एस्पेरांतोः सोपी, साधी परंतु अस्तंगत होत असलेली जागतिक भाषा

आपल्यातील बहुतेक एस्पेरांतो हे नाव प्रथमच ऐकत असतील. कदाचित ही भाषा ओळखणारे वा बोलणारे आपल्यापैकी कुणीही नसतील. परंतु एस्पेरांतो ही एक जागतिक भाषा आहे व त्याचा जन्म 130 वर्षापूर्वी झाला.

सामान्यपणे भाषेचा उगम अत्यंत पुरातन काळी झालेला असतो. कुठल्याही भाषेचे नेमके वयही नीटपणे सांगता येत नाही. लोक पिढ्यान पिढ्या त्या भाषेचा वापर करत असल्यामुळे ती भाषा जिवंत राहते. परंतु काही कारणामुळे भाषेचा वापर न झाल्यास वा भाषा पुढच्या पिढीपर्यंत नेणारे नसल्यास ती भाषा हळू हळू मृतवत पावते. काळाच्या पोटात अशा अनेक भाषा गायब झाल्या आहेत व त्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या भानगडीतही कुणी पडत नाही.

परंतु आधुनिक काळात प्रयत्नपूर्वकपणे एखाद्या भाषेला जन्म देणे ही एक अत्यंत दुर्मिळ व चमत्कारिक गोष्ट असू शकेल. विश्वास ठेवा अगर ठेऊ नका, असा एक प्रयत्न 1887 साली डॉ.लुड्विग झामेन्हॉफ यानी केला व एस्पेरांतो या जागतिक संपर्क भाषेला जन्म दिला.

आपल्या देशाप्रमाणे युरोपखंडात अनेक भाषा शेकडो वर्षे प्रचलित आहेत. केवळ भाषा वेगळी या कारणास्तव युरोपचे तुकडे पडलेले आहेत. भाषेच्यामुळे प्रादेशिकतेला लोकाधिष्ठान मिळत गेले. दंगली झाल्या. युद्धं पेटल्या. माणसं मेली. तरीसुद्धा आपली भाषा कशी श्रेष्ठ आहे व त्या तुलनेने इतर भाषिक किती असंस्कृत वा गावढळ आहेत, यासंबंधी वक्तव्ये करून आपली पोळी भाजून घेणाऱ्यांची कमतरता नाही.

लुड्विग झामेन्हॉफ याला युरोपियन युद्धांचा काळ्याकुट्ट इतिहासाची माहिती होती. व संबंध (युरोपभर) जगभर एकच जागतिक भाषा असल्यास सर्व प्रश्न चुटकेसरशी सुटतील या भाबड्या आशेने प्रेरित होऊन प्रत्येक युरोपियन भाषेतील चांगले चांगले अंश घेऊन त्यानी एस्पेरांतो भाषा तयार केली. झामेन्हॉफच्या या तथाकथित जागतिक भाषेची त्याच्या काळात भरपूर टर उडवली. तरीसुद्धा न डगमगता त्याने या भाषेच्या विकासासाठी मरेपर्यंत प्रयत्न केले.

एस्पेरांतोप्रमाणे गेली शेकडो वर्षे कुणी ना कुणी तरी नवीन भाषेला जन्म घालण्याचे प्रयत्न केले आहेत. लोज्बान ही भाषा तर्कशास्त्र समजून घेण्यासाठी, लाडान ही भाषा स्त्रीमुक्ती चळवळीला पूरक म्हणून जन्माला आल्या. क्लिंगॉन, एल्विश, डोथ्राकी, नावी यासारख्या काही भाषा केवळ मनोरंजनासाठी काही काळ प्रचारात आल्या व गेल्यासुद्धा. एस्पेरांतोच्या जनकाप्रमाणे त्यांच्यातही प्रचंड उत्साह होता.

एस्पेरांतोला कितीही जागतिक भाषा म्हणत असले तरी त्या कल्पनेपासून ती शेकडो कोस लांब आहे. तरीसुद्धा इतर शोधलेल्या भाषांच्या तुलनेत एस्पेरांतो सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. एस्पेरांतो विकिपिडियात, 186000 लेख आहेत. व ही संख्या हिंदी वा हिब्रूभाषिकापेक्षा नक्कीच जास्त आहे. या भाषेचा नियमित वापर करणाऱ्यांची संख्या 87000 आहे. यातील अनेक जालावर गप्पा मारत असतात, वर्षाकाठी स्नेह संमेलनं भरवतात, शिबिरांचे आयोजन करत असतात, मैत्रीचा हात पुढे करत असतात (वा प्रेमातही पडत असतात). जगभर पसरलेले हे भाषिक आतिथ्यशील असतात. पास्पोर्टा सर्वो या एस्पेरांतो भाषिकांना सेवा पुरवणार्‍या संस्थेच्या मते 90 देशात पसरलेले हे भाषिक एकमेकांच्या घरी अतिथी म्हणून फुकट राहू शकतात. अरिका ओक्रेंट या लेखिकेनी याविषयी In the Land of Invented Languages हे पुस्तक लिहिले आहे. व यात एस्पेरांतो भाषिकांचा गौरव करण्यात आला आहे.

एस्पेरांतोच्या यशामागे त्या भाषेचा सोपेपणा सर्वांना भावतो, हे एक मुख्य कारण आहे. झामेन्हॉफला या भाषेचा जगभर प्रसार होण्यासाठी सोपी भाषा असणे ही अट पूर्ण करावीशी वाटली. या भाषेतील शब्दांचा संग्रह युरोपियन भाषेतून घेतलेला आहे. त्याच्या व्याकरणात अजिबात क्लिष्टता नाही. शब्दांच्या शेवटचे अक्षर -o असल्यास नाम, -a असल्यास विशेषण, -e असल्यास क्रियाविशेषण व -j असल्यास बहुवचन. अशाप्रकारचे केवळ 16 नियमांनी बंदिस्त केलेल्या भाषेत नवीन शब्द आणण्यास अडचण भासत नाही. जालावर ही भाषा शिकविणारे अनेक अनुभवी विना मोबदला उत्साहाने पुढे येतात. भाषा शिकण्यासाठी उत्तेजन देतात. एका सर्वेक्षणानुसार हजारेक जण ही भाषा अस्खलितपणे बोलू शकतात. ध्येयवादी व आदर्शवादी असलेल्या कुटुंबातील पाल्यांना जन्मापासून या भाषेचा परिचय असल्यामुळे मुलं मोठी झाल्यावर ही भाषा शिकण्याकडे त्यांचा कल वाढतो.

तरीसुद्धा ही भाषा जागतिक भाषा होऊ शकत नाही, हेही तितकेच खरे. याचे एक साधे, सोपे कारण म्हणजे याचा जन्म अगदी अलिकडचा आहे. या भाषेच्या पेक्षा कित्येक संघ - संस्था भरपूर जुन्या आहेत. परंतु ही भाषा तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर प्रयत्न व अजून शेकडो पिढ्या जाव्या लागतील. परंतु आजतरी ही भाषा अपरिचित आहे. मुळात कुठलीही भाषा संपर्क भाषा असल्यास लाखो लोकापर्यंत पोचते, वाढते. जास्तीत जास्त लोक भाषा बोलायला लागले की ती भाषा त्यांना आवडू लागते. व त्यामुळे त्यात बोलणार्‍यांची आणखी भर पडते. हाच विचार डोळ्यासमोर ठेऊन एस्पेरांतोचे समर्थक प्रयत्न करत असतात. व जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करत असतात.

परंतु भाषेचा विकास केवळ किती मोठ्या संख्येने ती भाषा बोलली जाते यावर सर्वस्वी अवलंबून नसते. मानवी संस्कृतीची ओळख व जीवन जगण्यासाठी उभारी भाषा देत असते. त्यातच एस्पेरांतो मागे पडत आहे. त्याचप्रमाणे भाषेचा वापर फक्त संस्कृतीच्या परिचयासाठी नसतो. भाषेचा उपयोग नोकरी, व्यवसाय, प्रवास, खाणे - पिणे, खेळ, मनोरंजन, साहित्य, कलास्वाद यासाठीसुद्धा होत असतो. यात ही भाषा मागे पडते.

एस्पेरांतो शिकण्यासाठी केवळ संस्कृती नव्हे तर आंतरराष्ट्रीय बंधुभाव जोपासण्याची प्रेरणा असावी लागते. मग त्यातून फ्रेंच फूड, इटॅलियन फॅशन, ब्राझिलियन संगीत, स्पॅनिश नाइटलाइफ, अमेरिकन रॉक अँड रोल, जपानीज फिल्म्स, भारतीय अध्यात्म .... यांची मजा अनुभवता येते.

कदाचित काही नावाजलेले वलयांकित सेलिब्रिटीज ही भाषा बोलू लागल्यास त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होईल. सेलिब्रिटीजच्या पार्टीमध्ये हीच भाषा बोलत असल्यास नवागतालासुद्धा ही भाषा शिकाविशी वाटेल. परंतु तशी स्थिती आता नाही. प्रसिद्ध एस्पेरांतो भाषिक याबद्दल गूगलवर शोध घेतल्यास, लॉर्ड ऑफ रिंग्सचे लेखक, जे आर आर टॉल्किन यांचा सन्माननीय अपवाद वगळता, एकाही प्रसिद्ध व्यक्तीचे नाव त्या यादीत सापडणार नाही.

ज्याप्रकारे जागतिक भाषा म्हणून इंग्रजीची घोडदौड चालू आहे त्याप्रकारे एस्पेरांतोचा विकास कधीच होऊ शकणार नाही, हे आपल्याला मान्य करावे लागेल!

संदर्भ: Economist, 26 Sept 2013

धाग्याचा प्रकार निवडा: : 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

भाषेतील उणिवा हेच मानवी विसंवादाचे मुख्य आणि जवळजवळ द ओन्ली कारण आहे अशी माझी एक दृढ ( आणि इतरांच्या मते मूर्खपणाची) धारणा (अजून एकाही माणसाने याचा पाठपुरावा केला तर 'विचारसरणी') आहे. आदर्श भाषेच्या शोधात एस्परांतोबद्दल २००० सालाच्या आसपास काही वाचन केले होते. परंतु, it is more of a community than a language, म्हणून भ्रमनिरास झाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लेख भारीच रोचक आहे. त्यात काही भर घालण्याची माझी लायकी नाही.
एक अवांतर पृच्छा तेवढी - पद्मजा फाटकांनी त्यांच्या 'आवजो'मध्ये या आंतरराष्ट्रीय पाहुणचार योजनेचा उल्लेख केला आहे ती हीच का? एका आंतरराष्ट्रीय भाषेत तिचं नाव 'सर्व्हास' (अर्थः वी सर्व्ह) असं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
अतिअवांतरः 'आवजो' हे अतिशय रोचक पुस्तक आहे. जालीय विश्व सुपरिचित होण्याआधी काही वर्षं सर्वसामान्य अमेरिकन आयुष्याबद्दलच्या माझ्या ज्ञानात या पुस्तकानं मोलाची भर घातली होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

एका आंतरराष्ट्रीय भाषेत तिचं नाव 'सर्व्हास' (अर्थः वी सर्व्ह) असं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

हो का? अरे वा!

आम्ही आंतरराष्ट्रीयबिंतरराष्ट्रीय नसल्याकारणाने, आम्हांस फक्त 'सर्व्हेसा' (अर्थः बियर. स्प्यानिशमध्ये.) तेवढी ठाऊक! आमची मजल तिथवरच. चालायचेच!

================================================================================================

आमचे येथे श्रीकृपेकरून सूर्य ईष्टकोष्टावर उगवतो नि वेष्टकोष्टावर मावळतो. झालेच तर उत्तरेस क्यानडा नि दक्षिणेस मेक्सिको अशी फारेन, एलियन वगैरे मंडळी असतात म्हणून ऐकून आहोत बॉ. पण तेवढेच. विश्वसीमा त्यापलीकडे संपते.

कर्टसी: आमचे येथे टनावारी सापडणारे मेक्सिकन्स.

तरी बरे, आम्ही व्यक्तिशः बियरचे फारसे शौकीन नाही. बियरच्या वाटेस फारसे जात नाही. (आम्ही बरे, की आमची रक्तवारुणी बरी.) असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रयत्नपूर्वक नियम बनवून शोधलेल्या भाषा ही रोचक गोष्ट आहे.
एस्पारांतो शोधण्या मागचा उद्देश फक्त भाबडाच म्हणता येइल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एस्पेरांतो शिकण्यासाठी केवळ संस्कृती नव्हे तर आंतरराष्ट्रीय बंधुभाव जोपासण्याची प्रेरणा असावी लागते. मग त्यातून फ्रेंच फूड, इटॅलियन फॅशन, ब्राझिलियन संगीत, स्पॅनिश नाइटलाइफ, अमेरिकन रॉक अँड रोल, जपानीज फिल्म्स, भारतीय अध्यात्म .... यांची मजा अनुभवता येते.

मध्यंतरी काही महिन्यांपूर्वी सहज गंमत म्हणून प्यारिसला दोनतीन दिवस सहकुटुंब चक्कर मारून आलो.</जाहिरात> भरपूर हिंडलो (बहुतकरून स्थानिक झुकझुकगाडीतून, क्वचित ट्याक्षीतून), पाहिले, मजा केली, फ्रेंच फूड म्हणाल तर गोगलगायी खाल्ल्या, एकदा रात्री उशिरा नेहमीच्या झुकझुकने हाटेलावर परत जात असताना 'इतक्या रात्री झुकझुक तिथपर्यंत जात नाही, अगोदरच संपते' हे शुभवर्तमान कळले, तर अनोळखी ठिकाणी आयत्या वेळी कसेबसे विचारतविचारत बस गाठली, काही विचारू नका. पण जमले बुवा सगळे!

गंमत म्हणजे, माझ्या कुटुंबात कोणालाही फ्रेंच येत नाही.

जाण्यापूर्वी 'तिथे फारसे कोणाला इंग्रजी कळत नाही'पासून ते 'तिथल्या लोकांना इंग्रजीचा राग असतो; कळत असली, तरी उत्तरे देत नाहीत'पर्यंत काहीबाही ऐकले होते. त्यामुळे 'आपले कसे निभावणार' ही चिंता होती. पण आरामात निभावले.

तिथे गेल्यावर एक ट्रिक लक्षात आली. काहीही विचारायचे असले, तरी सर्वप्रथम 'आपल्याला फ्रेंच येत नाही' हा न्यूनगंड आणि 'समोरच्याला इंग्रजी येत नसावे' ही भीती डोक्यातून काढून टाकायची. आणि मग आयुष्यात कोठेही कधीही काही थातुरमातुर फ्रेंच शब्द, काही तोडकीमोडकी प्राथमिक फ्रेंच वाक्ये ऐकलेली असली, तरी त्यांचे पुण्यस्मरण करून बेधडकपणे 'फ्रेंच'मध्ये सुरू व्हायचे. किमानपक्षी, आपण फ्रेंचमध्ये बोलणार आहोत, नि फ्रेंचमध्येच बोलत राहणार आहोत, असा आविर्भाव आणायचा. समोरचा झक मारत 'बाबा रे, तुला काय हवे ते सांगतो, पण फ्रेंच आवर!' म्हणून आपण होऊन इंग्रजीवर उतरतो. (किंवा, त्याला खरोखरच इंग्रजी येत नसेल, तरी शक्य तितका प्रयत्न करतो, नि तरीही नाहीच जमले, तर हातवार्‍यांनी निभावतो, पण ते कळण्यास सहसा पुरेसे असते.) आपल्याला आपला कार्यभाग साधण्याशी मतलब.

तूर्तास माझ्याकडे स्वतःचे खर्च करायला तितके पैसे नाहीत म्हणून, पण बाकी तुम्ही म्हणता ते इटली, नाहीतर ब्राझील, नाहीतर स्पेन नाहीतर जपानला जायला कधी जमले, तरी याच अल्गोरिदमने चालवता येईल, याचा आत्मविश्वास आहे. तर त्याकरिता मुद्दाम एस्पेरांतो शिकायची काय गरज? हे तर मी एस्पेरांतोशिवायही करू शकतो की! नि त्या सर्व ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांना एस्पेरांतो येत असेल, याचा काय भरवसा?

आणि या सर्व ठिकाणी आज मी जाऊ शकत नाही, ते केवळ गाठीशी तितके पैसे नाहीत म्हणून. एस्पेरांतो शिकल्याने अचानक माझ्याजवळ ते पैसे जमा होणार आहेत काय? मग काय फायदा?

(आणि तसेही, या सर्व कल्चरांची मजा मला अनुभवायचीच असेल, तर ती मी अमेरिकेत बसूनही अनुभवू शकतो. एस्पेरांतो न शिकता. पर्वतमुहम्मदन्याय!)

(अतिअवांतर: मी राहतो त्या कॉलनीत, युगोस्लाविया फुटून झालेल्या तुकड्यांपैकी एका तुकड्यातून आलेली एक टुणटुणीत म्हातारी राहते. इंग्रजीचा अजिबात गंध नाही. परंतु 'आपली भाषा आख्ख्या जगाला कळते' अशा थाटात तिच्या भाषेतून कोणाशीही गप्पा मारते. समोरच्याला कळो न कळो. तिला अंदाजाने इंग्रजीतून उत्तर दिल्यास तिला ते समजत नसावे. पण संभाषण होते. बहुधा तिला मी मराठीतून उत्तरे दिली तरी बिघडू नये - एकदा प्रयोग करून पाहायला हवा! बर्‍याचदा उद्योग नसले की एकटीच जवळपासच्या ग्रोसरीच्या दुकानापर्यंत चालून येते. इंग्रजीचा गंध नसताना. कॉन्फिडन्स पाहिजे! बाकी काही नसले तरी विशेष बिघडत नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(अतिअवांतर: मी राहतो त्या कॉलनीत, युगोस्लाविया फुटून झालेल्या तुकड्यांपैकी एका तुकड्यातून आलेली एक टुणटुणीत म्हातारी राहते. इंग्रजीचा अजिबात गंध नाही. परंतु 'आपली भाषा आख्ख्या जगाला कळते' अशा थाटात तिच्या भाषेतून कोणाशीही गप्पा मारते. समोरच्याला कळो न कळो. तिला अंदाजाने इंग्रजीतून उत्तर दिल्यास तिला ते समजत नसावे. पण संभाषण होते. बहुधा तिला मी मराठीतून उत्तरे दिली तरी बिघडू नये - एकदा प्रयोग करून पाहायला हवा! बर्‍याचदा उद्योग नसले की एकटीच जवळपासच्या ग्रोसरीच्या दुकानापर्यंत चालून येते. इंग्रजीचा गंध नसताना. कॉन्फिडन्स पाहिजे! बाकी काही नसले तरी विशेष बिघडत नाही.)

अतिअतिअवांतर : यावरून हे आठवले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नेमके!

यावरून आणखी एक उदाहरण आठवले. पण ते शब्दांत वर्णन करणे अंमळ कठीण आहे / दृश्यात जी मजा आहे, ती शब्दांत नाही (आणि दृश्य येथे डकविण्यास बहुधा उपलब्ध नाही), म्हणून 'समझने वाले को इशारा काफ़ी'चा न्याय तूर्तास (जमल्यास) वापरून पाहू.

'अ‍ॅस्टेरिक्स'शी परिचित आहात काय? 'अ‍ॅस्टेरिक्स अँड द ग्रेट क्रॉसिंग' वाचले आहेत काय?
========================================================================================
ताजा कलमः

'दृश्य' सापडले.

बहुधा कोणीतरी (प्रताधिकाराचा भंग करून) स्क्यान करून आंतरजालावर चढवलेली पीडीएफ आवृत्ती दिसते, पण तूर्तास खपवून घेऊ. (दुवा.)

पीडीएफमधील क्रमांक ३३ ते ३४ची पृष्ठे (छापील पृष्ठ क्रमांक ३६ ते ३७) पाहावीत. (संपूर्ण संदर्भ हवा असल्यास आख्खे पुस्तक वाचावे. प्रताधिकारभंग करणे नसल्यास पुस्तक विकत घेऊन वाचावे. तसे केल्यास आम्हांस आनंदच आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अ‍ॅस्टेरिक्स द गॉल नामक प्रकरणाशी परिचित आहे खरा. अ‍ॅस्टेरिक्स अँड ओबेलिक्स ही द्वयी त्या गॉलिश खेड्याचे रोमनांना दरवेळी गंडवून रक्षण कसे करते इ. थोडेफार माहितीये, पण तो एपिसोड काही पाहिला नाही. पीडीएफ पाहिली, अगदी तस्सेच आहे. ती अक्षरांवरची चित्रविचित्र चिन्हे पहावयास मजा आली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तो हंटिंगसीझेन आणि डॉगम्याटिक्सचा (भूभूमंडळींचा) संवाद पाहिलात का? (आणि अ‍ॅस्टेरिक्स-ओबेलिक्सद्वय आणि व्हायकिंगमंडळींमधील 'संवाद'प्रयत्नाशी त्याचा कॉण्ट्राष्ट?)

(अतिअतिअवांतर: धागालेखकास प्रश्न: भूभूमंडळींना लागते का हो तुमची 'एस्पेरांतो'?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येस! पाहिला. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

यावरून आठवले:
मागे एकदा चेन्नैत रिक्षाचालकाशी भाव करण्याची वेळ आली (अर्थात त्यात नवे काहीच नाही). त्याने थेट (बहुदा) तमिळमध्ये बोलायला सुरवात केली. मी स्थानिक नाही हे त्याला कळतेय हे उघड होते. तरीही तमिळचा हेका सोडेना तेव्हा मग मी त्याच्याशी मराठीत बोलु लागलो. एखाद-दोन वाक्यांनंतरच तो हिंदीवर उतरला व आम्ही घेतल्या जाणार्‍या रिक्षा दराबद्दल एक 'इन्फॉर्म्ड डिसिजन' Wink घेतला

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कॉलेज शिक्षण झाल्यावर मी एस्पेरांतो शिकण्याचा प्रयत्न केला होता. मला आठवतयं की त्याचे ऑफिस कलकत्ता किंवा पुण्याला होते. तिथे पत्र पाठवून पुस्तक मागवले. तेव्हा दादरला १ गृहस्थ राहायचे, ज्यांना एस्पेरांतो बोलता येत असे, तिथे मी ३-४ वेळा जाऊन आलो. (खूपसे शब्द 'ओ'ने संपायचे, मला बोंगाली शिकतोय की काय असं वाटायचं). पण मराठी/इंग्रजी => एस्पेरांतो => मराठी असं translation करण्यातच माझा जास्त वेळ जायचा. मनात आलं, जर भाषेचा मूळ उद्देश माझे विचार तुमच्यापर्यंत पोचवणे हा आहे, तर हा इतका खटाटोप का?

शिवाय तेव्हा माझ्याशी एस्पेरांतो बोलायला अजून कोणी न्हवते. एस्पेरांतोचा मला आयुष्यात काही उपयोग होईल का, अशी शंका आली. त्यामुळे मी चक्क प्रोग्रामींगची भाषा शिकायला लागलो. (याचा अजून १ फायदा म्हणजे चूक झाली की कॉम्प्यूटर लगेच चूक झाली आहे, हे सांगायचा पण). छोटेछोटे प्रोग्राम लिहून ते चालले, की अजून थोडा उत्साह पण यायचा.

हौस म्हणून भाषा शिकण्याचा प्रयत्न करून झाला, त्यातून भलतेच शिकलो. (पण ज्याचा मला आनंद मिळाला). माझे स्पष्ट मत आहे की भाषेचा मूळ उद्देश म्ह्णजे इतरांबरोबर विचारांची देवाणघेवाण (communication with others). वरती 'न'वी बाजू यांनी सांगितलंच आहे की त्यासाठी विशिष्ट भाषा दोघांना यायलाच हवी असं काही नाही. दुसरं म्हणजे आयुष्यात पुढे त्या भाषेचा काय उपयोग आहे का? त्यामुळे यापुढे शिकायचेच झाले, तर मी स्पॅनिश किंवा चायनीज शिकेन; संस्कृत किंवा एस्पेरांतो नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0