कोविड आणि फ्लूची तुलना खरंच योग्य आहे का?

कोविड आणि फ्लूची तुलना खरंच योग्य आहे का?

डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे)

(व्हायरल झालेल्या मूळ पोस्टचा दुवा लेखाच्या अखेरीस दिला आहे.)

आदरणीय सर,

सप्रेम नमस्कार, विनंती विशेष.

तुमच्या व्हायरल पोस्टचे उत्तर पत्रानेच द्यावे म्हटले. याची मुख्य कारणे तीन आहेत.

पहिले म्हणजे तुमच्या फेसबुक पोस्टवर मी १० जानेवारीला केलेल्या कमेंटला आपले उत्तर अद्याप मिळाले नाहीये. (आत्ताच पुन्हा चेक केले मी). माझा प्रश्न महत्त्वाचा आहे म्हणून आज पुन्हा विचारेन. दुसरे कारण म्हणजे काल तुमची पोस्ट मला WAवर काही डॉक्टरांकडून मिळाली. म्हणजे संभ्रम केवळ जनतेमध्ये नाही तर डॉक्टरांमध्ये देखील पसरलाय हे जाणवले. आणि तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण केलेल्या दाव्यांसाठी आपण Preventive and Social Medicine म्हणजे माझ्या विषयाचा दाखला दिला आहे जो मला मान्य नाही.

आपण केलेले व करत असलेले कार्य खूप महान आहे मात्र आपण तळमळीने लिहिलेल्या पोस्टमध्ये थोडी गफलत झालीये. पूर्ण पोस्ट “कोविड हा फ्लू सारखा आजार आहे” या गृहितकावर आधारित आहे. कारण तुम्ही “आपण फ्लूसाठी तपासणी करत नाही, फ्लू पसरतोच, फ्लू सिझनल आहे म्हणून कोविड पण तसाच आहे” अशी मांडणी केली आहे.

मुळात भारतामध्ये पाश्चात्य देशांसारख्या इन्फ़्लुएन्झाच्या वार्षिक साथी येत नाहीत, फक्त तुरळक केसेस होतात, त्यामुळे भारतामध्ये फ्लूची वार्षिक लस सरसकट सर्व जनतेला कधी दिली जात नाही. भारतामध्ये हिवाळ्यात सर्दी-खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढते त्यांना rhinovirus किंवा इतर तत्सम विषाणूंची बाधा झालेली असते – केवळ इन्फ़्लुएन्झा व्हायरसची नव्हे. भारतातील किती जणांनी नियमितपणे फ्लूची लस घेतलीये? आठवतंय का कोणाला? ज्या देशांमध्ये फ्लूची वार्षिक लस दिली जाते त्या देशांमध्ये फ्लूमुळे मृत्यूदेखील होतात. ते टाळण्यासाठी तिथे वार्षिक लस देतात.

भारतातील सिझनल सर्दीच्या काळात सर्दीमुळे किती जण मरण पावले याची काही आकडेवारी आहे का? माझ्या माहितीनुसार नसावी. कारण सिझनल सर्दी (फ्लू नव्हे) जीवघेणी नसते म्हणून आपण तपासणी करत नाही व विलगीकरणासारखे उपाय देखील करत नाही. H1N1चे pandemic २०१० मध्ये संपले. मात्र H1N1 या फ्लूमुळे गेल्या पाच वर्षात संपूर्ण भारतामध्ये कितीजण मृत्युमुखी पडले माहीत आहे का? २०१६ (मृत्यू -२६३), २०१७ (मृत्यू – २२७०), २०१८ (मृत्यू - ११२८), २०१९ (मृत्यू – १२१८), २०२० (मृत्यू – ४४) आणि २०२१ (ऑक्टोबर पर्यंतचे) फ्लूचे मृत्यू आहेत केवळ ९. हे सर्व आकडे IDSP म्हणजे साथरोगांवर लक्ष ठेवणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या वेबसाईटवर सर्वांसाठी उपलब्ध आहेत. सध्या फ्लू पूर्णपणे नियंत्रणामध्ये आहे म्हणून अतिरिक्त उपाय आता करायची गरज नाही. २००९ मध्ये साथ सुरू असताना मात्र हात धुण्यासारखी खबरदारी (3C) सर्वांनी नक्कीच घेतली होती.

आता आपण कोविडमुळे गेल्या दोनच वर्षामध्ये किती मृत्यू झाले तो आकडा बघू या. भारतामधील आजअखेर नोंदवलेले कोविड मृत्यू आहेत ४,८५,४३३. या तिसऱ्या लाटेमध्ये यामध्ये थोडी वाढ होईलच. हे नोंदवलेले आकडे आहेत. कारण नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार कोविड मृत्यूंची खरी संख्या याहून कितीतरी अधिक आहे. भारतामध्ये जवळजवळ ३० लाख कोविड मृत्यू झाले असण्याची शक्यता वर्तवलेली आहे. ICMR चा सिरो-सर्व्हे देखील न नोंदवलेल्या केसेस खूप जास्त असल्याची पुष्टता करतो.

गफलत लक्षात आली का सर? तुम्ही वैश्विक महासाथ थांबवायच्या प्रयत्नांची तुलना फ्लूसारख्या आजाराशी करताय, ज्या फ्लूमुळे २०२० आणि २०२१ मध्ये फक्त ६०-७० मृत्यू झालेत. त्याच काळामध्ये कोविड मृत्यू ४.८५ लाख ते ३० लाख दरम्यान कितीही असू शकतात. या दोन आजारांची तुलना चुकतेय सर. आणि महत्त्वाचे म्हणजे कोविड मृत्यूमधील ५०% मृत्यू ६० वर्षाखालील आहेत. यातील किती तरी मृत्यू टाळण्यासारखे होते. लोकांमध्ये संभ्रम नसता ना तर लोकांनी नियम मनापासून पाळले असते. संभ्रम जीवघेणा ठरू शकतो.

कोविडमुळे झालेल्या मृत्युंचा मुद्दा थोडा वेळ बाजूला ठेवूया. सर्दी नंतर लॉंग सर्दी नसते हे मला माहीत आहे. फ्लू झाल्यानंतर किती जणांना लॉंग फ्लू होतो सांगू शकाल का? कारण कोविड झाल्यानंतर १०-४०% लोकांना लॉंग कोविडचा त्रास होतोय. भारतामध्ये याविषयी अजून नीटशी जाणीव व माहिती नाहीये. पण इंग्लंडसारख्या देशांनी लॉंग कोविडचे विशेष क्लिनिक्स सुरू केले आहेत. लॉंग कोविड मुलांमध्येही होऊ शकतो, अजून आपल्याला पूर्ण कल्पना नाहीये. नुकताच अमेरिकन databaseवरील एक अभ्यास प्रसिद्ध झालाय. तेथील कोविड झालेल्या लहान मुलांमध्ये मधुमेह निर्माण होण्याचे प्रमाण कोविड न झालेल्या मुलांपेक्षा अधिक आढळले आहे. कितीतरी जणांना कोविडनंतर थायरोइडचा त्रास होतोय. केस गळणे, थकवा, पाळीच्या तक्रारी, धाप लागणे तर आहेतच. मधुमेह, हृदयरोग अश्या तक्रारी कोविडनंतर वाढत आहेत. ही सर्व माहिती गोळा व्हायला व सिद्ध व्हायला व प्रसिद्ध व्हायला वेळ लागेल. तोपर्यंत या नूतन (novel) आजारापासून सर्वांना शक्य तेवढे सुरक्षित ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. हा शेकडो- हजारो नाही तर एकाच वेळी लाखो-करोडो जनतेचा प्रश्न आहे.

मी कमेंटमध्ये आपल्याला एका स्टडीची लिंक दिली होती. इथे पुन्हा देते. माझा प्रश्न आहे, जर कोविड फ्लूसारखा साधा आजार असेल तर कोविड नंतर पेशींचे ageing का होतेय? कोविड झालेल्या गटामध्ये साधारण सरासरी ५ वर्षांनी पेशींचे वय वाढलेले आढळून आले आहे. ६० वर्षाखालील व्यक्तींमध्ये हा बदल अधिक दिसून येतोय. तसेच DNAमधील telomers ची लांबीदेखील कमी झालीये.

म्हणजेच, हा विषाणू केवळ ताप सर्दी खोकला एवढ्यावर सीमित नाहीये. हा शरीरामध्ये इतर अवयव बाधित करतो ज्यांचे सर्व परिणाम अजून समोर आलेले नाहीत. कोविड मृत्यू झालेल्या ३३ व्यक्तींमध्ये पोस्ट मार्टेम करण्यात आले व प्रत्येक सिस्टीममध्ये करोनाचा शोध घेतला तेव्हा शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयवामध्ये करोना आढळला. हा अभ्यासदेखील प्रसिद्ध झालेला आहे. करोना अतिशय फसवा विषाणू आहे. ओमायक्रोन आपल्या इम्युनिटीलादेखील चकवा देतोय. त्यामुळे इतक्यात आपण दक्षता कमी करणे शहाणपणाचे होणार नाही.

आपण काही गंभीर विधाने देखील केली आहेत ज्यांनी संभ्रम निर्माण होऊ शकतो. जसे –

  1. फक्त लक्षणे असलेल्यांनी मास्क लावायचा.
    तथ्य - करोना लक्षणे येण्यापूर्वी दोन दिवस पसरतो, तसेच लक्षणविहीन बाधित व्यक्ती देखील संसर्ग फैलावतात म्हणून सर्वांनी मास्क लावावा हेच योग्य!,
  2. मास्क लावून काळजी घेणाऱ्यांना कोविड झाला.
    तथ्य - मास्क फक्त आपण लावून फायदा नाही, आपल्या आजूबाजूच्या सर्वांनी लावला तर त्याची सुरक्षा कैकपट वाढते. नियम जेवढे अधिक लोक पाळतील, तेवढी सर्वांचीच सुरक्षा वाढेल,
  3. आपल्यामुळे इतरांना कोविड होतो ही कल्पना चुकीची आहे (??)
    तथ्य - हा संसर्गजन्य व हवेद्वारे पसरणारा आजार आहे आणि म्हणून तर आपण या वैश्विक साथीला तोंड देत आहोत. गेल्या लाटेमध्ये अख्खीच्या अख्खी कुटुंबे बाधित झाली होती. कितीतरी जणांनी एकाहून अधिक कुटुंबीय गमावले आहेत. किती तरी जणांना कार्यालयातील संपर्कामुळे किंवा एकत्र प्रवास केल्यामुळे संसर्ग झाला आहे. हॉटेलमध्ये, समारंभांमध्ये पसरलेल्या संसर्गाविषयी विविध संशोधनात्मक पेपर्स उपलब्ध आहेत.
  4. डॉक्टर मंडळींना रोज कोविड झाला असता.
    तथ्य - रोज नाही मात्र वारंवार संसर्ग झालाय. इंटर्नपासून सिनियर डॉक्टरपर्यंत सर्वांना झालाय. आणि तुमच्या मते फ्लूसारख्या साध्या असणाऱ्या कोविडमुळे ७००हून अधिक डॉक्टर मृत्युमुखीदेखील पडले आहेत. डॉक्टरांच्या वृद्ध पालकांचे किती कोविड मृत्यू झाले याची आकडेवारी उपलब्ध नाही. या बलिदानाची दखल कुठेही घेण्यात आलेली नाही.
  5. वर उल्लेखलेल्या सर्व गोष्टी आमच्या Preventive and Social medicine या पुस्तकात दिल्या आहेत.
    तथ्य - नाही सर. तुम्ही उल्लेखलेली वरीलपैकी कोणतीच गोष्ट माझा विषय सांगत नाही. माझा विषय कोविड आपण थांबवू शकतो हे सांगतो. कोविड फ्लूपेक्षा वेगळा आजार आहे हे सांगतो. कोविड हवेद्वारे पसरणारा असल्याने ही साथ थांबवण्यासाठी लोकांचे सहकार्य आवश्यक आहे हे सांगतो. कोविड प्रतिबंधाचे सर्व उपाय माझा विषय सांगतो. वायुवीजन वाढवणे कोविड प्रतिबंध करू शकते हेही सांगतो. आणि कोविडच्या विषयी अजून संपूर्ण माहिती नसल्याने आपण सर्वांनी काळजी घ्यायला हवी हेदेखील सांगतो. माझ्या विषयात शिकवलेले Public health measures (Test-Track-Treat) वापरून ओमायक्रोनचा स्थानिक उद्रेकदेखील नियंत्रणामध्ये येऊ शकतो हे माझ्या महाविद्यालयाने दाखवून दिलेले आहेच.

कोविड रुग्णाला भावनिक व मानसिक आधार द्यायला हवा हे मात्र आपण अगदी योग्य सांगितलेत. जनता डॉक्टरांपेक्षा मिडीयावर अधिक विश्वास ठेवते हेही अचूक सांगितलेत. positive टेस्टचे आकडे हे सामान्य जनतेसाठी नसतात हेही योग्यच बोललात. हे आकडे सरकारसाठी महत्त्वाचे. पण रुग्णसंख्या वाढू लागली की मग आपली जनता नियम पाळते तेव्हा जनतेला संसर्गाची जोखीम समजण्यासाठी आकडे महत्त्वाचे आहेत. आणि कोविड कोणालाही होऊ शकतो मात्र आपली इम्युनिटी आपले संरक्षण करू शकते हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे.

आपल्या पोस्टमुळे आपण जनतेच्या प्रेमास पात्र झालात. माझ्या पत्रामुळे बहुधा मला जनतेच्या रोषास सामोरे जावे लागेल. पण तो धोका पत्करूनदेखील मला दुसरी बाजू जनतेसमोर मांडायलाच हवी. सुज्ञ जनता स्वतःच्या व कुटुंबियांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घेईल याची मला खात्री आहे.

महत्त्वाचा मुद्दा तर राहूनच गेला. हवेतून पसरणारा आजार लॉकडाऊन, जमावबंदी, संचारबंदी या उपायांनी थोपवता येत नाही. हवेतून पसरणारा आजार हा केवळ आणि केवळ जनता एकजुटीने प्रतिबंधाचे उपाय मनापासून आणि योग्य पद्धतीने पाळू लागते तेव्हाच थोपवता येतो. साथ थांबवण्याची शक्ती आपल्या प्रत्येकामध्ये आहे. आपली प्रत्येक वर्तवणूक करोनाला साह्य करणारी आहे की रोखणारी हा सर्वात कळीचा मुद्दा आहे. आणि लॉकडाऊन, जमावबंदी, संचारबंदी मुख्यतः विविध निर्बंध हे उपाय जनतेची वागणूक करोना प्रसाराला साह्य करणारी नसावी यासाठी आहेत. लोकशिक्षणाचा उपाय चालला नाही की लोकनियमनाचा उपाय करावा लागतो जो दुर्दैवी आहे. लोकांच्या मनातील संभ्रम संपला की लोक नक्कीच नियम पालनाला सहकार्य करतील. तोपर्यंत माझ्यासारखे लोक देखील पुरावाधिष्ठित शास्त्रीय माहिती जनतेपर्यंत पोचवत राहूच.

फ्लूचे मृत्यू गेली दोन वर्षे खूप कमी आहेत. कारण कोविड प्रतिबंधाच्या उपायांमुळे कोविडसोबतच हवेद्वारे पसरणारा फ्लूदेखील नियंत्रित झाला आणि फ्लूचे मृत्यू कमी झाले. नियमांबद्दल याहून कोणता वेगळा पुरावा हवाय? सर्व नियम आपल्या सुरक्षेसाठीच आहेत. नियमांचे पालन करूया आणि सुरक्षित राहूया.

कळावे, लोभ असावा. नवे वर्ष आपणास आरोग्यपूर्ण असावे हीच सदिच्छा!
आपली विनम्र,
डॉ. प्रिया

--
डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) M.D. (Community Medicine) साथरोगतज्ज्ञ, मिरज.
#Fighting_Myths_DrPriya
पूर्वप्रकाशित : इथे आणि इथे, जानेवारी १२, २०२१
डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) यांचे सर्व लेखन Info Portal by UHC, GMC, Miraj या पानावर उपलब्ध आहे. #covid_insights_drpriya
त्यांचे 'ऐसी अक्षरे'वर प्रकाशित सर्व लेखन इथे उपलब्ध आहे.

व्हायरल झालेली मूळ पोस्ट इथे वाचता येईल.
आणि SARS-CoV-2 infection and persistence throughout the human body and brain हे अधिक माहितीसाठी.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

डॉक्टरांचे या लेखाबद्दल मनापासून आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

डॅा. देवधर यांच्या अशास्त्रीय (आणि धोकादायक) फेसबुक पोस्टचा प्रतिवाद आपण प्रभावीपणे केला आहे. तोही त्यांच्याबद्दल पूर्ण आदर बाळगून.

रीसर्च स्क्वेअरमधील पेपर वाचण्याचा प्रयत्न करीत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

रोग आवरला पाहिजे एवढेच आम्ही म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख छान आहे त्यांनी तळमळी नी लिहला आहे .
सर्व मान्य आहे
जी त्यांनी मत मांडली आहेत ती त्यांनी स्वतः प्रयोग करून ,निरीक्षण करून,deta जगातील स्वतः जमा करून मांडली नाहीत.
संशोधन आणि विज्ञान हे ओपन असावे .
प्रत्येकाचे निरीक्षण,निष्कर्ष ह्याला किंमत असावी.
जगात खूप भयंकर घडत आहे .
शास्त्रीय काय हे ठरवण्यासाठी संघटित यंत्रणा आहेत .
त्यांची मंजुरी असेल तर च शास्त्रीय त्यांची मंजुरी नसेल तर अशास्त्रीय असे विभाजन होत आहे
प्रायोजक संशोधक,प्रायोजक मंजुरी देणारी यंत्रणा
ह्यांची संघटित यंत्रणा आहे
आणि हेच चुकीचे आहे
शास्त्रीय काय आणि अशास्त्रीय काय हे ही संघटित यंत्रणा ठरवत असेल
तर विज्ञान चे भविष्य अंधरकाय मयआहे.
प्रत्येकाच्या मताला किंमत हवी
जो महत्वाच्या विषयावर मत मांडतो आणि त्याचा संबंध कोणत्याच राजकीय,आर्थिक संस्था शी नसतो तेव्हा तो त्याचा खरा अनुभव मांडत असतो.
हे अशास्त्रीय हे शास्त्रीय हे ठरवू नका.
लोकांना येणारे खरे अनुभव हे सर्वात जास्त किंमती आहेतं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ1

1) मास्क वापरणे .कोणता ह्या बाबत पण मतभेद.
२) हात स्वच्छ धुणे.

साबणाने की sanitizer नी.
३) दोन माणसात अंतर असावे त्याला सोशल
Distance हा शब्द का वापरतात हे काही कळत नाही.

मास्क.
कष्टाचे काम करणारे शेतकरी,मजूर ह्यांनी मास्क वापरला की श्वास घेण्यात अडचण येते काम करताना दम लागतो
वॉकिंग जॉगिंग , gym करताना मास्क वापरला तर श्वास घेण्यास खूप त्रास होतो
त्यांनी सर्व सोडून घरी मास्क लावून बसावे का?
हात धुणे.
प्रत्येक वस्तू ल हात लावला की हात साफ केला पाहिजे हे अपेक्षित असेल तर हजार वेळा तरी रोज हात साफ करावे लागतील.
हे अशक्य आहे.
दोन लोकात अंतर.
मुंबई ,पुणे किंवा भारता मधिल प्रत्येक शहरात ९ By ९ च्या खोलीत बारा लोक राहतात
त्यांनी अंतर कसे ठेवावे.
सार्वजनिक वाहतूक इतकी कमजोर आहे की .
बस,ट्रेन,जीप ह्या साधनात क्षमते पेक्षा १०० टक्के जास्त लोक असतात त्यांनी अंतर kase राखावे.
चला उपाशी राहून, कष्ट सहन करून
रानावनात एकटे राहून, हजार वेळा हात स्वच्छ
करून. सर्व नियम पालन करून.
Covid नष्ट होईल ह्याची खात्री आहे का?
कोण जबाबदारी घेण्यास तयार आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक2
  • पकाऊ0