जाणीव भान भाग -8

आपला अबोल सांगातीः अनकॉन्शियस माइंड

आपण – मानव प्राणी म्हणून – आपल्यातील जाणिवाच्या वैशिष्ट्याबद्दल नेहमीच गर्व बाळगत असतो. आणि त्यात काही गैरही नाही. परंतु या जाणीव क्षमतेचा विचार करताना आपण नेहमीच आपल्या निर्णय प्रक्रियेवर परिणाम करत असलेल्या अनकॉन्शियस माइंडच्या क्षमतेला विसरतो. अनकॉन्शियस माइंड लक्षणीय प्रमाणात आपल्या जाणीव क्षमतेत भर घालत असते.

p1

1980च्या सुमारास या संदर्भात एक चाचणी घेण्यात आली. या प्रयोगात भाग घेणाऱ्यांना एक बटन दाबून त्याची अचूक वेळ नोंद करण्यास सांगितले. व दुसऱ्या एका घड्याळावर प्रयोगात सहभागी होण्याऱ्यांच्या नोंदी बरोबर आहेत की नाही हे तपासण्याची यंत्रणा होती. त्याचबरोबर या नोंदीच्या वेळी त्यांच्या मेंदूतील हालचालींची नोंद करण्यासाठी त्यांच्या डोक्यावर एक प्रोब चिटकवले होते. या प्रोबद्वारे मेंदूत घडत असलेल्या विद्युत प्रक्रियेची नोंद होणार होती.

गंमत म्हणचे प्रयोग सुरू होण्यापूर्वीच मेंदूमधील निर्णय प्रक्रियेशी संबंधित असलेले न्यूरॉन्स काम करू लागतात. fMRI च्या स्कॅनमध्येसुद्धा prefrontal cortex निर्णय घेण्यापूर्वीच्या काही क्षणापूर्वी कार्यरत होते हे लक्षात आले. हा निष्कर्ष माणसाच्या free will विषयी संशय निर्माण करतो असे वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्यात free willची क्षमता आहे. परंतु त्याचे नियंत्रण जागृत मनाकडे नसून अनकॉन्शियस माइंडकडे आहे असा अर्थ यातून निघू शकतो. परंतु या निष्कर्षालासुद्धा विरोध दर्शवणारे तज्ञ आहेत. यावरून फार फार तर जागृतावस्थेच्या बाहेर असलेल्या मेंदूतील प्रक्रियेचा मागोवा घेणे जिकिरीचे आहे असे म्हणता येईल. याच्या खरे-खोटेपणाविषयी प्रयोग करताना अगदी प्लँचेटचाही वापर केल्याची उदाहरणं सापडतील.

परंतु एवढ्या टोकाचे प्रयोग न करता अगदी साध्या चाचणीतूनसुद्धा यासंबंधी जास्त माहिती काढून घेता येणे शक्य आहे. डोळ्यासमोर एकानंतर एक या प्रमाणे चित्र दाखवून हा प्रयोग करता येईल. एक चित्र डोळ्यासमोर धरून काही क्षणातच काढून टाकल्यास नेमके चित्र कोणते होते हे ओळखणे जरा कठिण वाटेल. कारण जागृत मन react होण्याआधीच चित्र पुढे सरकलेले असेल. अशा प्रसंगी मेंदूत कसल्या हालचाली होतात, हे जाणून घेणे मजेशीर ठरेल. उदाहरणार्थ पहिल्या चित्रात चमचाभर मीठ दाखवल्यास पुढील चित्रात साखर असणार असे निद्रिस्त मन सांगण्याची शक्यता आहे. कोडे सोडवत बसलेल्याच्या समोरील कागद व पेन काढून ठेवले तरी त्याच्या विचारतंद्रीत फरक पडत नाही. त्याला आपल्यासमोर कागद नाही हे फार उशीरा कळेल.

अजून एका प्रयोगात काही जणांना खालील निकषापैकी एक निकष वापरून एका चांगल्या फ्लॅटची निवड करण्यास सांगितले होते.
• उत्स्फूर्तपणे निर्णय घेणे
• काही वेळ साधक बाधक विचार करून निर्णय घेणे
• फ्लॅटच्या खरेदीशी संबंधित नसलेल्या भलत्याच गोष्टींचा विचार करत निर्णय घेणे
गंमत म्हणजे भलत्याच गोष्टींचा विचार करणारेच उत्तम दर्जाचे फ्लॅट निवडू शकले. कदाचित भलत्याच गोष्टींचा विचार करणाऱ्यांचे मन अजाणतेपणाने चांगल्या फ्लॅटचे आडाखे बांधण्यात यशस्वी ठरल्यामुळे त्यांची निवड सरस ठरली असेल.

आपण सर्व झोंबी (Zombie) का नाही ?
तुम्हाला रस्त्यावर एखादा झोंबी दिसल्यास तुम्ही त्याला ओळखू शकाल का? भय पटातील झोंबीला ओळखणे तेवढे दुस्तर नसेल परंतु तत्वज्ञांच्या विचार प्रयोगतील झोंबी हा वेगळ्या मुशीतला असतो. हा झोंबी इतरासारखा दिसतो, वागतो; फक्त त्याच्या जाणीवा नाहिशा झालेल्या असतात.

p2

या झोंबीच्या हाताला टाचणीने टोचल्यास इतराप्रमाणे तो विव्हळेलसुध्दा! पंरतु त्या विव्हळण्यात प्रतिक्षिप्त क्रिया (reflex action) जास्त व वेदना कमी किंवा नाहीच अशी स्थिती असते. मुळात झोंबींना इंद्रियानुभवाची जाण नसते. त्यामुळे तुमच्या भोवती वावरणारे झोंबी नाहीतच हे खात्रीपूर्वक तुम्ही सांगू शकत नाही.

या विचार प्रयोगातून आपल्याला एवढेच कळते की इतरांच्यात जाणीव आहे का नाही हे आपल्याला सहजपणे कळू शकत नाही. किंवा मी जितका संवेदनशील आहे, तितके इतरही नाहीत असेही आपण म्हणू शकतो. त्यामुळे जाणिवेच्या गुणधर्मांचे संशोधन फार जिकिरीचे ठरत आहे.

या संबंधात अजून एक मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. उत्क्रांतीच्या मार्गक्रमणात आपल्या अस्तित्वासाठी या जाणिवेचा काही उपयोग झाला असेल का? थोडक्यात जाणीव उत्क्रांत का झाली?

आपल्यातील शारिरीक व मानसिक गुणविशेषांचा आपण नेहमीच उपयुक्ततेशी लावत असतो. भाषा, रंगसंगतींचे भान, दोन पायावर चालणे या सारख्या गोष्टी आपल्या अस्तित्वासाठी उपयुक्त ठरल्या व आपण होमोसेपियन म्हणून विकसित होण्यासाठी त्याचा फार मोठ्या प्रमाणात हातभार लागला हे आपण विसरू शकत नाही. परंतु जाणिवेच्या संदर्भातसुध्दा हे विधान आपल्याला करता येईल का? जर आपल्याला खात्रिशीर विधान करता येत नसल्यास आपण गोत्यात येऊ शकतो. आणि ज्या गोष्टी आपल्याला माहित नाहीत त्याच्या शोधाची सुरूवात कुठपासून करायची हीसुध्दा एक समस्या ठरू शकते. त्यामुळे आपल्या अंदाजाला सुद्धा काही मर्यादा पडू शकतात. या द्विधामनस्थितीत सुध्दा आपण जाणिवांच्या संदर्भातील काही गोष्टींचे ठामपणे विधान करू शकतो. कारण त्यासाठी आपल्याकडे MRI स्कॅनरचे व मेंदूला ठिकठिकाणी लावलेल्या इलेक्ट्रोड्सच्या सहायाने केलेल्या नीरिक्षणांचे पुरावे उपलब्ध आहेत. जाणिवांच्या संदर्भातील एका work space प्रारूपानुसार दृष्टी व ध्वनी सारख्या इंद्रियगम्य उद्दीपनांची (stimuli) प्रक्रिया जाणिवेच्या आधाराविना होते व ही माहिती जाणिवेच्या पातळीवर गेल्यानंतर मेंदूच्या इतर भागातील न्यूरॉन्सच्या नेटवर्कला उद्दीपित करून पुढील प्रक्रिया कार्यान्वित होते.

या प्रारूपानुसार जाणीव मेंदूला भेडसावणारे, जास्त कठिण, गुंतागुंतीच्या समस्यांचा उकल करणाऱ्या प्रक्रियेची सुरुवात करते. सर्व बाजूनी माहिती गोळा करून त्याचे विश्लेषण करून एक खात्रीशीर दिशा दाखवणे हे जाणिवेचे स्वरूप असते. काही तज्ञांच्या मते जाणीव माहितीचा संग्रह करून समस्येचे उत्तर शोधण्याच्या प्रक्रियेत प्रामुख्याने सहभागी होत असते. एका प्रकारे गोळाबेरजेचे ते काम करते.

आपल्या मेंदूच्या कार्यक्षेत्रात आपण काही गोष्टीच एका वेळी समावून घेऊ शकतो. परंतु गोळाबेरजेशी संबंधित इतर गोष्टीनासुद्धा समावून घेतल्यास संकल्पना स्पष्ट होत जाते व त्याचा मागोवा घेणे सुलभ होते. कदाचित जाणीव म्हणजे सर्व संबंधित गोष्टींना एकाच ठिकाणी आणून त्यांची मोट बांधणे असे सुद्धा म्हणता येईल. ही कल्पना जरी अंदाजपंचे वाटत असली तरी याच्या पुष्ट्यर्थ काही पुरावे उपलब्ध आहेत. गोळाबेरजेच्या वेळी Prefrontal and parietal cortex चे घटक उद्दीपित होतात, हे लक्षात आले आहे.

माणसाप्रमाणे इतर प्राण्यातसुद्धा अशाच प्रकारचा ‘झोंबीपणा’ असू शकतो का? मुळातच जाणीव हा प्रकारच फार कमी प्रमाणात इतर प्राण्यांच्यामध्ये असल्यामुळे त्यांच्यातील ‘झोंबीपणा’ चटकन लक्षात येत नसावा. एप्स वा डॉल्फिन्ससारख्या प्राण्यामध्ये जाणिवेचा अंश असला तरी तो फारच कमी प्रमाणात आढळतो.

या संबंधी अजूनही काही गृहितकांचा विचार करावा लागेल. 1970च्या सुमारास दुसऱ्यांच्या मनात काय आहे या प्रश्नावरून आपल्या जाणिवेत बदल होत असतील का हा प्रश्न संशोधकासमोर उभा राहिला. काही तज्ञांच्या मते आपल्यातील जाणीवा सुस्पष्ट नसतील तर इतरांच्या मनात काय चालले आहे हे समजणार नाही. इतर प्राण्यांच्यापेक्षा मानवी जाणिवांचे प्रमाण जास्त आहे त्यामुळेच माणसात आक्रमकता व/वा स्पर्धेत उतरण्याची ईर्षा मोठ्या प्रमाणात असते. यावरूनच माणसात समूह करून जीवन जगण्याच्या जाणीवा विकसित झाल्या असावेत. परंतु ईर्षा, स्पर्धा वा आक्रमकता या गुणविशेषांबरोबरच सहकार्य, औदार्य, करुणा, दया इत्यादी गुणविशेषसुद्धा माणसात आहेत हे विसरता येत नाही. एवढेच नव्हे तर माणसांचा पूर्वानुभवसुद्धा जाणीवा विकसित करण्यात सहभागी झाला असेल. मोकळ्या मैदानात मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्यास तेथे गुरांचा कळप होता का, क्रूर प्राण्यांची दौड आहे का यावरून पळायचे की सामोरे जायचे हे माणूस ठरवत होता. अशा प्रकारे जाणीवा विकसित होण्यामध्ये अनेक गुणविशेषांचा सहभाग होता. परंतु काहींच्या मते या गुणविशेषांच्या तसा अर्थाअर्थी संबंध नाही. हे गुणविशेष माणसाच्या बुद्धीच्या विकासाला मदत केले असतील, जाणिवेला नाही. जाणीव ही एक गुंतागुतीची प्रक्रिया आहे हे मात्र नक्की!

एक मात्र खरे की, माणसं शांत वातावरणात योग्य निर्णय घेऊ शकतात. कारण चहूबाजूनी विचार करून, पुरावे – संदर्भ यांचा अभ्यास करून निर्णयाप्रत पोचण्यास अशा वातावरणात त्यांना फुरसत मिळते. परंतु झोंबीसुद्धा – त्यांच्यात reflection व retrospection यांचा अभाव असूनसुद्धा निर्णय घेतच असतात. खरे पाहता या दोन्ही गोष्टी जाणिवासाठी अत्यंत आवश्यक आहेत असे मानले जाते. त्यामुळे कदाचित त्याचा पूर्वानुभव या कामी मदत करत असावा, असे म्हणता येईल. मैदानातील धूळ कशामुळे हे समजण्यासाठी पूर्वानुभव पुरेसे ठरू शकते.

या सर्व गोष्टींचा विचार करता जाणीव विकसित होण्यासाठी भरपूर कारणं असावीत किंवा कदाचित यापैकी काहीही नसावीत, असेही म्हणता येईल. अस्तित्वाच्या झगड्यात याचा उपयोग झाला असावा किंवा बुद्धीमत्तेचे ते एक उपउत्पादन (by-product) असावे.

समाप्त

संदर्भः New Scientist, Scientific American, Lancet, Science इ.इ. विज्ञानविषयक नियतकालिकेतील Consciousness या विषयीच्या लेखावरून

या पूर्वीचेः
बुद्धीमान रोबो: जाणीव भान – 1 https://aisiakshare.com/node/8827
मेंदू’ नावाचे मशीन: जाणीव भान – 2 https://aisiakshare.com/node/8837
बदलत्या स्थितीतून शिकण्यासारखे... जाणीव भान – 3 https://aisiakshare.com/node/8845
बधिरावस्थेचे गूढ: जाणीव भान – 4 https://aisiakshare.com/node/8852
मेंदूतील क्रिया – प्रक्रियांचे निरीक्षण: जाणीव भान – 5 https://aisiakshare.com/node/8887
जाणीव प्रारूप जाणीव भान भाग – 6 https://aisiakshare.com/node/8904
जाणीव प्रारूप जाणीव भान भाग – 7 https://aisiakshare.com/node/8911

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet