मानसोपचारतज्ञाकडे जाण्यापूर्वी - २

मानसोपचारतज्ञाकडे जाण्यापूर्वी - १

एक विशितला मुलगा माझ्याकडे येतो. त्याला शाळकरी वयापासून ओसीडी आहे. गेली दहा वर्ष तो उपचार घेतो आहे. त्याच्या औषधांचा डोस आता कमीतकमी झालेला आहे, लक्षणं कमी झालेली आहेत, सायकोथेरपीने त्याचे इश्यूज ताब्यात येत आहेत. आता तो अशा स्थितीत आहे की पूर्वी ज्या गोष्टींमुळे त्याला ओसीडीचा त्रास होत असे, आता तेच ट्रिगर्स मिळाले तरी ओसीडीची लक्षणं दिसत नाहीत. त्याची औषधही पुढे लवकरच बंद होतील आणि समुपदेशनाची वारंवारिताही कमी झालेली आहे. कदाचित हे सगळंच पूर्णतः बंद करूनही त्याला त्रास होत नाही असं दिसलं तर तो पूर्णपणे बरा झाला असं म्हणता येईल. या सगळ्याची आठवणच होणार नाही असं नाही, पण लक्षणं दिसलीच तर त्याला तो स्वतः तोंड देऊ शकेल.

हे सगळं सायकियाट्रीक आजारांमधे येतं. त्यावर दीर्घ कालावधीसाठी उपचार करावे लागतात. उपचारांमधे औषधं आहेत आणि समुपदेशन-थेरपी आहे. त्यांना स्वतः स्वतःवर काम करावं लागतं. यात उतारचढाव येतात आणि उतार आले की मग कधी रुग्णाची "जाऊ दे ना, याचा काही उपयोगच नाहीये" अशा प्रकारची धरसोडवृत्ती होते. याची दुसरी बाजू अशी की मुळात व्यक्तिमत्त्व, विकारच असा असतो की काहीही झालं तरी अर्धा पेला रिकामाच दिसतो; कसलेही फायदे दिसतच नाहीत. दिसले तरी धोके त्यापेक्षा कितीतरी मोठे आहेत असं मानण्याची वृत्ती होते. किंवा अस्वस्थता असते तेव्हा "अरे बापरे आता काय होईल" अशी किंवा मागे काहीतरी झालेलं होतं त्याची भीती लागून रहाते.

इतर काही व्यक्तिमत्त्वाशी संबंधित विकार, म्हणजे आत्मरत व्यक्तिमत्त्व (narcissistic personality), कंपल्सिव्ह व्यक्तिमत्त्व, टोकाच्या विचारसरणीची आणि वर्तणुकीची पद्धत असणारी व्यक्तिमत्त्व, यात असामाजिक (antisocial) आणि काठावरचे (boderline) असे दोन्ही प्रकार येतात, या विकारांमधे व्यक्तीचा सहभाग फार महत्त्वाचा असतो. त्यांच्या सहभागाशिवाय त्यांना काहीच शिकवता येत नाही. त्यांची वरवरची लक्षणं, टँट्रम्स इ. काही प्रमाणात औषधांमुळे ताब्यात आणता येतं. पण सहकार्य, सहभागाशिवाय पूर्ण इलाज होणं कठीण आहे. यांच्यापैकी बर्‍याचशा लोकांची तक्रार "मला इतरांमुळे (कुटुंबीय, समाजव्यवस्था) त्रास होतोय. त्यांना बदला म्हणजे मी आपोआप बदलेन. मला सांगू नका" अशा प्रकारची असते. वेगवेगळ्या प्रकारच्या नात्यांमधे हाच प्रकार दिसतो, नवरा-बायको, सासू-सून, मुलं-पालक, इ. या लोकांना पूर्णतः डावलूनही चालत नाही. त्यांची तशी मनःस्थितीही नसते. "बाहेरची परिस्थिती बदलणं आपल्या हातात नाही, पण स्वतःचा दृष्टीकोन(approach) बदलण्याचं शस्त्र आपण सहज वापरू शकतो. आपण ते करून पाहू. आणि मग बाकीचे बदलतील का ते पाहू", असं त्यांना सांगावं लागतं. ही मानसिक तयारी करून देणं हे समुपदेशकाचं कसब.

प्रश्न: ज्या व्यक्तीला प्रत्यक्षात उपचारांची आवश्यकता असते, त्यांच्या कुटुंबियांसाठी काही सल्ला द्याल का? हे 'वेगळं' काही आहे ते तज्ञाकडे नेण्याइतपत गंभीर आहे का हे ओळखण्यासाठी काही चाचणी?

उत्तरः जेव्हा माणूस सातत्याने नेहेमीपेक्षा वेगळा वागतोय, एखादवेळा नाही, त्यामुळे त्या व्यक्तीला मानसिक, शारीरिक आणि सामाजिक संबंधातही त्रास होतोय, चिडचिड होते आहे, कशात रस दाखवत नाहीये, नातेसंबंध बिघडत आहेत, त्यांच्या वागण्यामुळे इतरांना त्रास होतोय, अशा गोष्टी सातत्याने होत असतील तर तज्ञाकडे जाणं इष्ट. आत्मरत, ओसीडीच्या/OCPD च्या रुग्णांना स्वतःला त्रास होत नाही, कारण त्यांना आपलं तेच खरं वाटत असतं. झालाच तर इतर का बदलत नाहीत, आपलं ऐकत का नाहीत याचा त्रास होतो. त्यामुळे जबरदस्ती करणं, राग येणं असं होतं. मुख्य त्रास इतरांना, कुटुंबियांना होतो. तसं होत असेल तर हे सांगून सवरून बदलत नाहीये तर मग तज्ञाची गरज आहे. सरळ सांगून ही व्यक्ती येईलच असं नाही. मग त्यांना सांगताना, आत्ता जे काही होतंय, त्याचा सगळ्यांना त्रास होतोय. व्यक्तिला दोष देण्यापेक्षा परिस्थितीकडे बोट दाखवावं. आपण प्रयत्न केले पण आपल्याच्याने हे सुधारत नाहिये, आता अजून काही करता येईल का यासाठी मानसोपचार तज्ञाकडे जाऊ. असं सांगता येतं. अशा वेळेस रुग्ण "हे लोक आपलं ऐकत नाही निदान तज्ञ, डॉक्टरचं तरी ऐकतील" म्हणून येतात. हे बरेचदा होतं, विशेषतः व्यक्तिमत्त्वाशी संबंधित विकारांमधे हे होतं. रुग्णाचं मत "तुम्हालाच मानसोपचाराची गरज आहे" असं असतं. अशा वेळेस "तू तुझ्या तक्रारी सांगायला डॉक्टरकडे चल" असं रुग्णाला सांगता येतं.

थोडक्यात खिन्नता, राग, अस्थिरता वरचेवर होत असेल, त्यांच्यावर ताबा ठेवणं कठीण जात असेल, आणि त्यामुळे मानसिक बदल होत आहेत, कार्यपद्धतीमुळे नुकसान होतंय हे दिसत असेल; कळतंय पण वळतही नाही किंवा कळतच नाहीये असं असेल आणि हे सगळं काही आठवडे, महिने होतंय तर तज्ञाकडून मानसोपचार/औषधोपचाराची गरज आहे.

प्रश्न: अशा व्यक्तींच्या बरोबर रहाणार्‍या लोकांना याचा त्रास होऊन काही प्रमाणात खिन्नता इ. यांचा त्रास होऊ शकतो का? या ही लोकांना समुपदेशकाकडे जाणं योग्य का? या संबंधात तुमचा अनुभव काय?

उत्तर: बरेचदा असं दिसतं की जी व्यक्ती समुपदेशनाला येतेय तिच्यात फरक दिसला की कुटुंबीय विचार करतात, "त्याला फायदा झाला तर मलाही होईल". कुटुंबात एकाला त्रास होतो तेव्हा इतर लोकांनाही ते भोगावं लागतंच. लक्षणं दिसतात तेव्हा नक्की काय करायचं हे त्यांना माहित नसतं. आणि याचा परिणाम म्हणून त्यांच्याही वागण्यात खिन्नता, राग, वैताग, घृणा असंही होतं. काही विकार असणारे रुग्ण घरात शिव्या देणं, संशय घेणं असं करतात. उदाहरणार्थ सायकोसिस झालेला असताना रुग्ण, माझ्या नवर्‍याचे त्याच्या बहिणीशी संबंध आहेत अशा प्रकारचे काहीच्याकाही आरोप करतात. हे शब्द फारच सौम्य वाटावेत अशा शब्दांमधेही आरोप केले जातात. याचा मानसिक त्रास होतो, ही व्यक्ती असं का म्हणत्ये हे समजत नाही.

अल्झायमर्स किंवा डीमेन्शिया झालेल्या व्यक्तीचं विचित्र वागणं, न सांगता गायब होणं, तीच तीच गोष्ट पुन्हा सांगणं, विचारणं यांचाही त्रास होतो. अशा वेळेला हे सगळं काय, कसं, prognosis काय, कुटुंबियांनी स्वतःचं मनःस्वास्थ्य कसं राखावं, याची माहिती आणि शिक्षण कुटुंबियांना मिळू शकतं. व्यक्तिमत्त्व विकार जेव्हा मुलांना झालेले असतात तेव्हा पालक स्वतःला दोषी मानतात. नैराश्य, अस्थस्वता येते. या लोकांना औषधोपचार आणि समुपदेशन या दोन्हीची आवश्यकता असते.

प्रश्नः रुग्णाच्या कुटुंबियांशी बोलणं महत्त्वाचं आहे का?

उत्तर: निश्चितच. रुग्णाच्या सपोर्टींग रोलमधल्या व्यक्तीशी बोलणं होतंच . चार वेळा रुग्णाशी बोलून झालं की साधारण एकदा जाणत्या कुटुंबियांशी बोलणं होतं. शक्यतो रुग्ण पहिल्यांदा येतात तेव्हा घरचेही असावेत असं मी सुचवते. बरेचसे लोकही हेच सुचवतात. त्यातून परिस्थितीबद्दल सगळ्या बाजूंनी माहिती मिळवता येते. रुग्ण स्वतःचा परिप्रेक्ष्यच देणार, पण इतरांकडून त्यांचं वेगळं परिप्रेक्ष्य मिळतं. त्यातून प्रत्यक्षात काय घडत असेल याचा अंदाज करता येतो. व्यक्ती एक सांगते आहे आणि कुटुंबीय मिळून त्याच धर्तीचं काही सांगतात तेव्हा ही प्रत्यक्ष घटनाच आहे आणि त्याचा अन्वयार्थ नाही (किंवा उलट) असं सांगता येतं. दुसरं असं की कुटुंबीयांशी बोलून रुग्णाची प्रगती किती झाली आहे याची कल्पना येतो. समुपदेशन तासभर सुरू असतं, त्यात रुग्णाला पुढच्या वेळेपर्यंत काही गृहपाठ दिलेला असतो. हा गृहपाठ म्हणजे विचारसरणी कशी बदलावी, वागण्यात काय बदल करावा अशा प्रकारचा असतो. हा गृहपाठ केला आहे का, त्याचा कुटुंबीयांवर काय परिणाम झालेला आहे हे या लोकांकडून समजतं. रुग्ण जे सांगतो आहे ते खरोखर केलं आहे का हे समजतं. समजा कोणाला दारूचं व्यसन असेल आणि त्याला सांगितलं की पुढचे पंधरा दिवस एक ठराविक गोष्ट करायची आणि ही व्यक्ती पंधरा दिवसांनी, हे सगळं व्यवस्थित केलं, असं सांगते. पण बायको-मुलांनी किंवा कुटुंबीयांनी याच्या उलट सांगितलं, म्हणजे "आम्ही रोज आठवण करून देत होतो, पण त्यांनी पंधरा दिवसात चारदाच केलं", असं सांगितलं. तर मग पुढे कसं बोलायचं हे समजतं. "तुम्ही म्हणताय की तुम्ही पंधरा दिवस केलं म्हणजे तुमची करायची इच्छा होती हे तर दिसतंय. पण मग प्रत्यक्षात काय अडचण आली करताना? ती अडचण सोडवायला आपण ही एक युक्ती करू या", असं काही बोलावं लागतं. त्यामुळे कुटुंबीयांशी बोलणं या बाबतीत महत्त्वाचं आहे.

अगदीच कुटुंबीय या बाबतीत मदत करणारे नाहीत किंवा रुग्णाला कुटुंबीयांबद्दल संशयच आहे तर मात्र त्यांना उपचारांमधे सामील करून घेतलं जात नाही किंवा काही काळ टाळलं जातं. एकट्या माणसाच्या बाबतीत कुटुंबीय घेता येत नाहीत, पण मग मित्रमंडळाचा विचार करता येतो. ज्या लोकांचा रुग्णावर काही प्रभाव आहे अशा लोकांना यात सामील करून घेतलं जातं. काही काही वेळेला कोणीच नसतो. म्हणजे एखादी बाई आहे आणि तिच्या नवर्‍याला पटतच नाही की हिच्या मानसिक आरोग्यविषयक काही अडचणी आहेत. तिला आई-वडलांना सांगायचं नाहीये, सासरचं कोणी आहे, ते लोकं फक्त नवर्‍याचंच मानतात तर मग ती बाई एकटीच येईल. मग जे आहे त्यावरच पुढे जावं लागतं. पुढे मागे कदाचित काही मतपरिवर्तन होतं मग कोणी नातेवाईक येतो. पण सामान्यतः कुटुंबीयांचा सहभाग महत्त्वाचा आहेच.

दुसरं कारण असं की समुपदेशन पंधरा दिवसातून एखाद तास असतं, पण कुटुंबीयांशी संपर्क दिवसाचे अनेक तास होतो. वातावरणातून त्यांना योग्य पाठींबा आणि संदेश मिळत गेले तर उपचारांचा अधिक चांगला परिणाम होतो.

प्रश्नः व्यसनाधीनतेबद्दल काही स्त्रियांची नवर्‍याबद्दल मानसिकता अशी असते की "ह्यांना माझी गरज आहे". एकप्रकारे नवर्‍याची आई बनून या नवर्‍यालाच पाठीशी घालतात आणि व्यसनांनाच एक प्रकारे पाठींबा देतात. लांबून बघून एखाद्या जोडप्याची अशी अडचण दिसत असेल तर आपण काय करावं?

उत्तरः प्रत्यक्ष रुग्णाला या अडचणी, विकारांची जबाबदारी मान्य नसते. "You can take the horse to water, but you can't force it to drink." अशा व्यक्तिला, म्हणजे बायकोला वेगवेगळ्या पद्धतीने ही माहिती देणं, मानसिक आधार म्हणजे "हे असं करून तू त्याचं नुकसान करते आहेस असं मला वाटतं", असं करता येतं. पण यात उपदेश केल्याची भूमिका "मला हे सगळं माहित्ये, तू हे ऐक", आणू नये. अनेकदा ही उपदेश केल्याची भूमिका घेतली जाते त्याचा फायदा होत नाही. त्यापेक्षा आपल्याला वाटणार्‍या सहानुभूती, आपुलकीने "मला असं वाटतंय, तू विचार करून बघ" असं सुचवावं. आपल्या हाताबाहेरच्या गोष्टी करायला जाण्यात हशील नाही.

एखाद्या स्त्रीचा अब्यूज होतो आहे, मार खायला लागतोय, नवरा पैसे काढून घेतोय; पण त्या बाईला असंच वाटत असेल की माझा नवरा चांगलाच आहे; तर मग आपण किती वेळा हेच सांगणार यालाही मर्यादा आहे. अशा वेळेस "जेव्हा तुला गरज वाटेल तेव्हा तू ये" असं सांगू शकतो. असं काही चुकीचं होताना दिसतं तेव्हा प्रत्येक वेळेस सामाजिक कार्यकर्ता बनून आपण वागू शकत नाही. आपल्याला वाटतं गरज आहे, पण त्याच व्यक्तीला असं वाटत नाही तर मग आपण जबरदस्ती करू शकत नाही. काही देशांमधे अशा सोयी आहेत की शेजारपाजार्‍यांनी अशी माहिती दिली तर तिथले सामाजिक कार्यकर्ते मदत करू शकतात; असं अप्रत्यक्ष 'इंटरव्हेंशन' करू शकतात. पण भारतात अशी तरतूद नाही. माणूस दारू पिऊन दंगा करत असेल पोलिसांमधे जाऊ शकतो, पण अन्यथा नाही.

एखादा स्किझोफ्रेनियाने ग्रासलेला रूग्ण एकाकी, गचाळ परिस्थितीत, मदतीशिवाय समजा रहातो आहे तर अशा परिस्थितीत इंटरव्हेंशन होणं भारतातही शक्य आहे. अशा माणसाला institutionalise केलं जाईल. तिथे जे काही उपचार होतील ते होतील. पण आत्ता आपण जे बोलतो आहोत त्या प्रकारचे इंटरव्हेंशन भारतात होण्याची शक्यता कमी आहे, कारण इथे कुटुंबात ठेऊनच उपचार करण्याकडे कल असतो. ही समाजधारण, सांस्कृतिक घडण आहे. पण पाश्चिमात्य देशही आपल्या "घरातून होणार्‍या मदतीचे" फायदे पडताळून पाहू लागले आहेत. त्यावर संशोधनही करत आहेत. पुन्हा अगदी टोकाच्या परिस्थितीत काही रुग्णांना भारतातही तात्पुरते किंवा कायमचं institutionalise केलं जाऊ शकतं; प्रामुख्याने त्यांची काळजी घ्यायला कोणी नसेल किंवा इतरांना/रुग्णाला इजा होण्याची शक्यता असेल तेव्हा!
एका ठराविक मर्यादेपलिकडे कुटुंबीयांच्या बाबतीतही करायचं का नाही याचा निर्णय घेतला जावा. स्किझोफ्रेनिया, व्यसनाधीनता या बाबतीत असं होऊ शकतं. कुटुंबातल्या काही लोकांना पुढाकार घेऊन, डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार सुरू करून देणं महत्त्वाचं आहे. काही काळ, ४-६ आठवडे गेल्यानंतर रुग्ण अशा परिस्थितीत येतो की औषधोपचारांना विरोध करणार नाहीत. पण कुटुंबीयांना स्वतःला हे समजत नसेल तरी बाहेरच्या लोकांना मर्यादा ओलांडता येत नाही. अशा प्रकारचा एक अनुभवही मला आहे.

एका व्यक्तीचे लग्नबाह्य संबंध आहेत. हा माणूस दुसर्‍या एका बाईबरोबर रहात होता. घरी बायको, मुलं, सासू-सासरे वगैरे. त्याच्या बायकोने आधी हे मान्य करण्याचं नाकारलंच; पण मग पुढे तिला टोकाचं नैराश्य आलं. तिला वाटायला लागलं की मुलंही माझ्या हातची गेली. आधी तिचं म्हणणं होतं, "त्याला यातून सोडवा. मग सगळं ठीक होईल." पण तो नवरा त्याच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल ठाम होता. त्यांचं लग्न मर्जीविरोधात, लहान वयात झालं होतं. दोघांमधे कंपॅटीबिलिटीही नव्हती. पण दोघांनीही घटस्फोटाचा विचार केला नव्हता. तेव्हा तिला मी सुचवलं, "तो तिसर्‍या स्त्रीसोबतच रहाणार. आता तुला काय वाटतं?" माझा हे शोधण्याचा प्रयत्न सुरू होता की हिला वेगळं व्हायचं आहे का? पण तिचा असा काही विचारच नव्हता. तिने बर्‍याच कष्टाने ठरवलं असेल की तिला हे असंच ठेवायचं आहे, तिला असंच रहायचं आहे. हे मला व्यक्तिगत पातळीवर पटत नाही, पण माझे विचार मी तिच्यावर लादू शकत नाही. मग मी फक्त एवढंच करू शकते की या परिस्थितीमुळे तिला काय काय अडचणींना तोंड द्यावं लागेल आणि याला तोंड कसं देता येईल, त्याची तिला कल्पना देणे.

जे काही चांगलं-वाईट असतं ते आपल्या परिप्रेक्ष्यातून असतं. जी काही असतात ती मतंच असतात. अशा परिस्थितीत योग्य-अयोग्य काय याचा ठाम निर्णय नक्की कसा घ्यायचा?

प्रश्नः नवरा-बायकोत जे बेबनाव होतात त्याचा काय अनुभव आहे?

उत्तर: या अडचणी अशाच असतात असं नाही. मी जिथे काम करते तो बहुतांश शहरी आणि थोडा निमशहरी भाग आहे. काही क्वचित प्रसंगी दिसतं की बायकांकडून पारंपरिक अपेक्षाच असतात, त्यावरून भांडणं होतात असे लोक येतात. पण माझ्या कार्यक्षेत्रात पारंपरिक जेंडर रोल्स खूप घट्ट (rigid)आहेतच असं दिसत नाही. काही अडचणीत आणणारे gender role issues/ प्रथा काही प्रमाणात जरूर दिसतात. प्रामुख्याने, नवरा आणि बायको (किंवा त्यातले कोणी एक) फक्त स्वतःच्या बाजूने विचार करत असल्यामुळे आणि आपल्या भावना आणि हट्ट कमी करायला तयार नसल्यामुळे समस्या विकोपाला जातात.
पण या सगळ्यात कधीकधी टोकाच्या स्त्रीवादी किंवा स्त्रीद्वेष्टी भूमिकाही दिसते. जेव्हा स्त्रिया एखादी समस्या घेऊन येतात, तेव्हा त्यांची लग्नानंतरची तक्रार "मीच का सांभाळून घ्यावं?" अशी असते. तेव्हा मग त्यांना विचारावं लागतं, नोकरी बदलल्यानंतर नव्या नोकरीतल्या नव्या नियमांप्रमाणे तू स्वतःमधे बदल करून घेत नाहीस का? तिथे अशी तक्रार करतेस का? बहुतांशी लोक या प्रश्नांना, "होय, जुळवून घेते", असं उत्तर देतात. आणि का तर मग तिथे खूप वेळ नसतो, घरी मात्र असं नसतं. ही कारणं वरवरची आहेत. खरं कारण असतं ते कामाच्या ठिकाणी किंमत भावनिक पद्धतीने मोजली जात नाही; आपण किती उत्पादक आहोत तेवढंच पाहिलं जातं. पण घरी प्रत्येक गोष्टीचा अर्थ आपली किंमत नाही असा काढला जातो. इगो बेस्ड भांडणं होताना दिसतात.

आपल्या समाजात बरेच ठिकाणी बायकांनी स्वयंपाकघरातच दिसावं असं दिसत नाही. पुरुष घरात मदत करताना दिसतात. लिंगसमानता ही उथळपणे बघण्यासारखी गोष्ट नाही. बाईने अर्धा तास स्वयंपाकघरात घालवला तर पुरुषानेही तेवढा वेळ स्वयंपाकाचं काम केलंच पाहिजे, हा तो उथळपणा. मला असं वाटतं, यापेक्षा स्त्री-पुरुष शरीररचना ही परस्परपूरक अशी आहे. एकत्र काम केलं तर दोघांचाही, अधिक फायदा होईल. एकटं रहाणार्‍या लोकांना हा फायदा मिळत नाही, पण एकत्र रहाण्याचं ठरवल्यानंतर हा फायदा जोडप्याला होतो. त्याशिवाय प्रत्येकाकडे काही विवक्षित गुण असतात. त्याचा स्त्री-पुरुष असण्याशी, लिंगभावाशी काहीच संबंध नसतो. अशा वेळेला ज्याला जे चांगलं जमतं ते त्याने केलं. बाजारहाट करणं हे बाईचंच काम, ऑर्गनायझेशन हे पुरुषाचंच काम अशा प्रकारची सर्वसाधारण गृहितकं मानण्यापेक्षा व्यक्तीला काय चांगलं जमतं हे पहाण्याचा जास्त फायदा होतो.

मला आता असं दिसतंय, काही प्रमाणात काळजी वाटते आहे ती अशी की लग्नाच्या सुरूवातीच्या काळात, पहिल्या वर्षातच, खूप भांडणं, गैरसमज असतात. आपण काय आहे, आपली भूमिका काय याचा काहीही विचार नसतो. फक्त इगोच महत्त्वाचा वाटतो आणि डोक्यात घटस्फोटच असतो. ही भांडणं सोडवण्यासारखी असतात असा विचारच नसतो. घटस्फोट घेण्याला प्रागतिक विचारसरणी समजण्याची चूक होते. एका प्रकारे घटस्फोट घेणं प्रागतिक विचारच आहे. जर दोघांचं जमतच नसेल तर जोरजबरदस्तीने एकत्र रहाण्यापेक्षा घटस्फोट घेणंच योग्य. पण तरूण जोडपी दुसर्‍या टोकाला जात आहेत असं वाटतं.

लग्नाआधीची ओळख असेल तरीही लग्नानंतर भूमिका बदलतात. प्रेमिक म्हणून असणार्‍या ग्रह, अपेक्षा आणि आभास यांच्यापेक्षा एकत्र रहाणार्‍या जोडप्यांमधल्या अपेक्षा बदलतात. हा बदल होतो आहे हे मान्य झालं नाही तर भांडणं होतात. कोणत्याही नातेसंबंधांमधे, परस्परांसंबंधींच्या भूमिकांमधे सतत बदल होत रहातात. ते समजून घेतले नाहीत की गैरसमज निर्माण होतात.

प्रश्नः या प्रश्नांव्यतिरिक्त तुम्हाला अजून काही वेगळं सांगायचं आहे का?

उत्तर: मानसिक आरोग्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी, कोणत्याही वेगवेगळ्या परिस्थितीमधे जेवढ्या लवकर लक्षणं अंगावर फार काळ न काढता तज्ञाकडे जाणं चांगलं. उत्तम मानसिक आरोग्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची. खुला दृष्टीकोन खूप आरोग्यासाठी उपयुक्त आहे; आपण आपल्या कल्पनांना घट्ट चिकटून बसणं चांगलं नाही. वाचन, स्वतःला अद्ययावत ठेवणं महत्त्वाचं; पण स्वतःच स्वतःच्या रोगाची चिकीत्सा करू नये.

विशेषतः मुलांच्या बाबतीत पालकांना एक सुचवावंसं वाटतं की दुसर्‍या टोकाला जाऊ नका. मुलांसंदर्भात सर्वसाधारण तक्रारी असतात, किंवा मुलं स्वतःच्या कुवतीएवढे परिणाम दाखवत नाहीत. यामागे काही वस्तुनिष्ठ विचार करावा लागतो हे बहुतांश पालकांना माहितच नसतं. मानसोपचार करून या मुलाचं काहीतरी कल्याण होईल अशी पालकांची अपेक्षा असते. पण बहुतांश मुलांना याची काहीही गरज नसते आणि मुलांवर मात्र उगाच दडपण येतं. "बरं असतं ना एकदा समुपदेशकाकडे नेलेलं", ही अशी एकदा देवळात डोकं टेकवून आणण्यासारखी पालकांची भूमिका असते. किंवा आम्ही किती प्रागतिक हे दाखवण्यासाठीही पालक एकदा मानसोपचारतज्ञाची भेट घेतात.

लहान मुलांचे खरोखरच काही प्रॉब्लेम्स असतात, स्वमग्नता (austism), attention deficit hyperactivity disorder (ADHD), obsessive compulsive disorder (OCD), व्यक्तिमत्त्व विकारांची सुरूवात, लर्निंग डिसेबिलिटीज दिसतात. हे वेळेत समजलं नाही तर अतोनात मानसिक त्रास होतो. मुलांमधे काही वेगळं दिसत असेल. जी अगदी बॉर्डरलाईन आयक्यूची मुलं दिसत असतील तरीही मुलांची एकदा तपासणी करून घ्यावी. नाहीतर मुलांना रागावणं, मारणं किंवा "आता काय फायदा आहे" या विचारांनी सोडून देणं असं होतं. यात लवकर उपचार सुरू करण्याचा फायदा या मुलांना मिळत नाही.

"बरे होणे" ह्याची नक्की व्याख्या काय हे आपण डॉक्टर किंवा समुपदेशकाकडून समजून घेतली पाहिजे. काही आजार असे असतात की जन्मभर औषधं घेऊनच ते आटोक्यात ठेवणं शक्य असतं. पण ते नाही केलं तर फारच नुकसान आणि त्रास होतो. तसंच औषधांच्या दुष्परिणामाच्या (side effects) भीतीनेही काही वेळा टाळंटाळ होते. त्याचे फार गंभीर परिणाम होतात. त्यापेक्षा मनातल्या शंका मोकळेपणाने डॉक्टरांना विचाराव्यात. काही वेळा काही महिने किंवा वर्षं औषधं आणि समुपदेशन घेऊन समस्या पूर्णपणे जाऊ शकते. ते काय आणि कसे करावे ते तज्ञांच्या मदतीनेच ठरवावे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (4 votes)

प्रतिक्रिया

अतिशय उत्तम माहिती आहे. सदर मुलाखत इथे देण्याबद्दल आभार!
सुलभाताईंना मराठी येत असल्यास त्यांना इथे अधिक लेखनासाठी आमंत्रित करावे असे सुचवतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Smile धन्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खुप उत्तम माहिती... अनेक धन्यवाद अदिती इथे शेअर केल्याबद्दल. आणि ऋषिकेश ह्यांच्या विनंतीला माझाही दुजोरा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला ही आवडेल लिहायला Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दोन्ही लेख अतिशय उपयुक्त. माहितीबद्दल आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

Smile थॅन्क्स

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अदिती खूप छान मुलाखत. काही मूलभूत शंकांचं निरसन झालं.

अवांतरः
मला 'एक दिन अचानक' हा चित्रपट आठवला. त्यात एक वरवर सर्वसामान्य घरातला रिटायर झालेला प्रोफेसर अचानक एक दिवस काहीतरी आणायला जातो असे म्हणून नेहमीसारखा बाहेर पडतो तो घरी परततच नाही. त्याची तीन तरूण मुले आणि बायको यांची विचित्र मनःस्थिती आणि तो निघून जाण्याला आपणच कारणीभूत झालो ही त्यांच्यातली अपराधी भावना एकीकडे...आणि दुसर्‍याबाजूला आपल्या वडिलांनी असे निघून जाऊन केलेला 'अपमान'. या चित्रपटात घरातल्यांमध्येच आपापसात असलेला विसंवाद अधोरेखित झाला आहे. आपल्या नकळत आपण आपल्या घरतल्यांना समजून घेण्यात काही चूक करतो आहोत का असा विचार करायला लावणारा चित्रपट आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान सिनेमा.. अनेक पदर असतात अशा गोष्टीन्ना

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अ‍ॅम्बिग्युअस लॉस असे ह्या अवस्थेला म्हणतात .. म्हणजे काय अन कसे किती हरवले आहे.. किती काळासाठी.. परत येणार्/मिळणार का ह्या मुळे होणारे प्रॉब्लेम्स..फार गहन विषय आहे.
त्यावर १ यु एस ए मधे रिसर्च करुन लिहिलेले पुस्तक आहे, जे सुनन्दा अमरापुरकरार्न्नी अनुवादित केले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अधिक काही, generic प्रश्न, शंका असतील तर जरूर विचाराव्यात. (माझ्या डोक्यात एवढेच प्रश्न आले.) काही विशिष्ट प्रश्न विचारायचे असतील, जाहीर मंचावर मांडायचे नसतील तर त्यांचा इमेल पत्ता: suls02(अ‍ॅट)hotmail(डॉट)com

सुलभाताईंना मराठी टंकनाबद्दल थोडी शंका आहे, पण त्यांनी रोमनाईज्ड मराठीमधे लिहावं असं सुचवलं आहे. (लिप्यंतर मागाहून करता येईलच)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सायकियाट्रिस्ट, सायकॉलॉजिस्ट, समुपदेशक हेच भविष्यातील बाबा बुवा महाराज असतील असे भाकीत मी केव्हाच वर्तवले आहे. मी हे उपहासाने म्हणत नाही. पण शरीर जसे आजारी पडते तसे मनही आजारी पडतेच ना? शरीर व मन याचा घनिष्ट संबंध आहे याविषयी कुणाचे दुमत वाटत नाही. या निमित्त मला माझा अनुभव शेअर करावासा वाटतो. तीन वर्षापुर्वी म्हणजे २०१० मधे मी आयबीएस या विकारावर मानसोपचाराचा सल्ला वा उपचार यासाठी पुण्यातील लक्ष्मी रोडवरील ज्येष्ट व नामवंत मानसोपचार तज्ञाकडे गेलो. त्यांना माझे आरोग्य टिपण दिले. तसे ते मला ओळखत होते. माझे ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी....प्रश्नोत्तरातून सुसंवाद हे पुस्तक त्यांनी वाचले होते व मला पत्र लिहून कौतुकाचा अभिप्रायही त्यावेळी दिला होता. माझा अंनिसतील सहभाग त्यांना माहित होता. त्यांनी ते टिपण वाचले. ठीक आहे दोन दिवसांनी या म्हणाले. एकूण कालावधी ५ मिनिटे. फी ८००/- दिली व बाहेर पडलो. दोन दिवसांनी गेलो. टिपणावर चर्चा केली.आहार विहारावर जरा बोलले. पोटाचे डॉक्टरांनी दिलेल्या औषधावर हसू येते म्हणाले. मी तुम्हाला आयबीएस वर कुठलेही औषध देणार नाही कारण त्यावर तसे औषध नाही. विचार व भावना यावर मी काही सांगेन तसे करा. श्रद्धा ठेवा मग ती कशावरही असो. सरेंडर व्हा दुसरा इलाज नाही. ( मनात मी विचार केला मी काही गुन्हा केला आहे का?) आयबीएस वर एक डायरी तयार करा आहार विहाराची मग मला भेटायला या. हे सगळ पटत असेल तर या नाहीतर येउ नका असे कठोरपणे सांगितले. इंटरनेटच्या नादी लागू नका असेही सांगितले. एकूण त्यांनी १२ ते १५ मिनिटे दिली. ५००/- फी घेतली. नंतर काही गेलो नाही त्यांच्याकडे.श्रद्धा म्हणजे काय वस्तू आहे काय ठेवायला?आणी परत माझ्यासारख्याला सांगताहेत. यांनाच मानसोपचाराची गरज दिसते आहे. हात टेकले म्हणुनच तुमच्याकडे आलो ना! हे आपल मनातल्या मनात.
पुढे काही दिवसांनी बाहेर असताना अचानक डोके मुंग्या आल्यासारखे बधीर झाले. कसाबसा गाडीवरुन घरी पोहोचलो.डॉक्टरांनी तपासले त्यांना काही आढळले नाही. इतरही चाचण्या झाल्या नॉर्मल होत्या. मग सायकियाट्रिस्ट कडे जाण्याचा सल्ला दिला. मग दुसर्‍या एका जेष्ठ सायकियाट्रिस्ट कडे पूना हॉस्पिटलला गेलो. तेही पुण्यातील नामवंत. त्यांना पहिल्या सायकियाट्रिस्टचा अनुभव सांगितला. मग सायकोमेट्री टेस्ट साठी सह्याद्रि हॉस्पिटलला पाठवल. ओसीपीडी व एंग्झायटी असा संशय चिठ्ठीत लिहिला होता. ती टेस्टही मजेशीर होती. इंकब्लॉट ची काही आकार होते त्या काय चित्र दिसते? बाकी काही वर्तनाबाबत प्रश्न होते नात्यांबाबत होते, प्रसंगांबाबत होते. मी प्रामाणिक पणे उत्तरे लिहिली. रिपोर्ट घेउन डॉक्टरांकडे परत आलो.
मग मी या त्रासात शारिरिक भाग किती व मानसिक किती असा प्रश्न विचारला. त्यांचा अप्रोच हा मेडिकेशनवरच होता. पण अगोदरचे सायकियाट्रिस्ट ही त्यांच्या जागी बरोबरच आहेत हे सांगितले. काही काळाने मुंग्या नाहीश्या होत आल्या. नंतर औषधे मात्र त्यांनी चालू ठेवली. पुढे मला बिहेव्हियर थेरपी बाबत सायकॉलोजिस्टकडे जाण्यास सुचवले. मी जरा टाळाटाळ केली पण अंनिसतल्याच माझ्या एका सायकॉलॉजिस्ट मित्राने आयबीएस साठी तू सीबीटी ( कॉग्निटिव बिहेवियर थेरपी ) चे सहाय्य घे असे सुचवल्या मुळे मी शेवटी सायकॉलॉजिस्ट कडे गेलो एकदाचा. विचार, भावना, मनाचे व्यायाम, माईंड डायव्हरटींग टेक्निक्स, श्वसनाचे व्यायाम शिवाय आहार विहार वगैरे तारतम्याची पथ्थे चालू आहेत. त्यांनाच परवा हे भाकित सांगितले. पहिल्या सायकियाट्रिस्टची आठवण येते असे सांगितले. एकुणात मी निवळत व बदलत चालल्याचे मान्य केले. ऐसी वर अल्पसंख्यांकांचे प्रश्न मधे चिडचिड लिहीली होतीच असो टंकाळा आला. पुन्हा लिहिन त्या त्या निमित्ताने

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

खूप माहितीपुर्ण लेख.
माझे काही प्रश्न आहेत
१. मनोविकारांचे प्रकार, त्यांची कारणे (शारीरीक/लैँगिक/मानसीक), लक्षणे, उपाय असे काही वर्गिकरण/तक्ता आहे का?
२. मनोविकार हेरीडेटरी असू शकतात का? कोणते प्रकार?
३. बालकांचे मानसीक आरोग्य/ठेवण नक्की कोणत्या वयात चालु होते?
४. चाइल्ड अब्युजमुळे मनावर झालेले आघात/परीणाम पुर्णपणे बरे होउ शकतात? की त्यांच्यासोबतच राहावे लागते पण तरीही पॉझिटीव दृष्टीकोन आणु शकतो?
५. काही दिवसांपुर्वीच वाचलं की पुण्यात १४% मनोरुग्ण आहेत. punemirror.in/article/2/2013071020130710083750403c09fa686/Mental-health-issues-on-the-rise-in-city.html हा विदा कसा जमा केलाय?
६. शहरीकरणाने मनोरुग्णात भर पडते आहे का?
७. विद्यार्थी, आयटीवाले यांच्या आत्महत्या, व्यवसायात नुकसान झालं म्हणुन पुर्ण कुटुंब खून/आत्महत्या असल्या केसेस खरंच वाढल्या आहेत का? की फक्त त्यांचं रिर्पोटिँग वाढलय?
८. इतर देशांत अब्युजीँग पालकांपासुन मुलांना दुर करता येत. तसा काही कायदा भारतात आहे का? नसेल तर त्यासाठी काही प्रयत्न चालु आहेत का?
९. इतरांना अपाय करणारे मनोरुग्ण कळु शकतात तर मानसोपचार घेणारा एसटी ड्रायवर माने नोकरीत कसा काय राहीला? त्याच्यावर उपचार करणार्या बुरटेंना लक्षात आलं नाही का की हा धोकादायक ठरु शकतो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी ह्या सगळ्या प्रश्नान्ची जमेल तितकी आणि तशी उत्तरे द्यायचा प्रयत्न करेन. थोदा वेळ लागेल.. मला सवय नाही देवनागरी टायपिन्ग ची Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सॉरी बराच वेळ लागला. पण मी फार कामात होते आणी भाषान्तराला हि नीट करणे आवश्यक होते.

१. मनोविकारांचे प्रकार, त्यांची कारणे (शारीरिक/लैंगिक/मानसीक), लक्षणे, उपाय असे काही वर्गीकरण/तक्ता आहे का?
होय. मनोविकारांसंदर्भात विशिष्ट निकष आणि संबंधित माहितीचे मानदंड (standards) DSM (Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders) या नावाने प्रकाशित होतं. सध्याचं पाच क्रमांकाचा प्रचलित आहे, पण चौथाही वारंवार वापरला जातो. याचा उपयोग बहुतांशी psychiatrists आणि मानसोपचार-समुपदेशक करतात.

२. मनोविकार अनुवांशिक असू शकतात का? कोणते प्रकार?

इतर प्रकारचे जनुकीय विकार आणि शारीरिक व्याधींप्रमाणेच, अनुवांशिकता असल्यास मानसिक विकाराला बळी पडण्याची शक्यता वाढते. म्हणजे, कुटुंबातल्या व्यक्तीला मानसिक विकार असतील तर कुटुंबातल्या इतरांचं मानसिक अनारोग्य दिसण्याची शक्यता तणाव वाढल्यामुळे जास्त असते. शिवाय पालकांना जर अशी व्याधी असेल तर हे प्रमाण वाढतं. या विकारांचा आवाका (chronic and acute illnesses, personality disorders etc) पहाता या प्रश्नाचं थोडक्यात समर्पक उत्तर देणं कठीण आहे. अधिक शंका असल्यास मानसोपचारतज्ञ (psychiatrist) आणि/किंवा जनुकीय समुपदेशकांकडून अधिक माहिती मिळू शकेल.

३. बालकांचे मानसिक आरोग्य/ठेवण नक्की कोणत्या वयात चालू होते?

वातावरणाचा परिणाम मुलांवर अगदी जन्माच्या आधीपासूनच (conception) सुरू होतो; जन्मानंतर तो वाढतो. मुलांना कसं वाढवलं जातं, उदा: शिक्षण, बोलणं, समजावणं, मुलांच्या वर्तनावर प्रतिक्रिया, अगदी जन्मापासूनच बालकांबरोबरचं पालक आणि इतरांचं वर्तन याचा परिणाम बालकांच्या मानसिक आरोग्यावर होतो. मुलांचं संगोपन कशाप्रकारे होतं याशिवाय जनुकीय, अनुवांशिक घटक आणि अनुभवांमधून होणारं जडणघडण यांचाही मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो. तसंच, कुटुंबीय आणि बालकांचा सहयोग असेल तर तापदायक/उपचारविरोधी (contraindicatory) लक्षणांवर गरज असेल तिथे नियमितपणे काम करता येतं. अडचणी दिसल्यावर लवकर उपचार (intervention) केल्यास होणारी हानी कमी करता येते आणि विकाराची वाढ आटोक्यात आणता येते. (पण हे सगळं मूल उपचार, समुपदेशनाला किती प्रतिसाद देतं त्यावर अवलंबून असतं.)

४. चाईल्ड अब्युजमुळे मनावर झालेले आघात/परिणाम पूर्णपणे बरे होऊ शकतात? की त्यांच्यासोबतच राहावे लागते पण तरीही सकारात्मक दृष्टीकोन आणू शकतो?

होय! अशा प्रकारच्या आघातांची आठवण पूर्णपणे पुसून काढणं अशक्य आहे, पण अशा व्यक्तीसोबत त्यावर काम करून त्याचा परिणाम, ट्रॉमा कमी करू शकतो. यात 'बरं होणं' शक्य आहे. हे रुग्णाची इच्छाशक्ती आणि आंतरिक शक्ती, जवळच्या लोकांकडून (कुटुंबीय, मित्रपरिवार) मिळणारा मानसिक आधार, शिवाय समुपदेशकाचं कौशल्य आणि रुग्ण-समुपदेशक यांच्या परस्परसंबंधांवर अवलंबून असतं. ही चटकन बरी होणारी गोष्ट नव्हे!कधी कधी अब्यूज करणार्‍या व्यक्तीपासून दूर रहाणं पूर्णपणे शक्य नसतं. तरीसुद्धा अब्यूज्ड व्यक्तीला आपण सक्षम करू शकतो की त्या त्रास देणार्‍या व्यक्तीला सामोरे जाऊन जाऊन देखील वाईट परिणाम होऊ नये; coping चांगलं व्हावं. तसंच आत्मविश्वासाने आणि सडेतोपडणे नाही म्हणायला शिकून अब्यूज्ड व्यक्ती आपले आयुष्य चांगले जगू शकतात. इथे अब्यूज म्हणजे शारीरिक, मानसिक आणि/किंवा लैंगिक छळ/शोषण असा अर्थ आहे.

खरंतर, बरेचदा आंतरिक शक्ती निर्माण करून रुग्णाला स्वतःच्या भावना आणि वर्तन नियंत्रित करण्यासाठी करता अशा प्रकारच्या हानीचा वापर करून घेता येतो. तरीही स्वतःमधल्या या शक्तीचा उपयोग करून घेण्यासाठी माणसांना अशा प्रकारच्या वाईट अनुभवांना सामोरं जावं लागतं हे दुर्दैवी आहे.

५. काही दिवसांपूर्वीच TOI मधे वाचलं की पुण्यात १५ ते २०% मनोरुग्ण आहेत. हा विदा कसा जमा केलाय?

कल्पना नाही. साधारणतः असे आकडे सर्व्हे करून आणि आरोग्य विभागाच्या सांख्यिकीशी पडताळून घेतात. बरेचदा हे आकडे मर्यादित लोकांकडून, उदा: एखादं रुग्णालय किंवा डॉक्टरचं क्लिनिक किंवा अन्य रिपोर्ट्समधून मीडीयातले लोक मिळवतात, आणि ते अतिरंजित असू शकतात. अशा विदेचा अधिकृतपणा तपासून घेतला पाहिजे.

६. शहरीकरणाने मनोरुग्णात भर पडते आहे का?

हे शक्य आहे. औद्योगिकीकरण आणि शहरीकरणाचा ताण निर्माण होण्यात निश्चितच हातभार असतो, पण इतर कारणं वगळता फक्त याच कारणांमुळे मानसिक विकार होण्याची शक्यता वाढता नाही. सरसकट विधानं करण्याआधी याचा चहूबाजूंनी अभ्यास करणं आवश्यक आहे. तसंही (टीव्ही, इंटरनेट आणि छापील) माध्यमांमधून या विषयाबद्दल जनतेची जागृकता आणि आकलन वाढल्यामुळे अधिक प्रमाणात वेगळ्या वर्तनाची नोंद घेतली जाते आहे. "दैव" किंवा "पछाडलेलं असणं" असं म्हणण्यापेक्षा जास्त लोकांचा कल उपचार घेण्याकडे वळत आहे. याचा अर्थ, मानसिक विकारांच्या टक्केवारीत वाढ, असाही एकांगी स्वरूपाने लावला जाऊ शकतो.

७. विद्यार्थी, आयटीवाले यांच्या आत्महत्या, व्यवसायात नुकसान झालं म्हणून पूर्ण कुटुंब खून/आत्महत्या असल्या केसेस खरंच वाढल्या आहेत का? की फक्त त्यांचं रिर्पोटिंग वाढलय?

मागच्या प्रश्नाचं उत्तर इथेही लागू आहेच.
त्याशिवाय, वेगाने होणारे आयुष्यमानातले बदल, स्वतः आणि इतरांकडून असणार्‍या वाढीव अपेक्षा, तणावाबद्दल कमी सहनशीलता आणि क्षणार्धात समाधान (immediate gratification) मिळण्याची गरज / हट्ट यांच्यामुळे छोट्या अडचणी मोठ्या दुर्घटनेसारख्या वाटतात. स्वतःला कड्याच्या टोकावर उभे करणार्‍या लोकांचा दृष्टीकोन धोक्याच्या घंटा दुर्लक्षित करून, ताण आला की 'सगळं किंवा काहीच नाही' किंवा 'आत्ता किंवा कधीच नाही' अशा प्रकारे वाहवत जाण्याचा असतो. विचार करण्याच्या आणि घटनांचे अर्थ लावण्याच्या जखडबंद (लवचिक नसणार्‍या) पद्धतीमधून हे होतं.

शिवाय, अनुकरण करण्याचे प्रकारही दिसतात. विशेषत: आत्महत्या (आणि हिंसेच्याही) बातम्या सतत, अतिशय परिणामकारक आणि चाळवणार्‍या पद्धतीने आदळत रहातात तेव्हा मनाच्या नाजूक अवस्थेत तर्कशुद्ध विचार करणं सोडून निष्कारण धोका पत्करण्याचं वर्तन घडतं. विशेषतः बोर्डाच्या परीक्षांच्या निकालांच्या काळात आत्महत्येच्या प्रयत्नांचं प्रमाण वाढलेलं दिसतं; हीच गोष्ट विदर्भातल्या कर्जबाजारी शेतकर्‍यांची, किंवा मंदीमुळे कंपन्या होतानाची. सामाजिक आणि कौटुंबिक आधार मोडल्यामुळे लोक असे टोकाचे निर्णय घेण्यासाठी बळी पडतात. अशा प्रकारचं प्रमाण वाढण्याची सांख्यिकी मात्र मला माहित नाही.

८. इतर देशांत अब्युजींग पालकांपासून मुलांना दूर करता येतं. तसा काही कायदा भारतात आहे का? नसेल तर त्यासाठी काही प्रयत्न चालू आहेत का?

विशेषतः अडचणीत असणार्‍या मुलांना जपण्याचे, स्पष्टपणे लिहीलेले कायदे आणि कायदेशीर मार्ग भारतात आहेत. पण व्यवस्थित प्रकारची, उदाहरणार्थ अमेरिकेसारखी, सामाजिक सुरक्षितता जपणारी संस्था (social security provision cell), भारतात नाही. टोकाच्या उदाहरणांमधे Juvenile Justice dept (JJD) अडचणीत आलेल्या, धोका असणार्‍या मुलांना (वय १८ वर्षापेक्षा कमी) ताब्यात घेऊन त्यांना observation homes मधे ठेवतं. अर्थात हे सगळं होण्या आधी प्रथम-पर्यायी आणि योग्य 'घर', शिवाय कुटुंबातले किंवा त्याच समाजातले पालक शोधण्याचे प्रयत्न केले जातात. मुलांना ट्रॉमा कमी होण्यासाठी हे गरजेचं आणि जास्त योग्यअसतं. संस्थांमधे भरती करण्यापेक्षा हा मार्ग निश्चितच जास्त चांगला आहे. JJD आणि या क्षेत्रातले सामाजिक कार्यकर्ते लक्षपूर्वक हे काम करताना दिसतात. पण या क्षेत्राबद्दल मी अधिकारवाणीने बोलू शकत नाही. हे सांगितलं ते माझ्या मर्यादित निरीक्षण आणि अनुभवातून!

९. इतरांना अपाय करणारे मनोरुग्ण कळू शकतात तर मानसोपचार घेणारा एस.टी. ड्रायवर माने नोकरीत कसा काय राहिला? त्याच्यावर उपचार करणार्‍या बुरटेंना लक्षात आलं नाही का, की हा धोकादायक ठरू शकतो?

