म्युकरमायकोसिस उर्फ काळी बुरशी
म्युकरमायकोसिस उर्फ काळी बुरशी
म्युकरमायकोसिसनं (Mucormycosis), उर्फ काळी बुरशी (Black fungus) सध्या मीडियामध्ये हाहाःकार माजवला आहे. लोक खूप घाबरले आहेत याला. तर त्याबद्दलच चर्चेसाठी हा धागाप्रपंच.
म्युकरबद्दल पदव्युत्तर शिक्षणात शिकताना आम्हांला पहिलं वाक्य हे असायचं की हे एक अत्यंत दुर्मीळ फंगल इन्फेक्शन आहे. कोव्हिडच्या काळानं मात्र हे वाक्य खोटं ठरवलं. तर पहिली गोष्ट ही समजून घ्या, की हा काही नवीन रोग नाही. आधीपासून याबद्दल आपल्याला माहिती होती, फक्त आता हा खूप जास्त प्रमाणात (पूर्वीपेक्षा) दिसून येतोय.
कोव्हिडच्या रुग्णांना हा रोग का होतोय?
१. म्युकर फंगसचे बीजाणू (स्पोअर्स) सगळीकडे, सर्रास (ubiquitous) असतात. असं असूनही तो इतका दुर्मीळ (rare) आजार होता, कारण तो फक्त अशाच लोकांना होत असे ज्यांची प्रतिकारक्षमता खूप म्हणजे खूपच कमी झालीये. सहसा अनियंत्रित मधुमेह असलेल्यांना हा होत असे. कोव्हिड झालेल्या लोकांमध्ये रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे ते म्युकरला बळी पडतात.
२. कोव्हिडची काही गुंतागुंत (cytokine storm) थांबवण्यासाठी स्टेरॉइड प्रकारची औषधं दिली जातात. या औषधांमुळे रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढतं; शिवाय प्रतिकारशक्ती कमी होते, दोन्ही गोष्टी म्युकर आजारासाठी घातक आहेत.
३. कोव्हिडमधे रक्तातल्या फेरिटिन नावाच्या लोहयुक्त पदार्थाचं प्रमाण वाढतं, हेही म्युकरच्या वाढीला पोषक ठरू शकतं.
४. ऑक्सिजन ट्यूबमधून याची लागण होत्ये का अशी शंका होती. पण घरी विलगीकरण झालेल्या आणि ऑक्सिजन न दिलेल्या काही लोकांनाही हा आजार झाला आहे. तरीही ऑक्सिजन नळीची स्वच्छता ठेवणे/ बदलणे, humidifier भांड्याची स्वच्छता ठेवणे हे करणे योग्यच आहे.
५. शरीरातील जीवाणू (bacteria) बुरशीचे स्पर्धक असल्यासारखे काम करतात. कोव्हिडमध्ये देत असलेल्या प्रतिजैविक (ॲन्टिबायोटिक) औषधांमुळे जीवाणू कमी होतात, त्यामुळे बुरशीची स्पर्धा कमी होऊन वाढ अधिक आणि जलद होते.
हा फंगस एकाचा दुसऱ्याला पसरू शकतो का?
करोना विषाणूसारखा या बुरशीचा संसर्ग एकापासून दुसऱ्याला अजिबात होत नाही. बुरशीचे स्पोअर्स नाका-तोंडातून किंवा कानाचा पडदा फुटला असेल तर तिथून चेहऱ्यातील सायनसेस या हाडांच्या पोकळीत शिरतात. पण आधी सांगितल्याप्रमाणे ते स्पोअर्स सगळीकडे असतात. त्यामुळे संसर्ग झालेल्याच्या संपर्कामुळे कोव्हिडचा असला, तरी म्युकरच्या संसर्गाचा धोका नसतो.
या रोगाचे काय परिणाम होतात? लक्षणे काय आहेत?
ही बुरशी स्पोअर्समधून कवकतंतु (हायफे) रूपामध्ये वाढायला लागते आणि रक्तवाहिन्या अडवते, ब्लॉक करते.
