१८९७चा प्लेग : इतिहासाचे धडे

#ललित #संसर्ग #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२०

१८९७चा प्लेग : इतिहासाचे धडे

- अवंती

या वर्षातला मार्च महिना निम्मा-अर्धा होत असतानाच पुण्यात काही कंपन्यांनी 'वर्क फ्राॅम होम' सुरू केलं. त्याचबरोबर सोशल नेटवर्कींग साईट्सवर "आमच्या भागातल्या दुकानात हॅण्डवाॅशच संपले आहेत" या आशयाच्या अनेक पोस्ट्स पडायला लागल्या होत्या. आणि तरीही हे काय, कशासाठी, कशामुळे आहे हे भारतभरात सोडाच, पुण्यातल्या आम्ही राहतो त्या सोसायटीमधल्या बहुतेक लोकांना माहिती नव्हतं, कळत नव्हतं. घरून काम करायचं, मराठी नववर्षही सुरू होणार म्हणून बहुतेक लोक आपापल्या मूळ गावी गेले, तेवढंच आठ-दहा दिवस घरी राहता येईल म्हणून बरेच जण असे निघून गेले. आणि मग 'जनता कर्फ्यू' जाहीर झाला, ज्याच्यानंतर लगोलगच लाॅकडाऊन एक लागू केला गेला देशभरात. इतर देशांच्या दोन-तीन आठवडे नंतर हा लाॅकडाऊन केला गेला, तोपर्यंत इटली, फ्रान्स इत्यादी युरोपीय देशांत कोविड१९नं अनेक माणसं मरण पावली होती; त्यांतली काही वैद्यकीय सुविधा पुरेशा नसल्यामुळे गेली होती. उशीरा घेतलेला असला तरीही तडकाफडकी हा लाॅकडाऊनचा निर्णय भारतात घेतला गेला. यात कित्येकांचं अक्षरशः आयुष्यभराचं नुकसान झालं असेल त्याची गणतीही नाही. कडक लाॅकडाऊन करूनही परिस्थिती मात्र आटोक्यात आलीच नाही, उलट चिघळतच गेली. लोकांच्या बोलण्यात, लिहिण्यात, वाचण्यात सॅनिटायजर, सॅनिटायजेशन, हॅण्डवाॅश, मास्क, सोशल डिस्टन्सिंग, क्वारंटिन, विलगीकरण, लाॅकडाऊन हे शब्द वारंवार यायला लागले. आणि मग या परिस्थितीत अनेकांना जुन्या प्लेगच्या साथीच्या काळातील त्यांच्या घरातल्या वडील मंडळींनी सांगितलेल्या आठवणी येत राहिल्या.
आमचे बरेच नातेवाईक कोल्हापूर, मिरज ह्या जुन्या शहरांमध्ये राहतात. तिथले लोकही या जुन्या आठवणी एकमेकांना सांगताना दिसले.

आजपासून सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी म्हणजे १८९४साली कोल्हापूरच्या राज्यकारभाराची सूत्रं शाहू छत्रपतींनी आपल्या हातात घेतली. आणि त्यानंतर लगेच तीन वर्षांत, १८९७साली भारतभराची एका रोगाच्या साथीनं भयाण अवस्था करुन टाकली; ही होती प्लेगची साथ.
माणूस आत्ता आहे असं म्हणेपर्यंत तो होता म्हणायची वेळ येत होती. उभ्या उभ्या, जेवणाच्या ताटावर, कामंधामं करत असताना काखेत गाठ आली म्हणायला अवकाश माणसाला मृत्यूनं घेरून टाकलेलं असे. घराघरांना मरणकळा आली होती, वातावरणात मरणगंध पसरला होता. मोठ्या राज्या-शहरांमधून ही साथ कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव या महाराष्ट्राच्या इतर भागातही बोकाळत गेली. कोल्हापूरातल्या शहराव्यतिरिक्त इतर वीसेक खेड्यांतही ही साथ पसरायला लागली. वीसेक खेड्यांत मिळून त्यावेळी साधारणपणे ३१०००-३२००० लोकसंख्या होती आणि हे सगळे लोक रोजच मृत्यूच्या सावलीत वावरत होते.

या रोगावर औषधोपचार काय आहेत हे माहिती नव्हतं. राजेंचं ध्येय एकच होतं आपल्या लोकांचा जीव वाचवायचा. यासाठी त्यांनी या खेड्यांतील एकाही व्यक्तीला राहत्या घरी राहू दिलं नाही. त्यांची राहण्याची सोय गावाबाहेर माळावर करण्यात आली. ज्या लोकांची ऐपत नाही त्या लोकांना गावाबाहेर खोपटं बांधण्याकरता सामुग्री राज्यदरबारातर्फे देण्यात आली. हे इतकंच करून राजर्षी थांबले नाहीत तर त्यांनी सरकारतर्फे जनतेच्या मालमत्तेचं रक्षणही केलं.
लोकांची घरं, मालमत्ता सुरक्षित राहावेत याकरता पोलिसांना दिवसरात्र गस्त घालायचा आदेश शाहूराजांनी दिला होता, आणि तो अंमलात आणला जातो आहे याकडे जातीनं लक्ष दिलं होतं.
कारभारी भास्करराव जाधव यांची नेमणूक करून त्यांच्या साहाय्याने जनतेला प्लेगविषयक जागरूक करण्याच्या योजना राजर्षींनी आखल्या. यात प्लेग या रोगाविषयो शास्त्रशुद्ध माहिती देणारी पत्रकं काढून ती सर्व जनतेला पुरवण्यात आली. प्लेगच्या उंदरांची विल्हेवाट कशी लावायची याबाबत सविस्तर माहिती देणारा जाहीरनामा दरबारतर्फे प्रसिद्ध केला; घराची आतली स्वच्छता कशी राखली पाहिजे, उपलब्ध असणारे औषधोपचार कसे महत्त्वाचे आहेत, यांविषयी सूचनाही यात देण्यात आल्या होत्या.
प्लेगची लागण झालेल्या लोकांसाठी कोटीतीर्थ भागात हॉस्पिटल उभारण्यात आलं होतं. महाराज त्या काळात पन्हाळ्यावर वास्तव्य करत होते, प्लेगसंदर्भात घडणाऱ्या सर्व घटना, बातम्या समजाव्यात अन् त्याबरहुकूम सूचना देता याव्यात यासाठी महाराजांनी पन्हाळ्यावर दूरध्वनीची व्यवस्था करून घेतली.

याचबरोबर लोकांकडून सहकार्य मिळावं यासाठी प्लेगच्या रुग्णाची माहिती देणाऱ्या व्यक्तीला रोख बक्षिसं जाहीर केली. प्रजेचं, सामान्य जनतेचं आरोग्य इतर कशाहीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे, हे हा लोकराजा जाणून होता, आणि यासाठी आरोग्यविषयक कामकाजात हलगर्जीपणा करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना कामावरून बेदखल करण्यात आलं होतं.

राजर्षी शाहू राजांनी त्यावेळी कोल्हापूर शहरात संपूर्ण लाॅकडाऊन जाहीर केला होता. कोल्हापूरात शिरण्याच्या सर्व वेशी बंद करून टाकल्या होत्या. तिथं खडा पहारा ठेवला होता, इतका की पोस्टमनलाही संसर्गग्रस्त इलाख्यात,म्हणजे कंटेनमेंट झोनमध्ये जाऊ देत नसत. शहरातून बाहेर कुणालाही जाऊ देत नव्हते आणि शहराच्या आत कुणालाही येऊ देत नव्हते. ही सीमाबंदी प्लेगची साथ संपेपर्यंत होती. राजर्षींनी संस्थानाच्या सर्व वेशींवर विलगीकरण छावण्या उभ्या केल्या आणि लोकांना तिथे आश्रय दिला. प्लेगची बाधा झाल्याचा संशय आला तर त्या व्यक्तीला तिथे चार दिवस ठेवून घेत असत. हा नियम सर्वांना सारखाच होता, राजकारभारी, ख्रिश्चन मिशनरी यांचीही तपासणी करून, ते रोगमुक्त असले तरच त्यांना शहरात प्रवेश दिला जात असे.

शाहू छत्रपती
शाहू छत्रपती

लोकांनी एकत्र जमू नये, ज्यातून संसर्ग आणखी पसरेल, म्हणून जनतेचा रोष येण्याची जोखीम पत्करून या कालावधीत होणारे सर्व सण, उत्सव, जत्रा, यात्रा यांना स्थगिती दिली.

सरकारला हे सर्व करत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं. जिथं आजही, विज्ञान(?) तंत्रज्ञानाधिष्ठेच्या काळात लोक अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन स्वतःच्या, समाजाच्या जिवाशी खेळ करतात तिथं त्या जुन्या काळात जेव्हा सामान्यजनतेपर्यंत विज्ञान, आरोग्यशास्त्र या गोष्टी पोहोचल्याही नव्हत्या अशावेळी लोकांचं अंधश्रद्धा अन् देवदेवर्षी या समजुतीला बळी पडणं सहज होतं. त्या काळात प्लेग हा कुठल्याही देवाचा, देवीचा कोप नाही, ही कुठलीही करणी-मंत्र-तंत्र प्रकारांतली घटना नाही, तर हा एक आजार आहे. तो विषाणूच्या संक्रमणामुळं होतो; स्वच्छता, औषधोपचार, अन् योग्य ती काळजी घेतली तर आपण तगू शकतो हे पटवून देणं राजे अन् कारभारी लोकांकरता फार अवघड प्रश्न होता. यासाठी राजांनी एक शक्कल लढवली. जनतेच्या हिताचे प्रकल्प राबवतानाच त्यांच्या मनातली रोगाबद्दलची, त्यासंदर्भातील औषधोपचार अन् लसीबद्दलची भीती दूर व्हावी यासाठी स्वतःला लस टोचून घेतली अन् तिचे काहीही दुष्परिणाम नाहीत हे जनतेला पटवून दिले.
या सर्वांची परिणती अशी झाली की संपूर्ण कोल्हापूर संस्थानात इतर संस्थानं, बाकीचं राज्य, इतर शहरांच्या तुलनेत मृत्यूसंख्या कमी होती. याचं श्रेय जनतेच्या शहाणपणाबरोबरच किंबहुना रेषभर जास्तच श्रेय राजेंना जातं.

ज्याप्रमाणे कोल्हापूरातील प्लेगची साथ आटोक्यात आणण्यात छत्रपती शाहू राजे यांचं योगदान, म्हणजेच त्यांचं सतर्क असणं, त्यांचं सर्व बाबतीत स्वतःहून प्रत्यक्ष सहभागी होणं महत्त्वाचं ठरलं तसाच मिरजेत प्लेगची साथ आटोक्यात आणण्यात एका मिशनरी डाॅक्टरचा वाटा फार महत्त्वाचा ठरला.

डॉ. विल्यम वानलेस
डॉ. विल्यम वानलेस

स्वातंत्र्यपूर्वकाळात अनेक मिशनरी डाॅक्टर निरनिराळ्या गावांत, शहरांत राहून आपली वैद्यकीय सेवा आणि धर्मप्रसार असं दुहेरी काम सांभाळत. ज्या एका डाॅक्टरमुळं मिरज हे छोटेखानी गाव आज भारतभरात आयोग्यपंढरी म्हणून ओळखलं जातं तो एक मिशनरी डाॅक्टरच होता. अमेरिकेतील प्रेस्बिटेरियन (प्रोटेस्टंट ख्रिश्चन पंथातील एक उपपंथ) चर्चमार्फत डाॅक्टर विलियम वानलेस यांनी १८९४ साली मिरजेत मिशनला सुरुवात केली आणि त्यानंतर सुमारे ४० वर्षं त्यांनी मिरजेत सेवा दिली.
मिरजेत मिशनला सुरुवात झाली आणि अवघ्या तीनच वर्षांत भारतभरात प्लेगच्या साथीनं हाहाःकार माजवला. पुण्या-मुंबईमध्ये प्लेगची साथ वेगानं पसरत होती आणि मिरजेत ती येण्यास अवधी लागला नसता; पण भविष्यातला धोका, किंवा जिवीत अन् इतरही अनेकप्रकारची हानी ओळखून डाॅक्टर वानलेस यांनी 'मिरज स्वच्छता अभियान' सुरू केलं. तत्कालीन मिरजेचे संस्थानिक श्री. गंगाधरपंत पटवर्धन यांच्या परवानगीनं मिरजेत त्यांनी 'ॲन्टी प्लेग कमिटी' स्थापन केली. स्वतः डाॅक्टर वानलेस या कमिटीचे अध्यक्ष होते. या मिरज स्वच्छता अभियानात त्यांनी मिरजेतील घर अन् घर, गल्ली अन् बोळ, रस्ता अन् कोपरा सारं काही स्वच्छ करून घेतलं. इतकंच नाही तर घरं चुनखडीनं लिंपून काढली. स्वतः डाॅक्टर वानलेस यांनी त्यावेळी मिरजेत असणाऱ्या एकूण एक, ५०००ते ६००० घरांना भेटी देऊन, ती घरं रिकामी करून, तिथल्या माणसांना आयसोलेशन कॅम्पमधे हलवून, घरं साफ करून, चुनखडीनं लिंपून काढून घेतली. याबद्दल सांगताना वानलेस म्हणतात की, "अनेक घरांमधून विरोध दर्शविला जाई, गोऱ्या डाॅक्टरांस सहकार्य करण्याची मानसिकता नसे; त्याहूनही लोकांमधे भय अधिक होते. लोकांच्या हातापाया पडून, गयावया करून त्यांना घराबाहेर काढावं लागे तर काहीप्रसंगी त्यांना दरडावूनही बाहेर काढावं लागे. याप्रसंगी बुरखाधारी महिलांनी अडेलपणा करीत आपण येणार नसल्याचं सांगून आमचा पुष्कळ वेळ वाया घालवला. तसेच अनेक मुस्लिम व हिंदू घरांतून आम्हांला सहकार्य मिळाले नाही, परंतु अखेरीस आम्ही संस्थानातील कार्यकर्त्यांच्या साहाय्याने काम फत्ते केले."

इतकंच करून डाॅक्टर वानलेस शांत बसले नाहीत तर त्यांनी प्लेगच्या रुग्णांकरता म्हणून सव्वाशे खाटांची जागा उपलब्ध करून दिली. तत्कालीन आधुनिक अशा सर्व आरोग्यसेवा रुग्णांना देण्याची तजवीज केली.

इतर कुठल्याही गावाप्रमाणे मिरजेतही लोकांना आपापली घरं सोडून आयसोलेशन कॅम्प, म्हणजे दूर माळावर किंवा मोकळ्या जागेत, जिथं त्यांची रहायची सोय केली होती तिथं जाऊन राहावं लागलं होतं. सुरुवातीच्या काळात सुमारे वर्ष ते दीडवर्षं मिरजेत एकही प्लेगचा रुग्ण आढळला नाही. मिरजेची सीमाबंदी जरी केली नसली तरी पूर्ण गाव स्वच्छ अन् साफ केल्यामुळं प्लेगचा संसर्ग तिथं झाला नव्हता. पण वर्षा-दीडवर्षांच्या कालावधीनंतर लोकांना बंधनात राहाणं जड जायला लागलं आणि त्यांनी नियमांचं उल्लंघन करायला सुरुवात केली. (हे अगदी आताच्याच परिस्थितीसारखं वाटतं. आताही लोक पहिल्याइतके नियम पाळत नाहीत. जिथं तिथं गर्दी करून करोना जणू गेलाच आहे आता, अशा अविर्भावात अनेक लोक वावरताना दिसत आहेत.) तेव्हाही लोकांनी रोजचे व्यवहार, गर्दी करणं, सणसमारंभ साजरे करणं या गोष्टी सुरू केल्या. याचबरोबर सीमाबंदी नसल्यामुळे बाहेर गावातूनही लोकांची जा-ये सुरू राहिली. याची परिणती अशी झाली की मिरजेत एका मागे एक प्लेगचे रुग्ण वाढायला लागले. ती संख्या इतकी वाढली की दिवसाला ऐंशी ते पंच्याऐंशी मृत्यू मिरजेत व्हायला लागले. पुन्हा एकदा सर्व नियम कडक करून लोकांना त्यांचं पालन करायला लावण्यासाठी मिशन सरसावलं. घरोघरी प्लेगमुळे झालेले मृत्यू, ती मृतशरीरं अन् त्यांची विल्हेवाट लावणं यांसाठीही काही लोकांची नेमणूक करण्यात आली. याबद्दल काही वेळा लोकांचं असहकार्य, तर काही वेळा काही हृदयद्रावक घटना यांमुळे वारंवार अडथळे येत राहिले. याबद्दल सांगताना डाॅक्टर वानलेस म्हणतात, "प्लेगच्या संसर्गामुळे दिवसागणिक मृत्यू वाढत चालले होते. जनतेचे आम्हांस म्हणावे तितके साहाय्य नव्हते. परंतु काही घटना आम्ही आजही विसरू शकत नाही अन् डोळ्यांत पाणी आणतात. त्यातील काही घटना म्हणजे, काही घरांमध्ये आम्ही असे दृश्य पाहीले की जिथे रांगती बाळे आपल्या घरातील वडील थोरल्यांच्या मृतशरीरांवर आडवी पडून रडत आहेत, त्यांस परिस्थिती काय आहे हे काही कळत नाही परंतु ती केवळ त्यांच्यापाशी बसून रडत आहेत, मृतांमध्ये त्यांचे आई, वडील, भावंडे घरचे इतर वडील यांची मृतशरीरे असत. अशा घरांमधे जाऊन त्या लहान बाळांना त्या मृतशरीरांपासून दूर करणे महाकठीण जात असे; परंतु कार्यापुढे भावनेस थारा न देणे इष्ट असल्यामुळे आम्हाला आमची कार्ये पार पाडावी लागत."
याखेरीज त्यांनी लोकांना परत आपापल्या घरी जायचे असेल तर परवानापत्राची तजवीज केली. ज्यांच्याकडे डॉक्टरांचे परवानापत्र असेल तेच लोक इतर लोकांत मिसळू शकत होते. हे परवानापत्र मिळण्याच्या पूर्वअटी या होत्या की लसीकरण झालं आहे की नाही हे पाहणे, सदर व्यक्ती अथवा तिच्या निकटवर्तीयांमध्ये कुणालाही हा संसर्ग झालेला नाही ना हे तपासणे आणि मग परवाना जारी करणे. इतकं असूनही लोकांच्या अन् तत्कालीन राज्यकर्त्यांच्या हलगर्जीपणामुळे म्हणा किंवा संसर्गाचे गांभीर्य लक्षात न घेतल्यामुळे म्हणा मिरजेत एकावेळी मृत्यूदर भीषण होता. अंदाजे चाळीस एक हजार लोकसंख्येत दिवसाला ऐंशी ते पंच्याऐंशी लोकांचा या संसर्गानं मृत्यू होत होता.

जरी मिरजेत प्लेगचा संसर्ग झाला असला तरीही सुरुवातीचं वर्ष ते दीडवर्षंभर मिरजेत प्लेगचा एकही रुग्ण नव्हता. याचं सारं श्रेय वानलेस डाॅक्टर आणि मिशनच्या सर्व सहकारी डाॅक्टर व इतर कर्मचाऱ्यांना जातं. नंतरही संसर्ग आटोक्यात आणण्याचं श्रेय डाॅक्टर वानलेस यांना जातंच. डाॅक्टर वानलेस मिरजेच्या इतिहासातले अतिशय महत्त्वाचे व्यक्तीमत्त्व आहेत. त्यांचं काम केवळ प्लेगपुरतं मर्यादित नाही. मिरजेला भारताची आरोग्यपंढरी बनवण्यात सर्वात मोठा वाटा त्यांचाच आहे, हे म्हणल्यास वावगं ठरणार नाही.

इतिहासातील ह्या दोन उदाहरणांवरून काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येतात. जितके आरोग्यसेवा देणारे तत्पर, बुद्धिमान असतील तितका जनतेचा फायदा जास्त होतो. याहूनही महत्त्वाचं ठरतं ते जाणतं अन् हुशार शासन अथवा राज्यकर्ता असणं. हे कोल्हापूरच्या त्यावेळच्या उदाहरणावरून, आणि सद्यस्थितीतील केरळ किंवा राजस्थानातील, पंजाबातील काही लहान गावांवरून लक्षात येतं; जिथं रोगप्रसाराचं, संसर्गाचं गांभीर्य शासनकर्त्यांनी वेळीच लक्षात घेऊन आपल्या लोकांसाठी योग्य ती खबरदारी घेतली. या साऱ्यावरून निष्कर्ष काढायचाच झाला तर तो इतकाच निघतो की लोकांची मानसिकता दोन शतकांमागे अन् आताही तशीच आहे, अन् बहुतांश शासनकर्त्यांचीही तशीच आहे. शिवाय आपल्या राज्याचं हित कशात तर उत्तम राज्यकर्ते, उत्तम शिक्षण अन् आयोग्यसेवा, अन् उघडे डोळे ठेवून वावरणारा समाज यात आहे.

छत्रपती शाहू आणि डाॅक्टर वानलेस यांच्या वागणुकीतून थोडीतरी शिकवण आताचे लोक घेतील अन् इतिहासातल्या लोकांकडून घडलेल्या चुका न करण्याची शिकवण समाजही घेईल अशी आशा करायला हरकत नाही.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

त्या काळाचा धावता आढावा चांगला घेतलाय. ह्या इतक्यशा लेखासाठी प्रत्य्कष संदर्भ आणि तपशील बरेच शोधावे लागले असतिल हे दिसतय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कारोना व्हायरस हा बाधित व्यक्ती 10 मीटर पर्यंत संपर्कात आली तरच रोग संसर्ग होतो..
म्हणजे साथ पसरू न देण्यास खूप वाव आहे.उपाय पण सहज शक्य आहे तरी लाखो लोक मृत्यू मुखी पडले .
हाच corona व्हायरस जर पिसवा किंवा डास ह्यांच्या पासून पसरत असता तर 1897 chya प्लेग च्या साथी पेक्षा पण भयंकर स्थिती निर्माण झाली असती.
एक वर्ष व्हायरस ओळखण्यात आधुनिक वैद्यक शास्त्र ला लागतात आणि उपचार निर्माण होण्यास अजुन 1 वर्ष तो पर्यंत करोडो लोक मृत्यू मुखी आता पण पडली असती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0