सिंधू सरस्वती संस्कृती (भाग ६)

सिंधू सरस्वती संस्कृती (भाग ६)

आपण कोण?

सुधीर भिडे

(मागील भाग)

या भागात मानववंशशास्त्रदृष्ट्या आपण तीन प्रश्नांचा विचार करू –

  • सिंधू संस्कृतीचे लोक कोण?
  • आर्य कोण?
  • सध्याचे भारतवासी कोण?
  • जनुकीय पुरावा

पुढे जाण्याआधी मानववंशशास्त्रज्ञ एका नवीन तंत्राचा उपयोग करतात त्याची थोडी माहिती घेऊ. मानवाच्या शरीरातील प्रत्येक पेशीत केंद्र – न्यूक्लियस असते. न्यूक्लियसमध्ये मानवी गुणसूत्रांच्या – क्रोमोसोमच्या २३ जोड्या – गुणसूत्रे असतात. तेविसाव्या जोडीत स्त्रियांत दोन एकसारखे एक्स क्रोमोसोम असतात. पुरूषांना एक एक्स आणि एक वाय असे क्रोमोसोम असतात. शरीरात प्रथिने बनविण्यासाठी या क्रोमोसोमची नक्कल / कॉपी केली जाते. कॉपी करत असताना काही वेळा चूक होऊन ती चूक मग दुसर्‍यांदा कॉपी करताना परत होते. ह्या बदलाला म्युटेशन असे म्हणतात. ह्याशिवाय प्रत्येक पेशीत एक मिटोकोंड्रिया नावाचा भाग असतो हा भाग प्रत्येकाला आपल्या आईकडून मिळतो. मिटोकोंड्रियात पण म्युटेशन होतात.

आता ही जीवशास्त्राची माहिती झाली. याचा मानववंशशास्त्रज्ञांनी कसा वापर केला ते पाहू. ज्या ठिकाणी इतिहासकाळातील मानवाचे अवशेष मिळाले त्या ठिकाणी डीएनएमधील म्युटेशनवरुन काही निष्कर्ष काढता येतात. हे तंत्र गेल्या पंचवीस वर्षांत विकसित झाले आहे. वाय क्रोमोसोममधील बदल व्यक्तीच्या पित्याकडून आलेली माहिती देतात आणि मिटोकोंड्रियामधील बदल व्यक्तीच्या आईकडून आलेली (आई, आजी, पणजी या प्रकारे) माहिती देतात.

शास्त्रज्ञांनी आता हजारो वर्षापूर्वी पुरलेल्या व्यक्तींचे जे अवशेष मिळाले त्याचे डी एन ए पाहण्याचे तंत्र विकसित केले आहे. जर हजारो वर्षापूर्वी मृत झालेल्या व्यक्तीचा डी एन ए सध्याच्या कोणत्या व्यक्तीसमूहाशी जुळत असेल तर असे म्हणता येईल की या हजारो वर्षांपूर्वीच्या व्यक्तीचा त्या आजच्या लोकसमूहाशी संबंध आहे.

असे ध्यानात आले आहे की मिटोकोंड्रियामधील बदल काही ठरावीक कालखंडाने स्थिर होतात. यावरून एका लोकसमूहात हे बदल किती शतकांच्या अंतराने झाले आहेत याचाही अंदाज बांधता येतो.

हे तंत्रज्ञान केवळ माणसांसाठीच नाही तर प्राण्यांसाठीही वापरले जाते. समजा तुम्ही एक सयामी मांजर विकत घेतले. ते मांजराचे पिल्लू किती प्रमाणात खरे सयामी जातीचे आहे ते आपण त्या मांजराच्या डीएनए चाचणीवरून माहीत करू शकतो.

सिंधू संस्कृतीचे लोक कोण?

सिंधू सरस्वती संस्कृती उत्कर्षाला नेणारे लोक आपल्या निरनिराळ्या पूर्वजांपैकी एक. सध्याचा भारतीय समाज हा निरनिराळ्या लोकांच्या मिश्रणातून बनला आहे. यात गैर असे काहीच नाही. जगातील सर्वच देशांतून असे मिश्रण दिसून येते. त्याविषयी आपण शेवटी माहिती घेऊ.
पन्नास हजार वर्षे ते दहा हजार वर्षे पूर्व ह्या काळाला अश्मयुग असे म्हणतात. या काळात दगडाची आयुधे बनविण्यात आली. महाराष्ट्रात अशा स्टोन एज वस्त्यांचे पुष्कळ पुरावे मिळाले आहेत. याचा अर्थ आफ्रिकेतून आलेले लोक या चाळीस हजार वर्षांत भारतभर पसरले.
प्रश्न हा निर्माण होतो की सिंधू सरस्वती संस्कृती उत्कर्षाला नेणार्‍या लोकांचे पूर्वज कोण. DNA आणि मानववंशशास्त्राचा पुरावा असे दर्शवितो की हे लोक भारतात ५०,००० वर्षांपूर्वी आफ्रिकेतून आलेले लोक आणि त्यानंतर इराण मधून १०,००० वर्षांपूर्वी आलेले लोक यांचे मिश्रण आहे. साधारणपणे ४०% पहिले भारतीय आणि ६०% इराणमधील लोक यांचे हे मिश्रण. (Nature India 4/9/19/ Biblab Das)

ढवळीकर त्यांच्या पुस्तकात या विषयावर केवळ अवषेशातील सांगाड्यावरून जे समजते त्याविषयी लिहितात. सांगाड्यांच्या अभ्यासावरून या संस्कृतीचे लोक निरनिराळ्या वंशाचे मिश्रण होते एवढे समजते. साधारण चार हजार वर्षापूर्वी इराणमधून येथे मोठ्या प्रमाणावर लोक आले आणि या संस्कृतीत मिसळले. DNAवरून जे निष्कर्ष निघाले तेही असेच आहेत. आता यांनाच आर्य समजायचे का?

आर्य कोण?

आर्य कोण या प्रश्नावर भारतात गरमागरम चर्चा होते. भारतीय संस्कृती म्हणजे वैदिक आर्यांची संस्कृती असे समीकरण मांडण्याचा प्रयत्न होतो. या मताला तामिळनाडूमध्ये अजिबात सपोर्ट मिळत नाही. ते साहजिकच आहे कारण तीन हजार वर्षांपूर्वीच्या स्वतंत्र द्रविड संस्कृतीचे पुरावे मिळतात. तसे पाहिले तर आजच्या हिंदू धर्माच्या आचरणाचा आर्यांच्या धर्माशी काहीही संबंध नाही.

विसाव्या शतकात वंश (race) आणि राष्ट्र या संकल्पना एक समजण्याच्या विचार जर्मनीमध्ये पुढे आला. ही कल्पना हिटलरने पुढे आणली आणि भारतात उजव्या विचारसरणीच्या राजकारण्यांनी ती उचलून धरली. एकदा का भारतीय संस्कृती म्हणजे वैदिक आर्यांची संस्कृती हे गृहीत धरले की मग पुरावे दुर्लक्षित करून निरनिराळे सिद्धांत मांडणे आले. यापैकी एक सिद्धांत म्हणजे आर्य मूळचे भारतातीलच. येथूनच ते बाहेर गेले. वैदिक लोक आणि सिंधू सरस्वतीचे लोक हे एकच. ऋग्वेदात कोणत्याही प्रकारच्या स्थलांतराचे उल्लेख नाही. (कसा असेल? कारण ऋग्वेद आर्य भारतात स्थायिक झाल्यावर रचला गेला) आपण आपल्या समाजाचा आर्य centric विचार कमी केला तर बरेच प्रश्न सोपे होतील.

आपण हे पाहिले की सिंधू सरस्वती संस्कृतीचे अवशेष आज सापडतात. त्यावरून त्या संस्कृतीविषयी माहिती मिळते. जगातील दुसरी प्राचीन संस्कृती म्हणजे इजिप्तमधील संस्कृती. या संस्कृतीचेही अवशेष आहेत. त्या काळातील लिपीचेही ज्ञान झाले आहे. परंतु आर्यांचे असे नाही. आर्य संस्कृतीचे काहीही अवशेष शिल्लक नाहीत. आर्यांच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणजे वेद. वेदांचा काल ४००० वर्षांपूर्वीचा धरला तर त्या काळातील काहीही लिखाण उपलब्ध नाही. यामुळे आपल्याला जनुकीय पुराव्याकडे जावे लागते.

डीएनएचा अभ्यास काय दाखवतो?

प्रत्येक पुरुषाच्या सेलमधील वाय क्रोमोसोममधील म्युटेशन्स त्याच्या वडिलांच्या बाजूच्या पूर्वजांची माहिती देतात आणि मिटोकोंद्रियामधील म्युटेशन्स त्याच्या आईच्या बाजूच्या पूर्वजांची माहिती देतात. आता समजा की भारतातील त्या काळातील पुरुषांत जी म्युटेशन्स दिसतात ती कझाकस्तानमधील लोकांत आढळून आली तर अर्थ असा होतो की भारतातून कझाकस्ताकडे लोक गेले किंवा कझाकस्तानमधून भारताकडे लोक आले.

आता या माहितीच्या आधारे आर्यांविषयी काही सांगता येते का ते पाहू.

उत्तर युरोपपासून भारतापर्यंत ज्या भाषा बोलल्या जातात त्यांना इंडो-युरोपियन भाषा म्हटले जाते. जर भारतातून संस्कृतजन्य भाषा बोलणारे लोक युरोपकडे गेले असतील तर भारतातील लोकांत असलेली म्युटेशन्स यूरोपियन लोकांत दिसली पाहिजेत. जर आर्य बाहेरून आले नाहीत तर ते एतद्देशीय होते. याचा अर्थ भारतातील मूळचे लोक, ज्यांना आपण आदिवासी म्हणतो त्या समुदायाचे डीएनए म्युटेशन्स युरोपमध्ये मिळायला पाहिजेत. पण असे आढळत नाही. भारतात जी म्युटेशन्स आढळतात ती युरोपमध्ये दिसत नाहीत.

भारतात आणि युरोपमध्ये जो समान म्युटेशन ग्रुप दिसतो तो सर्वात जुना कझाकस्तान आणि युक्रेनमध्ये ७००० वर्षापूर्वी आढळतो. या म्युटेशनचे पुढे दोन भाग झालेले दिसतात.

आता हे जे ४००० वर्षांपूर्वी भारतात आणि युरोपमध्ये गेले ते कोण लोक?

हे लोक त्या वेळच्या यमना भागातून युरोप आणि भारतात आले. सहा हजार वर्षांपूर्वी कोकेशसच्या उत्तरेस गवताळ प्रदेशात हे लोक रहात. त्यांची मुख्य खूण म्हणजे घोडा आणि रथ.


Indus Valley Civilization

वर पाहिल्याप्रमाणे सिंधू सरस्वती संस्कृतीत राहणारे लोक १०००० वर्षांपूर्वी इराणमधून त्या भागात आले. त्या लोकांनी आपल्याबरोबर घोडा हा प्राणी आणला नाही.

तीन हजार वर्षांपूर्वीचे इराणमधील दगडावर कोरलेले हे रथाचे चित्र पाहा. तीन हजार वर्षांपूर्वी इराणमध्ये घोडा होता. यावरून हाच निष्कर्ष काढावा लागतो की साधारण चार हजार वर्षांपूर्वी काही लोकांचा समुदाय इराणमध्ये आला आणि घोडा हा प्राणी त्यांनी इराण आणि भारतात आणला.


Indus Valley Civilization

हे लोक यमना भागातून का निघाले हे सांगणे कठीण आहे. वातावरणातील काही बदलामुळे त्यांना आपली जागा सोडणे भाग पडले असे असू शकते.


Indus Valley Civilization

५००० वर्षांपूर्वी हे लोक युरोपमध्ये घुसले. युरोपच्या लोकांत या लोकांचा वाय क्रोमोसोम म्युटेशन प्रामुख्याने दिसते. याचा अर्थ असा की युरोपमधील त्या वेळच्या स्त्रियांना यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या बायका बनविल्या. युरोपमधील त्या वेळच्या पुष्कळ पुरुषांना बायकांशिवायच राहावे लागले असावे.

एक हजार वर्षानंतर म्हणजे चार हजार वर्षापूर्वी या लोकांची दुसरी शाखा अफगाणिस्तानद्वारे भारतात पोचली. कॉम्प्युटर मॉडेलिंगने हे लोक कसे दिसत असावेत याचे चित्र आपण पाहू –


Indus Valley Civilization

सिंधू सरस्वती संस्कृती आणि आर्य

यमनामधील कोकेशसच्या उत्तरेकडील लोक – ज्यांना आपण आता आर्य म्हणू – जेव्हा भारतात पोचले तेव्हा सिंधू सरस्वती संस्कृतीच्या पतनास सुरुवात झाली होती. या पतनाची कारणे भौगोलिक आणि वातावरणातील बदलांशी संबंधित होती. या दोन लोकांमध्ये पुष्कळच फरक होता. सिंधू सरस्वती संस्कृतीचे लोक शेती करत असत. त्यांची मोठमोठाली शहरे होती. ते लोक जगात व्यापार करीत असत. त्यांची लिपी होती. स्वतःचा धर्म होता. हे लोक लिंगपूजा करीत. हे लोक शांतिप्रिय होते. शस्त्रे आणि लढाया यांच्याशी त्यांचा संबंध नव्हता. घोडा हा प्राणी त्यांना माहीत नव्हता. या संस्कृतीचे लोक मृतांना पुरत असत.

सिंधू सरस्वती संस्कृती आर्य
शेती आहे शेती नाही
घोडा नाही? घोडा प्रमुख प्राणी
शस्त्रे नाहीत घोडा आणि रथाचा वापर करून युद्धं
शहरे भटकी जमात
व्यापार आहे व्यापार नाही
पशुपति, मातृदेवता आणि लिंगपूजा इंद्र, वरुण हे देव. अग्निपूजा, रुद्र या देवांचा संदर्भ
बहुतकरून मृताचे दफन मृताचे दहन

बाहेरून आलेले आर्य सिंधू सरस्वती संस्कृतीच्या दृष्टीने मागासलेले होते. या आर्यांनी भारतात घोडे आणि रथ आणले. आर्य कोकेशसमधून निघाले आणि लढाया करीत भारतात पोचले. आर्यांचे देव निराळे होते – सविता, अग्नि, वरुण, इंद्र हे त्यांचे देव. त्यांची जीवनशैली भटकी होती. साहजिकच आर्य मृतांना जाळत असत. ज्या अर्थी ऋग्वेदात सरस्वतीचा उल्लेख येतो त्यावरून सिंधू सरस्वती संस्कृती आणि सरस्वती नदी पूर्ण नष्ट होण्याआधी आर्य भारतात पोचले. ऋग्वेदातील ऋचांवरून असे म्हणावे लागते की आर्यांनी येथील लोकांशी हिंसक व्यवहार केला.
चार हजार वर्षांपूर्वीपासून पुढची हजार वर्षे या दोन संस्कृतींचा मिलाप होण्यात गेली. सिंधू सरस्वती संस्कृती जरी जास्त प्रगत होती तरी आर्य जास्त आक्रमक असावेत. आर्यांनी सिंधू सरस्वती संस्कृतीची काही मूल्ये स्वीकारली जसे की लिंगपूजा – त्या देवाला आर्यांनी शंकर म्हणून आत्मसात केले. संशोधक ढवळीकर यांच्या मते याच काळात – चार हजार वर्षापूर्वी ऋग्वेदाची रचना झाली.

काही प्रश्न

एक असा प्रश्न पडतो की जर सिंधू सरस्वती संस्कृती आणि आर्य यांच्यात देवाणघेवाण एक हजार वर्षांपर्यंत होत राहिली आणि सिंधू सरस्वती संस्कृतीची स्वतःची लिपी होती तर आर्यांनी लिहिण्याची कला का अंगीभूत केली नाही? अशोकाच्या कालाआधी लिहिलेले काही पुरावे मिळत नाहीत. दक्षिणेत तसे पुरावे मिळाले आहेत.

दुसरा प्रश्न मध्यप्रदेशातील भीमबेटका येथील गुहांमधून असलेल्या पेंटिंग्सवरून (भित्तीचित्रे) निर्माण होतो. भीमबेटका येथील चित्रे १०००० किंवा त्याहून जास्त वर्षापूर्वीची आहेत असे सांगितले जाते. एका चित्रात आपण घोड्यावर बसून शिकार करण्याचे दृश्य पाहू शकतो. यामुळे नवीन प्रश्न निर्माण होतात. या चित्राचे कार्बन डेटिंग होण्याची गरज आहे.


Indus Valley Civilization

आपण पाहिले की सिंधू सरस्वतीच्या संस्कृतीत घोडा हा प्राणी आढळत नाही. शिवाय त्या उत्खननात शस्त्रे मिळालेली नाहीत. असे म्हटले जाते की आर्यांनी घोडा आणि शस्त्रे भारतात आणले.

हे जर खरे असेल तर मग भीमबेटकात चित्रे काढणारे हे लोक कोण? भीमबेटका येथील गुहेत चित्रे ५००० वर्षेपर्यंत काढली गेली. असे म्हणायचे का की ज्यांना आपण आर्य म्हणतो ते लोक या गुहांत आले होते आणि त्यांनी ही चित्रे काढली? या चित्रांचे डेटिंग झाले तरच काही निष्कर्ष काढता येतील.

आपण कोण –

आपण कोण या प्रश्नाचा विचार करण्यापूर्वी आपण इंग्रज कोण हा विचार करू.

रोमन लोक इंग्लंडमध्ये येण्याआधी तिथे उत्तरेला पिक्ट्स या जमातीचे आणि दक्षिणेला सेल्ट्स या जमातीचे लोक रहात. रोमन लोक दक्षिणेला राहिल्यानंतर तिथे सेल्ट्स आणि रोमन लोकांच्या संकरातून बनलेले असे दोन प्रकारचे लोक राहू लागले. ४०० साली रोमन लोक इंग्लंड सोडून गेले. या नंतर जर्मनीमधून angels आणि saxons अश्या दोन जमातीचे लोक इंग्लंडमध्ये घुसले. त्यांचा स्थानीय लोकांबरोबर संकर होत राहिला. यानंतर ८०० साली व्हाईकिंग लोकांचे आक्रमण चालू झाले. त्यांचाही संकर होत राहिला. अशा प्रकारे इंग्लंडचे लोक सेल्ट्स, पिक्ट्स, रोमन्स, एंजल्स, सॅक्सन्स, व्हाईकिंग्स अशा सर्व लोकांच्या मिश्रणामधून बनले आहेत.

आपण पाहिल्याप्रमाणे भारतात आदिमानव पाषाणयुगापासून रहात होता. साधारण ६०००० वर्षांपूर्वी आफ्रिकेतील प्रगत मानव भारतात आला. त्यानंतर सुमारे ५००० वर्षापूर्वी सिंधू सरस्वती संस्कृतीचे लोक भारतात पसरले. त्यानंतर पुढील २००० वर्षे आर्यांचे भारतात आगमन झाले. त्यानंतर २००० वर्षांपूर्वी शक आणि कुशाण लोक आले. ते येथील समाजात मिसळून गेले.

गेल्या २००० वर्षांत मोठ्या प्रमाणावर कोणी लोक भारतात आले नाहीत. मुघल, पर्शियन आणि अफगाण लोक आले पण ते संख्येने अगदीच कमी होते आणि येथील समाजात मिसळले नाहीत आपला (इस्लाम) धर्म सांभाळत ते निराळे राहिले. आजही मुस्लीम समाजात हे उच्च कुळीचे निराळे लोक आहेत.

अशा प्रकारे भारताची लोकवस्ती ६०००० वर्षांपासून आलेल्या निरनिराळ्या जमातींच्या मिश्रणाने बनली आहे. हे काही विशेष नाही. जगात सर्वच देशात अशी स्थिती आहे.

आता आपण दक्षिण आणि उत्तर हिंदुस्थानातील मानववंशाचा अंदाज बांधू शकतो. असे मानले जाते की सिंधू सरस्वती संस्कृतीचे पतन सुरू झाल्यावर हे लोक भारतभर पसरले आणि पुढच्या हजार वर्षांत येथील लोकात मिसळून गेले. त्यांच्या मागून आर्य, शक, हूण भारतात आले पण दक्षिणेकडे मोठ्या प्रमाणावर पसरले नाहीत रामायणाची कथा म्हणजे आर्यांचा दक्षिणेकडे पसरण्याचा प्रयत्न!

अर्थातच हा दक्षिण आणि उत्तरेमधील फरक याची काही शार्प बाउंडरी नाही. हा बदल हळू हळू होत जातो.

दक्षिण हिंदुस्तान उत्तर हिंदुस्तान
आदिमानव १००००० वर्षांपासून आदिमानव १००००० वर्षांपासून
आफ्रिकेतून आधुनिक मानवाचे आगमन ५०,००० वर्षांपूर्वी आफ्रिकेतून आधुनिक मानवाचे आगमन ५०,००० वर्षांपूर्वी
सिंधु सरस्वती संस्कृतीचा मानव सर्वत्र पसरला ४००० वर्षांपूर्वी सिंधु सरस्वती संस्कृतीचा मानव सर्वत्र पसरला ४००० वर्षांपूर्वी
आर्यांचे आगमन ४००० वर्षांपूर्वी
शक, कुशाण, हूण

(समाप्त)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet