंबन घेतात. मधुरा अर्थात अलमारीतच अडकलेली आहे.)

तनय : माथाडी कामगारांचा खटला जिंकलीस याबद्दल अभिनंदन बरं का!

नंदिनी : थँक यू.

तनय : त्यासाठी खूप काम केलं होतंस गं! आणि आबांनीही अर्थात. त्याचं चीज झालं.

नंदिनी : हो.

तनय : चार वाजता भेटायचा निरोप रावजीने तुला दिला असणार ना?

नंदिनी : हो, म्हणून तर आले.

तनय : मी त्याला म्हटलं होतं की तू एकटी नसशील तर आडवळणाची भाषा वापरून निरोप दे. तसा तो हुषार आहे.

नंदिनी : हो.

तनय : बरोब्बर चारला मी इथे आलोच होतो, पण बसवण्णाचा आवाज ऐकू आला. तो लेकाचा केव्हा कटतो याची बाहेर दबा धरून वाट बघत होतो. त्याची बडबड एकदा सुरू झाली की थांबत नाही.

नंदिनी : हो, पण आज लवकर आटोपलंन.

तनय : नोनो, तू आज काही बोलत नाहीयस.

नंदिनी : तसं नाही रे. कसा आहेस?

तनय : फार बरा नाहीय गं. (हातात हात घेऊन दोघे दिवाणावर बसून राहतात.) पोटात खूप दुखतं. सकाळी डॉक्टर आले होते ते नंतर मला गुपचूप भेटून गेले. रिपोर्ट्स वाईट आहेत. लिव्हर सिर्होसिस झालेला आहे. इथून पुढे सगळी घसरणच आहे.

नंदिनी : (कसंबसं रडू आवरत) यातलं आईबाबांना किती सांगितलं आहेस?

तनय : थेट काहीच सांगितलेलं नाही. त्यांचं त्यांनी जितपत ओळखलं असेल ते असेल. डॉक्टरांनाही मी बजावून ठेवलं आहे माझ्या अपरोक्ष त्यांच्यासमोर काही बोलू नका म्हणून. तुला सांगू का नोनो, आईआबांवर मी इतका काही खूप उखडलो आहे असं नाही. पण तसा आव आणणं हेच सध्या बरं वाटतं. त्यामुळे मग कुठलाच विषय फार वाढत नाही.

नंदिनी : मधुराला किती सांगितलं आहेस? (अलमारीकडे चोरून पाहते.)

तनय : बबडीला तर काहीच माहित नाही. तिला कळलं तर खूप वाईट वाटेल. ती माझी फार काळजी करते गं. तुझ्याबद्दलही मी तिला काहीसुद्धा बोललेलो नाही. धीर होत नाही आणि काय बोलावं ते कळत नाही. माझ्या लग्नाबिग्नाचा विषय काढते अधूनमधून. माझ्यावर प्रेम करणारं कुणीतरी हवं असं तिला फार वाटतं. पण मग मी स्त्रीद्वेष्टा कसा आहे, मला कुणीच कसं नको आहे, मी कुणालाच कसा नको आहे असं सगळं शिरा ताणून बोलून टाकतो. तेच सोपं वाटतं.

नंदिनी : तनय, मीही माझ्याबद्दल तुला सगळं सांगितलेलं नाही.

तनय : हे आणि काय आता?! सांगायचं ते सांगून टाक ना प्लीज.

नंदिनी : आज नको रे. एकदा नीट विचार करून सांगेन.

तनय : असं कितीसं वाईट असणार आहे? You are my sweetheart, Nandini.

नंदिनी : I know.

तनय : तू अशी तुटक का वागतेयस? तुला माझ्याशी बोलायचं नाहीय का?

नंदिनी : तसं नाही. (अस्वस्थपणे उठून बसत) छे! काय वेडेपणा आहे हा. अरे, असं नाही चालायचं. ती आत आहे —

तनय : कोण आत आहे?

(नंदिनी अलमारी उघडते. आतून मधुरा ओक्साबोक्शी रडत बाहेर येते. नंदिनी तिला मिठीत घेते. मधुरा तिच्या छातीवर अंग घुसळते आणि क्षणभर घोटाळून अचानक दोघी एकमेकींचं चुंबन घेतात. काही सेकंद तिघेही एकमेकांकडे अवाक होऊन पाहात राहतात आणि मग तिघांनाही अतोनात हसू फुटतं. हळूहळू हे हसू विरत जातं. दोघांचा एकेक हात धरून नंदिनी त्यांना दिवाणाकडे घेऊन जाते. तिघे शेजारी-शेजारी बसतात. नंदिनी मध्ये आहे. तिच्या उजवीकडे तनय तिला बिलगून बसला आहे आणि डावीकडे मधुरा बिलगून बसली आहे. काही काळ तिघेही नि:शब्द राहतात.)

नंदिनी : तन्या, मला काय सांगायचं होतं हे तू ओळखलं असणार. मी बायसेक्शुअल आहे.

तनय : हो, ते दिसतंच आहे. पण मी मात्र एक धोपटमार्गी हेटरोसेक्शुअल आहे. चालेल ना तुला?

मधुरा : आणि मी एक अभिजात वळणाची हाय मेन्टेनन्स लेस्बियन आहे. नंदिनीवर माझं प्रेम आहे. मला नुकतंच कळलं.

(तिघे एकमेकांकडे बघून खिदळतात.)

नंदिनी : त्रांगडंच आहे हे!

तनय : 'त्रांगडं' हा शब्द समर्पक आहे.

मधुरा : मला फार छान वाटतंय. पुढे केव्हातरी आपल्याला अवघड गोष्टींवर बोलावं लागेल, पण तेव्हाचं तेव्हा बघू. आज नको. आज आनंदात राहूया.

(एकमेकांत हात गुंतवून ठेवून तिघेही मग्नपणे बसून राहतात. मधुरा नंदिनीचा चष्मा काढून स्वत:च्या डोळ्यांना लावते आणि हातातल्या काल्पनिक नोटपॅडवर काहीतरी लिहित असल्याचा अभिनय करते.)

मधुरा : (चष्मा सारखा करत) मिस नंदिनी गोखले, आमच्या हजारो वाचकांच्या मनात उद्भवलेला एक प्रश्न मी तुम्हाला विचारते: ही वेगळी वाट चोखाळण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली?

नंदिनी : हा फार चांगला प्रश्न विचारलात तुम्ही! झालं कसं ते सांगते. माझा प्रियकर तनय जातेगावकर आणि माझी प्रेयसी मधुरा जातेगावकर यांच्या दिवाणखान्यात एक बुद्धिबळाचा संच आहे. तो फार देखणा असल्यामुळे येता जाता त्याच्याकडे नजर टाकण्याचा मोह होतो. त्यातून ही प्रेरणा मला मिळाली. जीवनाच्या पटावर प्रत्येक मोहऱ्याची चाल ठरलेली असते. हत्तीने सरळच जायचं आणि उंटाने तिरकंच जायचं. हत्तीला उंटासारखं तिरकं जाता येत नाही किंवा उंटाला हत्तीसारखं सरळ जाता येत नाही. हे असं का याला उत्तर नाही. त्यांचा तो स्वभावधर्म आहे इतकंच म्हणता येईल. But I am the queen on the board of life. मी हत्तीसारखी सरळही जाऊ शकते आणि उंटासारखी तिरकीही जाऊ शकते. हीच माझी स्वत:ची खरी ओळख आहे. ती मला पटवून दिल्याबद्दल मी जातेगावकर कुटुंबाचे मनापासून आभार मानते.

(तिघे पुन्हा खिदळतात.)

तनय : तू माझी नंदूराणी आहेस. (तिच्या उजव्या गालाची पापी घेतो.)

मधुरा : तू माझा नंदूवजीर आहेस. (तिच्या डाव्या गालाची पापी घेऊन तिला परत चष्मा घालते.)

तनय : माझी गुणाची बाय ती. तुझ्यावरून मीठमोहरे ओवाळून टाकायला हवेत.

(रावजी दारात येऊन खाकरतो.)

रावजी : चहा आणू का?

मधुरा : रावजी, बाहेर हवा खूप छान आहे. आजचा चहा आम्ही बागेतच बसून पिऊ. तिथेच आम्हाला तीन खुर्च्या टाकून दे.

रावजी : येस, मिस. (तिघांना उद्देशून) बागेत वेस्ट-पॅव्हिलियनमध्ये बसायची व्यवस्था करतो. अजून एकोणीस मिनिटांनी सूर्यास्त होणार आहे. तिथून चांगला दिसेल.

तनय : मग चला तर.

रावजी : कसं जायचं ते ठाऊक आहे ना? ह्या दारातून दिवाणखान्याबाहेर पडलात की आधी सरळ जा आणि मग तिरके जा.

मधुरा : रावजी, आगाऊपणा करू नकोस. आमचाच बंगला आहे.

(मध्ये काही दिवस लोटले आहेत. स्थळ, अर्थात दिवाणखाना. बॅरिस्टर आणि डॉक्टर अबोलपणे बुद्धिबळ खेळताहेत. एका टेबलावर चहाचा ट्रे मांडलेला आहे. तनय मांडी घालून जमिनीवर बसला आहे आणि एकाग्र चित्ताने नंदिनीची वेणी घालतो आहे. सावित्रीबाई विणकाम करताहेत. डॉक्टर एक चाल करतात. त्यावर थोडा विचार करून बॅरिस्टर त्यांची चाल करतात तशी डॉक्टर लागलीच पुढची चाल करतात. बॅरिस्टरांचा चेहरा व्यग्र होतो. काही वेळाने ते किंचित हसून मान डोलावतात आणि शेकहँड करून दोघे पटापासून दूर होतात. प्रत्येकी एकेक कप चहा ओतून घेऊन खुर्च्यांवर बसतात.)

सावित्रीबाई : कोण जिंकलं?

बॅरिस्टर : डॉक्टर.

सावित्रीबाई : म्हणजे तुमच्यावर मात झाली?

बॅरिस्टर : मी हार कबूल केली.

सावित्रीबाई : मला कळलंसुदीक नाही ते? सारं कसं शांत शांत चाललं होतं.

डॉक्टर : तसं नसतं, माई. न खेळणाऱ्यांची समजूत अशी असते की ओरडा करून बघ्यांचं डोकं उठवणं हा बुद्धिबळाचा भाग आहे. 'हाणा! मारा! बंडूनाना, वाचवा तुमचा वजीर! पांडूतात्या, गेला तुमचा उंट! बंडूनाना, हा घ्या शह! पांडूतात्या, हा मी शह काढला. हा घ्या तुम्हाला प्रतिशह!' That is not how gentlemen play. अशी सततची लाकूडतोड नसते. आणि दुसरं म्हणजे मात होईपर्यंत ताणायचं नसतं. कुणीतरी एकाने समजा अशी चाल केली की तिथून पुढे मात देईपर्यंत त्याला सरळ राजरस्ता आहे. तर शिष्टसंकेत असा असतो की दुसऱ्याने ते कबूल करून हार मानावी. रस्ता दोघांनाही स्वच्छ दिसला म्हणजे पुरे. त्याच्यावर चालायची गरज नसते. चेहऱ्यावर एक सुरकुती पाडून आणि सेकंदापुरती नजर भिडवून तेवढा निरोप समोरच्याला कळवायचा असतो.

सावित्रीबाई : मग तर मला सहज जमेल. शिकवा एकदा.

(मधुरा आतून एका चांदीच्या ट्रे वर कापूस आणि नेलपॉलिशच्या अर्धा डझन बाटल्या घेऊन येते. नंदिनीच्या पायाशी ठिय्या मारून बसते.)

मधुरा : नंदी, तुझा पाय दे इकडे. रंग मी निवडणार. (नंदिनीचं पाऊल हातात घेऊन एकेक नेलपॉलिशची बाटली त्वचेलगत लावून पाहते. त्यातली एक निवडून पाऊल मांडीवर घेऊन तिच्या नखांना काळजीपूर्वक पॉलिश लावू लागते.) पप्पा, तुम्हाला हे यापूर्वी माहित नसणार, पण तुमची एक प्रो-बोनो क्लाएंट आहे: मधुरा जातेगावकर नावाची. तुमची फी तिला परवडणार नाही, पण कायदेशीर सल्ला हवा आहे. विचारू का?

बॅरिस्टर : बोल बेटा.

मधुरा : तुम्ही आणि मम्मानं लग्न केलंत आणि आम्हाला जन्माला घातलंत. मला बॅडमिंटनची रॅकेटपण घेऊन दिलीत, त्याबद्दल थॅँक यू सो मच! आता इश्यू काय आहे ते तुम्हाला सांगते: तन्या, नंदी आणि मी अशा आम्हा तिघांचं एकमेकांवर प्रेम आहे. ह्या घरात आम्ही एकत्र राहणार आहोत. तन्या आणि नंदी कोकशास्त्र वाचून मूल करणार आहेत. ते मूल आम्ही तिघे मिळून वाढवणार आहोत. तुमच्या पैशांनी त्याला बॅडमिंटनची रॅकेट, पतंग आणि गोष्टीचं पुस्तक घेऊन देणार आहोत. तर आता माझा प्रश्न असा की आम्हा तिघांना एकमेकांशी लग्न करता येईल का?

बॅरिस्टर : बेटा, तशी कायदेशीर तरतूद नाही.

मधुरा : म्हणजे करता येणार नाही?

बॅरिस्टर : नाही. तू म्हणत असशील तर यावरची सगळी कलमं मी तुला दाखवू शकेन. हिंदू कोड बिल, स्पेशल मॅरेज ॲक्ट अशा कितीतरी नावांची जंत्री म्हणता येतील. पण त्यांत काही मिळणार नाही याची मला खात्री आहे. तशी कायदेशीर तरतूद नाही. एक पुरुष आणि एक स्त्री अशा दोघांनाच एकमेकांशी लग्न करता येतं. त्यापलिकडे नाही.

मधुरा : का नाही?

डॉक्टर : बॅरिस्टर, मर्मभेद झालेला आहे! सुकन्येचा प्रश्न बरोबर आहे: तशी कायदेशीर तरतूद का नाही? तुम्हाला सांगतो बॅरिस्टर, इतकी वर्षं तुमची न् माझी ओळख आहे पण एक गोष्ट मला कधीही नीट कळलेली नाही. मुळात कायदा म्हणजे काय हेच आम्हाला समजावून सांगा. मग कायदेशीर तरतूद म्हणजे काय ते सांगा. रक्ताभिसरण कसं होतं हे मी तुम्हाला समजावून सांगितलं की नाही? Now you have to pay me in kind.

(बॅरिस्टर लगेच काही बोलत नाहीत.)

बॅरिस्टर : कायदा म्हणजे काय ते मला माहित नाही.

सावित्रीबाई : माहित नाही?! बाई गं! आता काय म्हणावं याला?! स्वत:ला कायदेपंडित म्हणवून घेऊन खोऱ्याने पैसे ओढलेत! त्यातून आमच्या डोक्यावर छत आलं, पोरीला बॅडमिंटनची रॅकेट आली, मला अळवाच्या लाडवांचं साहित्य विकत घेता आलं. पण कायदा म्हणजे काय ते माहित नाही! कुठे फेडाल हो हे पाप?! देवा, कशा माणसाशी जन्मगाठ बांधलीस रे?!

(बॅरिस्टर लगेच काही बोलत नाहीत.)

बॅरिस्टर : पण मला खरंच माहित नाही. मी लंडनमध्ये शिकायला होतो तेव्हा 'कायदा म्हणजे काय' यावर उलटसुलट चर्चा करत आम्ही लॉ स्टूडंट्स रात्रीच्या रात्री जागवायचो. खूप समरस होऊन बोलायचो. पण चर्चा करून एकदाच कायमचा सुटेल असा हा प्रश्न नव्हे. समजा तुम्ही लाडवासाठी गूळ खरेदी करायला मंडईत गेलात. तर त्या गुळात भेसळ असू नये असा कायदा आहे. जर कुणी भेसळ केली तर त्याला दंड होतो. हा कायद्याचा एक अर्थ झाला. पण आता दुसरं असं पाहा की डेक्कन जिमखान्यावर जमीन घेऊन आपण आपला बंगला बांधलेला आहे. त्यात आपल्या मालमत्तेची हद्द कुठे संपते आणि 'श्रमसाफल्य'ची कुठे सुरू होते याचा एक सर्व्हे असतो. घड्या घालून तुकडे पडायला आलेला हा एक जुनाट कागद असतो. तर आता हा सर्व्हे कुणी करायचा आणि झाल्यावर त्याची नोंद कुठल्या कचेरीत करायची यामागे लॅँड सर्व्हे ॲक्टचं पाठबळ आहे. कायद्याचा हा थोडा वेगळा अर्थ झाला, कारण यात दंडाचा किंवा शिक्षेचा थेट संबंध नाही. आता तिसरं असं पाहा की वयात आलेला हिंदू मुलगा वयात आलेल्या हिंदू मुलीशी लग्न करू शकतो, पण एका वेळी दोघींशी लग्न करू शकत नाही. कायद्याचा हा आणखीनच भानगडीचा अर्थ झाला, कारण भेसळ म्हणजे काय हे ठरवण्यापेक्षा हिंदू कोण हे ठरवणं जास्त अवघड आहे. असे बरेच अर्थ होतात. ते सगळे आपण समोर मांडून ठेवले आणि त्यांच्यातलं समान सूत्र शोधायचा प्रयत्न केला तर फार गोंधळ होतो. म्हणून आमचे प्रोफेसर आम्हाला सांगायचे की 'कायदा म्हणजे काय' याचा फार विचार करू नका. कायद्यातल्या ठराविक मुद्द्यांचा विचार करा. बहुतेक वेळा तेवढ्याने भागतं.

तनय : ठीक आहे आबा, तुम्ही म्हणता ते बरोबर वाटतं. मग आता ठराविक मुद्द्याचाच विचार करूया. तुम्ही म्हणता की तीन माणसांना एकमेकांशी लग्न करता येईल अशी कायदेशीर तरतूद नाही. मान्य. पण माझा प्रश्न त्याच्या आधीचा आहे. एकच बाप्या आणि एकच बाई यांना एकमेकांशी लग्न करता येईल अशी कायदेशीर तरतूद का आहे?

बॅरिस्टर : का आहे म्हणजे?

तनय : मला एक गोष्ट कळत नाही. समजा आपल्या शेजारी 'श्रमसाफल्य' मध्ये राहणारी कुणीतरी ज्योती नाडकर्णी आणि सदाशिव पेठेत राहणारा कुणीतरी अशोक कुलकर्णी अशा दोघांना एकमेकांशी लग्न करायचं आहे. तर मी म्हणेन त्यांच्या कलाने त्यांना करू द्यावं. आता ते लग्न अंतरपाट धरून करायचं की रानफुलांच्या माळा घालून करायचं, भटजी बोलवायचा की समाजसुधारक बोलवायचा, पंक्तीला मठ्ठा असणार की नाही, लग्नानंतर कुठे राहायचं, संसार कुणाच्या पैशाने चालवायचा हे त्यांचं ते ठरवतील. पण मला हे कळत नाही की ह्या सगळ्याशी सरकारचा काय संबंध आहे? लग्नाबद्दल काहीतरी कायदा असला पाहिजे असा अट्टाहास सरकार का करतं? ज्योती नाडकर्णीने समजा भोंडला घातला तर सरकारला त्याच्याशी देणंघेणं नसतं. सरकारी कचेरीत जाऊन तो काही ती रजिस्टर करत नाही किंवा तिला करता येणार पण नाही. मग लग्न वेगळं का आहे?

डॉक्टर : एक कारण असं आहे की त्यांच्या शरीरसंबंधांना लग्नामुळे समाजमान्यता मिळते.

तनय : डॉक्टर, हे काही उत्तर नव्हे. एकतर समाजाची मान्यता आणि कायद्याची मान्यता या वेगळ्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ, वि. स. खांडेकर वाईट लिहितात हे सगळ्या समाजाला मान्य आहे. पण म्हणून असेंब्लीने तशा अर्थाचा ठराव पास करून घ्यायची काही गरज नसते. समाजमान्य असलेली गोष्ट कायद्याने मान्य केली पाहिजे असं काही नसतं. आणि मुळात अशा समाजमान्यतेची गरज काय आहे? एकमेकांशी शरीरसंबंध ठेवायचे की नाही आणि ठेवायचे तर कसे ठेवायचे हे ज्योती आणि अशोक त्यांचं ते बघून घेतील. सरकारचा त्यात काय संबंध आहे? कुणी असं का नाही म्हणत की खिरापतीला समाजमान्यता मिळावी म्हणून भोंडला रजिस्टर करावा?

डॉक्टर : ठीक आहे, पण समज तुझ्या ज्योतीने आढेवेढे घेत अशोकशी शरीरसंबंध केला. आता त्यातून जर त्यांना मूल झालं तर पुढे काय?

तनय : तर पुढे काय? झालं तर होऊ दे. कायदा त्यांना बजावून सांगेल की त्या मुलाला खाऊपिऊ घालण्याची आणि बॅडमिंटन रॅकेट घेऊन देण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. ती टाळलीत तर तुम्हाला शिक्षा करू. पण त्या मुलाच्या आईबापाचं लग्न झालं होतं की नाही याच्याशी ह्या सगळ्याचा काही संबंध नाही. ते झालं काय आणि नाही झालं काय, जबाबदारी आहे तीच आहे.

सावित्रीबाई : म्हणजे तुला म्हणायचंय की लग्नाबद्दल काहीच कायदा करायला नको? लोकांना हवं ते करू द्यावं?

तनय : हो! माझं मत नंतर चुकीचं वाटलं तर ते मी मागे घ्यायला तयार आहे. पण तूर्तास तरी मी म्हणतो की काहीच कायदा नको. आई, तुला एक उदाहरण पटतं का बघ. लग्न बाजूला ठेव. 'मैत्री' या संकल्पनेबद्दल आपण बोलूया. तसं पाहिलं तर हा फार ढगाळ विषय आहे. बऱ्याच गोष्टींचा नीट उलगडा होत नाही. म्हणजे समज विकास आणि विलास एकमेकांना ओळखतात. तर आता प्रश्न असा आहे की हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत की नाहीत? नक्की काय असलं म्हणजे ते मित्र आहेत असं म्हणता येईल? म्हणजे बुवा आपण मित्र आहोत हे त्यांनी एकमेकांना स्पष्टपणे किंवा अस्पष्टपणे बोलून दाखवणं गरजेचं आहे का? तर याला निश्चित उत्तर नाही. समज विकास विलासला मित्र समजतो पण विलास विकासला मित्र समजत नाही. तर हे एकमेकांचे कितपत मित्र आहेत? याला निश्चित उत्तर नाही. ते एकमेकांना मित्र समजत असतील तरीदेखील एखादा तिसरा माणूस म्हणू शकतो का की त्यांची मैत्री खोटी आहे किंवा हा नुसता मैत्रीचा आभास आहे? समज तो तसं म्हणाला तर विकास-विलास बरोबर की तो बरोबर हे कसं ठरवायचं? याला निश्चित उत्तर नाही. हे सगळं तारतम्यावर अवलंबून आहे. पण निश्चित उत्तरं नाहीत म्हणून काही कुणी मैत्री करायचं किंवा तोडायचं थांबत नाही. चुकतमाकत का होईना लोक करायचं ते करतातच. 'मैत्री' ह्या संकल्पनेची प्रत्येकाची जाण थोडी वेगवेगळी असते, पण सगळेजण हे समजून सांभाळून घेतात.

मग लग्नाचं तसंच का नको? ज्योती आणि अशोकचं लग्न झालेलं असणं म्हणजे काय हा त्या दोघांचा, त्यांच्या नातलगांचा आणि शेजाऱ्यापाजाऱ्यांचा प्रश्न आहे. यात जी काही मतमतांतरं असतील ती हे लोक आपापल्या बुद्धीने सांभाळून घेतील. सरकारची यात लुडबूड कशाला?

नंदिनी : तन्या, तुझं पटत नाही असं नाही, पण मला काय वाटतं ते सांगते. तुला म्हणायचं असं की ज्योती आणि अशोकला लग्न करायचं असेल तर ते करू द्यावं. अर्धवट झोपेत गोपाळ मुहूर्तावर करायचं असेल तर तसं करू द्यावं. काडीमोड घ्यावीशी वाटली तर आपली काडीमोड झाली असं मावळत्या सूर्याच्या साक्षीने एकमेकांना सांगून ती घेऊ द्यावी. एकत्र सामानसुमान घेतलं असेल तर ते कसं वाटून घ्यायचं हे त्यांचं त्यांनी बघावं. ज्योतीला मध्येच तिसऱ्या कुणाशी लग्न करावंसं वाटलं तर तो त्या तिघांचा अंतर्गत प्रश्न आहे. सरकारचा आणि कायद्याचा यात काही कुठे संबंध नाही. बरोबर?

तनय : बरोबर.

नंदिनी : एक पटतं का पाहा. तन्या, समज तू एक कादंबरी वाचतोयस. तुला कंटाळा आला, शेवटच्या पानापर्यंत वाचण्यात अर्थ नाही असं वाटलं तर ती तू सोडून देशील. बरोबर?

तनय : बरोबर.

नंदिनी : आता समज तू थिएटरमध्ये जाऊन एक नाटक बघतोयस. तुला कंटाळा आला, शेवटच्या अंकाचा पडदा पडेपर्यंत बघण्यात अर्थ नाही असं वाटलं तर ते तू सोडून देशील. बरोबर?

तनय : बरोबर.

नंदिनी : पण या दोन्हींत फरक आहे. तू कादंबरी सोडून दिलीस ह्याची कुणाला फिकीर नसते. पण नाटक सोडून देताना दोन गोष्टी होतात: एक तर थिएटरच्या बाहेर जाताना इतरांचे गुडघे खात जावं लागतं. आणि दुसरं म्हणजे तू नाटक सोडून चाललायस हे इतर लोक टक लावून बघतात. चाललेलं नाटक सोडून जाणं हा अशिष्टपणा आहे असं त्यातल्या काहींना वाटतं आणि असं वाटणारे लोक तिथे असणार आहेत हे तुला आधीपासूनच ठाऊक असतं. यामुळे फरक पडतो. हा सगळा अप्रियपणा टाळण्यासाठी तू कंटाळवाणं नाटकसुद्धा पंधरा मिनिटं जास्त बघशील. आणि त्या पंधरा मिनिटांत कदाचित तुला ते आवडायला लागेल.

तनय : शक्य आहे.

नंदिनी : लग्नाचं असंच असणार. अगदी परस्परसंमतीने जरी घेतला तरी कायदेशीर घटस्फोट हा त्रास असतो. मावळत्या सूर्याकडे नुसतं तोंड करून तो होत नाही. तेव्हा ज्योती आणि अशोकचं लग्न समज डुगडुगायला लागलं तर घटस्फोटाचा त्रास वाचावा म्हणून दोघे मिळून ते सावरायचा थोडा जास्त प्रयत्न करतील. हा त्रास पुरता काढून टाकला तर अगदीच बेतासबात प्रयत्न करतील. तेव्हा सरकारी लुडबूड ही काही सदासर्वकाळ वाईट गोष्ट नव्हे.

तनय : (मान डोलावतो.) मान्य. तू म्हणतेयस त्यात तथ्य आहे. पण याला आणखी एक बाजू आहे. मी असं म्हणेन की मैत्रीभोवताली कायदे असे काही नसल्यामुळे ती संकल्पना जास्त श्रीमंत होत जाते. मैत्री करणं म्हणजे काय किंवा मैत्री तोडणं म्हणजे काय ह्याबद्दल प्रत्येकाला स्वत:चा विचार करावा लागतो. लग्नाबाबतीत होतं काय की सगळ्यांसाठी एकाच मापाची चड्डी मायबाप सरकारने विकायला काढल्यामुळे लोक ती घालून घेतात, आणि आपापलं ढुंगण नीट मोजून घेऊन त्याप्रमाणे व्यवस्थित बेतलेली चड्डी कशी शिवता येईल याचा विचार करेनासे होतात. पण ते आता राहू दे. आपण म्हणालो म्हणून काही सरकार इतक्यात दुकान बंद करणार नाही. नोनो, तुझा स्वत:चा कल काय आहे? तुला लग्न करावंसं वाटतं की नाही? किंवा कसं?

नंदिनी : (म्हटलं तर हो, म्हटलं तर नाही असा आविर्भाव करते.) नुसत्या आपल्या दोघांना करता येईलच. पण मला तसं करायचं नाहीय. मधुराच्या मनात खूप आहे. तेव्हा करायचं तर तिला घेऊन करायचं, नाहीतर नाही.
हवी गं हवी, मला माझी मधुरा
तिच्याविना वाटे, संसार अधुरा

बघा डॉक्टर, तन्याच्या संसर्गानं मी यमक जुळवायला शिकले आणि तुमच्या संसर्गानं वाईट कोट्या करायला शिकले!

मधुरा : उगी, उगी! (नंदिनीच्या पावलावर प्रेमाने थापटते.)

तनय : (नंदिनीला उद्देशून) Thank you for the compliment, love.

नंदिनी :
You are welcome, mister
My beloved poetaster!

मधुरा : फार सुंदर काव्यपंक्ती आहेत! (टाळ्या वाजवल्याचा अभिनय करते.) नंदी, तू इथेच बसून राहा. नाहीतर नेलपॉलिश फिसकटशील. (तिला दिवाणावर बसवून पायांखाली एक उशी ठेवून तिच्यासाठी चहा घेऊन येते.) पप्पा, मला तुमचे हे जडजंबाल विषय कळत नाहीत. तन्या म्हणतो की लग्नाचे कायदे ही आपल्या खाजगी आयुष्यात सरकारची लुडबूड आहे. असेल. पण मला सरकारची लुडबूड हवी आहे. इतरांच्या आयुष्यात सरकार लुडबूड करतं तर माझ्या आयुष्यात का नये करू त्यानं? इतरांना हवं तेच मला हवं आहे. आता माझं थोडं वेगळं आहे. मला पुरुषाचं आकर्षण वाटत नाही, पण बाईचं वाटतं. नंदीचं तिसरंच काहीतरी असतं. तिला पुरुषाचं वाटतं आणि बाईचंही वाटतं. कसं काय जमतं तिला कळत नाही. पण आता इतके किरकोळ फरक तुमच्या सरकारला सांभाळून का घेता येत नाहीत? तेव्हा पप्पा, तुम्ही आमचं वकिलपत्र घ्या. सरकारात दाद मागा आणि आम्हा तिघांना लग्न करता येईल अशी कायदेशीर तरतूद करून आणा.

नंदिनी : तसं शक्य आहे, आबा? (जीभ चावते.) सॉरी, तन्याच्या संसर्गानं तेच तोंडात आलं!

बॅरिस्टर : You too, Nandini?! Then die Barrister!

नंदिनी : सॉरी सर, पण सांगा ना!

बॅरिस्टर : बबडे, त्याआधी तू मला एक सांग. तुला नंदिनीशी लग्न करायचं आहे की दोघांशी?

मधुरा : दोघांशी. मला आणि तन्याला काही शरीरसंबंध करायचा नाहीय. पण त्याचा, माझा आणि नंदीचा संसार एकच असणार आहे. म्हणून मला त्या दोघांशी लग्न करायचं आहे.

बॅरिस्टर : मला अवघड वाटतं. पण बबडीने कायदेशीर सल्ला मागितला आहे तर तो रीतसर द्यायला हवा. (स्वत:साठी आणखी एक कपभर चहा ओतून घेतात. तुम्हालाही हवा असेल तर पुष्कळ आहे, असा आविर्भाव करतात. तनय नंदिनीचा कप पुन्हा भरतो.)

नंदिनी : अशी एका जागी खिळून बसून चहा पीत राहिले तर शू लागेल.

सावित्रीबाई : अगं, तेवढाच सराव होईल. चहा ढोसत राहिल्याशिवाय का कुठे पत्रकार होता येतं? आणि बाईच्या जातीला शू दाबून ठेवायची सवय हवीच.

बॅरिस्टर : झालं तुमचं?!

सावित्रीबाई : हो.

बॅरिस्टर : ठीक. तर आपल्यासमोरचा प्रश्न असा आहे की तीन सज्ञान व्यक्तींना एकमेकांशी लग्न करता येईल अशी कायदेशीर तरतूद सध्या नाही, तर ती कशी करून घ्यायची. यात दोन अडचणी आहेत: एकतर बबडी लेस्बियन आहे आणि स्वत: स्त्री असून तिला दुसऱ्या स्त्रीशी लग्न करायचं आहे. सध्या हे कायद्याने शक्य नाही. दुसरं म्हणजे नंदिनी बायसेक्शुअल आहे आणि तिला एका पुरुषाशी आणि एका स्त्रीशी एकाच वेळी लग्न करायचं आहे. हेही सध्या शक्य नाही. तर मग काय करायचं?

अशी कायदेशीर तरतूद अर्थात पार्लमेंट करू शकतं. तेव्हा ती करा बाबांनो, अशी पार्लमेंटमध्ये बसलेल्या लोकांना — म्हणजेच खासदारांना — गळ घालणं हा एक मार्ग आहे. पण 'खासदार' ह्या जमातीतले शंभरांपैकी पंचाण्णव लोक बेअक्कल असतात. त्यांच्या नादी लागण्यात अर्थ नसतो, तेव्हा तो विचार नको.

दुसरा मार्ग म्हणजे कोर्टात फिर्याद करणं. तिथे बेंचवर बसलेले लोक जास्त शहाणेसुरते असतात. हेकट माणसं तिथेही आहेतच, पण तीच फक्त भरलेली नाहीयत. त्यामुळे हा मार्ग जास्त बरा वाटतो. तर फिर्याद अशी करायची की अमुक प्रकारची कायदेशीर तरतूद नसणं हा माझ्या अशिलावर अन्याय आहे. न्याय देणं याच कामासाठी कोर्ट बसवलेलं असल्यामुळे अन्याय झाला असं म्हटलं की त्याला दखल घ्यावी लागते. पण अन्याय झाला असं नुसतं म्हणून चालत नाही, तर ते म्हणायचा एक ठराविक साचा असतो. आपल्या देशाच्या घटनेत काही वेचीव शब्दप्रयोग आहेत: आपण सगळे कायद्यासमोर समान आहोत असं त्यात म्हटलेलं आहे. किंवा आपल्या सर्वांना सन्मानाने जगता येईल अशी हमी दिलेली आहे. नक्की शब्दप्रयोग महत्त्वाचे नाहीत आणि घटनेत ते कुठे येतात हेही महत्त्वाचं नाही. प्रीअँबल बघा किंवा पार्ट थ्री आर्टिकल फिफ्टीन बघा असं लोक एकमेकांना सांगतात, पण प्रत्यक्षात तिथे बघून काही जास्त कळतं असं नाही. तर मी साचा म्हणालो तो असा की सध्याचा कायदा ज्या भाषेत लिहिलेला आहे त्यामुळे अमुक पानावर नमूद केलेल्या माझ्या तमुक घटनात्मक हक्काचा भंग होतो असं कोर्टाला म्हणायचं. आता हे जर रिवाजाला धरून म्हणायचं तर कुरूप आणि क्लिष्ट इंग्रजीत शे-दोनशे पानं खरडावी लागतात. जुन्या केसेस शोधून काढून त्या त्या जजमेंटातले उतारे द्यावे लागतात. पण तो सगळा कंटाळवाणा कारकुनी भाग झाला. बेंचवर बसलेले लोक इतके शहाणेसुरते असतात की ही दोनशे पानं ते वाचत नाहीत.

नंदिनी : You sound cynical, Sir.

बॅरिस्टर : Do I? Well, I am being pragmatic, that's all. तुपकट चेहरा करून ब्रह्मानंदी टाळी लागल्याच्या आविर्भावात घटनेबद्दल भरभरून बोलण्याचा आपल्याकडे प्रघात आहे. तो मी पाळत नाही.

नंदिनी : (हसू दाबत) All right. Do go on, Sir.

बॅरिस्टर : तर आपल्या घटनेत असं म्हटलेलं आहे की अशोक कुलकर्णी आणि बबडी जातेगावकर कायद्यासमोर समान आहेत. मुख्य म्हणजे ते भिन्नलिंगी आहेत म्हणून त्यांना वेगळं वागवता येत नाही. अशोक पुल्लिंगी आहे म्हणून त्याने कमी टॅक्स द्यायचा आणि बबडी स्त्रीलिंगी आहे म्हणून तिने जास्त द्यायचा असं सरकारला करता येत नाही. तसं केलं तर समानता ह्या तत्त्वाचा भंग होईल. पण मेख अशी की काही बाबतींत त्यांना वेगळं वागवलेलं कायद्याला चालतं. अशोकला सैन्यात शिरून लढाईवर जाता येतं तसं बबडीला जाता येत नाही. तिला सैन्यात डॉक्टर होता येतं, पण सीमेवर जाऊन लांड्यांना थेट गोळ्या मारता येत नाहीत. हे असं का याला सरकार बरीच कारणं देतं. सरकार म्हणतं की बबडीला एकतर इतकी जड बंदूक उचलणार नाही. शिवाय सीमेवर तंबू ठोकून राहात असताना अशोकला उघड्यावर कुठेतरी आंघोळबिंघोळ करावी लागते तेव्हा बबडी तिथे आसपास नसलेलीच बरी. म्हणजे एकूण सरकार असं म्हणतं की प्राणाची बाजी लावून देशाचं संरक्षण करण्याची परवानगी आम्ही बबडीला देत नाही, पण यामुळे समानता ह्या तत्त्वाचा भंग होतो असं काही म्हणता येणार नाही.

आता होतं काय की 'समानता' हा शब्द फार अमूर्त आहे, आणि सामान्य लोकांच्याच नव्हे तर न्यायाधीशांच्याही मनात त्याला स्पष्ट अर्थ असा नसतो. त्यामुळे सरकारचं बरोबर की चूक हे ठरवणं अवघड जातं. यावर उपाय म्हणजे जो काही विशिष्ट मुद्दा विचाराधीन असेल त्यावरची तुमची भावनिक किंवा नैतिक प्रतिक्रिया वापरणं. बबडी स्त्री आहे म्हणून तिला टॅक्स जास्त लावला तर 'अरेच्चा, हे बरोबर नाही बरं का' अशी प्रतिक्रिया मनात पटकन उमटते. 'समानतेच्या तत्त्वाचा भंग झाला' हे त्या प्रतिक्रियेचं कपडे घातलेलं रूप आहे. कोर्टात युक्तिवाद करताना लोक तत्त्वाची भाषा वापरतात, कारण पद्धत तशी आहे. पण खरं काम त्यामागची प्रतिक्रियाच करत असते. याउलट बबडीला लढाईवर न्यायला सरकार नाही म्हणालं तर अशी काही प्रतिक्रिया बहुतेक लोकांच्या मनात उमटत नाही. उलट लोकांना बबडीबद्दल काळजी वाटते आणि 'कशाला बाई तिथे जातेस' असंच ते मनातल्या मनात म्हणतात. त्यामुळे मग समानतेचं तत्त्व आपोआपच बाजूला पडतं. लढाईवर जायची बबडीला स्वत:ला खूप उबळ असली तरी इतरांवर तिचा म्हणावा तसा परिणाम होत नाही.

आपला प्रश्न हाच आहे. अशोक कुलकर्णीला एका स्त्रीशी लग्न करता येतं तर मग बबडी जातेगावकरला का नाही? यामुळे समानतेच्या तत्त्वाचा भंग का होत नाही? आणि इथेही अडचण तीच आहे. एका बाईला दुसऱ्या बाईबरोबर संभोग करावासा वाटू शकतो किंवा संसार थाटावासा वाटू शकतो हे बहुतेक लोकांच्या मनाआड असतं. त्यांना ते आतून कळत नाही. आणि त्यामुळे बबडीची तक्रार ऐकूनही कुणाला त्याबद्दल फारशी सहानुभूती वाटत नाही. आता जर तुम्ही इथे समानतेचा आग्रह धरलात तर त्यामागे सहानुभूतीचं पाठबळ नसल्यामुळे होतं काय की एकतर लोकांना तो दुराग्रह वाटतो किंवा एकूणच त्या युक्तिवादात दात कुठून रोवावेत ते कळत नाही.

नंदिनी : पण म्हणजे सर, 'सन्मान' किंवा 'समानता' हे शब्द इतक्या व्यासंगी चश्मिष्ट लोकांनी घटनेत आवर्जून लिहून ठेवले आहेत, त्यांना स्वत:चा असा अर्थ काहीच नाही?

बॅरिस्टर : (अनिश्चितपणे मान हलवतात.) मला तसं म्हणायचं नाही. निदान उघडपणे तसं म्हणायचं नाही. पण नंदिनी, असं बघ की शब्द आणि त्यांचे अर्थ यावर सेमिनार भरवून काही निष्पन्न होत नाही. समानता म्हणजे काय किंवा सन्मान म्हणजे काय यावर काथ्याकूट करण्याऐवजी कायद्याच्या विशिष्ट मुद्द्यात समानतेचा संबंध कसा येतो इतकंच पाहणं सोयीचं पडतं. आपलं आर्ग्युमेंट समोरच्याला पटवून द्यायचं असेल तर उपयोग त्याचा होतो. जज्जच्या डोक्यातली समानतेची अमूर्त कल्पना आणि तुमच्या डोक्यातली कल्पना ह्या दोन्ही जुळवायला गेलात तर ते बापजन्मी शक्य होत नाही. माथाडी कामगारांना सन्मानाने जगण्याचा हक्क आहे हा मुद्दा आपण मुंबईला हायकोर्टासमोर मांडला. त्याला बळकटी यावी म्हणून इंग्लंडमधल्या औद्योगिक क्रांतीपर्यंत मागे जाऊन ऐतिहासिक दाखले दिले. मॅँचेस्टर गार्डियनमधली कात्रणं शोधून काढली. ह्या विषयावर हाउस ऑफ लॉर्ड्समध्ये किती साली कोण काय म्हणालं होतं ते भिंग लावून हॅन्सर्डमध्ये बघून त्यातला आपल्याला हवा तो भाग वापरून घेतला. ह्या सगळ्याचा उपयोग झाला आणि आपण केस जिंकलो. पण सन्मानाने जगणं म्हणजे काय किंवा त्यात कशाचा अंतर्भाव होतो आणि कशाचा होत नाही हे विचारलंस तर मला तसं सांगता येणार नाही.

नंदिनी : मान्य आहे, सर. पण मग माझ्या किंवा मधुराच्या बाबतीत असं आर्ग्युमेंट यशस्वी होईल असं तुम्हाला वाटत नाही?

बॅरिस्टर : नाही. मी म्हणालो की बेंचवर बसलेली माणसं जास्त शहाणीसुरती असतात. पण त्यांच्या जजमेंटमध्येही भावनिक प्रतिक्रियेचा वाटा असतोच. तसं ते कबूल करणार नाहीत, पण म्हणून तो नाहीसा होत नाही. आणि ही प्रतिक्रिया कुणाची काय असेल ते सद्यपरिस्थितीत सांगवत नाही. पण जरी ती आपल्याला धार्जिणी असली तरीसुद्धा ज्या वाटेने त्यांना आपण जायला सांगतो आहोत ती इतकी बिकट आहे की ही शहाणी माणसंही कचरतीलच. मग अशा वेळी प्रश्न टाळण्याचा एक हुकमी आणि ठरीव मार्ग कोर्टासमोर असतो. अमुकतमुक निर्णय हा न्यायालयाच्या कक्षेत येत नाही तर तो पार्लमेंटने घ्यावा असा एक संकल्प म्हणता येतो. प्रत्यक्षात काय असतं की पार्लमेंटमध्ये बसणाऱ्या मंडळींच्या सुज्ञपणाबद्दल बेंचवर बसणाऱ्यांचं मत फारसं चांगलं नसतं. असा निर्णय घेण्यासाठी जो विचारीपणा लागतो तो पार्लमेंटकडे आहे असं त्यांना मनातून वाटत नसतंच. पण तसं कुणी बोलून दाखवत नाही. म्हणजे आपापसांत व्हिस्की पिताना ठीक आहे, पण चारचौघांत नाही.

नंदिनी : मग आम्ही काय करायचं सर? ही भावनिक प्रतिक्रिया म्हणा किंवा सहानुभूती म्हणा, आमच्या बाजूला वळावी म्हणून आम्ही काय करायचं? वर्तमानपत्रातून लेख लिहून आम्ही आहोत, आमच्याकडे लक्ष द्या, असं सांगायचं? मोर्चे काढायचे?

बॅरिस्टर : हो. अगदी आत्ताच नको. पायाची नखं वाळू देत. पण त्यानंतर हो.

नंदिनी : पण असं असेल तर मला तन्याचं म्हणणं जास्त जास्त पटायला लागलं आहे. तुम्ही म्हणता तसे दोन वेगळे मुद्दे यांत गुंतलेले आहेत. मधुरा लेस्बियन आहे म्हणून तिला एका बाईशी लग्न करायचं आहे. आता लेस्बियन बाया एकतर दुर्मीळ आहेत आणि शिवाय चारचौघींसारख्याच दिसतात. बॅडमिंटन खेळताना मधुरा काही वेगळी ओळखू येत नाही. पण त्यामुळे कायद्याने त्यांना एकमेकींशी लग्न करता येत नाही ही अडचण कुणी मनावर घेत नाही. मग त्यांनी काय करायचं? तुम्ही म्हणता की मोर्चे काढायचे, लेख लिहायचे, बेअक्कल खासदारांची मनधरणी करायची, डेक्कन क्वीनने मुंबईला जाऊन जज्ज नरीमनसमोर पदर पसरायचा. कित्येक वर्षं उन्हाळ्यामागून पावसाळ्यामागून हिवाळे हे सतत करत राहिल्यानंतर केव्हा तरी ही कायदेशीर तरतूद होईल. जेव्हा होईल तेव्हा त्या पेढे वाटतील. ठीक आहे.

मी बायसेक्शुअल आहे, म्हणून मला एका बुवाशी आणि एका बाईशी एकाच वेळी लग्न करायचं आहे. आता बायसेक्शुअल माणसं एकतर दुर्मीळ आहेत आणि शिवाय चारचौघांसारखीच दिसतात. लेडीज हॉस्टेलात मी काही वेगळी ओळखू येत नाही. पण त्यामुळे कायद्याने आम्हाला एकाच वेळी दोन माणसांशी लग्न करता येत नाही ही अडचण कुणी मनावर घेत नाही. मग आम्ही काय करायचं? तुम्ही म्हणता की मोर्चे काढायचे, लेख लिहायचे, बेअक्कल खासदारांची मनधरणी करायची, डेक्कन क्वीनने मुंबईला जाऊन जज्ज सोराबजीसमोर पदर पसरायचा. कित्येक वर्षं उन्हाळ्यामागून पावसाळ्यामागून हिवाळे हे सतत करत राहिल्यानंतर केव्हा तरी ही कायदेशीर तरतूद होईल. जेव्हा होईल तेव्हा आम्ही बर्फी वाटू.

पण हे ठीक नाही, सर. ह्यात अतोनात वेळ फुकट जातो आणि अतोनात शक्ती फुकट जाते. तोच तो प्रश्न आपण किती वेळा सोडवत राहणार? म्हणूनच तन्याचं म्हणणं बरोबर वाटतं, सर. तुमच्या कायद्याला आम्ही म्हणतो की बाबारे, आमच्या अंथरुणातून तुझी सोंड काढून घे. तुझ्या तरतुदी आम्हाला नकोत. आमचं आम्ही बघून घेऊ.

(थोडा वेळ कुणी काही बोलत नाही.)

डॉक्टर : आणि कोर्टकचेऱ्या करायच्या तर तितका वेळही आपल्याकडे नाही.

तनय : डॉक्टर ...

डॉक्टर : तितका वेळ आपल्याकडे नाही.

सावित्रीबाई : हो, ते तुकड्यातुकड्यांनी माझ्या लक्षात यायला लागलं आहे. तन्या स्वत:ला खूप हुशार समजतो. पण मी काही खुळी नाही. त्याच्या पोटात दुखतं, डोळे पिवळे दिसतात हे काही त्याला नीट लपवता येत नाही.

बॅरिस्टर : डॉक्टर, तितका वेळ नाही म्हणजे किती आहे?

डॉक्टर : तसं निश्चित कधीच सांगता येत नाही. पण ही सगळी डीकॉम्पेन्सेटेड सिऱ्होसिसची लक्षणं आहेत. यातून तो कायमचा उठेल अशी शक्यता कमी आहे. दीडदोन वर्षं मिळाली तर मिळाली.

(थोडा वेळ कुणी काही बोलत नाही.)

तनय : आबा, आई, सज्जनहो, सगळे ऐका. मी जसा जगलो तसा जगलो; जे प्यायलो ते प्यायलो. आता जे व्हायचं ते होईल. त्याबद्दल रडत बसूया नको. माझ्याकडे जितका वेळ उरला आहे तो वापरून घेऊया. मी म्हणतो की कायदा आणि त्याची तरतूद दोघेही काशीत जावोत. आम्ही तिघे घरगुती लग्न करू. सरकारदरबारी ते रजिस्टर होणार नाही आणि आम्हाला करायचंही नाही. तुम्ही आशीर्वाद द्या, तेवढं आम्हाला पुष्कळ होईल.

बॅरिस्टर : ठीक आहे.

सावित्रीबाई : मी तयारीला लागते.

मधुरा : (उत्साहात येऊन) I like tradition! मी आणि नंदी शालू नेसणार आहोत. तन्याला आपण झुळझुळीत झब्बा घालूया. सगळं कसं वेदोक्त आणि पारंपारिक करायचं!

सावित्रीबाई : बबडे, शब्द 'पारंपरिक' असा आहे. 'परंपरा' पासून 'पारंपरिक'.

मधुरा : मम्मा, तू म्हणजे अशी पंतोजीण आहेस ना! पण माझी लाडकी मम्मा आहेस. म्हणून आहेस तश्शी चालवून घेते तुला.

सावित्रीबाई : न घेऊन सांगशील कुणाला बबडे?

तनय : मग ठरलं तर! बार उडवूनच टाकू. Let us make an honest woman out of you, Nandini.

नंदिनी : Thank you, dear. But I would rather be doubly honest.

डॉक्टर : बॅरिस्टर, ही तुम्हाला अडचणीत आणणार! A doubly honest woman may prove doubly dangerous in a lawyer's house.

बॅरिस्टर : आता विनोद पुरेत. तयारीला लागूया.

डॉक्टर : पौरोहित्य मी करणार, त्यामुळे माझे विनोद तुम्हाला सहन करावे लागतील.

(लग्नाचा दिवस. मधुरा, नंदिनी आणि सावित्रीबाई शालूत आहेत. तनयने वेलबुट्टी काढलेला झुळझुळीत सदरा आणि धोतर असा वेष केला आहे. बॅरिस्टरांनी सूट घालून मिडल टेंपलचा नेकटाय लावला आहे. रावजीने बंद गळ्याचा कोट घातला आहे तर बसवण्णाने दक्षिणी पद्धतीचा पंचा गुंडाळला आहे. डॉक्टर सोवळ्यात आहेत. रावजी ग्रॅन्डफादर क्लॉकपाशी उभा राहतो. बसवण्णा एक वेताची टोपली घेऊन येतो आणि नंदिनीला दोन पिवळे, तनयला दोन पांढरे आणि मधुराला दोन गुलाबी रंगाचे हार काढून देतो. नाटकातली आठही पात्रं ह्या घटकेला रंगमंचावर आहेत. रावजीने वेळ झाल्याची खूण करताच डॉक्टर आपल्या हातातला इंग्रजी 'वाय' अक्षराच्या आकाराचा अंतरपाट उलगडतात. त्याचे तीन पदर डॉक्टर, रावजी आणि बसवण्णा हातात घेतात, तर तीन कोनांमध्ये तनय, मधुरा आणि नंदिनी उभे राहतात.

स्वस्ति श्री गणनायकम् गजमुखम् मोरेश्वरम् सिद्धिदम्

बल्लाळो मुरुडम् विनायकमहम् चिंतामणिम् थेऊरम्

असा उंच किनरा आवाज लावून रावजी सुरुवात करतो, तसे डॉक्टर, बसवण्णा, बॅरिस्टर आणि सावित्रीबाई त्यात सूर मिसळतात. ह्या नाटकाचा प्रयोग कुणाला करावासा वाटला तर मंगलाष्टकं म्हणण्यात प्रेक्षकांना सहभागी करून घेता येईल.
तदेव लग्नम् सुदिनम् तदेव
ताराबलम् चंद्रबलम् तदेव
विद्याबलम् दैवबलम् तदेव
लक्ष्मीपते तेंऽघ्रियुगम् स्मरामि

हा श्लोक झाल्यानंतर 'शुभमंगल सावधान' होऊन अंतरपाट दूर होतो. तिघांपैकी प्रत्येकजण आपल्या हातातले दोन हार इतरांच्या गळ्यांत घालतो, जेणेकरून तीन वेगवेगळ्या रंगसंगती तयार होतात. तिघेजण उपस्थितांच्या पाया पडून आशीर्वाद घेतात.)

तनय : (किंचित झोकांड्या देत बरळल्यासारख्या सुरात) डॉक्टर, हिला शपथ घ्यायला लावा! (त्याच्या आविर्भावावरून हे थट्टेत चाललं आहे हे स्पष्ट व्हावं.)

नंदिनी : घेईन ना पतिराज! पण मी एकटीच नाही. आपण सगळे घेऊ.

डॉक्टर : सगळ्यांनाच घ्यावी लागणार आहे. असे ओळीने उभे राहा. शपथ देतो तुम्हाला —

(तनय, नंदिनी आणि मधुरा ओळीने उभे राहतात.)

डॉक्टर : धर्मे च, अर्थे च, कामे च —

तनय : नातिचरामि

नंदिनी : नातिचरामि

मधुरा : नातिचरामि

डॉक्टर : धर्मे च, अर्थे च, कामे च ...

तनय आणि नंदिनी : नातिचराव:

नंदिनी आणि मधुरा : नातिचराव:

मधुरा आणि तनय : नातिचराव:

(रावजी एका चांदीच्या प्लॅटरवर दाट किरमिजी रंगाचा फ्रूट-केक घेऊन येतो.)

रावजी : माय हार्टिएस्ट कॉन्ग्रॅच्युलेशन्स ऑन युअर वेडिंग, सर ॲन्ड मॅडम्स! 'मिसेस बीट-ऑन्स बुक ऑफ हाउसहोल्ड मॅनेजमेंट' मध्ये वाचून मी हा फ्रूट-केक तयार केला आहे. इट्स अ व्हेरी कलेक्टिबल बुक. बॅरिस्टरसरांनी चेरिंग क्रॉसला विकत घेतल्याची त्यांच्याच हस्ताक्षरातली नोंद आहे.

(सगळे केक खाऊन पाहतात.)

मधुरा : आहाहा! रावजी, केक काय झकास झाला आहे! पण तुला किती वेळा सांगितलं की 'मिसेस बीट्न' असं म्हणायचं. 'बीट-ऑन' नव्हे. तो काय क्रिकेटमधला फॉलो-ऑन आहे का?

रावजी : येस मिसेस, सॉरी मिसेस. गेल्या पंधरवड्यात त्या कर्वेमॅडम आल्या होत्या तेव्हा मी असंच म्हणालो. पण मी काय बोलतोय ते त्यांना कळलं नाही.

मधुरा : नाही तरी ती कर्वीण जरा मंदबुद्धीच आहे. तिला वाटतं की आपल्या पोराशी सारखं इंग्लिशमधून बोललं तर त्याला जगन्नाथ शंकरशेट मिळेल. इथे आली होती तेव्हा मला म्हणाली की आपण बुद्धिबळं खेळूयात. वजिराच्या बाजूचा किल्लेकोट कसा करतात ते माहित नाही आणि म्हणे मी बुद्धिबळं खेळते!

रावजी : येस, मिसेस.

मधुरा : रावजी, आजचा दिवस म्हणून तुला आगाऊपणा माफ करते आहे.

रावजी : थँक यू, मिसेस! मग मी म्हणेन की केक फार खाऊ नका, नाहीतर जेवायला भूक राहणार नाही. (उरलेला केक घेऊन तडकाफडकी आत जातो. बसवण्णा येतो.)

बसवण्णा : माय कॉन्ग्रॅच्युलेशन्स ऑल्सो ऑन युअर वेडिंग, सर ॲन्ड मॅम्स! बॅरिस्टरसर, पूना मंडई माथाडी कामगार संघात आमचं जमखंडीकडचं दोस्त असतं. त्यांचं निरोप आलं होतं. आज रात्री संघातर्फे ग्रॅँड वेडिंग पार्टी अरेंज केलं आहे. गुलाबजाम आणि बोकड असं डिनर-मेन्यू असतं. मी ऑस्टिन समरसेट स्वच्छ करून पेट्रोल टाकून रोज पेटल्सचं डेकोरेशन करून तयारच ठेवलं आहे.

सावित्रीबाई : अरे मेल्या, मंडई शुक्रवारात आहे. संध्याकाळी तिथे सायकलींची आणि टांग्यांची नुसती भाऊगर्दी असते. एवढी मोठी गाडी कशी नेणार? वाट काढता काढता पुरेवाट होईल!

बसवण्णा : तसं विचार करायचं नसतं, मॅडम. आजूबाजूला सायकल आणि टांगा गर्दी करून असलं म्हणून ऑस्टिन समरसेट सोडून द्यायचं नसतं. आपण आपलं गाडी चालवायचं. गाडीला अकोमडेट कसं करायचं दॅट इज देअर प्रॉब्लेम.

❈ ❈

क्रमशः
अंक तिसरा

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

सर्वप्रथम पहिला अंक वाचून घाईने प्रतिक्रिया दिल्याबद्दल क्षमस्व. या अंकात तुम्ही धमाल केली आहे. पंचेस जोरदार आहेत. काही वर्षांपूर्वी, ' छोट्याशा सुट्टीत' हे नाटक बघितलं होतं. त्याची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0