समांतर विश्वांत पक्की

#ललित #संसर्ग #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक #२०२०

समांतर विश्वांत पक्की

- - प्रभुदेसाई

Alice laughed. 'There's no use trying,' she said: 'one CAN'T believe impossible things.' 'I daresay you haven't had much practice,' said the Queen. 'When I was your age, I always did it for half-an-hour a day. Why, sometimes I've believed as many as six impossible things before breakfast.
-- Lewis Carroll, 1871

Everything that can possibly happen does happen.

माझं नाव पक्की. माझ्या बाबांचं नाव पक्कीचे बाबा. आईचं नाव पक्कीची आई. असं आमचं आटोपशीर कुटुंब आहे. आई आणि बाबा गणित आणि विज्ञान शास्त्रांत अत्युच्च शिक्षण घेतलेले आहेत. त्यांना कुठल्याही जगप्रसिद्ध विद्यापीठात प्राध्यापकांच्या नोकऱ्या मिळाल्या असत्या. पण असं म्हणतात ना, "जे काही करू शकतात, ते काहीतरी करतात. बाकीचे विद्यापीठ-शाळा-कॉलेज, खाजगी शिक्षण वर्ग इत्यादी ठिकाणी शिकवतात." त्यामुळे उच्चशिक्षित असूनही आई घराचा व्याप सांभाळते आणि बाबा उपकरणं दुरुस्तीचं काम करून चार पैसे कमावतात. हे त्यांना कुणी करायला सांगितलं, हे कोडं मला सुटलेलं नाही. पण ज्या कुणी त्यांना असं करायची सूचना/ हुकूम/ रिक्वेस्ट केली, ते आमची काळजी घेतात. त्यामुळे आम्हाला कधीही, कशाची कमतरता भासत नाही. पण काही वेळा मात्र वरून "मिशन मे बी पॉसिबल" टाईप काम करायच्या सूचना/ हुकूम/ रिक्वेस्ट येतात, तेव्हा खूप टेन्शन असतं. मी ह्यापेक्षा जास्त बोलत नाही. कारण तसं करणं म्हणजे "अनऑफिशिअल सिक्रेट ॲक्ट"चा भंग करणं होईल.

मी एकदा मार्केटमध्ये फिरत असताना एक चिनी माणूस बघितला. हा माणूस रस्त्याच्या बाजूला, फुटपाथवर आपली पथारी पसरून बसला होता. तो काय काय वस्तू विकत होता. त्या त्याने आपल्या पथारीवर मांडल्या होत्या. त्यांत काय होतं ते विचारण्यापेक्षा काय काय नव्हतं ते विचारा! ती यादी करणं सोपं होतं. चिनीमातीची कितीतरी चित्रं तिथे मांडून ठेवली होती. गिटार वाजवणारा मुलगा, त्याला साथ देणारी त्याची बहीण, पाण्यात डुबकी मारणारी बेडकांची जोडी, शाळेला दांडी मारून झाडाखाली निवांत पुस्तक वाचत पडलेला उडाणटप्पू मुलगा, परीकथेतील राजकुमार, वाऱ्याशी शर्यत लावून धावणारा पंखवाला घोडा, नक्षीकाम केलेली फुलदाणी. आणि ह्या सगळ्यांवर मात करणारं एका मिश्कील मुलाचं चित्र! तो मुलगा वयाने लहान दिसत होता खरा पण त्याने पोषाख मात्र मोठ्या माणसासारखा केला होता. म्हणजे टाय-सूट-बूट आणि वर बेरी छापाची कॅप! अगदी जोकर दिसत होता. मला मित्र म्हणून एकदम पसंत पडला.

तिथे अजूनही गोष्टी होत्या. माझ्या आकाराचं कापूस भरलेलं अस्वल होतं. मोठ्या अस्वलाची छोटी बाळं होती. लांबच लांब शेपटीचा माकड. टिचकी मारली की 'हां हां हो हो' असं तोंड हलवत म्हणणारी कुत्री आणि पट्टेरी वाघ. तशीच ती भरतनाट्यम करणारी भावली. जरा वाऱ्याची झुळूक आली की तिचा नाच सुरू! मला सगळी खेळणी आवडली. हे घ्यावं की ते घ्यावं? काही सुचेनासं झालं. पण पैसे? खिशात एक पैसा पण नव्हता. मला स्वतःचा राग आला. बाबांचा धाक होता नाहीतर हवेत नुसता झटका मारून हात फिरवला तर माझ्या हातात पाहिजे तेव्हढे पैसे आले असते. बाबांनी हजार वेळा सांगितलं होतं, "पब्लिक के सामने जादू नही दिखाना." पण एखादे वेळी पब्लिकच्या नजरेआड त्या बोळात जाऊन पैसे काढून आणले तर काय बिघडलं?

मी चिन्याला मान हलवणाऱ्या वाघाची किंमत विचारली.

"किंमत विचारतोस? खिशात पैसे आहेत का?" हा चक्क माझा अपमान होता. रस्त्याच्या कडेला बूड टेकवून धंदा करणाऱ्या चिन्याने मला असं विचारावं? बाबांची परवानगी असती तर इथेच, ह्या रस्त्यावर नोटांचा पाऊस पाडून पैशाचा महापूर आणला असता.

"किंमत सांगा, म्हणजे मी बाबांच्या कडून पैसे घेऊन येतो." मी पण त्याला टेचात उत्तर दिलं.

"शंभर रुपये. आता जा पळ आणि आण पैसे." चिनी हसून बोलला.

मी बाजूच्या गल्लीत गेलो. अंधारात कोणी बघत नाही असं बघून, हवेत झटका देऊन हात फिरवला. हातात शंभर रुपयांची नव्वी कोरी नोट आली होती.

चिन्याने नोट हातात घेऊन नीट बघितली. उलटीसुलटी करून दोन्ही बाजूंची चित्रं अगदी जवळून बघितली. मग मला नीट न्याहाळून तो बोलला, "कुठून आणलीस बाळा? ही जादूची नोट आहे. कुणी शिकवली ही जादू तुला?"

त्याने नोट परत केली. "आपण जादूचे पैसे घेत नाही. तुझ्याकडे कष्ट करून मिळवलेले पैसे असतील तर दे. नाहीतर फूट इथून."

मला असा राग आला त्या चिन्याचा. खेळणं मिळालं नाही त्याचा राग होताच. त्याहीपेक्षा जास्त अपमानाचा. काम करून आईला पैशांची मदत करायची माझी केव्हापासूनची इच्छा आहे. पण माझ्यासारख्या लहान मुलाला कोण काम देणार? जादूने पैसे काढायला काय कमी कष्ट लागतात? मी बाबांवर नेहमी रागवायचो. हवेतून कुठलाही जिन्नस काढायला केवढा शक्तिपात करावा लागतो हे त्या चिन्याला कोण समजावून सांगणार? आणि शिवाय बाबा रागावणार ते वेगळंच. बाबांनी मला सक्त ताकीद देऊन ठेवली होती. "एक तर लोकांच्या समोर जादू करायची नाही. आणि स्वतःच्या फायद्यासाठी तर नाहीच नाही." मी बाबांना एकदा विचारलंदेखील होतं, "का नाही?"

"तू अजून लहान आहेस. तुला काही समजत नाही. थोडे टक्केटोणपे खाल्लेस की मग अक्कल येईल." बाबांनी मला समजावलं, "तुला जादू करताना सैतानाने पाहिलं तर तो तुला पळवून नेईल आणि त्याचा गुलाम करेल. अजून मी तुला सैतानापासून स्वतःचा बचाव करायचं तंत्र शिकवलेलं नाही. सैतान केव्हा, कुठे, कोणाच्या रूपात येईल त्याचा नेम नाही. जेव्हा तुला सैतानाची सगळी रूपं दिसतील, समजतील, ओळखता येतील तेव्हा तुला जादू करायचा मोह होणार नाही."

पण त्या चिन्याला समजलं कसं की मी ती शंभराची नोट जादूने काढली होती? तो काय सैतानाचा माणूस होता? बाबांनी मला सैतान ओळखण्याची साधी युक्ती शिकवली होती. "तुला संशय आला तर काय करायचं तर समोरच्या माणसाच्या डोळ्यात झाकून बघायचं. तिथे त्या माणसाचं सत्व तुला दिसेल." मी त्या चिन्याच्या डोळ्यांत डोकावण्याचा प्रयत्न केला होता पण त्याच्या डोळ्याच्या जागी फक्त दोन खाचा होत्या. त्यातून मला प्रवेश करता येईना. मी मग त्याचा नाद सोडला.

आजचा दिवस माझ्यासाठी हा असा वैतागवाडी होता. मी घरी आलो तर आईचा मूड नेहमीप्रमाणे ऑफ होता. हे नेहमीचंच असल्यामुळे मला त्याची सवय झाली होती. मी स्वतःला त्रास करून घेतला नाही. शांतपणे हातपाय धुवून पाटावर जाऊन बसलो. आई जेवायला वाढेल म्हणून.

"अजून झालेलं नाही. जा बाहेर बाबांच्या जवळ", आई करवादली.

आता तिथे घुटमळण्यात काही अर्थ नव्हता. भूक मारून मी बाहेरच्या खोलीत आलो. नेहमीप्रमाणे बाबांची समाधी लागली होती. पण मी आल्याची चाहूल लागल्यावर त्यांनी डोळे उघडले.

"ये पक्की, बैस इथे. काय म्हणत होता तो चिनी तुला?"

बाबांच्या पासून काही लपवणं शक्य नव्हतं. "तो म्हणाला जादूचे पैसे घेत नाही म्हणून. त्याला कसं समजलं की ते जादूचे पैसे होते?"

बाबा हसले. "अरे पक्की, खूप चिन्यांना जादू येते बरं का. एक लक्षात ठेव, जादूने पैसे काढलेस तर नेहमी जुन्या नोटा काढायच्या. नव्याकोऱ्या, करकरीत नोटा बघितल्या की लोकांना संशय येतो. नवीन काही असेल तर लोकांना संशय येतो. लोकांचा विश्वास बसायला थोडा वेळ लागतो. तुला गॅलिलीओ माहिती आहे ना? त्याची लोकांनी काय हालत करून ठेवली होती."

"तसं पाहिलं तर सगळे लोक जादू करून पैसे कमावतात. घरची कामवाली. ती काय करते? घराच्या बाईसाहेब तिकडे बेडरूममध्ये आराम करत असतात. नाहीतर फेसबुक वर लाईक्स बघत बसलेल्या असतात. तिकडे कामवाली बाई जादू करते. खरकट्या भांड्यांचा ढीग लागलेला असतो. बाईसाहेब अर्ध्या तासाने येऊन बघतात तो काय! भांडी लख्ख, स्वच्छ होऊन जागेवर बसलेली असतात. अमेझॉनची जादू बघ. इकडे आपण आपल्याला पाहिजे त्या गोष्टीचं नाव आपल्या संगणकावर लिहितो आणि बटण दाबतो. तिकडे लगेच आपल्या दारावरची घंटी वाजते. अलादिनच्या जिनपेक्षा वेगाने कुरिअर आपले पॅकेट घेऊन हजर! तिकडे आर. बी. आय.चा गव्हर्नर लेखणीच्या एका फटकाऱ्याने सरकारच्या खात्यात कोट्यावधी रुपये टाकतो. एक रुपयाची मेणबत्ती! ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी ट्रान्समिट करते! काडेपेटीतील प्रत्येक काडी इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्समीटर असते! अशी असते जादू पक्की. तेव्हा तू चिन्याचं बोलणं मनावर घेऊ नकोस."

माझे बाबा मला असं ज्ञान देत असतात. आता ओघाने आर. बी. आय. आणि गॅलिलीओ वाचणं आलं. आर. बी. आय. वाचल्यावर माझ्या डोक्यात एक आयडिया आली. मी माझ्या पेनने बाबांच्या पासबुकमध्ये एक कोटी रुपयांची एन्ट्री टाकली. बाबांची जमा कोटी रुपयांनी वाढवली! मला वाटलं होतं, आई-बाबा खूष होतील. पण ते बघून दोघंही पोट धरधरून, तुम्ही काय म्हणता ते, आरओएफएल करायला लागले. बाबा म्हणाले, "पक्की बेटा, ही जादू फक्त सायबर ल्युनॅटिक्स, मिथिकल एथिकल हॅकर्स आणि गवर्नर्स ऑफ बँक ऑफ लास्ट रिझॉर्ट करू शकतात. आपलं काम नाही ते बाळा."

इतक्यांत बाबांचे अंग थरथरायला लागलं. म्हणजे बाबा व्हायब्रेशन मोड वर होते. बाबांनी कॉल घेतला तेव्हा थरथर थांबली. बाबांनी काही जुजबी बोलणं केलं आणि 'मी आलोच' असं म्हणून कॉल संपवला. पक्कीकडे पाहून ते म्हणाले, "अरे तात्यांनी आठवण काढली आहे. त्यांच्या घराचे लाईट गेले आहेत. ताबडतोब जायला पाहिजे." मी म्हणालो, "एवढी घाई काय आहे. आईचा सैपाक झाला असेल किंवा होईल आता. जेवू आणि निघू." बाबा घाईत होते, "अरे पक्की, तुला समजत नाही. आपल्या इकडे दिवस आहे पण तात्याच्या तिकडे रात्र झाली आहे. त्याची मुलं बिचारी जेवायची थांबली आहेत. आपण आत्ता जाऊ आणि अर्धा तास आधी परत येऊ. हे बघ आत्ता साडेअकरा वाजले आहेत. आपण अकराच्या आधीच परत येऊ."

हे बाबांचे "लवकर परत येऊ" हे नेहमीचं होतं. एकदा बाबा आज गेले आणि काल परत आले. घरात दोन दोन बाबा! एक कालचे आणि एक आत्ताचे!!! सगळा सावळा गोंधळ. आईने बाबांना सॉलिड फायर दिलं. "अहो, तुम्ही परत येताना वेळेचा सांधा जमवून मग 'आत्ता'मध्ये प्रवेश करत जा."

मग काय, निघालो आम्ही, मी आणि बाबा. आमची जुनीपुराणी सुझुकी गाडी काढली आणि एक-एक वर्ष मागे टाकत तात्यांच्या काळात पोहोचलो.

तात्या जिथे राहायचे त्या जगताप आळीत लगेच पोहोचलो. त्याला काय वेळ लागतो? आळीत इलेक्ट्रिकच्या खांबावर मिणमिणते दिवे लागले होते. खांबावर इलेक्ट्रिकच्या तारांचं जंजाळ पसरलं होतं. ते पाहून माझी तर छाती दडपून गेली. बाबा तात्यांचं घर बघतबघत चालले होते, पण जास्त बघावं लागलं नाही. तात्या बाहेर उभे होते.

"अरे किती वेळ तुझी वाट बघायची?" तात्यांनी तक्रारीचा सूर लावला. मी आणि बाबा घरात गेलो. बाबांनी टेस्ट-लॅम्प लावून फेज चेक केली.

"तात्या तुमच्या घरात काहीही फॉल्ट नाहीये. खांबावर सर्व्हिसचा फ्यूज बघावा लागेल."

"अरे बापरे! म्हणजे आता कंपनीच्या गाडीला बोलवावं लागणार. सायकल हाणत रास्ता पेठेतल्या पॉवर हाऊसला जाणं आलं." तात्या निराश झाले होते.

"तात्यानू, तुम्ही काही काळजी करू नका. कंपनीची गाडी बोलवायची गरज नाही. मी आहे ना. तुम्ही जा घरात. मला माझं काम करू द्या."

"अरे पण तुझ्याकडे शिडी ..." बाबांनी त्यांना पुढे बोलूच दिलं नाही. तात्यांना घरात ढकलून बाबा झरझर खांबावर चढले. तिथला फ्यूज काढून वायर भरली. घरात लखलखाट झाला. बाबा खाली उतरले. आणि तात्या घरातून बाहेर आले.

"कसा देवासारखा धावून आलास बघ. किती पैसे झाले तुझे?" मला वाटलं की बाबा आता दीडशे दोनशे रुपये मागणार. हाच रेट चालू होता ना. पण बाबा म्हणजे काय.

"आता तुम्हीच विचार करून द्या." बाबा.

तात्या घरात गेले. थोडा खुडबुडीचा आवाज झाला. बाहेर येऊन त्यांनी एक बंदा रुपया बाबांच्या हातावर ठेवला. पैसे खिशात टाकून आम्ही दोघांनी तात्यांचा निरोप घेतला.

"म्हणतो काय 'कसा देवासारखा धावून आलास बघ' म्हणजे देव देव म्हणतात तो मीच आहे ना. लोकांना 'देव तेथेची जाणावा' हे समजत नाही त्याला मी काय करणार?" बाबा स्वतःशी बडबडत होते.

"आता आलोच आहोत तर शनिवारवाड्यावर सभा चालली आहे ती बघून जाऊ." बाबांनी माझा हात धरून मला शनिवारवाड्याकडे ओढून नेलं. तिथे हजारो लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते.

"आता बोलत आहेत ते एस एम जोशी. बाजूला बसले आहेत ते भाई डांगे, पलीकडे भाई चितळे, हे विराटकाय आहेत ते आचार्य अत्रे, इकडे ना. ग. गोरे." बाबा मला हलक्या आवाजात माहिती देत होते.

मी आणि बाबा तिथे किती वेळ ऐकत बसलो असू कुणास ठाऊक. शेवटी मीच बाबांना आठवण करून दिली. "बाबा, आई आपली वाट बघत असेल. चला आता." बाबा भानावर आले.

आम्ही घरी आलो तेव्हा बाबांनी मला त्यांचं मनगटी घड्याळ दाखवलं. "पहा पक्की, अजून अकरा वाजायचे आहेत." बाबा टाईम असा उलटासुलटा कसा मॅनेज करतात ते त्यांनाच माहीत! म्हणजे आज जायचं आणि काल परत यायचं! पण आई असल्या भूलभुलैयात फसणारी नव्हती. "कुठे गेला होता दिवे लावायला?" तिने कठोरपणे विचारलं.

"आम्ही साडे अकराला गेलो आणि अकराच्या आधीच परत आलो. दिवे लावायला गेलो होतो. तात्यांच्या घरचे दिवे गेले होते."

"म्हणजे तुम्ही एकोणीसशे अठ्ठावन सालात गेला होतात! तात्यांनी किती पैसे दिले?"

बाबांनी खिशातून दीडशे रुपये काढून आईच्या हातात ठेवले. कमाल आहे! तात्यांनी तर फक्त एक रुपया दिला होता. जेवण झाल्यावर मी हळूच बाबांना विचारलं. "पक्की, तो एकोणीसशे अठ्ठावन साली त्यांनी दिलेला रुपया होता. आता वीसशे वीस साल चालू आहे." म्हणून काय झालं! एक रुपयाचे दीडशे रुपये! ही चक्रावून टाकणारी जादू होती.

तुम्हाला जर वाटलं असेल की माझे बाबा इलेक्ट्रिशिअन आहेत, तर ते तसं चूक नाही. खूप लोकांचा तसा गैरसमज आहे. ते तितकसं बरोबर नाही. मला स्वतःला माहीत नाही की ते कोण आहेत. काही वेळा ते टीव्ही दुरुस्त करतात, तर कधी वॉशिंग मशीन, कधी फ्रीज, कधी मोबाइल, कधी मेनफ्रेम! मी आईला विचारलं तर ती पण उडवाउडवीची उत्तरं देते.

एकदा बाबा खूप उशिरा घरी परत आले. आईशी हलक्या आवाजात बोलत बसले. पुन्हा बाहेर निघून गेले. दुसऱ्या दिवशी परत आले तेव्हा खूप थकले होते. आईने हलक्या आवाजात विचारलं, "सक्सेस?"

"हा, लॉंन्च सक्सेसफुल! महादेवी, यू आर द ग्रेटेस्ट विझर्ड ऑन द अर्थ!"

आई लाजली पण खूष झाली. "मी तुम्हाला सांगितलं होतं ना की क्वाटर्निआन वापरा म्हणून. माझा डॉक्टरेटचा थिसीस आहे त्यावर!" आईने मग सगळ्यांसाठी कडॅक चहा बनवला. कडक नाही कडॅकच. बाबा बूबान बिस्कीट घेऊन आले होते. मग काय आम्ही पण खूष!!

असे माझे दिवस मजेत जात होते. सुख-दुःख कमी नाही की, जास्त नाही. सगळं काही कसं प्रमाणात!

अशाच एके दिवशी लँडलाईन च्या फोनची घंटी वाजली. म्हणजे बाबांना कॉल आला होता. मी फोन उचलला, "हॅलो, पक्की हियर."

"छोटा पक्की बेटा, बाबांना फोन दे. सांग डॉक्टर काकांचा फोन आहे म्हणून."

मी फोन बाबांच्याकडे देत म्हणालो, "डॉक्टर काकांचा फोन आहे."

"हॅलो डॉक्टर, मी एकदम ठीकठाक आहे. माझं बीपी, शुगर, नाडी सगळं काही जिथल्या तिथे व्यवस्थित आहे. छातीत, पोटात, पाठीत कुठेही दुखत नाहीये. मूत्रपिंड, स्वादुपिंड, यकृत, हृदय, फुफ्फुस ह्यांनी आत्ताच मला संदेश दिला आहे की त्यांचे काम व्यवस्थित चालले आहे. मग तुम्हाला माझी आठवण का झाली? घरातले लाईट गेले आहेत की तुमचं वॉशिंग मशीन चालू होत नाही? हां, माझा तर्क असा आहे की तुमचं इ. सी. जी. मशीन बिघडलं असणार. काय बरोबर आहे नं?" बाबा थांबायला तयार नव्हते. डॉक्टर काय बोलणार त्याची आपण कल्पना करू शकतो. पण बाबा आता गंभीरपणे डॉक्टरांचे बोलणे ऐकत होते. बोलणं झाल्यावर बाबा म्हणाले, "चल, पक्की बेटा काम आलं आहे."

These are the days of miracle and wonder.

—Paul Simon

आम्ही जेव्हा डॉक्टरांच्या दवाखान्यांत पोहोचलो तेव्हा त्यांच्या आगाऊ रिसेप्शनिस्टने मला आणि बाबांना नेहमीची रेकॉर्ड ऐकवली, "आज खूप गर्दी आहे. एक तासापेक्षा जास्त वेळ थांबावे लागेल. तुम्ही लोक आधी अपॉइंटमेंट का नाही घेत? बसा तिकडे. काय नाव सांगा."

बाबा पण काय कमी नाहीत, "मॅडम, आपण खूप टेंशन घेता. एक काम करा. डॉक्टरांना सांगा की पक्की आणि पक्कीचे बाबा आले आहेत." अर्थात मॅडमने तिकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. मग बाबा वैतागले. त्यांनी आपल्या शर्टाची बटणे दाबली आणि डॉक्टर काकांना कॉल लावला. डॉक्टरांनी लगेच कॉल घेतला बाबांनी सरळ तक्रार करायला सुरुवात केली. "अरे भल्या माणसा, आम्ही इथे तुझ्या रिसेप्शनमध्ये बसलो आहोत. आणि तुझी ही सुंदरी ..."

एका मिनिटात डॉक्टरांच्या केबिनमधून एक मलूल आणि दुःखी चेहऱ्याचा माणूस बाहेर पडला, आणि रिसेप्शनिस्टचा फोन खणाणला. पूर्ण गोची झाल्यामुळे त्या पेशंट इतका मलूल आणि दुःखी चेहरा करून तिनं बाबांना आणि मला आतला रस्ता दाखवला. "जा. डॉक्टर आत तुमची वाट बघताहेत."

आम्ही दोघं आत गेलो. डॉक्टरांनी बोलायला सुरुवात केली. "अशी विचित्र केस आली आहे की मला वाटलं की त्यात तुम्ही योगदान देऊ शकाल." योगदान! मी हा शब्द मेमरीत टाकून ठेवला. आजकाल हा शब्द खूप लोक खूप वेळा वापरतात. कधीतरी उपयोगी पडेल असा विचार करून मी शब्द साठवून ठेवला. अर्थ? आता आम्ही योगदान केल्यावर तुम्हाला समजेलच!

लगेच डॉक्टरांच्या केबिनमध्ये तो विचित्र पेशंट आला. हा पेशंट नेहमीच्या इतर पेशंटप्रमाणे रोगट, थकलेला, निराश किंवा हताश दिसत नव्हता. उलट तो खूप उत्साही, आनंदी वाटत होता. किंबहुना हा 'रुग्ण' आहे असं अजिबात वाटत नव्हतं. मग त्याचा काय प्रॉब्लेम होता?

डॉक्टरकाकांनी आमची ओळख करून दिली, "हा पक्की आणि हे पक्कीचे बाबा. हे दोघे वैश्विक तज्ज्ञ आहेत. आणि हे रामभाऊ आमभाऊ. पक्कीचे बाबा, रामभाऊ आमभाऊ हे सध्याच्या जमान्यातले सुप्रसिद्ध रहस्यकथाकार आहेत."

"नमस्कार रामभाऊ आमभाऊ. आपल्याला भेटून आनंद झाला." बाबा.

रामभाऊंनी लवून अभिवादन केले, "मला नुसते राम म्हणा. आता कुणालाही 'राम म्हणा' असे सांगितलेले आवडणार नाही. ( हा विनोद कुणालाही समजला नाही म्हणून बिचारा वाया गेला.) मग तुम्ही मला रामराव म्हणा. वैश्विक तज्ज्ञ म्हणजे काय प्रकार असतो ते मला माहीत आहे. त्यामुळे तुम्ही आल्यामुळे मला थोडा धीर आला. वाटलं की आपला प्रॉब्लेम समजून घेणारा कोणीतरी भेटला."

"काय आहे तरी काय तुमचा प्रॉब्लेम?" बाबांनी रामभाऊंना विचारलं.

"सांगतो, आधी मला सांगा तुमच्या मते दोन अधिक दोन किती होतात?" रामभाऊंनी विचारलं.

बाबा विचारात गढून गेले. मला चांगलं माहीत होतं की अतिप्रगत गणितशास्त्रामध्ये पारंगत असलेल्या बाबांना ह्या साध्या गणिताचं उत्तर माहीत नसणार. बाबांना उत्तर शोधायला बराच वेळ लागणार होता, तोपर्यंत आपण उत्तर देऊन टाकू म्हणजे गाडी पुढे सरकेल.

"दोन अधिक दोन चार!" मी रामभाऊचा प्रॉब्लेम सोडवला.

"दोन अधिक दोन चार!" बाबा पण विजयी मुद्रेने ओरडले. ते अतिप्रगत गणितातून दुसरीच्या अभ्यासक्रमात पोहोचले होते.

"मला वाटलंच होते की तुम्ही पण असंच म्हणणार. तरी बरं स्वतःला काय ते, वैश्विक तज्ज्ञ म्हणवून घेता. कालपासून ही असली भन्नाट उत्तरं ऐकून ऐकून माझं डोकं फिरायची वेळ आली आहे. मी स्वतःची तपासणी करून घ्यायला म्हणून डॉक्टर काकांकडे आलो. बघतो तर काय तुम्ही पण मला तेच सांगताय."

"प्राथमिक शाळेपासून मी हे घोकत आलो आहे. दोन अधिक दोन चार, इन्कम टॅक्स आणि मृत्यू ही जीवनातली शाश्वत तत्त्वं आहेत! मग काय तुमच्या मते दोन अधिक दोन बरोबर पाच होतात काय?" बाबांच्या बोलण्यात थोडा सारकास्टिक टोन होता.

रामराव एकदम खुश झाले. त्यांनी बाबांच्या टोनकडे दुर्लक्ष केलं. "अगदी बरोबर बोलता तुम्ही. आता तुम्ही वैश्विक तज्ज्ञ म्हणवून घ्यायच्या लायकीचे आहात. काल मी हॉटेलमध्ये एक चहा आणि एक सिंगल वडापाव घेतला, त्या शेट्टीने मला चाळीस रुपये बिल लावलं. माझ्या मते पन्नास रुपये व्हायला पाहिजेत. मी त्याला भलेपणाने त्याची चूक काढून दाखवली. तर उलट त्याने मलाच वेड्यात काढलं. आणि वर कॅल्क्युलेटरवर गणित करून दाखवलं, वीस वड्यांचे आणि वीस चहांचे, झाले चाळीस रुपये! आता मी तरी काय बोलणार? इथले कॅल्क्युलेटर पण मला वेडे करतील. काय करणार? चूपचाप घरी परत आलो."

"पण शेट्टीने केलेलं गणित बरोबरच आहे. वीस चहांचे आणि वीस वड्यांचे मिळून झाले चाळीस!" मी पण गोंधळून गेलो. मला काही समजेना की ह्या भल्या माणसाचा काय प्रॉब्लेम आहे.

"मी सांगतो," डॉक्टरकाका सांगायला लागले, "रामराव माझे जुने पेशंट आहेत. पक्कीचे बाबा, रामरावांना आज विचित्र भास होत आहेत. पैशाचे हिशोब चुकताहेत. त्यांच्या मते दोन अधिक दोन बरोबर पाच! आणि डीडीएलजे सिनेमा शोकांतिका असायला पाहिजे, पण आज दुपारी टीव्हीवर त्यांना त्याचा शेवट गोड झालेला दिसला. राज आणि सिमरन ह्यांची ताटातूट व्हायच्या ऐवजी गोड मीलन झालेलं बघून त्यांना धक्काच बसला. अजूनही बरेच प्रकार झाले आहेत. त्यांच्या विश्वात प्रचंड उलथापालथ झाली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. विश्व म्हटलं की मला तुमची आठवण येते म्हणून तुम्हाला बोलावलं." डॉक्टरांनी थोडक्यांत सांगितलं.

बाबा पुन्हा विचारात दंग झाले. मीच मग पुढाकार घेऊन प्रश्न केला, "पण आपण वस्तुमानाच्या अक्षय्यतेच्या नियमाचं उल्लंघन करू शकत नाही. म्हणजे असं की दोन किलो लोखंड अधिक दोन किलो लोखंड पाच किलो झालं तर हे वाढीव वस्तुमान आलं कुठून?"

"अगदी बरोबर, पक्की वस्तुमान वाढत नाही, ते चार किलोच राहातं. फक्त समान वस्तुमानाचे म्हणजे थोड्या कमी वस्तुमानाचे पाच तुकडे तयार होतात. ही साधी गणिती पद्धत वापरून आपण वस्तूचं विभाजन करत करत अणूपर्यंत जाऊ शकतो. इतकंच नाही तर अणूचे विभाजन करून ..."

डॉक्टरकाकांना ती चर्चा असह्य झाली असावी, म्हणून त्यांनी रामभाऊंना मध्येच थांबवलं, "ते डीडीएलजेचं सांगा ना त्यांना." मला दोन किलो लोखंड अधिक दोन किलो श्रीखंड मिळून किती होतात ते विचारायचं होतं ते राहून गेलं.

रामभाऊ नव्या उत्साहाने सांगायला लागले, "डीडीएलजे कालच टीवीवर पुन्हा लागला होता. त्याचा शेवटचा सीन बघताना मला शॉक बसला. गाडीच्या दारात रक्ताने माखलेला राज उभा आहे. गाडी हळूहळू वेग पकडत आहे. सिमरन फलाटावरून धावतधावत येत आहे. शेवटच्या क्षणी राज तिला हात देऊन गाडीत अलगद उचलून घेतो. असं त्यांचं गोड मीलन होतं असं दाखवलं आहे. पण पूर्वी मी जितक्या वेळा तो सिनेमा बघितला तितक्या वेळा त्याचा शेवट काहीतरी निराळाच होता. सिमरनला मेकप करायला थोडा वेळ लागतो, पण ती मनात विचार करते की नाही तरी गाडी थोडीच वेळेवर येणार आहे? दुर्दैवाने नेमकी त्याच दिवशी गाडी टाईमात आली नि येऊन गेली पण. राज तिची किती आतुरतेने आणि आशेने वाट बघत होता! वाट पाहून पाहून निराशेने तो निघून गेला. सिमरनने खऱ्या प्रेमाला झिडकारलं होतं असाच त्याचा समज झाला. गाडी आली थोडा वेळ थांबली आणि निघून गेली. सिमरन मिस्ड द ट्रेन!! बिचारी सिमरन फलाटावर एकाकी! सनईचे किंवा वायोलीन करुण संगीत. असा खरा त्या सिनेमाचा ट्रॅजिक शेवट आहे. अश्या त्या क्लासिक ट्रॅजेडीची ही अशी कॉमिक कॉमेडी कुणी आणि केव्हा केली? जीओके!"

ते ऐकून डॉक्टरकाका भयानक अस्वस्थ झाले होते. डीडीएलजे हा त्यांचा अत्यंत आवडीचा सिनेमा होता. त्यांना हा तमाशा बंद करावासा वाटला असावा यांत नवल ते काय? पण ते काही बोलायच्या आधी बाबांनी रामभाऊंना विचारलं, "सूर्य कुठल्या दिशेला उगवतो?"

रामभाऊंची नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. "ह्या तुमच्या छोट्या मुलालासुद्धा माहीत आहे ते. अहो, सरळ आहे, सूर्य उत्तर दिशेला उगवतो, डोक्यावर येतो, मग नव्वद अंशांत वळतो आणि पूर्व दिशेला मावळतो."

आता मात्र डॉक्टरकाकांनी चपळाई करून मुलाखत तिथेच संपवली, "रामभाऊ आपण जरा बाहेर थांबाल का? मी जरा ह्यांच्याशी चर्चा करतो. प्लीज हं."

पण बाबा थांबायच्या मूडमध्ये नसावेत. "आपल्याला भेटायचे असेल तर आपला पत्ता द्याल का?"

"हो, घ्या ना. रेखांश १८.५०७४ डिग्रीज उत्तर, अक्षांश ७३.८०७७ डिग्रीज पूर्व. समुद्रसपाटीपासून उंची ५५४ मीटर्स." रामभाऊ उत्तरले.

"रामभाऊ, तुम्ही अकौंटंट आहात का हो? नाही म्हणजे इतकी अचूक आणि तितकीच निरुपयोगी माहिती दुसरं कोण देणार? आम्हां सर्वसाधारण लोकांना समजेल असा पत्ता द्या ना."

"जैसी जिसकी कुवत! माझंच चुकलं. कर्वेनगरमधल्या कर्वे रोडवरच्या कर्वे पुतळ्याच्या बाजूला असणाऱ्या कर्वे लेन नंबर सातच्या कर्वे कोपऱ्यावर एक हॉटेल आहे. तिथे संध्याकाळी पाच ते सात मी चहा पीत बसलेला असतो. बाकीच्या वेळी मी कुठे असतो, काय करतो ते माझं मलाच माहीत नसतं तेव्हा तुम्हाला मी काय सांगणार?" इतके बोलून रामभाऊ आमभाऊ डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर पडले.

रामभाऊ बाहेर गेल्यावर डॉक्टरकाकांनी हुश्श केलं. "आता मला सांगा. ह्या पेशंटबद्दल तुमचं काय मत आहे. हा खरं तर माझा नेहमीच्या ओळखीतला माणूस आहे. आज अचानक त्याला काय झालं कुणास ठाऊक? माझ्या मते ह्याच्या मनावर काहीतरी आघात झाला आहे. पण हा त्याचा थांगपत्ता लागू देत नाहीये. मी त्याचं ब्रेन मॅपिंग करवून घेतलं आहे. पण ते तर नॉर्मल दिसतं आहे. मी ह्याला सध्यातरी माईल्ड ट्रँक्विलायझरवर ठेवायचा विचार करतो आहे. दोन-तीन दिवसांनंतर बघू काही फरक पडला तर. आता तुमचे निरीक्षण काय आहे ते सांगा."

बाबांनी सुरुवात केली, "हा माणूस रहस्यकथा लिहितो, पण हा स्वतःच एक रहस्यकथा आहे. हा एक रहस्य जगतो आहे. तो वेड पांघरून पेडगावला चालला आहे. कुणालातरी कात्रज दाखवतो आहे. पक्की तुला काय वाटतं? मी म्हणतो ते बरोबर आहे ना?"

"बाबा, आपण आईशी बोलायला पाहिजे. माझ्या मते हा माणूस पूर्ण शुद्धीवर आहे. त्याला काही भ्रम झालेला नाही. त्यानं सोंगसुद्धा पांघरलेलं नाही, का कुणाला घुमवत नाहीये. तो मनोरुग्ण पण नाही. मला असं वाटतं की तो कुठल्यातरी दुसऱ्या विश्वातून चुकून, भरकटून इकडे आला आहे. तो परग्रहावरील एलिअनही नाही. कारण आपल्या विश्वातल्या कुठल्याही एलियन संस्कृतीत दोन अधिक दोन चारच असायला पाहिजेत."

"पक्की बेटा, तू हे असं का म्हणतोस? "

"बाबा, तुम्ही बघितलं का? तो बोलत होता तेव्हा त्याचे ओठ हलत नव्हते. तो सरळ मेंदूतून बोलत होता. मी खूप एलियन्स बघितले पण ..."

"हे काही आमच्या लक्षात कसं आलं नाही?"

"तुम्ही मोठी माणसं सगळ्या गोष्टी गृहीत धरून चालता. त्यामुळे तुमचा मेंदू, माणूस जसा बोलतो आहे तसेच त्याचे ओठ हलत आहेत, असं गृहीत धरून चालतो. स्वतःच्या डोक्यातल्या कल्पना त्यांच्या ओठांवर सुपरइंपोज करता. बाबा, तुम्हाला ती राजाच्या तलम अंगरख्याची गोष्ट माहीत आहे ना, तसंच. आम्हां लहान मुलांची अशी पूर्वग्रहदूषित दृष्टी नसते. त्यामुळे अशा गोष्टी आमच्या चटकन लक्षात येतात." मी आपलं माझं मत नोंदवलं.

"डॉक्टर, मी मिसेसबरोबर चर्चा करून एक दोन दिवसांत माझा रिपोर्ट देईन. तोपर्यंत राहू दे त्याला ट्रँक्विलायझरवर, तुम्ही म्हणता आहात तसं. नंतर बघू आपण त्याचे काय करायचं ते." एवढं म्हणून आम्ही डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर पडलो.

घरी येऊन बाबांनी आईला सर्व वृतांत सांगितला, "डॉक्टरांनी आम्हांला पेशंटच्या मेंदूचे दिव्य दृष्टीने काढलेले नकाशे दाखवले. मी ते काळजीपूर्वक बघितले. त्याचा मेंदू कुठेही कललेला नाही. मेंदूचे डोंगर आणि दऱ्या जागच्या जागी आहेत. सुरकुत्यापण साधारण माणसापेक्षा जरा जास्तच आहेत. कुठल्याही भागावर सूज नाही. असं म्हणतात की, मेंदू सगळी रहस्यं उघडी करून दाखवतो. पण ह्या महाभागाच्या केसमध्ये मेंदू जेवढं सांगतो त्यापेक्षा जास्त लपवत होता. तेव्हा त्याच्यावर वेडेपणाचा आरोप आपल्याला करता येणार नाही."

आईचा मेंदू मात्र आता विद्युतवेगाने काम करायला लागला. "आधी तुम्ही जेवून घ्या. मग आपण बोलू."

जेवण झाल्यावर आईने जे आम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न केला त्यातला सैद्धांतिक भाग आम्हाला समजणं कठीण होतं, पण व्यावहारिक भाग मात्र समजला. तिने काय सांगितलं ते मी थोडक्यात इथे सांगायचा प्रयत्न करून बघतो. हुशार लोकांना ते लगेच समजेल! ते मी तिच्याच शब्दांत सांगतो.

आपण सर्वांनी आत्ताच झालेली इंग्लंड विरुद्ध भारत ही टेस्ट बघितली असणार. त्यात भारताचा कप्तान नाणेफेक हरतो, त्याच्या बरोबर सामनाही. कारण सामन्याच्या पाचव्या दिवशी खराब झालेल्या खेळपट्टीवर भारातला दुसरा डाव खेळावा लागला. ह्या खेळपट्टीवर स्टीव वॉच्या अजिंक्य ऑसी टीमची पण वाट लागली असती. कारण का, तर भारत नाणेफेक हरला. समांतर विश्वाच्या सिद्धांतानुसार जेव्हा नाणेफेक झाली, आणि भारत नाणेफेक हरला तेव्हा विश्वाला अजून एक फाटा फुटला. त्या विश्वात भारत नाणेफेक जिंकला आणि सामनाही! दुर्दैवाने त्या विश्वात आपल्याला प्रवेश करता येत नाही. हे मी अगदी सोपं करून सांगितलं. आता समजा भारताने नाणेफेक जिंकली पण अलिस्टर कुकचा स्लिपमधला झेल सोडला असेल तर? अजून एक फाटा फुटून अजून एक विश्व निर्माण झालं असेल. जशा अनेक शक्यता तशी अनेक विश्वं. हा सगळा पसारा म्हणजे महाविशाल अश्वत्थ वृक्षासारखा आहे. त्याच्या खोडापासून सुरुवात होते. नंतर मोठ्या फांद्या, त्यानंतर छोट्या फांद्या. मग डहाळ्या, शेवटी पानं! त्या अनेक पानांपैकी एक पान म्हणजे आपण ज्या विश्वात राहतो ते विश्व! तुमच्या पेशंट रामभाऊंचं विश्व असंच एक पान, कुठेतरी दूर असलेलं!

एव्हरेट नावाच्या महान वैज्ञानिकाने हा सिद्धांत मांडला. मी (म्हणजे माझ्या आईने) ह्यावर संशोधन करून निरनिराळ्या विश्वांत संचार करायची प्रणाली शोधून काढली. पण "वरच्या लोकांनी" मला ती प्रसिद्ध करण्यापासून परावृत्त केलं. ह्यामुळे विश्वाचं स्थैर्य ढळेल अशी बॉस लोकांना भीती वाटली. माझं ( म्हणजे आईचं) नोबल प्राईज मात्र हुकलं.

आता हे तुमचे पेशंट रामभाऊ आणि आपले इकडचे रामभाऊ ह्यांची अदलाबदल झाली आहे असं दिसतं. असे ॲक्सिडेंट होतात मधूनमधून. त्या माणसांना आपण वेडी माणसं म्हणतो. मला अशा काही केसेस माहीत आहेत. ही माणसं स्वतःला हरवून अशा अनेक विश्वांतून भटकत फिरत असतात. अशा माणसांचा छडा लावून त्यांना स्वगृही आणण्यासाठी एक खास खातं "वरच्या लोकांनी" उघडलं आहे. सध्या ते फक्त आपल्या विश्वात काम करतात. लग्नाआधी मी तिथे 'इंटर कॉसमॉस'मध्ये काम करत होते. तिकडे सारखे फिरतीवर जावं लागायचं म्हणून लग्न ठरल्यावर ती नोकरी मी सोडली. आता 'इंटर कॉसमॉस'मध्ये काम करायला लायक कॅंडिडेट त्यांना मिळत नाहीये. म्हणून त्यांनी तो विभाग बंद केला आहे सध्या. जाऊ दे त्या जुन्या आठवणी! (इथे माझी आई थोडी भावुक झाली. तिने लगेच स्वतःला सावरलं.)

भुतं दिसतात म्हणजे काय? जेव्हा समांतर विश्वाचं आपल्याला ओझरतं दर्शन होतं, तेव्हा आपल्याला माहितीतले, जे मृत झाले आहेत असं आपण मानतो, पण जे दुसऱ्या विश्वांत जिवंत असतात त्यांचं दर्शन!

आपले पेशंट रामभाऊ त्यांच्या विश्वातल्या अनुभवांची इथल्या विश्वातल्या अनुभवांची तुलना करत आहेत. असेच काही दिवस गेले तर डॉक्टरकाका त्यांची वेड्यांच्या इस्पितळात भरती करून मोकळे होतील.

आपण सैद्धांतिक भाग सोडून आता व्यावहारिक भागाकडे लक्ष देऊया. "महादेवी तू हे सगळं सांगितलं, ते ठीक आहे. पण आता आम्ही काय करावं ते सांग."

"ते अगदी सरळसाधं आहे. तुम्ही त्या २+२=५ विश्वात जाऊन त्या २+२=४वाल्या रामभाऊंना शोधून काढा आणि त्यांना इकडे घेऊन या. बिचाऱ्याची अगदी वेड्यासारखी अवस्था झाली असेल त्या विश्वात. आता उशीर करू नका. जा, माझ्या माहेरच्यांनी लग्नात आहेर केलेली सुझुकी गाडी घेऊन जा."

"अहो बाईसाहेब... तू असं बोलतेस की मी जणू लग्नात गाडीसाठी अडून बसलो होतो. तुझ्या भावाने विचारलं, तेव्हा मी म्हणालो, "काही द्यायचं असेल तर एक कार द्या." आता तुझ्या भावाला ते ऐकून झीट आली त्याला मी काय करणार? जमत नसेल तर नव्हती द्यायची."

"अहो महाशय, माझ्या भावाला वाटलं होतं की मागून मागून हा माणूस काय मागणार? एक चार-पाच हजारांची वस्तू मागेल. आता तुम्ही कार मागितल्यावर त्याला झीट आली त्यात नवल ते काय."

"हा माणूस?" बाबा एकदम खवळले, "तुझा भाऊ मला 'हा माणूस' म्हणतो काय?"

असा माझ्या आई-बाबांचा जुनापुराणा सुखसंवाद सुरु झाल्यावर मलाच मध्ये पडावं लागणार.

"अगं आई, त्या गाडीने आम्ही टाईम-ट्रॅव्हल केला आहे बऱ्याच वेळा, पण हा तर स्पेस-ट्रॅवल आहे. एका विश्वातून, दुसऱ्या विश्वात, तिथून तिसऱ्या..." मी माझी अडचण उघड केली.

"चला तुम्ही पार्किंग लॉटमध्ये. मी तुम्हांला दाखवते." आई आम्हाला घेऊन खाली आली, "ही डायल आता T वर आहे ना ती S वर अशी टाका. ST वर नका टाकू. मी अजून ते डेवलप नाही केलेलं. S विकल्प घेतला म्हणजे तुम्ही स्पेस ट्रॅव्हल करू शकाल. आणि प्रत्येक नवीन विश्वात प्रवेश केला की आधी कॅल्क्युलेटरवर २+२ =? असे टाकून खात्री करून घ्या. जर पाच असं उत्तर आलं तर मग पुढे त्या विश्वात प्रवेश करून त्या हॉटेलमध्ये जाऊन पहा. तिथे रामभाऊ भेटतीलच. विचारा त्यांना डीडीएलजेबद्दल."

बाबा आता बरेच निवळले होते. त्यांनी हळूच आईला विचारले, "तू चल ना आमच्याबरोबर."

"नाही रे बाबा. मला माझी कामं काय कमी आहेत!" तिला काहीतरी आठवलं, "तो मोबाइल इकडे द्या. आणि थांबा इथेच जरा. मी आलेच इतक्यात."

इतक्यात म्हणजे जवळजवळ पंचवीस-तीस मिनिटांनी आई परत आली. तोपर्यंत आम्ही माशा मारत बसलो होतो.

हे पहा, मी पोस्ट-डॉक्टरल संशोधन करत असताना गंमत म्हणून एक प्रोग्रॅम लिहिला होता. तो मोबाइलमध्ये टाकला आहे. बीटा व्हर्जन आहे, पण चालायला पाहिजे. ह्या सुझुकीमध्ये जो आयनिक वॉर्प ड्राईव्ह मी बसवला आहे त्याची मार्गदर्शक प्रणाली आहे. त्या 'दोन अधिक दोन पाच' विश्वात झॅप झालेल्या तुमच्या रामभाऊंचा वैश्विक पत्ता त्याच्या वैशिष्ट्यांसह इथे एंटर केला आहे. आता ही गाडी तुम्हाला अनेक काल-रंध्रांतून विनासायास तिकडे घेऊन जाईल. तुम्ही त्या रामभाऊंना घेऊन या. तोपर्यंत मी इकडे गरमागरम कोबी-पोहे तयार ठेवते."

आम्हाला दोन तीन विश्वांत थोडं भटकायला लागलं. त्या त्या विश्वातल्या त्या त्या पुण्याच्या कर्वे रोडच्या त्या हॉटेलांत निरनिराळे रामभाऊ आम्हाला भेटले. पण ते आम्हाला पाहिजे होते ते रामभाऊ नव्हते. ते तिथले मूळ रहिवासी म्हणजे ओरिजिनल रामभाऊ होते. आम्हाला पाहिजे होते रस्ता भटकलेले रामभाऊ. शेवटी एकदाचे भेटले. त्या हॉटेलात ते एकटेच बसले होते. ते आपल्या (नसलेल्या) विश्वात हरवले होते. एकाकी. उदास. आम्ही होतो म्हणून त्यांना आशा होती. नाहीतर त्यांची रवानगी वेड्याच्या इस्पितळात झाली असती. (असं त्यांनीच आम्हाला नंतर सांगितलं.)

त्यांना भेटताच बाबांनी परवलीचं संभाषण सुरु केलं, "रामभाऊ आमभाऊ, दोन अधिक दोन किती?" खरं तर हा प्रश्न विचारायची गरज नव्हती, कारण आम्ही ती टेस्ट आधीच केली होती. पण बाबा म्हणजे अगदी पद्धतशीर प्रमाणे वागणारे होते.

रामभाऊंनी बाबांच्या कडे संशयाने पाहिलं, "तुम्ही येरवड्यातील वेड्यांच्या इस्पितळांतले डॉक्टर आहात ना? मला घेऊन जायला आला आहात का?"

"अहो, आमचा ड्रेस पहा. रंगीबेरंगी, चट्ट्यापट्ट्यांचा बुशशर्ट घालून कधी डॉक्टर येतात का? आमचे चेहरे पाहा. आमच्या गळ्यांत ट्रेडमार्क स्टेथोस्कोप लटकवलेला दिसतो आहे का नाही ना. आम्ही रुग्णवाहिका आणली आहे का? आमची ही सुझुकी रुग्ण दिसत असेल खरी पण ती रुग्णवाहिका निश्चितच नाही."

बाबांच्या बोलण्याचा रामभाऊंवर बरा परिणाम झाला असावा. ते जरा आश्वस्त झालेले दिसत होते. त्यांनी आजूबाजूला बघितलं. कुणी बघत नाही अशी खात्री झाल्यावर ते बाबांच्या जवळ आले आणि अगदी हळू आवाजांत बोलले, "कुणाला सांगणार नाही ना? मग ऐका, दोन अधिक दोन बरोबर चार." एवढं सांगून झाल्यावर रामभाऊ एकदम रिलॅक्स झाले. जणू काही त्यांच्या डोक्यावरचं मणामणाचं ओझे उतरलं होतं.

मला त्या ग्रीक पौराणिक कथेची आठवण झाली. मिडास राजाला गाढवाचे कान! त्या गोष्टीतला केशकलाकार जंगलात जाऊन खड्डा खणतो आणि त्या खड्ड्यात तोंड घालून जोरात ओरडतो, "मिडास राजाला गाढवाचे कान." तेव्हा त्याला सुखाची झोप लागते. मला वाटतं, आम्ही वेळेवर पोहोचलो नसतो तर आमच्या रामभाऊंनी पण एक्झॅक्ट्ली तेच केलं असतं.

बाबांनी त्यांना प्रेमाने जवळ बसवून घेतलं आणि विचारलं, "डीडीएलजे सिनेमाचा शेवटचा सीन आठवतो? वर्णन करून सांगा बरं."

"ही काय विचारायची गोष्ट आहे? राज आणि सिमरन यांचे गोड मीलन होतं. त्याचं असं होतं..."

बाबांनी उठून रामभाऊंना घट्ट मिठी मारली. हेच आपले रामभाऊ आहेत ह्याची त्यांना पूर्ण खात्री पटली होती. तरीपण शेवटची कन्फर्मेटरी टेस्ट म्हणून बाबांनी विचारले, "सूर्य कुठे उगवतो?"

"अहो पक्कीचे बाबा, सूर्य पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळायला पाहिजे ना? पण ह्या मूर्ख आणि विचित्र देशात सूर्य उत्तरेला उगवतो. अर्थात खरं म्हणजे उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, मागे, पुढे, वर, खाली, हे सगळं मानवाने आपल्या सोयीसाठी निर्माण केले आहे. त्याला वैज्ञानिक परिभाषेत काहीही अर्थ नाही. तेव्हा ते एक सोडून द्या. पण हा महान सूर्य माथ्यावर आला की 'बाये मुड' करून सरळ पूर्वेला मावळतो. आपल्या सूर्यासारखे पूर्वेकडून पश्चिमेला मार्गक्रमण करत नाही. त्यामुळे हा सूर्य आपला वाटत नाही."

"चला रामभाऊ, आता इथे थांबायचं काम नाही. आपण आता टाकोटाक मायविश्वी परतूया."

असा एका विश्वातून दुज्या विश्वाला चालला चालला आमचा हा तांडा.

हे रामभाऊ इकडे आल्यामुळे ते रामभाऊ साहजिकच तिकडे पोहोचले.

घरी परत येऊन गरमा गरम कोबी-पोह्यांवर ताव मारताना रामभाऊ झालेला सर्व प्रकार विसरून गेले. चहा पिताना त्यांना एकदम आठवण झाली, "अरे बापरे, आज तारीख किती? मला आज डॉक्टरांची अपॉइंटमेंट होती. जायला पाहिजे. नाहीतर त्या द्वाड रिसेप्शनिस्टची बकबक ऐकावी लागेल. पक्की, पक्कीचे बाबा आणि वैनी, छान झाला प्रोग्रॅम. पुन्हा असे पोहे केले तर मात्र मला बोलवायला विसरू नका. पुढच्या वेळी मी माझ्या नव्या "तेहेतिसावा खून" या पुस्तकाची प्रत भेट द्यायाला घेऊन येईन."

दुसऱ्या दिवशी डॉक्टरकाकांचा फोन आला. आपला पेशंट नॉर्मल झाला अशी बातमी त्यांनी दिली. आपली ट्रँक्विलायझरची ट्रिटमेंट यशस्वी झाली ह्याचा त्यांना अभिमान वाटला. "गंमत म्हणजे ह्या पेशंटला झाला प्रकार अजिबात आठवत नाही. तो म्हणतो की मला कुठे काय झालं होतं? आहे की नाही गंमत! ज्याचं करावं भलं ... जाऊ द्या झालं. मी आता 'इंडिअन जर्नल ऑफ सायकॉलॉजीकल मेडिसिन'मध्ये शोध निबंध प्रकाशित करायचा विचार करतो आहे. आणि हो, तुमची फी तुमच्या खात्यात जमा केली आहे."

बाबांच्या कानाला ते शेवटचं वाक्य खूप भावलं.

---

ह्या कथेच्या लघुरुपाची श्राव्य फाईल इथे आहे

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

Intersting कल्पना

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लहानपणी ben10 नावाची एक मालिका कार्टून नेटवर्क लागायची. त्यात असलेला एक पात्र प्रोफेसर paradox सुद्धा हीच थेअरी सांगायचा आणि multiple time + dimensions मध्ये प्रवास करायचा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुणाचा गैर समज होऊ नये म्हणून
समांतर विश्व ही कल्पना मांडून Everett या शास्त्रज्ञाला 1957 साली पी एच डी पदवी प्राप्त झाली.
क़्वान्टम फिजिक्सचा अर्थ काय ? याबद्दल पाच -सहा शास्त्रज्ञांंनी आपापली मते मांडली आहेत. त्यांत हे एक मत आहे.
जिज्ञासूूंंनी https://www.anthropic-principle.com/preprints/manyworlds.html इथे अवश्य भेट द्यावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गमतीशीर कल्पना आणि कथा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बरीच वाक्यं आणि शब्द वाचून फुटलो.

काही वेळा ते टीव्ही दुरुस्त करतात, तर कधी वॉशिंग मशीन, कधी फ्रीज, कधी मोबाइल, कधी मेनफ्रेम

पक्कीचे बाबा खरंच हिरो आहेत.

अमेझॉनची जादू बघ. इकडे आपण आपल्याला पाहिजे त्या गोष्टीचं नाव आपल्या संगणकावर लिहितो आणि बटण दाबतो. तिकडे लगेच आपल्या दारावरची घंटी वाजते. अलादिनच्या जिनपेक्षा वेगाने कुरिअर आपले पॅकेट घेऊन हजर! तिकडे आर. बी. आय.चा गव्हर्नर लेखणीच्या एका फटकाऱ्याने सरकारच्या खात्यात कोट्यावधी रुपये टाकतो. एक रुपयाची मेणबत्ती! ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी ट्रान्समिट करते! काडेपेटीतील प्रत्येक काडी इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्समीटर असते! अशी असते जादू पक्की.

हे भारी होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा आवडली !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलाही ते पहिले रामभाऊ भेटले होते. त्यांनी एकच प्रश्न विचारला, " पांडव किती ?"
मीही आत्मविश्वासाने, दोन बोटे नाचवत उत्तर दिले," बाजेच्या खुराइतके तीन. "
रामभाऊ खुश हुआ!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थात, अलीकडच्या पिढीला ठाऊक नसेल कदाचित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडली. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

swati