नैसर्गिक शेती - भाग ६

नैसर्गिक शेती हा शब्दप्रयोग अलिकडे बराच ऐकण्यात-वाचण्यात येतो. ही नेमकी काय भानगड आहे, आणि त्यातल्या तज्ञ म्हणवणाऱ्या लोकांनीही त्यात कसे वैचारिक गोंधळ घालून ठेवले आहेत, त्यावर थोडा प्रकाश टाकण्याचा या टिपणांमधून प्रयत्न करते आहे. या मालिकेतील माहिती ही बव्हंशी माझे वडील डॉ. आनंद कर्वे यांनी गेल्या साठेक वर्षांत केलेल्या कामावर आधारित आहे. कार्यबाहुल्यामुळे जेव्हा वेळ होईल तेव्हा छोट्या छोट्या टिपणांमधून विषय पुढे पुढे नेत राहीन.
...
अनुक्रमणिका: नैसर्गिक शेती - भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७ | भाग ८
...

निसर्गात वनस्पती आपल्या आपण वाढतात, त्यांच्या बिया जमिनीवर पडतात, आपल्या आपण उगवून येतात. जगात ज्या ठिकाणी माणूस प्रथम शेतीकडे वळला, त्या सर्व ठिकाणांचे महत्वाचे वैशिष्ट्य होते, अतिशय सुपीक जमीन. अशा जमिनीत एखादे बी नुसते खोचले, तरी रोप उगवून येणे शक्य होते. शेतात बाहेरून काही आदाने (पाण्याखेरीजही) दिली पाहिजेत हा विचार मग नेमका कसा पुढे आला आला, हे सांगणे अवघड आहे, पण जवळजवळ सर्व प्राचीन कृषिप्रधान संस्कृतींमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात शेतजमिनीत बाहेरून काही पदार्थ घातले जात होते असे पुरावे मिळतात. यामध्ये राखेचा वापर सार्वत्रिक होता. पुढे युरोपात समुद्री पक्ष्यांच्या आणि वटवाघळांच्या विष्ठेचा खत म्हणून वापर केला जाऊ लागला. अशा विष्ठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या खडकाळ सागरी किनाऱ्यांना आणि गुहांना व्यापारी महत्व प्राप्त झाले. एका अर्थाने ही अगदी पहिली खते म्हणता येतील. पण या खतांचे नेमके काम काय, हे त्यावेळी माहित नव्हते, असे पदार्थ जमिनीत घातले तर उत्पन्न वाढते, या निरीक्षणाच्या जोरावरच हे चालू होते.

पिकांच्या वाढीसाठी नायट्रोजन व इतर काही खनिज पोषणद्रव्यांची विशिष्ट प्रमाणात गरज असते, हा विचार शास्त्रीय पध्दतीने 19व्या शतकातील जर्मन रसायन शास्त्रज्ञ जस्टस फॉन लीबग यांनी प्रथम मांडला. शेतीशास्त्राची मांडणी ही बरीचशी लीबग यांनी घातलेल्या पायावर उभी आहे. वनस्पती जमिनीतील खनिजांमधून पोषण मिळवत असतात, त्यामुळे आपण जेव्हा जमिनीत उगवलेले पीक कापून बाजूला काढतो, तेव्हा शेतातल्या मातीतून खनिजे कमी होतात. त्यामुळे प्रत्येक पिकासाठी मातीत बाहेरून विशिष्ट प्रमाणात ही खनिजे परत घातली पाहिजेत, नाहीतर कालांतराने मातीतली खनिजे संपून माती पूर्णतः नापीक होईल, हा विचारही लीबग यांनी प्रथम मांडला. मग राख किंवा पक्ष्यांची विष्ठा किंवा माशांच्या हाडांचा चुरा, इ. पदार्थांतून आडवळणाने खनिजे देण्यापेक्षा, आवश्यक त्या प्रमाणात थेट शुध्द रसायनेच का घालू नये, हा विचार त्यांच्या कामातूनच पुढे आला, त्यामुळे त्यांना खत उद्योगाचे जनकही म्हटले जाते.

मात्र कारखान्यांमध्ये खास निर्माण केलेली शुध्द रसायने थेट शेतात वापरण्याचे दुष्परिणाम लक्षात आल्यावर, अलिकडच्या काळात सेंद्रीय शेतीची संकल्पना पुढे आली. सेंद्रीय शेती ही खतांचे महत्व नाकारत नाही, फक्त त्या खतांचा स्रोत इथे वेगळा आहे. वनस्पतींनी जमिनीतून उचललेली पोषणद्रव्ये ही अन्नसाखळीचा भाग बनतात. तेव्हा अन्नसाखळीतला कोणताही टाकाऊ पदार्थ या पोषणद्रव्यांचा स्रोत म्हणून वापरता येईल, हा त्यामागचा विचार आहे. पण ज्या पध्दतीने सेंद्रीय शेती केली जाते, त्यात आणि रासायनिक शेतीत तत्वतः फार फरक नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.
सेंद्रीय शेतीमध्ये सेंद्रीय पदार्थ – मग ते शेण असेल, किंवा शेतातला काडीकचरा, इ. – कुजवून त्याचे खतात रूपांतर केले जाते. कुजवण्याच्या प्रक्रियेत त्या सेंद्रिय पदार्थातील कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन बऱ्याच अंशी हवेत उडून जातात, आणि खनिज पदार्थ मागे रहातात. मग अशा रितीने तयार केलेले खत किती प्रमाणात जमिनीत घालायचे, हे त्या पिकाची या पोषक रसायनांची गरज किती आहे, आणि तयार केलेल्या खतात या रसायनांची मात्रा किती आहे, यावर ठरते. त्यामुळे जिथे रसायनिक शेतीत काही किलोग्रॅम शुध्द रसायन घालून भागते, तिथे सेंद्रीय खताच्या मात्रा मात्र टनाच्या हिशोबात असतात.

एकदा कारखान्यात बनवलेली कृत्रीम रसायने मातीत जाऊ द्यायची नाहीत, हा विचार रुजला की तो फक्त खतांपुरता मर्यादित रहात नाही तर कीटकनाशक आणि तणनाशकांनाही आपल्या कवेत घेतो. मग वेगवेगळ्या सेंद्रीय स्रोतांतून निर्माण केलेली संरक्षक द्रव्ये यासाठी वापरली जातात, किंवा काही प्रमाणात उत्पन्न कीटकांना अर्पण करण्याची मानसिक तयारी करावी लागते.

तणांचे प्रमाण कमी करण्याचे काही हुशार उपाय आहेत. तणांच्या बीजांना उगवून येण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते, त्यामुळे शेतात एकदा पीक उभे राहिले की तण उगवून येत नाही. याचा फायदा करून घेण्यासाठी एक पीक उभे असतानाच, पुढच्या पिकाचे बी पेरून देणे, किंवा आधीच्या पिकाचा उरलेला पेंढा जमिनीवर आच्छादन म्हणून वापरणे, इ. उपाय करता येतात. निसर्गाच्या बलस्थानांचा आणि मर्यादांचा आपल्या फायद्यासाठी वापर करून घेण्याचे असे उपाय आपल्याला सेंद्रीय शेतीकडून नैसर्गिक शेतीच्या संकल्पनेकडे घेऊन जातात.

रासायनिक खतांच्या आणि कीटकनाशक व तणनाशकांच्या खरेदीच्या निमित्ताने कर्जांच्या सापळ्यात सापडणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र या शेतीपध्दतीत दिलासा मिळतो, कारण सेंद्रीय खते ते स्वतः तयार करू शकतात, त्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागत नाहीत. कीटकांच्या आणि तणांच्या नियंत्रणाचे पर्यायही त्यांच्या हातातले असतात. सेंद्रीय शेतीत रासायनिक शेतीइतके उत्पन्न मिळाले नाही, तरी बिघडत नाही, कारण शेतकऱ्याचा आदानांवर होणारा खर्च कमी झाल्यामुळे त्याचा नफा वाढतो. अर्थात रासायनिक शेतीमुळे होणारे उत्पन्न वर्षागणिक कमी होत जाते, तर सेंद्रीय शेती एकदा रुळली की उत्पन्न स्थिरावते. त्यामुळे दीर्घकालीन विचार केला तर सेंद्रीय शेती ही उत्पन्नातही रासायनिक शेतीला वरचढ होते.

मात्र सेंद्रीय शेतीच्या संकल्पनेतही मातीतल्या जीवाणूंकडे मुख्यतः दुर्लक्षच केले आहे. सेंद्रीय शेतीच्या पध्दतींमुळे मातीतल्या जीवाणूंना काही अंशी जीवदान मिळते, आणि तेही या शेतीच्या यशस्वितेला हातभार लावतात, हे मी नाकारत नाही, पण हा केवळ एक सुदैवी योगायोग आहे. जीवाणूंचे नेमके योगदान समजून त्याचा वापर करून घेणे, ही सेंद्रीय शेतीच्या पुढची पायरी आहे. नैसर्गिक शेती म्हणून पडलेले काही पायंडे आपल्याला या पायरीकडे काही पावले घेऊन जातात, पण दुर्दैवाने ही शेतीपध्दती अंधश्रध्दांच्या विळख्यात अडकलेली आहे. याबद्दल अधिक पुढच्या लेखात.
...
अनुक्रमणिका: नैसर्गिक शेती - भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७ | भाग ८
...

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

माहितीपूर्ण लेख

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुणाच्या बुडाखाली किती अंधार हाय,त्ये समद्या तालुक्याला माहित्ये.

लेखमाला छान चालू आहे. नैसर्गिक म्हणजे चांगलं, रासायनिक म्हणजे वाईट असा काळापांढरा भेदभाव न करता त्या दोन्ही पद्धतींची गुणवैशिष्ट्यं सांगून दूध का दूध और पानी का पानी करण्याचा दृष्टिकोन आवडला.

पण दुर्दैवाने ही शेतीपध्दती अंधश्रध्दांच्या विळख्यात अडकलेली आहे. याबद्दल अधिक पुढच्या लेखात.

पुढचा लेख लवकर टाकावा ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक लेखमाला

निसर्गाच्या बलस्थानांचा आणि मर्यादांचा आपल्या फायद्यासाठी वापर करून घेण्याचे असे उपाय आपल्याला सेंद्रीय शेतीकडून नैसर्गिक शेतीच्या संकल्पनेकडे घेऊन जातात.

याविषयीच्या आधिक माहितीच्या प्रतिक्षेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्सुकता ताणली गेली आहे. प्रचलित सेंद्रिय खते, ती तयार करण्याच्या पद्धती, किफायतशीरपणा, हे सर्व पुढे येईलच म्हणा. जैविक शेती असे काही असल्यास त्याविशयी वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरच्या प्रतिसादांप्रमाणेच, पुढच्या भागांची वाट बघत आहे. थोडा इतिहास, थोडी व्यावहारिक माहिती अशी मांडणीही आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मासानोबू फुरुओका (Masanobu Fukuoka) यांचे The One-Straw Revolution नुकतेच वाचले , याच विचारसरणीवर त्यांचेही काम वाटते. तुमच्या वडिलांच्या आणि त्यांच्या कामात किती साम्य आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सेंन्द्रीय शेतीचं हे वर्णन वाचून मला अशी शेती = सध्या आयुर्वेद या नावाखाली जे चालतं ते तर रासायनिक शेती म्हणजे "अ‍ॅलोपथी" या नावाखाली मॉडर्न मेडिसिनच्या एका तुकड्याचा आपल्यावर वारेमाप प्रयोग होतो त्याची आठवण झाली.

मला व्यक्तीशः जर काढे/चुर्णादी आयुवेदिक म्हटल्या जाणार्‍या किंवा घरगुती म्हटल्या जाणार्‍या उपायांनी बरे वाटत असेल तर शरीरात थेट रासायनिक फवारणी करायला नको वाटते - शिवाय शरीरावर त्याचे साईड इफेक्ट्स होतात हे ही समजते - दिसते. तेव्हा झाडांनाही तसेच वाटत असेल का त्यांच्यासाठी दोन्ही उपाय म्हणजे केवळ आपले समाधान आहे त्यांच्यासाठी ते एकच आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे? (तसे म्हणायचे नसावे असा अंदाज)

===

लेखमाला फारच छान चालू आहे. पुढिल भागाच्या प्रतिक्षेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सर्वांच्या प्रतिसादासाठी धन्यवाद.

आत्तापर्यंतच्या लेखांवर आलेल्या प्रतिसादातील काही मुद्द्यांनाही पुढील काही भागांत स्पर्श करायचा असल्याने थोडी संदर्भांची जुळवाजुळव चालू आहे. शिवाय कामे, प्रवास, इ.चा रेटाही आहेच, त्यामुळे थोडा उशीर होतो आहे, पण लेखांवर काम चालू आहे, हे सांगण्यासाठी फक्त हा प्रति-प्रतिसाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