एक उड़ता पंछी

सुमारे दोन-अडीच वर्षांपूर्वी मी अमेरिकेतून भारतात परतण्याचा निर्णय घेतला. त्याचं कवित्व काही अजून संपेना. माझ्या स्वतःपुरतं ते कवित्व न संपणं मला समजण्यासारखं आहे, पण पाच मिनिटांची ओळख असणाऱ्या टॅक्सी ड्रायवरपासून माझ्या नातेवाइकांपर्यंत ते कवित्व अजून टिकून आहे, याचं मला फारच आश्चर्य वाटतं. त्यामुळे फार तपशीलवार आत्मचरित्र न लिहिता आणि आपल्या प्रिविलेज्ड व हेतुतः केलेल्या उलट स्थलांतराचं भान ठेवून आपल्या अनुभवाबद्दल मी या लेखात लिहून पाहणार आहे. हे लिखाण अजिबातच साक्षीभावाने केलेलं नाही.

या गोष्टीला आता दहा-बारा वर्षं झाली असावीत. मला अमेरिकेत जाऊन तीनएक वर्षं झाली होती आणि तो देश हळूहळू अंगवळणी पडत चालला होता. काही मित्रांबरोबर मी बॉल्टिमोर शहरातल्या एका अफगाण हॉटेलात गेलो होतो. हॉटेल जरा टकाटक होतं आणि मेन्युकार्डावरचा उजवा रकाना माझ्या विद्यार्थीदशेतल्या खिशाला अजून तितकासा सवयीचा नव्हता. शिवाय डावीकडचे पदार्थही ओळखीचे नव्हते. दरम्यान, आमचं बोलणं ऐकून आमच्या वेटरने आमच्याशी उर्दू-हिन्दुस्थानीत बोलायला सुरुवात केली होती. तो कराचीचा होता. त्याला कुठल्यातरी पदार्थाबद्दल मी प्रश्न विचारला होता आणि तेव्हा तो म्हणाला होता, "सर आप ये मत ऑर्डर करना. इसका नाम तो अच्छा है, लेकिन ज़ाएका इतना अच्छा नहीं." मग तो अधूनमधून येऊन गप्पा मारून जात होता. आम्ही निघताना मला म्हणाला, "आप यहीं सेटल होंगे की इंडिया वापस जाएंगे?" मी आपलं ठरलेलं "देखते है, पढ़ाई खतम होने के बाद जाऊंगा" असलं काहीतरी मोघम उत्तर दिलं असणार. त्यावर तो गोड हसून मला म्हणाला, "सर ये कंट्री है ना, ये एक सोने की जेल है. समझते हो आप? यहां से निकलना मुश्किल है." मला तेव्हा त्याच्या या म्हणण्याचा अजिबात उलगडा झाला नव्हता. मात्र, ते वाक्य कायमचं लक्षात राहिलं. इंडिअन ओशनचं 'भोर भयी… एक उड़ता पंछी जा बैठा एक डाल…' हे गाणं नंतर जेव्हा जेव्हा ऐकलं, तेव्हा दर वेळी या वाक्याची आठवण मी काढली आहे. अर्थ वळायला अजून सात-आठ वर्षं जावी लागली.

कोणत्याही नव्या देशात, माणसांत, संस्कृतीत स्थलांतर केलं, की नव्या गोष्टींशी जुळवून घेण्यात बराच वेळ, ऊर्जा खर्ची पडते. त्यात आपल्या राहणीमानात एकदम जमीनअस्मानाचा फरक पडला, की जुळवून घेताना फारच बावचळायला होतं. राहणीमानाचा स्तर खालावला, की धुसफूस करता येते. निर्बुद्ध व्यवस्थांशी जुळवून घ्यावं लागलं, की प्रचंड चिडचिड होते. भारतात परतल्यावर मी हे सगळं केलं. अजूनही करतो. मात्र, राहणीमानाचा स्तर एकाएकी उंचावतो, तेव्हा त्याच्याशी जुळवून घेतानाही प्रचंड दमछाक होते. शिवाय, या ऊर्ध्व प्रवासाशी उर्फ अपवर्ड मोबिलिटीशी सहज जुळवून घेता येतं असा एक गोड गैरसमज असल्याने अनेकवार अव्यक्त मुस्कटदाबी होते, असा माझा अनुभव आहे. घरात चोवीस तास वीज, वायफाय, नळाला चोवीस तास गार व गरम पाणी, घरात शॉवर, आजूबाजूला कुणीही दारू पिऊन हाणामाऱ्या करत नाही या सगळ्या गोष्टी मी भारतात असताना माझ्या कल्पनेतही नव्हत्या. एका विमानात बसलो आणि पलिकडे अमेरिकेत उतरलो तेव्हा एकाएकी या गोष्टी मिळाल्या. फक्त चोवीस तासांत आयुष्याचा एकदम कायापालट झाला आणि 'असं कायसं आपण केलंय म्हणून हे लाभलंय आपल्याला? डू आय डिझर्व दिस?' अशा प्रकारचे गंड लगेचच वर आले. उलट बाजूला, रस्त्यावरून चालताना कधीही चोऱ्यामाऱ्या होऊ शकतात आणि आसपास चिटपाखरू नसतं अनेकदा याचं भयही होतंच. 'घरात आपली स्वतःची खोली असणे' हे परवडायला काही काळ गेला, मात्र त्याहून जास्त काळ 'हे चालण्यासारखं आहे, नॉर्मल आहे, ही उधळमाधळ नव्हे' हे स्वतःला समजावण्यात गेला.

कदाचित म्हणूनच, याच काळात अनेकांना आयुष्यभर पुरतील असे जिवाभावाचे मैत्र मिळत जातात. मलाही मिळाले. एकत्र खाल्लेल्या खस्ता आणि एकत्र निर्माण केलेल्या आठवणी यांच्या आधारावर झालेल्या मैत्र्या चिरायू असतात. आपल्या संदर्भांना - शहर, कॉलेज, भाषा, आर्थिक वर्ग, सामाजिक वर्ग - त्यातल्या त्यात जवळ असणारे लोक बहुदा नैसर्गिकरीत्या एकमेकांच्या जवळ येत असावेत. त्यातही अल्पसंख्याक असणारे समूह जरा जास्तच एकमेकांत गुंतून आपला घेटो निर्माण करतात. नव्या संदर्भांशी जुळवून घेताना या गोतवळ्यांची मानसिक साथ तर होतेच, पण अनेकदा त्यामागे आर्थिक कारणंही असतात. 'मी कुणाशीही रूम शेअर करणार नाही', 'मी नाही देसी लोकांबरोबर राहत' असा (अनेकदा तुच्छतावादी) खाक्या असणारे भारतीय लोकही भेटतात. ते भारतीयांच्या घेटोत अडकून पडत नसतीलही, मात्र हा खाक्या त्यांच्या भारतातील आर्थिक प्रिविलेजेसच्या पायावर उभा आहे, याची त्यांना अनेकदा पुसटशीही कल्पना नसते.

परदेशात काही काळ घालवल्यावर आणि आपल्या शिक्षण-नोकरीच्या जोरावर तिथल्या मध्यमवर्गीय जगण्याशी (मूल्यांशी नव्हे!) समरसून (बरोबरीने नव्हे!) जगू लागणारे मित्रच मग एका विवक्षित टप्प्यावर एकमेकांना सहज म्हणू लागतात, "ये फालतू देसीगिरी मत कर!" या म्हणण्याचा अर्थ काय असतो? अर्थ हाच, की आता अभावग्रस्त देशातल्या अभावग्रस्त लोकांची मानसिकता सोडा आणि त्यातून वागण्याबोलण्याला चढलेली पुटं एकेक करून उतरवत चला. आता आपण एका समृद्ध देशातले तुलनेने सुबत्ता अनुभवू शकणारे लोक आहोत आणि भारतातल्या आपल्या नातलगांच्या, समाजाच्या परिस्थितीशी फटकून जास्त सुखात गिल्ट-फ्री आयुष्य जगू शकण्याचं कसब आता आपण कमावलं आहे. डॉलर ते रुपये गुणाकार करण्यापासून 'देसीगिरी मत कर' इथपर्यंतचा प्रवास आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असणाऱ्या वर्गातील लोक कुठल्या ना कुठल्या वेळी करतातच. "पंछी कहे किस गगन उडूं मैं बेहतर जो इस डाल" अशी सुखवस्तू अवस्था अनुभवतानाच अनेकदा "पंख सुनहरी शहद चढ गया, अन्तर थम गयी चाल" असं एक प्रकारचं साचलेपणही काही जण अनुभवतात. निदान मला तरी तसं वाटलं. हा अनुभव माझ्या एकट्याचाच नव्हता, पण अनेकांनी त्याच्याशी आनंदाने किंवा नाइलाजाने जुळवून घेण्याचं ठरवलेलं दिसलं. अनेकांच्या बाबतीत तर 'कुटुंबकबिला घेऊन कुठे जाणार आता?' इथपासून ते 'अशी नोकरी कुठे मिळेल आता?' इथपर्यंत परिस्थितिशरणता दिसली. मला हे साचलेपण आवडेना आणि त्यातून बाहेर येण्याचे मार्ग दिसेनात. कायदेशीर अस्तित्वाच्या प्रदीर्घ प्रक्रियेत व्यक्तीला एका चाकोरीत ढकलणारं ते आयुष्य मला डाचू लागलं होतं. इतरही काही वैयक्तिक कारणं होती. कुटुंब या संस्थेची भासणारी उणीव, रक्ताच्या माणसांबद्दल वाटणारी अनावर ओढ, आणि काही प्रमाणात 'जरी उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा' छापाचा तद्दन भाबडेपणा.

मी जेव्हा परतण्याचा निर्णय घेतला, तेव्हा माझ्या अमेरिकेत राहणाऱ्या मित्रांना किंवा माझ्या अमेरिकेतील आयुष्याबद्दल माहिती असणाऱ्या भारतातील काही नातेवाईक, मित्रांना त्यात जराही आश्चर्य वाटलं नाही. काहींना काळजी वाटली, पण त्यांनीही मनापासून पाठिंबा आणि आधार दिला. एक प्रकारे, त्यांच्या भरवशावर मी हा उलट प्रवास केला. याउलट, भारतात राहणाऱ्या आणि माझ्या आयुष्याबद्दल फार कमी माहिती असणाऱ्या नातेवाईक, मित्र, आणि तिऱ्हाइतांना मात्र हा निर्णय अद्याप झेपलेला दिसत नाही. त्यामुळे आपली तीव्र नापसंती व्यक्त करून पुन्हा अमेरिकेत जाण्याविषयीचा अनाहूत सल्ला ते वारंवार देत असतात. यात पाच मिनिटांची ओळख असलेले अनेक जणही आहेत. 'कशाला इकडे आलात तडमडायला!' असा ते जातायेता आपला उद्धार करतात. एखाद्या देशात आपण इतक्या वर्षांनी पुन्हा आलो, की काही काही गोष्टी विसरलेलो असतो. अनेक जणांना आपण जसे बारा वर्षांपूर्वी होतो, तसेच अजून आहोत, असं वाटत असतं. उलट आपणही गतकाळातल्या कडवट आठवणी विसरलेलो असतो. त्यामुळे 'आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार अनेकांनी मुक्तहस्ते स्वतःकडे घेतला आहे' याचं भारतात परतल्यापासून अनपेक्षित, सखेद आश्चर्य वाटत राहिलं. त्याची सवय मात्र करून घेता आली नाही. आणि करावी तरी कशासाठी?

कोणत्याही भाड्याच्या घरात फ्रिज, गॅस किंवा विजेवर चालणारी शेगडी/कूकिंग रेंज, ओवन, गरम पाणी, हीटर, एसी अशा सुविधा असतातच हे गृहित धरण्याची सवय झालेल्या मी भारतातल्या नव्या घरात गॅस कनेक्शन आणि शेगडी मिळेस्तोवर जाम धुसफूस केली. ती निव्वळ एकाएकी आपल्या भौतिक राहणीमानात झालेल्या बदलामुळे नव्हती. किंबहुना, ते अगदीच स्वाभाविक कारण होतं. पण सगळ्यात कहर होता तो म्हणजे हा, की एकाही व्यक्तीला माझी विवंचना समजेना. 'एकटाच तर राहतोस', 'लग्न पण नाही झालंय अजून(!)', 'कशाला पाहिजे गॅसबिस इतका?' अशी वाक्यं माझ्यावर फेकून मारणारे मलाच मूर्खात काढत होते. उलट मी 'हे लोक काय हवेवर जगतात का?', 'गॅस ही मूलभूत गरज नाही का?' असे प्रश्न स्वतःला विचारून चिरडीला आलो होतो. मला काही कळेचना आणि बरं एखाददुसरा असता तर ठीक होतं. ही अनेकांची प्रतिक्रिया असे. भारतात येताना कोणकोणत्या गोष्टींना तोंड द्यायला आपण तयार असलं पाहिजे, याचे काही ठोकताळे मनात होते. मात्र आपलं संपूर्ण अस्तित्व आपल्या एकटेपणापासून सुरू होऊन एकटेपणातच गाडलं जाणार आहे असं काही मला वाटलं नव्हतं. ब्रेन ड्रेन, 'अमेरिकेतल्या सगळ्या कंपन्यांत भारतीय डोकीच तर आहेत, मग त्यांना इथे कसं आणता येईल' अशा विषयांवर आपल्या देशातल्या लोकांना फार जाज्ज्वल्य मतं आहेत. मात्र नगास नग चार हुशार टाळकी एका छताखाली आणून गोष्टी बदलतीलच याची काही खातरी देता येत नाही. मुदलात जे बहुसांस्कृतिक, उदारमतवादी, व्यक्तिस्वातंत्र्याचा स्वीकार आणि पुरस्कार करणारं वातावरण परदेशांतल्या पाश्चिमात्य शहरांत आहे, त्याच्याबद्दल आपल्याला किती माहिती आहे? आकलन तर लांबच राहिलं.

'तुला कशाला पाहिजे स्वतःचं घर?', 'राहा की पीजीमध्ये', 'हॅ हॅ हॅ तू जणू रोज स्वयंपाकच करणार आहेस' इथपासून ऑफिसातल्याच लोकांनी सुरुवात केली. ज्यांच्याशी आपली जुजबी ओळख आहे, ते सहकर्मचारी मग मला सटली सेटल होण्याकडे नेऊ लागले. 'आधी म्हणजे तू लग्न कर, एकदा फॅमिली असली, की आपोआप कार विकत घेशील', इति एक जण. मी म्हटलं, 'पण कार विकत घेणं सोपं आहे त्याहून!' 'नो नाऊ इट इज फाईन, बट वन्स यू हॅव किड्स यू नो…' आपण एका कन्वेयर बेल्टवर अलिकडच्या टप्प्यात रुतून बसलो आहोत आणि आज ना उद्या पुढल्या टप्प्यावर जाणारच आहोत या विचारात चोवीस तास जगणं हे किती जिकिरीचं आहे! सुरुवातीला कुणीही जातायेता म्हणायचं, "ओह यू आर नॉट मॅरिड येट, लग्न नाही झालंय होय अजून." मला ते खटकत असे, कारण इतकी वर्षं फारसं कुणी मला असं जातायेता म्हणत नसे. पण, काय खटकतंय हे मला कळत नसे. मग एकदा साक्षात्कार झाल्यावर मी असं म्हणणाऱ्या एका व्यक्तीला म्हणालो, "मी लग्न केलेलं नाही, इथे वस्तुस्थिती संपली. त्याला पुढे जोडलेलं 'अजून' हे तुमचं जजमेंट आहे. ते तुमच्याकडेच ठेवा." दुर्दैवाने त्या व्यक्तीला हेसुद्धा कळलं नाही आणि मी कपाळावर हात मारून घेतला.

खरं तर प्लंबर, सुतार, ड्रायवर, न्हावी अशा अगणित श्रमजीवी लोकांवर मी डोळे झाकून विसंबत आलो आहे. इतका की काही मित्र सुरुवातीला म्हणत, 'इतकं कशाला सांगायचं? सहज फसवेल कुणीही.' दहात दोन वाईट अनुभव येतील, हे मी गृहितच धरलं होतं. मात्र गेल्या दोन वर्षांत ॲडवान्स रक्कम घेऊन गायब झालेला एक सुतारकाम करणारा माणूस वगळता मला असा काही अनुभव आलेला नाही. उलटपक्षी, त्यांची नेहमी मदतच झालेली आहे. दोनचार भाड्याची घरं तर मी या कारणासाठी बाद केली, की ते घर पाहायला जाताना उबरच्या ड्रायवरने मला सांगितलं, "इथे नका पाहू घर. इथून सकाळी तुम्हांला वाहन मिळायला फार त्रास होईल आणि इथे सकाळी ट्रॅफीकही खूप असतो." एरवी सदैव आपलं विखारी पुरुषत्व परजून वावरणारे यांतले अनेक पुरुष आपण जरा प्रेमानं बोललं, की एकदम अविश्वसनीय संवेदनेशीलतेने बोलू लागतात आणि इतक्या काय काय खाजगी गोष्टी शेअर करतात की अवाकच व्हायला होतं. अनेक भारतीय पुरुषांना त्यांच्याशी प्रेमाने बोलणारे पुरुषच उपलब्ध नाहीत असं माझं मत उत्तरोत्तर अधिकच ठाम होत चाललं आहे. मात्र संस्कृतीचं कंडिशनिंग इतकं जबरदस्त, की ही सगळी संभाषणंदेखील अंततो गत्वा त्याच पूर्वपदावर येतात. 'आता गांधी आहेत, आंबेडकर आहेत, नेहरू आहेत, परदेशात शिकून परत आले. तसे तुम्ही आता आलात' अशी सुरुवात करून मला राष्ट्रपुरुषांच्या पंक्तीत बसवणारे एका सलूनमधले न्हावी काका केसांना कात्रीही लागली नसताना पाचव्या मिनिटाला कुठवर आले असतील? 'आता झालं की वय इतकं, मग लग्न करून टाका की लवकर!' इथवर. काकांचं मत मात्र संसारातून उठून निघून गेलेल्या मोदीजींनाच आहे! 'तीस के उपर का शादी बिना रहनेवाला कोई इन्सान मुझे पता ही नहीं' असं एक ड्रायवर चारदा म्हणाला. मी त्याला म्हटलं, 'मोदीजी और राहुलजी को तो आप कुछ नहीं बोलते हो. मेरे पीछे पडे हो.' तर तो खदाखदा हसला. 'आप अकेले रहते हो? तो खाना कौन बनाता है?' हा प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तींचा निरागसपणा तर काय वर्णावा! 'हां सर, या प्लानमध्ये एक अजून एक्स्ट्रा सिमकार्ड येतं. कुणालापण द्या. तुमच्या बायकोचा फोनपण पोर्ट करा ना.' असं लोक बिनदिक्कत सांगतात. 'मैं दोपहर घर पे नहीं रहूंगा. आप सुबह आ सकते है क्या?' या प्रश्नावर पलिकडून हमखास प्रतिप्रश्न येतो, 'पर मॅडम तो होगी ना घर पे?' षटीषण्मासी एक ॲमेझॉनचं पार्सल येईल ते घ्यायला, वर्षातून एकदा कधीतरी प्लंबींगचं काम निघेल ते उरकायला आणि सहचारिणी म्हणून माझं फोन, इंटरनेट यांत अर्धा वाटा मागायला चोवीस तास घरात बसणारी एक मॅडम मी कुठून तरी आणावी अशी या सगळ्या लोकांची तीव्र इच्छा आहे. हल्लीच मी घर बदललं. जुन्या घरात काम करणाऱ्या बाई निघताना म्हणाल्या, "शादी करोगे तब बताना भैय्या!" एरवी माझ्या आयुष्यातल्या इतर कुठल्याही गोष्टीला त्यांच्या लेखी किंमत नसावी.