No comments; अपवाद एवढाच की ड्रायव्हर मानेसारखाच विकार असणारे आणि उपचार घेणारे अन्य लोक हिंस्र वर्तन करतीलच असं नाही. चिरपरिचित चित्रपटांमुळे असं नाटकी चित्र तयार झालेलं आहे. अशा गोष्टींना एकापेक्षा अधिक बाजू असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खूप आभार सुलभाताई _/\_
मूळ लेखाप्रमाणेच हा प्रतिसाददेखील खूप माहितीपुर्ण आणि उपयुक्त.
अदितीचेदेखील भाषांतरासाठी आभार _/\_.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्हाला उपयोगी वाटले आणि आवडले; मला छान वाटले. धन्यवाद ! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तम झाली आहे मुलाखत. मी स्वतः IPH चा विद्यार्थी असल्यामुळे सुलभाताईंशी ओळख आहेच. त्यांचे वैवाहिक नात्यांविषयीचे विचार खासकरून आवडले.

पण या सगळ्यात कधीकधी टोकाच्या स्त्रीवादी किंवा स्त्रीद्वेष्टी भूमिकाही दिसते. जेव्हा स्त्रिया एखादी समस्या घेऊन येतात, तेव्हा त्यांची लग्नानंतरची तक्रार "मीच का सांभाळून घ्यावं?" अशी असते. तेव्हा मग त्यांना विचारावं लागतं, नोकरी बदलल्यानंतर नव्या नोकरीतल्या नव्या नियमांप्रमाणे तू स्वतःमधे बदल करून घेत नाहीस का? तिथे अशी तक्रार करतेस का? बहुतांशी लोक या प्रश्नांना, "होय, जुळवून घेते", असं उत्तर देतात. आणि का तर मग तिथे खूप वेळ नसतो, घरी मात्र असं नसतं. ही कारणं वरवरची आहेत. खरं कारण असतं ते कामाच्या ठिकाणी किंमत भावनिक पद्धतीने मोजली जात नाही; आपण किती उत्पादक आहोत तेवढंच पाहिलं जातं. पण घरी प्रत्येक गोष्टीचा अर्थ आपली किंमत नाही असा काढला जातो. इगो बेस्ड भांडणं होताना दिसतात.

आपल्या समाजात बरेच ठिकाणी बायकांनी स्वयंपाकघरातच दिसावं असं दिसत नाही. पुरुष घरात मदत करताना दिसतात. लिंगसमानता ही उथळपणे बघण्यासारखी गोष्ट नाही. बाईने अर्धा तास स्वयंपाकघरात घालवला तर पुरुषानेही तेवढा वेळ स्वयंपाकाचं काम केलंच पाहिजे, हा तो उथळपणा. मला असं वाटतं, यापेक्षा स्त्री-पुरुष शरीररचना ही परस्परपूरक अशी आहे. एकत्र काम केलं तर दोघांचाही, अधिक फायदा होईल. एकटं रहाणार्‍या लोकांना हा फायदा मिळत नाही, पण एकत्र रहाण्याचं ठरवल्यानंतर हा फायदा जोडप्याला होतो. त्याशिवाय प्रत्येकाकडे काही विवक्षित गुण असतात. त्याचा स्त्री-पुरुष असण्याशी, लिंगभावाशी काहीच संबंध नसतो. अशा वेळेला ज्याला जे चांगलं जमतं ते त्याने केलं. बाजारहाट करणं हे बाईचंच काम, ऑर्गनायझेशन हे पुरुषाचंच काम अशा प्रकारची सर्वसाधारण गृहितकं मानण्यापेक्षा व्यक्तीला काय चांगलं जमतं हे पहाण्याचा जास्त फायदा होतो.

मला आता असं दिसतंय, काही प्रमाणात काळजी वाटते आहे ती अशी की लग्नाच्या सुरूवातीच्या काळात, पहिल्या वर्षातच, खूप भांडणं, गैरसमज असतात. आपण काय आहे, आपली भूमिका काय याचा काहीही विचार नसतो. फक्त इगोच महत्त्वाचा वाटतो आणि डोक्यात घटस्फोटच असतो. ही भांडणं सोडवण्यासारखी असतात असा विचारच नसतो. घटस्फोट घेण्याला प्रागतिक विचारसरणी समजण्याची चूक होते. एका प्रकारे घटस्फोट घेणं प्रागतिक विचारच आहे. जर दोघांचं जमतच नसेल तर जोरजबरदस्तीने एकत्र रहाण्यापेक्षा घटस्फोट घेणंच योग्य. पण तरूण जोडपी दुसर्‍या टोकाला जात आहेत असं वाटतं.

नैराश्य (depression) हा खूप सामान्यपणे (common ह्या अर्थाने) आढळणारा मानसिक आजार आहे. त्यात अर्थातच बरेच प्रकार आणि तीव्रता आहे.
http://www.depressionperception.com/depression/depression-facts-and-stat...
त्यात काही counselling ने हाताळता येतात तर काही Psychiatric treatment ने हाताळावे लागतात. हा सर्वसामान्यपणे आढळणारा मानसिक आजार असल्यामुळे ह्याविषयी सविस्तर वाचायला आवडले असते.

जाता-जाता: हा अनुवाद आहे ही छाया मुलाखतीवर जाणवत राहते. परिप्रेक्ष्य (perception?) ऐवजी दृष्टीकोन्/परिस्थितीचे आकलन हे जास्त नैसर्गिक वाटले असते. अर्थात, मुलाखत फारच उत्तम आणि उपयुक्त झाली आहे हे नक्की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> परिप्रेक्ष्य (perception?) ऐवजी दृष्टीकोन्/परिस्थितीचे आकलन हे जास्त नैसर्गिक वाटले असते <<

परिप्रेक्ष्य - हा perspectiveसाठीचा प्रमाण मराठी प्रतिशब्द आहे.
स्रोत - परिभाषा शब्द कोश

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हो, पण हा शब्द खूप 'बोजड' वाटतो त्यामुळे भाषांतर कृत्रिम होते असे मला वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमचं बोलणं झालं ते मराठीच्या मुंबईकडच्या बोलीभाषेत; बहुतांशी मराठी आणि थोडेबहुत इंग्लिश शब्द, वाक्य इत्यादि. जिथे इंग्लिश शब्द फार प्रयत्न न करता बदलता आले ते बदलले. उदा: सकारात्मक/नकारात्मक विचार. बोलताना सहजच positive/ negative विचार असं बोलून जातो. परिप्रेक्ष्य हा शब्द मी ऐकला तेव्हा सुरूवातीला मलाही बोजड वाटला होता खरा. आता वाचून सवय झाली असावी. अजूनही बोलताना तोंडात येत नाही खरा!

या मुलाखतीचं स्वरूप (ग्लॅमरस व्यक्तीच्या वैयक्तिक आवडीनिवडींबद्दल गप्पाटप्पा नसून,) महत्त्वाच्या विषयावर माहिती देणं, एकप्रकारे लेक्चरसारखं, असल्यामुळे पारिभाषिक शब्दांसाठी मुद्दाम सोपे शब्द शोधत बसले नाही. सोपेपणासाठी आमच्या दोघींच्याही तोंडात जसं (केले, बघितले, सांगितले याऐवजी) केलं, बघितलं, सांगितलं असे शब्द आले त्यांचं स्वरूप तसंच ठेवलं. (भाषेच्या या बोली-स्वरूपामुळे गंभीर विषयाचं थिल्लरीकरण झाल्याचा आरोपही कोणी करू शकतो/शकते याची कल्पना आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अगदी बरोबर !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> हो, पण हा शब्द खूप 'बोजड' वाटतो त्यामुळे भाषांतर कृत्रिम होते असे मला वाटते. <<

शक्य आहे, पण कोणत्याही विषयाच्या खोलात जायला लागलं की त्या त्या विषयातले तज्ज्ञ त्यांच्या सवयीचे पारिभाषिक शब्द वापरू लागतात. काहींना ती भाषा बोजड वाटू शकते. पण मग 'वाचायला प्रत्येक वेळी हलकंफुलकंच द्या' असं म्हणणंही त्या भाषेत व्यक्त होत असलेल्या विचारांना कुंपणं घालण्यासारखं आहे, नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

खरे तर मुलाखत मराठीतच झाली.. काहि ठिकाणी इन्ग्रजी शब्द वापरले, ते अदितीने भाषान्तर केले. ते तसे जरा कठिनच असते. Smile
बाकी आभार प्रतिसादासाठी. साइट चान्गली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिती देणारी मुलाखत आहे. "तुला असे कधीपासून वाटते?" हा प्रश्न आम्ही मित्र (सायकोलॉजिस्ट/सायकियाट्रिस्ट यांच्याबद्दल) विनोद म्हणून वापरत असू.(त्याची आठवण झाली.)

माणसाचा मेंदू आणि माणसाचे मन हे अत्यंत गुंतागुंतीचे आहेत. केवळ काही रसायने आणि रासायनिक प्रक्रिया आपले विचार आणि व्यक्तिमत्व बदलू शकतात ही कल्पनाच विलक्षण चमत्कारिक(आणि काही अंशी भयावह) आहे. काही काळापूर्वी निकोटिन सोडताना केवळ पंधराच दिवस वापरलेली 'ब्यूप्रॉन एसार'(Bupron SR) मेंदूवर / विचारांवर जाणवण्याइतका परिणाम करत होती. सध्या 'आर्टीएमएस'नामक उपकरणाबद्दल वाचताना मेंदूवर /मनावर बाह्य प्रेरकांचे परिणाम समजत आहेत. 'शिप ऑफ थेशियस'मध्ये एका मिनिटाकरताच उल्लेख झालेली Ophiocordyceps unilateralis ही बुरशी तर इतर जीवाच्या विचारांचा ताबाही घेऊ शकते आणि त्याला आत्महत्येला प्रवृत्त करू शकते हे वाचून नवल वाटले होते.
मानसिक उपचारांत वापरल्या जाणारया औषधांबद्दल कुतुहल आहे. त्यांच्यावर अवलंबून रहावे लागण्याच्या शक्यतेबद्दल भिती आहे. ही औषधे ड्रग्जसदृश व्यसन निर्माण करू शकतात का?
त्यांचा मेंदूवरचा परिणाम (ताबा?) किती काळ रहातो?

विषय गहन आहे.मानसिक विकार आणि संतुलन यांच्यातली सीमारेषा फारच फिकट आहे. विशेषतः धकाधकीच्या,असुरक्षिततेच्या आणि अस्थिरतेच्या शहरी जीवनात "तुला असे कधीपासून वाटते?" हा प्रश्न स्वतःलाही विचारायला वेळ नाही. त्या दिशेने ही मुलाखत मार्गदर्शक आहे. या विषयावर चर्चा व्हावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुलाखत माहितीपुर्ण आहे.

विषय गहन आहे.मानसिक विकार आणि संतुलन यांच्यातली सीमारेषा फारच फिकट आहे.

विसुनानांशी सहमत.

ह्याविषयावरची माहिती शाळकरी वयापासुन सगळ्यांना असणे गरजेचे वाटते, क्लिनिकल सायकलॉजी असा वेगळा प्रकार अधिक प्रचलीत होण्यापेक्षा मानसिक विकाराच्या मागची कारणे तपासुन त्यावर काम व्हायला हवे.

ह्यानिमित्ताने एक प्रश्न - मानसिक विकारांमागे दडलेल्या सामाजिक/आर्थिक/पारंपारीक कारणांचा विदा/विश्लेषण उपलब्ध आहे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही म्हणता तसे मानसिक आरोग्या बद्दल माहिती लहानपणा पासुन द्यावी, अणि मोठ्यान्नी आचरणाने शिकवावी.
क्लिनीकल सायकॉलोजी रोगन्चे आणि स्वभावातिल दोषान्चे निदान करते. बरेच सन्शोधनही सुरु असते.
विकारान्मागे अनेक फॅक्टर्स असतात..त्या बद्दल महिति पुस्तकान्त किव्वा जर्नल्स मधे मिल्ते..गुगल वर शोधु शकता

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रत्येक व्यक्तीमधे काही ना काही मनोविकार हा काही अंशी असतो. पर्सनॅलिटी डिसऑर्डर देखील अनेकदा आपण पहातो. एखादे व्यक्तिमत्व आवडल नाही वा पटल नाही त्याला पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे असे देखील आपण कॉमेंटत असतो. मनुष्य सदासर्वदा काही शारिरिक वा मानसिक निरोगी राहू शकत नाही. आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर त्याला अनारोग्याशी सामना करावा लागतो.भुतबाधा, करणी, भानामती, अंगात येणे वगैरे बाबी या मनोविकाराशी संबंधीत आहेत हे चळवळीत प्रबोधनाचा भाग म्हणुन सांगितले जातेच. त्याचे विश्लेषणही केले जाते. तुम्ही बाबा बुवा मांत्रिक तांत्रिक यांच्या कडे जाउ नका त्याऐवजी मानसोपचार तज्ञाकडे जा असे आम्ही सांगत असतोच. पण एक प्रश्न आहे कि आज भारतात मानसोपचारतज्ञांची संख्या रुग्णांच्या मानाने फारच कमी आहे. शिवाय त्यांच्या फी देखील सर्वसामान्यांना परवडणारी नाही. मग अशा वेळी तो मांत्रिक तांत्रिक यांचे गावठी मानसोपचार घेतो. कधी बाबा बुवा महाराजांच्या भजनी लागतो. त्याला ते जवळचे वाटतात व तुलनेने परवडतात. औषधे उतारे व आशिर्वाद या डॊ सुधीर कक्कर यांच्या डॉ श्रीकांत जोशींनी केलेल्या मराठी अनुवादात हे सगळे वाचायला मिळाले. डॉ श्रीकांत जोशींचे मनोविकारांचा मागोवा हे पुस्तक तर चळवळीतील प्रत्येक जण क्रमिक पुस्तकासारखे वाचतोच.
मला वाटत हा विषय गहन आहेच पण यात मतमतांतरही बरीच आहेत. अच्युत गोडबोलेंचे मनात या विस्तृत पुस्तकात त्याचा उहापोह आहे. ट्रायल अँड एरर तत्वावर बर्‍याचदा उपचार चालतात.तरी पण मानसशास्त्रीय उपचार आता विकसित होत चालले आहेत. ज्यांना उपचारांची गरज आहे पण जे उपचार घेत नाहीत अशांची संख्या बरीच मोठी आहे. आकडेवारीच्या अकॅडमिक्स मधे मला जायचे नाही. डोळे उघडे ठेवले तर बर्‍याच गोष्टी कळतात. मानसोपचाराची औषधे दीर्घ काळ घ्यावी लागतात यात दीर्घ काळ म्हणजे किती हे गुलदस्त्यात असते. काही लोक असेही म्हणतात हे सायकियाट्रिस्ट आपला 'मीटर' चालू ठेवण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या कह्यात ठेवतात. या भीती पोटी काही लोक सायकियाट्रिस्ट नकोच असे म्हणत शक्य तितके दूर रहाण्याचा प्रयत्न करतात. औषधांच्या दुष्परिणाम देखील होतात पण त्याचे सुपरिणाम अधिक असल्याने दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करावे असेही काही डॉक्टर म्हणतात. या मताशी सहमत नसणारे देखील डॉक्टरच असतात.अर्थात हे काही फक्त मानसोपचारांच्या औषधासाठी नाही.
श्रद्धा अंधश्रद्धा बुवा बाबा हा प्रकार एकूण मानसिक आरोग्यातूनच निर्माण झाला आहे मंगेश पाडगावकरांच्या उदास बोध मध्ये बुवा शक्ती बाबत लिहिलेले पंक्ती बुवाबाजीच्या मानसिकतेचे विश्लेषण करतात.
"माणसे खपाट खंगलेली, आतुन आतुन भंगलेली
अदृष्य्य दहशतीने तंगलेली , आधार नाही
प्रत्येकास येथे हवा, कोणीतरी जबरी बुवा,
जो काढील सार्‍या उवा, मनातल्या चिंतेच्या
आधि म्हणे 'जय साई' मगच अधिकारी लाच खाई
अजुन पकडला गेला नाही,कृपा म्हणे बाबांची
आपण शोधायचे नाही, आपण लढायचे नाही
आपण भिडायचे नाही, आयुष्याला
कणा झिजुन गेला पार, शिरजोरापुढे सर्व लाचार
बुवा नाम जपाचा उच्चार, नशा देई

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

Smile धन्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे एक सांगायचे विसरलोच की. सुलभाताईंची मुलाखत तसेच त्यांचे या व्यासपीठावर येणे अतिशय आवडले. त्यांना धन्यवाद. विक्षिप्त (असली तरी) आदितीचे हे सर्व उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मालिका आणि प्रतिसादांतूनही माहिती मिळाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars