पु. पु. पिठातली (उर्फ भाषाभीरूची गोष्ट)

कथा पु पिठातली सतीश तांबे

पु. पु. पिठातली (उर्फ भाषाभीरूची गोष्ट)

- सतीश तांबे

जागा पाहून गणेशाचं मन उत्साहित; खरं तर, उतल्यासारखंच झालं होतं.

डाबरेने विचारलं, "साहेब, रविवारी जरा झाडलोट करून सोमवारी तुम्हांला किल्ल्या देऊ. चालेल ना?"

तर गणेशा म्हणाला, "नाही, आत्ताच्या आत्ता दे ना. झाडा-पुसायचं मी पाहीन. पण त्या बाजारपेठेतून कधी एकदा बाहेर पडतोयसं झालंय मला."

डाबरे म्हणाला, "तसं असलं तर मी एक-दोन पोरं पाहतो झाडलोटीला. तोपर्यंत आपण माझ्या घरी जाऊ. जेवण-खाण उरकू. आज सणाचं काहीतरी गोड केलं आसंल. चौरंग, फावडं, रॉकेलचा पंप वगैरे सामान तूर्त कोपऱ्यात ठेवा. मी सवडीनं म्हणजे लवकरच घिऊन जाईन."

बदली होऊन या गावात गणेशा आला तेव्हा फारसा नाखूश नव्हता. प्रथमदर्शनी गाव थोडा घरेलूच वाटला. कुठं उंच इमारती नाहीत की प्रचंड वर्दळीचे रस्ते नाहीत. थोडंसं इकडं-तिकडं चाललं की फिरायला निवांत वाटा. त्याने ताबडतोब पोचल्याचं पत्र टाकलं. त्रोटक व पहिलं म्हणून बापाला टाकलं. मनाशी ठरवलं, जागा मिळाली की मग बायकोला सविस्तर लिहूच.

पण जागा काही झटक्यात मिळेना. अन्‌ त्या बाजारपेठेतील लॉजिंगात त्याचा जीव कातावू लागला. सकाळी उठून टीचभर व्हरांड्यात यावं, तर खाली कांदा-बटाट्याचा एकतरी ट्रक उभाच. शिवाय समोरच्या हॉटेलातील बकाल वातावरणावर शिक्कामोर्तब करणारा रेडिओ. गणेशाला झालं की नवीन जागा मिळते कधी. भले ऑफिसमधून थोडी दूर चालेल. पण निवांतपण हवं. की बढती नाकारून सरळ गावीच परतावं? पण बाप? तो फक्त तोंडात शेण घालायचं बाकी ठेवेल आणि तसा गणेशाच्या गावात व ह्या जिल्ह्याच्या ठिकाणात काही धेडगुजरी फरक नव्हताच.

गणेशा एकदा असाच हताश होऊन ऑफिसात संध्याकाळी उशिरापर्यंत काम करत होता. मेणचट क्षुल्लक दिसणारा डाबरे कारकूनही ऑफिसात संध्याकाळी रेंगाळत होता. त्याची ती सवय होती. त्याने गणेशाला बिचकत बिचकत विचारलं,

"साहेब, आज घरी नाही जायचं?"

गणेशा चरफडत म्हणाला, "जावंसं वाटत नाही त्या लॉजिंगात. त्यापेक्षा ऑफिस बरं, काम बरं. तुमच्या गावात पटकन जागाही मिळत नाही. किती जणांना सांगून झालं."

डाबरे म्हणाला, "हवी तर माझी एक जागा आहे. गावाबाहेर जुन्या वस्तीत. आवडली तर खुशाल राहा. नवीन घरात गेलो, पण बायकोच्या आग्रहाखातर ती विकली नाही. मागे सोलापूरहून एक पोतदार आले होते. ते राहायचे तिथे. चाळीस रुपये भाडं द्यायचे. त्यांना जागा काही तेवढीशी आवडली नव्हती. मात्र लवकरच बदली मिळाली त्यांना. जाताना तेवढं म्हणाले, "तुमच्या जागेचा पायगुण."

त्यांचं बोलणं तोडण्यासाठी टपून बसलेला गणेशा म्हणाला, "मला चालेल तुमची जागा. दीड-दोन वर्षांचा तर प्रश्न आहे. आणि मी तसा ग्रामीण भागातलाच, खरं तर गावठीच आहे! थोडी वस्ती, ये-जा, थोडं निवांतपण, असं पाहिजे. बाकी नखरे नाहीत. नळ, लाईट असलं की खूप झालं."

पण प्रत्यक्षात डाबरेची जागा गणेशाला आवडलीच. होती सिंगल रूमच. आकारपण थोडासा विचित्रच. लांबीहून रुंदी जास्त, असं काहीतरी. शिवाय वर ऍस्बेस्टॉस. पण दुपारी तो तापायच्या वेळी गणेशा असणार होता ऑफिसातच. एरवी मोरीशेजारी असतो तसा इथे ओटा नव्हता, तर समोरासमोर. त्यामुळे आधीच लहान असलेली जागा थोडी अधिकच लहान भासायची. मोरीला लागून कॉट टाकायची असं गणेशानं मनात योजलं.

कोब्यालाही लेव्हल नव्हती, पण गेरू टाकून चौकोनात बेतल्याने गणेशाला तो चांगला जिव्हाळ्याचा वाटला. जमेची बाजू म्हणजे कोबा कुठेही फुटलेला नव्हता. घरपण आणणारा होता. मुख्य म्हणजे खोली चाळीच्या टोकाला होती. इतरांचे दरवाजे होते, त्याच्या काटकोनात या खोलीचा दरवाजा होता. गणेशाला वाटलं, इथे बाप असता तर दरवाज्यामुळे खोली त्याला वक्री शनीसारखी वाटली असती!

शिवाय वस्तीही चांगली होती. फारशी दाटीवाटी नसलेली अशी बैठी-बैठी बांधकामं. मुलांना हुंदडायला पुरेशी जागा. वाहनांचा वावर नाही. मोठ्यांनादेखील बसा-उठायला, गप्पा हाणायला भरपूर जागा. वाटेत एक भल्या मोठ्या पाराचा वड. गणेशाच्या ऍस्बेस्टॉसवरदेखील गुलमोहराची एक फांदी हळूहळू हातपाय पसरू लागली होती.

दरवाज्याला लागून असलेल्या भिंतीला खिडकी होती. त्याच भिंतीला ओटा. हवा-उजेड भरपूर. गणेशानं ठरवलं की इथे कॉट टाकली तर नळावरच्या हालचाली निरखता येतील. तेवढंच वेळ जायला बरं, आणि खिडकीतून दिसायची दूरवरच्या डोंगरावरची हिरवीगर्द झाडी. त्यातून डोकावणारं एक देवळाच्या कळसाचं टोक आणि वर फडकणारी भगवी पताका. आता पूजा-अर्चा, संध्या-स्तोत्रं अगदी बापाच्या काटेकोर शिस्तीप्रमाणे आचरता येईल, याचा गणेशाला आतून आनंद झाला. तसं बायको व छोट्यालादेखील कधीमधी येऊन विनाकटकट राहता येईल अशीच ती जागा होती.

त्याच संध्याकाळी गणेशाने बाजारपेठेतील कळकट लॉजिंगातून आपला बाडबिस्तरा हलवला आणि थेट डाबरेची ही खोली गाठली. दोन-तीन दिवसांत डाबरेला बरोबर घेऊन स्टोव्ह, केरसुणी, काही डबे अशा आवश्यक गोष्टींची खरेदी केली. चार दिवसांत घर सुरळीत झाल्यावर बायकोला त्यानं एक सविस्तर पत्र लिहिलं. 'झोपताना खूप आठवण येते, रोज.' हे तर लिहिलंच. पण 'इथली कॉट जास्त दिवस टिकेल. तिकडच्या पलंगासारखी वर्षभरात खिळखिळी होणार नाही.' असा त्याला न साजेसा विनोदही तो चुकून लिहून गेला. बाप पत्र वाचेल की काय, या धास्तीने त्याने पाकिटावर लाल अक्षरांत लिहिलं - 'खाजगी'.

२.

तसं म्हटलं तर गणेशाला एकटं राहायची सवय होतीच. कॉलेजच्या शिक्षणासाठी तो जिल्ह्याच्या ठिकाणाच्या हॉस्टेलात राहायचा. पण ते एकटेपण असं नव्हतं. किंबहुना तिकडची टगी पोरं गणेशाला म्हटलं तरी एकटं राहू द्यायची नाहीत. म्हणजे गणेशाला फार तर घरापासून लांब राहायची सवय होती, असं म्हणता आलं असतं. पण आईवडिलांपासून लांब राहणं वेगळं आणि बायको-मुलांपासून लांब राहणं वेगळं. मात्र गणेशानं त्या बाबतीत इथे येताना ठरवून टाकलं होतं की कोणत्याही परिस्थितीत माघार घेणं नाही. फार तर दोन वर्षांचा तर प्रश्न होता. आणि डाबरेच्या जागेत आल्यापासून तो भलताच उत्साहात आला होता. आता न कुरकुरता, न कंटाळता राहता येईल, असं वाटू लागलं होतं.

डाबरेनं व त्याच्या बायकोनं सांगूनच ठेवलं होतं, की सणासुदीला किंवा कधी कंटाळा आला की न संकोचता जेवायला यायचं. खरं तर ऑफिसातील बऱ्याच जणांनी अशी आमंत्रणं दिली होती. चिकू म्हणून नावाजलेल्या एका बेंगरूळ जोश्यानंदेखील. गणेशाला मनातल्या मनात वाटायचं, शेवटी आपण भिक्षुक बापाचं पोर. दहा घरी जेवणं आपल्या रक्तातच असावं, पण हे तर करायचं नाहीच. परंतु दहा हॉटेलं, खानावळीसुद्धा पत्करायच्या नाहीत. स्वयंपाक घरीच करायचा. तेवढाच वेळही जातो. ऑफिसात येण्या-जाण्यात तासभर पसार होतं, तसं स्वयंपाकात दोन-अडीच तास. येऊन-जाऊन सकाळच्या वेळी थोडी घाई-गर्दी होईल, तेवढंच.

घरकामाचा त्याला पूर्वीपासून अनुभव होता, अशातला भाग नाही. पण गेल्या वर्षी बायको बाळंतपणासाठी तीन-चार महिने माहेरी गेली होती, तेव्हा गणेशावर बऱ्याचदा स्वयंपाक करण्याची पाळी आली होती. बापाला आता जवळपास उरक उरला नव्हताच. कशीबशी ठरावीक घरची पूर्वापार भिक्षुकी पार पाडायची एवढंच. गणेशा बायकोला नव्या गावात घेऊन आला नव्हता ते तेवढ्यासाठीच. म्हाताऱ्या बापाजवळ कुणीतरी असावं.

नव्या जागेत आल्यानंतर गणेशाने ट्रंकेतील पोथी, ताम्हण, निरांजन अशी सारी सामग्री बाहेर काढली. बाजारपेठेतल्या त्या लॉजिंगात त्याला देवाधर्माचं सुरू करायची इच्छाच होत नव्हती. पण इथला निवांतपणा, खिडकीतून दिसणारा देवळाचा कळस, वर फडफडणारी भगवी पताका, सारंच त्याच्या पूजेअर्चेला, ध्यानाला पोषक होतं. डाबरेच्या चौरंगावरच त्याने तात्पुरतं सारं देवाचं मांडलं आणि मनोमन ठरवलं, की देवाचं करत असताना दरवाजा कटाक्षाने बंद करायचा. लोकांची ये-जा फारशी नसली तरी समोरच्या नळावरच्या धुणी-भांडी करणाऱ्या - पाणी भरणाऱ्या, खाली वाकलेल्या - साड्या वर केलेल्या बायका पाहून त्याला विचलीत व्हायचं. दहावी-अकरावीच्या वर्षापासून त्याला ही सवयच लागली होती. गावातदेखील, नदीवरच्या काम करणाऱ्या बायकांकडे तो दुथडी भरभरून पाहायचा. लग्नानंतरदेखील त्याची ही सवय पूर्णपणे गेली नव्हतीच.

३.

आपण इथपर्यंत आलो याचाच गणेशाला अचंबा वाटायचा. चक्क सरकारी खात्यात लागलो. बढती मिळाली. वाटेत लग्न होऊन बाप झालो. नंतर बापाला, बायको-मुलाला सोडून बदलीच्या गावी राहायला आलो - सारंच ग्रेट वाटायचं. आता मात्र हा घेतला वसा खंबीरपणे पार पाडायचा. नाहीतर 'नारभटाचं पोर' अशी त्याची शाळेत ओळख करून दिली जायची, तेव्हा वाटायचं, आता दहावी-अकरावीनंतर शिक्षण बस करावं. पिढीजात भिक्षुकी जतन करावी. इतर भटांची पोरं करतात तसंच.

पण नारभट एकदा म्हणाला, "गणेशा, तू खूप शिकायचंस. मन लावून. तुला हॉस्टेलात ठेवतो. पण तुझ्या हाती नको रे बाबा पळी-पंचपात्र यायला." गणेशा तेव्हा जसा हिरमुसला तसाच महिरलादेखील.

आणि अकरावीनंतर गणेशाची रवानगी खरोखरच जिल्ह्याच्या हॉस्टेलात झाली. नारभट न चुकता पैसे पाठवायचा. पण त्याचे दंडकही मोठे कडक होते. कुठं अरबट-चरबट वागताना सापडलं तर, विडी-सिगारेट फुंकल्याचं कळलं तर, आगळिकी-कलागती केल्या तर, कानात वारं गेलं तर - बापाने लंबे केलं असतं. आणि भिक्षुकी करायची नाही याचा अर्थ संध्या-पूजा-अर्चेला छाट द्यायची असा नव्हे. ते सारं घराण्याच्या रितीरिवाजाप्रमाणेच व्हायला हवं. हॉस्टेलातदेखील संध्या व्हायला हवी. चित्राहुती घालायलाच हव्यात. जानवं तुटलं तर गायत्री मंत्रून ताबडतोब नवीन घालायला हवं. 'शिंच्या', 'रांडेच्या' म्हणून प्रत्येक वाक्याची सुरुवात करणाऱ्या बापाला गणेशानं शिवी घातल्याचं मात्र खपलं नसतं!

गणेशा हॉस्टेलात अवतरला तो अर्ध्या चड्डीत व केसाला तेल चोपडूनच. शिवाय बापाचं शिस्त-नियमांचं किचाट होतंच. त्यामुळे पोरं त्याला भरपूर पिदवायची. अलीकडे गणेशाला वाटायचं, आपण इथपर्यंत आलो यात त्या पोरांचादेखील बापाएवढाच वाटा आहे. पण बापानं हॉस्टेलला घातलं म्हणून तर ही पोरं भेटली ना - त्याचं ताम्हण लांबवणं, पळी-पंचपात्रात कुणीतरी मुतून ठेवणं, असला फाजीलपणाही पोरं करायची. सुरुवातीला तो अगदी बेजार होऊन जायचा. अब्रह्मण्यम्! त्याला वाटायचं, खड्ड्यात गेलं शिक्षण. परत गावी जावं आणि बापामागोमाग एकादष्ण्या करत, पूजा सांगत, गणपती बसवत हिंडावं. भले बारावं-तेराव्यांचं, श्राद्धा-पक्षांचंही जेवावं. पण हा अत्याचार नको.

गणेशा शिव्या देत नाही हे कळल्यावर तर पोरांना ऊतच आला होता. भडवा, भाडखाऊ, भोसडीच्या - ही 'भ'ची बाराखडी त्याच्याकडून जबरदस्ती म्हणवून घेतली जायची. गणेशा म्हणता म्हणायचा नाही.

मग कुणीतरी उसन्या कनवाळूपणे म्हणायचं, "असं नाही, मग असं म्हण बाळ गण्या, 'भ'ला एक काना एक वेलांटी - 'भि'. 'क'ला एक काना - 'का'. र र रडूबाईतला. 'च'ला एक काना एक मात्रा - 'चो'. ट ट टरबुजातला. आता म्हण भि भि भिकारचोटातला."

मग सारे खि: खि: हसायचे.

एकदा कुणीतरी त्याला सिगारेटचा चटकाही दिला होता.

गणेशा काही वेळा खरंच रडायचा.

मग कुणीतरी लटक्या समंजसपणे म्हणायचं, "लहानपणी कधी गोट्या खेळला होतास का?"

गणेशा मग "हो" म्हणायचा.

मग कुणीतरी म्हणायचं, "हा पेद्रू कसला खेळतोय गोट्या. पण बाप धोतऱ्या आहे. त्याचे ढप्पर नक्की पाहिले असणार गण्याने."

गणेशा मान खाली घालायचा.

मग तोच विचारायचा, "बाप कपाळाला गंध चोपडत असेलच. म्हणजे कपाळही माहितेय."

"मग आता म्हण गणेशा, माझ्या गोट्या कपाळात गेल्या."

गणेशा त-त-प-प व्हायचा. त्याच प्रकारे 'भोकात गेला', 'घालून घे', 'आयचा घो', 'भेंडी-गवारी' असलं बरंच काही त्याच्याकडून अळे-बळे वदवून घेतलं जायचं. सर्वच क्रियापदं पोरं बेलाशकपणी हवी तशी वापरून घ्यायची. जणू काही बापाचाच माल!

एक झंगड पोरगा असा होता की तो गणेशाच्या वाटेला फारसा जायचा नाही. पण जाता-येता कधीतरी म्हणायचा,

"ही असलीच अवलाद. खालती केस फुटतील. ते कुरवाळतील, कापतील. ते कुरळेच कसे ह्यावरही डोक्यात उवा पडेपर्यंत काथ्याकूट करतील. पण 'झ्यॅट' म्हणताना यांच्या तोंडाला फेस येणार. ह्याचा बाप निदान 'शष्प'तरी नक्की म्हणत असेल. नारभट ना तो!"

आणखी एक मुलगा होता. गमत्या. त्याच्या वागण्याला फारसा धरबंध नसे. वाचायचा बरंच. जागूनदेखील. सतत विड्या फुंकायचा.

"अरे त्या गणेशाकडून कसली वदवता 'भ'ची बाराखडी? तुम्हीच म्हणा लेको, भट भाषेलाच भितो. भुक्कड, भेकड, भोळसट, भंपक लेकाचा. पुंडलिक वरदा हा‌ऽऽरी विठ्ठल!"

मग सगळे आरडाओरड करत हसायचे. गणेशा अधिकच गांगरून जायचा.

गणेशाला हे मात्र विचार करण्यासारखं वाटायचं. 'भाषेला भिणारा' हे त्याला थट्टेतलं नाही, तर गंभीर वाटायचं. शिवी दिली तर थोडं सैलावल्यासारखं वाटेल असे भास व्हायचे. पण बाप नारभट सतत डोळ्यासमोर यायचा अन्‌ मग तो मनातल्या मनातही क्वचितच शिवी द्यायचा. 'लांब लोंबताती आंड, फरफरा वाजे गांड' अशा बऱ्याच ओळी पोरं त्याला तुकारामाच्या म्हणून ऐकवून दाखवायची. त्यामुळे तो आणखीनच चक्रावून जायचा. मनातले लैंगिक भाव, व्यवहार, 'हे', 'ते' अशी सर्वनामं व काही तुरळक क्रियापदं यांच्यावरून निभावून न्यायला पाहायचा. मात्र काही वेळा त्याला वाटायचं, हे सगळे श्लील-अश्लीलतेचे, सभ्य-असभ्यतेचे बांध तोडून टाकावेत. शब्दांमध्ये सोवळं-ओवळं करू नये, आपलं-तुपलं म्हणून नये. भाषेचा ओघ वाहतो तसा वाहू द्यावा. मोकाट. आपल्या भावनेला त्या ओघातून उचलावासा वाटतो तो कोणताही शब्द उचलू द्यावा. पण लहानपणी पोफळं वेचता वेचता त्याला वागणुकीचे धडे देणारा बाप तो काही केल्या विसरायचा नाही. तो गप गुमानच राहायचा.

४.

गणेशाला एकटं राहताना वाटत होतं की बायको, मुलगा, बाप, गाव हेच आठवेल. पण त्याला लवकरच उमगलं की एकटेपणी मनाची गोधडी अगदी आतनं उसवल्यासारखी होते आणि भलभलते धागे-दोरे-चिंध्या भळभळा बाहेर येतात.

संध्याकाळच्या वेळी बऱ्याच वर्षांपूर्वी मेलेली आईच केव्हा-केव्हा आठवायची. शुभं करोति व परवचा म्हणून घेणारी, सासरला गेल्यानंतर सतत छळ, त्रास सोसत, 'रांधा-वाढा-उष्टी-काढा' आयुष्य झालेली ताई डोळ्यासमोर यायची. जिवतीसारखी. लहानपणी सूरपारंब्या खेळताना झाडाला अडकलेली लंगोटी आठवायची. हॉस्टेलची टारगट पोरं तर वरचेवर आठवायची. त्यांचे एकेक चाळे, आपली 'भाषाभीरू-भिकारचोट' अशी केलेली संभावना आठवायची आणि वाटायचं, एका पोराचे बाप होऊनही अजून आपण तसलेच. त्याला कळायचं नाही, एवढ्या साऱ्या आठवणी येतात कुठून? गावाकडे असताना असलं काही फारसं आठवायचं नाही. आपली भरकटायची तर लक्षणं नाहीत ना? तरी संध्याकाळच्या वेळी दारासमोरील नळावर चालणारी बायकांची वर्दळ तो कधी चोरून तर कधी थेट पाहायचा. हा विरंगुळा त्याला तास-दीड तास आठवणींच्या धुमश्चक्रीतून बाहेर काढायचा.

त्याला वाटायचं, ग्रामपंचायत पाणी संध्याकाळच्या वेळी सोडते हे खरंच बरं आहे. मुख्य म्हणजे डाबरेच्या घरासमोर नळ आहे, ही केवढी मोठ्ठी सोय! पोतदारला हेदेखील आवडलं नसेल? गणेशा असा पाहत राहतो हे हळूहळू तिथल्या बायकांच्या लक्षात येतंय, अशी भीती त्याला काही वेळा वाटायची. शेवटी आपण भीरूच! पण पाणी जाईपर्यंत तो काही स्वयंपाकाला लागायचा नाही. उगीच कॉटवर लवंडून वर्तमानपत्र वगैरे चाळल्याचे बहाणे करायचा. स्वयंपाक करताना त्याला नळावर दिसलेलं काहीही 'छान छान' आठवत राहायचं. मनात घोळायचं.

एखादी उफाड्याची पोर आली की गणेशा बालड्या घेऊन नळावर धावायचा. चोरट्या नजरेने तिचं अंग भरभरून पाहायचा. तोंडाने मात्र रामरक्षा, अथर्वशीर्ष किंवा एखादे स्तोत्र पुटपुटल्याचा आव आणायचा. मग त्याच्या इकडे-तिकडे, शेजारी-पाजारी ओळखीही होत गेल्या. काही बाया-बापड्यांशीही तो कामापुरतं बोलायचा. तिथे एक पंचविशीतील पोरगी होती. घटमुट अंगाची. नवरा नांदवत नाही म्हणून ती माहेरी परतली होती. राब राब राबायची. अंगाचा आब मात्र राखायची. ती आली की गणेशा भलताच चेकाळायचा. मनातल्या मनात तो तिला 'सुगंधा' म्हणायचा. नवरे या असल्या बायकांना नांदवत कसे नाहीत, याची त्याला कमाल वाटायची. ती नळावर आली की तो दार बंद करून लांबी निघालेल्या फटीतून मनसोक्त पाहायचा. पाणी भरून झालं की शेवटच्या खेपेला ती हातपाय घसाघसा व मन लावून धुवायची. ते पाहताना गणेशाची गात्रं अनावर व्हायची. तिचं बरंचसं अंग तेव्हा त्याला हमखास पाहायला लाभायचं.

तरी त्याला एक मात्र जाणवायचं. वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षी गावच्या नदीच्या घाटावरच्या कपडे धुणाऱ्या बायका पाहून त्याच्या शरीराची जी चाळवाचाळव व्हायची, त्रेधातिरपीट उडायची; तेवढं काही आता होत नाही. मात्र गणेशाला त्या वेळी हस्तमैथुन माहिती नव्हतं आणि बाईबरोबरच्या प्रत्यक्ष संबंधाचा तर प्रश्नच नव्हता. हस्तमैथुनही त्याला प्रथम शिकवलं गेलं ते हॉस्टेलवरच. मात्र शिव्या द्यायला त्याला जसा त्रास व्हायचा, तसा हस्तमैथुनाचा फारसा झाला नाही. स्वत:शीच थोडंफार लाजल्या-बावरल्यासारखं झालं तेवढंच.

कुणीतरी विचारलं, "काय रे गण्या, गावाकडे कधी हातगाडी चालवली की नाही?"

गणेशा हे ऐकून गोंधळला. भाषेच्या अचकट-विचकट अर्थाची त्याला एव्हाना माहिती झाली होती. तो गप्पच राहिला.

मग कुणीतरी म्हणालं, "अरे जानव्याची ब्रह्मगाठ कुरवाळतोस ना भूत दिसलं की! तसंच करायचं दिवसभरच्या बाया बघून झाल्यावर. आता 'कुठे' विचारशील, तर देईन एक थोतरीत."

गणेशा गप्पच राहिला. पण त्याला नदीकाठावरच्या ओलेत्या बायका तिरीमिरीत आठवल्या. त्या पाहताना पाण्यात आपण कसे वेडगळ पोहायचो, हेदेखील आठवलं.

मग कुणीतरी म्हणालं. "अवसे-पौर्णिमेला तर लई मज्जा येते. मुतताना घेतोस ना, तसं जानवंही घे हवं तर कानावर. पण हातगाडी चालवच एकदा. मज्जाच मज्जा!"

सारे मग फिदिफिदि हसले. गणेशाने त्याच दिवशी तो अनुभव घ्यायचं ठरवून टाकलं.

पोरं मग त्याला वरचेवर विचारायची. गणेशा कबूल काही व्हायचा नाही. हसण्यावारी न्यायचा. मात्र मुरब्बी पोरं याचा अर्थ समजून गेली. गणेशा अधेमधे नकळतदेखील तसं करून जायचा.

मग त्याला कुणीतरी सुचवलं, "आता आणखी एक गंमत कर. एखादी मादक बाई डोळ्यांसमोर आण. आणि ती हातात घावली समजून मजा मार. बघच साल्या. अगदी स्वर्गसुखच."

गणेशाला हे मात्र कधीच साधलं नाही. सुरुवात केली तरी अधेमधे भलतंच अपराधी वाटायचं. बापाची भीती वाटायची. मात्र गणेशाची कॉट रात्री हलते अशी आवई त्याच्या रूम पार्टनरने रात्री उठवून दिली होतीच.

पोरं मग त्याला विचारायची. "तू 'त्याला' काय म्हणतोस? आणि चिमणी, मैना कुठल्या-कुठल्या भेटतात?" कुणी त्याला चावट कोडी घालायचं. एक फुलीची, मुलीची म्हणजे काय?

वास्तविक गणेशाला उत्तरं ठाऊक असायची. पण या भाषेनं तो भेदरून जायचा. तो शब्द मनातसुद्धा उमटू नये याची तो दक्षता घ्यायचा. शेवटी गणेशा भाषाभीरूच!

त्याची हस्तमैथुनाची सवय मात्र इतर पोरांएवढी नाही, तरी पुढेही अगदी लग्न होईपर्यंत चालूच राहिली. मध्यंतरी बायको बाळंतपणासाठी माहेरी गेली असतानादेखील त्यानं ते अमलात आणलंच. आपल्या करड्या शिस्तीच्या बापाच्या घरात त्याच्या उपस्थितीत, आपण असं वागू शकलो यामुळे त्याच्या सर्वांगावर नंतर काटा उभा राहायचा! मग वाटायचं की, बापाचा उल्लेख आपण मनातल्या मनात सतत 'बाप' असा करतो. हे कुठे कुणाला माहिताय? गणेशा सोडून हे कुणालादेखील माहीत नव्हतं. अगदी बायकोलादेखील.

५.

गणेशानं हळूहळू पूजा-अर्चा नित्यनेमानं सकाळीच सुरू केली. आणि संध्याकाळच्या वेळेला तो केवळ नळावरच्या बायकाच पाहू लागला. खिडकी बंद करून तो सरळ दाराच्या भोकाला डोळे लावूनच बसायचा. जणू काही त्याला पिसंच लागलं होतं. त्याला वाटायचं, आजवरच्या आयुष्यातलं दबलेलं, सडलेलं, अळम्‌-टळम्‌ आता आडमार्गाने उफाळून येतंय. आपल्या जागी दुसरा कुणी नॉर्मल माणूस असता, तर त्याला बापाची काळजी वाटली असती. बायकोची भडभडून आठवण झाली असती. मुलाच्या बाळलीला आठवून जिवाची घालमेल झाली असती. पण आपलं हे भलतंच काहीतरी चाललंय. भाषा जणू आपल्यावर सूड उगवत्येय. गणेशाला आता ते सारं मोकाट होऊ द्यावंसं वाटायचं. एकदाचा निचरा व्हायलाच हवा. केलेल्या अपराधाचं प्रायश्चित्त घ्यायला हवं.

बायकोच्या पत्रांना गणेशा उत्तर लिहायचा, पण थातुरमातुर ओढून-ताणूनच. एका पत्रात तो बापाला नमस्कार लिहायचं विसरलं. बापच आपल्या भरकटण्याला जबाबदार आहे असं त्याला अलीकडे वाटायचं. भाषा ही खरी तर मायमावशीसारखी. पण बापाने आपल्याला असं काही वाढवलं की भाषा कधी परकी, तर कधी अनोळखी झाली. काही शब्दांना आपण दारी आलं असताना झिडकारलं, हाकललं. परिणामी या परक्या गावात मन हे असं वेडंविद्रं झालं. सकाळी सवय म्हणून पूजा-अर्चा आणि संध्याकाळी हे असं. चवीनं बेभान होणं. नवऱ्याने टाकलेल्या, त्या सायीच्या अंगाच्या बांधेसूद सुगंधामुळे तर तो रोमारोमातून खुळावला होता.

ऑफिसातही गणेशा आता थोडा थोडा मिसळू लागला. एक बाई कारकून सोडली, तर सारा पुरुषी खाक्या. गावातल्या भानगडी, झेंगटं, बायकांची शरीरं अशा विषयांवर लोक अचकट-विचकट आणि सतत बोलायचे. काळेले नावाचा एक पन्नाशीतील हेडक्लार्क तर भलताच इरसाल होता. गणेशा तसलं बोलणं कधी आयुष्यात बोलला नव्हता. मात्र असलं सारं तो चवीने ऐकायचा व क्वचित दादही द्यायचा. लोकही आता म्हणू लागले होते, "नवे साहेब आहेत गपचीप, पण असणार रंगेलच."

संध्याकाळच्या खिडक्या बंद असण्यावरून एका शेजाऱ्याने त्याला छेडलं, तेव्हा गणेशा प्रथम थोडासा गांगरलाच. त्याला वाटलं, त्याला आपला चाळा कळला असणार. पण उसनं अवसान आणून तो म्हणाला, "नाही, संध्याकाळी अलीकडे पोथी वाचतो. ध्यान करतो. आमचे बाबा नेहमी सांगतात, की अशा वेळी चित्त अगदी पूर्ण एकाग्र व्हायला हवं. तेवढ्यासाठी खिडक्या बंद करतो."

त्याला वाटायचं, आपल्या या अवस्थेबद्दल कुठेतरी मन मोकळं करावं. लहानपणापासूनचं सारं भडभडून सांगून टाकावं. हॉस्टेलातील मित्रांसारखा कुणी भेटला असता, तरच ते शक्य होतं. खरं तर तेव्हाच बापाला न टरकता चार पोरांसारखं साजरं वागलो असतो, तर आज मुळात ही दशा झाली नसती. हस्तमैथुन आणि भाषेची भीती यामध्ये आंतरिक धागा त्याला हॉस्टेलात जाणवला नव्हता, तो आता हाती आला. हस्तमैथुनात डोळ्यांसमोर बाई आणायची भीती. सतत चोरून काहीतरी दुष्कृत्य केल्याची जाणीव. निर्भेळ आनंद नाही. भाषेच्या वापरात भावनांना, गोष्टींना, वस्तूंना नेमका शब्द वापरायची भीती. कधीकधी तर शब्दबद्ध करायची वानवा. असले शब्द आतल्या आत दडपायचे. शंकराची पिंड लिंग आहे, हेच नाकारावं तसं. हस्तमैथुनाचा प्रश्न तसा मामुली आहे. तात्पुरता. पण भाषेची भीती मात्र आपल्या पाचवीलाच पुजल्यासारखी झाली आहे.

भित्यापाठी ब्रह्मराक्षस, तसे आजवर आपल्या मनात दडपलेले, भावनांना भाषेपर्यंत पोहोचू न दिलेले विकृत कल्लोळ. त्यांच्यापासून आता सुटका नाही.

एका संध्याकाळी सुगंधा एकटीच नळावर असल्याचं पाहून गणेशा बालड्या घेऊन नळाकडे धावला. तिचं अंग लांबून दिसतं त्यापेक्षा जवळून अधिकच मादक दिसतं, हे एव्हाना त्याच्या अंगवळणी पडलं होतं. ती सहज म्हणाली, "आजकाल नळाला चांगली धारच नसते. बालडी भरता भरत नाही." आणि असंच काहीतरी. पण गणेशाला त्याचा अर्थ लैंगिकच वाटू लागला. भाषेविषयी एकूणच तो संशयी झाला होता!

घरी येऊन तो स्वयंपाकाला लागला. भाजी, कोथिंबीर चिरून कणीक भिजवायला बसला. पीठ मळताना त्याच्या डोक्यात सुगंधा आणि तिचं उष्ण, गोरं, पहिल्या धारेचं अंग ठाण मांडून होतंच. पिठाचा स्पर्श त्याला अचानक स्त्रैण भासू लागला. त्याचा हात कणकेतच रेंगाळला. सबंध शरीरात एक प्रकारची सुरसुरी फैलावली. पिठाशी तो लाडेलाडे वागू लागला. लाडकी सुगंधा चक्क परातीत. त्याच्या अंगात सध्या जे वारं संचारलं होतं, त्यावरून त्याला वाटलं; आता यातून सुटका नाही. रोज संध्याकाळी आता हे साऱ्या शरीरभर फैलावणार. त्यापेक्षा आता पोळ्या करायचंच बंद करावं. सरळ बाजारातून पाव आणावे किंवा भातावरच जेवण निभवावं. लग्नानंतर आपण बायकोकडून पोळ्या करायला शिकायलाच नको होतं. पण आख्ख्या अंगातूनच कणीक मळण्याची ओढ लागते त्याचं काय? विचार करकरून त्याचा जीव अगदी मेटाकुटीला यायचा आणि जेवण झाल्यावर पुन्हा डोक्यात सुगंधा तशीच. साऱ्या अंगानिशी आणि अधिक जवळीक साधल्यासारखी.

नवीन गावात आल्यावर दीड-दोन महिन्यांतच त्याची उडालेली ही गाळण पाहून तो अगदी घुसमटून गेला होता. परिस्थिती आता त्याच्या आटोक्याबाहेर चालली होती. कणीक मळताना तो जपमाळ ओढावी तसा रममाण व्हायचा आणि मध्येच घामाघूम. जसं काही एखादं होमहवनच चाललंय. सकाळी नित्यनेमाने अस्खलित संस्कृतात संध्या, पूजा-अर्चा करून संध्याकाळी आपण असे बेभान कसे होतो - त्याचं त्यालाच कळेनासं झालं होतं. आपलं खरं रूप कोणतं? सभ्य, सात्त्विक, 'पितृ देवो भव'वालं की हे संध्याकाळी लंपट होत होत चेकाळणारं?

इथे डाबरेच्या खोलीवर आल्या आल्या, त्याला त्या देवळाच्या पताकेचं, कळसाचं एवढं आकर्षण वाटलं होतं की कधी एकदा ते जाऊन पाहतो, देवदर्शन करतो, असं झालं होतं. डोंगरातलं ते देवस्थान निश्चितच पवित्र आणि स्वयंभू असणार होतं. आता मात्र ही अंतरीची ओढ कुठल्या कुठे रेंगाळली होती आणि डोक्यात भिनली होती कणकेच्या स्पर्शाची वखवख. दीड-दोन वर्षं कसं निभवायचं, हा आता प्रश्नच होता. अगदी अनपेक्षितरीत्या सामोरा आलेला.

पण त्याहूनही भयंकर होतं ते भाषेने मांडलेलं वैर. तो प्रश्न आयुष्यभराचा होता. हस्तमैथुन, कणकेशी चाळा या कृती त्या वैराची केवळ झलक होत्या. वर्षानुवर्षं हस्तमैथुनाचा आस्वाद घेऊनही तो उभ्या हयातीत या विषयावर कोणाशीही चकार शब्द बोलला नव्हताच, परंतु स्वतःशीदेखील स्वच्छ, लख्ख शब्दांत त्याने आपल्या भावनेचा उच्चार केला नव्हता. सारं आळीमिळी गुपचिळी!

दुसरा एखादा कुणी गणेशाच्या जागी असता तर त्यानेही नळावरच्या बाया पाहून असंच काहीतरी आरंभलं असतं - जणू काही ते नैसर्गिकच आहे अशा आविर्भावात. मन सशक्त ठेवून. पण काही घडलंच नाहीये अशा थाटात.

गणेशाला अलीकडे तेच भयंकर वाटायचं. आपला राग, मत्सर इतर चार लोकांसारखाच; पण त्याचा निचरा करायला आपल्याकडे शिवी नाही. शारीरिक प्रेरणा इतरांसारख्याच; पण त्या व्यक्त करायला लागणाऱ्या शब्दकळेविषयी अप्रियता, धास्ती. त्यांचा अगदी स्वत:शीदेखील उच्चार नाही. परिणामी त्या भावनेला शब्दांचं यथोचित कोंदण नाही. त्यामुळे भावनेची होणारी नासाडी. होणारा कोंडमारा. सारंच विपरीत. त्याचेच हे परिणाम. दबलेल्या अस्फुट भावना आणि नाकारलेले शब्द आता संगनमताने आपल्या पाठी पडलेत. यातून वाचवायला काही आपला कडक शिस्तीचा बाप येणार नाही. हे आता स्वत:च निस्तरायला हवं.

डाबरेच्या खोलीवर त्याने बऱ्याचदा हस्तमैथुन केलं होतं. पण त्याला आता विविधता हवी होती. कधी वाटायचं, मोरपीस फिरवावं, अगोचर नाचावं. फार काय, तिथं पंख कापलेल्या माशा सोडून हुळहुळवावं. असल्या चित्रविचित्र इच्छाही त्याला वरचेवर व्हायच्या. त्यात आता हे आलिया भोगासी कणकेचं झेंगट. सुगंधामुळे पाठी लागलेलं. लग्न झाल्यामुळे असावं, पण आता त्याला बाईला आठवल्याशिवाय ते जमेचना. त्या वेळी बायकोशिवाय आणखी कोणी मनात शिरू नये यासाठी तो जिवाचा आटापिटा करायचा. आणि एवढं होऊनदेखील हॉस्टेलातील पोराचा सराईतपणा त्याच्यात नव्हताच. 'एक फुलीची मुलीची' हा उखाणा अजूनही त्याची गाळण उडवायचा. त्यातल्या त्यात 'योनी' हा शब्द तो निदान मनातल्या मनात तरी उच्चारायचा.

'योनी' हे कसं देवीसारखं वाटतं! हॉस्टेलातील एका पोराकडूनच त्याने हा शब्द ऐकला. पण त्याआधी जन्मपत्रिकेत तो वाचलेला असल्याने फारसं बिचकायला झालं नाही. गणेशानं आता त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न सुरू केला. तातडीचा उपाय म्हणून हस्तमैथुन किमान महिनाभर बंद करायचं ठरवलं. तरीही तो कणकेतून योनी बाहेर काढायचाच. त्याशिवाय त्याला स्वयंपाक झाल्यासारखं वाटायचं नाही. एखाद्या हाडामांसाच्या स्त्रीशी वागावं, तसा तो खोलीतील एकांतात त्या कणकेशी वागायचा. तर कधी देवीसारखा. जेवताना चित्रावती काढाव्यात एवढ्या सहजतेनं तो कणकेतून योनीच्या आकाराचा गोळा बाहेर काढायचा. त्याच्याशी तऱ्हेतऱ्हेने वागायचा.

गणेशा आता हस्तमैथुन न करताच एक वेगळ्या पातळीवरचा शारीरिक आनंद मिळवू लागला. त्या कणकेच्या योनीबरोबरच त्याचा संध्याकाळ-रात्रीचा बराचसा वेळ जाऊ लागला. आपल्या डोक्यावर परिणाम होतोय, ही भीती त्याच्या मनात बळावू लागली. क्वचित त्याला एकटं एकटं खूप हसायला यायचं. आनंद व्हायचा. त्याला एवढं भान होतं की हे असंच वाढत गेलं तर एखादा डॉक्टर गाठणं श्रेयस्कर. गणेशाला वाटायचं, आपल्या हस्तमैथुनातील गुरुंना ही कणकेची गंमत कळलीच नसणार. पण ती पोरं कशाला करतील असले वेडेविद्रे चाळे? ज्या वयात ते ते करणारी ती मुलं आता नेकीने संसार करत असतील. इकडे आपण मात्र भरकटतच चाललोय.

हळूहळू तो नळावरच्या बाया पहिल्या उत्साहाने पाहिनासा झाला होता. अगदी सुगंधाकडेदेखील रोजच्या रोज मिटक्या मारत पाहणं त्याला गरजेचं वाटायचं नाही. त्याला असंही वाटलं की तिच्या टाकलेल्या नवऱ्यानंही असंच काही कणकेत वगैरे शोधलं असेल आणि ही आपली बसली आहे इथे पाणी भरत.. खसाखसा हातपाय चोळत.

ग्रहणातलं सूर्यबिंब जसं परातीतील पाण्यात पकडतात, तसं काहीतरी त्याला त्या कणकेत सापडलं होतं. काही दिवसांनी आपण महिन्याभरापुरतंच हस्तमैथुन बंद केलंय, हेही तो विसरला. त्याला वाटायचं, आता त्या दाराच्या फटीतही लांबी भरावी. खरं तर कणीकच भरावी. आणि निवांतपणे कणकेशी चाळे करत रात्र साजरी करावी. ऑफिसातून सुटताना त्याला कणीकच आठवायची. त्याचं ऑफिसातील वागणं मात्र पूर्ववतच होतं. ही गणेशाला बापानं लावलेली शिस्त होती. जाता न जाणारी.

बायको आपली वरचेवर पत्रं लिहायची. तिकडची ख्याली-खुशाली कळवायची. तब्बेतीला जपा वगैरे प्रेमाचं लिहायची. छोट्याला तुमची खूप खूप आठवण येते व मलाही, असं हळूच लिहायची. छोट्याची दिसामासाने होणारी प्रगती कळवायची. इथे गणेशा येतानाच तो थोडं थोडं बोलायला लागला होताच. पण बायकोने कळवलं होतं की तो आता स्पष्टपणे आई, बाबा, मामा असं म्हणतो. आजोबा असं त्याला नीट म्हणता येत नाही, तर 'आबोजा' म्हणतो.

आपला छोट्या बोलायला लागला - त्याचा भाषेशी संबंध सुरू झाला हे जाणवलं, तेव्हा गणेशाला वेगळंच भान आलं. त्याच्या मनावर रोमांच उठले. आपल्याबाबतीत घडलेलं पूर्णपणे निस्तरणं आता कठीणच होतं; परंतु आपला अंश ज्याच्यात वाढतोय, तो छोट्या, आता भाषेशी अगदी सहजतेने वागला पाहिजे. त्याच्यात कुठलेही आडपडदे, आढेवेढे निर्माण होता कामा नयेत. दीड-दोन वर्षांनी परत गावी परतलो की त्याची वाढ डोळ्यांत तेल घालून केली पाहिजे. तो विचारेल त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण त्याला सांगू. त्याची जिज्ञासा कुठंही मारायची नाही. कदाचित त्याच्या निमित्ताने आपणही काही शब्द आयुष्यात प्रथमच मोठ्याने उच्चारू.

बायकोच्या या पत्रानंतर गणेशा कणकेशी पूर्वीच्या लघळपणे वागायचा बंद झाला होता. आपल्यात काहीतरी आमूलाग्र फरक लवकरच पडणार आहे, अशा थाटात तो वागू लागला. भाषेशी आपण सतत आट्यापाट्या खेळलो. तिनंही आपल्याला बागुलबुवा करून छळलं. पण छोट्या मात्र तिला आवेशात सामोरा जाईल, भिडेल; या स्वप्नाने त्याच्या अंगात आगळंच बळ संचारलं. पिठाची योनी, हस्तमैथुन हे सारे भाषिक हेळसांडीचे उद्रेक आहेत झालं.

गणेशाला वाटलं, दोन दिवस सुट्टी घेऊन गावी जावं आणि कधी नाही ते बापाशी तोंड वर करून तावातावाने बोलावं. त्याला समज द्यावी, 'माझ्या छोट्याला कधीही दटावायचं नाही. त्याला हवं तसं वागू दे. मी आणि तो पाहून घेऊ. पोरगा माझा आहे. तो माझ्या मनासारखा वाढेल. कडक शिस्तीमुळे तुम्ही मला भाषेपासून पारखा केलात. नैसर्गिक प्रेरणांचीही त्यामुळेच त्रेधातिरपीट झाली. आंड खेचलेल्या बैलासारखी.' आपण 'आंड' हा शब्द एवढ्या सहजतेने मनातल्या मनात उच्चारला, त्यामुळे त्याला क्षणभर का होईना स्फुरण चढलं. मात्र मग पुढचं वाक्य त्याला सुचेना.

त्याला वाटलं, आपली ही अवस्था कहाणीच्या स्वरूपात लिहावी. आटपाट नगर होतं. तेथे गणेशा नावाचा एक भिक्षुकाचा मुलगा होता वगैरे. त्यातील पात्रांची नावंही बदलू नयेत. घडलं तसं आणि तेवढंच लिहावं. योनीदेवीचं उपाख्यानही बेलाशकपणे जोडून द्यावं. आणि बापाला फर्मावावं, ही कहाणी घरोघर सांग. म्हणजे आपल्यासारखी वेडीविद्री अवस्था आणखी कुणाची होणार नाही. भाषाभीरूंचं समूळ उच्चाटन करून तिन्ही लोकांत आनंद व समाधान नांदून, कहाणी 'साठाउत्तरी सफळ संपूर्ण' होईलच,. पण बापाचंही नाक ठेचलं जाईल.

बापाचा असा सूड उगवताना त्याला असंही वाटलं की आपल्या या कुंथवणुकीला बाप तरी पूर्णपणे जबाबदार कसा? इतर पोरांना काही त्यांच्या बापाने 'भ'ची बाराखडी शिकवली नाही, की सर्वनामांचे, क्रियापदांचे लैंगिक अर्थ समजावून दिले नाहीत. असल्या गोष्टी ज्याच्या त्याने करायच्या असतात. बरं इतर पोरंही घरी चारचौघांत अगदी सर्रास तसंच बोलत नसतात, तर आपापसांतच हे असलं पाचकळ बोलतात. आपणच स्वतःच्या मनावर जोखड ठेवलं आणि झापडं बांधून वावरलो. आता बापाच्या माथ्यावर खापर फोडण्यात कसला आलाय पुरुषार्थ? आपण आधी भावनांना परिपूर्ण करणारे शब्द टाळले आणि शब्दांची हकालपट्टी केल्याने भावना निकोप राहिल्या नाहीत, बिथरल्या. अशा चक्रात आपण स्वतःहूनच अडकलो. आता रागाने आपण सतत वडिलांचा उल्लेख मनातल्या मनात 'बाप' असा केलाच ना? किंवा हस्तमैथुन तरी कुठे टाळलं? तेव्हा आपल्या या दयनीय अवस्थेला बापापेक्षा आपणच अधिक जबाबदार आहोत.

गणेशाला वाटलं, आता या खोलात शिरण्यापेक्षा, आपला छोट्या, कुणाच्याही चुकीमुळे का होईना, आपल्यासारखा होणार नाही याची काळजी घेणं अधिक महत्त्वाचं आहे. आपल्या बापाने आपल्या हातातील पळी-पंचपात्र टाळलं तसं. एकंदरीतच आयुष्य समोर येईल तसं स्वीकारता आलं पाहिजे. निदान स्वतःशी तरी प्रामाणिक राहता आलं पाहिजे. स्वतःशी तरी संवाद साधला पाहिजे. शरीर-मनाने एकमेकांची भीती बाळगता कामा नये. गणेशा त्याच्याच नकळत छोट्यासंबंधी बरीच स्वप्नं रंगवू लागला होता. सुगंधा वगैरे गोष्टी मग दुय्यमच बनून गेल्या. आता त्याला डॉक्टरकडे जावं लागणार नव्हतं. बऱ्यापैकी नॉर्मल वाटत होतं.

अस्वस्थ परंतु आत्मविश्वासपूर्ण गणेशाने एके दिवशी संध्याकाळी मग दरवाजा आणि खिडकी सताड उघडी टाकली. कॉटवर तो नळावरच्या बायकांकडे प्रथमच पाठ करून बसला आणि सत्याला सामोरं जायच्या निर्धाराने बायकोला पत्र लिहू लागला. आतापर्यंतच्या आयुष्यात त्यातल्या त्यात बायकोशीच त्याचं बऱ्यापैकी जमायचं. म्हणूनच त्याने आपल्या मनाची आणि जिवाची लहानपणापासून झालेली विकृत वाढ, जडणघडण, तिला सविस्तर कळवायचं ठरवलं. या निमित्ताने एकदाचं मोकळं होऊन जायचं, लहानसहान गोष्टीही कबूल करायच्या. मध्ये आपण पिठाचं काय करायचो हेदेखील त्याने तिला कळवायचं ठरवलं. तो एका अपूर्व आवेगात आणि ओघात लिहू लागला. ही सफाई तो प्रथमच अनुभवत होता.

लिहिता-लिहिता त्याला जाणवलं की भाषेच्या वापराला मुळातच काही मर्यादा आहेत. त्या ओलांडणं शक्यच नसतं. मात्र स्वतःशी तरी निश्चितच पूर्ण मोकळेपणाने, अगदी नागडं होऊन बोललं पाहिजे. ते अत्यंत जरुरीचं असतं.

