मातीचे कुल्ले, नागवे कोल्हे व इतर - अर्थात, मायमराठीची लेणी : भाग १
विद्याधर वामन भिडे यांचा जन्म बेळगाव येथे १४ नोव्हेंबर १८६० रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण कर्नाटकात कानडी व इंग्रजी माध्यमातून झाले. मॅट्रिक व बीएच्या परीक्षा त्यांनी पुण्याहून दिल्या. १८८४ ते १९१० अशी सव्वीस वर्षे त्यांनी पुणे शाळा खात्यात शिक्षक म्हणून नोकरी केली. निवृत्तीनंतरही प्रापंचिक अडचणींमुळे पुष्कळ वर्षे त्यांनी खाजगी शाळांमधून शिकवण्याचे काम केले. कानडी, मराठी, इंग्रजीबरोबरच फ्रेंच, पाली व पर्शियन या भाषांचाही त्यांचा अभ्यास होता. त्या ते शिकवतही असत. भिडे गुरुजींनी पुष्कळ गद्य व पद्य लेखन केले. त्यात मराठी भाषाविषयक लेखनाचा अंतर्भाव आहे.
ऐसी अक्षरेच्या वाचकांना साहजिकच प्रश्न पडेल की भिडेशास्त्र्यांचा आणि मातीच्या कुल्ल्यांचा किंवा नागव्या कोल्ह्यांचा संबंध काय? तो संबंध येणेप्रमाणे. भिडेशास्त्र्यांनी लिहिलेले "मराठी भाषेचे वाक्प्रचार व म्हणी" (१९१८ - चित्रशाळा प्रकाशन) हे आमच्या अत्यंत आवडत्या पुस्तकांपैकी एक आहे. त्यातील आम्हास आवडलेल्या काही उदाहरणांची ओळख येथे करून देण्याचा मानस आहे. भिडेशास्त्र्यांच्या पुस्तकात अनेक अनवट म्हणी, शब्दप्रयोग तर आहेतच, पण रूढ असलेल्या शब्दांचे, वाक्प्रचारांचे अर्थ व व्युत्पत्तीदेखील जाणून घेणे आजच्या पिढीला मनोरंजक वाटावे. या लेखातले बहुतेक शब्दार्थ भिडेशास्त्र्यांचे शब्द वापरून तिरप्या ठशात दिले आहेत, पण त्यावरच्या टिप्पणी आमच्या आहेत.
मातीचे कुल्ले -
नात्याचा संबंध नसता, ज्यावर आपण नातलगाप्रमाणे प्रेम करावे तसे करत असतो. परंतु अडचणीच्या वेळी जो आपल्या उपयोगाच्या वेळी उपयोगास येण्याचा संभव नसतो असा माणूस. वाक्यात उपयोग करायचा झाला तर विशेषतः नवराबायकोच्या भांडणात एकमेकांच्या सासरची माणसं किती कुचकामाची आहेत हे कुजकटपणे सांगण्यासाठी 'ह्हो, काही झाले तरी मातीचे कुल्ले, लावल्याने लागत नाहीत म्हटले!' असे म्हणता येते.
भिडेशास्त्र्यांच्या काळात अवयव पुष्ट करण्यासाठी सिलिकोनचे फुगे वगैरे नव्हते. अर्थात सिलिकोन भरलेले अवयव चिकटूनच रहातात, मातीप्रमाणे सुकून गळून जात नाहीत.
राम -
१. सामर्थ्य शक्ती जोर. उदा. त्या उपरण्यात आता राम उरला नाही.
२. राम म्हणजे रुपया, सीताबाई म्हणजे अधेली. राम हा पुल्लिंगी शब्द आहे एवढ्या कारणाने भिक्षुकांमध्ये राम म्हणजे रुपया, आणि त्याचे अर्धांग, स्त्रीलिंगी म्हणून अधेली.
हे पुस्तक लिहिले त्या काळात रुपयाला बरेच मूल्य होते. ज्या कार्यात रुपया दक्षिणा नाही, त्या कार्यात राम नाही असे भिक्षुक म्हणत. रुपयाला एवढं मूल्य असण्याच्या काळात वाघाचा डोळा हा शब्दप्रयोगदेखील रुपयासाठी वापरण्यात येत असे. बहुतकरून भिक्षुकांमध्येच.
स्मशानवैराग्य - क्षणिक वैराग्य.
स्मशानात गेल्यावर जे काही काळच मनाला वैराग्य वाटते ते. स्मशानासारख्या ठिकाणी 'साऱ्या ऐहिक गोष्टी व्यर्थ आहेत, सर्वांनाच कधीतरी जायचे आहे' इत्यादी भावना मनात बळावतात. परंतु घरी परत गेल्यावर त्याच सर्व ऐहिक गोष्टी स्वर्गमोलाच्या वाटू लागतात. एखाद्या समाजसेवकाचे भाषण ऐकून भारावून जाऊन देशसेवेला तनमनधन वाहून घेण्याची भावना होते. पण ती तेवढ्यापुरतीच. भाषण संपवून घरी जातेवेळी बसचे तिकीट न काढताही तिकीट तपासनिसाच्या तावडीत न सापडण्याचा आनंद होतो. आणि मघा उद्भवलेली समाजाला सर्वस्व अर्पण्याची ऊर्मी कोठल्या कोठे निघून जाते. हे स्मशानवैराग्य. याच्याच जवळचा आणखीन एक शब्दप्रयोग म्हणजे आतुरसन्यास.
आतुरसन्यास -
आपला मरणकाळ जवळ आला आहे अशी मनाची खात्री झाल्यावर जो सन्यास घेतात तो.
म्हणजे संपूर्ण आयुष्य, बऱ्यावाईटाचा विधिनिषेध न बाळगता यथेच्छ उपभोगून झाले. मृत्यूसमय जवळ येता परलोकातील भवितव्याची चिंता वाटू लागली. तेव्हा मरण्यापूर्वी सन्यास घेऊन इहलोकात कीर्ती आणि परलोकात थोडेफार पुण्य हे दोन्ही साधावे या अत्यंत व्यवहारी दृष्टीकोनातून घेतलेला सन्यास. त्यात ना वैराग्य, ना अध्यात्म.
शेंदाडशिपाई -
शेंदाडे हे फळ (खरबूज किंवा तत्सम) पातळ त्वचा व मऊ गर असलेले असते. जराशा धक्क्याने ते फुटते. शेंदाडासारखा शिपाई म्हणजे ज्याला रट्टे खाण्याची ताकद नाही असा. यामुळे या शब्दाचा अर्थ पुढे भित्रा माणूस असा झाला.
ध्वनिसाधर्म्य आणि पोरवयातील कल्पनाशक्ती यामुळे पूर्वी आमचा शेंदाडशिपाई म्हणजे नाक वहाणारा किंवा गैदी असा शिपाई, असा समज होता. परंतु त्यात बहुधा तथ्य नसावे.
सहा महिन्यांची जांभई - लवकर सिद्धीला न जाणारे काम.
याला जांभई असे म्हणण्याचे कारण किंवा व्युत्पत्तीचा उल्लेख भिडेशास्त्रींनी केलेला नाही. कुंभकर्ण सहा महिने झोपत असे हे आम्हांस माहीत आहे. परंतु त्यांची जांभई सहा महिने नक्कीच चालत नसणार. वाचकांना संदर्भ माहीत असल्यास आम्हासही सांगावे.
चार खुंट जहागीर - चार खुंट म्हणजे पृथ्वीचे चार कोपरे. या कोपऱ्यांपर्यंत पसरलेली जहागीर.
परंतु येथे अर्थ वेगळा आहे. भिक्षेकऱ्याची चौकोनी फडक्याची झोळी जमिनीवर पसरली की त्याचे कोपरे चार दिशांकडे असतात. या फडक्याचा विस्तार म्हणजेच चार खुटांची जहागीर. थोडक्यात, अत्यंत दरिद्री अवस्था.
दारिद्र्याबद्दलच्या या काहीशा विनोदी किंवा उपहासात्मक उल्लेखाला त्यातल्या कडवटपणामुळे एक कारुण्याची छटा येते असे आम्हांस वाटते. असाच आणखी एक वाक्प्रचार म्हणजे घड्याळ टिपरू.
घड्याळ टिपरू - मिरची भाकर असे गरीबाऊ जेवण.
पातळ वाटोळी भाकर म्हणजे तास आणि मिरची म्हणजे तिच्यावर बडवण्याचे टिपरू. फक्त भाकर आणि तिच्याबरोबर चवीसाठी मिरची असलेलं जेवण.
हल्ली प्रचलित असलेला तास शब्द हा ठराविक काळाने वाजवण्यात येणाऱ्या 'तासा'वरून आला असेल का? ताशा आणि तास यांचा संबंध काही आहे का?
नागवे कोल्हे - अकल्पित लाभ
कोल्हे हे क्वचितच एखाद्यास दृष्टीस पडणारे जनावर. त्यामुळे त्यावरून हा वाक्प्रचार आला असावा.
आम्हांस एक शंका आहे. जेव्हा केव्हा कोल्हे दिसेल तेव्हा ते नागवेच असते. कोल्हे कपडे घालून कोणाला दिसल्याचे ऐकिवात नाही. तरी येथे 'नागवे' हे विशेषण मुद्दाम वापरण्याचे काय प्रयोजन असावे? भिडे शास्त्र्यांनी त्याची व्युत्पत्ती माहीत नसल्याचे लिहिले आहे. ऐसी अक्षरेचे वाचक आपली कल्पनाशक्ती लढवून सांगू शकतील काय?
पाप्याचे पितर - अतिशय रोड माणूस
हा अर्थ सर्वांना माहीत असतो. त्याची व्युत्पत्ती भिडेशास्त्री अशी देतात. पापी लोक श्राद्धादी कर्मे करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या पितरांना खावयास न मिळून ती कायम रोड असतात.
आमच्या मनात असे येते की यावरून स्थूल व्यक्तीस पुण्यवंताचे अथवा धर्मपरायणाचे पितर म्हणावे काय?
प्रथम वंदे - हलकट नीच माणूस
उदाहरणार्थ, 'अरे तो गोविंदराव प्रथम वंदे आहे बरं का. त्याच्याशी जपून वाग.'
दुर्जनांना सर्वसामान्य घाबरून असतात. त्यामुळे काही झाले तरी त्यांना आधी वंदन करून मोकळे व्हावे, आणि पिडा टाळावी.
यावरून आठवले, श्रीगणेश हे दैवत आपल्याला सध्या विघ्नहर्ता या रूपात माहीत असते. परंतु एके काळी ते 'विघ्नकर्ता' म्हणजे विघ्न आणू शकणारे असे दैवत मानले जात असे. तेव्हा आपल्या कार्यात विघ्ने येऊ नयेत म्हणून श्रीगणेशाची सर्वप्रथम पूजा करण्याचा प्रघात पडला. त्यामुळे त्याचे विघ्नहर्ता हे रूप जनसामान्यांत प्रचलित झाले, असे ऐकिवात आहे.
शुक्लकाष्ठ - लचांड, झेंगट
एका स्त्रीने आपल्या कुटुंबातली खरी पण लाजिरवाणी गोष्ट कोणा इसमास सांगितली. ती लाजिरवाणी गोष्ट तू परक्याला का सांगितलीस म्हणून पती तिला सुकलेल्या लाकडाने झोडपू लागला. त्यावर ती म्हणाली "बोलायला गेले सुपाष्ट (स्पष्ट) अन् पाठीत बसलं सुकलं काष्ठ"
ही व्युत्पत्ती आमच्या मनास फारशी येत नाही, परंतु म्हणून ती चुकीची आहे असे नाही. वाचकांना याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यास आवडेल.
आकाशपाणी - मद्य (ताडी किंवा माडी)
ताड व माड ही झाडे उंच असतात. आणि त्यापासून निघणारी पेये, त्यांच्या माथ्याजवळ म्हणजे जमिनीपासून फार उंचावर, जणू काय आकाशात असतात. यावरून ताडी व माडी यांना आकाशपाणी म्हणण्यात येते.
येथे आमचा भिडेशास्त्र्यांशी थोडा मतभेद आहे. जे पाणी प्राशन केल्याने मस्तक आकाशात विहार करू लागते त्यास आकाशपाणी म्हणावे असे आम्हाला वाटते.
अठरा विसवे दारिद्र्य - अत्यंत हलाखीची परिस्थिती.
हा शब्दप्रयोग काही लोक अठरा विश्वे दारिद्र्य असा करतात. पण व्युत्पत्ती विसवेचीच आहे. कोणत्याही वस्तूचे वीस भाग कल्पिले तर (पाच भाग म्हणजे पाव, दहा भाग म्हणजे निम्मी वस्तू. याप्रमाणे) अठरा भाग (अठरा विसांश - नव्वद टक्के) म्हणजे जवळपास पूर्णच वस्तू. म्हणून अठरा विसवे दारिद्र्य म्हणजे पराकाष्ठेचे दारिद्र्य.
व्हाय दिस कुल्ल्यावरी कुल्ल्यावरी डी?
अगदी सहमत आहे. शीर्षकात कुल्ले आणायची गरज होती असे वाटत नाही. बहुदा लक्ष वेधून घेण्याकरिता असे केले गेले असावे. तरीही ते टाळूनही दुसर्या एखाद्या चांगल्या शब्दाला योजूनही शीर्षक लक्षवेधी बनविता आले असते.
असो. हे माझे मत होते. परंतू धागाकर्त्याचे लेखनस्वातंत्र्य देखील मान्य आहे.
छान
शब्द, त्यांच्या व्युत्पत्तीची कहाणी आणि लेखाची शैली अतिशय आवडली. 'शेंदाड'चा खरा अर्थ, आतुरसन्यास, घड्याळ टिपरू हे खासच.
'प्रथम वंदे' हे पुढील ग्राफिक सुभाषितावरून आले असावे -
दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा
अठरा विसवे दारिद्र्य = १८*२० = ३६० दिवस (प्क्षी: वर्षभर) दारिद्र्य अशी एक व्युत्पत्ती मराठीच्या भांगेबाईंनी सांगितली होती, तीही सयुक्तिक वाटते.
छानच लेख!
छानच लेख!
कित्येक व्युत्पत्ती रोचक आहेत! त्यातील काहि अजुनही वापरात आहेत मात्र काहि तितकेसे ऐकलेले नाहित. ग्यादरिंगात एकदा शिपायाची भुमिका केल्यावर आजीने हा आपचा 'शेंदाडशिपाई' असा गजर केल्याचे आठवते आहे :)
बाकी मलाही मराठीला भांगेबाईच असल्याचे की काय कोणजाणे नंदन म्हणतो तीच 'अठरा विसवे'ची व्युत्पत्ती ऐकलेली आहे.
असेच लेख येऊदेत. ऐसीवर स्वागत!
मस्त
मस्त लेख आहे! काही अर्थ माहीत नव्हते - स्मशानवैराग्य वगैरे. शेंदाडशिपाई बद्दल माझाही तसाच काहीसा समज होता. चार खुंट जहागिरदार प्रमाणे "कंगाल बँकेचा मॅनेजर" हे ही लहानपणी मित्रांमधे कायम ऐकलेले आहे (कदाचित नवा व्यापारी वगैरे खेळताना निघाले असेल).
वाचायला हवे हे पुस्तक.
रडतराउत
कोल्हापूर भागात [जो बराचसा 'मराठळलेला' आहे ] बरेचसे टांगेवाले आणि लग्नातील वाजंत्रीवाले - बॅण्डवाले नव्हेत - सुन्द्रीवादनसम, तसेच यल्लमा, त्र्यंबोली यात्रेत नैवेद्य नेणार्या सुहासिनींच्या पुढे देवीचा जागर करत चर्मवाद्ये वाजवणारे - हे पूर्वाश्रमीचे 'बारगीर' म्हणजेच शासकीय दप्तरातील नोंदीप्रमाणे 'मांग' जातीचे (एस्.सी.गटातील) आहेत. अजुनही इथल्या शाळा-कॉलेजमध्ये बारगीर आडनावाची मुले सापडतात. यातील टांगा व्यवसाय करणारे बरेचसे मुसलमानही आहेत, ज्यानी पुढे इथल्या रिक्षा-व्यवसायात चांगलाच जम बसवून स्थानिक राजकारणात {कार्पोरेशन निवडणुकातून} आपल्या जमातीच्या जोरावर बर्यापैकी स्थानही मिळविले आहे.
थोरल्या महाराजांच्या काळातील त्यांची शिकवण आणि स्वराज्यप्राप्तीसाठी सर्वच थरातील गटांनी एकत्र येऊन एक दिलाने काम करण्याची नीतांत गरज असल्याने 'मी प्रथम सैनिक आहे, नंतर माझे अन्य काम' या न्यायानुसार अगदी प्रधान अमात्य या प्रथम क्रमांकाच्या पदापासून उतरणीनुसार बारगीरापर्यंत सर्वांना एकच न्याय असेल यात संदेह नाही. मात्र महाराजांच्या पश्चात मराठा राज्याची जी काही पुढे वाताहात झाली [त्याची कारणमीमांसा करण्याचीही आवश्यकता नाही] तीत मग साहजिकच 'क्लास ग्रेडेशन' आपसूक आले असेल असे आपण मानू या. नंतर 'त्या' हिंदी शब्दकोशात दिलेल्या अर्थानुसार कामाचेही वाटप थेट त्या त्या दर्जानुसार झाले असणार. मोल्सवर्थने 'राऊत' ची व्याख्या केली आहे ती त्याचा तसा झालेला विस्तार लक्षात घेऊनच : A horse-soldier, a trooper, a cavalier. A term applied to a man of the Máng class. इथे मोल्सवर्थ फक्त 'मांग' नामाचा उल्लेख करून थांबलेले दिसतात. पण समाजरचनेत त्या गटाशी निगडित असलेली चौकटीबद्ध कामे लक्षात घेता बारगीरांच्या उपस्थितीचे प्रयोजनही बदलत गेले.
पेशवेकाळात मूळ 'बारगीर' जे 'राऊत' नावाने ओळखले जात, त्यांचा युद्धतयारीत जो काही भाग असेल तीत 'तलवार कमी तराटे जादा' असा स्थितीदर्शक बदल होत गेल्याने पुढच्या पिढीतील 'किलिंग इन्स्टिन्क्ट' ही हळूहळू लोप पावत गेले आणि उरली ती फक्त 'मांग' समाज करीत असलेल्या कामाची जंत्री. त्यातूनही एखाद्या मल्हारराव होळकराने वा दत्ताजी शिंद्याने गरज लागली म्हणून या नव्या राऊताला तलवार घेऊन घोड्यावर बस असे फर्मावले तर तो त्याला कसाबसा तयार होई. यावरूनच 'रडतराऊत' हे संबोधन आपल्या भाषेत निर्माण झाले. रोजच्या मराठीच्या वापरातदेखील हे संबोधन 'मारूनमुटकून तयार केलेला योद्धा' यासाठी उपयोगात येऊ लागले.
"पत्र नव्हे मित्र" म.टाईम्सची एक बातमी पाहा : "राजकारणात येणारी आव्हाने नेत्याने पेलायची असतात, संकटाला सामोरे जाऊन इतरांना दिलासा द्यायचा असतो, पण हे नेतेपदाचे गुण डॉ. सिंग यांच्यात दिसत नाहीत. रडतराऊत घोड्यावर बसले, या मराठी म्हणीप्रमाणे डॉ. मनमोहन सिंग यांना काँग्रेसने पंतप्रधानपदावर बसवले आहे."
किंवा
'सकाळ' मधील एका लेखातील एक वाक्य : "प्रोऍक्टिव्ह' मंडळी उत्साही असतात, धडाडीची असतात, याउलट "रिऍक्टिव्ह' मंडळी म्हणजे कुरकुरी, रडतराऊत!"
