शुभवर्तमान...? (भाग ३)
(जून महिन्यातील विदा इथे)
गृहीतके :
१. एकदा माणूस कोरोनाबाधित झाल्यावर किमान काही काळ, म्हणजे काही महिने तरी त्याच्या शरीरात काही प्रतिकारक्षमता निर्माण होते. (भले ती टिकेना का वर्षभर), आणि
२. किमान एक डोस लसीकरण झाल्यानंतर दोनतीन आठवडयांनी किमान काही काळ टिकणारी तरी (किमान ८४ दिवस तरी?) प्रतिकारशक्ती निर्माण होते.
या टेबलमध्ये किमान किती लोकांना लस दिल्याने किंवा विषाणूची बाधा (इन्फेक्शन) झाल्याने किमान तात्पुरती तरी प्रतिकारशक्ती निर्माण झाली असावी (आणि त्याची जिल्हावार टक्केवारी किती) ही माहिती देत आहे.
याचा थेट संबंध नवीन लाट समजा आलीच तर ती किती झपाट्याने वाढू शकते किंवा मर्यादित राहू शकते याच्याशी आहे .
या विदेच्या मर्यादा काय हे जाणून घेऊयात.
आकडेवारीचा जिल्हावार अभ्यास करताना फक्त लसींचे डोस किती, ही माहिती मिळत आहे. पहिला डोस घेतलेले किती आणि दुसरा डोस घेतलेले किती ही माहिती कळू शकत नाहीये. पूर्ण देशाचा विचार केला तर एकूण लसीकरणाच्या सुमारे एकवीस टक्के लोकांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. हाच टक्का इथे लावला तर लसीकरण झालेल्या लोकांची संख्या साधारणपणे दहा टक्क्यांनी कमी होईल.
दुसरी मर्यादा म्हणजे पॉझिटिव्ह रोग्यांच्या आकड्यात बऱ्यापैकी अंडररिपोर्टींग झाले आहे असे मानले जाते. हा आकडा किती हे नक्की कुणालाच माहीत नाही. त्यामुळे अधिकृत आकड्यावरच अवलंबून राहणे भाग आहे. या अंडररिपोर्टींगमुळे बाधित लोकांची संख्या आपण वास्तवापेक्षा थोडीफार कमी मानत असणार.
या दोन्ही मर्यादांच्या मुळे आपण काढलेल्या निष्कर्षांमधे २ ते ५ टक्क्यांचा फरक पडू शकेल असा अंदाज (फक्त अंदाज).
अर्थात किमान कोरोना विषाणूविरोधी अजिबात प्रतिकारशक्ती नसलेली susceptible जनसंख्या हळूहळू कमी होत चालली आहे हे नक्की. त्यातल्या त्यात पुणे जिल्ह्यात ही संख्या तीस पस्तीस टक्यांच्याइतकी खाली आली असावी हे उत्तम दिशादर्शक असे म्हणायला हरकत नाही.
अर्थात लॉकडाऊन संपल्यावर आता मास्क, सोशल डिस्टंसिंग, उगाच गर्दी ना करणे वगैरे त्रिसूत्री न पाळण्याचा हलगर्जीपणा आपण करायला नको.
आणि अर्थातच पुढच्या काही काळात अत्यंत वेगळी रचना असणाऱ्या आणि आत्ताच्या लसींना निरुपयोगी ठरवणाऱ्या एखाद्या variantने येऊन धुमाकूळ घालायला नको.
वेगवान लसीकरण हाच उपाय.
जास्तीत जास्त लोकसंख्येचे (टक्केवारीत) वेगवान लसीकरण केल्याने काय साध्य होते (केसेस वाढतात, पण त्या मुख्यतः लसीकरण न केलेल्या लोकांच्या आणि आधीच्या लाटेच्या तुलनेने खूप कमी लोकांना गंभीर आजार आणि हॉस्पिटलमध्ये भरती व्हायला लागते), याचे उत्तम उदाहरण म्हणजे ब्रिटनमध्ये लॉकडाऊन उठविल्यावर गेल्या दीड महिन्यात जे बघायला मिळाले त्यावरून लक्षात येईल. त्याविषयी माहिती पुढच्या वेळी.
या विद्यातली एक त्रुटी अशीपण
या विद्यातली एक त्रुटी अशीपण आहे की पुणे जिल्ह्यात सुमारे ११ लाख करोना बाधित असले तरी त्यातील पावणेचार लाख लोक १ जाने २१ पूर्वी बाधित झालेले आहेत. त्या लोकांमधील प्रतिकार शक्ती दुसऱ्या लाटेत टिकलेली असेल का हा प्रश्न आहे. टिकली असेल तर चांगलेच आहे. पण ती नसेल तर रिसेंटली बाधित रुग्णांचा आकडा चार लाखांनी कमी धरावा लागेल आणि मग पुणे जिल्ह्याची टक्केवारी ६९ ऐवजी ६५ टक्के दिसेल. अर्थात हा काही सिग्निफिकंट फरक नाही.
एस प्रथिनाविरुध्दचीच अँटीबॉडी मोजणे आवश्यक आहे
या व्हायरसची निदान २०-२५ प्रथिने असतात. यातील , बाह्य भागावरील एस प्रथिनाविरुध्दचीच अँटीबॉडी मोजणे आवश्यक आहे. बाकीच्या अँटीबॉडीज असल्या तर "प्रतिकारशक्ती" आहे असे म्हणता येणार नाही. (व्हायरसच्या सर्वात मोठ्या "एन" प्रथिनांविरुद्धची अँटीबॉडी मोजण्याची एक प्रवृत्ती दिसते: या अँटीबॉडीला प्रतिकार-शक्तीच्या दृष्टीने विशेष अर्थ नाही, आणि अशा विदाने दिशाभूल होणार आहे!). मात्र टी सेल्स च्या बाबतीत सर्वच प्रथिने प्रस्तुत ठरतात. पण ते मोजणे अवघड !