कुणाकुणाचा अपमान करावा? आणि कशाला इतका तरी भाव द्यावा? असा प्रश्न एकीकडे पडतो. दुसरीकडे सतत वसकन ओरडून, अपमानित करून आपली स्पेस निर्माण करावी असा काहींचा आग्रह दिसतो. पैकी दुसऱ्या गोष्टीत मला फारसा रस नसतो. लिफ्टमध्ये भेटल्यावर दोन शब्द बोलण्यापल्याड ज्यांच्याशी माझा काहीच संबंध नाही, ते काका मध्ये एकदा रॅंडमली म्हणाले, "मग लाडू कधी देणार?" मला कळेचना. "कसले लाडू?" असं मी अत्यंत निरागसपणे विचारलं. आता ज्यांचं सारं भावविश्व जगातल्या सर्वांची लग्नं व्हावीत या चिंतेने व्यापलं असेल, त्या लोकांनी या चिंता थेट बोलून दाखवाव्यात ना? पण अनेकानेक अन्योक्ती, चेतनगुणोक्ती, उपमा, उत्प्रेक्षा असले खेळ खेळतात. अनेकदा तर असं होतं, की आपला आतल्या आत होणारा त्रागा राहिला दूर, उलट मला असं वाटतं, 'हे नवीन आहे. थांबा हं लिहून ठेवतो. पुढे वापरता येईल.' लग्न न केल्यास आयुष्य जगूच नये असाही एक सूर आहे. 'एकटा असून कित्ती सामान आहे तुझ्याकडे!', 'तुला पुरेल की, तुला कितीशी जागा लागणार आहे?', 'तुला कशाला हवाय डबल बेड?', ' चादरी हव्यात का तुला? नव्या नको घेऊस. पण या ना सगळ्या डबल बेडशीट आहेत.' असली वाक्यं लोक जराही विचार न करता बोलतात. एकट्या माणसाने आयुष्य कसं जगावं याचेही काही सांस्कृतिक यमनियम आहेत. इंद्रियसंयम आणि अपरिग्रह हे त्यातले टॉपचे दोन नियम. मी तर कोणतीच भीष्मप्रतिज्ञा न करताही हा त्रास! आणि हे इथल्या आधुनिकता न रुजलेल्या रूढिवादी समाजामुळे आहे असं म्हणावं, तर हे मागासलेपण जपण्यात पुरोगामीही एकमेकांना हार जात नाहीत. त्यांचं पुरोगामित्व हेटेरोनॉर्मेटिव पुरुषसत्ताक व्यवस्थांचा समतेच्या अंगानं आंतरजातीय/धर्मीय/वंशीय/वर्णीय विस्तार करून संपलं. (हेटेरोनॉर्मेटिव या शब्दाकरता यथार्थ मराठी शब्द काय? कोण जाणे! नसावाच. कारण संकल्पनेच्या आकलनाचीच मुदलात बोंब आहे!)

मुद्दा भारत-अमेरिका तुलनेचा नाही. (आणि माझ्या लग्नाचा तर त्याहूनच नाही!) दोन्ही ठिकाणी भल्याबुऱ्या गोष्टी आहेतच. लोक आपापले निकष ठरवून पर्याय उपलब्ध असले तर आणि असतात तेव्हा स्वतःला पटणारे निर्णय घेतात. याद्या करायला बसलं, तर सकारात्मक, नकारात्मक मुद्दे लिहून एकप्रकारे खोटी बरोबरीही (false equivalence) करता येईल. पण त्याला अर्थ नाही. मुद्दा हा, की जाणीवपूर्वक उलट स्थलांतर केल्यानंतर फरक फक्त भौतिक राहणीमानात पडत नसतो, तर एकूणच आपल्या भवतालातले अनेक सांस्कृतिक, सामाजिक घटक आपल्या अनुभवांवर परिणाम करत असतात. ज्यांना पर्याय नसतो, ते झक मारत जुळवून घेतच असतात. पर्याय असतो (किंवा निदान तो आहे असा विचार करायची कुवत असते), तेव्हा या अनुभवांशी आपले निर्णय ताडून पाहता येतात. जागतिकीकरणाच्या लाटेत शेती उद्ध्वस्त झाल्याने कसंही करून अमेरिकेत येऊ पाहणाऱ्या, राहू पाहणाऱ्या निर्वासित मेक्सिकन व्यक्तीला, युद्धात जीव वाचवून निसटलेल्या आणि परदेशात आश्रय मागणाऱ्या कुटुंबांना, एका ठिकाणी छळ होतो म्हणून पळ काढणाऱ्या युगुलाला, लॉकडाऊनमध्ये असहाय्यपणे मजल दरमजल करत पायीच घर गाठू पाहणाऱ्या मजुरांना हे सगळे प्रश्न पाडून घेऊन त्याबद्दल विचार करण्याची सवडही मिळत नसावी. अमेरिका-मेक्सिको सीमेवरील निर्मनुष्य वाळवंटांनी, आफ्रिका-युरोपला जोडणाऱ्या भूमध्य सागराने, आपल्यावर डोकं ठेवून झोपलेल्या दमल्याभागल्या लोकांबद्दल अनभिज्ञ असणाऱ्या रेल्वे रुळांनी यांतल्या अनेकांचे बळी घेतले आहेत. जे जिवंत उरले आहेत, त्यांना सवड नसली, तरी हे प्रश्न पडतच नसतील कशावरून? माझ्या प्रिविलेजेसमुळे मला इतके स्वतःच्या स्थलांतराबद्दल प्रश्न पाडून घेण्याची उसंत मिळते हे खरंच, मात्र त्यामुळे त्यांची तीव्रता (माझ्यापुरती तरी) कमी होत नाही.

नागरिकत्वाचे संवैधानिक अधिकार आणि अनायास मिळणारी रक्ताची माणसं यांकरता मी व्यक्तिस्वातंत्र्याचा, कमावलेल्या गोतवळ्यांचा आणि आत्मसन्मानाच्या जगण्याचा बळी दिला. लग्नाशिवाय व्यक्तीला प्रतिष्ठा नाकारणाऱ्या आणि व्यक्तिस्वातंत्र्य कशाशी खातात याची माहितीही नसणाऱ्या समाजात राहताना याची वारंवार प्रचीती येते. याकरता नागरिकत्वाच्या अधिकारावर आणि संवैधानिक स्वातंत्र्यावर पाणी सोडून मी पुन्हा परदेशात जावं, असं कुणी सुचवलं असतं तर गोष्ट वेगळी होती. पण गंमत अशी आहे, की जे लोक मला मी पुन्हा परत परदेशी जावं असं सुचवतात, ते चुकीच्या कारणांकरता तसं सुचवतात. त्यांच्यासमोर परदेशाचं एक स्वप्नील चित्र तेवढं आहे. त्यातले खाचखळगे, गुंते त्यांना कळत नाहीत. माझ्या मनोव्यवहाराबद्दल त्यांना माहिती नाही. याच्या अगदी उलट, काहींच्या मते तडजोडी करून किंवा आदळापट करून प्राप्त भवतालाशी जुळवून घेण्यावाचून मला गत्यंतर नाही. विचारत तर मी कुणालाच नाही, तरीही दोन्ही गटांतले लोक नेमाने सल्ले देत राहतात.

फार सहजपणे आपण विचारतो, "have you adjusted there now?", " जमतंय का तिथे?" "रूळलास का आता?". चुकीचे प्रश्न विचारले, की योग्य उत्तरं मिळत नाहीत. फार वर्षांपूर्वी मी शिकत होतो त्या विद्यापीठातील माझ्या विभागाने एक सर्वेक्षण केलं होतं. तसं रूटिनच होतं, पण त्यातला एक प्रश्न मला तेव्हा नवीन होता आणि म्हणून तो लक्षात राहिला. तो प्रश्न होता - "Do you feel included? तुम्हांला इथे आपलंसं वाटतं का?" सगळेच जण आपापल्या परीने जुळवून घेण्याचा, आपल्यात बदल करण्याचा प्रयत्न करतच असतात. पण, प्रश्न आपण आणि आपलं भवताल यांतल्या परस्परसंबंधांचा असतो. विद्यार्थी शैक्षणिक वातावरणाशी जुळवून घेत आहेत का यापेक्षा भवतालात काय बदल करणं गरजेचं आहे, हे सर्वेक्षणकर्त्यांना जाणून घ्यायचं असल्याने त्यांना तो प्रश्न महत्त्वाचा वाटला असावा. पर्याय नाही म्हणून किंवा पर्याय आहेत म्हणून कोणत्याही कारणाने भवताल बदललं की अनेक प्रश्न आ वासून उभे राहतातच, मात्र आपण किती स्थितिशील असायचं हा प्रश्न भवतालाचा असतो, भवताल बदलणाऱ्यांचा नाही. नेहरूंचं एक वाक्य हल्लीच एका मित्राने उद्धृत केलं, "I have become a queer mixture of east and the west, out of place everywhere and at home nowhere." ते मला माझ्याबाबतीतही अगदीच समर्पक वाटलं. आपले स्थलांतराचे निर्णय - स्थलांतर सुलट असो की उलट - अखेर याच प्रश्नांच्या उत्तरावर योग्य किंवा अयोग्य ठरतात: आपल्याला आहोत तिथे आपलंसं किती वाटतं आणि एखाद्या मुक्कामावर कितीही रमलो, तरी आपल्या पंखांतलं पुन्हा उडण्याचं बळ शाबूत राहतं का?

(चित्र: साभार https://avyayasya.files.wordpress.com/2015/07/wpid-e9fc2ead7103009ef06d2.... कोणत्याही प्रताधिकाराचे उल्लंघन करण्याचा हेतू नाही. तसे होत असल्यास, कृपया निदर्शनास आणून द्यावे ही विनंती. चित्र तत्काळ वगळण्यात येईल.)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

प्रचंड आवडलं हे स्फुट.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेक मुद्दयांवर सह-अनुभूती आहे. लेख आवडला.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

धन्यवाद! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख अतिशय आवडला. अनेक मुद्दे आणि प्रसंग चांगलेच परिचयाचे आहेत. ('काय करायचंय तुला पैसे वाचवून/साठवून? पोरंबाळं तर नाहीत - तसंही वाळवीच तर खाणार आहे!' यासारखे उद्गारही याच जातकुळीतले. मताची पिंक टाकणे, यापरीस दुसरा सुयोग्य वाक्प्रचार नाही यांना.)

>>> आपण एका कन्वेयर बेल्टवर अलिकडच्या टप्प्यात रुतून बसलो आहोत आणि आज ना उद्या पुढल्या टप्प्यावर जाणारच आहोत या विचारात चोवीस तास जगणं हे किती जिकिरीचं आहे!
--- हे वैयक्तिक दृष्टिकोनातून झालं, पण समाजाच्या एका मोठ्या वर्गाच्या दृष्टीने या कन्वेन्शनल कन्वेयर बेल्टमधून मिळणारी सुरक्षिततेची भावना मास्लोच्या पिरॅमिडची महत्त्वाची पायरी असावी.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरक्षितता नाकारता येत नाही, मात्र जे मॉस्लोच्या पिरॅमिडच्या वरच्या थरांत पोहोचतात, तेही यातून बाहेर पडत नाहीत असं जाणवतं. शिवाय मुदलात ही सुरक्षितता नेमकी कसली आहे? असाही प्रश्न पडतो. अनेकदा आपल्या गोतवळ्यातून मिळणाऱ्या पावतीकरता (validation from peers) केलेला खटाटोप वाटू लागतो आणि त्यालाच सुरक्षितता म्हटलं जात असावं असंही वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Minding one's own business is not an Indian virtue. त्याबाबत काहीही करता येणे शक्य नाही (short of nuking the country and its people (irrespective of caste, creed, race, religion, or sex) out of existence - which is, to put it very mildly, impractical). उगाच विचार करून स्वतःच्याच डोक्याला त्रास करून घेण्यात काय हशील आहे? त्याने बाकीच्या इंडियनांवर शष्प परिणाम होत नाही, की त्यांच्या अंगाला भोके पडत नाहीत.

त्यात पुन्हा, भारतात परत जाण्याचा निर्णय तुम्ही स्वतः, स्वखुशीने, कोणीही तशी सक्ती केलेली नसताना घेतलात. (तुमचे तर लग्नसुद्धा झालेले नाही. नाहीतर अनेकदा बायकांना या विषयावरून नॅग करण्याची हुक्की अधूनमधून येते. अनेक (दक्षिण आशियाई?) बायकांमध्ये ही (relative) सुख बोचण्याची आत्मघातकी जीन आढळते. त्या बाबतीत - you may not know it yet, परंतु - तुम्ही सुखी आहात.) मग अशा परिस्थितीत, स्वतः होऊन खड्ड्यात उडी मारल्यावर, रडण्यात काय अर्थ आहे?

(नाही, अमेरिका काही फार मोठी परफेक्ट आहे, अशातला मुळीच दावा नाही. किंबहुना, गेल्या बारा वर्षांतला रिपब्लिकनांचा नि गेल्या चार वर्षांतला ट्रम्पचा नंगानाच पाहता, it is getting from bad to worse, एवढेच म्हणू शकतो. (मुळात Make America Great Again या उक्तीत, अमेरिका ग्रेट नाही, याचीच प्रांजळ कबुली नव्हे काय? भले त्यामागे अमेरिका कधीतरी ग्रेट होती, असे (चुकीचे) गृहीतक असले, आणि अमेरिकेचा ऱ्हास मुळात या MAGA म्हणणाऱ्या मंडळींनीच घडविला, ही बाब गाडून टाकण्यात आलेली असली, तरीही?) परंतु, अमेरिका हा जर (सोन्याचा, किंवा कसलाही) कैदखाना असेल, तर भारत हा (कसला, ते तुम्हीच ठरवा, परंतु) death row आहे - येथे फक्त समाजाचे torture सहन करीत, स्वत्व गमावून, मरणाच्या तारखेची वाट पाहात खितपत पडून राहायचे, झाले. मात्र, हे दुरून लक्षात येत नाही.)

मात्र, राहणीमानाचा स्तर एकाएकी उंचावतो, तेव्हा त्याच्याशी जुळवून घेतानाही प्रचंड दमछाक होते. शिवाय, या ऊर्ध्व प्रवासाशी उर्फ अपवर्ड मोबिलिटीशी सहज जुळवून घेता येतं असा एक गोड गैरसमज असल्याने अनेकवार अव्यक्त मुस्कटदाबी होते, असा माझा अनुभव आहे. घरात चोवीस तास वीज, वायफाय, नळाला चोवीस तास गार व गरम पाणी, घरात शॉवर, आजूबाजूला कुणीही दारू पिऊन हाणामाऱ्या करत नाही या सगळ्या गोष्टी मी भारतात असताना माझ्या कल्पनेतही नव्हत्या. एका विमानात बसलो आणि पलिकडे अमेरिकेत उतरलो तेव्हा एकाएकी या गोष्टी मिळाल्या. फक्त चोवीस तासांत आयुष्याचा एकदम कायापालट झाला आणि 'असं कायसं आपण केलंय म्हणून हे लाभलंय आपल्याला? डू आय डिझर्व दिस?' अशा प्रकारचे गंड लगेचच वर आले.

मात्र त्याहून जास्त काळ 'हे चालण्यासारखं आहे, नॉर्मल आहे, ही उधळमाधळ नव्हे' हे स्वतःला समजावण्यात गेला.

हीच, हीच ती ब्लडी हिंदू, ममव, सेल्फ-डिफीटिस्ट, गांडू मनोवृत्ती! साल्यांना कोणी आपण होऊन, प्रेमाखातर, स्वखर्चाने अमृत जरी पाजले, तरी, 'नको, नको, आमची काय लायकी आहे काय अमृत पिण्याची?' म्हणून नाकारतील. वर पुन्हा 'सोने आणि माती आम्हां समान ते चित्तीं' वगैरे फंडेसुद्धा मारतील. आमच्या थेरडेशाहीत असले नमुने पुष्कळ पाहिले. खरोखरच लायकी नव्हती साल्यांची. ही असली डिफीटिस्ट ॲटिट्यूड बाळगणारा समाज हा गुलामगिरीतच राहण्याच्या लायकीचा असतो. उगाच नाही इंग्रजाने हिंदुस्थानवर दीडशे वर्षे राज्य केले!

अर्थात, असे विचार तुमच्या मनात यावेत, हा तुमचा दोष नव्हे. पारंपरिक सामाजिक संस्कार (कंडिशनिंग) याला कारणीभूत आहे. त्या वातावरणातून बाहेर पडल्यावर सुरुवातीला थोडा काळ याचा त्रास होतो. (ओल्ड हॅबिट्स डाय हार्ड.) परंतु हळूहळू शिकतो माणूस.

(अवांतर: या 'कशास ते? आम्हांस नको!' ॲटिट्यूडमागे, 'कुड देअर बी अ कॅच इन इट?'च्या अनामिक भीतीचाही एखादा सुप्त काँपोनेंट असू शकेल काय?)

एका सलूनमधले न्हावी काका केसांना कात्रीही लागली नसताना पाचव्या मिनिटाला कुठवर आले असतील? 'आता झालं की वय इतकं, मग लग्न करून टाका की लवकर!' इथवर.

आमच्या एका (तेव्हा अविवाहित) मित्राची या बाबतीत निरीक्षणे होती. दोन किंवा अधिक देशी लोकांचा समूह एकत्र आला, की त्यांच्यात बोलण्याचे विषय काय असतात? तर, एक तर, "क्यों भाई, गाड़ी कैसी चल रही है?" किंवा मग, (घोळक्यातील एखाद्या अविवाहितास टार्गेट करून) "क्यों भाई, शादी कब कर रहे हो? जल्दी करो!" बस, एवढे दोनच!

त्यातल्या दुसऱ्या प्रकाराबद्दलचे त्याचे मत शोचनीय होते. त्याचे म्हणणे, "मी या भोसडीच्यांना कधी विचारायला जातो काय, की भाई, तुम्हारा अगला बच्चा कब आ रहा है? जल्दी करो! म्हणून? मग हेच का माझ्या असे मागे लागतात?" बिचारा अविवाहित होता; त्याला काय ठाऊक, की आपल्या दक्षिण आशियाई समाजांत विवाहितांना असले प्रश्न तोंडावर विचारणारे नि असली घाई करणारे - नि त्यापेक्षासुद्धा, त्यात काही गैर आहे, हे गावीसुद्धा नसणारे - महाभाग पुष्कळ भेटतात, म्हणून?

'तीस के उपर का शादी बिना रहनेवाला कोई इन्सान मुझे पता ही नहीं' असं एक ड्रायवर चारदा म्हणाला. मी त्याला म्हटलं, 'मोदीजी और राहुलजी को तो आप कुछ नहीं बोलते हो. मेरे पीछे पडे हो.'

मोदीजी काय, किंवा राहुलजी काय, एरवी कसेही असतील, परंतु, (टू देअर क्रेडिट) लोकांना 'तू लग्न का नाही केलेस अजून?' किंवा 'तुम्हाला मुले कशी झाली नाहीत अजून?', असले प्रश्न विचारीत हिंडत नाहीत. (म्हणजे, निदान, असे काही ऐकलेले तरी नाही.) त्यांच्या (दोघांच्याही) भक्तांनी त्यांचा हा कित्ता गिरविण्यासारखा आहे.

नेहरूंचं एक वाक्य हल्लीच एका मित्राने उद्धृत केलं, "I have become a queer mixture of east and the west, out of place everywhere and at home nowhere." ते मला माझ्याबाबतीतही अगदीच समर्पक वाटलं.

Well, at least, now you are a queer mixture of whatever and whatever. Had you stayed back, you would have remained a pure, one hundred percent bloody Indian.

नागरिकत्वाचे संवैधानिक अधिकार आणि अनायास मिळणारी रक्ताची माणसं यांकरता मी व्यक्तिस्वातंत्र्याचा, कमावलेल्या गोतवळ्यांचा आणि आत्मसन्मानाच्या जगण्याचा बळी दिला.

रक्ताची माणसे, रक्ताची नाती, झालेच तर विस्तृत परिवार-गोतावळा वगैरे हा एक अत्यंत ग्रोसली ओव्हररेटेड प्रकार आहे. त्यापेक्षा कट्टर शत्रू परवडले - ते निदान उघडपणे दुःस्वास तरी करतात. एक वेळ (तेवढेच डेस्परेशन आल्यास) पाकिस्तान्याला किंवा किरिस्तांवाला (किंवा अगदी रिपब्लिकनालासुद्धा) जवळ करावा, परंतु रक्ताच्या नात्याचा मनुष्य सामोरा आल्यास, हातात गावेल तो धोंडा त्याच्या टाळक्यात घालावा, नि रस्ता क्रॉस करून शीळ घालत चालते व्हावे.

त्यामुळे 'आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार अनेकांनी मुक्तहस्ते स्वतःकडे घेतला आहे' याचं भारतात परतल्यापासून अनपेक्षित, सखेद आश्चर्य वाटत राहिलं.

तुम्हाला हे अनपेक्षित होते, आणि आश्चर्यकारक वाटले, याचेच आश्चर्य वाटते. आम्हाला ही गोष्ट भारत सोडण्याच्या कितीतरी आधीपासून ठाऊक होती. किंबहुना, भारत सोडण्याच्या डेस्परेशनमागे ते एक प्राथमिक कारण असावे.

फार सहजपणे आपण विचारतो, "have you adjusted there now?", " जमतंय का तिथे?" "रूळलास का आता?". चुकीचे प्रश्न विचारले, की योग्य उत्तरं मिळत नाहीत. फार वर्षांपूर्वी मी शिकत होतो त्या विद्यापीठातील माझ्या विभागाने एक सर्वेक्षण केलं होतं. तसं रूटिनच होतं, पण त्यातला एक प्रश्न मला तेव्हा नवीन होता आणि म्हणून तो लक्षात राहिला. तो प्रश्न होता - "Do you feel included? तुम्हांला इथे आपलंसं वाटतं का?"

Do I feel included here? I do not know; may be, may be not. Do I feel like I belong here? I am not sure; perhaps, probably not. That may or may not be relevant. On the other hand, did I feel included back in India, either? Did I really feel like I belonged there? That is the real question to be asked.

In spite of my citizenship, I may or may not truly belong here, whatever that may mean. Perhaps, I belong nowhere. But out here, I am allowed to mind my own business. At least, so far. That is what matters.

----------

'तुला कशाला हवाय डबल बेड?'

'नाहीतर मग भोसडीच्या, तुझी आई कुठे झोपेल? (बास्टर्ड!)'

'मैं दोपहर घर पे नहीं रहूंगा. आप सुबह आ सकते है क्या?' या प्रश्नावर पलिकडून हमखास प्रतिप्रश्न येतो, 'पर मॅडम तो होगी ना घर पे?'

'आप की माँजी मेरे घर में भला क्यों होंगी?'

या असल्या प्रश्नांना ही असलीच उत्तरे योग्य आहेत. परंतु, दुर्दैवाने, ती आपल्याच्याने दिली जाऊ शकत नाहीत. गांडू संस्कार आड येतात.

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ3

भारत हा (कसला, ते तुम्हीच ठरवा, परंतु) death row आहे - येथे फक्त समाजाचे torture सहन करीत, स्वत्व गमावून, मरणाच्या तारखेची वाट पाहात खितपत पडून राहायचे, झाले.

इतकी वाईट परिस्थिती नाहीये हो! सकस आयुष्य जगणारे भारतातील शेकडो लोक मला माहिती आहेत. By extrapolation तसे लक्षावधी असणार. आणि त्यासाठी फार बंडखोरी किंवा माणूसघाणेपणा करावा लागतो अशातलाही भाग नाही. हां - शहाणपणा (wisdom या अर्थाने) मात्र असावा लागतो. आणि जगाच्या पाठीवर कुठेही सकस जगण्यासाठी तो लागतोच ह्मणा.

रक्ताची माणसे, रक्ताची नाती, झालेच तर विस्तृत परिवार-गोतावळा वगैरे हा एक अत्यंत ग्रोसली ओव्हररेटेड प्रकार आहे. त्यापेक्षा कट्टर शत्रू परवडले - ते निदान उघडपणे दुःस्वास तरी करतात. एक वेळ (तेवढेच डेस्परेशन आल्यास) पाकिस्तान्याला किंवा किरिस्तांवाला (किंवा अगदी रिपब्लिकनालासुद्धा) जवळ करावा, परंतु रक्ताच्या नात्याचा मनुष्य सामोरा आल्यास, हातात गावेल तो धोंडा त्याच्या टाळक्यात घालावा, नि रस्ता क्रॉस करून शीळ घालत चालते व्हावे.”

हे वाचून वाईट वाटले. यातील अतिशयोक्तीचा आणि dark humour चा भाग वगळूनही. रक्ताची नाती नसलेले काही लोक खूप जवळचे असू शकतात, आणि तद्वतच, रक्ताची नाती असलेले काही लोक दुरावलेले असू शकतात. पण रक्ताच्या नात्यांबद्दल सरसकट एवढी घृणा उत्पन्न होण्यासाठी आयुष्यात फारच वाईट गोष्टी घडाव्या लागत असणार. तश्या ज्यांच्या बाबतीत घडल्या असतील, त्यांच्याबद्दल सहानुभूती (आगंतुकपणेच) व्यक्त करतानाच, त्यांनी जरा आत्मपरीक्षण करून पहावे असाही विचार मनात येतो.

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

जी गोष्ट वारंवार डोक्यात येते ती करून टाका. बाकीच्यांचं सोडा. अर्थात हासुद्धा एक सल्लाच झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी मार्मिक लेख आहे. काही वर्षांपूर्वी भारतात परतायचं अगदी नक्की केलं होतं. ते हिंदी सिनेमांत ठान वगैरे लेतात ना, तसलं. त्यावेळी यातल्या बऱ्याच गोष्टींची अँटिसिपेटरी आवृत्ती बघायला मिळायची.

बाकी नबांशी गांडू संस्कारांबद्दल सहमत आहे. कधीतरी रन लोला रनसारखा सिनेमा कोणीतरी काढला पाहिजे, ज्यात पडद्याचे उभे दोन भाग करायचे. दोन्हीकडे एकच प्रसंग, पण उजव्या बाजूला नायक/नायिकेच्या गां०सं०युक्त प्रतिक्रिया, आणि डाव्या बाजूला गां०सं०मुक्त.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

लेख आवडला. माझ्या अनुभवानुसार हा भोचकपणा ही फक्त भारतातच दिसणारी वृत्ती आहे असे नाही. तेव्हा तुम्ही स्थलांतर केलंय म्हणून हे अनुभव येताहेत असं काही वाटून घेऊ नका. अमेरिकेतील भारतीयही तितकाच भोचकपणा दाखवतात. आणि तिथं गरजेपोटी देशी क्राऊडला थोडंफार चिकटून राहावंच लागतं. किंबहुना भारतातल्या देशींच्या तुलनेत अमेरिकेतील देशी हे वर नबा म्हणतात तसे जास्तच bloody Indian राहिलेत.

तर लग्न केलं का? का नाही केलं? (केल्यावर) आता गुड न्यूज कधी? बरीच वर्षं काही न्यूज दिली नाही की त्याबाबत सल्ले! (मला मूल नव्हतं तेव्हा एका अमेरिकन देशी आगंतुकाने मी सिगारेट ओढतो का आणि त्यावरुन फर्टिलिटीचे काही दोष आहेत का वगैरे चर्चा माझ्याशी सुरु केली होती. आता बोला!) एक मूल असलं की दुसरा चान्स कधी घेणार? बायको नोकरी करते का? करत असेल तर मुलाला कसं डेकेअरमध्ये ठेवता अरेरे? करत नसेल तर घरी बसून काय करते माश्या मारते का? वगैरे वगैरे प्रश्नांपासून देशी क्राऊड असेल तर सुटका नाही.
जास्त मनाला लावून न घेता असे प्रश्न टोलवून लावायचे. चांगला टाईमपास होतो.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना भारतातल्या देशींच्या तुलनेत अमेरिकेतील देशी हे वर नबा म्हणतात तसे जास्तच bloody Indian राहिलेत.

केल्याने देशाटन सर्वच इंडियनांतले ब्लडित्व लोप पावते, असा दावा केलेला नाही; किंबहुना, तसा मुळीच दावा नाही. (संदर्भाकरिता, माझ्या (तेव्हा अविवाहित) मित्राच्या अनुभवांचा ज़िक्र केलेलाच आहे; सदरहू मित्र प्रस्तुत अनुभव घेतेवेळी अमेरिकेत स्थित होता.) माझे विधान हे "I have become a queer mixture of east and the west, out of place everywhere and at home nowhere." या नेहरूक्त स्थितीस पोहोचण्यास क़ाबिल असणाऱ्या (दुर्मिळ) इंडियनांकरिता होते.

जास्त मनाला लावून न घेता असे प्रश्न टोलवून लावायचे. चांगला टाईमपास होतो.

सहमत आहे, परंतु... अंमलात आणायला कठिण आहे. (हे जर आपल्याला जमले असेल, तर, संत आहात, तथा पोहोचलेले आहात, एवढेच सुचवू इच्छितो.)

बाकी ठीक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

केल्याने देशाटन सर्वच इंडियनांतले ब्लडित्व लोप पावते, असा दावा केलेला नाही; किंबहुना, तसा मुळीच दावा नाही.

याउलट देशाटन केलेले इंडियन हे ब्लडी असण्याची शक्यता बरीच जास्त असते असा माझा दावा आहे. त्यांनी आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर देशाटन केले आहे, यावर ते ८०च्या, ९०च्या किंवा २००० च्या भारतीय दशकात सांस्कृतिक/मानसिकदृष्ट्या अडकून पडलेत हे अवलंबून असते. अजूनही पुलंच्या क्यासेटी ऐकणे, मो. रफी, तलत महमूद, वसंतराव वगैरे (पिक योर पॉईजन) कसे थोर वगैरेची एकसुरी टेप लावणे हे देशाटन केलेल्या इंडियनांमध्ये जास्त दिसले आहे ब्वॉ. याउलट (सँपल साईज जास्त असल्याने) भारतातल्या इंडियनांमध्ये ब्लडी ते नॉनब्लडी स्पेक्ट्रमवर बरीच मोठी रेंज दिसेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमची निरीक्षणे ठीकच आहेत, परंतु, त्यांचा इंडियनत्वाशी आणि/किंवा ब्लडित्वाशी अन्योन्यसंबंध मला शंकास्पद वाटतो.

असो. प्रस्तुत धाग्याचा हा विषय नाही, आणि त्याहीपेक्षा, तूर्तास आम्हांस टंकनकंटाळा असल्याकारणाने, सविस्तर लिहीत नाही. याबाबत अधिक यथावकाश, यथाशक्ति, यथोत्साह आणि येथेच लिहीन. तूर्तास हा केवळ रुमाल.

तसेही,

त्यांनी आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर देशाटन केले आहे, यावर ते ८०च्या, ९०च्या किंवा २००० च्या भारतीय दशकात सांस्कृतिक/मानसिकदृष्ट्या अडकून पडलेत हे अवलंबून असते.

तथाकथित सांस्कृतिक मूलस्रोताशी संपर्क तुटल्यावर हे होऊ शकते, हे मान्य करूनसुद्धा, याचा देशाटनाशी अर्थाअर्थी संबंध नसावा. वयोमानाचा एक ठराविक पल्ला गाठल्यानंतर, मनुष्याने देशाटन केलेले असो वा नसो, हे होतच असावे. शिवाय, याचा इंडियनत्वाशी अथवा ब्लडित्वाशीही संबंध नसावा.

अजूनही पुलंच्या क्यासेटी ऐकणे, मो. रफी, तलत महमूद, वसंतराव वगैरे (पिक योर पॉईजन) कसे थोर वगैरेची एकसुरी टेप लावणे हे देशाटन केलेल्या इंडियनांमध्ये जास्त दिसले आहे ब्वॉ.

हे तर सामान्य जनरेशन ग्यापचे अतिसामान्य उदाहरण झाले. याचा देशाटनाशी, इंडियनत्वाशी किंवा ब्लडित्वाशी (विशेषत्वेकरून, इंडियनत्वजन्य ब्लडित्वाशी) संबंध कसा, ते कळले नाही. (शिवाय, देअर इज़ नथिंग इन्हेरण्टली राँग अबाउट लाइकिंग वसंतराव, तलत महमूद, मो. रफी, ऑर पु.ल. ... ऑर, फॉर दॅट मॅटर, बाबूजी (मी स्वत: त्यांच्या खुराकावर वाढलेला असलो, आणि मला ते ग्रोसली ओव्हररेटेड वाटत असले, तरीही). यातले कोठलेही हलाहल कसे थोर याच्या एकसुरी टेपेचा देशाटनाशी संबंध नसावा. फार कशाला, बालगंधर्व, झालेच तर 'माँ, मैं कलकत्ते नॅहीं जॅऊँगा' हे (पंचवीस वर्षांचा घोडा देवदासच्या तोंडून) अत्यंत बालिश उच्चारांनी म्हणणारा के.एल. सहगल, हे कसे अत्युच्च कोटीचे गायक-नट होते, याची एकसुरी टेप मीही माझ्या कधीही देशाटन न केलेल्या आजोबांच्या तोंडून, मी देशाटन केल्याच्या कितीतरी पूर्वीच्या काळात, कैकदा ऐकलेली आहे. त्याचा देशाटनाशी काहीही संबंध नाही, असलाच तर जनरेशन ग्यापजन्य रनऑफदमिल नॉष्टाल्जियाशी आहे, असा माझा दावा आहे. आणि, नॉष्टाल्जिया हे सार्वत्रिक मूल्य असावे; इंडियनत्वाशी त्याचा काहीही संबंध नाही, त्यामुळे, (इंडियनत्वजन्य) ब्लडित्वाशी त्याचा संबंध जोडणे हे किञ्चित फारफेच्ड वाटते, एवढेच तूर्तास म्हणू शकतो. शिवाय, वर म्हटल्याप्रमाणे, या अशा आवडी असण्यात इन्हेरण्टली काहीही राँग नसल्याकारणाने, त्याचा ब्लडित्वाशी संबंधसुद्धा पटत नाही. तर ते एक असो.)

याउलट (सँपल साईज जास्त असल्याने) भारतातल्या इंडियनांमध्ये ब्लडी ते नॉनब्लडी स्पेक्ट्रमवर बरीच मोठी रेंज दिसेल.

भारतातल्या इंडियनांचा सँपल साइझ जास्त असणार, हे उघड आहे. तरीसुद्धा, सफरचंदांची सफरचंदांशीच तुलना करण्याच्या हेत्वर्थ, ८०च्या दशकात देशाटन केलेल्यांची तुलना देशाटन न केलेल्या त्यांच्या भारतातल्या समवयस्कांशी, ९०च्या दशकात दे. के. तुलना दे. न के. त्यांच्या भारतातल्या समवयस्कांशी, अँड सो ऑन अँड सो फोर्थ, करणे, हे (भारतातल्या गटांचा सँपल साइझ तरीही मोठा ठरण्याचा धोका पत्करूनसुद्धा) अधिक योग्य ठरेल. माझा अंदाज आहे की अशी तुलना केल्यास (या सांस्कृतिक वैयक्तिक आवडीनिवडींच्या बाबतीत तरी) दोन्हीं गटांत फारसा फरक जाणवणार नाही.

(आणि तसेही, वर म्हटल्याप्रमाणे, सांस्कृतिक वैयक्तिक आवडीनिवडी या क्रिस्टलाइज़ झालेल्या असण्याचा नि इंडियनत्वाचा आणि/किंवा (इंडियनत्वजन्य ऑर अदरवाइज़) ब्लडित्वाचा काहीही संबंध नसल्याकारणाने, हा मुद्दा तसाही मूट आहे.)

तूर्तास एवढेच.

----------

तळटीपा:

म्हणजे, असा काही अन्योन्यसंबंध आपण जोडू पाहात असलातच, तर. खरे तर त्याबद्दलही मी साशंक आहे.

अर्थात, तुमच्याबद्दल माहीत नाही, परंतु निदान आम्हाला तरी त्याने कधीच फरक पडला नव्हता म्हणा.

आधुनिक पिढीत यास टंकाळा असेही संबोधतात.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि लक्षात घेण्यासारखे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे तर सामान्य जनरेशन ग्यापचे अतिसामान्य उदाहरण झाले. याचा देशाटनाशी, इंडियनत्वाशी किंवा ब्लडित्वाशी (विशेषत्वेकरून, इंडियनत्वजन्य ब्लडित्वाशी) संबंध कसा, ते कळले नाही.

माझा अंदाज आहे की अशी तुलना केल्यास (या सांस्कृतिक वैयक्तिक आवडीनिवडींच्या बाबतीत तरी) दोन्हीं गटांत फारसा फरक जाणवणार नाही.

देशाबाहेर राहणारे आणि न राहणारे यांच्यात एक मोठी गॅप पडते आणि ती म्हणजे समकालीन लोकप्रिय संस्कृतीतल्या गोष्टींचे फॅड (आणि यथावकाश नॉस्टॅल्जिया) देशातल्या लोकांत जितकी उत्पन्न होते तितकी ती परदेशस्थ लोकांत होत नाही. उदा. मानबा म्हणजे काय, बबडू कोण, किंवा त्याआधी तुपारे म्हणजे काय त्यातले सर कोण किंवा हे मीम वगैरे -

Tu Pa Re Ma Na Ba

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

परदेशस्थ ममव ह्या मालिका पाहात नाहीत असं म्हणताय की काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजकाल पाहायचेच असले, तर वाटेल ते वाटेल तिथे मिळवून पाहाता येते, हे जरी बऱ्याच अंशी खरे असले, तरीसुद्धा, तितकी फाईट मारून पाहाणाऱ्यांचे प्रमाण त्या मानाने कमी असावे.

(अर्थात, सांस्कृतिक आवडीनिवडी आणि त्यांचे थिजणे हा प्रस्तुत धाग्याचा विषय नाही, अथवा धागाविषयाशी तो दूरान्वयानेसुद्धा संबंधित नाही. परंतु, वाटेल त्या धाग्यावर वाटेल त्या अवांतराचे वावडे आम्हांस तसेही कधीच नसल्याकारणाने, हरकत नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजूनही पुलंच्या क्यासेटी ऐकणे, मो. रफी, तलत महमूद, वसंतराव वगैरे (पिक योर पॉईजन) कसे थोर वगैरेची एकसुरी टेप लावणे हे देशाटन केलेल्या इंडियनांमध्ये जास्त दिसले आहे ब्वॉ.

सहमत आहे. माझेही ( भारतात बसून, परदेशी राहणाऱ्या मित्र/नातेवाईक यांच्या सेंपलवर आधारित) हेच निरीक्षण आहे. अनिवासी लोकच हे कढ जास्त प्रमाणात काढत असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

एक अमेरिकन कुत्रा आणि एक रशिअन कुत्रा असे पॅॅरीस मध्ये भेटतात. ओहो तुम्हाला माहित आहे हा जोक. नाही सांगत. सांगायाचा मुद्दा असा की काहीही करून मी अमेरिकेत दटके राहिलो असतो. (पण मी तेवढा नशीबवान नाही.)कारण त्या देशांत अनलिमिटेड भुंकायला मिळते.
इथला लॉकडाउन अमेरिकन स्टॅंडप कॉमेडीअनस ,तो महान डुप्लीकेट ट्रंप ह्यांच्या भरोश्यांवर
काढला. कॉलेज मध्ये असताना Art Buchwald सर्व प्रेसिडेंटच्या चड्या सोडत असे. अहाहा.
अशी लोकशाही कुठे मिळणार ?
ती मज्जा ईथे कुठे ?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे सविस्तर प्रतिक्रिया द्यायची होती पण राहून गेलं होतं.

तुझेच अनेक अनुभव मीही घेतले परत आले तेव्हा.
लग्नाशिवाय राहणाऱ्यांना समाजात प्रतिष्ठा नाही हे अगदी खरं आहे. मी सुरुवातीला असे अनेक अनुभव घेतले. आणि लग्न झालं तेव्हादेखील अनेक इरॅशनल म्हणाव्यात अशा प्रतिक्रिया मी अगदी जवळच्या नातेवाईकांकडून बघितल्या आहेत.
पण या कन्व्हेयर बेल्टवर येण्याचा निर्णय मात्र फक्त आपल्याला हवाय म्हणूनच घेतला पाहिजे. कारण एकदा का तुम्ही त्या बेल्टवर रुळलात (लग्न+मुलं) की तुम्हाला कुणीही विचारत नाही. ज्या इंटेन्सिटीने त्यांना आपल्याबद्दल लग्नाआधी उत्सुकता असते त्याच इंटेन्सिटीने नंतर ते आपल्याकडे सपशेल दुर्लक्ष करतात.
त्यामुळे आपण संसारात रमणारे आहोत असं १००% वाटत नसेल तर असल्या लोकांना भीक घालणे फार धोक्याचे ठरू शकते.

मला वैयक्तिकरित्या जितक्या वेळा "बरं झालं आपण परत आलो" असं वाटतं तितक्याच वेळा "उगाच आलो इकडे" असंही वाटतं. हे असं दोन्ही पुन्हा पुन्हा वाटल्यामुळे आता मला काहीच वाटत नाही.

लेख फार मस्त जमलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक3
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही म्हणजे, बाकी सर्व ठीकच आहे, परंतु...

मला वैयक्तिकरित्या जितक्या वेळा "बरं झालं आपण परत आलो" असं वाटतं तितक्याच वेळा "उगाच आलो इकडे" असंही वाटतं. हे असं दोन्ही पुन्हा पुन्हा वाटल्यामुळे आता मला काहीच वाटत नाही.

हे काही पटले नाही.

हे म्हणजे, समजा मी जर एखाद्या/दीला प्रथम डाव्या गालावर दिली ठेवून, आणि मग थोड्याच वेळाने त्या/तिच्या उजव्या गालावर तितक्याच जोरात वाजवली, अँड रिन्स अँड रिपीट... तर याचा अर्थ मी त्या/तिला कधी थोबाडीत मारलीच नाही?

समजा, मी एखादे दिवस ऑफिसात एक तास उशिरा पोहोचलो, आणि त्याची भरपाई म्हणून त्या दिवशी ऑफिसातून एक तास लवकर घरी आलो (कल्पना चिं.वि. जोशींकडून साभार.), आणि हा नित्यक्रम जर मी वर्षभर चालू ठेवला, तर त्या वर्षीचे वक्तशीरपणाबद्दलचे पारितोषिक मला मिळावे काय?

Two wrongs do not make a right. Multiple wrongs of the same magnitude but in opposite directions do not cancel each other out.

(नाही म्हणजे, तुमच्या दोन्हीं वाटण्यांना wrong म्हणून संबोधण्याचा उद्देश नाही - ती दोन्हीं वाटणीं आपापल्या परीने नि आपापल्या ठिकाणी ठीकच असावीत - फक्त, निष्कर्ष पटला नाही, एवढेच मांडण्याकरिता एक ॲनालॉजी दिली, इतकेच. बाकी चालू द्या.)

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

माझी अनालॉजी व्यवस्थित बरोबर आहे. तुम्ही ओढून ताणून आणलेली चुकीची आहे.
आपल्याला असंही वाटतं आणि त्याच्या उलटही वाटतं हे पुन्हा पुन्हा अनुभवल्यामुळे माझ्या निर्णयाची चिकित्सा आता मी करत नाही.
कारण कुठलाही मोठा निर्णय (लग्न करायचं/नाही करायचं, मूल होऊ द्यायचं/नाही द्यायचं, अमेरिकेत राहायचं/भारतात राहायचं) घेतला की आयुष्यात अनेकवेळा दोन्ही बाजूने असे विचार होतात. त्या सगळ्याचं फलित म्हणजे हळू हळू त्याबाबद्दल फार चिकित्सा करणे बंद होते. आणि त्यामुळे तीव्रतेने आपण आलो बरं झालं असंही वाटत नाही आणि चूक केली असंही वाटत नाही.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळ्याचं फलित म्हणजे हळू हळू त्याबाबद्दल फार चिकित्सा करणे बंद होते.

आलिया भोगासी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या ओळखीत एक आहेत. त्यांना दुसऱ्याचं काहीही चांगलं सांगताना "वो भी मरनेवाला हैं" असं म्हणायची सवय आहे.
मेरे पास होंडा हैं. उसके पास ऑडी हैं. लेकिन वो भी मरने वाला हैं.
मेरा घर ४ रूम का. उसकी हवेली हैं. लेकिन वो भी मरने वाला हैं.

त्याच्याशी बोलल्यावर लक्षात आलं की असा थेट मारायचाच विचार केला की कसलीच कटकट वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सॉरी थोडं विचित्र उदाहरण आहे पण देते. 'उंचे से उंचा बंदा, पॉटीपे बैठे नंगा' हे गाणेही मला त्याच पठडीतले वाटते. म्हणजे काही लोकं किती थोर असतात, त्यांची विचारसरणी उच्च असते, अभिनव, अत्युत्तम गुण असतात. पण या गाण्याप्रमाणे ते काहीही असो, त्या लोकांना एका विशिष्ठ खालच्या पातळीवर आणून ठेवायचं. आपल्या स्वत:च्या विचारसरणीच्या लेव्हलवर आणून ठेवायचं ... लोल. भयानक गाणे आहे!!! अतिशय भंगार हा एकच शब्द योग्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मौत और टट्टी, किसी को भी, कहीं भी, और कभी भी आ सकती है|

त्याचबरोबर, मौत और टट्टी, दोन्हीं कोणालाही चुकलेल्या नाहीत, ही फॅक्टही ॲक्नॉलेज करण्यात काही गैर नाही.

ते काहीही असो, त्या लोकांना एका विशिष्ठ खालच्या पातळीवर आणून ठेवायचं.

खालची पातळी??? लीस्ट कॉमन डिनॉमिनेटर्सना जाणणे यात खालची पातळी ती कशी काय बुवा? उलट मी तर म्हणतो, की ही जाणिवेची सर्वोच्च पातळी आहे, म्हणून! ग्रेट ईक्वलायझर्स आहेत, या दोन गोष्टी!

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Yes agreed indeed equalizers.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समजू शकतो. लोक इन जनरल इतरांच्या आयुष्याबाबत voyeuristic वाटतात आणि मग काही पाहायसारखं उरलंच नाही की वेगळी माणसं शोधतात, असं मला वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'मी कुणाशीही रूम शेअर करणार नाही', 'मी नाही देसी लोकांबरोबर राहत' असा (अनेकदा तुच्छतावादी) खाक्या असणारे भारतीय लोकही भेटतात. ते भारतीयांच्या घेटोत अडकून पडत नसतीलही, मात्र हा खाक्या त्यांच्या भारतातील आर्थिक प्रिविलेजेसच्या पायावर उभा आहे, याची त्यांना अनेकदा पुसटशीही कल्पना नसते.

उर्वरित लेखाशी बहुतांशी सहमत/(चिंजं म्हणतात तसे) सह-अनुभूत आहे. मात्र, हा एक मुद्दा समजला/पटला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अ-देसी लोकांबरोबर किंवा पाश्चिमात्य लोकांसोबत राहणे म्हणजे तुम्ही घर शेअर करू शकता, मात्र बेडरूम नाही. तशी संस्कृती पश्चिमेत नाही. ही चैन परवडायला खिसा गरम लागतो. आणि आपला नसेल, तर आपल्या आईवडलांचा लागतो. अर्थात इतकं प्रिविलेजचं आकलन 'मी नै देसी लोकांबरोबर राहत' म्हणणाऱ्यांकडे बहुतकरून नसतं असं निरीक्षण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. त्यातील बर्याचशा गोष्टींशी सहमत.
भारतात ३० वर्षे होतो. गेली ५० वर्षे अमेरिकेत सुखाने स्थायिक झालो आहे. वृत्तीने अजुनी अस्सल मराठी भारतीय आहे. अगदी जवळचे असे सर्व नातेवाईक भारतात आहेत. त्यांच्या घरी गेल्यावर घराच्यासारखे वाटते. पण बाहेर एकट्याने वावरताना बुचकळायला होते.
सांगण्याचा मुद्दा. त्यामुळे मी पूर्ण अमेरिकन किंवा पूर्ण भारतीय असे कधीच वाटत नाही. आपली स्थिती त्रिशंकू सारखी झाली आहे असे सदैव वाटते.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गावरान

मी तुमच्यात पाहण्याचा प्रयत्न करून पाहतो आहे @ गावरान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

... अर्थातच लेख आवडला, पण मनातून थोडी गंमतही वाटली. एरवी मी अशा चिकार तक्रारी खाजगीत किंवा पोलिटिकली-जाहीररीत्या केल्या आहेत. समविचारी लोक सहमत असतातच, पण पुरुष सहसा असं काही म्हणत नाहीत. ह्याचा व्यत्यासच म्हण -

एरवी सदैव आपलं विखारी पुरुषत्व परजून वावरणारे यांतले अनेक पुरुष आपण जरा प्रेमानं बोललं, की एकदम अविश्वसनीय संवेदनेशीलतेने बोलू लागतात आणि इतक्या काय काय खाजगी गोष्टी शेअर करतात की अवाकच व्हायला होतं.

भारतात, माझ्या मूळ स्वभावाला परिस्थितीची जोड मिळाल्यामुळे नातेवाईक, शेजारीपाजारी लोक फार चौकशा माझ्याकडे करायचे नाहीत. मऊ लागलंच नाही तर कोपरानं खणणार कसं! ती शंका अमेरिकेतल्या भारतीय लोकांना आली तर त्याचे गचके अजूनही बसतात. पण बरीच वर्षं या प्रकारांचं लांबून निरीक्षण करता आल्यामुळे कदाचित, जरा त्रयस्थपणा आलेला आहे.

तुझ्या अनुभवांमध्ये गंमत वाटली, ती विशेषतः गेलं दशकभर अमेरिकेत राहिल्यामुळे जाणवली. लोक व्यक्तिगत पातळीेवर भोचकपणा करतातच. तसा तो व्यावसायिक पातळीवरही होतो. सिमकार्ड विकण्यासाठी का होईना, "मॅडमना द्या दुसरं कार्डं", असं अमेरिकेत कुणी म्हणाले तर त्यांना त्याचा चांगलाच फटका मिळेल. भारतीय अघळपणा व्यावसायिक पातळीवरही दिसतो. तो भाग वाचताना मी सगळ्यात जास्त दचकले. दचकण्याचं कारण म्हणजे मी पुरेशी भारतीय राहिलेली नाही, याची जाणीव झाली!

अवांतर - गेल्या वर्षी या सुमारास आमच्या कंपनीत सगळ्यांना दोन-चार तास फोनवर ग्राहक लोकांशी बोलण्याची विनंती केली होती. मी तेव्हा गांभीर्यानं मॅनेजरला विचारलं होतं, "मी चारचौघांशी बोलणं धोकदायक आहे, हे या लोकांना कसं समजत नाही? त्यातल्यात्यात भारतीय नावं बघून मी त्यांच्याशी बोलेन फार तर." त्याला वाटलं, माझ्या नाव-हेलामुळे मी भारतीयांना जरा आपलीशी वाटेन, म्हणून मी हे म्हणत्ये. माझं म्हणणं होतं, "म्हणजे मी काही गडबड केलीच तरी त्या लोकांना ती जाणवण्याची शक्यता कमी असेल. हे मला माहीत असेल." ती गडबड म्हणजे अशा छापाचा भारतीय अघळपघळपणा! हे त्या गोऱ्या-अमेरिकी माणसाला कसं आकळणार! शक्यच नाही!!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लोक प्रोफेशनलीही अत्यंत नॉर्मेटिवली वागतात आणि त्यात त्यांना काहीच चुकीच वाटत नाही. तशी जाणीव कंपन्यांना, कर्मचाऱ्यांना अजिबातच नाही. तसं प्रशिक्षण देणं तर दूरच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला असे तर म्हणवत नाही. बाकी त्रागा व चिडचिड पोचली. किमान निदान अन्य अविवाहीत व्यक्तींशी किंवा स्वदेशी पुनर्स्थलांतरित व्यक्तींशी त्यांची चिडचिड होउ नये म्हणुन आपण कसे वागले पाहीजे हे लक्षात आले. बाकी भारतात होणारी व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी ही बाब नवी नाही. 'विवाह' हा हर रोगका अक्सीर इलाज असतो आपल्याकडे. मुलाला नोकरी लागत नाही, मुलगा घरात लक्ष देत नाही पासून ते मुलगा समलैंगिक आहे तरी 'लग्न लावा सगळं सुधारेल' असा मूर्ख आशावाद असतो आपल्याकडे. मुलीला तर कधी एकदा उजवुन टाकतोय याची घाई असते. आणि मग कोणी प्रवाहाविरुद्ध पोहत असलं की आपल्या पचनीच पडत नाही. मग सगळे त्याचं 'जमवण्याचं' अगदी घरचं कार्य असल्यासारखं, मनावर घेतात.
हळूहळू समाजाची धारणा बदलेल. असे लेख नक्कीच वेगळा विचार देतात. वेगळी बाजू दाखवतात. लेखाचे नाव छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेकानेक आभार. तुमची प्रतिक्रिया वाचून लेख लिहिणं सार्थकी लागलं असं वाटलं. अंततो गत्वा आपल्याला लागलेल्या ठेचा इतरांना लागू नयेत म्हणून या अनुभवांशी अनभिज्ञ लोकांना त्यांच्या वागण्याची जाणीव करून देणे आणि संवाद साधणे हाच लिहिण्याच उद्देश असतो. तुम्ही बचावात्मक न होता सकारात्मकपणे घेतलात हा लेख. धन्यवाद!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही कॉमेंट खवचट का वाटली कुणाला?
जे काही वैयक्तिक निर्णय असतात ना एखादी गोष्ट करण्याचे/ न करण्याचे ते ठरल्यावर मग समाजापुढे डिसेक्शनला का ठेवता असे म्हणतो. किंवा आतल्या आत घुसळतही का ठेवतात काही लोक?

समजा आईवडील, स्वत:ची मोठी प्रापर्टी यांचेकडे लक्ष देण्यासाठी परत भारतात आलात तर ठुसठुस कुणालाच वाटता कामा नये. लग्नाचं म्हणाल तर तो एक वेगळाच विषय आहे. ती उर्मी ही प्रत्येक प्राणीमात्रांंत नैसर्गिक रित्या येतच राहते. नाईलाज. चर्चेसाठी नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंवा आतल्या आत घुसळतही का ठेवतात काही लोक?

काही प्रश्न सुटतातच असं नाही. विशेषत: स्थलांतरीतांना हे प्रश्न पडणं मला स्वाभाविक वाटतं. इथे आणि तिथे असे आयुष्याचे कप्पे झालेलेच असतात. तुम्ही लाख नाही म्हणा पण अधेमधे ते मनात रहातंच.
अगदीच टोकाच्या प्रसंगात (निर्वासित वगैरे) त्यांना परतीचा मार्गच नसतो- पण तरीही पूर्वायुष्यातलं सगळंच काढून टाकता येतं असं मला वाटत नाही.
"I've made my peace with it" पर्यंत पोचायला वेळ लागत असेलच ना?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंवा जरा वैयक्तिक अनुभवच आहे का माहीत नाही. पण फार गंभीरपणे घेऊ नका. उगाच दुखावले जाणे होते.
परदेशी लोकांना काही बोलताना तसे वाटते की आपण यांनी आपले बोलणे रागाने तर घेतले नाही ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे, हावार्यूडूवइंग?
सी या. बाय. (तोंडभरून (मास्कच्या आडून) (फॉर्मल) स्माइल).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगलं मांडलंय.
चर्चाही चांगली.
न बा ह्यांचा त्रागा पोचतोय, समजण्यासारखा आहे.
इतरांचेही दृष्टिकोन, म्हणणं समजू शकतो.
आपापली एक परिस्थिती असते, आवडीनिवडी अन त्यानुसार निर्णय असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न बा ह्यांचा त्रागा पोचतोय, समजण्यासारखा आहे.

अघटित!

I am flattered.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0