अफवा आवडे सर्वांना!

जगभरात ठिकठकाणी हैदोस घालत असलेल्या कोरोना विषाणूमुळे भीतीचे व अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून जगातील एकूण एक सर्व राष्ट्रे भांबावून गेलेले असताना या भीतीची तीव्रता वाढविण्यात समाजमाध्यमावरून पसरत असलेल्या अफवांना कसे अटकाव करावे हा मोठा प्रश्न सर्व संबंधितांच्या समोर उभा आहे. कोरोना संसर्गाला आटोक्यात आणून ठप्प झालेल्या जागतिक स्तरावरील सर्व व्यवहारांना पूर्वस्थितीवर आणण्यासाठी सर्व पातळीवरून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य, प्रशासन, आपत्ती व्यवस्थापनासकट संपूर्ण यंत्रणा सर्व वेळ व श्रम खर्ची घालत असताना या अफवामुळे त्यांच्या या प्रयत्नांना खीळ बसत आहे. आपण आपल्या मोबाइलवरील वाट्सअॅअपवर जे काही लिहिले आहे ते सर्व खरे आहे व/वा टीव्हीच्या पडद्यावर जे काही पाहतो ते सत्यकथन आहे, यावर आपला भलताच विश्वास असतो. समाजमाध्यमावरून दर सेकंदाला लाखोनी झळकणाऱ्या लंगोटीसंदेश वाचून आपण आपली मते बनवत असताना त्याचा कुणीतरी गैरफायदाही घेऊ शकतो वा त्यापासून कुणाचे तरी नुकसान होऊ शकते, याची पुसटशी शंकासुद्धा आपल्याला शिवत नाही. त्यामुळे खरे काय व खोटे काय याचा विवेकच आपण हरवून बसलेलो आहोत. जे काही आपण ऐकतो वा पाहतो ते सर्व खरे आहे असे समजण्यात हशील नाही.

अफवा ही पडताळणी न केलेली माहिती असते व या अफवामुळे दंगलीच्या वेळी, साथीच्या कालखंडात, व युद्धप्रसंगी जगभरात अनेकांना मृत्युमुखी पडावे लागलेले आहे, हे आपण नाकारू शकत नाही. अफवा म्हणजे एका प्रकारे ‘सुधारून’ प्रसारित केलेली/करणारी बातमी. मागणी तसा पुरवठा या तत्त्वानुसार यांच्या संख्येत व/वा आशयात चढ-उतार होत असते. अगदी नगण्य तथ्यांश असलेल्या अशा बातम्यामध्ये आकर्षित करणारा मालमसाला भरगच्च भरलेला असल्यामुळे मोहित होऊन ऐकणारे/पाहणारे भारावून जातात.

अफवा, कुटाळक्या (गॉसिप), रसभरित कहाण्या व गप्पा-टप्पामधून माहितीची देवाण-घेवाण होत असते. संपर्क माध्यमांची उणीव असताना माहिती पोचण्यास वेळ लागत होता. परंतु अलीकडे वाऱ्याच्या वेगाने, नव्हे तर प्रकाशाच्या वेगाने माहिती पोचवता येत असल्यामुळे ही अर्धवट माहिती शक्य ती साधनं वापरून आपल्या ओळखी/अनोळखीतल्यां विविध गटापर्यंत पोचवण्यात येत असते. ही वाढ भूमितीश्रेणीत होत असल्यामुळे बघता बघता काही क्षणातच माहिती सर्वदूरपर्यंत पोचू शकते. एखादा चिकित्सक या माहितीतील सत्यासत्यता पडताळून प्रतिवाद करण्याच्या पावित्र्यात असला तरी अफवाच्या विरोधात केलेल्या प्रतिवादात तेवढा दम नसल्यामुळे हा प्रतिवाद फार कमी लोकापर्यंत पोचतो. व जे काही नुकसान होणार आहे ते टाळता येऊ शकत नाही. व हे नुकसान काही वेळा जीवावरही बेतू शकते.
इतिहास तज्ञ, समाजशास्त्रज्ञ व मानसतज्ञ यांचा अफवा, गॉसिप हे आता अभ्यासाचे विषय झाले असून यांचे ऐतिहासिक, सामाजिक व राजकीय परिणामांचा ते शोध घेत आहेत. इतिहासातील कुठली माहिती खरी आहे व कुठली माहिती पेरलेली आहे याचा शोध घेऊन इतिहासाचे पुनर्लेखन केले जात आहे. गंमत म्हणजे अफवा पसरवत असताना त्याचे काय परिणाम होणार आहेत याची कल्पना अफव्यांना जन्म देणाऱ्यांनासुद्धा नसते. एक गुळमुळीत, अर्ध सत्य व अर्ध खोटे काही तरी अंदाज दर्शविणारे त्याचे स्वरूप असते व बघता बघता ते हिट् होते (किवा दुर्लक्षिलेही जाऊ शकते.) म्हणूनच दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात ठिकठिकाणी शांत रहा व आपले काम करत रहा (keep calm and carry on) अशा प्रकारच्या पाट्या लावलेल्या होत्या. आताच्या कोरोनाच्या साथीच्या उद्रेकाच्या काळात सुद्धा सामान्य जनतेला असेच काही सांगण्याची गरज भासत आहे.

अफवांच्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित हानी व दंगे झालेले अनेक दाखले इतिहासात आहेत. 1750च्या सुमारास 15वा लुई हा फ्रान्सचा राजा, पॅरिस शहरातल्या मुलाना पळवतो अशी अफवा पसरली. तो कुष्ठ रोगाने पिडीत असून लहान मुलांना मारून त्यांच्या रक्तात आंघोळ केल्यावर रोग नाहिसा होईल म्हणून तो मुलांना पळवतो आहे यावर शहरवासीयांचा विश्वास बसला. रातोरात सर्व जनता रस्त्यावर उतरली व राजाच्या विरोधात घोषणा देऊ लागली. खरे पाहता रस्त्यावरील मुलांना पकडून रिमांड होममध्ये पाठवण्याची मोहीम पोलीस यंत्रणेने हाती घेतली होती. परंतु त्या मुलांना राजवाड्यात पाठवून त्यांचा खून केला जात आहे या अफवेमुळे पोलीस यंत्रणा हतबल झाली. 1761 साली भूकंपाच्या दोन सौम्य धक्याने लंडन शहर हादरले. त्याच वेळी 5 एप्रिल रोजी मोठा भूकंप होऊन लंडन शहर नष्ट होईल म्हणून एका माथेफिरूने अफवा पसरवली. सर्व लोक सैराभैरा होऊन शहर सोडून जाऊ लगली. काहींनी शेतात जाऊन तळ ठोकला. एक पोलीस वेडा-पिसा होऊन नग्नावस्थेत भर रस्त्यावर पळत सुटला. व शेवटी त्याला मनोरुग्णालयात दाखल करावे लागले. 14व्या शतकात युरोपमध्ये प्लेगची साथ पसरली होती. ज्यू धर्माची माणसं क्रिश्चियन वस्तीतील पाण्याच्या विहिरीत विष कालवतात व त्या बदल्यात होली स्पिरिट प्लेगपासून ज्यूंचे रक्षण करतो अशी अफवा पसरली. त्यामुळे हजारो ज्यूंची कत्तल करण्यात येऊ लागली. फ्रान्समधील एका शहरात पाच हजार ज्यूंना जिवंत जाळले गेले. ज्यूंना मारून टाकण्याचा कायदा पास केला गेला. परंतु ते निरपराध होते हे शेवटपर्यंत कळले नाही. फ्रेंच राज्यक्रांतीच्या कालखंडातील भीतीचा फायदा घेत क्रांतीला विरोध दर्शविणारे खेड्यातील शेतकऱ्यांना मारून त्यांचे धान्य लुटण्यासाठी दरोडेखोरांची टोळी उभी करत आहेत अशी अफवा पसरली. ठिकठिकाणी शेतकरी गटा-गटाने रात्रभर पहारा देवू लागले. एके ठिकाणी तीन हजारांचा गट दरोडेखोर जंगलात पळून गेले म्हणून पाठलाग करू लागली. परंतु गायी-म्हशींच्या कळपाशिवाय त्यांना तेथे काही सापडले नाही. इंडोनेशियात सरकारच बंदर निर्मिती वा तेल विहिरीच्या मोठमोठ्या प्रकल्पासाठी माणसांची मुंडकी गोळा करण्याच्या कामासाठी अधिकारी नेमले आहेत, ही अफवा वरचेवर पसरत असते. त्यामुळे जिवाच्या भीतीने घाबरलेले कामगार कामावरच येत नाहीत. कामावर आल्यास हे अधिकारी आपला खून करून मुंडकी घेऊन जातील ही भीती नेहमीच त्याना सतावत असते. 1998च्या सुमारास स्थानिक मांत्रिकांच्या विरोधात इंडोनेशियातील काही खेड्यात तंग वातावरण होते. या मांत्रिकांनी पूर्वी केलेल्या पापाच्या प्रायश्चिततेची मागणी हे खेडूत करत होते. त्यामुळे या मांत्रिकांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याची व्यवस्था सरकार करू लागली. आपण मांत्रिक आहोत याची नोंद करण्यासाठी त्यांना जवळच्या पोलीस चौकीत जावे लागत होते. परंतु चौकीवर जाणाऱ्या मांत्रिकामुळेच गावातील शेजारी-पाजारी आजारी पडत आहेत अशी अफवा पसरली. त्यामुळे चौकीपाशी येणाऱ्या प्रत्येक मांत्रिकाचा हे गावकरी खून करू लागले. अशा प्रकारे केवळ अफवेमुळे अनेकांना हकनाक जीव गमवावे लागले. 1996च्या सुमारास मध्यपूर्वेतील इजिप्त व इतर काही देशातील तरुणांना मादक द्रव्याच्या आहारी घालणारा डिंकासारखा पदार्थ इस्राइल पुरवून तरुणांना नादी लावत आहेत अशी अफवा पसरली. तरुणींनी हा पदार्थ खाल्यास त्या वेश्याव्यवसाय करू लागतात व इस्राइलतर्फे गुप्तचर म्हणून काम करू लागतात अशीही अफवा पसरू लागली. ठिकठिकाणच्या मशीदीतील स्पीकरवरून अशा पदार्थाचे सेवन करू नये अशी घोषणा वारंवार करण्यात येऊ लागली. कित्येक दुकानावर छापे टाकले गेले. परंतु हाती काही लागले नाही. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामालासुद्धा अशा प्रकारच्या अफव्याचे बळी व्हावे लागले. 23 एप्रिल 2013 रोजी ओबामाच्या व्हाइट हाउसमध्ये स्फोट झाल्यामुळे ओबामा थोडक्यात बचावले व काही किरकोळ इजा झाल्यामुळे उपचार घेत आहेत असे असोशिएटेड प्रेसचा हवाला देणारा ट्वीट प्रसारित झाला. बघता बघता न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेज 500 अंकानी कोसळला. व गुंतवणुकीदारांचे 13 हजार कोटी डॉलर्सचे नुकसान झाले. काही चाणाक्ष वार्ताहरामुळे या अफवाचा स्रोत शोधला गेल्यामुळे थोडक्यात निभावले.

खरे पाहता संसर्ग रोगाची लागण जगभरात अगदी पूर्वीपासून होत आहे. अफवा पसरविणारे, स्वयंघोषित डॉक्टर होऊन भलतेसलते उपचार सुचविणारे कदाचित मोठ्या प्रमाणात होत असलेल्या याच जीवित हानीचा फायदा दुर्धर संसर्गाच्या काळात घेत असावेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवित हानी होत असताना अफवा पसरवण्यात, चुकीचे संदेश पाठवण्यात काही तारतम्य वापरल्यास बाधितांना नक्कीच दिलासा मिळाला असता.

एके काळी ( व आतासुद्धा!) काही समाजात दैवी प्रकोपामुळेच साथीच्या रोगांची लागण व त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित हानी होत असते यावर पूर्ण विश्वास बसलेला असतो. मृत पावलेल्यांनी (या जन्मी किंवा पूर्वीच्या कुठल्या तरी जन्मात!) काही दुष्कृत्य केलेले असल्यामुळे परमेश्वर (वा भूत!) त्यांना शिक्षा म्हणून वा इतरांनी पाठ शिकावा म्हणून त्यांचा बळी घेतला जातो याबद्दल त्यांची खात्री झालेली असते. प्लेगसारख्या रोगांचा प्रसार समुद्रमार्गे व्यापार करण्यातून होत असतो हे माहित असूनसुद्धा साथीचे मूळ शोधून उपाय करण्यापेक्षा समस्यांचे सुलभीकरण केले जात होते. अशा प्रकारे अवैज्ञानिकरित्या समस्यांचे विश्लेषण करत असल्यामुळे लाखोनी नसली तरी हजारोनी माणसं मृत्युमुखी पडत होती.

काही अपवाद वगळता त्याकाळी देव-धर्माचा जबरदस्त पगडा धुडकावण्याइतके धैर्य कुणाकडेही नसावे असे म्हणता येईल इतकी परिस्थिती वाईट होती. परंतु जसजसे त्यांच्यातील काही जणं चिकित्सकरित्या विचार करू लागले, तेव्हा मात्र अशा प्रकारच्या जीवघेण्या समस्यांना उत्तरं मिळू लागले. शहरात सांडपाण्याची व्यवस्था केल्यास मृत्युचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होऊ शकते; सूक्ष्म जंतुमुळे रोग होतो व जलदरित्या प्रसार होतो; निर्जंतुकीरणामुळे उपचारादरम्यान दगावणाऱ्यांची संख्या कमी होते; प्रसूती किंवा शस्त्रक्रियेच्या वेळी सर्व साधनं उकळत्या पाण्यात काही काळ ठेवून वापरल्यास नंतरच्या रुग्णाला जंतुसंसर्ग होत नाही; हात स्वच्छ धुतल्यामुळे रोगप्रसार टाळता येते; आयोडीनयुक्त मीठ खाल्यामुळे काही आजारांना रोखता येते; इ.इ. गोष्टी हळू हळू कळू लागल्या. रक्तातील पांढऱ्या पेशींना बाह्य जंतुंची अगोदरच ओळख करून दिल्यास त्या रोगप्रकाराचा सामना शरीर करू शकतात या लशीकरण प्रकाराचा शोध लागला व प्रतिकारक शक्तीत वाढ होऊ लागली.

वैज्ञानिकरित्या काटेकोरपणे संशोधन केल्यास रोगाचे मूळ शोधता येईल, यावर किमान वैज्ञानिक जगतात तरी दुमत नाही. परंतु वैज्ञानिक पद्धत ही अनेक वेळा फार खर्चिक व वेळखाऊ असू शकते. संशोधनात अचूकता व काटेकारपणाकडे जास्त लक्ष देत असल्यामुळे घिसाडघाई करून बाजारात औषधं आणून रुग्णांच्या माथी मारल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता जास्त असते. यासंबंधातील पूर्वीच्या कटु अनुभवावरून हा शहाणपणा आल्यामुळे क्लिनिकल ट्रायल्स न घेता, प्रमाणीकरणाचे निकष न ठरवता बाजारात औषधं आणता येत नाहीत वा आणू दिले जात नाहीत. कोरोनावरही वैद्यकीय उपाय नक्कीच सापडतील व ही साथ नक्कीच आटोक्यात येईल. परंतु अफवा पसरवणाऱ्यास तेवढा दम कुठे?
p2आपल्याही देशातसुद्धा अफवांचे पीक तसूभरही कमी होत नाही. अवाच्यासवा दावे करणाऱ्यांची संख्याही कमी नसून त्या दाव्यांना बळी पडून अफवा पसरवणाऱ्यांच्या संख्येतही सतत वाढ होत असते. पैशाचा पाऊस पाडणारे, कुठल्या तरी झाड-पाल्याचे दोन थेंब डोळ्यात घालून लाखो अंधांना दृष्टी दिल्याचा दावा करणारे, उद्या ये, उद्या ये (नाळे बा,नाळे बा) म्हणून दरवाज्यावर लिहून भीतीत भर घालणारे, मंत्रोपचाराने, मंत्रित केलेल्या पाण्याने वा ‘सायन्टिफिक’ होम हवन करून असाध्य रोग बरे केल्याचा दावा करणारे, पोटावर हात फिरवल्यास मूल होणार याची खात्री देणारे, गोमूत्र सेवनातून कोरोना पूर्णपणे बरा होईल असे आश्वासन देणारे, इ.इ. चित्र विचित्र दावे करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. विविध माध्यमातून या तथाकथित चमत्कारसदृश उपायांचा अपप्रचार होतच असतो; अफवा पसरत जाते व लोक बळी पडतात. आपल्या देशात (व इतर देशातसुद्धा) पाय रोवून असलेली बुवाबाजी व आर्थिक फसवणुकीचा मनोरा अफवांच्या भक्कम पायावर उभा आहे असे म्हणावयास वाव आहे.

म्हणूनच शांत रहा व आपली कामे करत रहा असे सुचवावेसे वाटते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

चुकीची माहिती दिली जात नाही फक्त खरीच माहिती दिली जाते अशी कोणती यंत्रणा अस्तित्वात आहे.
त्यांची यादी दिली तर उपकार होतील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही नानावटींचे लेख वाचता??? अॅक्च्युअली वाचता???

थोर आहात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वांचे लेखन वाचतो कोणताच विषय वर्ज नाही.
अगदी व्हॉट्स ॲप वरील दिव्य ज्ञान पण वाचतो.
त्या मध्ये पण एक दोन ओळी तरी विचार करायला लावणाऱ्या असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण माझा लेख वाचून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.

खरे पाहता मीसुद्धा माहितीतील खरे-खोटेपणा लक्षात आणून देणाऱ्या यंत्रणेच्या शोधात आहे. परंतु काही गोष्टी कॉमन सेन्सचा किंचित वापर करून प्रश्न विचारत गेल्यास माहितीची सत्यासत्यता ओळखता येते असे मला वाटते. यासंबंधात एक उदाहरण म्हणून डॉ. प्रिया प्रभू यांनी RTPCR संबंधातील एका मेसेजसंबंधी विचारलेले वाचला का? पटला का? किती जणांनी मूळ पत्र वाचून समजून घेतले, किती जणांनी ते पत्र खरे आहे का याची पडताळणी केली? किती जणांनी त्या पत्रातील लिंक्स उघडून अधिक माहिती मिळवायचा प्रयत्न केला? किती जणांनी मेसेजमधील पडताळण्याजोगे मुद्दे पडताळले? किती जणांनी असे काहीच न करता विश्वास ठेवला? आणि किती जणांनी ही खोटी माहिती इतरांपर्यंत पोचवून त्यांचे जीवदेखील धोक्यात आणले? तुम्ही नक्की कोणत्या गटामध्ये आहात? इत्यादी प्रश्नामधून वाचलेल्या मेसेजची पडताळणी करतात. आपणही अशा प्रकारे एखादी माहिती अफवा असेल अशी शंका आल्यास त्याची सत्यासत्यता ठरवू शकतो. ( परंतु सत्याचे कपडे घालून मिरवत असलेल्या खोटेपणाला आपणही बळी पडू शकतो, हेही मान्य.)

शेवटी सारासार विचार करून आपण वाचलेल्या माहितीची पडताळणी करू शकतो असे मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्यातरी आल्ट न्यूज पोर्टलवर खऱ्या न्यूज आहेत का अफवा पडताळणी करता येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू