व्यवस्थापक: 'आजचे दिनवैशिष्टय' ह्या सदरात दिसणाऱ्या नावे आणि घटनांवरून वेगवेगळे धागे सुरू करण्याऐवजी एकाच सलग धाग्यात वेळोवेळी ही माहिती नोंदत गेल्यास तिला अधिक सुबकपणा येईल असे वाटून श्री. कोल्हटकर यांनी असा पहिला धागा सुरू केला होता. आधीच्या धाग्यावर १००+ प्रतिसाद झाल्याने वाचकांच्या सोयीसाठी नवा भाग काढत आहोत.
आजच्या (१२ जून) दिनवैशिष्टयातील नोंदीनुसार आर्यभट पहिला ह्या गणितज्ञाचा जन्म १२ जून ४७६ ह्या दिवशी झाला. ह्यातील १२ जूनच्या उल्लेखामागे काय आधार आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे.
आर्यभटाने आपल्या आर्यभटीयाच्या कालक्रियापाद ह्या भागाच्या १०व्या श्लोकामध्ये आपल्या जन्मवर्षाचा उल्लेख असा केला आहे:
त्र्यधिका विंशतिरब्दास्तदेह मम जन्मनोऽतीता:॥
अर्थ - तीन युगपाद आणि साठदा साठ इतकी वर्षे गेली तेव्हा माझ्या जन्मापासून तेवीस वर्षे झाली होती.
ह्याचा अर्थ असा की कलियुगातील ३६०० वर्षे संपली तेव्हा आर्यभट २३ वर्षांचा होता. कलियुगाची गतवर्षे ३६०० म्हणजे इ.स. ४९९. त्यातून २३ कमी केले म्हणजे आर्यभटाचे जन्मवर्ष ४७६ इसवी असे निघते. येथपर्यंत बहुतेक अभ्यासकांचे एकमत दिसते.
आर्यभटाने ह्यापुढे आपला जन्मदिवस अधिक स्पष्टपणे लिहून ठेवलेला नाही आणि अन्य कोणत्या पुराव्यानेहि त्याची काही सूचना मिळत नाही. कलियुगातील ३६०० वर्षे संपली तेव्हा आर्यभट पूर्ण २३ वर्षांचा होता आणि त्याचे २४वे वर्ष प्रारम्भ झाले नव्हते असे शब्दशः मानून त्याचा जन्मदिनांक मार्च २१, ४७६ ह्या दिवशी पडतो असे खालील उतार्यावरून दिसते:
(स्रोत - Introduction - p.xx, Aryabhatiya of Aryabhata ed. Kripa Shankar Shukla, published for The National Commission for the Compilation of History of Sciences in India.)
तेव्हा प्रश्न असा की १२ जून ह्या दिनांकामागे कशी गणना आहे?
(२१ मार्च हा त्याचा जन्मदिनांक हे ठरविण्यामागेही आर्यभटाच्या विधानामध्ये कसलाहि मोघमपणा नाही आणि ते शब्दशः मानले गेले पाहिजे हे गृहीतकृत्य आहेच.)