'पिठाचा हल्ली मी दुरुपयोग चालवलाय.' याहून स्पष्ट तो तरीही लिहू धजला नाही. पण एवढंही लिहिणं त्याच्या लेखी कमी मोलाचं नव्हतं.

याहूनही अधिक स्पष्ट लिहिता येईल का, या विचारात त्याने पाठ फिरवली, तोच त्याला नळावर पाणी भरणारी सुगंधा दिसली. पण आज त्याला जराही अवघडल्यासारखं झालं नाही. नैसर्गिकच वाटलं.

पत्र पुरं करताना त्याने लिहिलं, "छोट्याला सांग - आ आ आईतला, बा बा बाबातला आणि पु पु पिठातली."

त्याला खात्रीनं वाटलं, 'पु पु पिठातली' याचा अर्थ बायको निश्चितच समजून जाईल. फार तर थोडा वेळ लागेल. त्याला हा उल्लेख वरच्याहून अधिक स्पष्ट वाटला.

ताजा कलम म्हणून त्याने तरीही टीप जोडली; 'पु पु पिठातली'चा अर्थ जर कळला नाहीच, तर प्रत्यक्ष भेटीत मी सांगेनच.

पाकिटाच्या गोंदावर थुंकीचं बोट फिरवत गणेशाने पाकीट बंद केलं, तेव्हा त्याला थोडं कमी भाषाभीरू वाटत होतं. सांधे सुटल्यासारखं मोकळं मोकळं.

"नारभटाच्या बैलाला होऽऽऽ" असं स्वतःशीच ओरडत गणेशाने मग त्वेषाने दोन बालड्या उचलल्या आणि त्याच्या भरदार पोटऱ्यांनी सुगंधाच्या दिशेने डौलात धाव घेतली.

---

('राज्य राणीचं होतं' या कथासंग्रहातून पुनर्प्रकाशित, अक्षर प्रकाशन)

'पु पु पिठातली उर्फ भाषाभीरूची गोष्ट' ह्या कथेची जन्मकथा

field_vote: 
4.666665
Your rating: None Average: 4.7 (3 votes)

प्रतिक्रिया

वा! खासच. मानसिक द्वंद्व आणि लढा मस्त ऊभा केलाय. हेसुद्धा फार फार अतिशय खरे आहे की आईवडीलांनी बसवलेले बरेचसे "सेफ्टी व्हाल्वज"काढून फेकून द्यावे लागतात. नाहीतर ही अटळ घुसमट होते.
.
I don’t regret the things I’ve done, I regret the things I didn’t do when I had the chance.
.
खूपच आवडली. हा जो "लहानपणीचा केशवपणा" आहे त्याच्याशी आयडेंटीफाय करु शकले. हॉस्टेलवरती असे अनुभव आले नाहीत पण .... स्वातंत्र्य उपभोगता आले नाही कारण केशवपणा.
.
मात्र पुढे कधीतरी तो झुगारला गेला तो अशा तीरमीरीत, असा की मैलोन मैल जाऊन पडला. असो.आयडेंटीफाय करता आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा आवडली. मध्ये किंचीत तेचतेच झाल्याने कंटाळवाणी वाटली; पण एकंदरीत आवडली.
कॉलेजमध्ये असताना मित्रांमध्ये बोलताना निव्वळ काहीतरी बंडखोरी केल्यासारखं वाटतं म्हणून सिगरेटी फुंकताना शिवराळ भाषेत बोलणे आणि एरवी निषिद्ध असलेले शब्द वापरुन थ्रिल मिळवणे असे प्रकार केलेले आहेत. बाहेर असं बोलत असूनही घरी मात्र चुकूनही असा एकही शब्द कधी तोंडातून निघाला नाही अशी भाषाभीरुता फार पगडदार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा आवडली. बापाचं पात्र आपल्या सामाजिक, संस्कारिक वातावरणाचं प्रतीक म्हणून उत्तम जमलेलं आहे. आणि तरीही तो हाडामांसाचा माणूस वाटावा असं झालेलं आहे. हे नातं हळूहळू उलगडून दाखवलेलं आहे. कथेची मांडणीही व्यवस्थित झालेली आहे. डाबरे, सुगंधा ही पात्रंही पार्श्वभूमीसाठी योग्य प्रमाणात ठळक-पुसट झालेली आहेत.

कथेच्या शीर्षकात भाषाभीरू हा शब्द आणि कथेत सतत येणारा भाषाभीरू आणि भाषेचा उल्लेख खटकला. 'आपल्याला शिव्या देऊन मन मोकळं करण्यासाठी शब्दच नाहीत आपल्याकडे.' या अर्थाचं वाक्य आलेलं आहे तशीच वाक्यं आली असती तर नैसर्गिक वाटलं असतं. आणि गणेशा-बापाचं नातं जसं फुलत गेलं आहे तसं 'भाषा, किंवा ती जीमधून येतात ते संस्कार आपल्या लैंगिक (किंवा एकंदरीतच) मोकळेपणावर बंधनं आणतात' हे तत्त्व नकळत वाचकाच्या मनात ठसलं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा आवडली.

वाचताना सतत 'कपलिंग' या ब्रिटीश विनोदी मालिकेतलं जेफ नावाचं पात्र सतत आठवत होतं. त्याला निरनिराळे गंड आहेत; भाषेबद्दल त्याला असणारा गंड म्हणजे तो भाषा(अ)भीरू आहे. भलत्या वेळी आपण भलतेच शब्द उच्चारले तर आपलं काय होईल, याची त्याला भीती आहे. म्हणजे नोकरीसाठी मुलाखत देताना आपण मध्येच 'gusset' किंवा 'thighs' असे शब्द वापरले तर आपलं काय होईल अशी भीती त्याला वाटते.

ही मालिका यूट्यूबवर उपलब्ध आहे. तांब्यांना त्याची जोरदार शिफारस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला अतिशय आवडणारी ही कथा. अंकाच्या प्रक्रियेत तिची आठवण पुष्कळ उशिरा झाली. पण एकदा झाल्यावर, या कथेविना अंक अपुरा राहील, याची खातरीही झाली. कथेच्या पुनर्प्रकाशनाची परवानगी तर लेखकानं दिलीच. पण त्यासोबत या कथेमागची गुंतागुंतही उलगडून दाखवली. त्याबद्दल लेखकाचे आभार.

माझ्या दृष्टीनं ही कथा पॉर्नोग्राफीचं (संभोगदर्शन या अर्थी) आपल्या आयुष्यातलं स्थानच उलगडून सांगते. किती प्रकारचं दमन, अज्ञान, अतृप्ती, असहायता, कोंडमारे घेऊन आपण जगत असतो.. त्या सगळ्याला वाट करून देण्यासाठी सगळ्यांपाशी शब्द वा रेषा वा रंग वा सूर वा साधं कसबही असतंच असं नाही. पण ही धगधगती इच्छा मात्र असते. तिला वाट करून देतात शिव्या - अचकटविचकट बोलणं - आधाशी नजरा - किंवा मग या प्रकारची - जिला विकृत म्हणता येईल - अशी कामतृप्ती. या दोन्ही वाटांमध्ये एक गाठ आहे. थेट त्या गाठीवर बोट ठेवल्यासारखी ही कथा आहे. अवघड जागची.

तिच्याशिवाय हा अंक खरोखरच अपुरा राहिला असता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन