सिंधू सरस्वती संस्कृती (भाग ४)
सिंधू सरस्वती संस्कृती (भाग ४)
सिंधू सरस्वती संस्कृतीचा धर्म
सुधीर भिडे
सिंधू सरस्वती संस्कृतीच्या रहिवाश्यांच्या धर्माचा विचार करताना एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की एक सर्वत्र पाळला जाणारा धर्म असावा असे वाटत नाही. चार हजार वर्षांच्या कालखंडात आणि इतक्या मोठ्या प्रदेशावर एकच धार्मिक समजुती होत्या असे शक्यही नाही. मिळालेल्या पुराव्यानुसार काही निष्कर्ष निघू शकतात.
अग्नीपूजा
काही दशकांपूर्वी असे मानले जायचे की अग्नीपूजा ही आर्यांची विशेषता होती आणि सिंधू सरस्वती संस्कृतीतील रहिवाश्यांच्या धर्मात अग्नीपूजेचा भाग नव्हता. परंतु गेल्या काही दशकांत झालेल्या उत्खननात सिंधू सरस्वती संस्कृतीमध्ये अग्निपूजेचे अवशेष मिळाले आहेत. त्यामुळे आर्य – दस्यू / दास / अनार्य हा भेद क्लिष्ट झाला आहे. पुढच्या भागात आपण हे पाहू की ऋग्वेदात अशी वचने आहेत जी यज्ञ न करणाऱ्या दस्यूंना कनिष्ठ समजतात. आता अग्नीपूजेचे पुरावे सिंधू सरस्वती संस्कृतीत मिळाल्यावर या वचनांचा अर्थ कसा लावायचा?
आर्य आणि यज्ञ या समीकरणाची सुरुवात पाश्चिमात्य संशोधकांपासून होते. या विचारसरणीत हे गृहीतक धरले जाते की आर्य कोकेशस पर्वताच्या भागातून निघून युरोपात आणि इराणमधून भारतात पोचले. असे समजले जाते की हे स्थलांतर ३७०० तो ४००० वर्षांपूर्वी झाले आणि त्याच काळात ऋग्वेदाची रचना झाली. हे जे लोक ३७०० वर्षापूर्वी भारतात आले ते आपले रीतीरिवाज घेऊन आले.
कोकेशस पर्वताच्या दक्षिणेला काही ठिकाणी घोड्यांना पुरले असण्याचे पुरावे मिळाले. ही सर्व दफने ४००० वर्षांपूर्वीची होती. ऋग्वेदात वर्णन केल्याप्रमाणे घोड्यांचे पाय कापले होते. अश्वमेध यज्ञात घोडा पुरला जात नसून घोडा अग्नीला अन्न म्हणून देण्यात येतो. त्यानंतर घोड्याचे मास प्रसाद म्हणून भक्षण केले जाई. याशिवाय कोकेशस पर्वताच्या भागात ज्या घोडे पुरल्याच्या जागा मिळाल्या त्या ठिकाणी बऱ्याच घोड्यांचे सांगाडे मिळाले. अश्वमेध यज्ञात एकच घोडा बळी दिला जातो.
या भागात वैदिक संस्कृतीचा अजून एक पुरावा मिळाला आहे. कोकेशसपासून इराणपर्यंत झालेल्या उत्खननात घरात गोल आणि चौरस कुंडे मिळाली आहेत. अशी घरातील कुंडे वैदिक प्रथा अग्निहोत्र यात असतात.
तिसरा पुरावा मृत्यूनंतर प्रेतांच्या दहनाचा होता. कोकेशस ते इराण भागात त्या काळात मृत शरीरे जाळण्याची प्रथा दिसते.
संदर्भ दिलेल्या लेखाचा (Roots Of Vedic Rituals: On Harappan Fire Worship And Its Vedic Parallels, Indica today, Akshay Shankar, 16/9/20) निष्कर्ष हा होता की आर्यांच्या अग्नीपूजेच्या कर्मकांडांचा कोकेशस ते इराण या भागात मिळालेल्या माहितीशी काही संबंध नाही. असा निष्कर्ष का काढावा हे समजत नाही. वैदिक कर्मकांडांशी याचा सारखेपणा दिसतो. आर्यांच्या स्थलांतर सिद्धांताला पाठिंबा मिळतो.
सिंधू सरस्वती संस्कृतीत आता अग्नीपूजेचे पुरावे मिळाले आहेत. सर्वात महत्त्वाचे उत्खनन कालीबंगण येथील आहे. या स्थळी एके ठिकाणी एका ओळीत सात अग्नीकुंडे मिळाली. सात या आकड्यास काही महत्त्व असावे . सप्तमातृका असा उल्लेख वेगळ्या संदर्भात येतो. मोहेंजोदारो येथे एक शिक्का मिळाला आहे ज्यावर सात व्यक्ती पिंपळाच्या झाडाखाली चालताना दिसतात.
या सात कुंडांच्या बाजूला एक खड्डा आहे ज्यात राख आणि कोळसे मिळाले. असे दिसते की या कुंडात अग्नी अखंड राखला जाई आणि जरूर तेव्हा या सात कुंडात अग्नी प्रज्वलित करण्यासाठी हा बाहेरचा अग्नी वापरला जाई. अग्निहोत्र परंपरेत अग्नी कायम राखला जातो. त्या काळात अग्नी कायम ठेवणे महत्त्वाचे होते. कारण अग्नी उत्पन्न करणे सोपे नव्हते.
या सात कुंडांच्या बाजूला उत्तर-दक्षिण दिशेत एक भिंत आहे. जेव्हा या कुंडात व्यक्ती कर्मकांड करीत असेल त्यावेळी तिचे तोंड पूर्वेकडे असेल. ऋग्वेदातील ३.१.२ , ५.२८.१. अशा ऋचातून हेच लिहिलेले आहे. वेदातील सोमयज्ञात अशा तह्रेची कुंडे सांगितली आहेत.
दुसऱ्या एका कुंडात घोडे आणि इतर प्राण्यांचे अवशेष मिळाले. खाली पहा. यज्ञात दिलेल्या बळींचे हे अवशेष होते.
या यज्ञकुंडांच्या बाजूला अंघोळीची जागा आहे. अशा जागेची व्यवस्था शतपथ ब्राम्हणात सांगितली आहे.
पशूला मारण्याची पद्धत
कालीबंगणमध्ये एक मातीचा साचा मिळाला आहे. त्यावर एक माणूस पशूचे तोंड दाबून पशूला गुदमरून मारत आहे असे चित्र आहे. या व्यक्तीने शिंगे असलेले शिरस्राण घातले आहे. शतपथ ब्राम्हणात पशूला असेच मारण्यास सांगितले आहे.
बनवली येथे गजपृष्ठाकृती (आयताची एक बाजू गोलाकार) कुंडे मिळाली आहेत. अग्निहोत्रात दक्षिणाग्नीचा असा आकार असतो.
अशा प्रकारची यज्ञ कुंडे मथुरेत मिळाली आहेत
मातृदेवता
डोक्याच्या दोन बाजूला दिवे असलेल्या स्त्रियांच्या पुष्कळ मूर्ती मिळाल्या आहेत. असे वाटते की मातृदेवता मोठ्या प्रमाणावर पुजली जात असे.
पुरुष लिंग प्रतिमेची पूजा ही पण सर्वत्र होती. एकंदर प्रजनन हे महत्त्वाचे होते.
सप्तमातृका
खालील प्रतिमेत डावीकडे वर एका झाडात एक पुरुष उभा आहे. त्याच्या पायाशी एक पुरुष वाकून बसलेला आहे. खालच्या बाजूला सात स्त्रिया उभ्या दिसतात. ऋग्वेदात सोम तयार करण्याच्या प्रसंगाचे वर्णन आहे. या कार्यक्रमावर सप्तमातृका देखरेख करत असे वर्णन आहे. वाकलेला पुरुष अग्निदेव असावा. हे पाहण्यासारखे आहे की सर्व व्यक्तींना शिंगे दाखविली आहेत.
एकशिंग्या
जवळजवळ एक हजार शिक्के सापडले आहेत की ज्यावर एकशिंग्याचे चित्र आहे. असा कोणताही प्राणी त्या काळी अस्तित्वात नव्हता. याचा संबंध मातृदेवता आणि प्रजननाशी असावा.
पशुपतीसारख्या देवाचे चित्रण अनेक ठिकाणी आढळते. या चित्रात हत्ती, गेंडा, म्हैस आणि डुक्कर हे प्राणी दिसतात पण घोडा दिसत नाही. या संस्कृतीतील सर्व देव शिंगे धारण केलेले दिसतात.
एक मूर्ती सापडली ती धर्मगुरूची असावी असे वाटते, या व्यक्तीच्या अंगावर एक वस्त्र आहे. या व्यक्तीला दाढी आहे पण मिशा नाहीत. मिशा कशा साफ केल्या असतील? या व्यक्तीच्या दंडावर आणि कपाळावर एक दागिना आहे.
लिंगपूजा
कालीबांगन येथे शिवलिंग सापडले आहे. ऋग्वेदात अनार्यांच्या शिश्न देवाचा उल्लेख येतो
स्तंभपूजा
ढोलावीरा येथे बालेकिल्ल्यात दीड मीटर उंचीचे स्तंभ मिळाले आहेत. अशा प्रकारचे स्तंभ आजही कित्येक मंदिरात दिसतात.
देऊळ कल्पना
सिंधू सरस्वती संस्कृतीत मूर्तीपूजा असली तरी देऊळ ही कल्पना विकसित झाली नव्हती असे दिसते. सापडलेल्या मूर्ती छोट्या आकाराच्या आहेत आणि त्यांची पूजा घरात होत असावी असे दिसते.
मृतांचे दफन / दहन
सिंधू सरस्वती संस्कृतीचे लोक मृतांचे दफन करीत. मृताबरोबर दफन करताना त्याच्या पुढच्या प्रवासासाठी धान्य मातीच्या भांड्यात ठेवले जाई. अशीच कल्पना इजिप्तमध्ये पण दिसते. दोन संस्कृती ज्यांच्यात काहीही संबंध नव्हता, त्यांचा मृताबद्दल एक विचार असावा हे विशेष नाही का? या लोकांनी मृतांचे दफन केल्यामुळे एक फायदा असा की अवशेषांचा डीएनए तपासून ह्या लोकांचे मूळ शोधता आले. दफन करताना मृताचे डोके उत्तरेकडे आणि पाय दक्षिणेकडे करून ठेवत.
परंतु दहन केल्याचे प्रमाण पण मिळाले आहे. अस्थीकुंभात ठेवलेल्या अस्थीही मिळाल्या. आर्य मृतांचे दहन करीत. ईशावास्योपनिषद, जे ऋग्वेदानंतर बनले त्यात एक मंत्र असा आहे – वायु: अनिलं अमृतम, अथ ईदम भस्मातम शरीरम – माझे प्राण पंचतत्वात विलीन होवोत. माझ्या शरीराचे भस्म होवो.
समालोचन
मिळालेल्या माहितीवरून असे म्हणता येईल की सिंधू सरस्वती संस्कृतीमधील रहिवाश्यांचा धर्म आर्यांच्या धर्मापेक्षा निराळा होता. जोपर्यंत अग्नीपूजेचे पुरावे या संस्कृतीत मिळाले नव्हते तो पर्यंत कथा सरळ होती – आर्यांनी ही संस्कृती नष्ट केली. सिंधू सरस्वती संस्कृतीत अग्नीपूजेचे पुरावे मिळाल्यावर कथा अवघड झाली आहे. पुढच्या प्रकरणात आपण ऋग्वेदातील संदर्भ घेऊन अधिक माहिती घेऊ.
संदर्भ
Roots Of Vedic Rituals: On Harappan Fire Worship And Its Vedic Parallels, Indica today, Akshay Shankar, 16/9/20
कोणे एके काळी, सिंधू संस्कृती, म के ढवळीकर , राजहंस प्रकाशन , २००६
प्रतिक्रिया
ढवळीकर
मधुकर ढवळीकर यांची दोन पुस्तकं आज ऑर्डर केली आहेत. राजहंस प्रकाशनची आहेत. "कोणे एके काळी सिंधु संस्कृती" आणि "आर्यांच्या शोधात".
या विषयावर विद्वानांमध्येच इतके मतभेद आहेत की, नेमके सत्य काय असावे यावर संभ्रम होणे सहाजिक आहे. आधुनिक संशोधन, विद्वानांचे बहुमत, ढवळीकरांचे स्वतःचे मत यासाठी ही दोन पुस्तके घेतली.
आर्यांच्या शोधात
मागच्या आठवड्यात ढवळीकरांचे "आर्यांच्या शोधात" संपवले. थोडक्यात ढवळीकरांचे मत असे आहे की, आर्य भारतात इ. पू. ५००० वर्षापूर्वीच आले. त्यामूळे आर्य हेच सिंधू-सरस्वती संस्कृतीचे लोक आहेत. त्यांची भाषा कदाचित संस्कृतच असावी. पर्यावरणातल्या बदलामूळे उत्तर सिंधू-सरस्वती काळात हेच आर्य इतरत्र विस्थापित झाले. खास करून मध्य भारतात, इराणमध्ये व इतरत्रही. नंतर कधीतरी त्यांच्याकडे घोडा आला असावा. आणि वैदिक संस्कृती उदयास आली असावी. जे सिंधू-सरस्वती संस्कृतीचे लोक इराणमध्ये गेले ते पण आर्यच पण "वैदिक आर्यंचे" शत्रू होते (आणि तेच दस्यू असावेत). आणि त्यांनी पारशी धर्म आणि अवेस्था जन्माला घातले.
ह्या मताचे फार थोडे तज्ञ आहेत. कारण एकतर यात विसंगती आहेत आणि लिंकाही जुळत नाहीत त्यामूळे एकसंघपणाचा अभाव वाटतो. पुस्तकातही काही ठिकाणी विसंगती आढळली. उदा. काही गोष्टींच्या समर्थनार्थ ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळाचा, पुराणकथांचा आधार घेतला आहे जे खूप नंतरच्या काळात निर्माण झाले आहे. ढवळीकर जर हयात असते तर त्यांच्याकडून अधिक खुलासा घेता आला असता.
याउलट इतर बहुसंख्य तज्ञांचे मत आर्य भारतात इ.पू. १५००-२००० च्या आसपास टोळ्या टोळ्याने आले सिंधू संस्कृतीच्या र्हासानंतर. त्यांच्याकडे घोडा होता. (भारतात रानटी गाढवं होती पण माणसाळवलेला घोडा नव्हता. आणि घोड्यापेक्षा बैल हा जंबोद्विप मध्ये मूख्य प्राणी होता.) इंडो-आर्यना भाषासमूहाचे शब्द पकडून या गोटातल्या तज्ञांचे मत असे आहे की आर्यांचे स्थलांतर मध्य आशिया ते सिंधू खोरे असे झाले आहे. पण हाच पुरावा घेऊन हे स्थलांतर सिंधू खोर्यातून इतरत्र झाले आहे असे ढवळीकरांसारख्या तज्ञांचे मत आहे हे विशेष. आर्य गोरे नव्हते (कॉकेशिअन तर नव्हेच, पण ब्रुनेटही नव्हते, किंबहूना सावळेच होते) असे मत ढवळीकरांनी एके ठिकाणी मांडलेले आहे (दस्यू कुणी स्थानिक नव्हेत तर आर्यच पण इतर गटातले. ह्या मुद्द्याच्या समर्थनार्थ). असे असेल तर मग वर्णाचा प्रश्न, खासकरून उलट स्थलांतराच्या केसमध्ये तर निर्माण होतोच.
आर्यांच्या शोधात
हाता सरशी
"Early Indians
The Story of Our Ancestors and Where We Came From"
Tony Joseph
हेही पुस्तक मिळवून वाचा.
आणि https://www.indica.today/reviews/book-review-genetics-and-the-aryan-deba...
ह्या लेखात त्याचा केलेला प्रतिवाद ही वाचा.
Very Interesting reading;
श्री सुधीर भिडे ह्यांची मते ऐकायला आवडतील.
ह्या लेखमालिकेच्या सहाव्या
ह्या लेखमालिकेच्या सहाव्या भागात हा विषय हाताळलेला आहे.
आता वाचतोय.
हे पुस्तक वाचा भिडे गुरुजी.
हे पुस्तक वाचा भिडे गुरुजी. आणि बघा काय उपयोग होतोय का.
बरेच लोक याला अनुल्लेखाने मारत आहेत.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
एक् कथा अशीच वाचली.गौतम बुद्ध
एक् कथा अशीच वाचली.गौतम बुद्ध न ची कथा म्हणून कोठे तरी वाचली.
एक व्यक्ती बुद्ध न विचारतो देव खरेच आहे का?
तेव्हा गौतम बुद्ध त्याला सांगतात मी तुझ्या प्रश्नांचे उत्तर देतो पण त्या आधी तू माझ्या काही प्रश्नांचे उत्तर दे.
तुला बाण लागला आणि तू जखमी झालास तर तू काय करशील.
तेव्हा तो व्यक्ती उत्तर देतो बाण पहिला शरीरातून काढेन आणि प्रथम उपचार करीन.
तेव्हा बुद्ध त्याला सांगतात बाणा कोणी बनवला हा प्रश्न इथे तुला पडणार नाही कारण तो प्रश्न च निरर्थक आहे .ते शोधणे शहान पणाच नाही तसेच देव शोधणे पण निरर्थक आहे.
त्याच प्रकारच्या ह्या कथा आहेत आर्य कोण ते कोठून आले? ते मूळ भारतीय होते का?
ह्या अशा प्रश्नांना आता काही किंमत नाही ..निरर्थक प्रश्न आहेत हे .
ह्या विषयावर जे लेखन करतात ते फक्त पॉलिटिकल अजेंडा साठी च अशा विषयावर लिहीत असतात त्या माहितीचा आता काडी च पण उपयोग नाहि.
कोणाला तरी कमी समजणे किंवा कोणाला तरी ग्रेट समजणे इतकाच हेतू ह्या मधून साध्य होतो बाकी काही फायदा नाही
आणि लेखन करणारे कोणी कार्बन dating वरून वय ठरवणाऱ्या विषयात तज्ञ नसतात त्या मधील काहीच टेक्निकल बारकावे ह्यांना माहीत नसतात.
भित्ती चित्र,प्राचीन लिपी मधील लेख ह्या विषयातील पण चे है लेखक तज्ञ नसतात.
त्या लोकांस त्या मधील सखोल ज्ञान असेल असे वाटत नाही.
त्या मुळे असे लेखन जास्त गंभीर पणे घेण्याची गरज नाही