आज काय घडले... पौष व.६ भरतपूरचा अजिंक्य किल्ला !

bharatpurcha killa
शके १७२६ च्या पौष व. ६ रोजी होळकर आणि जाट यांनी भरतपूर येथे इंग्रजांचा प्रचंड पराभव केला.
बाजीराव, शिंदे, होळकर यांची सत्ता संपुष्टांत आणण्याचे अनेक प्रयत्न इंग्रजांनी या वेळी चालू केले होते. दीगच्या लढाईनंतर यशवंतराव होळकर भरतपूरच्या आश्रयास ससैन्य येऊन राहिले होते. सुरजमल जाटाचा नातु रणजितसिंग हा या वेळी भरतपूरच्या गादीवर होता. यशवंतराव होळकरास इंग्रजावर विजय मिळतात हे पाहून रणजितसिंगासहि अवसान चढले. यशवंतराव व जाट एक झालेसे पाहून इंग्रजांनी आपला मोर्चा भरतपुरावर वळविला. २ जानेवारी १८०५ रोजी भरतपूरच्या किल्ल्यासमोर इंग्रजांचा तळ पडला. भरतपूरचा किल्ला उंच डोंगरावर असून त्याच्याभोवती पाण्याचे विस्तिर्ण खंदक होते. जाट आणि मराठे यांच्यासारखे खंदे वीर हाती शस्त्र घेऊन इंग्रजांविरुद्ध उठले. पहिल्याने इंग्रजांचा पराभव झाला. नंतर पौष व.६ रोजी त्यांनी दुसरा हल्ला चढविला. खंदकांच्या लांबी-रुंदीची मापे घेऊन इंग्रजांनी जोराची तयारी चालविली होती. खंदकाच्या एका काठावरून पलीकडच्या काठापर्यंत पोचतील अशा शिड्या तयार झाल्या. सर्व सिद्धता झाल्यानंतर ले. कर्नल मॅकराय, कॅ. लिंडसे या इंग्रज अधिकान्यांच्या नेतृत्वाखाली सैन्य खंदकांतून पार होऊ लागले. होळकरांचे घोडेस्वार तटाच्या बाहेर असून पायदळ मात्र आंत गेले होते. किल्ल्यांत येण्याबद्दल भरतपूरच्या राजाकडून आग्रह झाल्यावर यशवंतराव बोलले, "माझी गादी माझ्या घोड्याच्या पाठीवर आहे." इंग्रज सैन्य पार होत असतांना होळकरांच्या घोडेस्वारांनी त्यांना अगदी बेजार करून सोडले. इंग्रजांची अगदी दुर्दशा उडाली. हिंदुस्थानच्या अर्वाचीन इतिहासांत भरतपूरचे नांव अजरामर आहे. या किल्ल्याने इंग्रजांचा चार वेळां पराभव केला. सर्व किल्ले भराभर इंग्रजांच्या हवाली झाले. पण भरतपूरचा किल्ला मात्र भोवतालच्या पाण्यांत आपली मर्दुमकीर्ची प्रतिबिंबे दाखवीत अभिमानाने त्या वेळी उभा होता.
२१ जानेवारी १८०५

(व्यवस्थापन : एकाच वेळी अनेक धागे काढू नयेत. छोटेछोटे धागे काढू नयेत. आता सर्व एकत्र केले आहेत. पुढे असे धागे काढून टाकले जातील.)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

swami vivekanand
शके १७८४ च्या पौष व. ७ रोजी भारतीय तत्त्वज्ञानाचा सर्व जगभर
प्रसार करणारे थोर पुरुष स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला.
विवेकानंदांची पूर्वपरंपरा अध्यात्मिक वैभवाने नटलेली आहे. 'शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी' या उक्तीप्रमाणे विवेकानंद या श्रेष्ठ व्यक्तीच्या कुलाचा इतिहासहि उज्ज्वल असाच आहे. विवेकानंदांचे आजे बाबू दुर्गाचरण दत्त यांनी ऐन वयांतच संन्यास घेऊन परामार्थवृत्ति स्वीकारली होती. दुर्गाचरणांचे चिरंजीव विश्वनाथ बाबू मोठे विद्वान् होते. त्यांची ज्ञानलालसा अतुलनीय अशीच होती. त्यांची पत्नी भुवनेश्वरी ही देखील आदर्श आर्य स्त्री होती. तिचा चेहरा भव्य व उदात्त असून त्यावर दिव्य शक्तीचे तेज ओसंडत असे. रामायण-महाभारतातील कित्येक भाग तिने मुखोद्गत केले होते. अशा या उच्च मातापितरांच्या पोटी विवेकानंदांचा जन्म झाला. नामकरणाच्या दिवशी अनेकांनी 'दुर्गादास' हे नांव सुचविले; परंतु भुवनेश्वरी देवीच्या पसंतीने 'वीरेश्वर' हे नांव ठेवण्यांत आले. पुढे नरेंद्र हेच नांव रूढ झाले. लहानपणी यांचा स्वभाव हट्टी व खोडकर असला तरी साधुसंतांविषयी प्रेम यांना होतेच. अलौकिक बुद्धिमत्ता, खेळाडूपणा, तेजस्विता या गुणांच्या साह्याने नरेंद्रांचे शिक्षण झपाट्याने होऊ लागले. यांचा आवाज मोठा मधुर होता. बी. ए. ची परीक्षा दुस-या दिवशी असतांना यांच्या हृदयांत अध्यात्मज्ञानाचा दिव्य आनंद निर्माण झाला. त्यांची वृत्ति अध्यात्मचिंतनांत गुंगू लागली. त्यांना योग्य असे रामकृष्ण परमहंस हे गुरु भेटले.... रामकृष्णांचा सहवास, हिंदुस्थानांतील भ्रमण, हिमालय व तिबेट येथील वास्तव्य, सन १८९३ मधील जपानमार्गे अमेरिकेचा प्रवास, धर्मपरिषदेंतील असामान्य कर्तृत्व, 'राजयोग' या ग्रंथाचे लेखन, इंग्लंडमधील पं. मॅक्समुल्लर व भगिनी निवेदिता यांची मैत्री, मायदेशी परत आल्यावर रामकृष्ण मठाची स्थापना, सन १८९९ मध्ये परत अमेरिकेस जाण्याची तयारी, वाटेत मधुमेहाचा विकार झाला म्हणून सिलोनमधूनच परत हिंदुस्थानांत आगमन आणि सन १९०२ मध्ये समाधिअवस्था असा यांचा संक्षिप्त जीवितक्रम आहे.
१२ जानेवारी १८६३

dattaji shinde
शके १६८१ च्या पौष व.८ रोजी राणोजी शिंद्यांचे पराक्रमी चिरंजीव व पानपतच्या संग्रामांतील आघाडीचे वीर दत्ताजी शिंदे यांचे निधन झाले.
सन १७६० च्या ३ जानेवारीस दत्ताजी दिल्लोस आले. स्वतःचे शौर्य व फौजेचा दम यांजवर विश्वास ठेवून अब्दालीस जेर करू असा विश्वास त्यांना होता. यांची बायको भागीरथीबाई हिने नारोपंत, बुंदेले, जनकोजी यांच्यामार्फत यांना युद्धापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश आले नाही. पौष व.८ रोजी दत्ताजी फौजेनिशीं गिलच्यावर चालून गेले. "शजूंनी एकदम निशाणावर चाल केली आणि तोफांचा व बंदुकांचा मार मराठी फौजेवर जोराचा चालू केला. नदीच्या तीरावर अडचण भारी, शेरणीची बेटे असल्यामुळे पळून जाण्यास सोय पडेना. आठ घटका पूर्ण होतांच पांचशे मनुष्य ठार झाले. दत्ताजी व जनकोजी यांस पळून जातां आले असते, परंतु तसे न करतां निशाणापाशींच लढत राहिले. तो जनकोजीचे दंडास गोळी लागून तो बेशुद्ध होऊन खाली पडला. हे वर्तमान दत्ताजीस समजले तेव्हां त्याने जोराने शत्रूवर घोडे घातले. त्या गर्दीत यशवंतराव जगदाळे गोळी लागून पडला. त्याचे प्रेत काढावयास दत्ताजी पुढे गेला, तो त्याचे उजवे बरगडीत गोळी लागून तोहि तात्काळ गतप्राण झाला. तेव्हां सर्वांची अवसाने गेली."
दत्ताजी गोळी लागून रणभूमीवर पडले तेव्हा त्यांना कुत्बशहाने विचारले, “पटेल, लढेगे क्या?" त्यावर त्यांनी उत्तर दिले, “बचेगे तो और भी लढेंगे!" यावरून दत्ताजीच्या शूरत्वाची कल्पना येते. "मराठ्यांच्या इतिहासांत जे कित्येक हृदयद्रावक प्रसंग आहेत त्यांत दत्ताजीच्या वरील पराक्रमाची गणना झाली पाहिजे. पानपतच्या प्रचंड संहाराने दत्ताजीचे अचाट कृत्य लोपून गेले आहे. धन्याची कामगिरी पार पाडण्यासाठीच त्याने आपल्या प्राणांची आहुति दिली." दत्ताजी शिंदे पडले आणि जनकोजी जखमी झाले हे समजतांच मल्हारराव होळकर शोक करूं लागले. त्या वेळी त्यांची स्त्री गौतमाबाई हिने सांगितले, “सुभेदार, तुमचे वृद्धपण झाले. शिंदे यांच्या मुलांच्या तोंडचा जार वाळला नाही. ते मारता मारतां मेले. तुमचे दिवस समीप आले. हिम्मत धरून धरून मारता मारतां मरावे."
-१० जानेवारी १७६०

आज काय घडले ...
पौष व. ९
तैमूरचा राक्षसी प्रताप !
शके १३२१ च्या पौष व. ९ रोजी तैमूरलंग भारतांतून अगणित लूट घेऊन आणि मनसोक्तपणे रक्तपात करून आपल्या मायदेशी गेला.
दिल्ली शहर हस्तगत झाल्याबरोबर तैमूरच्या सैन्यांत विजयोत्सव सुरू झाले. पकड, लूट, मारहाण या प्रकारांना ऊत आला. पंधरा दिवसपर्यंत तैमूरलंगाचा मुक्काम दिल्लीस होता. भारतातील कलाकौशल्यावर तो फार खुष होता. कित्येक कारागीर त्याने स्वतःबरोबर घेतले. जातां जातांहि त्याने पुष्कळच अनन्वित प्रकार केले. मिरत शहरी त्याच्या सैन्याची थट्टा कोणी केली म्हणून त्याने सर्वांची कत्तल केली. आग्नि व तरवार यांच्या साह्याने तैमूरचा तुफानी प्रचार होत होता. हरद्वार येथे आल्यावर त्यास समजले की, गोमुखांतून गंगा पडते. या 'पाखंडीपणा'वर तो खूपच संतापला आणि त्यामुळे त्यावर विश्वास ठेवणारांना कडक शासन भोगावे लागले. लक्षावधि लोकांना त्याने मृत्युलोकांत पाठविले.
"मनुष्यजातीचे महान् शत्रु म्हणून इतिहासांत जे नावाजलेले आहेत त्यांच्यांत तैमूरची गणाना केली जाते. तो एखाद्या नवीन शहरी आला म्हणजे तेथील लोकांजवळ सर्व संपत्तीची दरडावून मागणी करीत असे. नंतर ती लुटून आणण्यास आपली फौज पाठवी. सर्व लोकांना पकडून तो एका ठिकाणी जमा करी. अशा लोकांतून कोणी कारागीर किंवा विद्वान् असतील तर तो त्यांना निवडून दूर करी. इतरांचा जीव घेऊन त्यांच्या शिरांचा एक मोठा ढीग शहराबाहेर रचण्यांत येई. बगदाद शहर घेतले त्या वेळेस अशा शिरांचे मनोरे एकशेवीस झाले होते. केव्हां केव्हा जिवंत माणसांना चुन्याने व विटांनी चिणून त्यांचा तट बांधण्याचे काम तैमूरचे कुशल कारागीर करीत.
हिंदुस्थानांत मोंगली जुलमास व्यवस्थितपणे सुरुवात तैमूरनेच केली. त्याच्या नांवाने बादशाहीहि चालू होती. तो जिवंत असेपर्यंत त्याच्या नावाने खुत्बा वाचण्यांत येत असे. तैमूरलंगाची स्वारी म्हणजे एक प्रकारचा ईश्वरी क्षोभच असे भारतीय समजत असत.
-१ जानेवारी १३९९taimur

shivaji maharaj

अफझलखानाच्या वधानंतर श्रीशिवरायांचे महत्त्व फारच बाढून बादशहाचा एक मोठाच डाव फसल्यासारखा झाला होता. आतां विजापूरकरांच्या ताब्यातील प्रांत व किल्ले सोडविणे हेच एक ध्येय शिवाजी महाराजांच्या समोर होते. २८-११-१६५९ रोजी मोठ्या युक्तीने पन्हाळा किल्ला शिवाजी राजांच्या हातांत आला. या समयी कोल्हापूर प्रांतांत विजापूरच्या एका सुभ्याचे काम रस्तुमजमान नांवाचा सरदार पहात असे. त्याच्या प्रांतांतील पन्हाळा किल्ला फारच मजबूत होता. याशिवाय पावनगड, खेळणा, रांगणा, हे प्रसिद्ध किल्ले जिंकावेत अशी मनीषा शिवाजी राजांची होती. अफजलखानाच्या वधानंतर अण्णाजी दत्तो यांच्या पराक्रमाने अदिशाहीकडून पन्हाळा हस्तगत झाला. पावनगड, वसंतगड हेहि किल्ले मिळाले. तेव्हां शिवाजी राजांचा बंदोबस्त करणे विजापूर दरबारला अत्यंत आवश्यक वाटले. या कामगिरीवर रुस्तुमजमान व फाजलखान यांची नेमणूक झाली. आदिलशाहीच्या हुकमावरून या दोघांनी फौज जमा केली व ते शिवाजी राजांवर चालून आले. परंतु पौष व. १७ रोजी शिवाजी राजांनी त्यांचा संपूर्ण मोड केला आणि कृष्णा नदीच्या पलीकडे त्यांना हांकून दिले. व शिवराय स्वतः खंडण्या वसूल करीत करीत थेट विजापूरपर्यंत चालून गेले. त्यांना प्रतिकार करावा असे कोणासहि वाटले नाही. त्यांचा पाठलाग करणेहि शत्रूंना अशक्य होऊन बसले. रायबाग सारखी समृद्ध स्थळे शिवाजी राजांच्या हाती आली. आणि त्यानंतर नेताजीनें गदग लक्ष्मेश्वरपर्यंतचा मुलूख लुटला. याप्रमाणे बरीच लूट जमा करून शिवाजी महाराज राजगडी परत आले. शिवाजी राजांचा हा पराक्रम पाहून आदिलशहा घाबरूनच गेला. रुस्तुमजमान तर उघडपणे शिवाजी राजांचा मित्र बनला होता. “आतां विजापूरचे राज्य संपून शिवाजी राजांचें चालू होणार, त्यांचे वडिल शहाजीरीजे सतरा हजार फौज घेऊन कर्नाटकांतून शिवाजी राजांचे मदतीस येत आहेत" अशी बातमी पाश्चात्य व्यापारी वरिष्ठांस कळवू लागले.

-२८ डिसेंबर १६५९