आरशात बघताना

#ललित #संसर्ग #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२०

आरशात बघताना

- सई केसकर

बारावं सरून तेरावं वर्ष लागलं असावं. भरतनाट्यमच्या क्लासची सुट्टी सुरू होणार होती. चार वर्षांची असल्यापासून ताई मला बघत होती. माझी जडणघडण ताईच्या डोळ्यांदेखत झाली होती. त्या वर्षी, सुट्टी सुरू होताना ताईनं बरीच लांब प्रस्तावना देऊन एक सूचना दिली. मला आणि माझ्याबरोबर शिकत असलेल्या दुसऱ्या एका मुलीला. ‘आपण जेव्हा स्टेजवर जातो, तेव्हा आपली देहबोली आपल्या चेहऱ्याइतकीच महत्त्वाची आहे आणि ती चांगली दिसावी असं वाटत असेल तर आपलं वजन योग्य हवं,’ अशा अर्थाचं काहीतरी होतं. पुढेही ताई खूप बोलली. सगळं अतिशय मुद्देसूद आणि पटण्यासारखं होतं. पण तेव्हा पहिल्यांदा एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या तोंडून, इतर ठिकाणाहून आडून आडून येत असणारी टीका ऐकली. आणि सगळ्या वर्गासमोर आमच्या दोघींची नावं घेऊन हे भाषण सुरू झालं होतं त्यामुळे मनात फक्त एकच विचार होता, "नशीब तिचंपण नाव घेतलं." सुट्टीत वजन कमी करण्यासाठी ताईनं जे जे सांगितलं, ते आजही मी नियमितपणे करते.

"एखादं मस्त गाणं लावायचं," ताई म्हणाली होती, आणि तिनं 'परदेस'मधलं शाहरुखचं 'ये दिल दिवाना' सुचवलं होतं. त्या गाण्यावर हजार दोरीच्या उड्या मारायच्या. साखर आणि भात पूर्ण बंद. ती सुट्टी मी फक्त व्यायाम करण्यात घालवली. सकाळी आई-बाबा ऑफिसला गेले की मी कॅसेट लावून हजार उड्या मारायचे, नंतर असेच अनेक व्यायाम प्रकार करायचे. आणि संध्याकाळी टेकडी चढायचे. आपण किती बारीक होतो आहोत वगैरे मोजमाप तेव्हा विशेष केलं नव्हतं. पण जूनमध्ये पुन्हा क्लास सुरू झाला, तेव्हा ताईनं सगळ्यांना आम्हा दोघींसाठी टाळ्या वाजवायला लावल्या होत्या. तो 'विजय' अजिबात आवडला नव्हता. त्या वयातही वजन कमी करून दाखवल्याबद्दल लाजच वाटली होती.

इतके दिवस, 'तुम्ही लहान आहात अजून', म्हणून नवरसांमधले काही रस ऑप्शनला असायचे, ते आता शिकवायला घेतले होते. आणि नायक सामोरा आल्यावर चेहऱ्यावर काय भाव यायला हवेत, हे आता ताईनं न दाखवतादेखील जमायला लागलं होतं. ताई माझ्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या हावभावांचं खूप कौतुक करायची. पण... पुढे नेहमी एक पण असायचा. आणि तो आला की आधीचं कौतुक विसरून जायला व्हायचं. तेव्हा आपण शिकतोय ती नृत्यकला आहे, आणि तिचं सादरीकरणाचं माध्यमच शरीर आहे म्हणून या सूचनांचा राग यायचा नाही. पण पाळी येण्याआधीच, आपलं शरीर चुकीचं दिसू शकतं, चुकीचं असू शकतं, याची पूर्ण जाणीव झाली होती.

आजी आईला माझ्या वयात येण्याबद्दल विचारायची. कोल्हापुरात पाळी आली की मुलीला साडी नेसवतात. मला पाळी येण्यापेक्षाही त्या साडी नेसायच्या विधीची धास्ती होती. शेवटी तीन पिढ्यांमध्ये अनेक वाटाघाटी झाल्या आणि जेव्हा तो दिवस उगवला तेव्हा सगळ्यांनी थोडी थोडी तडजोड करून तो पार पाडला. शाळेत मात्र एक निर्लज्ज आणि टवाळ मुलींचा गट होता, त्यांना जेव्हा बातमी समजली, तेव्हा त्यांनी मला दहा-बारा धपाटे घालून माझ्या मनावरचा सगळा ताण घालवला होता.

आपण सुंदर आहोत का? सुंदर म्हणजे काय? आणि सुंदर असावं का? आपण सुंदर आहोत असं आपल्याला कळलं तर त्याबद्दल आपल्याला नेमकं काय वाटलं पाहिजे? असे अनेक प्रश्न तेव्हा पडायचे. सुंदर म्हणजे काय, याची सुरुवातीला एक पुसटशी कल्पना असायची. पण वर्षं सरत गेली तसे हे ठोकताळे अगदी स्पष्ट झाले. आणि वरच्या प्रश्नांची उत्तरंही मिळत गेली. अभ्यास आणि सौंदर्य याचं प्रमाण व्यस्त असायचं. सुंदर मुली मठ्ठ असतात, किंवा त्यांना आपण सुंदर आहोत, असं समजलं की त्या आपोआप मठ्ठ होऊ लागतात, असा काहीतरी नियम पालकांनी शोधून काढला होता. त्यामुळे वर्गातल्या गोऱ्या, उंच, चवळीची शेंग वगैरे मुलींची आयुष्यं सौंदर्यानं काही फार सुसह्य केली नव्हती. तसंच, आपण तशा दिसत नाही म्हणून आपण खूप हुशार आहोत, याचा प्रत्ययही काही केल्या आला नाही.

ते वय आपण व्यक्ती म्हणून नक्की कोण आहोत, हे शोधायचं वय असतं. अर्थात, आपण कोण आहोत यात आपली लैंगिकता, आपल्याला कुणाबद्दल आकर्षण वाटतं, या आकर्षणाची पुढची पायरी काय असावी, ती पायरी आपण कधी चढायची वगैरे कुतुहलांचं वय असतं. पण निदान मराठी मध्यमवर्गीय समाजात तरी या अशा सगळ्या नाजूक संभावनांवर, या अशा छोट्या छोट्या ठिणग्यांवर बादल्या बादल्या पाणीच ओतलं जायचं. ज्या मुली पठडीबाज सुंदर नाहीत, त्यांना त्या कशा कशा सुंदर नाहीत याची तपशिलवार माहिती अगदी आज्यांपासून शाळेतल्या पोराटोरांपर्यंत सगळ्यांकडून मिळायची. काही काही शब्द अडले आणि त्यांचे अर्थ विचारले, तर ते सांगण्याइतकी पारदर्शकता वडीलधाऱ्या टीकाकारांमध्ये नसायची. उदाहरणार्थ, 'उफाड्याची'. या शब्दाचा अर्थ मला तो शब्द वापरणाऱ्या एकाही आजीबाईनं सांगितला नाही. पण त्या कुणाकुणासाठी तो वापरतात, यावरून मी माझाच स्वतंत्र डेटाबेस केला होता. आणि निष्कर्ष असा की, तो शब्द काही फार चांगल्या अर्थी वापरलेला नसायचा. असे शब्दच मग शाळेच्या युनिफॉर्मच्या आतमध्ये दोन ब्रा घालून जायला कारणीभूत ठरायचे.

पण याचा अर्थ, ज्या मुली सुंदर आहेत त्यांच्या सौंदर्यावर उत्स्फूर्त, आनंदी प्रतिक्रिया येतील असेही नव्हते. मुलगी सुंदर आहे, म्हणजे तिला जास्त धाकात ठेवा; तिचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत यावर सतत लक्ष ठेवा. मुलगी सुंदर असेल तर तिनं साधं असलंच पाहिजे, असा एक ठेका असायचा. तरी काही मुलींना त्यांच्या आया पार्लरमध्ये वगैरे जाऊ द्यायच्या. पण स्वतःचं सौंदर्य खुलवण्याला सामाजिक मान्यता तशी कमीच होती, निदान शाळकरी दशेत तरी.

सोळाव्या वर्षी मी पहिल्यांदा जिममध्ये गेले असेन. पण तो अनुभवही अतिशय नकारात्मक आणि नाईलाजाने करायचे काहीतरी, असाच होता. व्यायाम का करायचा, याचं उत्तर चांगलं दिसण्यासाठी असंच असायचं. पण हळूहळू व्यायाम आवडायला लागला. अर्थात तेव्हा आजूबाजूचे लोक काहीही खाऊन बारीक राहतात आणि आपण सगळं मोजून खातो याची चीड असायचीच. पण काही का असेना, आपल्या शरीरात जे चूक आहे, ते सुधारायची गुरुकिल्ली मिळाली होती. आणि आता अगदी चवळीची शेंग वगैरे नाही, पण आपल्याला मिळालेल्या कच्च्या मालाचं त्यातल्या त्यात बरोबर दिसणारं रूप टिकवायला जमायला लागलं होतं. हे करत असताना अनेक प्रश्न पडायचे. एखादी व्यक्ती थोडी स्थूल आहे, म्हणजे नक्कीच तिचा खाण्यावर काहीही ताबा नसणार, हे एक गृहीतक. पण आजूबाजूला माझ्यासाठी निषिद्ध असं सगळं जंक फूड खाऊन किडकिडीत राहणाऱ्या मुली होत्या. आपलं वजन पटकन वाढतं, बाकीच्यांच्या मानाने कमी खाऊनही वाढतं, आणि यात आपल्याला मिळालेल्या जनुकांचादेखील तितकाच सहभाग आहे हे सोळाव्या वर्षी समजलं होतं पण माझ्या आजूबाजूला असलेल्या कुणातही माझ्याबद्दल आणि माझ्यासारख्या इतरांबद्दल असा विचार करायची क्षमता नव्हती. याबरोबर आपण आपल्या बरोबरीच्या लोकांपेक्षा जास्त व्यायाम करतो, कमी खातो याबद्दल अभिमान वाटण्याऐवजी हे सगळं करावं लागूनही आपण त्यांच्याइतके शिडशिडीत नाही, याबद्दल मनात राग असायचा. पण त्या वयात या रागाला वाट करून द्यायला व्यायामच कामी यायचा.

मग भारताबाहेर जाण्याची संधी मिळाली. तिथे वेगवेगळ्या देशांतून, संस्कृतींमधून आलेली अनेक माणसं भेटली. सडपातळ लोक आवड म्हणूनही व्यायाम करतात, आणि तो करताना अपरंपार अपराधी भावना बाळगायची गरज नाही, हे लक्षात आलं. पण तिथेही स्त्रीदेहाची व्यथा जरा जास्तच दाहक होती. भारतात या सतत 'बारीक हो', 'अशी दिसायला पाहिजे', 'तशी दिसायला पाहिजे' अशा सूचना देतात, त्याला 'बॉडीशेमिंग' म्हणतात याचा साक्षात्कार झाला. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, त्यानं सतत आपल्याला आपण जाड आहोत, असं सांगितल्याने कसं वाटतं, याचा अगदी जवळून अनुभव घेतला. पण तेव्हा माझ्या हातात हुकमी एक्का आहे, हे मला नेहमी माहीत असायचं. माझं शरीर मी अन्न आणि व्यायाम या दोन गोष्टी वापरून हवं तसं बदलू शकते, ही भावना अतिशय आनंददायी होती.

तेव्हा दिवसातून दोन ते अडीच तास व्यायाम चालू झाला. सकाळी पाऊण तास पळणे, संध्याकाळी एखादा किलोमीटर पोहणे, आणि आठवड्यातून दोन दिवस योग. अनेक महिने वजन केलं नव्हतं आणि मग एक दिवस काट्यावर चढून बघितलं तर सुखद धक्का बसला. मला शाळेतल्या सगळ्यांना फोन करून करून सांगावंसं वाटलं होतं. पण हे असं करण्यात फार काही हशील आहे, असं वाटलं नाही. एक चूक सुधारली की अजून शंभर चुका समोर यायच्या. आपला रंगच काळा आहे, आपलं नाकच धड नाही, आपण उंच नाही, कितीही पळालो तरी आपण कोकाकोलाच्या बाटलीसारख्याच दिसतो, आपलं पोट गोऱ्या, परदेशी मुलींसारखं सपाट नाही, त्यामुळे आपल्याला टू पीस बिकिनी घालता येत नाही, एक ना अनेक.

हळूहळू आपण हे आपल्या जोडीदारासाठी करतोय की आपणच असे क्रूर, स्वतःला सारखे सारखे रडवणारे झालोय, याचा काही पत्ता लागेनासा झाला. फक्त एवढंच लक्षात राहिलं होतं की पळताना रडता येत नाही. एका वेळी एकच काहीतरी नीट करता येतं. त्यामुळे मी सिमेंटच्या फुटपाथवरून पळत सुटायचे. एक आयपॉड शफल होता तेव्हा माझ्याकडे. तो मला काही कल्पना न देता एका पाठोपाठ एक गाणी लावायचा. रोजच्या काट्यावर चालणाऱ्या दिवसात, ते एकच काय ते असं उत्स्फूर्त असायचं.

त्या सिमेंटच्या रस्त्यांवर पळाल्याच्या खुणा अजून शरीरात कुठे कुठे आहेत. आणि थंडी पडली की त्या सगळ्या दिवसांची हटकून आठवण करून देतात. अतिव्यायाम आणि अति डाएट हे दोन्ही सातत्याने करत राहणे यांना मानसशास्त्रात "इटिंग डिसॉर्डर्स" म्हणतात. यात वजन वाढीच्या भीतीने कमी खाणे (ॲनोरेक्सिया), कमी वेळात काय वाट्टेल ते आणि वाट्टेल तसं खाणे (बिंज इटिंग), खाऊन लगेच मुद्दाम उलटी करणे (बुलिमिया), लॅक्सेटीव्हचा अतिवापर करणे असे काही प्रकार मोडतात. त्या काळात यातला कुठलाच प्रकार मी ठळकपणे केला नसला तरी अति व्यायाम आणि अति डाएट या दोन गोष्टी मात्र मी नक्की केल्या होत्या. एकदा रक्तदान शिबिरात भाग घेतला तेव्हा मी प्रचंड ॲनिमिक आहे हे लक्षात आलं. तेव्हापासून मी व्यायाम कमी केला आणि चांगला आहार वाढवला. पण एव्हाना माझ्या बारीक शरीराची मला खूप सवय झाली होती. त्यामुळे आपलं वजन वाढणार हे मान्य करणं खूप जड गेलं होतं.

आपण कसं दिसतो हे महत्त्वाचं नाही, आपण कोण आहोत हे महत्त्वाचं आहे, हे अगदी साधं, कुणालाही पटण्यासारखं तत्त्व आहे. पण मग आजूबाजूला, अनेक छोट्या-छोट्या गोष्टींमधून बरोबर या उलट प्रचार का होताना दिसतो?

वयाची तेवीस वर्षं, सतत टीव्हीवर 'फेअर अँड लव्हली' नावाच्या क्रीमची जाहिरात बघण्यात घालवली. शाळेत, अगदी आठवीत असताना एकदा वर्गाबाहेरच्या कॉरिडॉरमध्ये मुलींचा घोळका उभा होता. काय चाललंय म्हणून तिथे गेले तर गोल करून सगळ्यांनी आपापले हात मध्ये ठेवले होते आणि त्यांतून 'सगळ्यांत गोरी कोण आहे' याची स्पर्धा चालली होती. त्यातून जी सगळ्यांत गोरी निघाली ती जाड आहे, म्हणून तिला पुढच्या स्पर्धेतून बाद केलं. या अशा सगळ्या आठवणी मनातल्या एका कोपऱ्यात घेऊन मी एकदा 'स्टोरी ब्रिज'वरून धावत होते. धावता धावता धाप लागली म्हणून कठड्यावर रेलून पाण्याकडे बघत दम खात होते. तेवढ्यात एक गोरी बाई शेजारी अशीच श्वास घ्यायला थांबली आणि माझ्याकडे बघून म्हणाली, "तुझा रंग किती सुंदर आहे! मला असा रंग कुठल्याही टॅनिंग स्टुडिओमध्ये मिळणार नाही". आयुष्यभर जे ऐकत आलो आहोत त्याला असा तडा गेला की खूप चीड यायची.

