रहस्यकथेचा रूपबंध - वसंत आबाजी डहाके

#संकल्पना #ट्रॅश #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२२

रहस्यकथेचा रूपबंध

- वसंत आबाजी डहाके

बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेल्या 'कौटिल्याचे कपट' (१९६५) या रहस्यकथेत कौटिल्य नावाच्या एका इसमाने आपली वाममार्गाने, इतरांना फसवून मिळवलेली सगळी संपत्ती एका अभेद्य तिजोरीत ठेवलेली असते. मुद्दाम बांधवून घेतलेल्या उंच चौथऱ्यावर ती अवाढव्य तिजोरी ठेवलेली असते. त्या तिजोरीखाली एका पोकळीत कौटिल्याच्या अस्थी असलेली पेटी ठेवलेली असते आणि पोकळी झाकणाऱ्या दगडावर पुढील अक्षरे कोरलेली असतात : 'मी येथेच आहे. मी सर्व पाहात आहे'. त्या तिजोरीवर टेलिफोनप्रमाणे निरनिराळ्या अक्षरांच्या सहा तबकड्या बसवलेल्या असतात आणि त्या तबकड्यांच्या सहा मुठीही असतात. त्या तिजोरीच्या मुठी फिरवल्या की तबकड्यांवर निरनिराळी अक्षरे दिसू लागतात. त्या सहा तबकड्या फिरवून जेव्हा विशिष्ट अक्षरांचा विशिष्ट शब्द तयार होईल तेव्हाच ती तिजोरी उघडली जाईल अशी व्यवस्था केलेली असते. ती अक्षरे मिळवता यावीत यासाठी कौटिल्याने एक कविता तयार केलेली असते. कौटिल्याचे वकील तीन व्यक्तींना ती कविता देतात. त्यातल्या एका व्यक्तीच्या वडिलांना कौटिल्याने फसवलेले असते आणि दुसऱ्या दोन व्यक्तींनी फसवणुकीच्या कामात कौटिल्याला मदत केलेली असते. एकप्रकारे कौटिल्याने फसलेले आणि फसवणारे यांच्यातच स्पर्धा लावलेली असते. त्यांपैकी कुणीही ते कोडे सोडवावे, आणि वीस लक्ष रुपयांचे मालक व्हावे. 'हे माझे वीस लाखांचे कोडे सोडवावे, आणि जो ते सोडवील त्याला ते सर्व पैसे मिळतील' असे मृत्यूपूर्वी कौटिल्याने म्हटलेले असते.

कौटिल्य हा कोटिभास्कर या नावाने वृत्तपत्रांना कोडी पुरवत असे. तिजोरी उघडण्याच्या बाबतीतही त्याने एक शब्दकोडेच तयार केलेले असते. परंतु ते अधिकच कूट, गहन असे कोडे असते. उकल म्हणून दिलेल्या कवितेत ते कोडे कुठे सापडते आणि त्याचे उत्तर कुठे सापडेल याचा निर्देश त्याने केलेला असतो. ते त्याला ग्रंथात सापडलेले असते. मात्र त्या ग्रंथाचा अथवा ग्रंथकाराचा नामनिर्देश त्या कवितेत नसतो. कोडे सोडवू इच्छिणाऱ्याने ते हुडकून काढावे अशीच त्याची अपेक्षा असते. संपत्ती मिळवायची तर कोडे सोडवले पाहिजे. कोडे सोडवायचे तर तो विशिष्ट ग्रंथ मिळवला पाहिजे, ग्रंथ मिळवायचा तर ग्रंथकाराचे नाव समजले पाहिजे, आणि नंतर तो ग्रंथ मिळाला पाहिजे. ते कोडे सोडवणे शक्य व्हावे यासाठी कौटिल्याने एक गुरुकिल्ली दिलेली असते. वकिलांकडे असलेल्या तांबड्या लिफाफ्यात अनेक चिटोरे असतात. त्यातल्या एका चिटोऱ्यावर 'प्रोफेसरांचे नवीन पुस्तक मागविणे' असे लिहिलेले आढळते. मग हे प्रोफेसर कोण, त्यांचे नवीन पुस्तक कोणते, ज्या ग्रंथात हे कोडे सापडले होते तो ग्रंथ म्हणजे हे नवीन पुस्तक असेल काय, असे प्रश्न निर्माण होतात. या प्रश्नांचा उलगडा झाल्याशिवाय ती सहा अक्षरे मिळणे शक्य वाटत नाही. त्या कवितेतच त्या कोड्याचे उत्तर नसते का? खरे तर बाह्यत: अर्थबोध न होणाऱ्या त्या कवितेतच उत्तर दडलेले असणे शक्य असू शकते. ते उत्तर बरोबर आहे की चूक आहे, याची खात्री करून घेण्यासाठी प्रोफेसरांचे नाव आणि त्यांचे नवीन पुस्तक मिळवणे हे या कथेतील पात्रांना आवश्यक वाटते. कदाचित हा कोडे घालणाऱ्याने निर्माण केलेला चकवाही असू शकेल. कविता आहे, पण त्या कवितेतली नेमकी कोणती सहा अक्षरे तिजोरी उघडणारी आहेत? कदाचित ते पुस्तक पाहिल्यानंतर कळू शकेल असे पात्रांना वाटू लागते.

आपल्याजवळ एक कविता आहे, त्या कवितेत ती सहा अक्षरे आहेत, ती सापडली की ते कोडे उलगडता येणे शक्य होणार असते. त्यासाठी त्या कवितेचे अनेकदा आणि सूक्ष्म वाचन करणे आवश्यक ठरते. कोडी घालणारा चक्रव्यूह निर्माण करतो. कोणत्याही कोड्यात चकवे असतातच. विविध पर्याय - सत्य आणि भ्रामक - उभे केलेले असतात. त्यांतून नेमकी अक्षरे शोधायची असतात. आपण ते कोडे सोडवले नाही तर दुसरा कोणी ते सोडवील अशी धास्तीही असते. या रहस्यकथेतले कोडे संपत्तीशी आणि मानवी जीविताशी निगडित आहे. ते कोडे सोडवण्यापूर्वी, कोडे सोडवण्याच्या प्रयत्नात आणि कदाचित, कोडे सोडवल्यानंतरही अनेक बळी जायचे असतात. कोडे रचणाऱ्या कौटिल्याचीच आधी हत्या होते. घरात शिरू इच्छिणाऱ्या माणसाची हत्या व्हावी अशा यांत्रिक करामतीचे कोडे कौटिल्याने रचलेले असते, तरी ते भेदून एकजण आत प्रवेश करतो आणि त्याने तयार केलेल्या रस्त्याने दुसरा येतो. हा दुसरा कौटिल्याची हत्या करतो आणि कौटिल्याचे यांत्रिक कोडे उमगलेले नसल्याने बळी जातो.

कोडे सोडवणे म्हणजे धोका पत्करणे, कोडे सोडवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे प्राण गमावणे हे खरेच, तथापि कोड्याची कल्पनाही नसणे आणि अवचित कोड्यात सापडणे म्हणजेही आयुष्याला आचवणे ठरते.

रहस्यकथा हे लेखकाने रचलेले एक कोडे असते. एखादी हत्या होते. ती कुणी, का आणि कशासाठी केली असे ते कोडे असते.

रहस्य कथा शोकात्मिका
खुनापूर्वीची शांततामय स्थिती भ्रामक निष्पापपणा
भ्रामक सुगावा, दुसरा खून अपराधाच्या उपस्थितीची जाणीव
उलगडा भ्रामक अपराध-स्थल
खुन्याला अटक खऱ्या अपराधाची स्थलनिश्चिती
अटकेनंतरची शांततामय स्थिती विरेचन - खरे निष्पापपण

रहस्यकथा आणि शोकात्मिका यांच्या रचनेत बाह्य साम्य दर्शवणारा हा तक्ता आहे; त्याचबरोबर या दोन प्रकारांमधला भेदही येथे स्पष्ट होतो. ग्रीक शोकात्मिकेत सत्य काय ते वाचक-प्रेक्षकांना ठाऊक असते, पात्रांना ते ठाऊक नसते. रहस्यकथेतले सत्य वाचकांना मुळीच ठाऊक नसते, पात्राला (म्हणजे खुन्याला) ते ठाऊक असते, नंतर अपराध-शोधक सत्य काय ते शोधून काढतो.

गुंतागुंत आणि उकल हे शोकात्मिकेचे दोन महत्त्वाचे घटक असल्याचे अ‍ॅरिस्टॉटलने म्हटले आहे. रहस्यकथेतही या दोन घटकांना महत्त्व असते. परंतु तेवढ्यावरून हे रूपबंध सारखेच आहेत असे म्हणता येत नाही. शोकात्मिकेतील कृत्यांना आणि त्या कृत्यांशी निगडित पात्रांना विविध पातळ्या लाभलेल्या असतात. दुसऱ्या भाषेत; त्यांना उंची, रुंदी आणि खोली असते. रहस्यकथेतील कृत्यांना व पात्रांना दोनच मिती असतात, खोली नसते. शोकात्मिकेत आत्म-शोध असतो, तर रहस्यकथेत अपराध्याचा शोध घेतलेला असतो.

चोरीचे अथवा खुनाचे कृत्य उघडकीस आल्यापासून चोराला अथवा खुन्याला अटक होईपर्यंतचा प्रवास रहस्यकथेत चित्रित केला जातो. ही वाटचाल सरळ रेषेतली असते, तथापि लेखक प्रत्येक कृतीत गुंतागुंत निर्माण करतो आणि नंतर उकल करतो. सगळ्याच कथात्मक साहित्यकृतींच्या मुळाशी मिथक अथवा नीतिकथा असली तरी कथेच्या आविष्कारात भिन्नता असते. रहस्यकथेच्या वाचकांना एखादा खून कसा झाला, कुणी केला एवढ्याच प्रश्नांपुरती उत्सुकता असते. ही उत्सुकता अथवा उत्कंठा टिकवून ठेवणे हे लेखकाच्या कसबावर अवलंबून असते. राजा ईडिपसला आपण केलेल्या खुनाच्या कृत्याचे व त्याच्या परिणामांचे क्रमश: भान येणे हे 'राजा ईडिपस' नाटकाच्या संदर्भात महत्त्वाचे ठरते; लेअसचा खून त्याने केला की अन्य कुणी हा प्रश्न तेथे महत्त्वाचा नसतो.

अर्नाळकरांच्या 'रावराजेचे रहस्य' या कथेत रावराजेंचा खून विवेकने केला की गंगाधरने हा महत्त्वाचा प्रश्न असतो. सुरुवातीला, विवेकने तो केला असावा असा समज झाल्यानंतर प्रत्यक्षात तो गंगाधरनेच केलेला आहे असे सिद्ध होते. अर्नाळकरांच्याच 'दैवाचा खेळ' या रहस्यकथेतील विनयकुमारवर बँकेवर दरोडा घातल्याचा आरोप शाबीत व्हावा असा पुरावा आढळतो. परंतु तो केवळ योगायोगाने त्यात अडकलेला असून बदमाषांच्या एका टोळीचे ते कृत्य आहे, हे नंतर धनंजय आणि छोटू हे अपराध-शोधक सिद्ध करतात. अर्नाळकरांच्या या दोन्ही कथांत फारशी गुंतागुंत नाही. विशेषत: दुसऱ्या कथेत वाचकांना विनयकुमारचा दरोड्याशी काही संबंध नाही हे ठाऊक असते. त्या आरोपातून त्याची सुटका कशी केली जाते एवढाच प्रश्न असतो.

अ‍ॅगाथा ख्रिस्ती यांच्या 'आफ्टर द फ्यूनरल' या कादंबरीत विविध प्रसंगांची गुंफण अतिशय चातुर्याने केलेली आहे.

रिचर्ड अ‍ॅबरनेथीच्या अंत्यसंस्काराला त्याची नातलगमंडळी जमा झालेली असतात. अंत्यसंस्काराला सगळे एकत्र जमलेले असताना रिचर्डची बहीण कोरा लॅन्स्कनेट उद्गारते, 'पण त्याचा खून झाला होता, होय ना?'

पुत्रवियोगामुळे तो हळूहळू खचत गेला आणि त्याला नैसर्गिक मृत्यू आला असेच सगळे समजत असताना, कोराचा हा प्रश्न बुचकळ्यात टाकतो आणि कदाचित तो नैसर्गिक मृत्यू नसावा असा संशय निर्माण करणारा ठरतो. कोरा आपल्या घरी परतल्यानंतर तिचा खून होतो. रिचर्डचा खूनच झाला असावा आणि कोराला त्या बाबतीतले काही रहस्य ठाऊक असल्याने तिचाही खून झाला असावा. कोरा मोलकरणीबरोबर राहत असते. तिला कोराचा खून करण्याचे काही कारण नाही. शिवाय त्या मोलकरणीला कुणीतरी जहाल विष घातलेला केक पाठवते आणि ती मरतामरता वाचते. मग या सगळ्या घटनांच्या मागे कोण असेल? रिचर्डच्या मृत्यूने कुणाचा फायदा आहे, कोराला का ठार करण्यात आले असे प्रश्न उपस्थित केले जातात. या कुटुंबाशी घरोबा असलेल्या एंटव्हिसलला, डिटेक्टिव्ह हर्क्यूल पायरोला आणि वाचकांनाही हे प्रश्न पडतात. रिचर्डच्या जवळच्या नातलगांवरून नजर फिरू लागते आणि प्रत्येकाचा संशय येऊ लागतो.

अ‍ॅगाथा ख्रिस्ती यांनी कोराच्या खुनाचा प्रसंग रहस्यनिर्मितीसाठी वापरलेला आहे. दुपारी तो खून झालेला असतो, त्यावेळी हे लोक कुठे होते याचा शोध घेतला जातो. प्रत्येकाचेच त्या काळातले वागणे संशयास्पद असते. हर्क्यूल पायरो सगळा तपास करतो आणि एका व्यक्तीवर लक्ष केंद्रित करतो. एक विचित्र गोष्ट कादंबरीतल्या एका पात्राच्याही ध्यानात आलेली असते. ती कळण्यापूर्वीच पायरो खरा खुनी कोण ते जाहीर करतो. रिचर्डचा खून झालेला नसतो, तसा संशय निर्माण करणारी कोरा ही कोरा नसतेच. कोरा म्हणून अंत्यसंस्काराला आलेली कोराची मोलकरीण गिलख्रिस्ट ही असते. वीस वर्षांत कोराला कुणी पाहिलेले नसल्याने हे लक्षात येत नाही. कादंबरीच्या अखेरीस हेलन अ‍ॅबरनेथीच्या हे लक्षात येते. वीस वर्षांत माणसांच्या चेहऱ्यामोहऱ्यात फरक पडू शकतो, पण लकबीत किंवा हावभावात सहसा बदल घडत नाही. कोराला उजवीकडे मान झुकवण्याची सवय होती. अंत्यसंस्काराला आलेली कोरा डावीकडे मान झुकवणारी होती. वीस वर्षांत लकबीत इतका विरोध उत्पन्न होणे शक्य नसते. आरशात आपले प्रतिबिंब आपल्याला जसे दिसते, तसेच आपण दुसऱ्यांना दिसतो. गिलख्रिस्टने कोराचे वागणे बिंब-प्रतिबिंबात्मक पद्धतीने उचलले होते आणि ती गोष्ट हेलनला उमगत नव्हती. रिचर्डच्या नैसर्गिक मृत्यूचे खुनाच्या संशयात रूपांतर हे कोराच्या खुनासाठी केलेले आवरण असते, आणि त्यानंतर विषारी केक स्वत:च पाठवण्याची व्यवस्था करून आपल्यावरचे लक्ष वळवण्यासाठी केलेली ती युक्ती असते.

अ‍ॅगाथा ख्रिस्ती यांनी इतरांविषयीचे संशय सतत पृष्ठभागावर ठेवलेले आहेत, पण पायरोच्या शोधाचा भाग अंधुक ठेवलेला आहे. त्यामुळे वाचकाला अखेरपर्यंत रहस्य उलगडत नाही. पात्रांच्यापैकी हेलन स्वत: आरशासमोर उभी राहते तेव्हा ही रहस्याची तिजोरी उघडण्यासाठी आवश्यक ते अक्षर तिला सापडते. तोपर्यंत पायरोने अनेक चिटोरे चाळून विविध अक्षरे पाहत, नेमकी अक्षरे जुळवत आणलेली असतात.

कोराची हत्या ही या कादंबरीतली उघडकीस आलेली घटना आणि तिचा खून करणाऱ्या गिलख्रिस्टला अटक हा शेवट - या दोन बिंदूंच्या मध्ये लेखिकेने अनेक कोडी निर्माण केलेली आहेत. अशा प्रकारची कोडी सोडवण्यात आणि अपराधशोधक ही कोडी कशी सोडवतो ते बघण्यात वाचकाला आनंद मिळतो.

काही लोकांना रहस्यकथा म्हणजे कोडे हा सिद्धान्त मान्य नाही. एखादा सगळा समाजच अपराधभावनेने ग्रस्त होतो किंवा अकल्पित अशा भयाच्या जाणिवेने त्रस्त होतो तेव्हा लोक भीती आणि काळजी यातून सुटण्यासाठी रहस्यकथा वाचू लागतात, असे एडमंड विल्सन यांनी म्हटले आहे. ऑडन यांना रहस्यकथेतले निष्पापपण आणि अपराध यांतले द्वंद्व महत्त्वाचे वाटते. रहस्यकथेचा वाचक ही पापाच्या जाणिवेने त्रस्त होणारी व्यक्ती असते, असे त्यांनी म्हटले आहे. रहस्यकथेतील अपराध्याचा शोध घेणे आणि त्याला शिक्षा होणे हे ऐहिक आणि पारलौकिक न्यायव्यवस्थेवरील विश्वास टिकवून ठेवणे होय, हेही वाचकांच्या रहस्यकथाआवडीचे एक कारण सांगता येईल. बहुतेक रहस्यकथाकार न्यायव्यवस्थेची चौकट सांभाळत असतात. ऐहिक न्यायालयातून एखाद्याची सुटका होईल, पण पारलौकिक न्यायालयात अपराध्याला शिक्षा मिळतच असते हे सूत्र बहुतेक रहस्यकथांतून अध्याहृत असते. निष्पाप लोक यातना भोगत असतात, परंतु त्यांना शिक्षा होत नाही; आणि अपराधी शिक्षा चुकवू शकत नाहीत.

रहस्यकथेतून एखादा समाजही प्रतिबिंबित होतो. वाचक अपराध्याशी एकरूप होत नसतात. प्रत्येक खून हा व्यक्तीमधल्या क्रौर्याचे प्रकट चिन्ह असला तरी प्रत्येक खुनामागचे उद्दिष्ट निराळे असते. 'आफ्टर द फ्यूनरल'मधल्या गिलख्रिस्टला मठ्ठ आणि मूर्ख कोरा लॅन्स्कनेटच्या प्रत्येक शब्दाला होय, होय म्हणत राहण्याचा कंटाळा आलेला असतो. तिला चहाचे एक छान दुकान काढायचे असते. चित्रकलेतले काहीही न कळणाऱ्या कोराकडे व्हर्मीरचे एक पेंटिंग चुकून आलेले असते. ते व्हर्मीरचेच आहे हे गिलख्रिस्टला कळलेले असते. परंतु कोराच्या ताब्यातून ते काढून घेणे तिला शक्य नसते. पाच हजार पौंड देऊ शकणारे पेंटिंग मिळवायचे तर कोराचा खून केला पाहिजे. वडिलार्जित इस्टेटीवर जगणारा, वैभवाच्या गोष्टी करणारा एक अकर्मण्य समाज आणि कष्ट करणारा, पण फारशी प्राप्ती नसलेला दुसरा समाज यातले द्वंद्व या कादंबरीत आहे. मात्र हे द्वंद्व चित्रित करणे हा या कादंबरीचा उद्देश नाही. पात्रांच्या वर्णनातून, त्यांच्या उक्ती-कृतींतून ते व्यक्त होत राहते.

वास्तवसदृशता हेही रहस्यकथेचे एक महत्त्वाचे अंग आहे. अर्नाळकरांच्या कादंबऱ्यांतून मुंबई शहरातील विविध रस्त्यांची, भागांची, इमारतींची नावे असतात. ही कथा आपल्या परिचयाच्या प्रदेशातच घडलेली आहे याचा आभास उत्पन्न केलेला असतो. गुंडांची नावे (किंवा टोपणनावे) सर्वसामान्य नावांहून निराळी असतात याचीही खबरदारी अर्नाळकरांनी घेतलेली असते. मध्यमवर्गीय पांढरपेशांचे जग आणि गुन्हेगारांचे जग यातली सीमारेषाही अर्नाळकरांच्या कादंबऱ्यांतून स्पष्ट असते. मुंबईसारखे गुन्हेगारीला पोषक वातावरण असलेले महानगर अर्नाळकरांनी निवडलेले आहे, तर दिवाकर नेमाडे यांनी वर्‍हाडातला ग्रामीण परिसर निवडलेला आहे. महानगरात एखाद्या घटनेचा थांगपत्ता लागणे कठीण असूनही दक्ष पोलीसखाते आणि चाणाक्ष गुप्तहेर यांच्यामुळे गुन्ह्याचा तपास लागतो. लहानशा खेड्यात लहानशीही घटना चव्हाट्यावर येते, गुन्हा कोणी केलेला असेल याचा अंदाज गावकऱ्यांना असतो; परंतु गुन्हेगाराचा शोध कठीण हाऊ शकतो. दिवाकर नेमाडे यांच्या कादंबऱ्यांत वर्‍हाडातली मालगुजारी, व्यापार-व्यवसायाची सर्व सूत्रे हाती असलेली विशिष्ट जमात आणि बाकीची कष्ट करणारी, दरिद्री जनता असे द्वंद्व आढळते.

रहस्यकथेची विविध रूपे आहेत. अपराध-शोधकथा, संदेहकथा, भयकथा, चित्तथरारक कथा वगैरे.

या सगळ्या कथारूपांमध्ये अपराध-शोध हे सामान्य सूत्र असते.

रहस्यकथालेखक एस. एस. वान डाइन यांनी रहस्यकथेविषयीचे काही नियम सांगितले आहेत, ते असे :

१. प्रत्येक रहस्यकथेत एक अपराध-शोधक (डिटेक्टिव्ह) आणि एक गुन्हेगार असला पाहिजे, आणि निदान एक बळी (प्रेत) असला पाहिजे.
२. अपराधी हा व्यावसायिक गुन्हेगार असता कामा नये, तसेच तो अपराध-शोधकही असता कामा नये. व्यक्तिगत कारणांसाठी त्याने खून केलेला असला पाहिजे.
३. रहस्यकथेत प्रेमाला स्थान नाही.
४. गुन्हेगाराला काही प्रतिष्ठा असली पाहिजे. लौकिक जीवनात तो हरकाम्या नोकर अथवा मोलकरीण असता कामा नये. कादंबरीत महत्त्वाच्या पात्रांपैकी एक असावे.
(हा नियम अ‍ॅगाथा ख्रिस्ती आणि नंतरच्या रहस्यकथाकारांनी पाळलेला नाही.)
५. प्रत्येक गोष्ट बुद्धीला पटेल अशा रितीने स्पष्ट केली पाहिजे. फॅन्टसीला रहस्यकथेत जागा नाही.
६. सविस्तर वर्णने अथवा मानसशास्त्रीय विश्लेषणांना जागा नाही.
७. कथांतर्गत गोष्टींच्या माहितीसाठी खालील सूत्र पाळले पाहिजे : 'लेखक : वाचक :: गुन्हेगार : अपराध-शोधक'.

हे नियम रहस्यकथेच्या बहुतेक उपप्रकारांना लागू पडणारे आहेत. जेम्स हॅडली चेसच्या कथांमध्ये अपराध-शोधक हा घटक महत्त्वाचा असूनही कथाकथनाच्या विशिष्ट रितीमुळे त्या चित्तथरारक कथा म्हणून ओळखल्या जातात. चेस यांच्या कथांमधल्या अपराध करणाऱ्या पात्रांना शासन चुकत नाही. पुष्कळदा त्यांनी केलेले कष्ट वाया जातात. बरेच मोठे घबाड मिळालेले आहे असे वाटत असताना शेवटच्या क्षणी सारे व्यर्थ ठरते. निष्पाप लोकांना यातना देणाऱ्या गुन्हेगारांचा अंत अधिकच वाईट होतो असे चेसच्या कथेत दाखवलेले असते. रहस्यकथेचे एक निराळे रूप चेस यांच्या 'नो ऑर्किड्स फॉर मिस ब्लँडिश' या कथेत पाहायला मिळते.

कथानिवेदनात लेखकाने 'आफ्टर द फ्यूनरल'प्रमाणे कोणतेही रहस्य ठेवलेले नाही. बेली, म्हातारा सॅम आणि रायली हे तीन भुरटे चोर मिस ब्लँडिशच्या गळ्यातला अत्यंत मौल्यवान हार पळवण्याचा बेत आखतात. त्यासाठी ते ब्लँडिशला आणि तिच्या भावी नवऱ्याला पळवून नेतात. झटापटीत भावी नवरा ठार होतो, मग ब्लँडिशला पळवण्यावाचून गत्यंतर नसते. वाटेत ग्रिसम गँगच्या एका सदस्याशी गाठ पडते. नंतर ग्रिसम गँग त्या भुरट्या चोरांना मारून ब्लँडिशला आपल्या ताब्यात घेते. तिच्या गळ्यातल्या हाराहूनही अधिक पैसे मिळवण्याची संधी येते. तिच्या कोट्यधीश बापाकडून तिच्या सुटकेच्या बदल्यात खंडणी मागितली जाते. खंडणी मिळते, पण मिस ब्लँडिशची सुटका होत नाही. टोळीची सर्वेसर्वा, मा ग्रिसमचा मुलगा स्लिम, याला ती हवी असते.

मिस ब्लँडिशच्या आणि टोळीच्या हालचालींची माहिती वाचकांना पुरवली जात असली तरी काही पात्रांना ती नसते. पोलिसांना बराच प्रयत्न करूनही तिचा तपास लागलेला नसतो. मग मिस ब्लँडिशचे वडील जॉन ब्लँडिश, डेव्ह फेनर या डिटेक्टिव्हकडे जातात. तिथून ही शोध-कथा सुरू होते.

या कथेत खून आहे, पण तो त्या भुरट्या चोरांना करायचा नसतो. मुलीला पळवले आहे. तिला पळवून न्यावे अशीही त्यांची इच्छा नसते. परंतु ग्रिसम गँगच्या हाती ब्लँडिश लागल्यानंतर क्रौर्याचा आणि हिंसेचा उद्भव होतो. या कादंबरीतल्या पात्रांचे रेखाटन वैशिष्ट्यपूर्ण आहे. मुलीला पळवून घरात कोंडून ठेवणे हे आपल्या (गुन्हेगारी) नीतीला धरून नाही असेही एखाददुसऱ्या पात्राला वाटते, परंतु दहशतीमुळे त्यांना तसे उच्चारता येत नाही.

आधुनिक काळात महानगरांमध्ये टोळ्या उदयाला आल्या. त्यांच्या अपराधकृत्यांचे स्वरूप अधिक विक्राळ आणि व्यापक असते. पुढच्या काळातल्या कादंबऱ्यांत गुन्हेगारांच्या टोळ्या व राजकारणातल्या व्यक्तींचा सहयोग चित्रित होऊ लागला. मारिओ पुझोच्या गॉडफादरने तर अशा नव्या कादंबरीचे रूपच सिद्ध केले. फ्रेडरिक फोरसाइथच्या राजकीय थरारकांमध्येही रहस्यकथेचे मूळ घटक आहेतच. अत्याधुनिक भांडवलशाहीतील बड्या उद्योगपतींच्या जगाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणारे चित्रण सिडने शेल्डन यांच्या कादंबऱ्यांत सापडते. या सर्वच कादंबऱ्यांतल्या जगात कालमानाप्रमाणे बदल झालेला असला, तरी गुंतागुंत आणि उकल हे कथारचनेचे घटक कायमच आहेत. रहस्य, थरारकता, संदेह या सर्वच गोष्टींचे रसायन आजच्या यशस्वी लोकप्रिय लेखनात आढळते. त्याचप्रमाणे अपराध्याला शासन हे सूत्रही सर्वांनी सांभाळलेले असते.

लोकप्रिय लेखनाच्या रहस्यकथात्मक प्रकारात एक? प्राथमिक संकल्पना पुन्हापुन्हा येताना दिसते. मिस ब्लँडिशला जबरीने कोंडून ठेवणाऱ्या आणि कामवासनेची पूर्ती करण्यासाठी तिला ड्रगच्या अमलाखाली ठेवणाऱ्या स्लिमचा शेवट दारुण होतो. हा लौकिक आणि पारलौकिक न्याय असेल, पण निष्पाप अशा मिस ब्लँडिशच्या वाट्याला हे भोग का यावेत, हा प्रश्न शिल्लक राहतो. ड्रगचा अंमल पूर्णपणे नाहीसा झाल्यानंतर मिस ब्लँडिश आपल्या वडिलांकडे जायला नकार देते. आता तिने एकटीनेच स्वत:ला सावरायचे असते. आजपर्यंत, हा प्रसंग येईपर्यंत, असा प्रश्न कधी पडलाच नव्हता; आपण निव्वळ मजेत आयुष्य घालवत होतो, आपल्याला मूल्यजाणीव अशी काही नव्हतीच असे ती सांगते. ती म्हणते, आता ही माझी परीक्षा आहे, पण ती माझी परीक्षा न वाटता हा सापळा आहे असे वाटते; आपण यातून बाहेर पडू शकू की नाही हे आपल्याला ठाऊक नाही. देवावर श्रद्धा असल्याने अशा स्थितीचा स्वीकार माणसे करू शकतात, मजेत वेळ घालवण्याखेरीज माझी कशावरही श्रद्धा नव्हती असे ती म्हणते.

परिस्थितीने निर्माण केलेल्या सापळ्यातून सुटण्यासाठी ब्लँडिश आत्महत्या करते. हाही प्राथमिक न्यायच होय.

रहस्यकथालेखकांची काहीएक जीवनदृष्टी असते. ती सर्वसामान्य माणसाच्या जीवनदृष्टीशी संवाद साधणारी असते. सर्वसामान्यांच्या श्रद्धा, विश्वास, समजुती यांना रहस्यकथालेखक धक्का लावीत नसतो. त्याचप्रमाणे अगदी निषिद्ध गोष्टी तो दाखवीत नसतो. क्वचित त्या दाखवल्या तरी त्यांच्याविषयीची त्याची निषेधाची भूमिका प्रतिबिंबित झालेली असते. या लेखकांनी निर्माण केलेले अपराध-शोधक दुर्गुणी किंवा दुर्व्यसनी नसतात. ते बुद्धिमान, साहसी, संभाषणचतुर आणि न्यायप्रिय असतात; आणि नेहमीच ते अपराधकर्त्याच्या वरच्या पातळीवरचे असतात. अर्नाळकरांनी कल्पिलेली धनंजय, छोटू, झुंझार, काळापहाड, चारूहास, बहिर्जी, कोदंडराव, भद्रंभद्र, भीमसेन इत्यादी अपराध-शोधक पात्रे स्वत:ची वेगवेगळी व्यक्तिमत्त्वे असलेली आहेत. न्यायनिष्ठा हा सगळ्यांचा समान वृत्तिविशेष आहे.

मराठीत या वाङ्मयप्रकाराचा विशेष विकास झालेला नाही. अर्नाळकरांनंतर नारायण धारप, गुरुनाथ नाईक, शरच्चंद्र वाळिंबे, दिवाकर नेमाडे, सुहास शिरवळकर, चिंतामणी लागू इत्यादींचा उल्लेख करणे आवश्यक आहे. मामा वरेरकर आणि उद्धव ज. शेळके या लेखकांव्यतिरिक्त गंभीर साहित्याच्या लेखकाने हा वाङ्मयप्रकार हाताळलेला आहे असे दिसत नाही. मुख्य म्हणजे या वाङ्मयप्रकाराला आवश्यक अशी वाङ्मयीन नव्हे तर व्यावसायिक प्रतिष्ठा लाभलेली नाही. पाश्चात्त्य लेखकांप्रमाणे कष्ट घेऊन, अभ्यास करून रहस्यकथा लिहिली जाण्याचे प्रयत्नही क्वचितच दिसतात.

न्याय या संकल्पनेवर आपला विश्वास आहे तोपर्यंत रहस्यकथा वाचावीशी वाटत राहीलच. त्याचप्रमाणे माणसाला असलेले गूढतेचे आकर्षण, अज्ञात गोष्टी समजून घेण्याची इच्छा, एखाद्या गोष्टीमागच्या कारणांची चिकित्सा करण्याची आवड कायम असेपर्यंत रहस्यकथेत गोडी वाटत राहील. चांगल्या वाङ्मयकृतींप्रमाणे चांगल्या रहस्यकथा ही देखील वाचक-समाजाची गरज असते.

***

पूर्वप्रकाशन : दृश्यकला आणि साहित्य, लोकवाङ्मय गृह, २०१३.

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

प्रतिक्रिया

रहस्यकथेचे दिलेले नियम फार जुने वाटत आहेत - त्याला छेद देणाऱ्या कथा/चित्रपट वगैरे आजकाल प्रचंड बघायला मिळतात.
अर्नाळकरांचं लिखाण वाचलं नाही - त्यामुळे त्या भागाला पास.
मात्र दिवाकर नेमाडे ह्यांचं लिखाण वाचायची खूप उत्सुकता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख अनेक ठिकाणी डळमळीत वाटतो:

(१) तक्त्यात उजवीकडे जी ‘शोकात्मिकेची रचना’ म्हणून दिलेली आहे ती अनेक (ग्रीक) शोकात्मिकांना लागू पडत नाही (उदाहरणार्थ, ‘अॅन्टीगनि’, ‘मदीया’).

(२) लेखकाच्या म्हणण्यानुसार अ‍ॅरिस्टॉटलच्या मते ‘गुंतागुंत आणि उकल हे शोकात्मिकेचे दोन महत्त्वाचे घटक आहेत’. ठीक आहे, पण तसे ते अनेक सुखात्मिकांचेही घटक आहेत (उदाहरणार्थ, ‘लायसिस्ट्राटा’ किंवा ‘अॉर्नीथेस’). तसं पाहिलं तर ते ‘मोरूची मावशी’चेही घटक आहेत. (पण अर्थात हे अॅरिस्टॉटलला ठाऊक असणं शक्य नाही.) रहस्यकथेची चर्चा करताना शोकात्मिका मध्ये आणल्याने विश्लेषणाला मदत न होता उगीच घोळ वाढतो.

(३) ‘लेअसचा खून ईडिपसने केला की अन्य कुणी हा प्रश्न ‘राजा ईडिपस’ मध्ये महत्त्वाचा नाही ‘ हे वाचून मी फारच बुचकळ्यात पडलो. लेअसचा खून दुसऱ्या कुणी केला असं समजलं तर नाटकाचा आत्माच हरवून जाईल.

-----

लेखात दिलेले रहस्यकथेविषयीचे ‘नियम’ कालबाह्य झालेले आहेत ह्या मताशी मी सहमत आहे. पण रेखा इनामदारांच्या लेखाप्रमाणेच ह्याचाही ग्रंथसूची म्हणून उपयोग होण्यासारखा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)