न्या. धनंजय चंद्रचूड होणार देशाचे ५० वे सरन्यायाधीश

सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्या. डॉ. धनंजय यशवंत चंद्रचूड भारताचे ५० वे सरन्यायाधीश होतील, हे मंगळवारी औपचारिकपणे स्पष्ट झाले. विद्यमान सरन्यायाधीश न्या. उदय उमेश लळित येत्या ७ नोव्हेंबर रोजी निवृत्त झाल्यानंतर न्या. चंद्रचूड न्यायसंस्थेतील या सर्वोच्च पदाची सूत्रे स्वीकारतील. न्या. चंद्रचूड यांचा सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळ दोन वर्षे दोन दिवसांचा असेल. १० नोव्हेंबर, २०२४ रोजी वयाला ६५ वर्षे पूर्ण होतील तेव्हा ते त्या पदावरून निवृत्त होतील. सरन्यायाधीश म्हणून न्या. चंद्रटूड यांचा कार्यकाळ अलिकडच्या काळातील सर्वाधिक असेल.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील पाच ज्येष्ठ न्यायाधीशांचे ‘कॉलेजियम’ करते. परंतु सरन्यायाधीशांची निवड अशी न करता मावळत्या सरन्यायाधीशांनी आपला उत्तराधिकारी निवडण्याची प्रथा रुढ आहे. यासाठी ज्येष्ठता पाळण्याचीही परंपरा आहे. त्यानुसार विद्यमान सरन्यायाधीश न्या. लळित यांनी मंगळवारी न्या. चंद्रचूड यांचे नाव आपले उत्तराधिकारी म्हणून केंद्र सरकारला कळविले. त्यानुसार सुयोग्य वेळी राष्ट्रपतींकडून न्या. चंद्रचूड यांची औपचारिकपणे नियुक्ती केली जाईल.
वडील व मुलाने सरन्यायाधीश होण्याचा विरळा योगही न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या नियुक्तीने ३० वर्षांनी पुन्हा साधला जाईल. त्यांचे दिवंगत वडील न्या. यशवंत विष्णू चंद्रचूड २ फेब्रुवारी, १९७८ ते ११ जुलै १९८५ अशी सुमारे साडेसात वर्षे देशाचे १६ वे सरन्यायाधीश होते. हिरालाल कणिया व मधुकर कणिया या पिता-पुत्राच्या आणखी एका जोडीनेही यापूर्वी असेच सरन्यायाधीशपद भूषविले होते. न्या हिरालाल कणिया २६ जानेवारी, १९५० ते ६ नोव्हेंबर, १९५१ या काळात भारताचे पहिले सरन्यायाधीश होते. त्यांचे चिरंजीव न्या. मधुकर कणिया यांनी १३ डिसेंबर, १९९१ ते १७ नोव्हेंबर, १९९२ या काळात सरन्यायाधीशपद भूषविले होते.
न्या. चंद्रचूड हे सरन्यायाधीश पद भूषविणारे पाचवे मराठी न्यायाधीश असतील. विद्यमान सरन्यायाधीश न्या. लळित, न्या. प्रल्हाद भालचंद्र गजेंद्रगडकर, न्या. यशवंत विष्णू चंद्रचूड व न्या. शरद अरविंद बोबडे हे याआधीचे चार मराठी सरन्यायाधीश होत. याखेरीज न्या. मधुकर कणिया, न्या. सॅम फिरोज भरुचा व न्या. सरोश कापडिया हे मराठी नसलेले परंतु महाराष्ट्रातील न्यायाधीश सरन्यायाधीस झाले होते.
अत्यंत अभ्यासू व बुद्धिवान असलेल्या न्या. चंद्रचूड दिल्लीच्यासेंट् स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रातील बी.ए. (आॅनर्स) ही पदवी व दिल्ली विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयातून ‘एलएल. बी.’ पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील हारवर्ड या प्रतिष्ठित विद्यापीठातून ‘एलएल. एम.’ व कायद्यातील ‘डॉक्टरेट’ संपादन केली. सुमारे १८ वर्षे मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात वकिली केल्यानंतर न्या. चंद्रचूड यांना सन १९९८ मध्ये पश्चिम भारतासाठीचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल नेमले गेले. त्यानंतर दोन वर्षांनी २९ मार्च, २००० रोजी ते मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश झाले. त्या पदावर १३ वर्षे राहिल्यानंतर त्यांची ३१ ऑक्टोबर, २०१३ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. त्यानंतर तीन वर्षांनी १३ मे, २०१६ रोजी न्या. चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीस झाले. अशा प्रकारे न्या. चंद्रचूड यांना १८ वर्षे वकिलीची व २२ वर्षे न्यायाधीशपदाची पाश्वभूमी आहे.
न्या. चंद्रचूड हे त्यांच्या उदारमतवादी व पुरोगामी विचारांच्या निकालांसाठी ओळखले जातात. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे व मानवी हक्कांचे ते खंदे पुरस्कर्ते आहेत. अविवाहित महिलेलाही गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यापर्यंत गर्भपात करून घेण्याचा हक्क बहाल करणारा निकाल हा त्यांचा त्या प्रकारचा ताजा निकाल आहे. याखेरीज दोन प्रौढ व्यक्तिंमधील समलिंगी लैंगिक संबंध हा गुन्हा रद्द करणे, ‘प्रायव्हसी’ हाही व्यक्तीच्या जगण्याच्या मूलभूत हक्काचा अविभाज्य भाग मानणे व विवाहित स्त्रीने विवाहबाह्य संबंध ठेवणे हा गुन्हा रद्द करणे हे महत्वाचे निकाल देणार्‍या घटनापीठांवरही न्या. चंद्रचूड एक न्यायाधीश होते. केरळमधील शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश खुला करणारा बहुमताचा निकालही न्या. चंद्रचूड यांनीच दिला होता. अयोध्येतील बाबरी मशिद- राम मंदिर वादात संपूर्ण वादग्रस्त जागा हिंदूना राम मंदिर बांधण्यासाठी देण्याचा निकाल देणाºया पाच न्यायाधीशांच्या पीठातही न्या. चंद्रचूड होते. ते निकालपत्र लिहिणाºया न्यायाधीशाचे त्यावर नाव नव्हते. परंतु त्याची धाटणी व भाषा यावरून ते निकालपत्र न्या. चंद्रचूड यांनीच लिहिल्याची माहितगारांना खात्री झाली होती.
--------------------------
तिघांची एकाच दिवशी नियुक्ती
त्यावेळी वयाच्या चाळीशीत असलेल्या न्या. शरद अरविंद बोबडे न्या. अजय माणिकराव खानविलकर, न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड या तिघांची २९ मार्च, २००० या एकाच दिवशी मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र त्यानंतर या तिघांच्या करियरमधील प्रगती निरनिराळी झाली. सर्वप्रथम न्या. बोबडे यांची १८ ऑक्टोबर, २०१२ रोजी व न्या. खानविलकर यांची ४ एप्रिल, २०१३ रोजी अनुक्रमे मध्य प्रदेश व हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. न्या. चंद्रचूड यांना मात्र अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपद त्यानंतर सहा महिन्यांनी ऑक्टोबर, २०१३ मध्ये मिळाले. याचा परिणाम या तिघांच्या सर्वोच्च न्यायालयावकील नियुक्तीवरही पडला. न्या. बोबडे १२ एप्रिल, २०१३ रोजी व न्या. खानविलकर आणि न्या. चंद्रचूड १३ मे, २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाला. परिणामी न्या. बोबडे १८ नोव्हेंबर, २०१९ रोजी सरन्यायाधीश होऊन २३ एप्रिल, २०२१ रोजी निवृत्त झाले. त्यानंतर दीड वर्षाने आता न्या. चंद्रचूड सरन्यायाधीश होत आहेत. दरम्यान, न्या. खानविकलकर वयाची ६५ वर्षे पूर्ण झाल्याने यंदाच्या २२ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

मध्यंतरी ऐकले होते की काही न्यायाधिशांच्या पुढच्या चार पिढ्यांचे व्यवस्थित प्लॅनिंग आहे. हे साहेब पण त्यातलेच वाटतात. यांचे सुपुत्रदेखील अजून x वर्षांनी सरन्यायाधिश होतील अशी बरोब्बर करियर आखणी केलेली आहे. गमंत आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

हे खूप महत्त्वाचे पद आहे.लोकांचे स्वतंत्र,लोकांचे अधिकार अबाधित राहण्याचे,राज्य घटनेने लोकांना दिलेले अधिकार अबाधित राखण्याचे .
अत्यंत महत्वाचे काम सर्वोच्च न्यायालय करते.
घटनात्मक मार्गाने,शांती chya मार्गाने न्याय देणारा तो एकमेव कायदेशीर मार्ग आहे.
नाही तर न्याय मिळवण्यासाठी रक्त सांडले जाते
आणि हा मार्ग खडतर असतो हिंसाचार करून न्याय मिळवावा लागतो.
प्रचंड त्याग करावा लागतो.
अशा ह्या महत्वाच्या पदावर जो व्यक्ती असेल त्याची नियुक्ती सत्ताधारी लोकांनी करावी हे साफ चुकीचं ठरले असते आणि त्याचे गंभीर परिणाम पण आज पर्यंत दिसले असते.
Collegem पद्धतीनी ह्या पदावर नियुक्ती होणे हे अतिशय योग्य आहे.
घराणे शही चा धोका आहे
पण लोकांचे अधिकार च हिरावून घेण्याचा गंभीर
धोका त्या पद्धती मध्ये नाही.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0