गुलाबी हत्ती पाळणारी स्त्री

#संकल्पना #ट्रॅश #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२२

गुलाबी हत्ती पाळणारी स्त्री

- जुई

ती आदिमस्त्री गुलाबी हत्ती पाळायची.
आभासाच्या त्या जगात प्रकृतीचे नियम विलक्षण होते.
इवल्या इवल्या उंदरांएवढे होते ते गुलाबी हत्ती.
प्रेमाचं प्रतीक जणू. इवलेसे छोटुशे गुलाबी हत्ती.
आभासाच्या चतकोर जगातली चतकोर प्रेमं होती ती.
कधी पूर्णत्वास जात कधी वरवर राहत.
प्रेमाच्या लाटा येऊन विरून जातात.
लोकांनी लव्ह लव्ह लव्ह रिॲक्ट करून गुलाबी लव्हाळी फार फार माजायची. स्वस्त आणि मस्त अशी ही पौष्टिक(?) गुलाबी लव्हाळी होती.
ही लव्हाळी खाऊन खाऊन गुलाबी हत्ती ही प्राणीजात निर्माण झाली. कारण अन्न निर्माण झालं की सोबत भक्षक निर्माण होतातच. महान आध्यात्मिक विचार आहे हा. असा विचार करूनच नियती ही सोय करत असेल. नियतीला असले विचार कोण पुरवत असेल हाही विचार करण्यासारखा विचार आहे.

आदिमस्त्रीने गुलाबी हत्ती पाळायचं ठरवलं कारण दुसरं काही ती करूच शकत नव्हती.
तिचं भागधेय, कर्मध्येय तेच ठरलं होतं. तिलाही वाटत होतं की केशरी गायी पाळाव्यात किंवा हिरव्या बकऱ्या पाळाव्यात. पण या जगात काही गोष्टी तर ठरलेल्या असतात.
आदिमस्त्रीच्या नशिबी गुलाबी हत्ती आले...
ती फार फार फार प्रेमळ होती म्हणून कदाचित.
तिला प्रेमाची कदर होती म्हणून कदाचित. आदिमस्त्रीला प्रेमाचा अपमान चुकूनही करता येत नसे.
चहूकडे पसरले पाणी पिण्यास थेंबही नाही अशी परिस्थिती प्रेमाच्या बाबतीत माणसाची झालीय हे तिला कळत होतं.

गुलाबी हत्ती पाळणं तसं प्रेमळ काम होतं पण सोपं काम नव्हतं. सतत प्रेमाचा आदर करत त्याची ही इवली प्रतीकं जपत राहणं हे सोपं नसतं.
गुलाबी हत्ती गुलाबी लव्हाळी चरत राहत, बागडत राहत, कधी उदास होऊन अश्रू ढाळत, कधी अवखळपणा करत इकडे तिकडे बागडत राहत.
आदिमस्त्रीला दुसरं काही आयुष्य उरलं नाही.
हळूहळू गुलाबी होऊन गेली तिची नजर नजर, तिचं अस्तित्वही.
इतका गुलाबीपणा कंटाळवाणा होतो एका मर्यादेनंतर.
गुलाबी हा मूळ रंग नाहीये.

हिरवाकंच हवासा वाटतो... पेशीपेशीतून. माणूस जणू एकेकाळी होता कुणी झाड.
चेतवणारा लाल ओटीपोटातून वाहतो, बोलावतो. हा तांबडा आवाहन करतो आणि आव्हान देतो पुरूषतत्त्वाला. जगतो, जगवतो आणि जीवावर उठतो.
स्वच्छ,चमकता, आशेचा, उन्हाचा पिवळा असतो. सगळं काही स्पष्ट दाखवणारा. अतीच लखलखीत पिवळा.
विरागी केसरीया गहनगूढ हाका मारतो अज्ञाताच्या.
सगळ्यांच्या मनातूनच वाहणारा निळा. सहज पण सोपा नाही. अंतहीन नील आभाळासारखा.
गूढ श्रीमंत जांभळा, लवलवता ग्रेसफुल, सौंदर्याचा आदर करवून घेणाऱ्या स्त्रीसारखा.
गूढ सर्वभक्षी काळा. शांत रात्रीचा. समाप्तीचा. अंताचा गर्द काळा.
अगणित रंग आहेत.
...

आदिमस्त्रीने हिरवा मळवट भरला आणि ती तिच्या नकळत हिरव्या राव्याची साधना करू लागली. राव्याला हिरव्याकंच मिरच्या आणि लालचुटुक मिरच्या वाहू लागली. स्वतःही याच मिरच्या खाऊन जगू लागली. मिरच्या खाऊन राहणं सोपं नव्हतं. मिरची स्त्रीलिंगी असते. सगळ्या तनाला मनाला झिणझिण्या आणणारी. बधिर करून टाकणारी चविष्टता. पण विज्ञान म्हणे तिखट ही चवच नसते; नुसतं एक सेन्सेशन, एक आग, एक जलन. विज्ञानाला तरी असल्या मिरच्या कोण पुरवत असेल.

रंग रंग रंगांच्या या आलम दुनियेत तिला आता हिरवा खेचत होता.
उत्पत्तीचा हिरवा रावा.

स्वतःचं स्त्रीपण पणाला लावून आदिमस्त्रीला हवं होतं एक सोनेरी आम्रफळ. आदिमस्त्री अपूर्ण वगैरे अजिबात नव्हती. खरंतर आदिमायेगत ती स्वयंभू, स्वयंपूर्ण होती.

पण आदिमायेलाही एकट्याने कंटाळा येतो हे देखील आदिम सत्यच होतं.
गुलाबी हत्तींची संगत कितीशी पुरणार.
सोनेरी आम्रफल आदिमस्त्रीला अत्यंत समाधान पुरवणारं आहे... आदिमस्त्रीतलं अस्तित्व जागवणारं सोनेरी फळ आहे ते.

रावा... हा काही पोपट साधा नाही. पोपट झाला या अर्थाने वापरतात तो तर अजिबातच नाही.
शुकसारिका कथांमध्ये शुक सदोदित सांगतो स्त्री जातीच्या दुष्टपणाचे किस्से. सारिका सतत त्याला विरोध करत राहते.
शुक आद्य सनातनी असावा.
सारिका आद्य फेमिनिष्ठ असावी.
दोघं करीत राहतात संघर्ष... एकच आदिम घर्षण मात्र दोघांना हवंच असतं... त्यावेळेसच फक्त ते वादविवाद आवरतात. तनाची भूक मनावर काबीज होते की मनाची शरीरावर हे दोघांनाही कळत नाही.
शुक, सारिका एक निरंतर वाद जगाच्या अंतापर्यंत घालत राहणार आहेत.

स्त्रीमध्ये असतं पुरूषतत्त्व आणि पुरूषात असतं स्त्रीतत्त्व याचं भान दोघांना येणार नाही. माणसांना आलं नाही तर, ते तर शुक आणि सारिका आहेत.

एकाक्षणी शुक सारिका एकरूप होऊन महाशुकाचं हिरवंगार विशाल रूप तयार होतंय. हे अद्वैत एक अद्भुत आहे. परिणामी एक सोनेरी आम्रफळ येऊन पडणारे. कुठल्याही एकरूपतेचं फळ काहीनाकाही स्वरूपात निसर्ग देतोच देतो. हे आम्रफळ तोडणार का स्त्री पुरूष वाद, भेद आणि जोडेल का एक पूल. असं निसर्गाला वाटत असेल. निसर्गालाही काहीही वाटत असतं.

महाशुकाला आदिमस्त्रीच्या हाकेला ओ द्यावीच लागेल.
सोनेरी रंगाची खरी गरज माणसालाच.
संस्कृती वसवायची असते त्याला सतत.
कितीही आभासात राहिला तरी सत्य सोडून चालत नसतं.
सतत प्रगती. सतत स्वतःतलं जनावर दाबणं.
सततची वंशसातत्याची सोनेरी आस जपणं.
तहान भूक अपरिमित... वखवखच ती... न शमणारी.

महाशुक आदिमस्त्रीला सोनेरी फळ देतो.
आदिमस्त्रीचा हिरवा मळवट सार्थक ठरतो.
आदिमस्त्रीचा मिरच्यांचा नैवेद्य पावतो.

आदिमस्त्री सोनेरी आम्रफल घेतेही. पण पुढे या फळातून यातून कोणती झाडं येणार हे खुद्द नियतीपण जाणत नाही . सोनं बेभरवशी धातू आहे. जे खूप चमकतं आणि इतकं मऊ आहे ते कुणीही बेभरवशी असतं. कधीही विकलं जाणारं. ना विज्ञान जाणत ना नियती जाणते ना निसर्ग जाणतो असंही काही काही आहेच या जगात.

गुलाबी हत्ती मात्र बागडत आहेत. शांतपणे या अशांत अशा माहौलात.
लव्ह लव्ह लव्ह लव्हाळी चरत जगणारे गुलाबी हत्ती आणि गुलाबी हत्ती पाळणारी आदिमस्त्री, आणि एक महाशुक आणि एक सोनेरी आम्रफळ. हे सगळे एकाच जगाचा भाग आहेत.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

…कधीपासून होतंय हे असं?

 • ‌मार्मिक4
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

कारण अन्न निर्माण झालं की सोबत भक्ष्य निर्माण होतंच
या ठिकाणी लेखिकेला भक्षक म्हणायचे असावे बहुतेक! दुरुस्त करता येत असेल तर करावे.
बाकीच्या लेखावरील प्रतिक्रिया लेख समजल्यानंतर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इवल्या इवल्या उंदरांएवढे होते ते गुलाबी हत्ती.

आमच्या जमातीत आकाराने इतके लहान कोणी नसते. आणि रंगही गुलाबी नसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इवल्या इवल्या उंदरांएवढे होते ते गुलाबी हत्ती.
प्रेमाचं प्रतीक जणू. इवलेसे छोटुशे गुलाबी हत्ती.
आभासाच्या चतकोर जगातली चतकोर प्रेमं होती ती.

**
मिरची स्त्रीलिंगी असते. सगळ्या तनाला मनाला झिणझिण्या आणणारी. बधिर करून टाकणारी चविष्टता. पण विज्ञान म्हणे तिखट ही चवच नसते; नुसतं एक सेन्सेशन, एक आग, एक जलन. विज्ञानाला तरी असल्या मिरच्या कोण पुरवत असेल.

***
शुकसारिका कथांमध्ये शुक सदोदित सांगतो स्त्री जातीच्या दुष्टपणाचे किस्से. सारिका सतत त्याला विरोध करत राहते.
शुक आद्य सनातनी असावा.
सारिका आद्य फेमिनिष्ठ असावी.

ही वाक्यं मला फार आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोणीसे म्हटले आहे… A politician’s speech is like an ox’s head: A point here, a point there, and a lot of bull in between.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

केशरी गायी पाळाव्यात किंवा हिरव्या बकऱ्या पाळाव्यात.

१. केशरी गाय == प्रो हिंदू == आदित्यनाथ
२. हिरवी बकरी == प्रो मुसलमान == गांधीजी
असा काही रूपकात्मक संबंध आहे का?

१. धागाभर पसरलेला गुलाबी रंग
२. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचा सध्या राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न सुरु आहे (त्यांच्या पक्षाचा झेंडा गुलाबी आहे).
या दोन्हींचा काही रूपकात्मक संबंध आहे का?

१. शीर्षक वगळता मूळ धाग्यात तब्बल १८ वेळा गुलाबी असा शब्द आला आहे.
२. भारतात १८ वर्षे झाली की काफिर स्त्रियांना लग्न करता येते.
या दोन्हींचा काही रूपकात्मक संबंध आहे का?

१. ती आदिमस्त्री गुलाबी हत्ती पाळायची.
२. मागच्या ३०-४० वर्षांपासून, हत्ती या चिन्हाशी संबंधित एक भारतीय राजकारणी स्त्री आहे.
या दोन्हींचा काही रूपकात्मक संबंध आहे का?

मुळात धाग्यात काही रूपक आहे का?

निळ्या रंगाचा केवळ पुसटसाच उल्लेख करून कुणाचा तरी अवमान केलेला आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ1

लेख वरकरणी अभ्यासपूर्ण वाटला, तरीदेखील त्यातले काही निष्कर्ष शास्त्रकाट्याच्या कसोटीवर म्हणावे तसे उतरत नाही हे वाचकांच्या सहज ध्यानात येईल.

> प्रेमाचं प्रतीक जणू. इवलेसे छोटुशे गुलाबी हत्ती.

‘गुलाबी हत्ती’ प्रेमाचं प्रतीक आहेत हे विधान वस्तुनिष्ठ नाही. (त्यातदेखील ‘जणू’ ह्या संदिग्ध भाषाशास्त्रीय प्रयोगामुळे गोंधळात भरच पडते.) अशा प्रकारची प्रतीकं व्यक्तिसापेक्ष असतात, किंबहुना एखाद्या विवक्षित संकेतचिन्हव्यवस्थेपलिकडे त्यांना निश्चित आधार नसतो हे फ्रान्सिस बेकनने Novum Organum मध्ये ठामपणे सिद्ध केलेलं आहे. (आपल्या ह्या निष्कर्षाला वैचारिक वर्तुळाबाहेर प्रसिद्धी मिळावी म्हणूनच ‘जणू’ त्याने गनिमी कावा वापरून एका वेगळ्या स्वरूपात ते ज्युलिएटच्या तोंडी घातलं आहे. ती म्हणते: ‘..that which we call a rose, by any other word would smell as sweet.’ पण ह्या उक्तीतली अनावश्यक नाट्यमयता जरी बाजूला ठेवली तरीदेखील गुलाबाचा (आणि पर्यायाने गुलाबीपणाचा) प्रेमाशी जोडला जाणारा संबंध निव्वळ सांकेतिक आहे हा मुद्दा Baconian theory स्वीकारण्याइतपत बौद्धिक धाडस नसणाऱ्या गतानुगतिक वाचकालाही सहज मान्य व्हावा. अर्थात निव्वळ व्यक्तिसापेक्षतेला माझा आक्षेप नव्हता आणि नाही. सामान्य व्यक्तीला जशी वैयक्तिक मतं असू शकतात तशी ती संशोधकांनाही असू शकतात हे मला पूर्णपणे मान्य आहे. परंतु तर्काच्या कसोटीवर उतरणारे निष्कर्ष आणि निव्वळ वैयक्तिक मतं (मग ती प्रथमदर्शनी कितीही आकर्षक असोत) यांची सरमिसळ होणार नाही, इतपत काळजी संशोधकाने घ्यायलाच हवी. One could almost say that a pink elephant would look no more rosy through rose-tinted glasses.

> मिरची स्त्रीलिंगी असते.

हे विधान शब्दश: खरं असलं तरी फसवं आहे. ‘आदिम’स्त्रीच्या भाषेत (म्हणजे लेखाचा एकूण संदर्भ पाहता प्रोटो इंडो-युरोपियन भाषेत) मिरची पुल्लिंगी होती. (चीनमधल्या तारीम भागात पूर्वी बोलल्या जाणाऱ्या परंतु आता नामशेष झालेल्या तखारियन-ए ह्या भाषेच्या व्याकरणात तशा स्पष्ट खुणा आढळतात.) बेरिंग स्ट्रेटमार्गे जेव्हा रशियातून उत्तर अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर मानवी स्थलांतर झालं, तेव्हा तत्कालीन समाजाच्या पर्यावरणात आणि त्या अनुषंगाने भाषेतही मूलभूत बदल होऊन अनेक शब्दांची लिंगं पालटली. (असे अनेक दाखले देता येतील. उदाहरणार्थ, फ्रेंचमधल्या ‘rive’ ह्या स्त्रीलिंगी शब्दाचा किंचित अर्थबदलानंतर स्पॅनिशमध्ये पुल्लिंगी ‘rio’ होतो.) ‘मिरची’ हा शब्द स्त्रीलिंगी रूप घेणं हे याचंच उदाहरण आहे. महाराष्ट्रीय खाद्यजीवनात जरी मिरची उत्तर अमेरिकेतून आली असली तरीदेखील मराठी भाषेचं मूळ तांत्रिकदृष्ट्या ‘इंडिक’ असल्यामुळे तिचं स्त्रीलिंग तसंच्या तसं स्वीकारणं ही व्याकरणदृष्ट्या चूक ठरते. लेखिकेने यापुढे दिलेला शुकसारिका दृष्टान्त जर तिनेच डोळसपणे निरखून पाहिला असता तर हिरव्या मिरचीचा रंग धारण करणारा शुक (म्हणजेच पोपट) पुल्लिंगी आहे हे तिच्या आपसूकच लक्षात आलं असतं. ह्या चुकीमुळे लेखिकेने मांडलेला स्त्रीवादी तर्कही आपोआपच रद्दबातल होतो. अर्थात ‘एकच आदिम घर्षण मात्र दोघांना हवंच असतं’ हा अंतिम निष्कर्ष मुळातून नाकारायला हवा असा याचा अर्थ नसून तो दुसऱ्या कुठल्यातरी जास्त भक्कम तात्विक पायावर उभा करावा लागेल इतकंच आपल्याला म्हणता येईल. (आणि एकूण पाहता हा निष्कर्ष अनुभवसिद्ध असल्यामुळे व्यावहारिक सोय म्हणून का होईना तात्पुरता स्वीकारावा लागेलच.) मात्र सई केसकरांसारख्या व्युत्पन्न विदुषीचीदेखील ह्या मुद्द्यावरून दिशाभूल व्हावी ही खेदाची बाब मानावी लागेल. Quandoque dormitat Homerus.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी3
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

>>मात्र सई केसकरांसारख्या व्युत्पन्न विदुषीचीदेखील ह्या मुद्द्यावरून दिशाभूल व्हावी ही खेदाची बाब मानावी लागेल. Quandoque dormitat Homerus.

Isn't it
aliquando bonus dormitat Homerus?

Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

‘Aliquando’ आणि ‘Quandoque’ ह्या दोन्हीचा अर्थ ‘काही वेळा’ असा होतो. आणि ‘bonus’ (शब्दश: अर्थ ‘चांगला’ - पण इथे अपेक्षित अर्थ ‘चतुर’) हा शब्द गाळला तरी चालतो. आपण स्त्री आहात, तेव्हा पुल्लिंगी विशेषणामुळे उगीच अधिक्षेप झाला तर काय घ्या..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

मला लिखाणातल्या प्रतिमा आवडल्या (गुलाबी हत्ती आणि पाहिले काही परिच्छेद) सुरुवात थोडी समजतेय असंही वाटलं पण पुढे पुढे संगती लागेना.

आदिम स्त्री-(सिंगल रेडी टू मिंगल?)
गुलाबी हत्ती - प्रेम, पण जोडीदाराशिवाय?

पण मग हिरवा रंग कसला आहे? आम्रफळ काय आहे?
की त्या स्त्रीला जोडीदाराची आस आहे आणि तो हा हिरवा रंग?
आम्रफळ म्हणजे बहुधा संतती - जी त्या स्त्रीची आणि पुरुषाची -खरं तर
सजीव अशा सगळ्यांचीच एक bio coded नियती आहे, ज्याची आस ही आतून बहुतांश सजीवांना आपोआप असतेच.

-------------------
किंवा मग पहिला परिच्छेद हा सोशल मीडियावरच्या वावराबद्दल आहे असं मानलं तर गुलाबी हत्तीची संगती लागते पण पुढे काही कळेना.

(माफ करा, मी जे काही मला उमगलं ते लिहिलं आहे कदाचित ते भयानक बाळबोध असेल.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुळात या सगळ्या प्रकारास काही अर्थ आहे, या गृहीतकास आधार काय?

मुळात नसलेला अर्थ अट्टाहासाने ओढूनताणून लादण्यात नक्की काय हशील?

भाषा मराठीसदृश वाटतेय ना? मग पुरे झाले! त्याउपर त्यातून काही अर्थनिष्पत्ती झालीच पाहिजे, हा अनाठायी आग्रह कशापायी?

(‘योड्डमुट्टी जंगल कुडमुडकुडे वाघा गुडमुडगुडे’ या ध्वनिसमुच्चयास वस्तुतः काही अर्थ आहे काय? परंतु त्यातून कानडी वाक्य फेकल्याचा आभास निर्माण करता येतोच ना?

किंबहुना, मी तर म्हणेन, की सध्याचा प्रकार हा ‘योड्डमुट्टी’पेक्षा एक पायरी वरचढ आहे. बोले तो, ‘योड्डमुट्टी’ प्रकारातून कानडी वाक्य फेकल्याचा आभास हा (‘कानडी’ची मनोमन हेटाळणी करणाऱ्या) मराठी कानांस बहुधा होईलही. परंतु, एखाद्या कन्नडभाषकाच्या कानांस तो तसा होईलच, हे शंकास्पद आहे. (खरेखोटे काय ते एखादा/दी कानस कन्नडभाषकच सांगू शकेल. चूभूद्याघ्या.) सध्याचा प्रकार मात्र खुद्द मराठीभाषकाच्याच ठायी मराठीचा आभास निर्माण करण्यात सफळ होतो. (इतका, की, ‘तिच्यामारी, यातून आपल्यालाच काही अर्थबोध होत नाहीये’ असा न्यूनगंड निर्माण करतो. आणि मग याला नाही नाही ते नसलेले अर्थ लावण्याची अशी अहमहमिका सुरू होते! अरे, पण लेको, खुद्द लेखिकेलाच यातून काही अर्थबोध होतोय का, किंबहुना, लेखिकेच्या मनात तरी यामागे कोणता(ही) अर्थ अपेक्षित होता का, याची साधी चौकशी केली आहेत काय कधी?)

एकंदरीत, सध्याच्या प्रकाराचे वर्णन आमच्या वुड्डहौससाहेबाच्या(च) भाषेत येणेप्रमाणे करता यावे: It’s like Shakespeare. Sounds great, but does not mean a thing.

असो. आजचा गोंधळ बरा होता. चालायचेच.)

——————————

साभार: पु.ल.; ‘मी आणि माझा शत्रुपक्ष’ (संग्रह: ‘हसवणूक’)मधून.

होय, ‘कानडी’च! ‘कन्नड’ नव्हे. या छद्मभाषेस२अ ‘कन्नड’ असे संबोधून कन्नडचा अवमान निदान मी तरी करणार नाही.

२अ बोले तो, ‘योड्डमुट्टी’ इ.इ. ही छद्मभाषा; कन्नड ही नव्हे. कन्नड ही वास्तवभाषा आहे, छद्मभाषा नाही!

‘Across the Pale Parabola of Joy’ची आठवण या निमित्ताने होते. पी.जी. वुडहाउसचे Leave it to Psmith वाचलेल्यांना याचा संदर्भ कदाचित लागू शकेल.

आमची इंग्रजी साहित्यवाचनाची गाडी पी.जी. वुडहाउसच्या स्टेशनापलिकडे फारशी गेली नाही, हे कबूल करणे येथे प्राप्त होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>याची साधी चौकशी केली आहेत काय कधी?)

अशी कशी करणार चौकशी? समजा केली आणि लेखिका म्हणाल्या की, "इतकं साधं, स्पष्ट पारदर्शक कळलं नाही?" तर काय?
आणि अशावेळी आजूबाजूचे लोकही त्यांना कळलं आहे असा अभिनय करून आपल्याला तुच्छ लेखतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकदम खरं.
पण "स्वतःच्या अज्ञानाविषयी निर्लज्जपणा" हा गुण अंगी विकसित करावा लागतो, आणि कुतूहल स्वस्थ बसू देत नाही.
किती वेळ उगाच कळलं नाही तरी "छान छान " म्हणायचं?
त्यापेक्षा सरळ कबूल करावं की नाही आपल्याला घंटा समजलं- समजावून संगणार का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुळात या सगळ्या प्रकारास काही अर्थ आहे, या गृहीतकास आधार काय?

विश्वास न.बा, विश्वास! लेखिका ही unreliable narrator नाही असा एक उगा विश्वास. Benefit of डौट द्यायला पाहिजे.

(उत्तम शंका!
हा लेख "संकल्पनाविषयक" का आहे - हा खरं तर माझा मूळ प्रश्न होता. म्हणजे हा कचरा आहे का? कचऱ्याबद्दल काही आहे का?

काहीसं अमूर्त लिहून आणि ढोबळपणे काहीतरी जबरी लिहिलंय असा आव आणून लेखिकेने आपल्याला बनवलं आहे - हीसुद्धा शक्यता आहे, जे खरं असेल तर माझे ह्या लिखाणाला 5 तारे. Biggrin )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पयला पयला इंस्टाग्राम वर लाईक साठी जगणे अशी कथा आहे का असे वाटले, ते गुलाबी लव्हाळी आणि गुलाबी हत्ती चालू होते तोपरेंत. मग रावा, मिरची आली आणि आपल्याला काय कळेना ह्याचा साक्षात्कार झाला.

मग ते इंस्टा वैगेरे प्रिकनसेप्शन सोडून पुन्हा पयल्यापासन सुरु केली. जरा कायतरी समजतंय असं वाटलं तर पुन्हा गंडलं. असो, प्रयत्न चालू राहील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छोटुश्श्या गुलाबी हत्तींची पिल्ले कित्ती गोड असतील नाही? ती पण तिथेच बागडत असणार

त्या आदिम स्त्रीला काही तरी नाव असायला पाहिजे होते. ... "आद्या" कसे आहे?

सामान्य ज्ञानानूसार (सोनेरी असले तरी) आम्रफळापासून आम्रवृक्षच उगवायला पाहिजेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

छोटुश्श्या गुलाबी हत्तींची पिल्ले कित्ती गोड असतील नाही?

आमची जमातच गोंडस आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0