जाणीव भान – भाग 1

कृत्रिम बुद्धीमत्ता आणि जाणीव

x1 वैज्ञानिक कथा-कादंबऱ्यावरून तयार केलेल्या चित्रपटात, टीव्ही मालिकेत एखादा स्मार्ट रोबो कचरा गोळा करताना, शहाण्यासारखा वागताना दिसतो. तेव्हा आपण टाळ्या वाजून त्याचे स्वागत करतो. कदाचित प्रत्येकाच्या मनात माणूस बुद्धीमान रोबो बनवू शकतो अशी एक अतृप्त आशा घर करून बसलेली असावी. जाणिवेचा अभ्यास करताना कृत्रिम बुद्धीमत्तेवरील आतापर्यंतच्या संशोधनाचा नक्कीच उपयोग होईल असे तज्ञांना वाटते. जाणीव समजून घ्यायची असल्यास जाणीव असलेले मशीन तयार करा असे विधान एका तज्ञाने केले आहे. हे विधान गंमतीचे वाटत असले तरी 70च्या दशकात मशीन्संना भाषा शिकवण्याची शिकस्त केली गेली हे आपण विसरू शकत नाही. ध्वनीचे चढउतार, त्यातील वेगवेगळे प्रकार, या ध्वनीवरून अक्षरं, अक्षरावरून शब्द, शब्दावरून वाक्य रचना, वाक्यामधून निघणारा अपेक्षित अर्थ असे काहीतरी करण्याची कल्पना त्याकाळी पुढे आली होती.

परंतु या प्रक्रियेतील प्रत्येक पाऊल शंकास्पद वाटत होती. आई हा शब्द शेकडो प्रकारात उच्चारता येते. व प्रत्येक वेळी त्या ध्वनीत बदल होत असतो. बदलत्या ध्वनीला अनुसरून विदा गोळा करावे लागतील व संगणकांचा वापर करून त्याचे विश्लेषण करावे लागतील. एक मध्यवर्ती data bank यासाठी लागेल. कदाचित विश्लेषणासाठी शेकडो संगणक लागतील.

तरीसुद्धा या संकल्पनेचा वापर करून तयार केलेला HearSay II हा संगणक 90 टक्के अचूक होता. फक्त त्यातील शब्दसंग्रह एक हजार शब्दापेक्षा जास्त नसावी ही मर्यादा त्यासाठी होती. नंतर त्याच्या software मध्ये काही बदल करण्यात आले. याच सुमारास जाणीव विषयक तज्ञांचे या संकल्पनेकडे लक्ष गेले. त्यांनी ही कल्पना उचलून धरली. जाणिवांच्या बाबतीत असेच काही तरी घडत असावे असा त्यांचा कयास होता. जाणीव ही एखाद्या फळ्यावरील लेखनासारखी असते. प्राथमिक स्वरूपातील माहिती ही नेहमीच अनकॉन्शियस माइंडमध्ये साठवली जाते. व नंतर त्याचे काही प्रमाणात विश्लेषण झाल्यानंतर फळ्यावर लिहिल्यासारखे त्याला एक मूर्त स्वरूप येते. व त्याची जाहीर वाच्यता होते. याच्या पुष्ट्यर्थ भूल दिलेल्या रुग्णांचे पुरावे सादर केले होते.
x2 यानंतर संगणक तज्ञ कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी मेंदूतील प्रक्रियांचे नक्कल करू लागले. LIDA नावाच्या संगणक प्रणालीत अनकॉन्शियस आणि कॉन्शियस routines समांतररित्या काम करतात. परंतु याला बुद्धिमत्ता या सदरात टाकू शकत नाही. फक्त यात विश्लेषणानंतरचे परिणाम सादर करणारे routines आहेत.

याच संदर्भात स्वित्झर्लंड येथे विकसित होत असलेल्या Human Brain Project ला भरपूर प्रसिद्धी मिळाली. या प्रकल्पात मानवी मेंदू व त्यातील प्रत्येक चेतापेशी जसे कार्य करतात त्याच प्रमाणे संगणक प्रणाली असलेले एक संगणक तयार करण्याची महत्वाकांक्षी योजना होती. आतापर्यंत उंदिराच्या मेंदूतील 10 cubic millimeter एवढ्याच पृष्ठभागाचे simulation करण्यात प्रकल्प तज्ञ यशस्वी झाले आहेत. अजून फार मोठा टप्पा त्यांना गाठायचा आहे. अजून काही निधी उपलब्ध झाल्यास प्रकल्प तडीस नेता येईल असा त्यांचा विश्वास आहे.

या प्रकल्पाबद्दल टिप्पणी करताना एका तज्ञाने मेंदू कसा काम करतो हे महत्वाचे नसून आपल्यात जाणीव कशी निर्माण होते हे महत्वाचे आहे असे म्हटले होते. उदाहरणार्थ, न्यूरॉन्समधून विद्युत प्रवाह गेल्यास आपल्याला वेदनेची जाणीव कशी काय होते व ही वेदना सापेक्ष कशी काय असू शकते? तांबड्या रंगाबाबतही ही सापेक्षता का आढळते? यावरून येथे फक्त वेदनेची जाणीव नसते तर वेदनेचे परिणामही शरीरावर होताना दिसतात.

अशा प्रकारच्या वेदनेची जाणीव करू शकणारे किंवा तांबड्या रंगाचे तंतोतंत simulation करू शकणारे मशीन्स तयार करण्यासाठी अगदीच वेगळ्या प्रकारे विचार करण्याची गरज आहे. वेदनेची जाणीव simulate करणारे मशीन अशक्यातली गोष्ट ठरू शकेल. मशीनमध्ये वापरात येणारी संगणक प्रणाली ही एक भाषा आहे, हे आपण विसरू शकत नाही. व भाषेद्वारेच वेदनेचे वर्णन किंवा अभिप्रेत असलेल्या तांबड्या रंगाचे वर्णन भाषेच्या माध्यमातूनच करावे लागेल. जर तुम्हाला ‘वेदना’ किंवा ‘तांबडा’ हे शब्दच कळत नसल्यास ते शब्द निरर्थक ठरतील. त्यामुळे तुमची स्वतःची भाषा या सर्वापुढे गौण ठरण्याची शक्यता आहे. संगणक वा रोबोचे कार्य काही विशिष्ट अशा संगणकीय भाषेच्या आधारावर चालते. यांना मायक्रोफोनला जोडलेले असले तरी तेथून आलेले inputs 0 किंवा 1 च्या साखळीत बदलल्याशिवाय अर्थ ध्वनित होत नाही. परंतु रंग, वेदना, भावना, दुःख, समाधान या सारख्या गोष्टींना संख्येत पकडता येत नाही. त्यामुळे संगणकीय भाषेत या गोष्टी निरर्थक ठरतात.

x3

या संबंधात काही नवीन रोबोंचीसुद्धा भर पडत आहे. XCR हा रोबो प्रायोगिकरित्या जाणिवावर आधारित आहे, असे त्याच्या संशोधकांचा दावा आहे. या रोबोत संवेदनांचे मॅनिप्युलेशन (manipulation ) होते. संवेदनांचे signalsचे सॉफ्टवेरमधून प्रक्रिया न होता त्याच्यातील विशिष्ट ‘मेंदू’ प्राथमिक धडे घेतो. या रोबोला समोरून कुणी धक्का दिल्यास एका विशिष्ट प्रकारचे photodiodes स्विच ऑन होतात. हे सिग्नल्स मेमरीत साठवल्या जातात. पुढच्या वेळी अशाच प्रकारच्या धक्क्यातून तो सावध होऊ शकतो. धक्का जोरात असल्यास रोबो माघारी फिरतो. अशा प्रकारे हा रोबो प्राथमिक धडे घेत घेत शिकण्याचा प्रयत्न करतो. या रोबोला काठीने मारल्यास विव्हळतो; विनवणी करतो. हे बघताना आपल्यालाही कसे तरी वाटू लागते. रोबोला मारण्यात आपल्यात अपराधीपणा जाणवेल का? इतर जिवंत प्राण्याइतके नसले तरी आपल्याला नक्कीच वाईट वाटेल, हे मात्र नक्की.

रोबोची ही प्रगती खरोखरच थक्क करणारी आहे. त्याच्यातील जाणीवा मर्यादित प्रमाणात असले तरी त्या दिशेने वाटचाल होत आहे हेही नसे थोडके! मुख्य म्हणजे जाणिवासाठी फक्त मेंदू हवा, शरीराची गरज नाही, हे आता लक्षात येऊ लागले आहे. मग हा मेंदू कितीही मोठा वा गुंतागुंतीचा, क्लिष्ट असला तरी चालेल.

सॉफ्टवेरवर चालणारे असोत किंवा XCR टाइप रोबो असोत, हे रोबो नजीकच्या भविष्यात पूर्ण क्षमतेने काम करू शकतील, अशी कल्पना केली तरी त्यांच्यात मानवी जाणिवा - स्वभान या गोष्टी असतील याची खात्री देता येत नाही. फार फार तर रोबो-जाणीव असण्याची शक्यता आहे. स्वभान हे फारच सापेक्ष अशी एक संकल्पना आहे. समजा, रोबोतसुद्धा स्वभान आहे व त्याप्रमाणे ते वागू लागल्यास, नाइलाजाने का होईना, त्यांचेही अस्तित्व आपणाला मान्य करावेच लागेल.

हे जरा अतीच वाटत असल्यास आपण आपल्या भोवती वावरणाऱ्यांच्या कडे एक नजर टाकल्यास हे लक्षात येईल. आपल्या समाजातील कमी बुद्धिमत्तेच्या, वा शारीरिक – मानसिक कमतरता असलेल्यांच्या, झोंबी टाइप वागणाऱ्यांच्या वा असंवेदनशील असलेल्यांच्या अस्तित्वाला सहन करतच आलेलो आहोत, हे विसरता येत नाही. एखाद्या एलियनशी बोलताना तो माठ आहे हे लक्षात आले तरी आपल्यातील इतर माठ लोकांना सहन केल्या प्रमाणे त्या एलियनच्या अस्तित्वाला सहन करावेच लागेल; मग हा एलियन परग्रहावरचा असो की मानवनिर्मित रोबो असो, काही फरक पडत नाही!

क्रमशः

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

विषय खूपच रोचक वाटतो आहे. धन्यवाद. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0