उपक्रमावरील अशोक पाटिल ह्यांच्या प्रतिसादातून(http://mr.upakram.org/node/3478#comment-60346)
प्रतिसाद
धन्यवाद मनोबा,
खरं सांगायचे झाल्यास माझ्या मनी नेमका हाच विचार आला होता की, 'रडतराऊत' बद्दलचा माझा "उपक्रम" चर्चेतील हा प्रतिसाद इथे द्यावा. पण थांबलो तो एवढ्यासाठी की, इथेच ("ऐसी..."वर) 'एकच लेख अनेक ठिकाणी" तसेच 'तिथले प्रतिसाद इथेही" असा प्रघात पडू नये अशा स्वरूपाची एक बर्यापैकी टीआरपी मिळालेली चर्चा झाली, ती आठवली. त्याप्रसंगानंतर मी अन्यत्र दिलेले लेख इथे दिले नाहीत वा तसले प्रतिसादही कॉपीपेस्ट केलेले नाही.
पण तुम्ही ते काम "ऑन युवर ओन इम्पल्शन" केले त्याबद्दल आभार.
अशोक पाटील
अभ्यासाचा विषय
चांगला विषय (शिवाय लेखन जरी एका पुस्तकाच्या महतीबद्दल असला तरी इथे तो ज्या आकर्षकरितीने मांडला आहे त्याची धाटणी आवडली).
१. सहा महिन्याची जांभई : याचा कुंभकर्णाच्या झोपेशी संबंध असेल असेही वाटते. म्हणजे मुळात त्याला जागे करायचे म्हणजे ते एक दिव्य काम, आणि तो उठल्यावर लागलीच काम सुरू करणा नाही कारण झोपेनंतर त्याला आलेली जांभई संपायलाच सहा महिने लागत असणार, असा एक अंदाज करता येईल. त्यानुसार एखादे काम किंवा घटना किती वेळ घेते आणि तो वेळ म्हटला तर वैतागाचा, त्रासाचा असू शकतो, यावरून 'सहा' चे आयोजन असावे. उदाहरणार्थ - 'कपिलाषष्ठीचा योग' = फार काळाने एखादी घटना घडणे. त्या अनुषंगाने एखाद्या नोकराला काम सांगितले तर तो ते पूर्ण करण्यास इतका वेळ लावेल की, पुन्हा त्याला काम सांगताना यजमान वैतागाने म्हणू शकेल "याला सांगू नका. त्याची जांभई सहा महिन्याची असते."
२. अठरा विसे : 'विश्वे' नसून विसे = १८ गुणीले २० बरोबर ३६० म्हणजेच वर्षांचे बारा महिने ३६० दिवस तुमच्यावर दारिद्रयाचे सावट राहाणार, अशी व्युत्पत्ती या अगोदरही वाचनात आली होती.
३. आकाशपाणी = या अनुषंगाने ताड आणि माड यांचा उल्लेख नवा वाटला. इथे "हरभर्याच्या झाडावर चढवू नका" या वाक्प्रचाराची आठवण झाली.
(अवांतर : भिड्यांच्या या पुस्तकात "टोमणा मारणे" बद्दल काही उल्लेख आढळतो का ? म्हणजे याचा अर्थ Taunt होतो हे माहीत आहे, पण हा 'टोमणा' प्रकार काय आहे? शस्त्र वा हत्यार ? की एखादे निरुपद्रवी खेळणे ?)
अशोक पाटील
तार्किक दृष्ट्या विचार करता अशक्य वाटते
आणि तो उठल्यावर लागलीच काम सुरू करणा नाही कारण झोपेनंतर त्याला आलेली जांभई संपायलाच सहा महिने लागत असणार, असा एक अंदाज करता येईल. >>
मला वाटतं असा अंदाज करणे योग्य ठरणार नाही. सामान्य मानव सात तास झोपतो तर झोपेनंतर त्याला आलेली जांभई संपायला सात तास लागतात का? तद्वतच कुंभकर्ण जर सहा महिने झोपत असेल तर proportionally त्याला आलेली जांभई सहा महिने न टिकता फार तर तीन चार दिवस / आठवडा भर टिकत असावी.
असो. ही केवळ एक शक्यता झाली. इथे या सर्व बाबी वास्तविक आहेत की काल्पनिक याचाच पत्ता नाही. आपण केवळ अंदाज लावत बसायचे. ठामपणे काहीच सांगता येत नाही.
पुराणातील वानगी
"ठामपणे काहीच सांगता येत नाही."
~ अगदी अगदी. योग्य मुद्दा आहे तुमचा चेतन जी. त्यामुळेच पुराणातील दाखले देताना त्याची सांगड आताच्या परिस्थितीशी लावताही येत नाही. मला वाटते त्या तर्कसंगतीतूनच पुढे "पुराणातील वानगी पुराणातच ठेवावीत" असा एक वाक्यप्रचार मराठी भाषेत रूढ झाला. [त्याचाही अपभ्रंश "वांगी" असा झाला होता, जो चुकीचा ठरला.]
अशोक पाटील
लेख
लेख अत्यंत आवडला ! अनेक वाक्प्रचार माहिती होते , पण काही नवेही समजले.
असेच इतर ऐकलेले काही :
१. उलटी अंबारी हाती येणे : हा वाक्प्रचार आम्ही आमच्या एका ज्येष्ठ स्नेह्यांकडून लहानपणी बर्याचदा ऐकला. "खेळताय कसले, अभ्यास करा. उलटी अंबारी हाती येण्याची लक्षणं".
(जणू काय आम्ही अंबारीत फिरणार्या कुठल्या तरी सम्राटाचेच वंशज !)
२. "आक्काबाई आठवणे" : याची व्युत्पत्ती माहिती नाही. पण "दुर्बुद्धी सुचणे" असा अर्थ. "काय , आक्काबाईचा फेरा आलाय वाटतं ?!" ( इति , तीर्थरूप.) यानंतर टिपिकली "चौदावे रत्न" , "श्रीमुख रंगवणे" , "तारे दिसणे" इत्यादि वाक्प्रयोगांचा डेमो होत असे.
लेख आणि प्रतिसादांतून बरीच
लेख आणि प्रतिसादांतून बरीच नवीन माहिती मिळाली. शहराजाद, तुझ्याकडून असेच रोचक लेख येत रहातील अशी अपेक्षा आहे. मी शहरात लहानाची मोठी झालेली, बैल गेला आणि झोपा केला याचा अर्थ मला खूप उशीरा समजला.
घरातल्याच म्हणता येतील अशा एका वडीलधार्यांकडून एक वाक्प्रचार ऐकला होता. त्यांनी ना त्याचा अर्थ सांगितला ना व्युत्पत्ती! आत्ता त्याचा अर्थ विचारण्यासाठी योग्य धागा आहे असं दिसत आहे, पण अश्लीलताविरोधकांची थोडी काळजी वाटते. त्यांनी कृपया पांढर्या रंगातला प्रतिसाद वाचू नये. तो वाक्प्रचार होता "ढुंगणात आवळे उकळणे".
अवांतरः तुकारामांच्या ओव्यांमधली 'भले त्यासी देऊ गांडाची लंगोटी' या ओवीचं संपादन करणार्यांच्याच मनात अश्लीलता असेल काय?
मूळ ओवीची मोडतोड
अदितीने वरील प्रतिसादात तुकारामाच्या त्या प्रसिद्ध ओवीतील एका अर्ध्या ओळीचा उल्लेख केला आहे. त्या एका ओळीचे पांढरपेशी (वा अनावश्यक) असे संपादन नंतरच्या "सुशिक्षित" म्हटल्या वा समजल्या गेलेल्या जनाने का केले याचे विश्लेषण इथे अपेक्षित नसले तरी कोणत्याही कारणाने का होईना त्याचा तुकारामाना अभिप्रेत असलेला अर्थही बदलून टाकला (विशेषतः बाळासाहेब ठाकरे यानी 'मार्मिक' साठी ती ओवी साप्ताहिकाचे पताका-घोषवाक्य बनवून मुखपृष्ठावर झळकविले त्या वेळेपासून).
"भले तरी देऊ कासेची लंगोटी | नाठाळाचे माथी देऊ काठी |" असा मराठी मनाला सुखावणारा बदल ओवीत करून 'आम्ही वेळ आली तर याचकाला कासेची लंगोटीही देऊन त्याची अब्रु वाचवू, पण नाठाळ समोर आला तर त्याच्या माथी काठी हाणल्याशिवाय राहणार नाही" असा सज्जड दम इथे ध्वनीत केला गेला, जो आकर्षक असल्याने मराठी मनाला भावलाही.
पण संत तुकारामाच्या मनी वसलेले मानवी जीवनाचे नियमन असे उग्र नसून त्यांच्या रचनेतील दिलदारपणा आणि प्रतिकारामागील शांतचित्तता दर्शविते. हे अशावेळी समजेल की मूळ ओवी पूर्ण स्वरूपात वाचली तरच. ती अशी आहे :
मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥१॥
मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जो जें मागे तें तें देऊं ॥ध्रु.॥
भले तरि देऊं गांडीची लंगोटी । नाठ्याळा चि गांठीं देऊं माथां ॥२॥
मायबापाहूनि बहू मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि ॥३॥
अमृत तें काय गोड आम्हांपुढें । विष तें बापुडें कडू किती ॥४॥
तुका म्हणे आम्ही अवघे चि गोड । ज्याचें पुरे कोड त्याचेपरि ॥५॥
- ओवीतील दुसरी ओळ "जो जो जो जे मागे ते ते देऊ" अर्थ स्पष्टच करते की, मागणार्याने कधीही काहीही मागितले तरी आम्ही विष्णुदास यथाशक्ती ते देणारच. पुढील ओळीत ती "थरो कमिटमेन्ट" येतेच "मग मागणार्याने गांडीची लंगोटी मागितली तरी देणार वा नाठाळाने काठी मारण्यासाठी माथे मागितले तरी नाही म्हणणार नाही."
- कालौघात जसे म्हणी आणि वाक्यप्रचारांचे अर्थ वा मोडतोड होत गेले, त्याच चालीवर आणि रितीने तुकोबांच्या त्या प्रसिद्ध ओवीचेही झाल्याचे दिसते. अदिती विचारते त्याप्रमाणे ओवीच्या मजकुराचे संपादन करण्यामागे "अश्लिलता" हे एक कारण असूही शकेल, पण पूर्ण ओळीचा अर्थ आपल्याला हवा तसा प्रखरपणे प्रकटने हे नंतर गरज बनल्याने पुढील मजकूरातही आवश्यकतेनुसार फेरबदल झाल्याचे दिसते.
अशोक पाटील
रडत राऊत, पुराणातली वांगी इ.इ.
धाग्याचा विषय असलेल्या पुस्तकाप्रमाणेच आल्फ्रेड मॅनवेरिंग (चर्च मिशनरी सोसायटी) ह्यांचे Marathi Proverbs हे १८९९ साली छापलेले पुस्तक पाहावे. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेनुसार ह्या विषयावरचे ते पहिलेच पुस्तक आहे. एकूण १९१० म्हणींचा संग्रह येथे आहे. पुस्तक archive.org येथे उपलब्ध आहे आणि शोधपेटीमध्ये Manwaring असे घातल्यास मिळेल.
ऋषिकेश ह्यांनी विचारलेल्या 'रडत राऊत'बद्दल मॅनवेरिंग पुस्तकात पुढील म्हण दिली आहे, अर्थ स्पष्ट आहे: 'रडता राऊत घोडयावर बसवला तर मेल्याची खबर आणतो'.
अशोक पाटीलः 'पुराणातील वांगी पुराणात' ह्या म्हणीची गोष्ट मॅनवेरिंग पुस्तकात पुढीलप्रमाणे दिली आहे. एक पुराणिक कथा सांगत असतांना कोठेतरी वांगी निषिद्ध असल्याचा उल्लेख आला. पुराणिकबुवांची बायको पुराण ऐकत होतीच तिने हे लक्षात ठेवले. नंतर भाजी घेऊन ती घरी गेली पण भाजीत तिने वांगी खरेदी केली नाहीत. पुराणिकबुवा घरी आले आणि जेवायला बसले. जेवतांना त्यांनी वांग्याची भाजी मागितली तेव्हा बायकोने पुराणातील कथेची त्यांना आठवण करून दिली. तेव्हा पुराणिकबुवा तिला म्हणाले: 'पुराणातली वांगी पुराणातच बरी'.
मॅनवेरिंग पुस्तकात 'बापाची पेंड' आणि 'घोडे पेंड खाते' ह्यांबद्दल काही उल्लेख नाही. भिडेशास्त्रींच्या पुस्तकात आहे काय? मला माहीत असलेला त्यांचा अर्थ येथे देतो.
जुन्या मराठीत पेणा म्हणजे थांबण्याची जागा, पक्षी स्वस्थान. तुळपुळे-फेल्डहाउस ह्यांच्या जुन्या मराठीच्या शब्दसंग्रहात पृ. ४५५ येथे हया शब्दाचा उगम 'प्रयाणक' ह्या संस्कृत शब्दापासून दिला आहे आणि तशा उपयोगाची काही उदाहरणेहि दिली आहेत. 'घोडे पेण खाते' म्हणजे घोडे अडकले आहे. 'बापाची पेण' म्हणजे बापाच्या मालकीची जागा. हे मूळ अर्थ विस्मृतीत गेल्यामुळे 'घोडे पेण खाते' आणि 'बापाची पेण' ह्याऐवजी समांतर उच्चारांचे 'घोडे पेंड खाते' आणि 'बापाची पेंड' असे वापर रूढ झाले.
माहितीपूर्ण
वांग्यांबद्दलची ही गोष्ट मी पण ऐकलेली होती, पुन्हा वाचल्यावर आठवलं. मूळ उगम माहित नसणे, उच्चार आणि व्यापक अर्थामुळेही कदाचित वानगी शब्द जास्त योग्य वाटतो. पण गोष्ट मजेशीरच वाटली.
हेच का ते पुस्तक?
या पुस्तकात वापरलेल्या लिपीत अ, ण ही अक्षरं आपण वापरतो त्या नागरी लिपीपेक्षा वेगळी दिसत आहेत. अशी अक्षरं मला छत्तीसगढ राज्यात स्टेशनांच्या नावांमधे वापरलेली दिसली होती. तेव्हा गाडी जोरात पळत असल्यामुळे नीट काय ते दिसलं नव्हतं, पण आता दिसलं आणि समजलंही. या लिपीतले 'ह'ला दिलेले उकारही आजच्या लिपीपेक्षा वेगळे दिसत आहेत.
सहज चाळताना 'मेले मेंढरू आगीस भीत नाही' अशी म्हण दिसली. 'मेलं कोंबडं' कसं झालं असेल?
होय, तेच.
गूगल.बुक्सवरील आणि आर्काइज.ऑर्ग येथील पुस्तक तेच आहे. पुस्तक गूगलने तयार केलेले दिसते पण तेथे ते वाचता येत नाही. आर्काइज्अमध्ये ते उतरवता येत नाही पण ऑनलाइन, DJVU अशा माध्यमांतून वाचता येते.
'ण' छापण्याच्या वेगळ्या वळणाचे कारण असे असावे की पुस्तक इंग्लंडात छापलेले आहे. तेथे मराठीऐवजी हिन्दी छपाईचे खिळेच उपलब्ध असण्याची शक्यता अधिक म्हणून तेच वापरले असतील.
श्रवणदोषाचे परिणाम
धन्यवाद अरविंद जी -
वेळोवेळी अशा सविस्तर खुलाशांची जी माहिती उपलब्ध होत जाते, वाचायला मिळते त्यामुळे या संदर्भातील स्वतःजवळील ज्ञान किती चांगल्याप्रकारे 'अपडेट' होते याची झलक तुमच्या प्रतिसादातून मिळाली. तरीही मी काही ठिकाणी [अगदी लिखित स्वरुपात] "वानगी" = उदाहरण, या अर्थाने 'पुराणाचा' संबंध आहे असे वाचले आहे. म्हणजे आजच्या जमान्यात एखाद्या पतीने "बघ, पुराणात सीतेने रामासाठी कोणती दिव्ये केली होती, तशी तू करशील का माझ्यासाठी ?' असा दाखला दिला तर आजची सीता आपल्या रामरावाला "ठेवा तुमची पुराणातील वानगी पुराणातच" असे उत्तर देईल. इथे 'वांगे' येणार नाही (असा माझा समज आहे, जो कदाचित चुकीचाही असू शकेल, असे तुमच्या वाचनावरून दिसते.)
जनसामान्यांना कित्येकवेळा या विषयावरील लिखित वाङमय चटदिशी उपलब्ध होत नसल्याने (किंवा अल्पशिक्षितांना त्याची आवश्यकताही वाटत नसल्याने) बर्याचवेळा मौखिक मार्गातून श्रवण झालेल्या आणि त्यामुळेच त्या तशाच मनी वसल्याने अशा म्हणी+वाक्यप्रचारातील काही रचना, दोष अपभ्रष्ट होतात (होत असावेत). जरी मूळ अर्थ बदलत नसला तरी त्या म्हणीचे तसे 'भ्रष्ट' वा 'मोडतोडी'चेच रूप मग पुढे कुणीतरी प्रथितयश लेखक (उदा.पु.ल.देशपांडेसकट कित्येकांनी, जवळपास सर्वानीच, "घोडे पेंड खाते" असाच आपल्या लिखाणात उल्लेख केल्याचा आढळेल) तीच रचना आपल्या पुस्तकात घेतो आणि मग तो प्रघात कायमचा रुजतोच. शासनही अशा लेखकांचे साहित्य क्रमिक पुस्तकासाठी वापरताना त्यावर योग्य ते संस्कार (परत तेच घोड्याचे उदाहरण) करत असल्याचे बिलकुल दिसत नाही.
श्रवण वा उच्चार दोष असूनही काही म्हणी/वाक्यप्रचार असे काही इथल्या मातीत घट्ट बसले आहेत की त्यांचे मूळ रूप दाखविले तर ते मनाला पटत नाही. उदा. "ताकास तूर लागू न देणे". शाळाकॉलेजीसमधील मराठी भाषेच्या शिक्षका/प्राध्यापकांपासून भाषेच्या अभ्यासकांनी अगदी याच शब्दांचा आमच्यावर मारा करून त्याचा अर्थ "गुपिताबद्दल कसलाही थांगपत्ता न लागू देणे" असेच बजावले होते. पुढे श्री.कोल्हटकर यांच्यासारख्याच एका अभ्यासकाने ह्या म्हणीची श्रवणदोषाने अशी रचना झाली असून यातील 'ताक' हे "ताग" शब्दाचे भ्रष्ट रूप आहे. एक पेय म्हणून वापरत असलेल्या ताकाचा आणि तुरीचा बादरायण संबंध येणे शक्य नाही. शेतकर्यांसाठी लागवडीच्यावेळी एक ताकीद दिली जाते, ती अशी की तागाचे रोप आणि तुरीचे रूप ही सुरुवातीला अगदी सारखी दिसतात. परंतु त्यांचे गुणधर्म पूर्णपणे विरोधी असतात. निसर्गतः तागाच्या पोटी फार उष्णता असल्याने पुढे जशी त्याची वाढ फोफावते त्यावेळी साहजिकच त्यातील उष्णतेचे प्रमाणही वाढते म्हणून ताग व तूर यांची लागवड एकत्र केल्यास तूर तागाच्या उष्णतेने मरून जाईल. यासाठी शेतकर्याने पिकाची लागवड करताना तागाशेजारी तूर लावू देत नाहीत. थोडक्यात "असंगाशी संग" नको या चालीनुसार 'तागास तूर नको" असे मूळचे रूप श्रवणदोषामुळे 'ताकास तूर लागू न देणे" असे प्रचलित झाले.
अशी कितीतरी उदाहरणे या निमित्ताने चर्चेला घेता येतील इथे.
अशोक पाटील
लेख छान आहेच वाद नाही पण
लेख छान आहेच वाद नाही पण शिर्षक योग्य नाही. ओढून ताणून शिर्षकाशी लेखनाचा संबंध लावता येईल. बादनारायण संबंधाने "शेंदाडशिपाई आणि सहा महिन्यांची जांभई" किंवा "प्रथम वंदे पाप्याचे पितर असेही" हेही लेखनाचे शिर्षक होवू शकले असते.
भिडेशास्त्र्यांनी लिहिलेले "मराठी भाषेचे वाक्प्रचार व म्हणी": आमचे आवडते पुस्तक हे शिर्षक ठेवा.
आपण मराठीचा चांगला अभ्यास केलेला दिसतोय. अजून असेच चांगले चांगले लेख लिहून त्याचे प्रत्यय आणून द्या.