मृत्यू – भाग २

भाग २ – स्वत:ची तयारी

सुधीर भिडे

I don’t fear death so much as I fear its prologue – loneliness, pain, debilitation, senility, after few years of these, death presents like a holiday
– Mary Roach

विषयाची मांडणी

आयुष्याच्या शेवटच्या भागाचे नियोजन
थांबण्याचा निर्णय
मृत्युला सामोरे जा
नियोजनाची सुरुवात स्वत:पासून होते
परावलंबित्व
तयारीच्या व्यावहारिक बाजू
वृद्धाश्रम
आर्थिक नियोजन
अवयवदान
देहदान
स्वेच्छामरण
कवींच्या दृष्टीतून
– – –

काही वर्षापूर्वी आम्ही कश्मीर आणि लडाखच्या दहा दिवसांच्या ट्रिपला गेलो होतो. याचे नियोजन तीन महिने आधीपासून चालले होते. अशा छोट्या ट्रिपचे इतके दिवस नियोजन तर इतक्या मोठ्या प्रवासाचे नीट नियोजन नको?


Old Age

थांबण्याचा निर्णय

सुभाष अवचट, थांबणे, ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका, मार्च २०२२

लोकांना कुठे थांबावे हे समजत नाही. माझ्या सभोवताली जे प्रतिभावंत लेखक होते त्यांच्यापैकी काही उदाहरणे देतो. विंदा करंदीकरांनी एक दिवस ठरवले की त्यांनी आता लिहिणे बंद केले. त्यानंतर ते आनंदात जगले. पु. ल. देशपांडे यांनीही वेळच्या वेळी आवराआवर केली. यानंतर ते मुक्त झाले आणि उरलेले आयुष्य ते गिफ्ट मिळाल्यासारखे हसत जगले.

गंगाधर गाडगीळांनी एक दिवशी मला रस्त्यात थांबवले. म्हणाले,

“बरे झाले आज भेट झाली. आता पुढे शक्य होणार नाही.”
मी विचारले, “का? परदेशी चाललात काय?”
त्यांचे उत्तर : “नाही आता सर्व थांबवले आहे. सर्व गोष्टी व्यवस्थित आवरल्या आहेत. सर्व औषधे बंद केली आहेत. आता एकेक मित्रांना भेटतो आहे. तुमचा सहवास लाभला, आभार”

त्यानंतर आठवड्यात ते गेल्याचा निरोप आला.

केव्हा थांबावेसे वाटणे हे प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर अवलंबून असते. पण प्रत्येकाने हा थांबण्याचा निर्णय करून सर्व तयारी केली पाहिजे आणि त्यानंतरचे आयुष्य मजेत जगले पाहिजे.

मृत्युला सामोरे जा

जी ए कुलकर्णी ‘काली’ या कथेत लिहितात –
माते आता मी पूर्णपणे मुक्त आहे. आसक्तीचे सारे धागे विरून गेले आहेत. पण एखाद्या कपटी मारेकऱ्याप्रमाणे येऊन मृत्यूने माझ्यावर प्रहार करावा ही घटना मला कमीपणाची वाटते. मी पळत असता मृत्यू माझ्यामागे धावत आहे असेही होऊ देऊ नकोस. मीच मृत्युपुढे सन्मुख झालो हे मानचिन्ह माझ्यापाशी राहू दे.

नियोजनाची सुरुवात स्वत:पासून होते.

कबिराचा हा दोहा पहा :
माली आवत देखके कलियन करी पुकार । फूल फूल चुन लिये, काल हमारी बार ॥

बागेत माळी फुले तोडायला आला आहे. त्याला पाहून झाडावरच्या कळ्यांच्या मनात येते, ‘उद्या आपली पाळी.’ जेव्हा आपले ज्येष्ठ जगाचा निरोप घेऊ लागतात, तेव्हा समजावे ‘उद्या आपली पाळी’.

या नियोजनातील एक अनिश्चित बाब म्हणजे आपल्याला कोणत्या रस्त्याने जावे लागणार आहे ते माहीत नसते. आज ठीकठाक असलेल्या व्यक्ती उद्या निरोप घेतात. तर काही व्यक्ती तीन-पाच वर्षे अंथरुणात खितपत पडतात. सर्वात खराब शक्यता विचारात घेऊनच नियोजन करावे लागते.

जेव्हा आपण आपला मृत्यू क्षितिजावर बघू शकतो तेव्हा आपली तयारी चालू करणे योग्य राहते. ही तयारी मृत्यू दाराशी आल्यावर करण्याची नसते. तयारी खऱ्या अर्थाने आपल्या मनाची असते. आपण विरक्ती आणि वैराग्य हे दोन शब्द ऐकले असतील. संत-महात्मे या स्थितीला त्यांच्या आयुष्यात लवकरच पोचतात. आपण साधारण माणसे या कल्पनांपासून दूरच राहतो. पण एकदा मृत्यू क्षितिजावर दिसू लागला की आपणही या कल्पनांचा विचार करणे जरूर होते. विरक्ती आणि वैराग्य याला पतंजलि योग सूत्रात अपरिग्रह असे नाव दिले आहे. अपरिग्रहाचे तीन भाग सांगितले आहेत.

  1. निरीच्छता – ऐहिक गोष्टींची हाव सोडणे
  2. निरपेक्षता – आपल्या जवळच्या व्यक्तींपासून काही अपेक्षा न ठेवणे
  3. नि:संगत्व – कोणत्याही व्यक्तीला किंवा स्थितीला चिकटून न राहणे

विरक्ती आणि वैराग्य याचे महान उदाहरण म्हणजे चंद्रगुप्त मौर्य. इसवी सन पूर्व चौथ्या शतकात या पराक्रमी राजाने नवे साम्राज्य स्वत:च्या बळावर उभे केले जे आजचा भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या भागावर पसरले होते. वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांनी निवृत्ती स्वीकारली, आपल्या मुलाच्या हातात राज्य दिले. अंगावर एक पांढरे वस्त्र, हातात दंड आणि कमंडलू घेऊन ते पाटलीपुत्र – आजचे पटणा – येथून चालत निघाले आणि कर्नाटकात श्रवणबेळगोळ येथे पोचले. तेथे एका गुहेत त्यांनी वास्तव्य केले. काही वर्षे तप:चर्या केल्यावर अन्नत्याग करून त्यांनी मरण घेतले.

परावलंबित्व

वृद्धावस्थेतील एक सत्य म्हणजे परावलंबित्व. आजच्या काळात, काही आजार सुरू झाला नाही तर, ऐंशी वर्षांपर्यंत माणसे आपले व्यवहार करतात. त्यानंतर बाहेरचे व्यवहार करणे अवघड होत जाते. काही आजार चालू झाला की परावलंबित्व वाढते. खूप वाढलेल्या वयात घरात सोय नसेल तर वृद्धाश्रमाचा किंवा हॉस्पिसचा रस्ता पकडावा लागतो. पार्किन्सन्स किंवा अल्झायमर्ससारखे आजार असले तर पाच-सात वर्षे पूर्णपणे परावलंबी अवस्थेत काढावी लागतात.
भारतात निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणाऱ्या वृद्धांचे प्रमाण केवळ ४% आहे. ६५% वृद्ध आपल्या मुलांवर किंवा नातेवाइकांवर अवलंबून असतात (म. टा. २९/३/२३, अर्थकारण)

अतिवृद्ध / जास्त आजारी रुग्णांना परावलंबित्वानंतर पारतंत्र्य येते. अशा व्यक्तींशी संपर्क करता येत नाही. त्यांनी काय खायचे, काय करायचे हे दुसरे कोणी ठरविते. इतकेच काय, त्यांच्या आजारावर काय उपाय करायचे, किंवा उपायच करायचे नाहीत हे पण दुसरे कोणी ठरवत असते.
आपण करण्याच्या तयारीत येणाऱ्या परावलंबित्वाची आणि पारतंत्र्याची पूर्ण जाणीव हवी.

निर्णय घेण्याची असमर्थता

परावलंबित्वाची दुसरी बाजू निर्णय घेण्याची असमर्थता. दुसऱ्यांच्या बाबतीतील निर्णय घेण्याची क्षमता केव्हाच गेलेली असते. परंतु अतिवृद्धांना स्वत:च्या बाबतीतील निर्णय पण घेता येत नाहीत. आपल्याला एका स्थितीत राहावे असे वाटत असेल पण आपल्या केअरगिवर्स ना काय वाटते तेच करावे लागते .

तयारीच्या काही व्यावहारिक बाजू

१) पहिली गोष्ट म्हणजे मृत्यूपत्र. आपल्याला फक्त एक वारस असला तरी मृत्यूपत्र करणे योग्य राहते. एक तर मृत्यूपत्रात आपले सर्व असेट्स लिहिले जातात. वारसाला किंवा वारसांना याची नीट माहिती होते. वारसांत असेट्सची जर समान वाटणी नसेल तर त्याचे थोडे स्पष्टीकरण करणे ठीक राहते. मृत्यूपत्र करून बरीच वर्षे झाली असतील तर मृत्यूपत्राकडे परत पाहणे योग्य ठरते. कारण पाच-दहा वर्षांत परिस्थिती बदलून गेल्याची शक्यता असते. आपण मृत्यूपत्र केले आहे आणि ते कुठे ठेवले आहे याची पण माहिती वारसांना हवी.

२) मृत्यूपत्रानंतरचा महत्त्वाचा दस्तावेज म्हणजे – वैद्यकीय इच्छापत्र (लिव्हिंग विल). पहिली गोष्ट म्हणजे आपली तब्येत चांगली असताना लिव्हिंग विल बनवायचे असते. तुम्ही स्वत: आपल्याला काय प्रकारचे इलाज करण्याची इच्छा नाही हे तुम्ही सांगता. त्यावर आपल्या डॉक्टरांची सही असते की हे लिखाण करताना तुमची तब्येत चांगली होती. या लिखाणावर तुमच्या मुलांच्या / वारसांच्या साक्षीदार म्हणून सह्या घेणेही ठीक राहते. कायद्याप्रमाणे या विलवर नोटरीची सही आवश्यक आहे. असे लिखाण असले की डॉक्टरांना आणि तुमच्या कुटुंबीयांना निर्णय घेणे सोपे जाते.

अमेरिकेत काम करणारे कर्करोगतज्ज्ञ डॉक्टर कटककर लिहितात –
आत्मसन्मान ठेऊन मरण येणे हे ध्येय असले पाहिजे. वैद्यकीय इच्छापत्र आयुष्याच्या शेवटी आपल्याला काय प्रकारची वैद्यकीय मदत हवी ते सांगते. हे विचार आपण मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असताना लिहायचे असतात. व्याधी सुरू झाल्यावर नाही. साठीनंतर सर्व व्यक्तींनी वैद्यकीय इच्छापत्र करणे श्रेयस्कर.
या विषयावर म. टा. च्या ६ फेब्रुवारीच्या अंकात मेंदूरोगतज्ज्ञ डॉक्टर बाविस्कर यांचा लेख आला होता. त्यांचे या विषयावरील विचार त्यांच्याच शब्दात –

मृत्यू प्रतिष्ठेने व्हावा हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. [...] अंथरुणाला खिळलेले व लघवी, संडास यावर नियंत्रण नसलेले वेदनामय, मानसिकता खचलेले वृद्धत्व लादणे हे कितपत योग्य? [...] सर्वोच्च न्यायालयाने मार्च २०१८ मध्ये अतिगंभीर आजारपणात मृत्यूचा अधिकार देणारा (निष्क्रिय इच्छामरण किंवा सोप्या शब्दात, गंभीर आजारी रुग्णाची जीवरक्षक प्रणाली काढण्याचा वा सुरूच न करण्याचा) आणि ‘लिव्हिंग विल’ला मान्यता देणारा कायदा आणला. [...] अत्यंत किचकट व वेळखाऊ प्रक्रियेमुळे पाच वर्षांत एकही निष्क्रिय इच्छामरणाची केस दंडाधिकाऱ्यांपुढे आली नाही. [...]‘इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन’ने २०१९ साली न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयाने नव्या नियमपद्धतीला मान्यता दिली. प्रक्रिया सोपी करून परवानगी देण्याचा अवधी ४८ तासांचा ठरविला.
[...]
‘लिव्हिंग विल’ कशी करावी याबद्दल खुद्द न्यायव्यवस्थेलाच पत्ता नाही. अखेरीस मार्च २०२२ मध्ये ‘लिव्हिंग विल’विषयी कायदेशीर अहवाल आला. [...] गॅझेटेड अधिकारी अथवा पब्लिक नोटरी, दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत ‘लिव्हिंग विल’ला अधिकृत करू शकतात.

१ मे २०२३ रोजी टाईम्स ऑफ इंडियात या विषयावर डॉक्टर दातार यांचा लेख आला. लेखात लिव्हिंग विलची प्रक्रिया सांगितली आहे –

  • कोणतीही व्यक्ती एका नोटरीसमोर वैद्यकीय इच्छा पत्र करू शकते.
  • याची एक प्रत स्थानिक नगरपालिकेकडे देण्याची गरज आहे (नगरपालिकांना याची काही माहिती नाही).
  • इस्पितळात इलाज चालू असताना जवळच्या नातेवाईकाने इस्पितळाला लिव्हिंग विलची माहिती देणे आवश्यक आहे. मग इस्पितळ नगरपालिकेकडून याची शहानिशा करून घेईल.
  • मग हॉस्पिटल तीन डॉक्टरांचे एक बोर्ड बनवेल जे रुग्णाच्या स्थितीची पाहणी करून आपले मत देईल.
  • त्यानंतर हॉस्पिटल दुसरे एक बोर्ड बनवेल ज्यात जिल्ह्याचा मेडिकल ऑफिसर असेल.
  • आपला निर्णय हे बोर्ड फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेटला कळवेल.

अर्थातच ही सोपी केलेली प्रक्रिया पण कटकटीची आहे. सध्या काय होते?

दोन शक्यता – हॉस्पिटलने लाखो रुपये कमावले की मग हॉस्पिटलचे अधिकारी नातलगांना पर्याय देतात. तोपर्यंत नातलग आर्थिकदृष्ट्या आणि व्यावहारिकदृष्ट्या कंटाळले असले की मग जीवन चालू ठेवण्याची साधने काढली जातात.

दुसरी शक्यता – व्यक्ती शेवटच्या स्थितीत पोचली तरी व्यक्तीला इस्पितळात नेले जात नाही. या पर्यायात लिव्हिंग विल असणे नातलगांच्या दृष्टीने सोयीचे होते. व्यक्ती घरीच रहाणार असली तरी कोणत्या तरी डॉक्टरांचे जुजबी उपाय चालू ठेवणे जरूर राहते.

३) लिव्हिंग विलबरोबर तुमची इच्छा व्यक्त करणारे दोन दस्तावेज तयार करणे जरूर असते. पहिले म्हणजे मृत्यूनंतर आपल्याला काय प्रकारचे अंत्यविधी हवेत हे लिहून ठेवणे. दुसरे म्हणजे आपण अवयवदान किंवा देहदान केले असेल तर त्याचे कागदपत्र नीट ठेवणे. या दोन्ही बाबतींची वारसांना माहिती द्यावी.

४) आपल्यासंबंधी सर्व महत्त्वाची कागदपत्रे एका ठिकाणी नीट ठेवून त्याची माहिती वारसांना द्यावी.

५) आयुष्यातील अडगळ काढून टाका.
प्रथमत: मनातील अडगळ काढा. जे भूतकाळात झाले ते संपून गेले. त्याचे जे परिणाम व्हायचे ते होऊन गेले. आता ती अडगळ मनातून काढा. भविष्याकडे कोऱ्या पाटीने पहा.
भौतिक जीवनातील अडगळ काढून टाका. उरलेल्या आयुष्यात ज्या गोष्टींची जरूर पडणार आहे, आपण उपयोग करणार आहोत, करू शकणार आहोत तेवढ्याच गोष्टी ठेवा. मुलांच्या / वारसांच्याकडून हे जाणून घेणे योग्य राहते की आपल्या स्थावर मालमत्तेपैकी आणि सामानसुमानापैकी त्यांना कशात इंटरेस्ट आहे. त्याशिवायच्या आपल्या वापरात नसलेल्या वस्तू काढून टाकणे चांगले. आपल्यानंतर अशा गोष्टी भंगार म्हणून पाहिल्या जातात. एका गृहस्थाचे जीवनभर जमविलेले सामान आठ हजार रुपयांत भंगार म्हणून विकलेले मी अनुभवले आहे.

वृद्धाश्रम

आपली कौटुंबिक स्थिती अशी असेल की वृद्धाश्रमात जाणे अनिवार्य होईल तर कुठला वृद्धाश्रम आपल्याला सर्व बाजूने योग्य राहील याचा विचार जरूर आहे.

  • आपल्याला खोलीत काय सोयी हव्यात,
  • खोली एकट्यासाठी की शेअर करण्याची तयारी आहे,
  • वृद्धाश्रमात काय प्रकारची वैद्यकीय सुविधा मिळू शकेल,
  • नेहमीची औषधे मिळण्याची व्यवस्था काय,
  • जेव्हा हालचाल करणे, पलंगावरून उठणे शक्य होणार नाही, तेव्हा त्या वृद्धाश्रमात सोय असेल का?
  • वृद्धाश्रम आपल्याला आपल्या शहरात हवा की शहरापासून दूर चालेल?

आयुष्यात आपण बरेच बदल पाहिलेले असतात. आता हा शेवटचा बदल असे त्याकडे पाहिले पाहिजे. आपण स्वत:च्या घरात रहात असताना मोठी जागा असते. वृद्धाश्रमात एका कॉटवर राहायचे असते. आपल्या दैनंदिन कार्यक्रमाचे स्वातंत्र्य जाते. ठराविक वेळेस सकाळचा चहा-नाश्ता येणार. त्यावेळी आपण झोपलेले असाल तर चहा-नाश्ता थंड होऊन जाणार.

खर्चाचा काही अंदाज –

हा अंदाज घेताना हे अध्याहृत आहे की वैद्यकीय इच्छापत्र आपण केले आहे आणि कोणत्याही प्रकारची इन्वेजिव ट्रीटमेंट आपण घेणार नाही

जर आपण घरात राहण्याची शक्यता असेल तर अशी वेळ येऊ शकते की आपल्याला चोवीस तासांसाठी आपली देखभाल करण्यासाठी माणसाची जरूर पडेल. आज बारा तासांसाठी ५०० रुपये द्यावे लागतात, चोवीस तासांसाठी १०००, महिन्याचे ३०,०००, वर्षाचे ३,७०,००० (बोनस धरून)

आज चांगल्या वृद्धाश्रमात एका कॉटचा खर्च महिना ३५,००० असतो. वर्षाचे ४,२०,०००.

चांगल्या हॉस्पिसचा खर्च दिवसाचा ५००० असतो, महिन्याचे १,५०,०००. सहा महिन्यांचे ९ लाख.

तीन-चार वर्षे वृद्धाश्रम आणि सहा महिने हॉस्पिस हा खर्च २५ लाखांपर्यंत जाऊ शकतो. हे सर्व २०२२चे अंदाज आहेत . वर्षाला ५% इन्फ्लेशन जोडून खर्चाचा अंदाज घेता येईल.
वरील सर्व गप्पा सांपत्तिक स्थिती चांगली असतानाच्या आहेत. गरिबांच्या वृद्ध अवस्थेतील हालांविषयी बोलायलाच नको.

आर्थिक व्यवहाराचे नियोजन

आपण जेव्हा पूर्णपणे परावलंबी झालेलो असतो त्यावेळी आपले आर्थिक व्यवहार कसे आणि कोणी करायचे याचा विचार करण्याची जरूर असते. आपण जेव्हा परावलंबी होतो तेव्हा आपला / आपली पार्टनर जर आर्थिक व्यवहार करण्यास योग्य असेल तर ठीक. परंतु बहुसंख्य वेळी पार्टनर नसतो किंवा पार्टनर पण आर्थिक व्यवहार करण्यात सक्षम नसतो. अशा वेळी आपल्या संपत्तीचे संचालन कसे करायचे, आपल्या रोजच्या खर्चाचे आणि वैद्यकीय खर्चाचे पेमेंट कसे करायचे याची काही योजना हवी.

अवयवदान

अवयवदान हे सर्वात मौल्यवान दान आहे. आपली इच्छा असेल तर अवयवदानाचा अर्ज भरा. आपल्याला एक कार्ड मिळेल. अवयवदान करून आपण दुसऱ्याचे प्राण वाचवू शकता. आज शेकडो लोक अवयवांच्या प्रतीक्षेत अवघड आयुष्य जगत आहेत.

भारतात अवयवदानाविषयी पुरेशी जागरूकता नाही. भारतात अवयवदानाचा दर दहा लाखांना एकापेक्षा कमी आहे. हाच दर अमेरिकेत ३६ आहे. दर वर्षी पाच लाख भारतीयांना अवयवांच्या प्रत्यारोपणाची गरज भासते. त्यांपैकी फक्त ३% व्यक्तींना अवयव मिळतात. (ET Health World , 14 April 2022)

आपले वय किती यावर अवयवदान अवलंबित नसते. तो निर्णय डॉक्टरांना घेऊ द्या. आपण अवयवदानाचा अर्ज भरला असेल तर वारसांना आणि संबंधितांना याची माहिती दिली पाहिजे.

अवयवदानाविषयी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण शेवटच्या आजारात हॉस्पिटलमध्ये असाल आणि आपला मेंदू काम करेनासा झाला आहे तरच अवयवदान व्यावहारिक राहते. (याला deceased donation programme म्हणतात.)

देहदान
माहिती – डॉक्टर येरवडेकर, हेड , सिंबायोसिस आरोग्य विज्ञान शाखा, म. टा. १४ नोव्हेंबर. २०२१
मानवी शरीराची रचना समजून घेण्यासाठी तरुण डॉक्टरांच्या शिक्षणात शवविच्छेदनाचा मोठा भाग असतो. प्रत्येक १० विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी एका शवाची आवश्यकता असते. सध्या हे प्रमाण ५० विद्यार्थ्यांच्या मागे एक शव असे आहे. इच्छुक देहदात्याने मृत्यूपूर्वी तशी नोंदणी करणे आवश्यक असते. हे अर्ज महाविद्यालयात उपलब्ध असतात. देहदात्याला स्वत:च्या हस्ताक्षरात हे इच्छापत्र भरावे लागते. या पत्रावर दोन जवळच्या नातेवाईकांच्या आणि दोन साक्षीदारांच्या सह्या लागतात. अपघातात मृत्यू ओढवलेले किंवा संसर्गजन्य आजाराने मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे देह स्वीकारले जात नाहीत. मृतदेहाबरोबर डॉक्टरांनी दिलेला मृत्यूचा दाखला गरजेचा असतो. नैसर्गिक मृत्यूनंतर सहा तासांच्या आत मृताचा देह महाविद्यालयात आणला जातो. देहदान स्वीकारल्यानंतर त्याची पोचपावती आणि प्रमाणपत्र देण्यात येते.

स्वेच्छामरण
(मरणात खरोखर जग जगते, लेखक बाळ सामंत, प्रकरण १९)
बौद्ध साहित्यात स्वेच्छामरणाला विभवतृष्णा असे म्हटलेले आहे. विभवतृष्णा म्हणजे मरण्याची उत्कट इच्छा. आत्महत्या म्हणजे स्वेच्छामरण नव्हे. शत्रूशी लढताना शूर सैनिकाने केलेले बलिदान हे पण स्वेच्छामरण नव्हे. काका कालेलकर सांगतात –

सामान्यपणे मनुष्याने पाहिले की आपल्याला असाध्य रोग झाला आहे, जगणे कठीण होत चालले आहे, आपण समाजाच्या काही कामी येऊ शकत नाही आणि समाजाला आपण भाररूपच झालेलो आहोत अशा मनुष्याला आपल्या जीवनाचा अंत करण्याचा अधिकार असला पाहिजे.

आचार्य रजनीश यांच्या मते –

प्रत्येकाला असा मूलभूत अधिकार मिळायला हवा की ठरावीक वयानंतर जीवनाचे उगीचच ओझे वाहण्यापेक्षा त्याला शरीर सोडण्याचा अधिकार हवा.

इच्छामरण हा विचार पारंपरिक वैद्यकात बसत नाही. हिपोक्रॅटेसने सांगितलेली एक शपथ डॉक्टर्स घेतात. या शपथेमध्ये एक वाक्य असते – I will never give a deadly drug to anybody, even if asked for, nor I will make suggestions to that effect. हे वाक्य इच्छामरण हा विचार आधुनिक वैद्याकातून काढून टाकते.
जगात स्वित्झर्लंड, नेदर्लंड, स्पेन, बेल्जिअम, लक्झेंबर्ग, कॅनडा, कोलंबिया, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, न्यू झीलंड आणि अमेरिकेतील काही राज्ये या ठिकाणी स्वेच्छामरण कायद्याने मान्य केले आहे.

स्वेच्छामरणाचे निरनिराळे प्रकार आहेत

  • डॉक्टरांच्या मदतीने, औषधे घेऊन स्वत:चे मरण जवळ आणणे
  • सर्व तऱ्हेचे इलाज बंद करून मरण येऊ देणे (passive euthanasia)
  • बेशुद्ध रोग्याचे औषधे देऊन मरण जवळ करणे, जर त्याने इच्छामरणाची लिखित नोंद आधीच केली असेल
  • डॉक्टरांनी रोग्याजवळ औषधे देणे जी घेतल्याने मरण येते. अशा वेळी रोगी स्वत: निर्णय घेत असतो.

भारतात सुप्रीम कोर्टाने व्यक्तीचा आत्मसन्मानाने मरण्याचा अधिकार लक्षात घेतला. २०२० साली कोर्टाने passive euthanasiaला काही अटी घालून मान्यता दिली. या अटी इतक्या जाचक होत्या की पुढील तीन वर्षांत या कोर्टाच्या निकालाचा वापर करून एकही passive euthanasiaची केस झाली नाही. (खरे पाहता या काळात लाखो व्यक्तींनी passive euthanasiaची निवड केली असावी.) २०२३ मध्ये या जाचक अटी कोर्टाने कमी जाचक केल्या आहेत. वर याविषयी माहिती आली आहे.

जैन धर्मातील संथारा
(माहिती या लेखातून Santhara – Jain Way of Death with Equanimity, By Manoj Jain MD, Jain Huff Post)
जैन धर्मात नैसर्गिक आपत्तीच्या काळात, वृद्धापकाळात आणि असाध्य रोग असताना व्यक्तीला संथाराची परवानगी मिळते. संथारा हिंदू धर्मात ज्याला प्रायोपवेशन म्हणतात तसाच आचार आहे. संथाराचे अनुकरण हे सामाजिकरीत्या प्रसिद्ध केले जाते. ज्या व्यक्तीला संथारा करण्याची इच्छा आहे ती व्यक्ती प्रथमत: सर्व व्यक्तींची माफी मागते ज्यांना त्या व्यक्तीने दुखविले असण्याची शक्यता आहे. त्यानंतर जैन धर्मातील गुरूंशी ती व्यक्ती बोलणे करते. जर गुरूंना योग्य वाटले तरच गुरू संथाराची परवानगी देतात. यानंतर काही दिवस ती व्यक्ती ध्यान करते. तरी निश्चय राहिला तर संथाराला सुरुवात केली जाते.

प्रथमत: अन्नप्राशन कमी केले जाते. मग दिवसाआड उपास चालू केला जातो. काही दिवसांनी तीन दिवसांत एका वेळेला अन्नप्राशन केले जाते. अशा प्रकारे हळूहळू अन्नप्राशन पूर्ण बंद केले जाते. त्यानंतर पाणी कमी केले जाते. काही दिवसांनी पाणी पण पूर्ण बंद केले जाते. अशी व्यक्ती दोन ते तीन आठवड्यांत मरण पावते.

जैन धर्मातील संथारा हे आचरण स्वेच्छामरणच होय.

मरणाच्या तीन पायऱ्या
मरण तीन पायऱ्यांनी येते – सामाजिक मरण, मानसिक मरण, शारीरिक मरण
आपले वय वाढते तसे आपले सामाजिक बंध कमी होत जातात. ही प्रक्रिया काही वर्षे होत राहते. साहजिकच ज्या व्यक्तींचे मरण थोड्या अवधीत होते त्यांच्या बाबतीत ही पायरी येत नाही. मानसिक मरण येते जेव्हा व्यक्तीला जवळ आलेल्या मृत्यूची चाहूल लागते. त्या अवस्थेला डेथ झोन म्हणतात ज्याची माहिती पुढच्या भागात घेऊ .
दुसऱ्या भागात आपण काय तयारी करण्याची गरज आहे याचा विचार केला. मृत्यू ही एक अटळ घटना आहे. त्या घटनेच्या आधी आपण कोणत्या स्थितीतून जाणार आहोत याची आपल्याला कल्पना नाही.

आपली तयारी झाल्यावर हे सर्व विचार स्वत:पाशीच ठेवायचे आहेत. आपल्या मरणाविषयी बोलणे पूर्णपणे टाळा. कोणालाही तुमच्या मरणाविषयी ऐकण्याची इच्छा नसते. तुमची तयारी झाल्यावर असे जगा की अजून शंभर वर्षे जगणार आहात.

कवींच्या दृष्टीतून

ये मंजिल आखरी है, कब्र ही तेरा ठिकाना है I रिश्ते तोडने है, ये दुनिया छोड जाना है II
बिछड जाएंगे तेरे दोस्त और रहबाज सारे I सुबह होतेही कूच करते है बंजारे II
जो दौलत आज है तेरी, वो कल गैरोंका धन होगा I दोशाले काम आएंगे, ना रंगी पहरन होगा II
तू लाख हिफाजात करले तू लाख करे रखवाली I उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली II

अख्तर वार्सी

या दिव्य क्षणांच्या वेळी श्वासांच्या लयीत अडसर,
डोळ्यात जरा अंधारी, नजरेत उराली थरथर
थरथरते जे आहे ते की हलते व्याकुळ पाणी
नजरेत धुराची चिमणी, अंतरात घरघर गिरणी
गिरणीची थांबे घरघर भोंग्यांची विलापलीला
निढळातुनी विहंग फडफड खोपेही मोडकळीला
असणे नसणे प्रत्यंतर जणू अळु पाऱ्याचे खेळ
हे एकांताचे तांडे, ही दिव्य क्षणाची वेळ
प्राजक्त देशमुख

त्याच्यावरच राज्य आहे
कोपऱ्यात मोजतोय आकडे
मी केव्हापासून बसलोय लपून
त्याच्यापासून
हृदय धडधडतंय
एकुणसत्तर ....... सत्तर ........ एक्का ......
थांबतच नाईय्यय वर्ष मोजणं

हेमंत जोगळेकर

– – –
(क्रमशः)

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

माझ्या बहिणीच्या सासूबाईंच्या सासूबाईंनी काही वर्षापूर्वी त्वचादान केली होती (त्यांचे त्यावेळी वय ८० वर्षे अधिक असावे). यात ना रक्ताचा थेंब येतो ना शरीर विद्रुप होते.

तसे आजकाल यूट्यूब पाहणे खूपच कमी झाले आहे. पण शरीरशास्त्रासाठी हा चॅनल मधून मधून पाहतो. प्रत्यक्षात मानवी शरीरातले अवयव बघून बर्‍याच गोष्टी शिकायला मिळाल्या (ज्याचा शाळेत असताना खूप बाउ केला होता की यात पाठांतर खूप करावे लागेल). यातल्या कुठल्याशा एका एपिसोड मध्ये डॉक्टरांनी शरीरदानाचे आव्हान केले होते आणि ज्यांनी दान केले त्यांचे आभार मानले होते. कुठल्यातरी एका एपिसोड मध्ये भृण पहायला मिळाला. डॉक्टरांनी त्याच्या दात्याचे आभार मानल्याचे स्मरते. पुस्तकात अशी चित्रे असतात, आजकाल अ‍ॅनिमेशनही उत्तम करता येते. पण ते काचेच्या बाटलीत, द्रावणात ठेवलेले प्रत्यक्ष भृण पाहता माहिती घेणे हा वेगळाच अनुभव होता.

"आपले वय किती यावर अवयवदान अवलंबित नसते." हा मुद्दा माझ्यासाठी नवीन होता. धन्यवाद!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वृद्धापकाळा साठी आर्थिक नियोजन करून ठेवणे इतकेच काही लोकांना शक्य आहे.
बाकी सर्व कवी कल्पना आहे.
प्रॉपर्टी विकून स्वतः जीवंत असे पर्यंत तिचा उपभोग घ्यायचा की विल करून नातेवाईक ,मुल बाळ ह्यांना द्यायची हे त्यांच्या वर्तनावर अवलंबून आहे.
नात्यात बिलकुल गुंतू नका .
स्वतःची सर्व संपत्ती स्वतःसाठी जीवंत असे पर्यंत पूर्ण वापरा.
देह, दान, नेत्र दान हे करण्यासाठी स्वतः निरोगी असावे लागते.
असे निरोगी किती लोक असतील.
तो प्रश्न पण निकाली.
मृत्यु ची भीती बाळगू नका असे उपदेश देवून काही फायदा नसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी नुकतेच लिव्हिंग विल केले आहे. समाजमाध्यमावर ते टाकले आहे. खाली एक उपयुक्त लिंक देत आहे
विषय : वैद्यकीय इच्छापत्र
मार्गदर्शक : प्राचार्य डॉ. रोहिणी पटवर्धन
पीएच.डी. (वृद्धाश्रमाचे व्यवस्थापन)
लेखिका : आपल्यासाठी आपणाच
संस्थापक : सनवर्ल्ड संस्था
रविवार २५ एप्रिल 2022, ला झालेला हा कार्यक्रम
मराठीत, सर्वांकरिता उपयुक्त
निवेदक : डॉ.मिनाक्षी कुऱ्हे, प्रमुख संयोजक, नवी मुंबई डॉक्टर्स फौंडेशन
https://www.youtube.com/watch?v=XB0MDETBadg

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

आभार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0