युनिव्हर्सिटीबाहेर एक कॉफीचा स्टॉल होता. कधी कधी तिथून एखादी कापुचिनो घेऊन जायचे. एकदा माझी कॉफी बनवता बनवता बरिस्ता म्हणाला, "तुझ्यासारखे हसणारे डोळे मी पहिल्यांदा पाहतोय. इट इज नॉट जस्ट युअर आईज, इट इज हाऊ युअर स्माइल रीचेस देम". त्याआधी आणि त्यानंतर असं वाक्य मी परत ऐकलं नाही. पण तेव्हा त्याला गडबडीत कसंतरी 'थँक्यू' म्हणून, "हा कॉफी खपवायला असं म्हणाला असेल का?" म्हणून उलटतपासणी केल्याचं स्पष्ट आठवतं आहे. आपल्याला कुणी सुंदर म्हणालं, तर त्याचा स्वीकार कसा करायचा, याबद्दलसुद्धा अशीच उदासीनता का असावी? समोरचा माणूस आपल्याला दिलखुलास कॉम्प्लिमेंट देऊ शकत नाही का?

आपण या सगळ्यातून बाहेर आलं पाहिजे; शरीर हे फक्त माध्यम आहे. जगायचं, खाल्लेलं अन्न पचवायचं, ज्ञान गोळा करायचं, प्रवास करायचं असं हे माध्यम आहे; शरीराचा वापर कुठलीच वासना शमवण्यासाठी झाला नाही पाहिजे; हिंदू धर्मात सांगितलं आहे तेच खरं, अगदी इथपर्यंत विचार जायचे. आपल्याला हे जे होतंय, ती एखादी मनोविकृती असेल का? याचाही खूप विचार केला आणि काही अंशी ते खरं वाटायला लागलं. पण माझ्या आजूबाजूच्या तथाकथित मनोरुग्ण नसलेल्या मुलींनाही असे प्रश्न होते. असं एक एक तास पळणं, पोहणं, जागेपणीचा पंचवीस टक्के वेळ व्यायामाला देणं, मोजून-मापून खाणं, असं किती वर्षं करायचं? आपण कधीच वजनकाट्याची धास्ती न घेता जगायचं नाही का? आणि आपलं नातं टिकवण्यासाठी आपल्याला जर आयुष्यभर असं जगावं लागणार असेल तर आपण ते आत्ताच तोडलेलं बरं नाही का? पुढे जर सगळेच लोक असे भेटले, तर आपण एकटं राहणं, आपल्या तब्येतीसाठी जास्त योग्य नाही का? असे अनेक प्रश्न सतत भेडसावायचे. पण या सगळ्याची उत्तरं आणि भारतीय संस्कृती, त्यातही मराठी मध्यमवर्गीय संस्कार याचा ताळमेळ लागायचा नाही.

यातच मग पाश्चात्य देशांमध्ये चालू असलेल्या बॉडी-पॉझिटिव्हिटी चळवळीविषयी बरंच वाचन झालं. सगळीच शरीरं, यंत्रवत चारा खाऊन एकसारखी दिसू शकत नाहीत. या अगदी मूलभूत सत्याला कुणीतरी वाचा फोडत होतं आणि मला त्याबद्दल सगळं सगळं वाचायचं होतं. आपण जसे आहोत, जसे दिसतो त्याचा आनंदानं स्वीकार करायचा. आता अनेक मोठीमोठी फॅशन नियतकालिकं त्यांच्या कव्हर पेजवर आजूबाजूला जशा बायका असतात, तशाच मॉडेल्स घेऊ लागली. त्या बायकांना ‘प्लस साइझ’ असं म्हणायची प्रथा सुरू झाली होती. पण प्लस साइझ म्हणजे तरी काय? त्या मॉडेल्स माझ्यासारख्या दिसायच्या पण त्यांनाही प्लस साइझ म्हटलं जायचं.

एखाद्या स्त्रीने ती जशी दिसते तशीच ती सुंदर आहे असं म्हणणंसुद्धा फार मोठी बंडखोरी आहे. त्या काळी जराशा अंगाने पुष्ट अशा एखाद्या प्रसिद्ध स्त्रीला नेहमी, "आय लाइक हाऊ कॉन्फिडन्ट यू आर!" असं काहीतरी म्हणायची पद्धत होती. कारण एखाद्या जाड, सावळ्या, बुटक्या स्त्रीला स्वतःबद्दल आत्मविश्वास वाटतो हेच एक नवल होतं. आणि ते काही अंशी खरंसुद्धा होते. लहानपणापासूनच, तू सुंदर नाहीस, असं शिकवलं असताना, माझ्या आकाराच्या मुलीला हवे तसे कपडे घालून कॅमेऱ्यासमोर जाण्याची हिंमत होते, हाच व्यवस्थेला एक मोठा धक्का होता. काही दिवस मला हे प्रकरण फार आपलंसं वाटलं. पण लहानपणापासून घरात मधुमेही लोक बघितल्यामुळे या चळवळीचा "हवं ते खा", हा भाग मात्र मी आत्मसात करू शकले नाही. किंबहुना आंधळी बॉडी पॉझिटिव्हिटी फारशी रुचली नाही. त्यापेक्षा मला नियमित व्यायाम, पण अतिव्यायाम नाही, आणि ताज्या भाज्या, फळं आणि प्रथिनांचं प्रमाण जास्त असलेला आहार घेऊन आपण जसे आहोत तसा स्वीकार करणं जास्त पटलं.

आपली किंमत इतरांच्या डोळ्यांत का बघायची? अर्थात, तरुणपणी हे स्वतःला समजावणं आणि ते अमलात आणणं अतिशय अवघड असतं. पण तरीही, आपण जशा आहोत, आपण जशा दिसतो आणि मुख्य म्हणजे आपल्यातले इतर अनेक गुण लोकांना आपल्याकडे आकर्षित करत असतात. यात खुमासदार विनोदबुद्धी आहे, सतत, अविरत गप्पा मारायची हौस आहे, प्रवासाची आवड, स्वयंपाकाची आवड, इतकंच काय तर काही काही जण स्क्रॅबल खेळता खेळता प्रेमात पडल्याचंसुद्धा पाहिलं आहे. आपल्या आजूबाजूच्या आभासी, पठडीबाज जगात अशी अनेक माणसं असतात, ज्यांना आपल्यासारखेच प्रश्न पडलेले असतात. शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा ठिकाणी सतत कुठल्यातरी समीक्षेला सामोरं जावं लागतं. त्यामुळे समोरून येणाऱ्या टीकेला कायम महत्त्व दिलं जातं. आपण कुठे कमी पडतो आहोत हे बघितल्याशिवाय प्रगती कशी होणार? पण काही बाबतीत ही भूमिका चुकीची वाटू लागली. विशेषतः वैयक्तिक आयुष्यात. आपण घरी येतो तेव्हा बाहेरच्या खऱ्या-खोट्या टीका टिप्पण्या, लोकांची आपल्याबद्दल असलेली मतं विसरून जाऊन, एखादा जुना फटका टीशर्ट घालून पुस्तकात हरवून जाता आलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला अशी चार तरी माणसं पाहिजेत, ज्यांच्यासमोर आपल्याला आपण आहोत तसं आनंदाने राहता येईल. अशी माणसं मी शोधली आणि मला ती सापडली. अजूनही सापडतात. आणि त्यांच्यामुळे आयुष्य सोपं होतं.

या प्रवासातलं अजून एक मोठे स्थित्यंतर म्हणजे आई होणं. मला जेव्हा समजलं तेव्हा मी अगदी ठरवलं होतं की, आता मी वजनवाढीची अजिबात चिंता वगैरे न करता मला हवं ते खाणार आहे. पण अशातच मला प्रेग्नन्सीमध्ये उद्भवणारा मधुमेह आहे, असं लक्षात आलं. त्या बातमीनं माझ्या या वजनसंघर्षाला एक अतिशय सकारात्मक ध्येय दिलं. इतकी वर्षं ज्या चुकीच्या ध्येयासाठी चांगल्या सवयी लावून घेतल्या होत्या, त्या सवयींचं ध्येय बदललं. व्यायाम आणि चांगला आहार का घ्यायचा? तर आपल्या आंतरिक स्वास्थ्यासाठी. हे समजले तेव्हा अचानक खूप शहाणं झाल्यासारखं वाटलं. संबंध प्रेग्नन्सी रोज पोहून आणि चालून, आणि साखर पूर्ण बंद करून मी माझा मधुमेह ताब्यात ठेवला. शेवटचा एक महिना मला स्विमिंग पूलवाल्यांनी येऊ नका म्हणून सांगितलं कारण त्यांनाच भीती वाटायला लागली होती. तो महिना मात्र मी डॉक्टरलासुद्धा सांगितलं, मी आता काहीही डाएट वगैरे करणार नाही. जे व्हायचं ते होऊ देत. आईबाबांनी माझ्या गाडी चालवण्यावर, घरातून बाहेर पडण्यावर उगाच निर्बंध घातले. पण जोपर्यंत माझे पाय ब्रेक आणि ॲक्सिलरेटरपर्यंत पोहोचत होते तोपर्यंत मी पुण्यातल्या अनेक आवडत्या रेस्तरॉंमध्ये एकटी जाऊन खाऊन यायचे. मग एक दिवस असा आला की पोट, स्टीयरिंग व्हील आणि ब्रेक यांचा त्रिकोण बसेना झाला, तेव्हा मी घरीच विश्रांती वगैरे घ्यायची ठरवली. डिलिव्हरीच्या आदल्या दिवशीच माझी तपासणी होती. तेव्हा डॉक्टरच्या चोमड्या रेसिडेंटनी मला, "आपको शायद दिखाई नही देगा, लेकिन आप को पता हैं आप का वेट ९० केजी हुआ है!" असं सांगितलं. त्या शिडशिडीत विशीतल्या पुरुषाला "अरेरे, ९०? मुझे लगा था मैं सेंचुरी मारुंगी," असं उत्तर देताना माझ्या मनात पूर्वीचे कुठलेही ताण नव्हते.

मुलगा झाल्यावरही वर्षभर मी कुठलाही आटापिटा न करता, स्वतःला त्रास न करून घेता लठ्ठपणा साजरा केला. आणि नंतर योग्य आहार आणि व्यायामाने पुढच्या वर्षभरात वाढलेलं सगळं वजन कमी केलं. अजूनही काही बेसावध दिवस येतात जेव्हा आपण लठ्ठ झालो आहोत असं लक्षात येतं. पण आता लठ्ठपणा आणि सौंदर्य यांचं समीकरण तोडल्यामुळे पूर्वी वाटायचं तसं असहाय्य वाटत नाही. आणि हल्ली कुणी माझ्यावर लठ्ठ आहे अशी टीकाही करत नाही, किंवा आता कदाचित मला ती ऐकूच येत नाही.

हे सगळं असं लिहायची काय गरज आहे? स्वतःबद्दल एवढा विचारच कशाला करायचा? एवढा आटापिटा करून कशाला बारीक व्हायचं? स्वतःच्या दिसण्याबद्दल एवढी चिकित्सा कशाला करायची? असे अनेक प्रश्न मला अनेकांनी विचारले आहेत. हा लेख वाचूनही असे प्रश्न पडतील.

लहानपणीपासून अगदी साधी साधी वाक्यं मुलींच्या आणि मुलांच्या कानावर पडत असतात. आणि आजूबाजूचे मोठे लोक, पालक, आजी-आजोबा, त्यांच्या बोलण्यातूनच नव्हे तर वर्तनातूनही लहान मुलांना त्यांचं शरीर कसं असावं, हे शिकवत असतात. एखादी आई तिच्या शरीराबद्दल असमाधानी, उदासीन आहे हे अगदी तीन वर्षांचं पोरही समजू शकतं. मराठी बायकांच्या तोंडून अनेकदा एक वाक्य ऐकलेलं आहे, "आमचं काय बाई आता सगळं झालेलं आहे". यात सगळं म्हणजे लग्न आणि मुलं. तरुण मुलं/मुली विशीत असताना आपल्याकडे त्यांच्या दिसण्याची प्रचंड चिकित्सा होते. आणि मांडवातही, "नवरी थोराड आहे. नंतर अजून जाड होणार. शोभत नाही," वगैरे वाक्यं मी सर्रास ऐकली आहेत. पण लग्न आणि मूल झाल्यावर खरंच ही चिकित्सा बंद होते का? बाहेरच्यांच्या दृष्टीने होतही असेल. पण तोपर्यंत त्यांचा आवाज हा आपला आतला आवाज झालेला असतो. आणि हळूहळू तो आपल्या मुलांचा आतला आवाज कसा होतो, ते आपल्या लक्षातही येत नाही.

शरीर हे खरंच एक वाहन आहे. आपल्या मनातली सुखदुःखं वागवणारं, आपल्या लहानपणीच्या आठवणी जपून ठेवणारं, आपल्याला शारीरिक सुख अनुभवायला देणारं. आयुष्यातली पहिली दोन-तीन दशकं हे शरीर समजून घेण्यातच जातात, तेसुद्धा तुम्ही तशी धडाडी दाखवलीत तर. पण आपल्या इतर वस्तूंवर आपलं प्रेम असतं, तसं आपल्या या जडदेहावर सुद्धा प्रेम करता आलं पाहिजे. आणि अगदी पुस्तकी, उत्कट प्रेम जमलं नाही तरी निदान सतत आपल्या शरीराची नकारात्मक चिकित्सा करण्यापासून मनाला थांबवता आलं पाहिजे. लोकांची नजर, त्यांची आपल्या बद्दल असलेली मतं, सामाजिक समजुती वगैरेंवर आपला काहीच उपाय नाही. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन, आपलं शरीरच आपलं शेवटच्या श्वासापर्यंत सोबत करणार आहे हे समजून त्याच्याशी मानसिक सुसंवाद करण्याची शक्ती आपण नक्कीच मिळवू शकतो. माझ्यासारख्या/सारखे इतर कुणी असे असतील त्यांच्यासाठी हा लेख.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

शरीराबद्दल इतका उहापोह प्रथमच वाचला. पुरुष असो वा स्त्री, स्वत:च्या शरीराबद्दल कॉन्शस असतातच. विशेषत: जाडेपणा वा अतिबारीक व्यक्तिंना जे ऐकावे लागते ते बॉडी शेमिंगमध्येच मोडते. सुडौल शरीर राखायचं की जिभेचे चोचले पुरवायचे या द्वंदात माझ्या जिभेचा कायम विजय झाला आहे. आणि आता आयुष्याच्या अखेरीलाही मला त्याबद्दल जराही पश्चात्ताप वाटत नाही. चित्रलेखा चित्रपटातील एका गाण्यात म्हटलेच आहे की , ' ये भोगभी एक तपस्या है, तुम त्यागके मारे क्या जानो'. ते ऐकल्यापासून माझ्या मनांतली अपराधी भावनाही नाहीशी झाली आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा उहापोह थोडा टोकाचा होता.
पण या सगळ्यातून अनेक गोष्टींचे उलगडे झाले.

>>>ये भोगभी एक तपस्या है, तुम त्यागके मारे क्या जानो'

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. रिलेट झाला.बॉडी शेमिंग खूप अनुभवलेले आहे. तीव्र अनुभव आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद!
I hope, तुम्हालाही तुमच्या अनुभवांमधून closure सापडले असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला लहानपणी भीती वाटायची, मी गोरी आहे (म्हणून लोकांना सुंदर वाटायचे), त्यामुळे लोक माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतील. आठवतंय तेव्हापासून ही भीती होती. पीएचडी केल्यानंतरही काही वर्षं लागली ही भीती ओसरायला. तोवर पुरेसा अनुभव आला होता की मी कशीही दिसले तरी लोक सल्ले देण्याचं काम करतच राहणार.

काही वर्षांपूर्वी नियमितपणे व्यायाम सुरू केला तो जरा बारीक राहण्यासाठी वगैरे. त्यातून सवयी बदलत गेल्या; आता साखर जरा जास्त खाल्ली की सगळं चुकल्यासारखं व्हायला लागतं. आता व्यायामाचं व्यसन लागलंय म्हणायला हरकत नाही. व्यायाम केला नाही तर कामाकडे नीट लक्ष लागत नाही; आणि चार-सहा दिवस व्यायाम बुडला तर मनाची अवस्था फारच वाईट होते. आपण अगदीच फालतू आहोत, हे एरवी माहीत असलं तरी त्यामुळे कामं करणं आणि आवडत्या गोष्टींचा आस्वाद घेताना व्यत्यय येत नाही. व्यायाम चुकल्यावर ... नकोच ते!

आता एक वेळ साखर पूर्णपणे सोडून देण्याची तयारी आहे, पण व्यायाम सोडणार नाही.

'द सेकंड सेक्स'मध्ये सिमोन दि बोव्हार लिहिते की बायकांनी आपल्या आयुष्याचा ताबा घेतला पाहिजे. शरीराचाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कधी कधी लहानपणी लठ्ठ होतो ते चांगलं होतं असं वाटतं. कारण त्याशिवाय व्यायामाची सवय लागली नसती. आता जवळपास वीस वर्षं बऱ्यापैकी न चुकता व्यायाम झाला आहे. व्यायाम करण्याची मजा वेगळीच. आपल्याकडे आता व्यायामाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आता लोक उत्साहानं करतात व्यायाम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे लिहिलंस आणि इतक्या सहज भाषेत लिहिलंस यासाठी मनापासून धन्यवाद. इतरांची मतं हळूहळू आपलीच मतं होऊन जाणं आणि पुढची सगळी कारणपरंपरा छान उकललीयेस. आणि त्यावरचं उत्तरही दिलंयस. वा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान वाटलं तुमचा प्रतिसाद वाचून!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख अगदी बरोबरच आहे, आणि कोणीतरी या गोष्टीचा खूप खोलात जाऊन विचार करण्याची गरज आहेच. इथे आलेल्या प्रत्येक प्रतिसादातून प्रत्येकाचा/कीचा 'trauma' दिसतो आहे. पुरुषांना या चर्चेला तोंड द्यावे लागत नाही असं नाही, पण बायकांना अगदी केसांपासून पायाच्या नखापर्यंत शेरे मिळतात, तितकं नसावं.

देशात गेल्यावर सर्वात आधी लोक दिसण्यावरच शेरे मारतात. बाकी बोलण्यासारखं काही सुचत नसेल, आणि २० वर्षांपूर्वीच्या त्यांच्या मनातल्या आपल्या प्रतिमेला तडा गेला, की आधी तेच बोललं जातं. आता व्हिडीओ कॉल मुळे अनेकदा असेल त्या अवतारात 'दर्शन' द्यायची सोय आहे Wink अमेरिकेत 'आरामाची जीवनशैली' वगैरे असल्यामुळे माणसाने वाढत्या वयातसुद्धा निसर्गनियमांच्या विरुद्ध दिशेने अधिकाधिक सुंदर होत जाणे अपेक्षित असते का काय कोणजाणे!

मुळात आपल्याला आपलं दिसणं महत्वाचं वाटत नसेल, तर कोणी काहीही बोलले तरी वाईट वाटायला नको, पण ते तसं होत नाही खरं. एंगेजमेंट नंतर माझ्या कुरळ्या केसांना हात लावून सासूबाई म्हणाल्या होत्या - "हे असेच राहतात का!"
मी म्हंटलं, "हो. मग आता लग्न कॅन्सल करूया का?"

आजकाल फोनवर म्हणतात, "बारीक झालीस की काय?" केवढी प्रगती झाली पहा १७ वर्षात. मी म्हणते, "कसचं काय सासूबाई? जानेवारीपासून साखर सोडीन म्हणते."
व्यायामशाळा लावली, तिला कोविडने दृष्ट लावली, बघू पुढे काय होतंय. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मध्यंतरी केट विंस्लेटची मुलाखत वाचली होती. त्यात ती म्हणाली की घरी आम्ही शरीर आणि दिसण्याबद्दल बोलतच नाही. आणि त्या industry मध्ये ज्या प्रकारे दिसण्याची चिकित्सा होते ते पाहिलं की खरंच त्याचा वीट येणे साहजिक वाटते.
भारतात अजूनही एखाद्याला जाडी वरून चिडवणे, फेसबुकवरही सतत एखाद्याच्या वजनात विनोद शोधणे, तशा कॉमेंट करणे चालू असते. किंवा बायकांवर वयावरून कॉमेंट करणे अगदी सर्रास चालू असते. त्यामुळे कधी कधी आपण शाळेतून बाहेर पडलोच नाही असं वाटून जातं.
कुणालाही खूप दिवसांनी भेटलं की जाड झालास/झालीस वगैरे म्हणावच लागतं भारतात. त्याशिवाय संवाद पुढेच जात नाही. आणि हे किती अनावश्यक आणि ill mannered आहे याची अनेकांना जाणीव नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एंगेजमेंट नंतर माझ्या कुरळ्या केसांना हात लावून सासूबाई म्हणाल्या होत्या - "हे असेच राहतात का!"

हिंदूंमध्ये (किंवा कदाचित सर्वच दक्षिण आशियाई लोकांत) पर्सनल स्पेस नावाची संकल्पना अभावानेच आढळते. किंबहुना, असे काही असते, हेदेखील बहुतेकांच्या गावी नसते.

आत्यंतिक इरिटेटिंग, मॅनरलेस लोक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझी एक रुममेट होती. तिला तर इतका सिव्हीअर ट्रॉमा झाला होता विवाहोपरान्त. नवरा या लेव्हलपर्यंत जाउन तिला म्हणायचा - तुम तो औरतही नही हो!!
WTF!!! ती घरातून एकदा पळून आली होती व माझ्याबरोबर रहात होती. आम्ही दोघी एकाच कंपनीत होतो. एकदा पुढे नवऱ्याला कसा सुगावा लागला देव जाणे पण आमच्या रुमवर येउन तो थडकला. नेमके तिनेच दार उघडले. ती इतकी घाबरली होती. प्लीज सेव्ह मी फ्रॉम हिम असे म्हणत ओरडत, चक्क माझ्या व माझ्या दुसर्या एका रुममेटच्या मागे लपली.
हु द फक गेव्ह हिम राईटस टु कमेन्ट ऑन हर लुक्स? तेही असे की तू स्त्रीच नाहीस असे मला वाटते. कशी कनेक्ट झाली असती ती अशा व्यक्तीबरोबर???
इट्स ट्रॉमा. इट इज ट्रॉमा. आणि चक्क अशा शेण-व्यक्तीबरोबर मन मारुन रहाण्यापेक्षा खरच घर सोडावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि नातेवाईक कितीही जवळचे असले तरी त्यांना स्वतः वजन कमी करावं असं वाटत असेल तरच त्यांनी करावं. बऱ्याचदा पुढे त्रास होऊ नये म्हणून घरातले लोक लठ्ठ व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारे सल्ले देत असतात. पण अनेकदा असं बघितलं आहे की असं सारखं nagging झालं की मुलं/मुली अजूनच खचतात.

माझी एक पार्लर वाली होती. तिच्याकडे आता मी जाणं सोडलं.
अगदी लहानपणी पासून मी तिथे जायचे. मी कशी माझ्या मैत्रिणीच्या मानाने जाड आणि कमी सुंदर आहे हे ती मला नेहमी ऐकवयची. मग मी खूप बारीक झाले त्या काळात तिच्याकडे गेले. तेव्हा मी कशी जाडच चांगली दिसायचे असं ती म्हणाली. मग नंतर लग्नात माझा नवरा कसा बारीक आहे आणि आता मला आयुष्यभर डाएट करावे लागणार वगैरे म्हणाली. तेव्हापासून मी तिला कायमचा रामराम केला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाप रे अशा मैत्रीणी ठेवल्यास सई तर तुला शत्रूंची गरजच उरणार नाही Smile (अगं तुगं करते आहे कारण माझ्यापेक्षा बरीच लहान असावीस.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही लोक फक्त टीका करणं आणि अगोचर सल्ले देणं ह्यांतच तरबेज असतात. असे लोक आपल्या करमणुकीसाठीच आपल्या आयुष्यात आले आहेत, असं मी मानते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Minding one's own business is not an Indian virtue.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारताबाहेर येऊनही त्याचं प्रदर्शन बघता येतं. सुदैवानं त्यांची संख्या, प्रमाण खूप कमी असल्यामुळे, इतर लोकांशी बोलण्याचे पर्याय सहज उपलब्ध असल्यामुळे ह्या प्रकारांतून आपली करमणूक करून घेणं सोपं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख आवडला. रेझोनेट झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

Thank you!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लिहिलं आहे . शाळकरी वयात ' तुझं नाक म्हणजे चष्म्याचा स्टॅन्ड आहे ' असं कोणीतरी मला म्हणालं होत. त्यानंतर कायम S T स्टॅन्ड, पेन स्टॅन्ड वगैरे कधी पाहिले , वाचले कि मला माझ्या नाकाची आठवण यायची. पण यापलीकडे दिसणे याबद्दल फार काही कधी वाटले नव्हते. पण त्यामुळे बावळट गबाळेपणा सुधारण्यासाठी कधी प्रयत्न पण केले गेले नाहीत माझ्याकडून. मुळात आळशी पिंड असल्याने त्याला हे सर्व पोषकच होतं . पण व्यायामाला पर्याय नाही. ती गोष्ट आनंददायक झाली तर दुधात साखर !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

swati

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

छान मांडणी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूपच महत्त्वाचा लेख. आपण प्रत्येकजण (मुलगा किंवा मुलगी) ह्यातून गेलो आहे. 

आता लठ्ठपणा आणि सौंदर्य यांचं समीकरण  

इथे लठ्ठपणाऐवजी रंग, उंची, चष्मा , चेहेर्याची विशिष्ठ ठेवण ( जाड किंवा पातळ ओठ, टप्पोरे किंवा बारीक डोळे) असं काहीही असतं. बऱ्याच मुद्द्यावर अगदी -अगदी असं झालं. थोड्याफार फरकाने ह्यांतले बरेच अनुभव घेतले असले आणि ह्याच प्रवासात असले तरी इतकं छान शब्दबद्ध करणं अवघड आहे. 
खूप छान लिहिलंयस सई. 

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

लेख आवडला. लेखातल्या शेवटच्या दोन तीन ओळी जवळच्या वाटल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. मी स्त्री नाही, त्यामुळे अर्थातच स्त्रियांना होणाऱ्या बॉडी शेमिंगचा प्रत्यक्ष अनुभव शक्य नाही. मात्र पुरुषांनाही वाढत्या वयात बारीक आणि कमी उंचीचे असण्यातून अनेक प्रकारच्या समांतर अनुभवांतून जायला लागतं, त्याचा वैयक्तिक अनुभव आहे. तुमचं शरीर, तुमचं दिसणं हा तुमच्या असण्याचा, तुमच्या व्यक्तिमत्वाचा केवळ एक भाग असतो हे समजून घेण्यातच तारुण्य खर्च होऊ शकतं. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख प्र चं ड आवडला
जमेल तितका शेअर करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप छान लेख. भारतात हे जास्त प्रमाणात होतं हे नक्की.
पण एक अनुभव सांगितल्या वाचून रहावत नाही. माझी एक फ्रेंच मैत्रिण दोन लिव्ह इन रिलेशनशिप नंतर आता लग्न करण्याच्या इराद्याने जोडीदार शोधत आहे. एकाच वयाच्या असल्याने आणि यूरोपियन स्री देहयष्टीचे कौतुक असल्याने तिला तसं बोलून दाखवलं तर म्हणाली की, अगं मला पर्याय नाही. जोडीदार शोधायचा तर आकर्षक दिसणं भाग आहे. त्या साठी बर्‍याच आवडीच्या पदार्थांकडे बघतही नाही आणि खूप व्यायाम करते.. तुम्हा भारतीय बायकांचं बरं आहे, लग्न झाल्यावर थोडं इथेतिथे झालं तरी नवरा काही तुम्हाला सोडून जात नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

children are now often taught about online behavior, they receive “very little education” about filters. Their safety training “was linked to overt physical dangers of social media, not the emotional, more nuanced side of social media

https://www.technologyreview.com/2021/04/02/1021635/beauty-filters-young...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0