कार्नेगी देवाची कहाणी

ऐका देवा महाराजा कार्नेगीजी देवा तुमची कहाणी. एक आटपाट मेट्रो महानगर होते. तेथे एक राजा राज्य करत नव्हता. त्याला दोन राण्या नव्हत्या. एक आवडती नव्हती आणि एक नावडती नव्हती. कारण तेथे लोकशाही नांदत होती. त्या लोकशाहीची व्याख्या अशी होती Democracy is a government off the people, buy the people and f*** the people.
लोकशाही इतकी घनघोर नांदत होती की अगदी कहरच झाला होता. लोक उठसूट मतदान करायचे. मतदानाच्या दिवशी सुट्टी असली तरी बाहेर कुठे सहलीला न जाता मतदानकेंद्रावर सहल काढत असत. म्हातारे लोक व्हीलचेअर वरून घेऊन मतदानाला जात असत. लग्नाच्या बोहल्यावर ‘शुभमंगल सावधान’ हे शब्द ऐकल्यावर वधूवरांना आपल्या कर्तव्याची जाणीव होऊन ते सहकुटुंब सहपरिवार मतदान केंद्रावर जाऊन लाइनीत उभे रहायचे. प्रथम मतदान, लग्न नंतर. एका क्रिकेटपटूनेतर ९९ धावांवर डाव अर्धा सोडून मतदानाकेंद्राकडे १००वी धाव घेतली. जरी एवढी खणखणीत लोकशाही होती तरी तेथे राजेरजवाडे, सरदार दरखदार, भालदार चोपदार, शिपाई प्यादे, दरबार, कमी दराचे (subdidised) बार आदी सर्व चोख होतेच! आणि इतके सर्व असल्यावर विदुषक खुषमस्करे असायला पाहिजेतच आजूबाजूला. त्यांची पण वाण नव्हती.
अश्या ह्या महानगरीत चिंटू आणि दिनू नावाचे दोन मित्र राहत होते. त्यांची घनदाट मैत्री होती. दोघेही लोकशाहीच्या मंदिरांत पाट्या टाकायचे काम करीत.(म्हणजे सरकारी नोकरीत होते,) दिनूच्या नशिबाने काय खेळी केली पहा. तो एकापाठोपाठ एक बढत्या घेत गेला.आता तो संकृती आणि कला विभागांत असिस्टंट डेप्युटी डायरेक्टरच्या पदावर कार्यरत होता. इकडे आपला नायक –त्याची खर्डेघाशी चालूच होती. त्याचे सगळे ओळखीतले, सगेसोयरे, मित्रमंडळी त्याची टिंगल करायचे. म्हणायचे, “ चिंतामणी, पहा दिन्या कुठे पोहोचला आणि तुम्ही. काही शिका तुमच्या मित्राकडून.” पण काय शिकायचे तेच नेमके चिंटूला कळत नव्हते.
एके दिवशी मात्र कहर झाला. त्याच्या पत्नीने त्याला चित्रपटाची तिकिटे बुक करयाला सांगितले होते.पण ऑफिसच्या कामाच्या रगाड्यांत तो नेहमीसारखाच विसरला. ऑफिसमधून परत येताना घराच्या दाराशी त्याला आठवण आली.पण आता आठवून काय उपयोग? तिला काय थाप मारायची ह्याचा विचार करायला पाहिजे होता. घरांत गेल्यावर पत्नीने पाहिला प्रश्न केला,” तिकिटे काढलीत? नाही ना. मला माहीत होते. तुमच्या हातून काही काम झालं तर ना. ही पहा दिनू भावाजींनी काढून दिली.एक फोन केल्यावर.”
तो अपमान चिंटूला सहन झाला नाही. रात्री झोप म्हणून काही येईना काय करावे ते उमजेना. त्यावेळी आकाशातून देवांचे विमान चालले होते. त्यांना ह्याचे दुःख जाणवले. त्यांना अंतर्ज्ञानाने हे ही समजले की ह्या मर्त्य मानवाला स्वतःहून काही समजणार नाही. त्यांना ह्याची कणव आली. त्यांनी ह्याला घोर तपश्चर्या करायची प्रेरणा दिली. देवांचे विमान पुढे गेले. पण इकडे काय चमत्कार झाला. देवाची करणी, नळाला पाणी. तशांतली गत. हा एकदम उठला, भारावलेल्या सारखा चालू लागला. एक बेडरूम किचनच्या फ्लॅटचा निरोप घेतला. बायका मुलाचा निरोप घेतला. सॅमसंग टीवीकडे एकदा शेवटचा कटाक्ष टाकला. आता ते आरडा-ओरडीचे वाद विवाद पुन्हा बघायला मिळणार नव्हते. तपश्चर्या किती वर्षे करावी लागेल? काही सांगता येत नाही बुवा. थोडे चुकल्या सारखे वाटेल. बायकोच्या घालून पाडून बोलण्याची सवय लागलेला बिच्रारा चिंटू त्याशिवाय कसा जगणार? असे कितीतरी मोहपाश आजूबाजूला होते, ते तोडून तो पहा तपश्चर्या करण्यासाठी जंगलात निघाला. पण जाताना पाकीट आणि ए टी एम कार्ड घ्यायला विसरला नाही.बायकोला पिन माहीत असल्याने ती अकौंट धुवून मोकळा करेल अशी भीती त्याला वाटली असेल किंवा वाटेत काही खायला प्यायला लागले तर असावे आपले जवळ म्हणूनही असेल.
चालला. चालला. चालतच राहिला. पण जंगल येण्याचे चिन्ह नव्हते. त्या बिचाऱ्याला हे माहीत नव्हते की आता कुठेही जंगले राहिली नव्हती. केव्हढे हे अज्ञान. आजूबाजूला टोलेजंग इमारती उभे करण्याचे काम चालले होते. हजारो इमारीतींचे सांगाडे उभे होते.रात्रीच्या प्रकाशांत ते सांगाडे भुतांसारखे दिसत होते. बिल्डर्सचे पानदान झाल्यामुळे सर्व इमारतींचे काम अर्धवट पडले होते. चिंटूला भ्याव वाटले.बेवारशी कुत्री, उंदीर ,घुशी, झुरळे आणि क्वचित कुठे माणूस असे हिंस्र वन्य जीव त्याला दिसू लागले. जंगल जंगल म्हणतात ते हेच असावे ह्याची त्याला जाणीव झाली. कॉंक्रिटचे का होईना पण ते देखील जंगल होते.
मग एकदम चमत्कार झाला. आकाशांत पाच तारे चमकू लागले. हीच आपली डेस्टिनी आहे ह्याची त्याला जाणीव झाली. तो लोखंड जसे चुंबकाकडे खेचले जाते तसा तो त्या पाच ताऱ्यांकडे खेचला गेला. तेथे जाऊन बघतो तर काय हजारो दिव्यांचा लखलखाट होता. वीस पंचवीस टेबलं मांडली होती. टेबलावर पांढरे शुभ्र टेबलक्लॉथ लावले होते. प्रत्येक टेबलावर मिनरल वाटरच्या बाटल्या ठेवल्या होत्या. उंची आयात केलेल्या बिस्किटांनी गचागच्च भरलेल्या प्लेटा ठेवल्या होत्या. पार्ले-जी च्या पलीकडे धाव न घेतलेल्या चिंटूला त्याचा हेवा वाटला. इंद्राचा दरबार असाच असेल का? फक्त इथे अजून अप्सरा आलेल्या नव्हत्या. चिंटू दूर अंधारांत उभा राहून ते दृश्य डोळ्यांत साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत होता दासी बटकी लगबगीने फिरत होत्या.
इतक्यांत आकाशंत कित्येक विमाने उडताना दिसू लागले. गेस्ट यायची वेळ झाली होती. एकेक विमान उतरू लागले. विमानातून झ्याक प्याक पोशाख केलेले रुबाबदार तरूण उतरू लागले. एकमेकांत हातमिळवणी सुरु झाली.. सगळे एकमेकांशी एसफ्यास करत होते. त्यांच्या चेहऱ्यावर अलौकिक तेज होते, चिंटूने त्या सर्वांना ताबडतोब ओळखले. म्यानेजर म्यानेजर म्हणतात ते हेच. चिंटू मनातल्या मनात बोलला. त्यांचे दर्शन झाल्यामुळे चिंटूच्या सात पिढ्यांचा उद्धार झाला. शेवटचे विमान उतरले. त्यातून मोठे म्यानेजर उतरले. त्यांचा रुबाब काय वर्णावा. बहुतेक ते “तिकडून” आले असणार. गोऱ्या कातडीवरून आपण अंदाज करू शकतो. त्याने इशारा केल्यावर सर्व धाकटे म्यानेजर स्थानापन्न झाले. मोठ्या म्यानेजरने मग एसफ्यासमधून भाषण दिले. तेथे असलेल्या जायंट स्क्रीनवर कोणा महापुरुषाचा फोटो दिसू लागला. सगळ्यांनी त्याला नमस्कार केला. चिंटूने ओळखले – हा त्यांचा देव असावा. त्यानंतर सगळ्यांनी मेणबत्त्या लावून त्या महापुरुषाची आरती गायला सुरुवात केली, तेव्हा चिंटूच्या डोक्यांत प्रकाश पाडला. हे देवपुत्र नागपुत्र मिळून कुठलातरी वसा वसत आहेत. आरती संपली. आता दासींनी येऊन सगळ्यांचे ग्लास भरले. मोठ्या म्यानेजरने एसफ्यास करून छोटे भाषण करून सर्वांनी आपले ग्लास एका दमांत रिकामे केले. पुन्हा सर्व स्थानापन्न झाले.
मोठ्या म्यानेजरने टाळी वाजवली. आणि जादूची कांडी फिरवावी तसे एक स्टेज अवतीर्ण झाले. दे दणादण संगीत सुरु झाले. स्टेजवर अप्सरा येऊन डान्स करू लागल्या.डान्स रंगात आला असताना एका अप्सरेच्या पायांत गोळा आला. फ़िजिओ बॅग घेऊन धावत धावत पळत आला. इकडे गिटारच्या तारा तुटल्या. बोंगो कोन्गोचे पडदे फाटले. मोठे म्यानेजर उठून उभे राहिले. त्यांनी सगळ्यांना शांत केले. ते म्हणाले, “ अप्सरेचा पाय दुखावला, गिटारची तार तुटली,कोन्गोचा पडदा फाटला. करा रे हकारा, पिटा रे डांगोरा ,आजूबाजूला कोणी उपाशी आहे का याचा शोध घ्या.”
सिक्युरिटीचे जवान सगळीकडे पांगले.शोध घेऊ लागले.तर हा दिसला. उपाशी आहेस का रे बाबा. हा हो म्हणाला. त्याला पकडून ह्याच्या सामोरे केले. मग हा त्यांना म्हणाला, “अरे ह्याला चांगले जेवयाला द्या, हा उपाशी राहिल्यामुळे अप्सरेचा पाय दुखावला, गिटारची तार तुटली, कोन्गोच पडदा फाटला.” मग त्याचे पान वाढले. मोम्याने आपण एक सूपचे बोल घेतले. एक चिंटूला दिले. चिंटूने जेवण केले तो जेवण करताना सगळे म्यानेजर त्याच्याकडे टक लाऊन बघत होते. त्यांनी आयुष्यांत कधी इतका उपाशी, इतक्या तोकड्या कपड्यातला मानव त्यांनी पाहिला नव्हता. मोठ्या म्यानेजरला त्याची दया आली. चिंटूचे जेवण झाल्यावर त्याने चिंटूला विचारले, “ आता तुझी पुरती कहाणी सांग. प्रथम हे सांग तू कुठल्या गावचा.”
चिंटूने त्याला अभिमानाने पुण्यनगरीचे नाव सांगितले. मोठ्या म्यानेजरला काही समजलं नाही. एका छोट्या म्यानेजरने त्याला एसफ्यासमध्ये समजावून सांगितले. त्याच्या डोक्यांत प्रकाश पडला. “ ओ ऑ हो हो, आता समजले. माझी चूक. माझी चूक. कारण आम्ही लहानपणी शिकलो तेव्हा त्याचे नाव पूना होते. तेच ते गाव ना जिथले लोक खूप अघा-----“ त्याने स्वताला वेळेवर सावरले. तो जर का पुढे बोलला असता तर पृथ्वीवर हलकल्लोळ माजला असता. पण छोट्या म्यानेजरांना कळले होते. ते आपला रुमाल आपल्या तोंडाला लावून फिदी फिदी हसू लागले. म्यानेजर लोक खूप स्मार्ट असतात. ब म्हणले की बिर्याणी ओळखणारे लोक ते!
मोठा म्यानेजर रंगात आला होता.” मी पुण्यात काही दिवस होतो. अहाहा काय ते पुणे. अहाहा काय तो डेक्कन जिमखाना! अहाहा काय ती संभाजी बाग ! अहाहा काय ती पेशवे पार्क. बर ते जाऊदे, तुझी कहाणी ऐकव ”
“ मी चिंतामणी अनंत धायगुडे. मी पी डब्लू डीच्या बी अॅंड सी मध्ये एल डी सी म्हणून काम करतो. जॉईन झाल्यापासून आजतागायत मला एक पण प्रमोशन मिळाले नाही. माझे कलीग कुठल्या कुठे पोचले पण मी जिथल्या तेथे. मित्र तोंडावर कॉमेंट करतात. बाकीचे पाठीमागून टिंगल करतात. बायको घालून पाडून बोलते. नातेवाईकांना तोंड दाखवायची लाज वाटते, करू तर काय करू. जाऊ तर कुठे जाऊ. तुम्ही काय वसा वसत होता तो मला सांगा, मी पण ते व्रत घेतो.”
उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतणार नाही, मातणार नाही.घेतला वसा टाकणार नाही. इत्यादी परवलीच्या शब्दांची देवाण घेवाण झाल्यावर मोठ्या म्यानेजरची खात्री झाली की बंदा तैय्यार आहे. मग त्याने वसा सांगितला. तू डेल कार्नेगीजींना आपले गुरु कर. आम्ही सर्व त्यांचे शिष्य आहोत. त्यांचे “ मित्र कसे बनवावेत आणि लोकांवर छाप कशी पाडावी “ हे पुस्तक विकत घे. त्याची नवीन आवृत्ती घ्यायला पाहिजे. मॅनेजमेंटची लिंगो दरवर्षी बदलत असते, तशाच पद्धतीही. तुला पैशाची भाषा समजते का ? नाही समजत ? तुझ्या मुलाला पहिलीत प्रवेश घ्यायला गेला होतास तेव्हा हेड मिस बोलल्या तीच ती भाषा.”
येथे चिंटू गोंधळला. तो जेव्हा मुलाच्यासाठी शाळेत गेला होता तेव्हा त्या मिस चक्क मराठीत बोलल्या होत्या. त्याचा गोंधळ बघून मोम्याने (मोठा म्यानेजर) त्याला विचारले,” कुठल्या शाळेत प्रवेश घेतलास?”
“ कुठल्या म्हणजे उलटीपालटीच्या, माफ करा , मुनसिपाल्टीच्या शाळेत! तिथे फी कमी असते.”
“ म्हणजे तुला पैशाची भाषा पहिल्यापासूनच शिकावी लागणार अस दिसतंय! नो प्रॉब्लेम. पैशाची भाषा तिसऱ्या शतकांत प्रचलित होती.ती आता नामशेष झाली असे तज्ञ सांगतात.ते चूक आहे. ती सध्या जोरात आहे. राजकारण करणारे सांगतील की मराठी ही राजभाषा आहे, आहे ना. कोण नाकारतो. पण तळाशी ही पैशाची भाषा चालते. ही भाषा शिकण्यासाठी तू “२४ तासांत शिका.पैशाची भाषा फाड् फाड् “ हे पुस्तक खरेदी कर. हो आणि एक , ही पुस्तके अ.ब. चौकांत मिळाली तरी घेऊ नकोस. तिथे हमखास जुनी आवृत्ती मिळणार. तेव्हा तू सरळ अॅमॅझॉन वरून मागव. अक्षरधारामध्ये पहिल्या धारेची पुस्तके मिळतात. बघ मिळतेय का.नाहीतर वाहत्या गंगेतही हात धुवू शकतोस.”
जाता जाता – मला जरा महत्वाचे काम आहे. बेझो भेटायला येणार आहे. त्यासाठी मला लंडनला परतायला पाहिजे.--- त्या आधी काही महत्वाच्या टिप्स . १) नेहमी खाविंदचरणारविन्दी मिलिंदायमान होत्साते हाताखालच्या लोकांवर जरब ठेव २)मिटींगमध्ये इंग्लिश मध्ये सुरवात करावी. मग म्हणावे की “ व्हाट आय वान्ट टू से इज की “ अशी सुरवात करावी आणि मराठीत गाडी बदलावी. ३) तीव्र निरीक्षण शक्ति. ह्याबाबत मला मेडिकल कॅालेजमधला किस्सा आठवतो. आज नको. पुढच्या वेळेला भेटू तेव्हा मला आठवण करशील. पुस्तकांचा मात्र कसून अभ्यास कर. कार्नेगीजी तुला यश देओ.”
असा संदेश देऊन मोम्या विमान पकडून लंडन कडे रवाना झाला. नंतर धाम्या पण आपापल्या विमानातून एकमेकांचा निरोप घेऊन रवाना झाले. इतक्या विमानांनी टेक-ऑफ केल्यामुळे प्रचंड आवाज झाला. चिंटू स्वप्नातून जागा झाला. तेव्हा तो आवाज विमानांचा नसून आपल्या प्रिय पत्नीचा आहे हे त्याच्या लक्षांत आले. ती चहा प्यायला बोलावत होती.
पण चिंटूने स्वप्न मनावर घेतले. मोम्याने रेकमेंड केलीली पुस्तके त्याने विकत आणली. त्यांचा कसून अभ्यास केला. कारनेगींच्या कृपेने त्याचे अंथरुणावर लोळत पडलेले नशीब आळोखे पिळोखे देऊन उठून बसले, मग चालू लागले, त्यानंतर चक्क धावू लागले. आता तर ते उंच उडी मारत आहे! चिंटू आता चढत चढत मंत्र्याचा पी ए झाला आहे. त्याच्याकडे गाडी आहे.नुकताच त्याने मोठा फ्लॅट बुक केला आहे. समाजात त्याला आता मान आहे.नातेवाईक “ या चिंतामणराव “ असे आग्रहाने बोलावतात. आता बोला! आहे की नाही.
डेल कार्नेगीजी जसे चिंटूला पावले तसे आपणा सर्वांना पावोत. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet