द 'कल्चर' मस्ट गो ऑन

#संसर्ग #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक #२०२०

द 'कल्चर' मस्ट गो ऑन

- -आरती रानडे

'दिवाळी' येते तेव्हा ती एकटी येत नाही. येताना ती आपल्याबरोबर फराळ, फटाके, आकाशकंदील, रांगोळी, उटणी, नवीन कपडे आणि दिवाळी अंक असा 'सांस्कृतिक' लवाजमा घेऊन येते. या गोष्टींशिवाय 'दिवाळी' शक्यच नाही अशी वर्षानुवर्षांची सवय झाल्यानंतरच्या वयात, एके वर्षी मी शिक्षणासाठी अमेरिकेला आले. त्यानंतरची विद्यार्थीदशेतली दिवाळीची वर्षं कोणत्याही लवाजम्याशिवाय 'आलेल्या आणि गेलेल्या' दिवाळीची होती. माझ्यासाठीच नाही, तर माझ्यासारख्याच, माझ्या बरोबरीच्या अनेक मित्रमैत्रिणींसाठी. आता जितक्या सहजतेनं भारतातून 'फराळाची पाकिटं' कुरियरनं इथं अमेरिकेत येतात तितक्या सहज आणि परवडणार्‍या दरात ती १२-१५ वर्षांपूर्वी यायची नाहीत. शिवाय विद्यार्थी असताना डॉलरमध्ये किंमत मोजून चकल्या, लाडू विकत आणण्याची चैनही परवडणारी नव्हती. मग अशा वेळी गावातले एखादे प्रेमळ काका-काकू, आजी-आजोबा आम्हां सर्व विद्यार्थ्यांना आपल्या घरी दिवाळीनिमित्त बोलवायचे. छान वाटायचं. लाडू, चिवडा, चकली, शंकरपाळी असा फराळ असायचा. मग 'आपापल्या घरच्या, गावच्या, लहानपणच्या दिवाळीच्या आठवणी' एकमेकांना सांगत आम्ही विविध वयाचे, विविध पिढीतले सगळेच 'परदेशस्थ' लोक एकत्रितपणे दिवाळी साजरी करायचो.

या सगळ्या नॉस्टाल्जिक गप्पांदरम्यान, चकलीचा तुकडा तोडता तोडता, इतर वेळी साध्याच वाटणार्‍या एका पदार्थाची हमखास चर्चा व्हायची. तो पदार्थ म्हणजे 'दही'.

दही #संसर्ग

एकतर अमेरिकन ग्रोसरी स्टोअरमधल्या डब्यातलं रेडीमेड दही खाणार्‍या आम्हा विद्यार्थ्यांना स्टीलच्या भांड्यातलं किंवा काचेच्या बोलमधलं दही बघूनच फार अप्रूप वाटायचं. शिवाय विकतच्या दह्यापेक्षा त्या मस्त वडी पडणार्‍या 'घरी लावलेल्या दह्याची' वेगळी चवही जाणवायची. मग ते यजमान काका-काकू किंवा ज्येष्ठांपैकी कोणी 'दह्याची गोष्ट' सांगायचे,

'मी सत्तर, एक्काहत्तर साली अमेरिकेला आले, तेव्हा विमानप्रवासात अगदी जपून छोट्याशा काचेच्या बरणीत माझ्या आईच्या किंवा सासूबाईंच्या घरचं दही घेऊन आले होते. मग इथे आल्यावर अमेरिकेतल्या दुधात त्यातलं थोडं दही विरजण म्हणून लावून पाहिलं. थंडीच्या दिवसात आधी अंदाज चुकायचा, पण मग थोडं चुकतमाकत दही लावायला शिकले. मग अजून चार मैत्रिणी विरजणाकरता दही घेऊन गेल्या. कुठे गावाला जायचं असलं तर मैत्रिणीकडे दही देऊन जायचे, विरजण पुढे चालू राहावं म्हणून. आज तुम्ही जे दही खाताय त्याचं मूळ त्या सत्तर साली भारतातून आणलेल्या दह्यात आहे!'

त्यानंतर अनेक शहरांत मी 'या गावातल्या बहुतेकांच्या घरात अमक्या अमक्या काकूंकडच्या विरजणाचं दही आहे' अशा दह्याच्या गप्पा ऐकल्या आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये इंटरनेटवर बरीच माहिती उपलब्ध झाली आहे. पहिल्यांदा दही लावताना, बाजारात विकत मिळणार्‍या विविध प्रकारच्या दह्यांपासून घरी दही लावताना, काय काय गोष्टी लागतात, त्या घटकांचं प्रमाण, तापमान, वेळ, भांड्याचा प्रकार याबद्दल आता अनेक 'रेसिपी' सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे आता गेल्या काही वर्षांत 'घरगुती दही' हा प्रकार खूप कॉमन झाला आहे. पण तरीही एखाद्याच्या घरच्या पार्टीत 'ए, जाताना मी तुझ्या दह्यातलं थोडं दही नक्की घेऊन जाणार आहे विरजण लावायला,' हे वाक्य आजही अनेकदा कानावर पडतं.

माणसांचा, संस्कृतीचा - मग ती खाद्यसंस्कृती असो वा भाषा, राहणीमान असो वा चालीरीती - प्रवास मला फार आकर्षित करतो. त्याबद्दलची माहिती मिळवायला, त्याची कारणं शोधायला मला फार आवडतं. कदाचित माझ्या अभ्यासाच्या विषयात म्हणजे 'स्टेम सेल' शास्त्रात सगळ्यांत (जास्त) महत्त्व 'मूळ पेशीला आणि त्यापासून विविध अवयवांच्या पेशी तयार होण्याच्या प्रवासालाच' असल्यानं एकूणच कोणतीही गोष्ट, कोणत्या रूपात चालू कुठून झाली आणि कुठवर येऊन पोचली, या प्रवासामध्ये, त्यामध्ये घडणार्‍या बदलांमध्ये मला विशेष रस आहे.

दह्याच्या बाबतीत तर हा शब्दशः 'कल्चर'चा प्रवास आहे!

'शेजारच्या काकूंकडून विरजण घेऊन ये, किंवा त्यांना विरजण देऊन ये' अशी 'विरजणाची देवाणघेवाण' हा आपल्या जडणघडणीचा, संस्कृतीचा भाग. पण हे करताना आपण चक्क लॅक्टोबॅसीलस किंवा स्ट्रेप्टोकोकस या गटातल्या 'बॅक्टेरियल कल्चर'ची देवाण-घेवाण करत असतो, हे आपल्यापैकी अनेकांच्या ध्यानातही येत नाही. 'विरजण' हा शब्द आलाय 'विरंजन' या शब्दापासून. याचा अर्थ रंग घालवणे किंवा बेरंग करणे. आपण अनेकदा 'दूषित करणे' या अर्थी आनंदावर विरजण पडलं असा शब्दप्रयोग वापरतो. पेशीशास्त्राच्या भाषेत यालाच 'कंटॅमिनेट' करणं म्हणतात. पण 'योग्य प्रमाणात मुद्दामून दूषित करण्यातच' दुधाचं दह्यात रूपांतर होण्याचं रहस्य दडलेलं आहे.

मीही आईला एकदा उत्सुकतेपोटी 'आपल्या घरच्या दह्याच्या विरजणाचं मूळ काय?' असा प्रश्न विचारल्यावर आईनं माझ्या पणजीच्या घरचं दही आजीकडे आणि तिथून माझ्या आईकडे आल्याचं सांगितलं. अर्थात आता आमच्या घरच्या दह्यात इतरही 'कल्चर' मिसळली आहेत, त्यामुळे शास्त्रीय दृष्टिकोनातून आता 'प्युअर कल्चर' मानता येणार नाही. पण आजही दह्याची संस्कृती जपणार्‍या देशांतील अनेक घरांत आणि दही बनवणार्‍या व्यावसायिक कंपन्यांमध्येही दह्याच्या 'मूळ बॅक्टेरियल कल्चर'चा वारसा पिढ्यानपिढ्या जपलेला आणि चालू ठेवलेला आहे. त्यामुळे माणसांची पिढी संपली तरी 'बॅक्टेरियल कल्चर' मात्र 'अमरत्व' मिळवलेलं किंवा शास्त्रीय भाषेत 'इम्मॉरटल' मानलं जातं.

'दही-बॅक्टेरिया-कल्चर' ही आपल्या रोजच्या आयुष्यातली अतिशय साधीशी वाटणारी गोष्ट माझ्या मनात 'शास्त्र आणि संस्कृती' या दोन्ही अर्थाच्या 'कल्चर'साठी नकळत जपून ठेवली गेली. माझ्या नंतरच्या आयुष्यात या संकल्पनेशी जवळीक साधणार्‍या अनेक गोष्टी भटकताना, वाचनात आणि माझ्या कामाच्या दरम्यानही मला वारंवार भेटत गेल्या.

ग्रीस, आशियातले देश, तुर्कस्तान हे जसे दह्याचं 'लॅक्टोबॅसिलस कल्चर' आणि संस्कृती जपणारे देश, तसे युरोपातले अनेक देश ब्रेडची संस्कृती आणि 'कल्चर' जपणारे. सध्याच्या कोविड-१९ काळात प्रसिद्ध झालेल्या आणि जगभरात पसरलेल्या अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे 'घरी ब्रेड तयार करणे'. वास्तविक 'ब्रेड बेक केला म्हणजे शुभशकुन होतो' हा युरोपियन देशांमधल्या संस्कृतीचा भाग. सध्याचं ब्रेड बेकिंगचं हे लोण फ्रान्सपासून चालू होऊन आज घराघरात पोचलं आहे. सर्व क्षेत्रांतले, देशांतले हौशी, नवशिके, व्यावसायिक लोक विविध प्रकारचे ब्रेड घरी तयार करण्याचे प्रयोग करत आहेत. काहीजण बाजारात तयार मिळणार्‍या 'ड्राय यीस्ट'चा वापर करून तर काही जण 'स्टार्टर कल्चर'पासून सुरुवात करून ब्रेड बेक करून पाहात आहेत. एकाच 'पाककृतीचा' आधार घेऊन तयार केलेल्या वेगवेगळ्या 'सावरडो' (sourdough) ब्रेडच्या चवीतला फरक तर लगेचच लक्षात येतो. पण फोटो जरी नुसते बारकाईने पाहिले तरी लक्षात येतं की कोणतेही दोन सावरडो ब्रेड रंग, रूप, त्यावरच्या रेषा यांचा विचार करता एकसारखे दिसत नाहीत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ब्रेड बनवण्यासाठी वापरलेलं 'स्टार्टर कल्चर'.

#सावरडो #कल्चर
सावरडोचं विरजण आणि पावाचा तुकडा

फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅपवर माझ्या अनेक मित्रमैत्रिणींनी पोस्ट केलेल्या सावरडो ब्रेडचे फोटो पाहताना मला काही वर्षांपूर्वी सॅनफ्रान्सिस्कोमध्ये फिरत असताना पाहिलेल्या 'बूडीन ब्रेड कंपनी'ची आठवण होते. या कंपनीची स्टोरी खूप रंजक आहे.

१८४८च्या सुमारास कॅलिफोर्नियामध्ये सॅक्रामॅन्टो व्हॅली भागातल्या खाणीत सोनं सापडायला लागलं. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वाधाच्या अमेरिकेच्या इतिहासातली ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटना ठरली. सोनं सापडत असल्याची खबर जसजशी पसरली, तसतसे बोटी भरभरून हजारो लोक, सोन्याच्या खाणीत काम करण्यासाठी, सोनं मिळवण्यासाठी विविध देशांतून अमेरिकेत स्थलांतरित झाले.

अमेरिकेत बाहेरून आलेल्या लोकांची संख्या १८४८पूर्वी हजार माणसांपेक्षाही कमी होती. मात्र १८४९च्या शेवटापर्यंत कॅलिफोर्नियात १००,०००पेक्षा जास्त लोक स्थलांतर करून आले. याला '१८४९ गोल्ड रश' असं म्हटलं गेले. हे स्थलांतरित लोक येताना आपली संस्कृती, कल्चर बरोबर घेऊन आले. हळूहळू त्यांनी सोन्याच्या खाणीत काम करण्याच्या जोडीला आपले वडिलोपार्जित उद्योगधंदे या नव्या जागेत सुरू केले. त्यामुळे अनेक पूरक उद्योग सॅनफ्रान्सिस्कोमध्ये चालू झाले.

याच 'गोल्ड रश'मध्ये फ्रान्सहून आलेला इसिडोर बूडीन. त्यानं पीठ मळून त्याला 'वाईल्ड यीस्ट'च्या सहाय्यानं फरमेंट केलं आणि पारंपरिक फ्रेंच ब्रेडच्या आकारात ब्रेड बेक केला. या पाककृतीमध्येच जणू त्याला 'सोन्याची खाण' गवसली. एका लहानशा, जुनाट बेकरीत "पीठ, पाणी, मीठ आणि मदर डो" या चार घटकांपासून तयार झालेला उत्तम सावरडो ब्रेड त्यानं विकायला सुरुवात केली आणि जन्माला आली 'बूडीन बेकरी'.

त्यांच्या 'स्टार्टर कल्चर' किंवा 'मूळ कल्चर'मध्ये त्यांच्या ब्रेडचं 'रहस्य' दडलेलं आहे. सॅनफ्रान्सिस्कोच्या धुकं असलेल्या हवेत उत्तम रीतीनं वाढणारा 'लॅक्टोबॅसिलिस सॅनफ्रान्सिससेन्सिस (Lactobacillus sanfranciscensis) या गटातील बॅक्टेरियाचं हे कल्चर आहे. हा मदर डो किंवा तो करायला वापरलेलं कल्चर याचं पेटंट या बेकरीकडे आहे. या बेकरीमध्ये 'मदर डो' खास फ्रीजरमध्ये साठवून ठेवलेला आहे. गेली जवळपास २०० वर्षं त्या पहिल्या 'मदर डो'ला सांभाळण्यासाठी आणि वाढवण्यासाठी योग्य ते घटक रोज पुरवण्यात येतात - याला शब्दशः 'फीडिंग द कल्चर' असंच म्हणतात.

या बेकरीचं वैशिष्ट्य हेच आहे की आजही त्यांच्या दररोजच्या बेकिंगसाठी ते २०० वर्षांपूर्वीच्या 'मदर डो'चा वापर करतात. त्यामुळे त्यांच्या ब्रेडची थोडी आंबटसर चव, त्याचा रंग, त्याचं टेक्श्चर पिढ्यानपिढ्या जसंच्या तसं राखलं गेलं आहे. एका अर्थी 'इतिहासाचा किंवा काळाचा तुकडाच' त्या बेकरीमध्ये जतन केलेला आपल्याला आढळतो - संस्कृती आणि बॅक्टेरियल कल्चर या दोन्ही अर्थांनी!

२०१७च्या सुमारास रॉबिन स्लोन या लेखकानं लिहिलेलं 'सावरडो' नावाचं एक फिक्शन गटात मोडणारं पुस्तक याच विषयावरती आहे. सॅनफ्रान्सिस्कोमध्ये 'स्थलांतरित' झालेल्या आणि छोटंसं घरगुती रेस्टॉरंट चालवणार्‍या दोन भावांना व्हिसाच्या प्रश्नांमुळे अमेरिका सोडून जाण्याची वेळ येते. तेव्हा जाताना ते त्यांचं पारंपरिक 'स्टार्टर कल्चर' सांभाळायला, त्याला रोज 'खाऊ' घालायला आणि काळजी घ्यायला, त्यांच्या रेस्टॉरंटमधून नेहेमी अन्न मागवणार्‍या ग्राहक मुलीकडे ते देऊन जातात. सॅनफ्रान्सिस्कोच्या बिझी आणि टेक्नॉलॉजिकल वातावरणातली ही तरुण मुलगी, जिचा स्वयंपाकाघराशी कधीही फारसा संबंधही आलेला नसतो आणि तिच्यावर जबाबदारीसारखं, गळ्यात पडलेलं हे 'स्टार्टर सांभाळायचं काम'. या स्टार्टर कल्चरसोबत एका वेगळ्याच अनपेक्षित जगाशी तिचा झालेला परिचय, त्या जगात घडलेला तिचा प्रवास आणि त्यातूनच कोणतंही 'कल्चर' सांभाळणं ही किती महत्त्वाचं असतं, किती मोठी जबाबदारी असते याची तिला झालेली जाणीव, हाच या पुस्तकाचा विषय.

तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करता त्यानुसार अनेकदा एखाद्या शब्दाच्या अनेक अर्थांपैकी नेमका अर्थ पहिल्यांदा तुमच्या डोळ्यासमोर येतो. कल्चर म्हणजे संस्कृती या अर्थापासून माझं लहानपण सुरू झालं खरं; पण आता मात्र 'कल्चर' म्हणजे 'सेल कल्चर', टिश्यू कल्चर, रीसर्च लॅब, मायक्रोस्कोप हेच शब्द माझ्यासाठी पहिले नजरेसमोर येतात. 'सेल' शब्द दुकानदारासाठी वेगळा, इलेक्ट्रिशियनसाठी वेगळा, डेटावर काम करणार्‍यांसाठी वेगळा. बहुतेक माणसांसाठी सेल म्हणजे मोबाइल फोन. तर माझ्यासारख्या बायोलॉजिस्ट किंवा सायंटिस्टसाठी सेल म्हटलं की पेशी हाच पहिला अर्थ डोळ्यासमोर येणार.

'कल्चर'चं आपल्यापैकी बहुतेकांना अपरिचित असलेलं जग मात्र माझ्या चांगलंच परिचयाचं, सरावाचं, शास्त्रीय प्रयोगशाळेतलं जग. या कोविड-१९मुळे उद्भवलेल्या लॉकडाउनचा काळ अनेक लोकांसाठी घरी राहून विविध प्रयोग करून पाहण्याचा असला, तरी माझ्यासारख्या रोज 'प्रयोग करणार्‍यांसाठी' मात्र मोठी समस्या निर्माण करणारा होता. पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा अचानक, कोणतीही पूर्वकल्पना नसताना सगळं 'बंद' झालं, संपूर्ण 'लॉकडाउन' झालं, जेव्हा सगळे लोक सुट्टी मिळाल्याच्या आनंदात नवनवीन पदार्थ करत होते, साडी, पुस्तकवाचन, स्वयंपाक, व्यायाम, डालगोना कॉफी, बेकिंग अशी विविध चॅलेंजेस साजरी करत होते, तेव्हा आम्ही लोक चिंतेत होतो - प्रयोगशाळेत जी 'कल्चर' सांभाळली जात आहेत, त्यांना फीड कसं करायचं, ती जिवंत कशी ठेवायची? अर्धवट अवस्थेतले प्रयोग पूर्ण कसे करायचे? अ‍ॅनिमल फॅसिलिटीजमध्ये असलेल्या प्राण्यांना अन्न-पाणी कसं द्यायचं? यातले काही काही प्रयोग १५ दिवसांचे, २८ दिवसांचे, ३ महिन्यांचे. त्यात एका जरी दिवसाचा खंड पडला तरी सगळा प्रयोग व्यर्थ जाणार.

वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणार्‍या आम्हां लोकांसाठी हे फार मोठं आव्हान होतं. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान तर झालंच, पण पब्लिकेशन्स, ग्रांट्स, पेटंट्स, कॉन्ट्रॅक्ट्स या सगळ्या 'इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी'संदर्भात अनेक मुद्द्यांचा फेरविचार करावा लागला.

कोणत्या अवयवाच्या पेशी आहेत त्यानुसार, साधारणतः एक दिवस ते एक आठवडा या कालावधीपर्यंत पेशी शरीराच्या बाहेर 'इन व्हिट्रो कल्चर'मध्ये राहू शकतात. कोणत्याही 'कल्चर' संदर्भात - वेळ, तापमान आणि पेशींना जिवंत ठेवून त्यांना योग्य काम करण्यासाठी आवश्यक असलेले घटक, न्युट्रियंटस देणारं द्रव्य म्हणजेच 'मीडिया' या तीन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी. यातल्या कोणत्याही गोष्टीत जरासा जरी बदल झाला तर कल्चर मरण्याची, त्यांची कार्यक्षमता कमी होण्याची किंवा म्यूटेशन्स होऊन बदल घडण्याची शक्यता असते.

प्राण्याच्या किंवा माणसाच्या शरीरामध्ये ('इन व्हिवो') पेशींना जिवंत राहण्यासाठी जे जे वातावरण आवश्यक असतं, ते पुरवून म्हणजेच शरीराबाहेर ('इन व्हिट्रो') कोणत्याही पेशी जिवंत ठेवणं हा वैद्यकीय संशोधनामधला अत्यंत महत्त्वाचा भाग. कोणत्याही अवयवाचं, पेशीचं कार्य समजून घेण्यासाठी, रोगाविषयी जास्तीत जास्त माहिती मिळवण्यासाठी आणि पर्यायानं नवीन औषधांच्या निर्मितीसाठी 'शरीराबाहेर - इन व्हिट्रो' पेशी जिवंत आणि कार्यरत ठेवणं अतिशय महत्त्वाचं असतं.

त्यामुळेच मानवी शरीराबाहेर दीर्घकाळ जिवंत आणि कार्यरत राहू शकणार्‍या सेल लाइन किंवा पेशी शोधणं, अथवा निर्माण करणं या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशी पहिली सेल लाइन म्हणजे HeLa cell line. या सेल्सनी वैद्यकीय संशोधन क्षेत्रात क्रांती घडवली. 'अमरत्व' प्राप्त झालेली म्हणजेच 'इम्मॉरटल' असलेली ही पहिली मानवी सेल लाइन.

या पेशींचा उगम झाला हेन्रीएटा लॅक्स (Henrietta Lacks) नावाच्या स्त्रीच्या शरीरात. हेन्रीएटा ही सर्व्हायकल कॅन्सरची म्हणजेच गर्भाशयाच्या कर्करोगाची रुग्ण होती. १९५१मध्ये तिचं या कर्करोगानं निधन झालं. तपासणी आणि उपचाराच्या दरम्यान तिच्या ट्यूमरचं जे सँपल किंवा तुकडा डॉक्टरांनी घेऊन ठेवला होता, त्या सेल्स, पेशी प्रयोगशाळेत म्हणजेच शरीराच्या बाहेर वाढत आहेत का, या उत्सुकतेपासून किंवा प्रश्नापासून या क्रांतीची सुरुवात झाली. तोपर्यंत मानवी शरीरातल्या पेशी, मानवी शरीराबाहेर जास्तीत जास्त एक आठवडा इतक्याच कालावधीपर्यंत जिवंत राहू शकतात, असा शास्त्रज्ञांचा अनुभव होता. पण हेन्रीएटा लॅक्सच्या ट्यूमरमधल्या पेशी, त्यांना योग्य ते पोषण पुरवल्यावर प्रयोगशाळेत 'पेट्री डिश'मध्ये वाढायला लागल्या. त्यांचा वाढण्याचा वेगही प्रचंड म्हणजे २४ तासात दुप्पट इतका होता. सर्व्हायकल कर्करोगामुळे हेन्रीएटा लॅक्स मरण पावली, पण तिच्या ट्यूमरच्या पेशी मात्र 'अमर' होत्या. त्यातूनच निर्माण झाली, तिच्या नावाच्या आद्याक्षरांनी ओळखली जाणारी HeLa सेल लाइन ही पहिली मानवी 'अमरत्व' असलेली सेल लाइन.

या पेशी प्रचंड झपाट्यानं वाढतात. आकडेवारीच सांगायची झाली तर २०११मध्ये सादर केलेल्या अहवालानुसार आजवर जितक्या पेशी विविध प्रयोगशाळेत वाढवल्या गेल्या आहेत त्यांचं वजन पाच कोटी मेट्रिक टन इतकं भरेल असा अंदाज आहे. किंवा त्या एकाशेजारी एक अशा ठेवून त्याची माळ केली तर तिची लांबी तीन वेळा पृथ्वीला वेढा घालू शकेल इतकी होईल.

जगातली सगळ्यात जास्त संशोधन झालेली आणि संशोधनात वापरली गेलेली सेल लाइन म्हणजे 'हेला सेल लाइन'. या पेशी एका कृष्णवर्णीय स्त्रीच्या शरीरातून निर्माण झाल्या आहेत. आजवर या सेल्स वापरून संशोधकांना मिळालेल्या बक्षिसांच्या, पैशाच्या, मानसन्मानाच्या तुलनेत या महिलेला आणि तिच्या परिवाराला अगदीच नगण्य 'रॉयल्टी' मिळाली आहे या मुद्द्यावरून काही वर्षांपूर्वी बरंच वादळ उठलं होतं.

सॉल्क #संसर्ग सॉल्क #संसर्ग

डावीकडे : पोलियो व्हॅक्सिन चे जनक डॉ. जोनास सॉल्क प्रयोगशाळेत टेस्ट ट्यूब्स मधील कल्चर्स पाहताना, पिट्सबर्ग, अमेरिका, १९५४
उजवीकडे : सॉल्क हॉल, युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग, बाहेरची पाटी

मी ज्या विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली, त्या 'सॉल्क हॉल' या इमारतीमध्ये 'पोलियो व्हॅक्सीन'चा शोध लागला आणि संशोधन झालं. संशोधक डॉ. सॉल्क यांनी पोलियो व्हॅक्सीनच्या संशोधनात ही 'हेला सेल लाइन' वापरली होती. त्यानंतर अनेक प्रकारच्या कॅन्सरच्या, एच.आय.व्ही किंवा एड्सवरच्या संशोधनात किंवा जेनेटीक्समध्ये ही सेल लाइन वर्षानुवर्षं वापरली जात आहे. १९६०मधल्या स्पेस मायक्रोबायोलॉजी मिशनमध्ये तर असा शोध लागला की, अवकाशात 'हेला सेल्स' अधिक झपाट्यानं दुप्पट होतात. आपल्या घराघरातल्या स्वयंपाकात मिसळणाचा डबा असतो. जिरं, मोहरी, हळद असते अगदी तसंच कोणत्याही प्रयोगशाळेत 'हेला सेल्स' असतातच. तो प्रयोगशाळेच्या 'कल्चरचा' एक महत्त्वाचा हिस्सा आहे.

सॉल्क #संसर्ग
सॉल्क हॉल, युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग, अमेरिका

या 'हेला सेल'मुळे, पेशी मानवी शरीराच्या बाहेर दीर्घकाळ राहू शकतात यावरच्या संशोधनाला गती प्राप्त झाली. यानंतर अनेक अवयवांच्या पेशींच्या 'इम्मॉरटल' सेल लाइन तयार करण्यात आल्या आणि आजही तयार केल्या जातात. माझा संशोधनाचा जो विषय आहे 'लिव्हर' - यकृत, त्यामध्येदेखील हे संशोधन मोठ्या प्रमाणात केलं जातं.

प्रत्येक घरच्या स्वयंपाकाला खास वेगळी चव असते, आणि काही खास पाककृती असतात. शिवाय पदार्थांच्या त्या चवीसाठी, रंगांसाठी स्वयंपाक करणार्‍याच्या काही 'सिक्रेट रेसिपीज' किंवा गुपितं असतात. तसंच आमच्या प्रयोगशाळेतही सगळ्यांच्या हातात सगळ्या पेशी सारख्याच वाढत नाहीत. प्रत्येक लॅबच्या काही खास सिक्रेट रेसिपीज असतात. मग ती गुपितं, सिक्रेट फॉर्म्युले त्या प्रोसीजर/कृतीमध्ये असतील किंवा मीडियामध्ये!

'सेल कल्चर'च्या बाबतीतला दुसरा एक महत्त्वाचा शोध म्हणजे 'क्रायोप्रिझर्वेशन'. या पेशींना आहे त्या अवस्थेत, वयात 'गोठवून' ठेवता येणं. कोणत्याही सेल लाइनच्या साधारण पहिल्या दहा-पंधरा पिढ्या (पॅसेज नंबर) अतिशय महत्त्वाच्या आणि महागड्या. अनेकदा आम्ही पेशींची पन्नासावी-सत्तरावी पिढी प्रयोगासाठी वापरत असतो. पण 'सेल कल्चर' जरा वेगळं दिसायला लागलं, पेशींचा आकार वेगळा वाटायला लागला, त्याची कार्यक्षमता बदलल्यासारखी वाटली तर 'पूर्वी जी सत्त्वं होती ती हल्लीच्या पिढीत राहिली नाहीत' असं म्हणत आम्ही परत एकदा पहिल्या दहा पिढ्यांकडे वळतो. अतिशय कमी तापमानाला जतन करून ठेवलेल्या या पेशी, त्यांना योग्य ते तापमान, मीडिया मिळालं की गोठलेल्या अवस्थेतून बाहेर येतात आणि जिवंत, रसरशीत होतात.

या एकेका लहान लहान पेशींमध्ये असणारी 'जगण्याची, कार्यक्षम असण्याची क्षमता आणि इच्छा' पाहिली की आपोआपच फिलॉसॉफिकल व्हायला होतं. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' असतात तशा या पेशीपण आपापले स्वभावविशेष बरोबर घेऊन आलेल्या. कोणाला एकटंच राहायला आवडतं, कोणाला लहान लहान गटात. लिव्हरच्या पेशी तर 'एकमेकीला चिकटल्याशिवाय' पूर्णतः कार्यक्षम होऊ शकत नाहीत.

सिनेमांत वगैरे दाखवतात तसं संशोधकांचं रोजचं आयुष्य अजिबातच ग्लॅमरस वगैरे नसतं. किंबहुना बहुतेक दिवस रुटीन कामाचे, एकाच प्रकारचा प्रयोग परतपरत करण्याचे, सतत शंका उपस्थित करण्याचे - त्यांचं निरसन करण्याचे, अपयशाचे - त्यावर विचार करून नवीन प्रयोग करण्याचे असतात. प्रत्येक दिवशी अजिबातच 'नवीन शोध' लागत नाही. पण जेव्हा तुम्ही एखाद्या 'सेल कल्चर'वर काम करत असाल, तेव्हा लॅबमध्ये गेल्यानंतर दर दिवशी सूक्ष्मदर्शकाखाली त्या निरोगी, आखीव-रेखीव 'सेल्स' पाहण्यासारखा दुसरा आनंद नाही. आमच्यासाठी हेच रोजच्या जीवनातलं लहानसं समाधान, दिलासा आणि आशावाद.

प्रयोगशाळेत 'सेल कल्चर' सांभाळणं, त्यावर प्रयोग करणं हे अतिशय जिकिरीचं काम आणि त्यात अतिशय नजाकतीनं, प्रेमानं ही कल्चर सांभाळावी लागतात. त्या पेशींबरोबर तुमचा रोजचा संवाद असतो. त्यातल्या बारीकसारीक हालचाली, त्यांच्यात झालेले छोटे छोटे बदल तुम्ही टिपलेले असतात. त्या निरोगी राहाव्यात म्हणून तुम्ही अतिशय निगुतीनं त्यांची काळजी घेतलेली असते. आधीची लॅब सोडून जाताना किंवा दुसर्‍या प्रोजेक्टवर काम करायला लागल्यावर, आपण तयार केलेल्या, वाढवलेल्या पेशी दुसर्‍यांच्या हातात सोपवून पुढच्या प्रवासाला निघणं खूप अवघड जातं.

#सेल #कल्चर #संसर्ग #सेल #कल्चर #संसर्ग

प्रयोगशाळेतलं सेल कल्चर

पण कधीकधी एखादी सेल लाइन काही वर्षांनी परत एकदा तुमच्या आयुष्यात येते. पहिल्यांदा गोठलेल्या पेशी योग्य तापमानाला आणून वाढवताना थोडा अनोळखीपणा असतो. पण एकदा सूक्ष्मदर्शकाखाली पेशी दिसल्या की जुनी ओळख पटते. तुमच्या मनातल्या त्या 'सेल लाइन'बरोबरच्या आठवणींचा गोठलेला काळ प्रवाही होतो.

अशा वेळी माझ्यासाठी 'भारत सोडून प्रवासाला निघण्याचा' मनात गोठवून ठेवलेला क्षणही जिवंत होतो. घरातून निघताना देवाला, आई-बाबांना नमस्कार केला की अगदी शेवटच्या क्षणी आई हातावर 'दही' देते. 'प्रवास सुखाचा होऊ दे आणि पुनरागमनाय च' असं म्हणते. ते दही खायचं, आईच्या पदराला हात पुसायचा आणि प्रवासाला सुरुवात करायची ही वर्षानुवर्षांची सवय, रिवाज.

प्रयोगशाळेच्या शिकवणी आणि संस्कृतीनुसार 'सेल कल्चर' बरोबरचा प्रवास सुरू करताना मी सराईतपणे हातात ग्लोव्ह्ज चढवते. तळहातांवर अल्कोहोलचा फवारा मारते... आणि 'सेल कल्चर'बरोबर, थोड्या ओळखीच्या पण बर्‍याचशा अनोळखी प्रदेशात संशोधनाच्या प्रवासाला सुरुवात करते.

field_vote: 
4.666665
Your rating: None Average: 4.7 (3 votes)

प्रतिक्रिया

वाह ! सुरेख , संयत आणि गोलाकृती लेख !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Observer is the observed

झकास !!! उत्तम लेख . स्टार्टर कल्चर, सेल कल्चर, सेल लाईन्स , HeLa वगैरे शब्द दिवाळी अंकातील लेखात वाचून फार बरं वाटलं.
आमच्या ' जातवाल्या ' निघालात. ( इथलेच दुसरे लेखक संजोप राव आणि बहुधा अवंतीच्या पण)
उगाचच अवांतर म्हणून विचारतो, भारतात हे शिक्षण कुठे घेतलेत ?
आणि सध्या कुठे आणि कुठल्या विशिष्ट विषयात काम करत आहात ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख रोचक आहे, याबद्दल वाद नाही. परंतु, लेखातल्या एका बारक्या भागाच्या संदर्भात एक कुशंका (खुसपट म्हणा ना!):

मग ते यजमान काका-काकू किंवा ज्येष्ठांपैकी कोणी 'दह्याची गोष्ट' सांगायचे,

'मी सत्तर, एक्काहत्तर साली अमेरिकेला आले, तेव्हा विमानप्रवासात अगदी जपून छोट्याशा काचेच्या बरणीत माझ्या आईच्या किंवा सासूबाईंच्या घरचं दही घेऊन आले होते. मग इथे आल्यावर अमेरिकेतल्या दुधात त्यातलं थोडं दही विरजण म्हणून लावून पाहिलं. थंडीच्या दिवसात आधी अंदाज चुकायचा, पण मग थोडं चुकतमाकत दही लावायला शिकले. मग अजून चार मैत्रिणी विरजणाकरता दही घेऊन गेल्या. कुठे गावाला जायचं असलं तर मैत्रिणीकडे दही देऊन जायचे, विरजण पुढे चालू राहावं म्हणून. आज तुम्ही जे दही खाताय त्याचं मूळ त्या सत्तर साली भारतातून आणलेल्या दह्यात आहे!'

पण... पण... पण... हे असे पदार्थ (सीलबंद नसलेले, नाशिवंत खाद्यपदार्थ, फळफळावळ, मांस, दूध तथा दुग्धजन्य पदार्थ, आणि, खास करून लाइव्ह बॅक्टीरियल कल्चर्स वगैरे) पॅसेंजर बॅगेजमधून आयात करणे हे यू.एस. कस्टम्सच्या नियमांचे सरळसरळ उल्लंघन आहे ना?

बॅगांची तपासणी बहुतेकदा काटेकोरपणे होत नाही, म्हणून ठीक; अन्यथा, तपासणीत 'माल' सापडला असता, तर कस्टम्स अधिकाऱ्याने तो जप्त करून जागच्या जागी कचऱ्याच्या टोपलीत फेकला असता, याबद्दल खात्री आहे.

(हे निषिद्ध खाद्यपदार्थ तुम्ही बरोबर आणता आहात का, असा एक प्रश्न कस्टम्सच्या फॉर्मवर असतो, त्याला या काकूंनी 'नाही' असे खोटे उत्तर नक्की दडपून दिले असणार, आणि तोंडी चौकशीतसुद्धा पुन्हा तसेच सांगितले असणार, आणि काकूंच्या चेहऱ्याकडे नि (बहुधा) वयाकडे पाहून कस्टम्स अधिकाऱ्याने अधिक चौकशी अथवा तपासणी न करता त्यांना तसेच सोडून दिले असणार. अन्यथा, त्या लेखी किंवा तोंडी प्रश्नास 'होय' असे उत्तर दिल्यावर, आणि अधिक चौकशीत अथवा तपासणीत नेमका कोणता निषिद्ध पदार्थ आपण आणतो आहोत हे विशद केल्यावर आणि/किंवा अधिक कसून तपासणीत तो सापडल्यावर, कस्टम्स अधिकारी मुद्देमाल जप्त करून जागच्या जागी तो नष्ट करणार नाही, हे संभवनीय वाटत नाही. एक तर सत्तर-एकाहत्तर सालचे यूएसए हे आजच्या ट्रम्पयुगातल्या यूएसएइतके करप्ट बहुधा नसावे (चूभूद्याघ्या.), आणि, फॉर्दॅट्मॅटर, आजमितीससुद्धा यूएसएतले करप्शन हे कस्टम्स अधिकाऱ्याच्या पातळीवर होत असावे, याबद्दल मी स्वतः साशंक आहे.)

हे म्हणजे, निषिद्ध माल चोरून आयात करायचा, त्याकरिता सरकारी फॉर्मवर आणि/किंवा तोंडी चौकशीत खोटी उत्तरे द्यायची, आणि मग इतक्या वर्षांनंतर त्याबद्दल बोस्ट करायचे, त्याचे ग्लोरिफिकेशन करायचे. शोभते का हे त्या (ममव) काकूंना?

आणि, सत्तर-एकाहत्तर साली चोरून आयात केलेले बॅक्टीरियल कल्चर वापरून लावलेले दही, होमसिकनेसमुळे का होईना, परंतु मागचा पुढचा विचार न करता मिटक्या मारीत खाणाऱ्या लेखिकेसारख्या लोकांना माझा अखेरचा (नारदीय) सवाल: की बायांनो/बाबांनो, चित्रगुप्तासमोर हा प्रश्न जेव्हा ऐरणीवर येईल, तेव्हा, त्या काकूंच्या पापाच्या/चे वाटेकरी होण्यास तुम्ही तयार व्हाल काय?

(या प्रश्नाचे उत्तर 'होऽऽऽऽऽऽ!' असे आल्यास, नो फर्दर क्वेश्चन्स. आय रेस्ट माय केस, युअर ऑनर!)

----------

स्मगलिंग! अबब!!! खास करून सत्तर-एकाहत्तरच्या सुमारास 'स्मगलर' या व्यक्तिविशेषाबद्दल ममव समाजात काय भावना असत, आठवताहेत का? काकू (मूळच्या) ममवच ना?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

कल्चर या शब्दाच्या विविध अर्थांची सहजसुंदर गुंफण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सूक्ष्मजीवशास्त्र या विषयावरचा हा रंजक लेख फारच आवडला. मायक्रोबियल कल्चर हा माझ्या आवडीचा विषय. फर्मेंटेशन होत असताना भराभर वाढत जाणारे यीस्ट किंवा साध्या Nutrient Broth मध्ये चोवीस तासात उतू जाणारे Bacillus चे कल्चर बघायलाही खूप बरे वाटत असे. Hanging glass technique ने वळवळ करणारे जीवाणू बघूनही गंमत वाटत असे. आता ते क्षेत्र सोडून बरेच दिवस झाले, पण या लेखाने ते सगळे आठवून मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

युजर आयडी आणि पासवर्ड शोधण्यापासून तयारी होती. त्यामुळे रीप्लाय देण्यास उशीर होत आहे. त्याबद्दल सॉरी.
लेख वाचला जातोय, लोकांना इंटरेस्टींग वाटतोय हे छान वाटतंय.
मनापासून धन्यवाद.. तुम्हा सर्वाचे आणि 'ऐसी अक्षरे' चे - लेख दिवाळी अंकासाठी स्वीकारल्याबद्दल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एनसीएल चे दिवस आठवले. बरेच कर्मचारी संध्याकाळी घरी जाताना तिथल्या दह्याचे शास्त्रीय कल्चर घेऊन जाताना दिसत. ते वापरल्यावर घरी उत्तम दर्जाचे दही होत असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0