दीराची बायडी हीच माझी तायडी (भाग दुसरा)


दीराची बायडी हीच माझी तायडी,

अर्थात जनजागृती नाटक

हे नाटक 'ऐसी अक्षरे'वर तीन भागांत प्रसिद्ध होईल:

  • भाग पहिला: स्थापना (दुवा)
  • भाग दुसरा: प्रवेश १,२ आणि ३
  • भाग तिसरा: प्रवेश ४ आणि ५ (दुवा).

————

प्रवेश पहिला

(गाव - अलिबाग. स्थळ - समुद्राकाठच्या एका पैसेबाज आणि प्रशस्त बंगल्याचा व्हरांडा. काचेच्या गोलाकार टेबलाभोवती दोन वेताच्या खुर्च्या मांडलेल्या आहेत. वनमाला नावाची एक टंच आणि उफाड्याची तरुणी हलक्या हाताने साफसफाई करते आहे. झगझगीत रंगाची गावठी पद्धतीची साडी तिने चापूनचोपून नेसलेली आहे. विशेष साफसफाईची गरज नसली तरीदेखील वऱ्हांड्याचा लाकडी कठडा घासून चकचकीत करण्यात आणि काचेच्या टेबलामध्ये स्वत:चं प्रतिबिंब न्याहाळण्यात तिला मजा वाटते आहे हे दिसून येतं. 'काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही —' हे गाणं हळू आवाजात ती स्वत:शी गुणगुणते आहे. आतून एमील येतो. हा एक भारतीय चेहऱ्यामोहऱ्याचा तिशीचा तरुण आहे. समुद्राकडे तोंड करून तो एका खुर्चीवर ऐसपैस बसतो आणि समाधानाने दीर्घ श्वास घेतो.)

वनमाला : (नाटकीपणे हात डोळ्यांवर ठेवून आकाशाकडे पाहात) साहेब, सूर्य माथ्यावर आलेला आहे.

(एमील हसून मान डोलावतो. वनमाला आत जाते आणि वाईनचा रिकामा ग्लास फुलासारखा ओंजळीत धरून आणून टेबलावर काळजीपूर्वक ठेवते. पुन्हा आत जाऊन बर्फाने भरलेली एक वाईन बकेट पोटाला कवटाळून बाहेर घेऊन येते आणि टेबलावर ठेवते. व्हाईट वाईनची एक बाटली बर्फात उलटी खोचून ठेवलेली आहे. तिसऱ्यांदा आत जाऊन एक कॉर्क-स्क्रू तळहातावर तोलून घेऊन येते. मन:पूर्वक खटपट करून ती बाटलीचं बूच काढते आणि ग्लासमध्ये वाईन ओतून पुन्हा बूच लावून बाटली बर्फात सरळ खोचून ठेवते. ह्या वस्तू हाताळण्याची तिला सवय नसली तरीदेखील अप्रूप आहे हे तिच्या हालचालींवरून स्पष्ट व्हावं. तिच्या कष्टांकडे एमील मंदस्मित करत कौतुकाने पाहतो आहे.)

एमील : थँक यू!

वनमाला : नो मेन्शन! (तो वाईन चाखून बघतो. चव छान असल्याचं त्याच्या चेहऱ्यावर दिसतं.) साहेब, एक विचारू का?

एमील : विचार ना —

वनमाला : मी काय म्हणते की ह्या ग्लासाला फुलासारखा देठ का असतो?

एमील : असं बघ की व्हाईट वाईन ही वेळ लावत एकेक घुटका घेत चाखतमाखत पीत राहण्याची वस्तू असते. ग्लास दर वेळी असा वरून धरला तर हाताच्या उबेनं वाईन कोमट होऊन जाईल. म्हणून तो देठाकडून उचलायचा असतो.

वनमाला : हां! हे फार हुशार कारण झालं बरं का साहेब! (त्याने ग्लास हातात धरलेला असताना त्याच्या बोटांभोवती आपली बोटं अलगद गुंफून ग्लास उचलून स्वत:च्या तोंडाजवळ नेऊन पाहते, पण ओठ लावत नाही. ग्लास अलगद खाली आणून बोटं सोडवून घेते.) तुमचं बघून आधी मी पण असा देठाकडून धरायला गेले तर ग्लास पडता पडता वाचला.

एमील : त्याला सवय लागते. वाईन ग्लास कसा धरायचा हे आमच्या देशात पोरांना शाळेतच शिकवतात. मग ते आपसूक यायला लागतं.

वनमाला : अगं बाई! आमच्या इथे पोरांना शाळेत काही पण नीट शिकवत नाहीत. बघते ना मी!(थोडा वेळ ओठंगून उभी राहात) पण साहेब, आता विषय निघाला आहे तर आणखी एक विचारू का?

एमील : अगं, विचार ना —

वनमाला : ही वाईन का काय म्हणता तिचा रंग काही चुन्याच्या निवळीसारखा नाही. मग हिला व्हाईट वाईन का म्हणतात?

एमील : याला नीट उत्तर नाही. आमच्या देशातलं भाषेचं वळणच तसं आहे समज. आता तू इथे अलिबागला राहतेस. कुठे जंगलात राहतेस का? तर नाही. तरी पण तुझं नाव वनमाला आहे की नाही?

वनमाला : आहे! माझ्या आईबाबांना निसर्गाची फार आवड होती. हातात हात घालून देवराईत फिरायला जायचे. (लाडात येऊन गुणगुणू लागते) जाईन विचारित रानफुला! भेटेल तिथे गं सजण मला — जाईन विचारित रानफुला!

एमील : पुढे?

वनमाला : तर असे फिरायला गेलेले असताना तिथेच एक दिवस दोघांत काहीबाही होऊन गेलं आणि मी आईच्या पोटात आले. म्हणून माझं नाव ठेवलं वनमाला. पण मला माझा धैर्यधर अजून भेटायचा आहे.

एमील : भेटेल. वाट पाहात राहा. पण भेटल्यावर ओळखेल का हा वेगळा प्रश्न झाला.

वनमाला : (किंचित गोंधळते.) काय उगीच चेष्टा करताय साहेब!

(जवळच उभी राहून थोड्या वेळाने) पण साहेब, तुम्ही स्वभावाने गोड आहात तेव्हा आणखी एक विचारूनच घेते. तुम्ही म्हणता की आमच्या देशात असं असं शिकवतात, आमच्या देशात असं असं वळण आहे. पण तुमचा देश म्हणजे कुठला म्हणायचा? दिसायला तुम्ही इथलेच दिसता —

एमील : त्याचं असं आहे वनमालाबाई, की माझा जन्म इथलाच भारतातला आहे. पण कुठे झाला हे मला माहीत नाही, आणि माझे आईबाप कोण हेही मला माहीत नाही. मी अगदी लहान असताना तुळजापूरच्या एका अनाथालयात ते मला टाकून गेले. एक दिवस तिथे फ्रान्समधून एक निपुत्रिक जोडपं आलं, त्यांनी मला दत्तक घेतलं आणि तिकडे घेऊन गेले. माझं नाव ठेवलं एमील. त्यांचं आडनाव मोने, त्यामुळे माझं आडनाव मोने. असा मी एमील मोने. (समोर समुद्राकडे बोट दाखवत) इथून सरळ चार हजार मैल उडत गेलं की आमचा देश लागतो.

वनमाला : अगं बाई! मोने! फ्रान्समध्ये ब्राह्मण म्हणून राहायचं म्हंजे अवघड आहे हो! मी असं ऐकलं की समुद्रापार गेल्यानं आर्यधर्म बुडतो —

एमील : अगं ते ब्राह्मण नव्हते, फ्रेंच होते. मोने म्हणजे भारतातले मोने नव्हेत — तिकडचं स्पेलिंग वेगळं असतं. शेवटी एक मुका टी असतो —

वनमाला : मुकाटी? म्हणजे कसं म्हणता? मुका घेण्याशी त्याचा संबंध असतो की काय? (मादकपणे कमरेत वाकून, पण एमीलच्या गालांपासून सुरक्षित अंतर राखून ओठांचा चंबू करते.)

एमील : च्च. तुला कसं सांगू आता?! मुका घेण्याशी नव्हे, मुकं राहण्याशी असतो.

वनमाला : मग तो माझा प्रांत नव्हे बरं का साहेब! पण आता विषय वाढतोच आहे तर आणखी एक विचारते. तशी मी पहिल्यापासून चौकस बरं का!

एमील : हो, ते कळलं —

वनमाला : थँक्यू! तर मी काय विचारते की दिसायला मॅडम पण इथल्याच दिसतात. आता त्या पण तुमच्याच फ्रान्स देशातल्या का कसं?

एमील : त्याचं असं आहे वनमालाबाई, की तिचाही जन्म इथलाच भारतातला आहे. पण कुठे झाला हे तिला माहीत नाही, आणि तिचे आईबाप कोण हेही तिला माहीत नाही. ती अगदी लहान असताना चिपळूणच्या एका अनाथालयात ते तिला टाकून गेले. एक दिवस तिथे फ्रान्समधून दुसरं एक निपुत्रिक जोडपं आलं, त्यांनी तिला दत्तक घेतलं आणि तिकडे घेऊन गेले. तिचं नाव ठेवलं सुझन. त्यांचं आडनाव माने, त्यामुळे तिचं आडनाव माने. अशी ती सुझन माने.

वनमाला : अगं बाई! माने! फ्रान्समध्ये शहाण्णव कुळी मराठा म्हणून राहायचं म्हंजे अप्रूप आहे हो! मी असं ऐकलं की समुद्रापार गेल्यानं क्षात्रधर्म बुडतो —

एमील : अगं ते मराठा नव्हते, फ्रेंच होते. माने म्हणजे भारतातले माने नव्हेत — तिकडचं स्पेलिंग वेगळं असतं. शेवटी एक मुका टी असतो —

वनमाला : मुकाटी? इथे पण? (तोच अभिनय एमीलच्या दुसऱ्या गालाजवळ येऊन करते.) मुका घेण्याशी खरंच संबंध नाही म्हणता? बघा हं — कित्येकदा आपल्या देशाचं वळण आपल्यालाच नीट माहीत नसतं.

एमील : च्च. तुला कसं सांगू आता?! जाऊ दे. पण मुद्द्याची बाब अशी की पॅरिसमध्ये आम्ही दोघे एका कॉलेजात होतो. तिथेच भेटलो आणि प्रेमात पडलो. मी 'एमील', म्हणून ती मला 'ए' म्हणायला लागली. ती सुझन माने, म्हणून मी तिला 'सुमा' म्हणायला लागलो.

वनमाला : पण तुम्ही वेगळंच म्हणता! शीळ घातल्यासारखं—

एमील : आमच्या देशात 'उ' असाच म्हणतात: ये, तुला शिकवतो. (तिच्या शेजारी उभा राहतो.) 'सीमा' म्हण बरं. (ती म्हणते.) हं. आता ओठाचा असा गोल चंबू कर आणि 'सीमा' म्हण: 'सुमा'!

वनमाला : (त्याप्रमाणे करत दोनतीनदा म्हणून बघते) सुमा! (एमीलकडे रोखून बघत अोठांचा चंबू करून उभी राहते. मग प्रयत्नपूर्वक फ्रेंच 'उ' म्हणत गुणगुणू लागते:) उगीच का कांता, गांजिता— उगीच का कांता!

(गाणं बंद करून) तोंड दुखायला लागलं हो! हा उच्चार पण शाळेतच शिकायला हवा. नंतर येण्यासारखा नाही. पण ते काही असलं तरी तुम्ही आणि सुमाताई (फ्रेंच पद्धतीने 'सु' म्हणत) मस्त शोभू—न दिसता. ('भू' म्हणताना ओठाचा चंबू करते.)

एमील : थँक यू! आमच्या लग्नाला सात वर्षं झाली. तेव्हा म्हटलं मायदेश बघून यावा. हे अलिबाग गाव छान वाटलं. समुद्र छान वाटला. म्हणून हा बंगला तात्पुरता भाड्याने घेतलेला आहे. इथे थोडे दिवस आरामात राहू आणि मग फ्रान्सला परत जाऊ.

वनमाला : हे बेष्ट केलंत! सात वर्षांनी म्हणजे रुचिपालट हा पायजेच. तुम्हाला मासेबिसे खावेसे वाटले तर सांगा बरं का साहेब. मला मस्त झणझणीत पापलेट करता येतो!

एमील : करूया ना! सुमा परत आली की तिला विचारून बेत ठरवू.

वनमाला : पण आज त्या एकट्याच कशा काय फिरायला गेल्या?

एमील : तिला वाटलं तशी गेली. आमच्या देशात असं चालतं बरं का! वाटलं तर नवराबायको एकत्र बाहेर जातात, वाटलं तर आपापले जातात. बायकोला तिची मोकळीक असते, नवऱ्याला त्याची असते. सगळीकडे आपला लक्ष्मीनारायणाचा जोडा मिरवला पाहिजे असं काही नसतं.

वनमाला : चांगली पद्धत आहे हो! मी लग्न करेन ना तेव्हा मला माझी मोकळीक देणारा नवराच बघेन. खलील जिब्रान हेच म्हणून गेला आहे: जवळिकीत मोकळीक पायजे. पण साहेब, आता मोकळिकीचा विषय निघाला आहे तर एक नाजुक गोष्ट विचारते, बरं का. मी पहिल्यांदा भेटले तेव्हा मॅडमनी माझा चेहराच कुरवाळला. मी घरात शिरले की दर वेळी माझा चेहरा कुरवाळतात. असं का म्हणे? तुमच्या फ्रान्स देशात अशीच पद्धत आहे की काय?

एमील : हं. त्याबद्दल तुला जरा तपशीलानं सांगायला पाहिजे. मॅडमना एक दुर्मीळ रोग आहे. रोग म्हण नाही तर विकार म्हण. मॅडम मुखांधळ्या आहेत.

वनमाला : काही कळलं नाही —

एमील : मॅडमना बाकी सगळं व्यवस्थित दिसतं पण माणसांचे चेहरे ओळखू येत नाहीत.

वनमाला : चेहरे ओळखू येत नाहीत?! असं कसं होईल?

एमील : होऊ शकतं. कसं ते तुला मोघम सांगतो. असं बघ की आपण सतत काही ना काहीतरी पाहात असतो किंवा ऐकत असतो किंवा बोलत असतो किंवा लक्षात ठेवत असतो वगैरे. तर हा सगळा कारभार मेंदूतून चालतो हे तुला ठाऊक आहे. उदाहरण घ्यायचं म्हणजे, आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपले ओठ हलवण्याची जबाबदारी मेंदूच्या एक ठराविक भागाकडे असते. तो इथे असतो. (स्वत:च्या 'ब्रोकाज् एरिया'ला हात लावून दाखवतो. तीही स्वत:च्या डोक्यावर चाचपडून पाहते.) तसाच माणसांचे चेहरे ओळखणारा एक भाग मेंदूत असतो. आता भाग याचा अर्थ तो मेंदूत एकाच ठिकाणी असेल असं नाही. विखुरलेला असू शकेल. पण असतो. त्यात बिघाड झाला तर चेहरे ओळखू येत नाहीत. मग अशी व्यक्ती काय करते तर दुसरी काहीतरी खूण वापरून माणसं ओळखायला शिकते. सुमाला पहिल्यापासून समोरच्याचा चेहरा कुरवाळून बघायची सवय आहे. नाक धारदार आहे की बसकं आहे, गाल गोबरे आहेत की खप्पड आहेत, भुवया फटकून राहताहेत की जोडून राहताहेत हे सगळं हाताळून ती मनाशी नोंद करून ठेवते. प्रत्येकाच्या चेहऱ्यात वैशिष्ट्यं ही असतातच. तो अख्खा भूगोल ती एकत्र लक्षात ठेवते.

वनमाला : गंमत आहे! पण हे असं फारसं पाहण्यात येत नाही —

एमील : अशा व्यक्ती फार दुर्मीळ असतात. क्वचित एखादी भेटली तर भेटते. लुळेपांगळे काय सगळीकडेच दिसतात. तसं ह्यांचं नाही.

वनमाला : पण साहेब, तुम्ही मुखांधळे नाही ना? नाहीतर चान्स मारून तुम्ही पण माझा चेहरा कुरवाळून घेणार —

एमील : नाही, माझं तसं नाही. मला सगळे चेहरे व्यवस्थित दिसतात, तेव्हा काळजी नको करूस.

वनमाला : मग ठीक आहे. पण आता मीच विषय काढला आहे तर एक बोलून दाखवते बरं का. साहेब, तुम्ही चांगले आहात. मी ऐकून असायची की कुणी तरणी बाई दिसली की फ्रान्स देशातले बाप्ये लगेच आंगचटीला जायला बघतात. आता मी अशी आवाजमधल्या खिडकीचित्रासारखी दिसते, पण तुम्ही तसे नाही वागला. मॅडम एकट्याच बाहेर गेल्या आहेत पण तुम्ही माझा गैरफायदा नाही घेतला!

एमील : वनमाले, मघापासून मला शंका अशी वाटते आहे की तूच माझा गैरफायदा घेशील की काय!

वनमाला : चला! काहीतरीच बोलता बाई तुम्ही. मी आतच जाते कशी. ('कशी या त्यजू पदाला, नाथा' हे पद गुणगुणत आत जाऊ लागते.)

एमील : प्लीज माझं पुस्तक देऊन जा.

वनमाला : देते. (फडताळातून 'कळ्यांचे निश्वास' आणून देते.)

एमील : हे नव्हे—

वनमाला : हेच घ्या. करमणूक होते. नीट वाचा. (आत जाते. एमील शांतपणे समुद्राकडे पाहात पुस्तक चाळत वाईनचे घुटके घेतो आहे. त्याच्या कपाळाला आठ्या पडू लागतात. असाच थोडा वेळ जातो. समोरच्या पुळणीवरून एक तरुणी चालते आहे. ही सुझन मानेची जुळी बहिण सुरंगा माने आहे.)

एमील : (तरुणीकडे लक्ष जाताच) सुमा! आलीस का परत? (ह्या प्रसंगात सुरुवातीला तो फ्रेंच पद्धतीने 'सु' म्हणतो. तरुणी दचकून बघते.) सुमा! अगं, सुमा! घर विसरलीस वाटतं — (समोर जाऊन तरुणीच्या हाताला धरून बंगल्याकडे नेऊ लागतो. ती हात झिडकारते.)

सुरंगा: तुम्हाला माझं नाव कसं ठाऊक?

एमील : अगं सुमा, असं काय करतेस? (सुरंगा त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालून नाकाने हुंगत त्याचा चोहोबाजूंनी वास घेते.)

सुरंगा: अहो, मी तुम्हाला ओळखत नाही.

एमील : मला माहीत आहे. मी तुझा ए. आत्ता ओळख पटेल तुला —(असं म्हणत तिचा हात हातात घेऊन स्वत:च्या चेहऱ्यावर ठेवतो. सुरंगा किंचाळते, तसा तो दचकून बाजूला होतो. गडबड ऐकून वनमाला बाहेर येते.)

वनमाला : सुमामॅडम (प्रयत्नपूर्वक फ्रेंच पद्धतीने म्हणत), आलात का फिरून? (सुरंगा तिच्याभोवती प्रदक्षिणा घालून नाकाने हुंगत तिचा चोहोबाजूंनी वास घेते.)

सुरंगा: बाई, मी तुम्हाला ओळखत नाही.

वनमाला : मला माहीत आहे. साहेबांनी मला सगळं सांगितलं आहे. अहो, मी वनमाला. इथे बंगल्यात काम करते. आत्ता ओळख पटेल तुम्हाला —(असं म्हणत तिचा हात हातात घेऊन स्वत:च्या चेहऱ्यावर ठेवते. सुरंगा किंचाळते. एमील आणि वनमाला गोंधळून एकमेकांकडे पाहतात.) अहो, किंचाळताय काय अशा?

एमील : हिचं बिनसलंय काहीतरी.

वनमाला : मॅडम, तुम्हाला बरं नाही का वाटत? मी सांगते, तुम्हाला ऊन लागलं असणार. लांबून कुठूनतरी फ्रान्स देशातून तुम्ही येणार. तिथे सगळी थंडी. इथे कोकणात उकडतं किती आणि अंगातून घाम किती जातो! त्यातसुद्धा माझ्या भरवशावर नवऱ्याला सोडून मोकळीक घेऊन तुम्ही एकुलत्या भटकणार. त्रास होईल नाहीतर काय होईल? आधी आत चला बघू.

(सुरंगा तिथेच खिळून उभी राहते. तिच्या दुसऱ्या बाजूला एमील येऊन तिचा हात धरू पाहतो.)

सुरंगा: (पुन्हा एमीलला हुंगत) अहो, पण मी तुम्हा दोघांना ओळखत नाही.

वनमाला : अशा हुंगताय काय स्वत:च्याच नवऱ्याला? (एमीलला हुंगत) अय्या, यांना व्हाईट वाईनचा कसा छान वास येतोय. तुम्हाला पण देते, म्हणजे तुम्हालाही येईल. (दोघे मिळून तिला वऱ्हांड्यात आणून वेताच्या खुर्चीवर बळेबळे बसवतात. वनमाला लगबगीने आत जाते.)

एमील : सुमा (फ्रेंच उच्चारांत), तू विश्रांती घे. तुला ऊन लागलं असणार.

सुरंगा: अहो, पण तुम्ही माझं नाव असं का म्हणताय?

एमील : बरं बाई. रोमात रमणी आणि कोंकणात कोंकणी. सुमा (सानुनासिक उच्चारांत म्हणत), तू विश्रांती घे. तुला ऊन लागलं असणार.

(वनमाला येते. तिने वाईनचा रिकामा ग्लास अभिमानाने देठाकडून धरलेला आहे. सुरंगाला ती वाईन भरून देते तशी सुरंगा तो वरच्या गोलसर भागाला ओंजळीत धरून उचलते. एमील आणि वनमाला एकमेकांकडे आश्चर्यचकित होऊन बघतात.)

वनमाला : मॅडम, तशी ती हाताच्या उबेनं कोमट होऊन जाईल. पटकन पिऊन टाका. (यावर गोंधळून सुरंगा सगळी वाईन पटकन पिऊन टाकते. वनमाला तिला आणखी एक ग्लास भरून देते.) फारच ऊन लागलेलं दिसतंय. आणखी एक घ्या. (सुरंगा तीही सगळी पिऊन टाकते.)

सुरंगा: मला गरगरतंय हो.

वनमाला : मॅडम, तुम्ही आत चला आणि घटकाभर निवांत पडा. तुम्हाला कुणी त्रास देणार नाही. नवरा पण त्रास देणार नाही. (एमीलचा वाईन ग्लास स्वत:च्या गालाला लावत) आमचे साहेब कसे व्हाईट वाईनसारखे शीतल मनोवृत्तीचे आहेत. उन्हातान्हातून आलेली लालबुंद खारट बायको बघूनसुद्धा त्यांचं मन विचलित होत नाही. बिनघोर चला तुम्ही — (सुरंगाला आत घेऊन जाते. एमील अनिश्चितपणे उभा राहतो, पण मग पुन्हा खुर्चीवर बसून वाचू लागतो. काही वेळाने वनमाला परत येते. एमील तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहतो.)

वनमाला : गरागरा पंखा लावून मॅडमना झोपवलं आहे. एक डुलकी टाकली की त्यांना हुशार वाटेल. तुम्ही काळजी नका करू.

एमील : ठीक.

वनमाला : अगदी नका करू. कोंकणी हवेत माझा जन्म गेलेला आहे.

एमील : ठीक.

वनमाला : पण साहेब, मी काय म्हणते — दुपारच्या जेवणाला काय करायचं?

एमील : (विचार करून) तू नेहमी झणझणीत पापलेट करतेस म्हणालीस ना? आज व्हाईट वाईन टाकून फ्रेंच पद्धतीचा पापलेट करू. लोणसर आणि गोडसर असतो. कसा करायचा ते मी दाखवतो.

वनमाला : अगं बाई!

एमील : मी सांगतो तेवढं बाजारातून पटकन आणायचं: पापलेट —

वनमाला : आणते!

एमील : लोणी —

वनमाला : घरात आहे!

एमील : ते द्राक्षाएवढे छोटे कांदे असतात ते मिळतील का?

वनमाला : आणते. बाजारात एक मद्रासी बसतो, त्यांना तो सांबार कांदे म्हणतो —

एमील : व्हाईट वाईन —

वनमाला : इथेच आहे! (उत्साहाने हात पदराला पुसते आणि पदरातच धरून वाईनची बाटली उचलते.) साहेब, मला इंग्रजी अक्षरं येतात बरं का! तुम्हाला वाचून दाखवते.

एमील : वनमालाबाई, इंग्रजी अक्षरं असं काही नसतं. त्यांना रोमन अक्षरं म्हणतात.

वनमाला : म्हणू देत. तुम्हाला वाचून दाखवते. (अक्षरं लावत) पि-नॉट ग्रि-गि-ओ.

एमील : नाही. माझं ऐकून नीट म्हण. पी—न्यो, ग्री—ज्यो. पुन्हा ऐक. पी—न्यो, ग्री—ज्यो.

वनमाला : पी—न्यो, ग्री—ज्यो? (बाटलीवरच्या चिठ्ठीकडे बघत) पण साहेब, हा टी म्हणायचा नाही?

एमील : नाही. मुका टी म्हणजे काय ते आता कळलं ना?

वनमाला : (चमकून) हाच तो मुका टी होय?! आता कळलं! पी—न्यो (डाव्या हाताच्या तळव्याने स्वत:चा ब्रोकाज् एरिया क्षणभर झाकून घेत) ग्री—ज्यो! पण साहेब, म्हणायचा नाही तर तो लिहिलाय कशाला?

एमील : आमच्या देशात तशीच पद्धत आहे. चल आता — (वाईन ग्लास उचलून घेऊन आत जाऊ लागतो.)

वनमाला : आहे तर आहे. चलते! साहेब, तुम्ही गोड आहात. लग्न करेन तेव्हा असा जोडीनं स्वयंपाक करणारा नवरा बघूनच करेन. (बाटली परत बर्फात खोचून बकेट पदरात कवटाळून गुणगुणत नाचाची पावलं टाकत त्याच्या मागोमाग जाते: 'मला मदन भासे हा, मोही मना या — मोही मना या!')

प्रवेश दुसरा

(पोटऱ्या अर्धवट बुडतील इतपत पाण्यात उभी राहून सुझन माने समुद्राकडे पाहते आहे. पुळणीवर उभा असलेला एकनाथ मोने तिच्याकडे एकटक निरखून पाहतो आहे. ह्या प्रवेशामध्ये सुझन आणि एकनाथ यांची स्वगत भाषणं येतील. यांपैकी कोणतंही एक पात्र बोलत असताना दुसरं निश्चल अवस्थेत जाईल.)

एकनाथ : (स्वगत) मध्यान्हीचे प्रखर किरण जिच्या सुडौल अवयवांवर अनिर्बंध बागडताहेत अशा माझ्या लालबुंद आणि खारट प्रियपत्नीकडे पाहून मनाला विषयाचा स्पर्श झाल्याखेरीज राहात नाही. परंतु आमचा संसार नव्या नव्हाळीचा असताना माझ्या उत्कट कामेच्छांना ती जसा भरभरून प्रतिसाद देत असे तसा आताशा देत नाही, हे एक शल्य माझ्या अंत:करणात अंकुर धरू लागलं आहे. रोखठोक आणि मोजक्या शब्दांत सांगायचं तर आमचं सहजीवन थंडावू लागलं आहे. सुमाशी माझं लग्न झाल्याला सहा वर्षं झाली. मी ब्राह्मण आणि ती क्षत्रिय असा तो आंतरजातीय संबंध असल्यामुळे दोन्हीही कुटुंबांकडून आम्हाला जोरदार विरोध झाला. त्यावेळच्या कुरबुरींना व कलागतींना लहानमोठ्या प्रसंगी खतपाणी मिळून त्या उत्तरोत्तर बळावत गेल्या आणि ह्याचा परिणाम म्हणून त्रासिकपणाचं एक सावट सुमाच्या स्वभावावर कायमचंच पडून गेलं. मात्र एकदा असं झाल्यानंतर प्रणयाच्या प्रारंभीची उत्स्फूर्त प्रीतिभावना कोमेजून जाऊन मलूल दिसू लागावी यात नवल ते काय? शंभरातल्या नव्व्याण्णव जोडप्यांच्या बाबतीत अतिपरिचयामुळे जे आपसूक होऊ लागतं त्याला आम्हा दोघांच्या बाबतीत पारिवारिक अशांततेमुळे चालनाच मिळाली म्हणायची.

आता ती हलक्या पावलांनी पाण्यातून किनाऱ्यावर येईल आणि मला ओळखण्यासाठी नेहमीप्रमाणे चोहोंबाजूंनी हुंगू लागेल. मी इथे डोळे मिटून अळीमिळी गुपचिळी उभा राहतो कसा! तिने कितीही भरभरून वास घेतला तरीदेखील मी काहीसुद्धा प्रतिक्रिया द्यायचा नाही. मग बघूया काय करते ते!

(डोळे मिटून न हलता उभा राहतो. काही वेळाने सुझन पाण्यातून बाहेर येते आणि एकनाथच्या दिशेने चालू लागते. ती त्याचा चेहरा कुरवाळते तसा तो आश्चर्यचकित होतो, पण आनंदूनही जातो.)

सुझन : ए—,

एकनाथ : (खिदळत) अगं सुमे, अशी लाडात काय येतेस!? गुदगुल्या होताहेत ना मला!

सुझन : (स्वगत) हं! आज स्वारीची लहर काही वेगळीच दिसते आहे. एरवी माझा एमील म्हणजे वागण्याबोलण्यात कसा संयत आणि समतोल! अख्खं आयुष्य गॉलप्रदेशात जाऊनही तिथल्या पुरुषांच्या आततायी प्रणयोत्सुकतेची बाधा त्याला झालेली नाही. त्याला ओळखण्यासाठी त्याचा चेहरा मी रोजच नाही का कुरवाळत? परंतु शीतकपाटात ठेवलेल्या कणकेच्या गोळ्याला कुरवाळावं यापेक्षा जास्त चेतना त्याच्या स्पर्शातून मला कित्येक वर्षांत जाणवलेली नाही. पण याउलट आज पहा ना! त्याचा चेहरा मदनज्वराने असा उष्ण झाला आहे की माझ्या हातांना अंमळ चटकाच बसला. आणि माझ्या नावाचा उच्चारही त्याने अशा काही आगळ्या प्रकारे केला की जणू मी त्याची सात वर्षं मुरलेली लग्नाची बायको नसून वेगळीच कुणी असावे. खचितच त्याच्या मनात कसल्यातरी वात्रटपणाचे बेत शिजताहेत आणि तो मला काहीतरी संकेत देऊ पाहतो आहे. काय बरं त्याचा हेतू असेल?

(क्षणभर विचार करून) हं! असं तर नसेल?! पॅरिसमध्ये कॉलेजात असताना 'The Hitchhiking Game' नावाची मिलान कुंदेराने लिहिलेली लघुकथा मी आणि एमीलने बिछान्यात लोळत एकमेकांच्या कमरेभोवती हात टाकून वाचून काढली होती. तेव्हा ती बाळबोध वाटली होती, परंतु तिच्यामागची मध्यवर्ती कल्पना मात्र आम्हा दोघांना आवडली होती. एक तरुण आणि एक तरुणी सहलीवर गेलेले असतात. पण अचानक एका क्षणी परस्परांच्या मूकसंमतीने अशी बतावणी करू लागतात की आपण एकमेकांना अनोळखी आहोत आणि योगायोगाने नुकतेच भेटलो आहोत. मला वाटतं हाच संकेत एमीलच्या मनात असावा, कारण आम्ही दोघे खरोखरीच सहलीवर आलो आहोत. तेव्हा मी असं करते: मला एमील अनोळखी आहे अशी बतावणी करून पाहते. बघू या तो तसाच प्रतिसाद देतो का! लघुकथेचा शेवट जसा होतो तसाच ह्याही प्रसंगाचा झाला तर मात्र मोठी मौज होईल.

(प्रकट) सॉरी हं, माझा काहीतरी गैरसमज झाला असावा. मी तुम्हाला ओळखलं नाही.

एकनाथ : (स्वगत) हूं! आज माझ्या प्रियपत्नीची लहर काही वेगळीच दिसते आहे. चक्क म्हणते आहे की मी तुम्हाला ओळखलं नाही! कित्येक वर्षांपूर्वी कुलाबा जिल्ह्याच्या कलेक्टर कचेरीत काम करीत असताना जेवणाच्या सुट्टीत आमची ओळख झाली. अशाच एका भेटीत 'एकदा काय झालं' नावाची गौरी देशपांड्यांनी लिहिलेली लघुकथा सुरंगाने आणि मी एकाच चमच्याने कांदेपोहे खात डोक्याला डोकं लावून वाचून काढली होती. तेव्हा ती भंपक वाटली होती, पण तिच्यामागची मध्यवर्ती कल्पना मात्र आम्हा दोघांना आवडली होती. एक नवराबायको आपापल्या कामाच्या निमित्ताने गावात अचानक एकाच ठिकाणी येतात. परस्परांच्या मूकसंमतीने ते अशी बतावणी करू लागतात की एकमेकांना आपण अनोळखी आहोत आणि योगायोगाने नुकतेच भेटलो आहोत. मला वाटतं हाच संकेत सुमाच्या मनात असावा, कारण आम्ही दोघे आमच्याच गावात खरोखरीच अचानक भेटतो आहोत. तेव्हा तिची ही खेळी बरोब्बर ओळखून मीही तसाच प्रतिसाद देतो. लघुकथेचा शेवट जसा होतो तसाच ह्याही प्रसंगाचा झाला तर मात्र मोठी बहार येईल.

(प्रकट) जाऊ द्या हो. होतं असं कधी कधी! पण आमच्या गावात तुम्ही नव्या दिसता.

सुझन : हो, नवी आहे खरी. माझा जन्म ह्याच देशात झाला, पण काही कारणाने मी परदेशात वाढले. आता का आणि कशी यात नाही बाई पडत! पहिल्याच भेटीत कशाला मेलं रडगाणं गायचं ते?! पण आपल्या मायभूमीची ओढ वाटू लागली, तशी आले परत. चार दिवस समुद्राकाठी राहीन, आणि मग जाईन चिमणीसारखी भुर्र उडून.

एकनाथ : मोठ्या भाग्यवान बुवा तुम्ही. परदेशी राहणाऱ्यांचा मला भारी हेवा वाटतो. मी आपला इथेच जन्मलो आणि इथेच वाढलो. आमची धाव कुंपणापर्यंतच!

सुझन : इतक्या छानशा टुमदार गावात राहणाऱ्यानं दुसऱ्या कुणाचा हेवा तो कशाला करावा?

एकनाथ : बरं बुवा! आता आमचा गाव तुम्हाला आवडला ह्यातच आम्ही काय ती फुशारकी वाटून घेऊ. पण तुमच्यासारखी चार गावचं पाणी प्यालेली, देखणी, आधुनिक स्त्री अहोजाहो करू लागली की अकाली पोक्त झाल्यासारखं वाटतं! मी तर म्हणतो की मला एकेरीच हाक मारा.

सुझन : आता मला तुमचं नावदेखील ठाऊक नाही तर हाक ती कशी मारणार? आणि मला बाई परपुरुषाला अरेतुरे करायला संकोच वाटतो. आमच्या परदेशी भाषेचं वळण तसं नाहीच मुळी. मी आपली तुम्हाला 'अहो ए—' म्हणेन. यापेक्षा जास्त एकेरीवर येणं मला नाही जमायचं. चालतं का पाहा!

एकनाथ : आता तुम्ही इतक्या स्नेहानं म्हणणार तर का नाही चालणार बरं?

सुझन : पण माझ्यासारख्या चार गावचं पाणी प्यालेल्या, देखण्या, आधुनिक स्त्रीशी घसट वाढवायची तर माझं नाव परदेशी उच्चारांत नीट म्हणावं लागेल. जमेल का तुम्हाला?

एकनाथ : अहो, मी आपला साधाभोळा कोंकणी माणूस. तुमचा तो परदेशी उच्चार मला कसा ठाऊक असेल? तुम्हीच शिकवलंत तर आशा आहे.

सुझन : शिकवते. असे माझ्याजवळ उभे राहा. 'सीमा' म्हणा बरं. (तो म्हणतो.) हं. आता ओठाचा असा गोल चंबू करा आणि 'सीमा' म्हणा: 'सुमा'!

एकनाथ : (दोनदा म्हणतो.) गोड नाव आहे. अंगावर शिरशिऱ्या येताहेत.

सुझन : बरं, बरं! इतकं काही कौतुक करायला नको आहे. तुमच्या बायकोनं ऐकलं चुकून तर जळफळेल मेली!

एकनाथ : (व्यथित झाल्याचा अभिनय करत) सुमादेवी, सहज थट्टा करता करता मनावरची खपली काढलीत ना?!

सुझन : (अपराधी वाटल्याचा अभिनय करत) असं हो का म्हणता? बायकोचा विषय निघताच अचानक खिन्नसे झालात?

एकनाथ : झालो खरा. पण जाऊ द्या तो विषय. थोड्या दिवसांसाठी आमच्या गावी पाहुण्या आला आहात. गृहछिद्रं सांगून कशाला उगीच तुमच्या आनंदात विरजण कालवू?

सुझन : तेही खरंच. आपली चार क्षणांची ओळख. पुढे टिकेल, न टिकेल. पण एक सांगू का? छोटीमोठी गृहछिद्रं सगळ्याच संसारांत असतात. आता मीदेखील विषय नाही वाढवत; तुम्ही शहाणेसुरते आहात तेव्हा उमजून घ्यालच —

एकनाथ : समजलो. पण मला फिरून फिरून वाटतं की आपली ओळख अशी विरून नाही जायची. यदाकदाचित टिकली आणि वाढली तर एकदा मन मोकळं करेन तुमच्याजवळ.

सुझन : मी पण करेन.

एकनाथ : एका नव्या नात्याची ती सुरुवात ठरेल.

सुझन : हो.

एकनाथ : पण तो विषय आज नको.

सुझन : आज नको. आज आपण हलक्याफुलक्या मनानं राहू. मी सुट्टीवर आले आहे ना? मग तुमचा गाव नको का बघायला? काय काय दाखवाल मला?

एकनाथ : इथे एक जुना किल्ला आहे आणि एक जुनं देऊळ आहे. दोन्ही सुरेख आहेत. पण गावातली माझी खास आवडीची जागा कोणती आहे सांगू? पुळणीवरून असंच पुढे चालत गेलं की वळचणीला एक पोफळीचा बाग आहे. आता एवढं कबूल की तुमच्या परदेशी उद्यानांसारखा तो आखीवरेखीव आणि नखरेबाज नव्हे. हा आपला वेडाबागडा आणि ऐसपैस आहे. दुपारी अगदी निवांत आणि निर्जन असतो. याल बघायला?! मला फार आनंद वाटेल तुम्ही आलात तर —

सुझन : अग्गोबाई! फारच धिटावलात हो तुम्ही. परपुरुषाबरोबर अशी कशी भलत्यासलत्या जागी येऊ मी?

एकनाथ : अंमळ धीटपणा झाला खरा! पण आता तुमच्यासारख्या आधुनिक स्त्रीसमोर बुजून ते कसं चालेल? मी तर बुवा ऐकलं की अशा स्त्रियांना आत्मविश्वासानं मुसमुसणारा तरुणच आवडतो. हे आमचं आपलं पुस्तकी पांडित्य बरं का! लघुकथा वाचून कमावलेलं!

सुझन : कळतात हो असली बोलणी. आम्ही काय कुठे लघुकथा नाही वाचत वाटतं?

एकनाथ : तुम्ही त्या वाचत असणार अशी तुमच्याकडे पाहूनच खात्री पटली माझी. चेहरा का कुठे खोटं बोलतो?!

सुझन : हो ना! खूण पटलीच म्हणायची. पण वाचनाचे षौकीन असाल तर एक गोष्ट तुम्हाला नक्की ठाऊक असणार. लघुकथा ताणायची नसते—

एकनाथ : मान्य! कथेचा शेवट मात्र फार महत्त्वाचा असतो. तो चपखल जमून यायला हवा.

सुझन : रचनेमागे धोरण असेल तर का बरं नाही येणार?

एकनाथ : हे अगदी नेमकं बोललात! मग येताय तर?

सुझन : येते बापडी. तुम्ही चांगल्या मनाचे आहात आणि तुमच्यावर विसंबायला हरकत नाही अशी मी आपली समजूत करून घेतली आहे. धोका तर नाही ना देणार मला?!

एकनाथ : नाही हो. बेलाशक चला तुम्ही.

सुझन : (पालथा पंजा पुढे करते.) परदेशी पद्धत!

(एकनाथ किंचित गोंधळतो, पण तिच्या हाताचं चुंबन घेतो. कोपऱ्यांशी हातात हात अडकवून एकमेकांना बिलगून दोघे चालू लागतात.)

प्रवेश तिसरा

(वनमाला आणि एमील बंगल्याच्या आतल्या भागातून वऱ्हांड्यात येतात. दोघेही किंिचत घामेजलेले आहेत. एकेक पेला माठातलं गार पाणी पिऊन घेतात आणि एकमेकांकडे पाहून मंदपणे हसतात. वनमाला डोळे मिटून हाताची घडी घालते.)

वनमाला : कायकाय केलं ते एकदा मनाशी आळवून घेते म्हणजे नंतर विसरायची नाही. पसरट भांड्यात जैतुनाचं तेल गरम करायचं आणि मीठमिरी चोळलेला मासा त्यात शिजवून घ्यायचा. मग तो बाहेर काढून ताटकळत ठेवायचा. चिरलेला कांदा, वाईन आणि लिंबाचा रस त्याच भांड्यात टाकून परतून घ्यायचं. वरून लोणी टाकायचं आणि ते वितळलं की मिश्रण गाळून घ्यायचं. सॉस तयार झाला की ताटकळलेला मासा त्यात पोहायला सोडायचा!

एमील : बरोब्बर.

वनमाला : (डोळे उघडत) नवं शिकत राहायला मला आवडतं. अजून दोनदा केलं की हातात बसेल.

एमील : हो. आणि भारतातल्या जुन्या पठडीच्या बायकांसारखं करायचं नाही. स्वयंपाक करत असताना पदार्थाची चव घेऊन बघायला डगमगायचं नाही. अंदाज त्यामुळेच सुधारतो.

वनमाला : कबूल! आता पानं घेते आणि मॅडमना उठवते. अजून बहुतेक झोपल्याच आहेत.

एमील : तुझंही घे.

वनमाला : तसं नको. इथली पठडी वेगळी आहे. तुम्हाला वाढून मग मी घेते.

(कामाला लागते. दोन पांढऱ्याशुभ्र प्लेट्स, सुऱ्याकाटेचमचे, नॅपकिन, पेले, पाण्याचा जग अशा अनेक वस्तू काचेच्या टेबलावर वेगाने हालचाली करत उत्साहाने मांडते आहे. एमील 'ती बहु चपल वारांगना—' गुणगुणतो आहे.)

वनमाला : आवाज छान आहे तुमचा, साहेब. पण बघा हं — संशयकल्लोळातलं पद म्हणताहात. उगीच कुठे अपशकून नको व्हायला. (एमील स्मितहास्य करत गुणगुणणं चालूच ठेवतो.) सुरी वापरायला जास्त ताकद लागते, म्हणून ती उजव्या हाताशी. काटा वापरायला कमी ताकद लागते म्हणून तो डाव्या हाताशी. हुशार पद्धत आहे! (काम संपवते. टेबल मांडून तयार आहे.) आलेच मी. (आत जाते. थोड्या वेळाने पडद्यामागून) साहेब! मॅडम कुठे गेल्या?!

एमील : कुठे गेल्या म्हणजे?

वनमाला : (पडद्यामागून) घरात दिसत नाहीत! (एमील आत जातो. दारं आपटल्याचे आणि 'सुमा', 'सुमामॅडम' अशा हाका मारल्याचे आवाज. दोघेही पुन्हा बाहेर व्हरांड्यात येतात.) त्यांचं काहीतरी बिघडलंय—

एमील : मलाही तीच शंका येते आहे.

वनमाला : साहेब, मी काय विचारते — त्यांना झोपेत चालायची सवय नाही ना? मी ऐकलं की तुमच्या तिकडच्या एका राणीला अशी हात चोळत झोपेत चालायची सवय होती. (अभिनय करून दाखवते.)

एमील : नाही, हिचं तसं काही नाही. आधीच मुखांधळी आणि वर झोपेत चालते म्हणजे दुर्मीळ लक्षणांची परिसीमा झाली असती. पण तू राणी म्हणतेस ती आमची नव्हे. आम्ही फ्रान्स, ती स्कॉटलंड.

वनमाला : मॅडमशी भांडण नाही ना केलंत?

एमील : केव्हा करणार?! मी तुझ्याचबरोबर स्वयंपाकघरात नव्हतो का?

वनमाला : त्यालाच त्या भांडण समजल्या असतील. बघा — मी संशयकल्लोळाचं म्हणाले होते की नाही?

एमील : छे! तिचा स्वभाव असा नाही हं.

वनमाला : मग काय कारण असेल?

एमील : काही सुचत नाहीय.

वनमाला : साहेब, तुम्ही घरीच थांबा. मी जाऊन बघून येते. टीचभर तर गाव आहे. जाणार कुठे त्या? (एक ऐटबाज गवती हॅट डोक्यावर ठेवून 'आल्हादक मुखचंद्रही होता—' हा चरण गुणगुणत बाहेर पडते. एमील कठड्यावर हात ठेवून अनिश्चितपणे उभा राहतो.)

(क्रमश:)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

माने-मोने आडनावांवरून हा फार्स लिहिणं सुचलं का मुखांधळेपण आधी सुचलं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Those who love बदाम sausage and respect the law should not see either one being made.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिहिताना बहुधा पीनो-ग्रीज्योची आख्खी बाटली एका घोटात कामी आलेली दिसतेय. पण, मजा आहे; चालू द्या!

----------

हा पीनो ग्रीज्यो प्रकार मात्र तपशिलांत सपशेल गंडलेला आहेसे वाटते. (चूभूद्याघ्या.)

१. एक तर, पीनो ग्रीज्यो. पीन्यो नव्हे. (पीन्यो व्हायला ते Pignot थोडेच आहे?)

२. दुसरे म्हणजे, एमील तथा सुझन (ही फ्रेंच आहे म्हटल्यावर, सूझान (तोंडाचा चंबू करून 'सीझान' म्हटल्यासारखी) असायला हवी का? परंतु, ते एक राहू द्या.) हे जोडपे फ्रेंच असल्याकारणाने, त्या मद्यास 'पीनो ग्रीज्यो' कधीही म्हणणार नाही. ('पीनो ग्री' (Pinot Gris) म्हणेल. पीनो ग्रीज्यो (Pinot Grigio) हे त्या मद्याच्या — खरे तर त्या द्राक्षाच्या — इटलीतील अवताराचे नाव आहे, तथा उत्तर अमेरिकेत हे (इटालियन) नाव अधिक प्रचलित आहे, परंतु फ्रान्समध्ये मात्र त्यास सामान्यत: पीनो ग्री म्हणतात, असे थोड्या गूगल-विकीगिरीअंती कळते. (पुन्हा, चूभूद्याघ्या.))

(परंतु, तसेही इथे कोणाला पत्ता लागणार आहे म्हणा! त्यामुळे, द्या ठोकून, नि काय!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वनमाला आवडली. मला उगीचच वनमालाची प्रेरणा शेक्सपियरकडून घेतली असावी असं वाटलं. माझं शेक्सपियरबद्दल असलेलं ज्ञान शून्याच्या काहीच पॉईंट वर असावं. तरी मला असा भास का झाला कोण जाणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0