हा रोग फक्त नाकापर्यंत असताना सुरुवातीची लक्षणं - घाण वासाचा किंवा रक्तमिश्रित शेंबूड येणं. या स्टेजवर जर नाकात एण्डोस्कोपी - दुर्बिणीने चिकित्सा - केली तर काळ्या रंगाचे डाग, पॅचेस दिसतात. यावरूनच याचं नाव काळी बुरशी - black fungus - असं पडलंय.
नाकातून हा रोग सायनसेसमध्ये जातो. तेव्हा चेहऱ्यावर दुखतं किंवा तीव्र डोकेदुखी होते; गालांवर सूज येते. तिथून पुढे हा रोग ऑर्बिटमध्ये - डोळ्यांभोवतीची पोकळी - शिरतो. तिथल्या रक्तवाहिन्या ब्लॉक केल्यामुळे दृष्टी अंधुक होणं, तिरळेपणा येऊन डबल दिसणे, डोळ्यांवर लाली, सूज येणे अशी लक्षणं दिसतात. जर वेळीच याला थांबवलं नाही तर पाहता पाहता बुरशी ऑर्बिटमधून कवटीमध्ये शिरते. एकदा मेंदूला याची बाधा झाली की रुग्ण वाचण्याची शक्यता फार कमी उरते. नाकापासून मेंदूपर्यंतचा प्रवास आठवड्याभरातही होऊ शकतो. म्हणून याचं वेळीच निदान आणि उपचार होणं अत्यावश्यक आहे.
याचं निदान कसं करतात?
(प्रतिमा आंतरजालावरून साभार.)
याचं निश्चित निदान बुरशीच्या पीसीआर चाचणीतून होतं. पण त्याचा रिपोर्ट मिळायला वेळ लागतो. त्यामुळे नाकातल्या ऊती (tissue) खरवडून, त्याच्या मायक्रोस्कोपीने संभाव्य (probable) निदान कळू शकतं. याशिवाय ती कुठपर्यंत पसरली आहे यासाठी पुन्हा पुन्हा एम. आर. आय. (MR angiography) ही चाचणी करावी लागते.
यावर उपाय काय?
यावर काही बुरशीरोधक (antifungal) औषधं आहेत. सगळ्यांत स्वस्त औषध अँफोटेरिसिन-बी (Amphotericin-B) हे आहे. याची गरज आधी खूपच कमी होती (कारण या रोगाचे रुग्णच कमी होते) त्यामुळे ते औषध त्या प्रमाणातच (म्हणजे कमी) बनवलं जात होतं. आता अचानक गरज वाढल्यामुळे कुठेही मिळेनासं झालंय. इतर औषधांचा खर्च लाखांच्या घरात असल्यामुळे ती सामान्य जनतेला परवडण्यासारखे नाहीत. परत औषधं जर रक्तावाटे द्यायची ठरवली तर ही बुरशी रक्तवाहिन्याच बंद करते; त्यामुळे रक्तावाटे दिलेलं औषध जिथे पोचायला पाहिजे तिथे पोहोचेल की नाही हे आधी MR angio चाचणीत कळतं. जर रक्तवाहिन्या बंद झालेल्या असतील आणि बुरशी अजून मेंदूजवळ पोहोचली नसेल तर तिथे पोहोचू नये म्हणून बाधा झालेला भाग काढून टाकणे हाच उपाय उरतो. यामुळेच काही लोकांचे डोळे त्यांचा जीव वाचवण्यासाठी काढून टाकावे लागले होते (orbital exenteration). एकदा बुरशी मेंदूपर्यंत पोचली की कोणताच उपाय लागू पडत नाही.
याला प्रतिबंध (prevention) करता येईल का?
निश्चितच. कोव्हिडची आहे तशी याची प्रतिबंधक लस नाही. पण काही सावधगिरी बाळगली तर आपण याला टाळू शकतो.
१. स्वच्छता. हाताप्रमाणेच चेहरा साबणाने धुणं, शरीराची स्वच्छता ठेवणं.
२. एकदा वापरलेला मास्क परत परत न वापरणं.
३. रक्तातल्या साखरेच्या प्रमाणाबद्दल कोव्हिड झालेल्यांनी तसंच न झालेल्यांनीही जागरूक असणं. ती प्रमाणात, आटोक्यात ठेवण्यासाठी जरूर ते करणं (आहार, व्यायाम, औषधं).
४. वाफारा घेणं. (टीप : वाफारा योग्य पद्धतीने घ्यावा : साधारण पाच मिनिटे, दिवसातून २-३ वेळा) आणि प्रत्येक वापरानंतर भांडे धुवून कोरडे करून ठेवावे. पण खूप जास्त वेळ किंवा जास्त वेळा घेतल्यामुळे नाकाचा म्युकोझा हुळहुळा होऊ शकतो. असे झाल्यास तिथून म्युकर आत घुसू शकतो.)
५. कोव्हिड झालेल्यांनी बिटाडीनच्या गुळण्या करणं. बिटाडीन या बुरशीला मारून टाकतं.
६. स्टेरॉइड औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय न घेणं.
या साध्या सोप्या उपायांनी आपण या बुरशीचा टाळू शकतो.
तर सारांश असा की, हा आजार घातक असला तरी घबराट माजण्याची गरज नाही. आजार न होण्यासाठी सोपे उपाय आहेत. याउपरही झालाच तर सुरुवातीची लक्षणं दिसताच उपाय केला तर बरा होतो.
काळजी घ्या, काळजी करू नका!
डॉ. प्राजक्ता कुलकर्णी
नेत्र तज्ञ, मंगलोर.
७१ % केसेस फक्त भारतात आहेत
जगात असलेल्या एकूण ब्लॅक fungas च्या केसेस मध्ये 71% फक्त भारतात आहेत.COVID नी जगातील सर्वच देशांना आपल्या कवेत घेतले होते.
अमेरिका,ब्राझील सारखे देश covid नी मोठ्या प्रमाणात बाधित झाले होते.
पहिली लाट
पहिल्या लाटेच्या वेळेस हा रोग कोणाला झाला होता का ? नसेल तर तेंव्हा का नाही झाला ?
बाकी सर्व म्हणणे ठीक असेलही कदाचित, परंतु...
...rareकरिता 'दुर्मिळ' हे भाषांतर (या संदर्भात) भयंकर आहे. (किंबहुना, भयंकर नसते, तर विनोदी म्हटले असते.) म्हणजे, लोक हे इन्फेक्शन होऊन घ्यायला उतावीळ, अगतिक झालेत, त्याकरिता काय वाटेल ती किंमत मोजायला तयार आहेत, परंतु, हाय दैवा, काय करणार, दाही दिशा धुंडाळल्या तरी प्रेमाकरिता किंवा पैशाकरिता (मराठीत: औषधालासुद्धा) लेकाचे कोठे मिळतच नाही (कोव्हिडच्या सुरुवातीच्या काळात अमेरिकेतल्या दुकानांतून शोधूनसुद्धा टॉयलेट पेपर सापडत नसे, तद्वत), अशी काहीशी धारणा होते.
(तरी बरे, या इन्फेक्शनची टंचाई आहे, वगैरे म्हटले नाहीत.)
तसे पाहायला गेले, तर, (मोल्सवर्थादि शब्दकोश धुंडाळले असता) rareकरिता या संदर्भात फिट्ट बसू शकणारे मराठी प्रतिशब्द तितकेही दुर्मिळ, दुर्लभ किंवा दुष्प्राप्य नसावेत, त्यांची तितकीही टंचाई, वानवा वा दुर्भिक्ष्य मराठीत नसावे. विरळा, क्वचित आढळणारे आदि पर्यायांचा विचार करता यावा.
(अवांतर: Rareकरिता 'किंचित भाजलेले (त्यातून किंचित रक्त अजूनही स्रवत असलेले)' असाही एक पर्याय असू शकतो, परंतु या संदर्भात तो कदाचित उचित ठरणार नाही. असो.)
असेच म्हणावे लागेल.
असेच म्हणावे लागेल.
किंबहुना ही सर्वांमध्ये आधीपासूनच असलेली आणि क्वचितच किंवा विशिष्ठ रुग्णामध्ये प्रादुर्भाव होणारी बुरशी आहे असं म्हणता येईल.
हे ज्ञान परवा सायन रुग्णालयात विभागप्रमुख असलेल्या डॉकटर बाई मराठी वाहिनीवर सांगत होत्या म्हणून मिळाले. लक्षात अशासाठी राहिले की प्रतिनिधी तिला विचारत होती की आधीपासूनच असते म्हणजे आता ती तुमच्या आणि माझ्याही नाकात आहे का? त्यावर त्या शांतपणे होय म्हणाल्या...आणि मला हसू आवरले नाही!
मानवाला हा आजार होण्याची शक्यता खूप च कमी आहे
दुर्मिळ ह्या शब्दाचा अपेक्षित अर्थ मानवाला हा आजार होण्याची शक्यता खूपच कमी आहे असा असावा.ज्याला पोहता येते तो व्यक्ती पाण्यात बुडण्याची शक्यता खूपच कमी आहे असा अर्थ .
फक्त पाण्यात भोवरा नसावा,पाण्याचा वेग खूप प्रचंड नसावा ह्या अटी.
ब्लॅक फंगस माणसाला होण्याची शक्यता खूपच कमी आहे फक्त त्याची रोग प्रतिकार शक्ती अतिशय दुबळी नसावी ही अट .
fungas व दुर्मिळ रोग प्रतिकार शक्ती
या नवसंकल्पनांमुळे गोंधळात पडलो होतो. वेळीच संपादन केल्याबद्दल धन्यवाद.
लेखाबद्दल धन्यवाद
डॉ कुलकर्णी, लेख आवडला. तज्ज्ञांनी आपापल्या विषयाचे इतरांस आकलन करून देणे गरजेचे आहे. आपण रोगाचे स्वरूप, कारणे आणि प्रतिबंधक उपाय मोजक्या शब्दात सांगितले आहेत त्याचा वाचकांना उपयोग होईल.
हा रोग करोना बाधित इतर देशांच्या तुलनेत भारतात ज्यास्त का दिसतो हा चांगला प्रश्न आहे. ज्यास्त तापमान, आर्द्रता आणि अस्वच्छता ही कारणे असू शकतील का? की मेटाबोलिक सिन्ड्रोम (चू. भू. द्या. घ्या.) दक्षिण आशियात - विशेषतः पुरुषांत - ज्यास्त प्रमाणात आढळतो हेही कारण असू शकेल? तसे असेल तर भारतीय पुरुषांत काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव स्त्रियांपेक्षा ज्यास्त दिसतोय का?
पहिल्या लाटेच्यावेळी मुद्दलातच करोनाच्या केसेस संख्येने आणि तीव्रतेने कमी होत्या काय? त्यामुळे तेंव्हा हा आजार लक्षात आला नसावा काय?
….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!
माहितीपूर्ण आहे लेख.
रंगीबेरंगी बुरशा येत आहेत. पांढरी, काळी आता पिवळी.
पावसाळ्यात भिजलेल्या कपड्यांमुळे त्वचेला फंगल इन्फेक्शन होते एवढेच अनुभवले होते.
कोरोनामुळे काय काय बघायचे राहिलेय कळतच नाही बुवा.
सर्वसामान्यांनी किती आणि काय सहन करायचं.
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
जिवंत व्यक्ती च्या शरीरात बुरशी वाढते
तेव्हा ती कशी वाढते ह्या साठी बुरशी साठी असणारे नियम कसे काय लागू होतील.
1) कोंदड वातावरणात बुरशी वाढते.
मग काय कपडे पण वापरायची नाहीत का?
२) ओलसर वातावरणात बुरशी वाढते.
जिवंत माणसाचे डोळे आणि तोंड सदा सर्वकाळ ओले च असते आणि ते तसे असणेच गरजेचे आहे.
बाहेरच्या वातावरणात ,झाडावर,जमिनीवर वाढणाऱ्या बुरशी ची आणि मानवी शरीरात वाढणाऱ्या बुरशी ची तुलना कशी काय होईल.
मृत शरीरावर वाढणारी बुरशी आणि जिवंत शरीरावर वाढणारी बुरशी ह्यांची तुलना कशी काय होईल .
.एक लघु शंका.