'पैसाअडका' इत्यादि.

’पैसाअडका’ ह्या रोजच्या वापरातील शब्दप्रयोगातील ’अडका’ म्हणजे काय असा विचार मनात आला आणि त्या अनुषंगाने थोडा शोध घेतला तेव्हा ’एकातून दुसरे’ अशा प्रकाराने पुढील यादी आणि त्यातील तपशील गोळा झाला. मराठी भाषेमध्ये पैसा-द्रव्य ह्या संदर्भात कोणकोणत्या नाण्यांची नावे सापडतात आणि त्यांची उपपत्ति, ते ते शब्द वापरात असताना त्यांचे मूल्य काय होते अशा प्रकारची ही टिप्पणी आहे. ती तयार करतांना मोल्सवर्थसंपादित मराठीचा कोष, दाते-कर्वेसंपादित महाराष्ट्र शब्दकोष, तुळपुळे-फेल्डह्हाउस संपादित जुन्या मराठीचा कोष, हेन्री यूलसंपादित हॉबसन-जॉबसन कोष, मोनिअर-विल्यम्स आणि आपटे ह्यांचे संस्कृत-इंग्रजी कोष, चतुर्वेदीसंपादित हिंदी-इंग्रजी कोष ह्या साधनांचा उपयोग केला आहे. येथे हे स्पष्ट करतो की प्राचीन वा मध्ययुगीन भारतातील नाण्यांचा इतिहास येथे संकलित करण्याचा प्रयत्न केलेला नाही. तो विषय खूपच विस्तृत आहे. येथे केवळ मराठी भाषेत नाणेदर्शक शब्द काय होते अशीच माहिती संकलित केली आहे.

मिळालेली माहिती पुढील प्रमाणे मांडली आहे. प्रथम शब्द,नंतर सारांशरूपात कोषांत सापडलेली माहिती आणि उदाहरणे आणि कंसात कोषाचे संक्षिप्त नाव, अखेरीस कंसात माझी स्वत:ची - असल्यास - काही टिप्पणी अशी ही मांडणी आहे.

ह्या माहितीमध्ये अंकगणिती सुसूत्रता शोधण्यात अर्थ नाही. येथील कोष्टके एकाच नाणेवाचक शब्दाची वेगवेगळी मूल्ये दर्शवितांना आढळतील. ह्याचे कारण असे आहे की एकच शब्द गेल्या हजार-बाराशे वर्षांत स्थलकालपरत्वे वेगवेगळ्या मूल्यांचे दर्शन करविण्यासाठी वापरला गेला आहे, जसे की आजचा पैसा आणि १९५७ पूर्वीचा पैसा ह्यांचे मूल्य एकच नाही आणि त्यामुळे १ रुपया म्हणजे ६४ पैसे आणि १ रुपया म्हणजे १०० पैसे हे दोनहि अर्थ कालपरत्वे संभवतात. त्याच कारणामुळे माहिती संग्रहित करतांना लहानापासून मोठयाकडे वा मोठयाकडून लहानाकडे अशी काही शिस्तशीर व्यवस्था लावता आलेली नाही. शक्य झाले तसे लहान नाणी सुरुवातीस आणि मोठी शेवटाकडे असे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

’पैसाअडका’ मधील ’अडका’पासून प्रारंभ करू.

अडका-अडिका-अटका - १/२ रुका, एक तांब्याचे नाणे. ’अटक्याची कोंबडी आणि टका फळणावळ’ ’हातीं नाहीं अडका, बाजारांत चालला धडका” (मोल्सवर्थ.) १/२ रुक्का, रुक्क्याचा चतुर्थांश, पै, आण्याचा बारावा भाग. ’शिष्यास न लाविती साधन, न करविती इंद्रिये दमन। ऐसे गुरू अडक्याचे तीन, मिळाले तरी त्यजावे॥’(दाते-कर्वे.) एक प्रकारचे नाणे, ’अडिका तेलालागी दिधला’ लीळाचरित्र.(तुळपुळे.) (अशा रीतीने ’पैसाअडका’ हा ’पैसा’ अशा अर्थाचा द्विरुक्त शब्द दिसतो, जसे की ’भाईबंद’,’नोकरचाकर’, ’मालमत्ता’,’दागदागिने’,’सरदारदरकदार’ इत्यादि. मोल्सवर्थमधील फळणावळ म्हणजे कोंबडी फळविण्यासाठी आणलेल्या कोंबडयाचा दर.)

रुका,रुक्का - १/१२ आणा.(मोल्सवर्थ.) १६ आणे किंमतीचे चांदीचे नाणे, पै, आण्याचा बारावा भाग.(दाते-कर्वे.)

विसवा,विश्वा - १/२० रुका.(मोल्सवर्थ.)

पैका - १/४ रुका, १/१२ शिवराई. (मोल्सवर्थ.) म्हणजेच १/२ अडका.(मोल्सवर्थ.) ’स्त्री सुत बंधू पैका उचकी.’(दाते-कर्वे.) (बाईचं ऐका, गाडीभर पैका.)

टका - १)१६ शिवराई, २)४ पैसे, ३)१ आणा, ४)उत्तर हिंदुस्तानात २ पैसे, ५)गुजरातमध्ये ३ पैसे. (दाते-कर्वे.) तसेच ’घरटका’ घरावर कर, 'लग्नटका’ लग्नावर कर.(मोल्सवर्थ.) उत्तर हिंदुस्तानात दोन पैसे, चांदीचे नाणे.(चतुर्वेदी.) (’अंधेर नगरी चौपट राजा, टका सेर आटा टका सेर खाजा’ - अंधेर नगरीत विचित्र राज्य, आटा आणि मिठाई, दोन्हीचा भाव सारखाच - शेराला एक टका. ’सब घोडे बारा टके’ - सगळे घोडे एकाच किमतीचे - बारा टके, one size fits all. सोनटक्का = सोन्याचे नाणे. मूळ संस्कृत ’टङ्क’, ठसा उठवून केलेले नाणे, a punch-marked coin. त्यावरून ’टङ्कशाला’ टांगसाळ. बंगाली भाषेत টাকা टाका हे बोलीभाषेतील रुपयाचे नाव असून बांगलादेशाच्या चलनाचेहि तेच नाव आहे.)

ढबू-ढब्बू, ढबू पैसा - १)२ पैसे किमतीचे तांब्याचे नाणे. २)२ शिवराई. 'देखण्यांत ढब्बू चालण्यांत शिवराई.’(मोल्सवर्थ आणि दाते-कर्वे.)

सजगाणी, सजगणी - एका ढबूचे नाणे, दुंडा पैसा, सहा रुके. (दाते-कर्वे.) ’सजगाणीस देई रुका’ नामदेव गाथा. (तुळपुळे.)

शिवराई - १ पैसा, शिवाजीने राज्याभिषेकप्रसंगी पाडलेले तांब्याचे नाणे, किंमत अर्धा ढबू पैसा.(मोल्सवर्थ.)

काकण - काकिणी = २० कवडया अथवा कपर्दिका. (कर्वे-दाते.) (काकणभर सरस = थोडया फरकानेच सरस.)

कवडी, कपर्दिका, कपर्दिक, कपर्दक, वराटिका - छोटया नाण्यासारखी वापरली जाणारी कवडी.(मोल्सवर्थ.) नाणे म्हणून वापरली जाणारी कवडी - ’पैं दृष्टादृष्टाचिये जोडी । भांडवला न सुटे कवडी॥’ ज्ञानेश्वरी ९.५०३. (तुळपुळे.) "c. 1665.-- "The other small money consists of shells called Cowries, which have the edges inverted, and they are not found in any other part of the world save only the Maldive Islands.... Close to the sea they give up to 80 for the paisa, and that diminishes as you leave the sea, on account of carriage; so that at Agra you receive but 50 or 55 for the paisa."-- Tavernier" (हॉबसन-जॉबसन.) कोष्टक २८ कवडया = १ बोरी, १२ बोरी = १ दुगाणी, १२ दुगाणी = १ रुपया. म्हणून २८८० कवडया = १ रुपया. (हॉबसन-जॉबसन). (ह्यावरून शब्दप्रयोग - एक कपर्दिक म्हणजे अगदी क्षुल्लक रक्कम. देवदर्शन पुराणी । काया कष्टवी जे गोसेवनी । तयातें न लगे कपर्दिक दानी । तपें करूनि मी तोषे॥ अधिकमासमाहात्म्य - khapre.in येथून. कवडीचुंबक म्हणजे चिक्कू माणूस. जवळ फुटकी कवडीहि नसणे म्हणजे अतिदारिद्र्य. कोष्टक - २० कवडया = १ काकिणी, ४ काकिणी = १ पण, १६ पण = १ द्रम्म, १६ द्रम्म = १ निष्क.)

खुळापैसा - राजापूर भागात प्रचलित असलेले एक तांब्याचे नाणे, रुपयाचा १/७०० वा भाग. कवडीबरोबरचे. (मोल्सवर्थ.)

दाम - पैसा, किंमत, १/३० किंवा १/६० आणे.(मोल्सवर्थ.) एक जुने तांब्याचे नाणे. नंतरच्या काळात वापरातून बाहेर पडले पण हिशेबाच्या सोईसाठी चालू राहिले. अकबराच्या काळात १ रुपया म्हणजे ४० दाम, औरंगजेबाच्या वेळी ४६ अधिक १/३ दाम, उत्तर हिंदुस्तानात सर्वसाधारणपणे २५, ३० वा ६० दाम असे मानत. ’राजा करी तैसे दाम, चाम तेहि चालती’.(दाते-कर्वे.) ’नामा म्हणे तुमचे घरीं सोनें दाम । आमुचे घरीं तुमचें नाम॥’ नामदेवाची गाथा १७३९. (तुळपुळे.) दामदुप्पट म्हणजे व्याजासह मुद्दल दुप्पट होणे. दामदुपटीपलीकडे व्याजाची आकारणी हिंदु धर्मशास्त्रानुसार निषिद्ध होती.(दाते-कर्वे.) तीन दाम म्हणजे एक दमडी, सहा दाम म्हणजे एक तुकडा आणि साडेबारा दामाच एक अधेला.(चतुर्वेदी.) "Originally an actual copper coin, regarding which we find the following in the Āīn, i. 31, ed. Blochmann: -- "1. The Dám weighs 5 tánks, i.e. 1 tolah, 8 māshas, and 7 surkhs; it is the fortieth part of a rupee. At first this coin was called Paisah, and also Bahloli; now it is known under this name (dám). On one side the place is given where it was struck, on the other the date. For the purpose of calculation, the dám is divided into 25 parts, each of which is called a jétal. This imaginary division is only used by accountants. The adhelah is half of a dám. The Páulah is a quarter of a dám. The damrí is an eighth of a dám." (हॉबसन-जॉबसन.) येथेच ’दाम’ आणि ’दमडी’ ह्यावर अजूनहि मजेदार तपशील नोंदविलेले आहेत. उदा. अवध प्रांतातले कोष्टक: 26 kauris = 1 damrī, 1 damrī = 3 dām, 20 damrī = 1 ānā, 25 dām = 1 pice. तसेच 1628. -- "The revenue of all the territories under the Emperors of Delhi amounts, according to the Royal registers, to 6 arbs and 30 krors of dáms. One arb is equal to 100 krors (a kror being 10,000,000), and a hundred krors of dams are equal to 2 krors and 50 lacs of rupees."(हॉबसन-जॉबसन.) (’दाम करी काम बिबी करी सलाम’, ’दाम रोख काम चोख’ आणि ’आपलाच दाम खोटा’ ह्या म्हणी. संस्कृत ’द्रम्म’ आणि ग्रीक ’द्राख्मा’ वरून. ’कुसीदवृद्धिर्द्वैगुण्यं नात्येति सकृदाहृता’ ’एकदा वसूल केल्यानंतर कर्जाची रक्कम दुपटीहून अधिक होऊ शकत नाही.’- मनुस्मृति ८.१५१, कुसीद म्हणजे व्याजावर घेतलेले कर्ज - मोनिअर-विल्यम्स.)

चाम - (चर्म) नाण्यासारखे वापरले जाणारे चामडयाचे तुकडे. एका आण्याचे तीस दाम, एका दामाचे तीस चाम. (मोल्सवर्थ.) ’राजा करी तैसे दाम, चाम तेहि चालती’. ’चामाचे दाम चालविणे’ म्हणजे अधिकाराच्या जोरावर कातडयाचे नाणे चालविणे, अनन्वित कृत्ये करणे.(दाते-कर्वे.)

छदाम - १/४ पैसा किमतीचे एक छोटे नाणे, दोन दमडया, सहा दाम (उत्पत्ति षट्-दाम). तुला माझ्याकडून एक छदाम मिळणार नाही!(दाते-कर्वे.)

फद्या - मुख्यत्वेकरून जुन्या मुंबई इलाख्यात हा शब्द प्रचलित होता. ह्याचा अर्थ एक पैशाचे तांब्याचे नाणे. (मोल्सवर्थ.) ४ पै. (दाते-कर्वे.) पोर्तुगीज़ सत्तेखाली असलेल्या पश्चिम किनार्‍याच्या भागत १६व्या शतकात Fedea-Fuddea आणि Pardao नावाची नाणी वापरात होती आणि २० फदीआ म्हणजे १ पर्दाओ असे कोष्टक होते. Fedea-Fuddea पासून ’फद्या’ निर्माण झाला.(हॉबसन-जॉबसन.)

दुडू दुड्डू - तांब्याचा पैसा.(मोल्सवर्थ.) कन्नड भाषेत १/३ आणा कारण १ पैसा = ४ पै मानत असत. (दाते-कर्वे.)

दमडा - दमडी मूळ संस्कृत द्रम्म = १/४ पैसा = १० वा १२ कवडया.(मोल्सवर्थ.) २० कवडया.(दाते-कर्वे.) (दीडदमडीचा माणूस, चमडी देईल पण दमडी देणार नाहीं.)

नासरी - अर्ध्या दमडीच्या बरोबरीचे एक नाणे.(मोल्सवर्थ.) अर्धी दमडी.(दाते-कर्वे.)

पचकी - दमडीच्या बरोबरचे एक तांब्याचे नाणे.(मोल्सवर्थ.)

टोली - एका पैशाचा आठवा भाग आणि एका दमडीचा अर्धा भाग. ’न लगे वेंचावें टोलीधन नावें । तुका म्हणे भावें चाड एक ॥’(मोल्सवर्थ आणि दाते-कर्वे.)

दिडकी - एक नाणे, दीड दुगाणी.(मोल्सवर्थ.) एक पैसा, दीड दुगाणी नाणे.(दाते-कर्वे.)

दुगाणी - तांब्याचे एक जुने नाणे, १/२ पैसा, ’न लाभता तो न मिळे दुगाणी’.(दाते-कर्वे.) कोष्टक २८ कवडया = १ बोरी, १२ बोरी = १ दुगाणी, १२ दुगाणी = १ रुपया.(हॉबसन-जॉबसन).

दुकार - ’एक आणा’ अशा अर्थाचा ग्राम्य शब्द.(मोल्सवर्थ.) (नंदभाषेवरील खालील टिप्पणी पहा.)

आणा - मुसलमानी शासनकाळापासून प्रारंभ. १/१६ रुपया.(हॉबसन-जॉबसन.)

चवली, पावली, अधेली - २ आण्याच्या, ४ आण्याच्या आणि ८ आण्याच्या नाण्यांची ही नावे सर्वांना परिचित आहेत. १९५७ साली दशमान पद्धति येईपर्यंत हे शब्द रोजच्या वापरात होते. चवलीला ’चवल’ आणि ’दुणेली’ असे पर्यायी शब्द होते. तसेच १ आण्याच्या नाण्याला ’गिन्नी’ म्हणत असत असेहि स्मरते.

धरण - ९ आण्यांचे वजन (मोल्सवर्थ.) (’धरण’ ह्या शब्दाचे ’वजन’ अशा छटेचे अनेक अर्थ मोनिअर-विल्यम्समध्ये दिले आहेत. मनुस्मृति अध्याय ८ येथेहि ह्याविषयी कोष्टक आढळते.)

होन - शिवराज्याभिषेकसमयी पाडलेले सोन्याचे नाणे. (हंसाचे चित्र असलेले सोन्याचे नाणे असा मूळ अर्थ, नंतर कसलेहि सोन्याचे नाणे.) होनाचे प्रकार - पादशाही होन, सणगिरी होन, अच्युतराई होन, रामराई होन, देवराई होन, जडमाळ होन, धारवाडी होन, कावरी होन, शैल्यघाटी होन, पामनायकी होन, अदवानी होन, ताडपत्री होन, निशाणी होन, उकिरी होन, सापे होन, एकेरी होन. म्हण - होनापायली होणें म्हणजे एका पायलीची किंमत एक होन, अतिशय महाग.(मोल्सवर्थ). ’रायें होन दिधले । हरिनें ठेविलें धोकटीं’ सेना न्हावी अभंग. (तुळपुळे.) ह्यावरून शब्द होनमाळ = होन गुंफून केलेला गळ्याचा दागिना.(मोल्सवर्थ.) (ह्यावरूनच मला अशी शंका येते की येथूनच होनमाळ म्हणजे ’होनहार’ ’अतिशय चांगला, सद्गुणी’ असा शब्द निर्माण झाला असेल काय? होनाच्या ह्या प्रकारांपैकी काहींचा अर्थ स्पष्ट आहे. बाकींपैकी अच्युतराई होन, रामराई होन, देवराई होन ही नावे विजयानगरच्या राजांवरून झालेली दिसतात. सणगरी = शृंगेरी असावे काय? अदवनी म्हणजे अडोनी, उकेरी म्हणजे हुक्केरी, ताडपत्री म्हणजे सध्याचे रायलसीमेतील अनंतपुर जिल्ह्यातील ’ताडिपत्री’ हे पुरातन गाव, शैल्यघाटी म्हणजे श्रीशैलम् इतके स्पष्ट दिसते.)

पुतळी - सुमारे ४ रुपये किमतीचे सोन्याचे नाणे.(मोल्सवर्थ.) कुंकवावर लावण्याची पितळ, रुपे, काच इत्यादीची टिकली, एक प्रकारचे नाणे.(दाते-कर्वे.) (’पुतळ्यांची माळ’ हा मराठमोळा दागिना प्रसिद्ध आहे.)

फलम - सुमारे ३ रुपये किमतीचे सोन्याचे नाणे.(मोल्सवर्थ.) तमिळ ’पणम्’ ’पैसा’. संस्कृत ’पण’ ह्यावरून. हे नाणे कधी सोन्याचे, कधी चांदीचे तर कधी हीण मिसळलेल्या सोन्याचे असे.(हॉबसन-जॉबसन.) तेथेच अजूनहि बरीच माहिती उपलब्ध आहे. ह्यासारख्या ’फनम’ अशा नावाचे एक नाणे मद्रास इलाख्यात १९व्या शतकाच्या सुरुवातीच्या दिवसांपर्यंत रुपयाच्या जोडीने चालू होते. पहा http://en.wikipedia.org/wiki/Madras_fanam)

मोहोर, मोहर - १५ रुपये किंमतीचे सोन्याचे नाणे, रुपया वा अन्य नाण्यांवरील खूण.(दाते-कर्वे.) ’अकबरी मोहोर सर्वत्र तडक चालती’.(मोल्सवर्थ.) सोन्याची मोहोर हे एक नाणे.(तुळपुळे.) ’अलाई मोहर’ अलाउद्दीन खिलजीची मोहर.(चतुर्वेदी.) इ.स. १२०० च्या सुमारास ह्याचे वजन १०० रती सोने इतके होते आणि विनिमयदर १० चांदीच्या रुपयांबरोबर असावा. कंपनी सरकारने १७७६त पाडलेल्या मोहरेमध्ये शुद्ध सोने १४९.७२ ग्रम इतके असून विनिमय १४ सिक्का रुपये इतका होता.(हॉबसन-जॉबसन.)

तोडा - एकत्र १००० नाण्यांची थैली.(मोल्सवर्थ.) सोन्याची, चांदीची मोहरा, रुपये इ. हजार नाणी भरलेली पिशवी.(दाते-कर्वे.)

खोका आणि पेटी - ह्या सर्व शब्दसंभारामध्ये अगदी अलीकडेच पडलेली भर म्हणजे धनदांडगे-गुन्हेगार-राजकारणी-भ्रष्ट सरकारी नोकर ह्यांच्या संगनमतातून निर्माण झालेले, अनुक्रमे एक कोटि रुपये आणि एक लाख रुपये अशा अर्थांचे हे दोन शब्द.

(ह्यापुढील ’नंदभाषे’चे वर्णन दाते-कर्वेमध्ये सापडले. मलातरी हे पूर्ण अज्ञात होते. सर्वांच्या माहितीसाठी येथे देत आहे.)

नंदभाषा: बाजारात इतरांना कळू नये म्हणून व्यापारी ’नंदभाषा’ नावाची एक सांकेतिक भाषा वापरत असत. त्या भाषेमध्ये नाण्यांच्या उल्लेखांसाठी विशेष शब्द आहेत. त्यातील अर्थ: केवली, भुरका - एक, आवरु - दोन, उधानू - तीन, पोकू - चार, मुळू - पाच, शेली - सहा, पवित्र - सात, मंगी - आठ, तेवसू, लेवनू - नऊ, अंगुळू - दहा, एकडा - अकरा, रेघी - बारा, तेपरु - तेरा, चोपडू - चौदा, तळी - पंधरा. एक, दोन इत्यादींचे सांकेतिक शब्द, नंतर तान असा शब्द आणि तदनंतर तळी (पंधरा) असा शब्द जोडून सोळा, सतरा इत्यादींचे संकेत होत असत, जसे भुरका तान तळी - सोळा, आवरु तान तळी - सतरा इ. त्याचप्रमाणे बिटी - शंभर, ढकार - हजार, नाण्यांसाठी संकेत: भुरका - एक रुपया, टाली - अर्धा रुपया, पकार - चार आणे, चकार - दोन आणे, दुकार - एक आणा, फाटा - आणा, अवारु फाटे - दोन आणे.

ही संकेतभाषा त्या काळात बर्‍याच जणांना माहीत असावी कारण ह्या संकेतात बांधलेली विसोबा खेचरांची एक रचना दाते-कर्वे देतात: (ही पंचानन शंकराची स्तुति दिसते.)

मुळु वदनाचा। उधानु नेत्रांचा। अंगळू हातांचा। स्वामी माझा॥ मुगुट जयाचा। केवळ्या आगळी काठी। पवित्र तळवटी। चरण ज्याचे॥ ढकार वदनाचा। आला वर्णावया। जिह्वा त्याच्या चिरल्या। वर्णवेना॥ शेली वेडावली। पोकू मौनावली। अंगुळूमंगी थकली। नकळे त्यासी॥ सद्भावे शरण। अवारु जोडून। खेचरविसा म्हणे। स्वामी माझा॥

अर्थ: पाच मुखांचा, तीन नेत्रांचा, दहा हातांचा माझा स्वामी आहे. (मुगुट जयाचा। केवळ्या आगळी काठी। पवित्र तळवटी। चरण ज्याचे॥ ह्याचा अर्थ मला लागत नाही. केवळ्या १, काठी २०, पवित्र ७ असे दाते-कर्वे सांगतात.) एक हजार मुखांचा वर्णन करायला लागला, त्याच्या जिभा चिरल्या पण वर्णन पूर्ण झाले नाही. (शेली वेडावली। पोकू मौनावली। अंगुळूमंगी थकली। नकळे त्यासी॥ ह्याचाहि अर्थ मला लागत नाही. शेली ६, पोकू ४, अंगुळूमंगी म्हणजे १०+८=१८ असे दाते-कर्वे सांगतात.) सद्भावाने शरण जाऊन दोन (हात) जोडून विसा खेचर म्हणतो - स्वामी माझा.

अखेरीस पुन: ’पैसाअडका’. हा शब्द मूळचा ’पैकाअडका’ असा असू शकेल असे वाटते कारण का-का हा अनुप्रास चांगला जुळतो आहे आणि ’पैका’च नंतर केव्हातरी ’पैसा’ झाला असावा.. तुळपुळे-फेल्डहाउसमध्ये ’पाइका’ असा शब्द दिला असून त्याचा उगम ’पादिक’ ह्या संस्कृत शब्दाशी दाखविला आहे. दाते-कर्वेमध्ये ’पाईक’ ह्या शब्दाचा उगम संस्कृत ’पदाति’, प्राकृत ’पाइक्क’, मराठी ’पाईक’ असा दाखविला आहे. आपटेमध्ये ’पदाति’, ’पादाति’, ’पादातिक’, ’पादाविक’ अशा शब्दांचा समाईक अर्थ 'foot-soldier' असा दिला आहे. ह्या शब्दांवरून ’पाईक’ असा मराठी शब्द साधला जाणे अशक्य नाही. पाईकाचे वेतन म्हणजे ’पैका’ असेहि असू शकेल. प्रत्यक्षात रुपये-आणे-पैसे-पै हे कोष्टकहि मुसलमानी राजवटींपासूनच सुरू झालेले आहे असे वाटते कारण हे किंवा त्यांच्याशी जुळते शब्द जुन्या संस्कृत वाङ्मयात भेटत नाहीत.

ह्या सर्व वर्णनावरून अजून एक गोष्ट ध्यानी येते. बहुश: सर्व शब्दवैविध्य किरकोळ मूल्याच्या कवडी, दमडा, टका अशा नाण्याभोवतीच फिरतांना दिसते. रुपया, होन, मोहोर अशांना फार समानार्थी शब्द नाहीत. ह्याचे कारण म्हणजे आजच्या तुलनेने अतिस्वस्ताई आणि सार्वत्रिक दारिद्र्य ह्यांमुळे बहुजनसमाजाचा मोठया नाण्यांशी संबंध क्वचितच येत असेल. गोरगरीब कशाला मोहरा आणि होनांची उठाठेव करीत बसेल? त्याला ही नाणी पाहायलाहि मिळणे दुर्मिळ!

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4.375
Your rating: None Average: 4.4 (8 votes)

"दुगाणी" हा शब्द विशेष रोचकही वाटला, दुगाण्या झाडणे असा वाक्प्रचार आहे त्याच्याशी काही संबंध असेल का? व्यवहारात असणार्‍या अनेक शब्दांचे अर्थ वाटतात त्यापेक्षा खोल असतील असं वाटलं नव्हतं.

अर्ध्याधिक लेख वाचून झाल्यावर, आताच्या दशमान पद्धती, चलनाचं प्रमाणीकरण यामुळे आता भाषेत फार भर पडणार नाही असं वाटत होतं. पण "खोका आणि पेटी"ने तारलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कोल्हटकरांच्या प्रतिमेला साजेसा अभ्यासपूर्ण लेख.

दिडकी हा शब्द वाचल्यावर 'दिडकीची भांग घेतली तर कोणीही कविता करू शकतो' हेच आठवतं. त्याकाळी खरंच प्रचंड स्वस्ताई होती असं दिसतंय Smile

लहान लहान नाण्यांचे अनेक शब्द 'खिशात दमडीसुद्धा नव्हती' 'फुटकी कवडीदेखील गाठीला नाही' 'मला त्या लेखनाबद्दल तांब्याचा पैसादेखील मिळाला नाही' (संदर्भ - ठणठणपाळ)... वगैरे दारिद्र्य दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जातात.

नंदभाषेवरून इतरही तसे उल्लेख आठवले. मुंबईत गुजराथी दुकानदार आपापसात किमती बोलताना 'बापट बावीस' वगैरे म्हणायचे. याचा अर्थ 'ज्या आकड्याची दुप्पट बावीस आहे असा तो' म्हणजे अकरा. हेही अर्थातच मुलांना जशी चची भाषा समजते तसं जनतेला कळलेलं होतंच. कदाचित गुप्ततेपेक्षा साडेसात वगैरे आकडे म्हणण्याऐवजी बापट पंधरा म्हणणं सोपं जात असेल म्हणूनही ही पद्धत आली असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अप्रतिम लेखन. त्यामागचा अभ्यास नेमका आणि आनंददायी -प्रसंगी थक्क- करणारा आहे.
बुकमार्क केले आहेच

विसवा,विश्वा - १/२० रुका

या 'विसवा' चा "अठरा विसवे दारिद्र्य" मधील विसवे एकच का?

बाकी होन हे शिवरायांनी शिवराज्याभिषेकसमयी पाडलेले होते तर विजयनगरच्या राजांनी ते नाव कसे उचलले असेल (त्यांचा अंत शिवकाळाच्या आधीच झाला होता असे आठवते.) का नाव आधीच प्रचलित होते तेच शिवरायांनी चालु ठेवले असावे.

बाकी ’सब घोडे बारा टके’ काय किंवा होनहार / होनमाळ काय प्रत्यक्षात वापरतल्या शब्दांना इतका सुयोग्य अर्थ आहे हे माहित तर नव्हतंच आणि अर्थ माहित नसूनही इतके वर्षे काही वाक्प्रचार विविध आमदन्या, राज्ये (व त्यावेळचे अर्थकारण) यांच्यातूनही आरपार चालत आले याचे आश्चर्यमिश्रित कौतुक वाटते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माहितीपूर्ण लेख आवडला.

या 'विसवा' चा "अठरा विसवे दारिद्र्य" मधील विसवे एकच का?

हे विसवे आहे? मी तर 'अठरा विश्वे दारिद्र्य' असे ऐकत आलोय. म्हणजे फार पूर्वीपासूनचे दारिद्र्य असे मला वाटले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विसवे बद्दल पूर्वी झालेली एक चर्चा येथे आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>अप्रतिम लेखन. त्यामागचा अभ्यास नेमका आणि आनंददायी -प्रसंगी थक्क- करणारा आहे.

अगदी असेच म्हणते.
अवांतरः अजून कोणकोणत्या गोष्टींच्या काठानं भाषेच्या इतिहासात असा फेरफटका मारता येईल बरं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

छान माहिती दिली आहेत. धन्यवाद ! हे सगळे संदर्भ तुम्ही कुठे पाहता?
जुन्या गोष्टींमधे मोहोरा, होन, कवड्या वगैरे वाचनात येतात, त्याचा केवळ 'पैसा' एवढा ढोबळ अर्थ न राहता खर्या मूल्याचा अंदाज येइल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> अप्रतिम लेखन. त्यामागचा अभ्यास नेमका आणि आनंददायी -प्रसंगी थक्क- करणारा आहे.

+१

अतिशय माहितीपूर्ण लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख खूप आवडला. काकणभर सरस. खुळापैसा छानच.
कितीतरी नवे शब्द कळले.
शिवाजीमहाराजांनी चांदीचा तोडा इनाम दिल्याचे पूर्वी वाचले होते. त्यावेळी, एवढया कौतुकाचे इनाम पायातला एक तोडाच कसे काय असा प्रश्न पडला होता, तो तोडा कुठला असावा हे आता ध्यानात आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मणभर माहितीने ठासून भरलेला लेख वाचून आपली तोळाभर प्रतिक्रिया ती काय द्यावी.
आम्हाला ह्यातली रत्तीभर जरी माहिती जमवता आली असती तरी आम्ही कॉलर टाइट करुन फिरु. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

क्या बात है!
अग्दी 'मना'तले बोललास! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरील लेखात एक भर घालता येईल, जी मला ह्या लेखनाची तयारी करतांना मिळाली. ती म्हणजे आसु - सोन्याचे एक नाणे जे देवगिरीच्या यादव राजांच्या काळात वापरात होते. (ग्राहकापासी दामाचा वीसोवा आसूपाठी नगरे दीन्हला॥)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हल्लीच 'चाणक्य' ही मालिका पाहात होते. त्यात 'काशा पण' हा शब्द पैसे या अर्थाने वापरलेला आहे. तो तुम्ही दिलेल्या यादित दिसला नाही...या "काशा पण" बद्द्ल तुमच्याकडे काही माहिती असल्यास वाचण्याची उत्सुकता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'कार्षापण' हे एका प्राचीन भारतातील नाण्याचे नाव आहे. मौर्यांच्या काळात हे वापरात होते, तसेच अन्य काळांमध्येहि ते वापरात होते. ते चांदीचे वा सोन्याचे असे आणि वेगवेगळ्या काळांत त्याचे वजनहि वेगवेगळे असे. मौर्यकालीन कार्षापण हे ओतीव नसत, तर दाब देऊन उठविलेले असत (punch-marked. येथे मौर्यकालीन कार्षापणाची चित्रे पाहता येतील.

नंतरच्या काळात कार्षापण नाणे वापरातून गेलेले दिसते पण 'कर्ष' असे सोन्याच्या वजनाचे एक परिमाण निर्माण झाले. मला असे वाटते की 'कार्षापणाच्या वजनाचा तो कर्ष' अशी ह्या संज्ञेची उत्पत्ति झाली असावी.

९ व्या शतकातील महावीराचार्यलिखित 'गणितसारसंग्रह' ह्या ग्रंथात पुढील कोष्टक सोन्याच्या वजनांचे म्हणून दिले आहे: (संज्ञाधिकार श्लोक ३९)

चतुर्भिर्गण्डकैर्गुञ्जा गुञ्जा: पञ्च पणोऽष्ट ते।
धरणं धरणे कर्ष: पलं कर्षचतुष्टयम्॥

४ गण्डक = १ गुंजा
५ गुंजा = १ पण
८ पण = १ धरण
२ धरण = १ कर्ष
४ कर्ष = १ पल

माझ्या वरील लेखात ह्या नाण्याचा उल्लेख नाही ह्याचे कारण त्यात प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे त्यात केवळ मराठी भाषेतील नाणेवाचक शब्दांचे संकलन केले आहे, प्राचीन आणि मध्ययुगीन शब्दांचे नाही कारण तो विषय खूपच विस्तृत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद अरविंद सर. उच्चार व्यवस्थित न कळल्यामुळे माहिती स्वत: शोधताना हाती फर काही लागत नव्ह्तं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता धागा वर आलाच आहे, याच प्रमाणे "वेळ" मोजण्याच्या परिमाणांवरही लेख आल्यास वाचायला आवडेल हे नमूद करून ठेवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

येथील हा लेख वाचून 'भाषा आणि जीवन' ह्या मराठी अभ्यासपरिषदेकडून प्रकाशित होणार्‍या त्रैमासिकाच्या संपादकांनी तो माझ्याकडून मागवून घेऊन अलीकडे त्रैमासिकामध्ये छापला आहे असे मला कळले. मी त्रैमासिकामध्ये तो अद्यापि वाचलेला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभिनंदन!

त्या त्रैमासिकाचा अंक जालावर उपलब्ध आहे का? नसल्यास स्कॅन करून टाकता येईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अभिनंदन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

अभिनंदन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दुगाणी - तांब्याचे एक जुने नाणे, १/२ पैसा, ’न लाभता तो न मिळे दुगाणी’.(दाते-कर्वे.) कोष्टक २८ कवडया = १ बोरी, १२ बोरी = १ दुगाणी, १२ दुगाणी = १ रुपया.

रोचक माहिती. मला "दुगाण्या झाडणे" म्हणजे "लाथा मारणे" हाच अर्थ माहिती होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(शेली वेडावली। पोकू मौनावली। अंगुळूमंगी थकली। नकळे त्यासी॥ ह्याचाहि अर्थ मला लागत नाही. शेली ६, पोकू ४, अंगुळूमंगी म्हणजे १०+८=१८ असे दाते-कर्वे सांगतात.)

स्मृती ६ आहेत का?
४ वेद असतील
१८ पुराणे असतील

हे सर्व स्तुती करुन थकले वगैरे वर्णनं सापडतात तसे काही आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

एकूण शास्त्रे ६ आहेत असे मानले जाते. ती बहुधा खालील लिंकेत दिलेल्यापैकी असावीत.

http://en.wikipedia.org/wiki/Vedanga

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ह्म्म्म असावे. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down