होऊनही न झालेल्या लग्नाचे गूढ!

पुण्यातील एका इसमाने २७ वर्षांपूर्वी केलेल्या परंतू कायद्याच्या दृष्टीने सिद्ध होवू न शकलेल्या पहिल्या लग्नाचे गूढ कथानक आज मी सांगणार आहे. पहिल्या लग्नाची पत्नी हयात असूनही आणि तिला रीतसर घटस्फोट न देता आणखी एका स्त्रीशी फसवणुकीने विवाह करणे हे भारतीय दंड विधांनाच्या (Indian Penal Code) ४९४ व ४९५ या कलमान्वये गुन्हे आहेत. त्यासाठी अनुक्रमे सात आणि १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा आहे. या गुन्ह्यांसाठी या इसमाविरुद्ध दाखल केल्या गेलेल्या खटल्याने या कथानकाची सुरुवात होते आणि अपिलात हायकोर्टाने त्याला निर्दोष सोडण्यात सांगता होते.
या कथानकास गूढ म्हणण्याचे कारण असे की, त्यात दोन समांतर शक्यता तुल्यबळ संभाव्यतेने दिसतात. एक म्हणजे, दुसरे लग्न करण्याआधी या इसमाचे खरंच पहिले लग्न झाले होते. पण त्याच्या त्या पहिल्या बायकोने कथानकातून अर्ध्यातूनच ‘एक्झिट’ घेतल्याने ते पहिले लग़्न झाल्याचे कोर्टात सिद्ध होऊ शकले नाही. दुसरी शक्यता अशी: झालेल्या लग्नात दुसर्‍याच दिवशी बिब्बा घालण्यासाठी पहिल्या लग्नाचे कुभांड रचले गेले व पहिल्या पत्नीच्या रूपाने एक ‘तोतया’ उभा केला गेला. खरे खोटे काहीही असो. पण लग्नासारखे पवित्र व विश्वासाचे नाते जोडताना लोक कपटाने कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतात, हेही यावरून दिसते.
आता पुणे महापालिकेच्या हद्दीत आलेल्या वानवडी येथील प्रकाश मिरकुटे हा या कथानकाचा नायक आहे. स्वप्नाली पांगम नावच्या मुलीशी प्रकाशचे पुण्यात १९ ऑक्टोबर १९९५ रोजी लग्न झाले. लग्नाच्या दुसर्‍या दिवशी देवदर्शनाला जाऊन नवदाम्पत्य संध्याकाळी घरी परत आले. त्याच दिवशी लग्नानिमित्त सत्यनारायाणची पूजा असल्याने घरात दोन्हीकडचे पाहुणे आलेले होते. पूजा झाल्यावर रात्री आठच्या सुमारास स्वत:चे नाव ‘प्रभावती मिरकुटे’ असे सांगणारी एक स्त्री येते. ‘मी प्रकाशची पहिली बायको आहे. त्याच्यापासून मला दोन मुले झाली आहेत. मला फसवून त्याने हे दुसरे लग्न केले आहे’, असा बॉम्बगोळा ही प्रभावती टाकते आणि विष पिऊन आत्महत्या करण्याची धमकी देत तेथून निघून जाते.
प्रकाशने पहिले लग्न झाल्याचे दडवून ठेवून आपल्याशी फसवणुकीने दुसरे लग्न केले हे कळल्यावर दोन दिवसांनी स्वप्नाली पोलीस ठाण्यात जाते आणि प्रकाश, त्याची आई, बहिण व त्याच्या एका मित्राविरुद्ध फिर्याद नोंदविते. यावरून प्रकाश व इतरांविरुद्ध भादंवि कलम ४२० (फसवणूक) आणि कलम ४९४ व ४९५ हे गुन्हे नोंदवून पोलीस तपास सुरू होतो. या तपासात २७ ऑक्टोबर,१९९५ रोजी पोलीस प्रभावतीची जबानी नोंदवितात व तिच्याकडून काही कागदपत्रेही हस्तगत करतात. त्याच दिवशी प्रभावती प्रकाश, त्याची आई व बहीण यांच्याविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याची (भादंवि कलम ४९८ ए) नोंदविते.
कालांतराने स्वप्नालीच्या फिर्यादीवरून खडकी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (Judicial Magistrate) न्यायालयात खटला उभा राहतो. या खटल्यात प्रभावती एक प्रतिज्ञापत्र सादर करते. त्यात ती म्हणते की, प्रकाशशी माझे लग्न कधीच झालेले नाही. ज्यांना प्रकाश व स्वप्नालीचे लग्न पसंत नव्हते त्यांनी मला सत्यनारायण पूजेच्या दिवशी घरी जाऊन तसे ‘नाटक’ करायला भाग पाडले. या प्रतिज्ञापत्रावरून प्रभावतीला साक्षीदार म्हणून समन्स व नंतर वॉरन्टही काढले जाते. पण तिचा ठावठिकाणा लागत नाही व तो आजतागायत लागलेला नाही. तिने प्रकाश व त्याच्या कुटुंबियांविरुद्ध केलेल्या छळाच्या फिर्यादीचे पुढे काय झाले, हेही कळायला मार्ग नाही.
प्रभावतीची साक्ष न होताच दंडाधिकार्‍यांपुढील खटला चालला. त्यात विवाह नोंदणी कार्यालयातील संबंधित कारकूनाने कोर्टात साक्ष देताना प्रकाश आणि प्रभावती यांच्या लग्नाचे प्रमाणपत्र सादर केले. त्यात ते लग्न सन १९८८ मध्ये झाल्याची नोंद होती. त्या करकुनाने साक्षीत संगितले की, या प्रमाणपत्राच्या तारखेला मी त्या पदावर नव्हतो. त्यामुळे विवाह नोंदणीच्या वेळी वधू आणि वर दोघेही कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहिले होते की नाही, हे मला सांगता येणार नाही. हा कारकून प्रकाशला कोर्टात ओळखुही शकला नाही. प्रकाश व प्रभावती यांचे हे कथित लग्न ज्याने लावले त्या भटजीचीही साक्ष झाली. विवाह नोंदणी प्रमाणपत्रावरील स्वत:ची स्वाक्षरी भटजीने मान्य केली. पण त्यानंतर बरीच लग्ने लावल्याने हे लग्न लावल्याचे नक्की आठवत नाही, असे त्याने सांगितले. भटजीनेही प्रकाश, त्याची आई किंवा बहीण यापैकी कोणालाही कोर्टात ओळखले नाही.
साक्षीदारांनी दुजोरा दिला नसला तरी विवाह नोंदणी दाखल्यावरून प्रकाश आणि प्रभावती यांचे लग्न झाल्याचे सिद्ध होते, असा निष्कर्ष काढून दंडाधिकार्‍यांनी प्रकाशला दोषी ठरवत शिक्षा ठोठावली आणि इतर आरोपींना निर्दोष मुक्त केले. प्रकाशने या निकलविरुद्ध पुणे सत्र न्यायालयात (Sessions Court) दाद मागितली. त्या न्यायालयाने दंडाधिकार्‍यांचा निकाल रद्द करून प्रकाशचीही निर्दोष मुक्तता केली. याविरुद्ध सरकारने केलेले अपील फेटाळत उच्च न्यायालयानेही (High Court) सत्र न्यायालयाच्या निकालावर शिक्कामोर्तब केले.
उच्च न्यायालयाने निकालात म्हटले की, कलम ४९४ व ४९५ चे गुन्हे सिद्ध होण्यासाठी पहिला व दुसरा हे दोन्ही विवाह वैधपणे झालेले असावे लागतात. केवळ विवाह नोंदणी प्रमाणपत्राने पहिला विवाह झाल्याचे सिद्ध होत नाही. खासकरून या कथित पहिल्या विवाहातील पत्नीने तो विवाह झाला नसल्याचे प्रतिज्ञापत्र केलेले असल्याने तिची साक्ष न काढता त्या विवाहविषयी निष्कर्ष काढणे चुकीचे आहे.
अशा प्रकारे प्रकाशच्या मागे लागलेले हे पहिल्या विवाहाचे शुक्लकाष्ठ २५ वर्षांनी सुटले. परंतु पतीवर असा आरोप करून खटला भरणारी स्वप्नाली प्रकाशसोबत नांदली नसणार हेही शक्य आहे. प्रकाशने खरंच दुसरे लग्न केले नसेल तर नंतर प्रत्यक्षात झालेल्या लग्नाची बायकोही त्याच्या नशिबी नाही, असा शेवटी निचोड निघतो.
या निकालात चूक असे काही म्हणता येणार नाही. कारण न्यायालयास सादर झालेल्या पुराव्यांच्या पलिकडे जाऊन निकाल देता येत नाही. पण त्या पलिकडेही खरोखरच काही असेल तर फसवणुकीने दुसरा विवाह केलेल्या पत्नीला ते सिद्ध करणे किती दुरापास्त असू शकते, हेही यावरून दिसते.
(टिप: संबंधितांना व्यक्तिगत जीवनात त्रास होऊ नये यासाठी या लिखाणात पात्रांची खरी नावे न देता प्रकाश, स्वप्नाली व प्रभावती ही काल्पनिक नावे घेतली आहेत. तरीही हे कथानक मात्र काल्पनिक नाही. इच्छूक हे निकालपत्र Criminal Appeal 60/2003 या संदर्भाने हायकोर्टाच्या वेबसाइटवर पाहू शकतात.)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आणि हे सगळं प्रकरण कशामुळे, कोणी रचलं होतं याबद्दल कधी काही माहिती मिळाली का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भयानक!
एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणं ह्या देशात किती सहज शक्य आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

देशात अस्तित्वात असणारे कायदे ह्यांची बिनचूक अमल बजावणी पोलिस यंत्रणा कडून झाली की नाही त्याची खात्री
न्यायाधीश लोकांनी केली पाहिजे.
आणि स्वतःची मत चुलीत घालून निकाल दिला तर मला नाही वाटत कोणावर अन्याय होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या मध्ये मानवी सहभाग बिलकुल नसावा.

आधुनिक तंत्र वापरून Ai आणि रोबोट जे स्वतः च्या बुद्धीचे आहेत त्यांच्या वर ही जबाबदारी सोपवावी.
असंख्य प्रश्न राहणारा च नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0