पंधरा आणि सोळा ऑगस्टच्या (२०२०) काही नोंदी

नेमेचि येतो मग पंधरा ऑगस्ट. अर्थात लहानपणाच्या आठवणीत या दिवसाला त्याचा स्वतःचा उत्सवी असा रंग आहे , झेंडूच्या फुलांचा वास आहे, त्याच्याशी निगडित पेढे , बर्फी, बासुंदी कधी जिलेबीच्या चवीच्या आठवणी आहेत. परंतु जीवन प्रवाही आहे, आणि गेली काही वर्षे १५ ऑगस्ट फार वेगळा उगवतो. एक तर आपल्या नेहमीच्याच, ओळखीच्या वातावरणात हे उत्सव साजरे करणे आणि एक स्थलांतरित म्हणून हे उत्सव साजरे करणे यात खूप फरक आहे. अर्थात तुलना केली तर फरक आहे आणि तुलना केली नाहीच तर प्रत्येक अनुभव हा एकमेवाद्वितीयच आहे. कुटुंबातले सर्व आप्तजन, मित्र-मैत्रिणी आजूबाजूला असताना हे सण साजरे करण्याचा संदर्भ वेगळा असतो, किंवा अगदीच परिचयाचा असतो. माझ्या आठवणीत अशा ओळखीच्या वातावरणाबाहेर साजरा केलेला पंधरा ऑगस्ट म्हणजे हैदराबादचा. या शहरात मी फार नाही पण एक वर्षं काढलं. तरीही घराबाहेर इतक्या लांब जाऊन नोकरी करण्याचा हा पहिलाच अनुभव असल्याने एकदम इंटेन्स असा काळ होता. म्हणलं तर भारतातच होतो, पण भाषा , संस्कृती या सर्व बाबतीत प्रचंड वेगळेपण होतं. अपवाद सुरेख अशा दगडी शिवालयांचा. एक स्पेशल जन्म घेऊन आंध्र प्रदेशातील शिवालयात वेळ घालवता आला तर मजा येईल. म्हणजे शिवालयात तासभर ध्यान करून संन्यासी व्हायचं, बाहेर आल्यावर देवळापासून शंभर दोनशे मीटर अंतरावर असलेल्या एखाद्या टपरीवरून येणाऱ्या ताज्या वड्याच्या वासाकडे आकर्षित होऊन आठदहा रुपयात आलूबोन्डा आणि मिरची खायची. तर अशा या शहरात देवदत्त बर्वे ऊर्फ देबू भेटेपर्यन्त मी पुष्कळ एकटा होतो. नंतर देबूने स्वतः तिथल्या हॉस्टेल वरून माझी सुटका केली आणि मला रूममेट करून घेतला. देबू स्वतः चांगला चित्रकार , वाचक आणि इतिहासाचा जाणकार. त्यामुळे तो भारत देशाबद्दल पुष्कळ काही सांगत असे. संध्याकाळी मी शक्यतो हार्मोनियम वाजवत बसे आणि देबू इतिहासाबद्दल काहीतरी सांगे किंवा त्याच्या कामाच्या काही मजेशीर गमतीजमती सांगत असे. दुसरी एक गम्मत अशी की देबू हैद्राबाद मध्ये तीनेक वर्षे तरी काम करीत होता तरीही तो ‘तिथला किंवा इथला’ झाला नव्हता. तो स्थलांतरित होता. त्याची काहीएक खंत त्याच्या मनात कायम होती. तर तिथल्या पंधरा ऑगस्टला आम्हाला ध्वजवंदनाला वगैरे कुठे जायचं नव्हतं. आम्ही कुर्ते बिर्ते घालून , गांधी टोप्या घालून त्या दिवशी तयार होतो. रूमवरच वेगवेगळ्या आकाराचे भारताचे झेंडे आणले होते. मिठाई म्हणून आमचा एकदम फेवरीट असा पुल्लरेड्डीचा मिल्क मैसूरपाक आणून ठेवलेला होता. नाश्ता वगैरे झाल्यावर गच्चीवर जाऊन आम्ही मग हातात वेगवेगळ्या आकाराचे झेंडे घेऊन एसएलआर कॅमेऱ्याने काही फोटो काढून त्याकाळातील फोटो सेशन केलं होतं. सर्वात जास्त फोटो देबूचे काढले होते कारण त्याचा फोटोजेनीकपणा आणि उत्साह ! देबूच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. तो दिवस फार मस्त मजेत आणि उजळ गेला.

भारत सोडून मला आता एक तप तरी पूर्ण झालं. पंधरा ऑगस्ट हा पोलिश संस्कृतीमध्ये किंवा कॅथॉलिक संस्कृतीमध्ये हा महत्वाचा सण आहे. आजच्या दिवशी येशू ख्रिस्ताची आई, मेरी ही सदेह वैकुंठाला गेली अशी धारणा आहे. त्यामुळे इथल्या हवेतदेखील एक प्रकारचा फेस्टिव्हपणा असतो, परंतु तो वेगळा. पोलिश समाजमनात असलेले श्विएन्ता ( Święta) अर्थात सण आणि त्यांच्या अवतीभवतीची खास सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ भूमी, त्यांच्याशी निगडित तथाकथित धार्मिक कल्पना, सण साजरा करण्याच्या पद्धती हा एक खास अभ्यासाचा विषय आहे. ऑगस्ट महिन्याचा दुसरा महत्वाचा पैलू म्हणजे इथल्या उन्हाळ्याचा आणि पर्यायाने सुट्टीचा क्लायमॅक्स. गेल्या बारा वर्षात मी ऑगस्टमध्ये कधी भारतात होतो, तर कधी सुटीसाठी मुलांसोबत समुद्रावर. सुट्टीसाठी मनुष्य जंगलात , समुद्रावर असेल तर एक निसर्ग सोडला तर दुसऱ्या कुठल्या खास उत्सवाची गरज भासत नाही, त्यांची आठवण देखील होत नाही. एकदा भारतात सहकुटुंब असताना आमचे पिताश्री त्यांच्या पोलिश सुनेला ऑफिसच्या पंधरा ऑगस्टच्या ध्वजवंदनाला आणि पेढे वाटप कार्यक्रमाला घेऊन गेले होते हे नक्की आठवतंय. परंतु एकूण या दहा बारा वर्षांत पंधरा ऑगस्ट साजरा करण्यात एक प्रकारची अनियमितता होती, आणि या पार्श्वभूमीवर कोविड-वर्षात साजरा केलेला हा पंधरा ऑगस्ट फारच मजेशीर होता.एकूण हा वीकेंडच मस्त होता.

या पंधरा ऑगस्टला दोन फेस्टिवलना एकाच दिवशी आपल्याला हजर रहावं लागणार हे काही दिवस आधी माहित झालं. त्यातला पहिला फेस्टिव्हल म्हणजे शहरातल्या विलडा या भागात दरवर्षी होणारा झुपांस्की फेस्टिव्हल आणि त्यानंतर लगेच येणारा आमचा इंडियन कल्चरल इवनिंग हा छोटा फेस्टिव्हल. झुपांस्की फेस्टिव्हल साधारण दुपारी दोननंतर सुरु होणार होता, तर आमचा इंडियन फेस्टिवल चार वाजता. झुपांस्की फेस्टिव्हल मध्ये माझा काही परफॉर्मन्स वगैरे नव्हता, परंतु आमच्या अर्बन स्केचर ग्रुपच्या स्केचेसचं प्रदर्शन होतं.त्याची तयारी करायची होती. म्हणजे दोन वाजता जमा होऊन शामियान्यात चित्रे लटकवणे वगैरे. आमच्या या अर्बन स्केचर ग्रुपमध्ये मी अजून नवा आहे. इथे येऊन मला एकच वर्ष झालं आहे. हा ग्रुप काय करतो तर , वेळ मिळेल तेव्हा शहरात ( कधीकधी दुसऱ्या शहरात , जवळच्या भागात ) जमून स्केचिंग करतो. आठ ते दहाजणांचा हा एक बऱ्यापैकी नियमित ग्रुप आहे. यात अनुभवी, अननुभवी आणि विविध माध्यमांत काम करणारे विविध वयोगटाचे लोक आहेत, त्यामुळे जास्त मजा येते. आमच्या या ग्रुपविषयी आणि एकूणच अर्बन स्केचिंगविषयी कधीतरी लिहायचं आहे. या फेस्टिव्हलसाठी डोरा ही आमची मैत्रीण खास वरोत्सुआफ़वरून सायकलवर आली होती. तर माझा प्लॅन अगदी साधा होता , तो म्हणजे सकाळपासून थिएटरवरून ( तेआत्र पोल्स्की ) माईक/केबल्स घ्यायच्या , नंतर रुसाऊका तळ्यावर जाऊन प्योत्रकडून माईकचा स्टॅन्ड घ्यायचा , आणि नंतर दोनच्या आसपास मित्र शिमॉनकडून माईकहोल्डर घ्यायचा. भारताचा स्वातंत्र्यदिन असल्याने भारतीय स्टाइलचा जुगाड असलाच पाहिजे. या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळाल्या असत्या तर ! हे सर्व संध्यकाळच्या कन्सर्टसाठी जरुरी होतं , कारण इंडियन कल्चरल इव्हीनिंग मध्ये आमचा एक माजी विद्यार्थी सतार वाजवणार होता तर मी त्याला तबल्यावर जुजबी साथ करणार होतो . असो ! तर सकाळी दहा साडेदहाच्या आसपास माईक घेतले, नंतर रुसाऊका वर गेलो. हे तळं आमच्या घरापासून दहा पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे. या जागेला फार खास असा इतिहास आहे. उन्हाळ्याच्या कहरात या तळ्याच्या आजूबाजूला असलेल्या जंगलात निवांत आणि थंड असा वेळ घालवता येऊ शकतो. तर मी प्योत्रला भेटण्यासाठी गेलो आणि तिथे तो माल्टा फेस्टिवल अंतर्गत वर्कशॉप घेत होता. म्हणजे आयोजित करत होता. तोंडावर भरघोस मास्क असलेली एक लहानखुऱ्या चणीची एक मुलगी आजूबाजूच्या लोकांना चिकणमाती कशी मळावी याचं ट्रेनिंग देत होती. तिच्या आवाजावरून आणि इंग्लिश बोलण्याच्या लहेज्यावरून ती इराणी असावी असा मी अंदाज बांधला आणि प्योत्रची वाट पाहत उभा राहिलो. दोनेक मिनिटात प्योत्र आला, त्याने आमची ओळख करून दिली. ही छोट्या चणीची सुरेख आवाजात बोलणारी मुलगी सारा; आणि ती खरोखरीच इराणी होती. तिचा नवरा इटालियन होता आणि दोघेही माल्टा फेस्टिवलमध्ये हे विकेंड वर्कशॉप घेत होते. या अत्यंत रोचक उपक्रमाबद्दल पुढे सांगेनच. त्यांनी मला एक टेबल दाखवलं आणि चल तू जॉईन हो असं म्हणाले. मी म्हणालो सॉरी , आज नाही जमणार , उद्या असेल तर जरून येईन. मग उद्या बारा वाजता येण्याचं मी ठरवलं आणि प्योत्रकडून स्टॅन्ड घेऊन घरी आलो; अंशूभाईंची वाट पाहत बसलो. अंशूभाई म्हणजे आमचे भारतीय मित्र. मूळ बिहारचे, आता गेली आठेक वर्षे पोलंडमध्ये! इथे ओल्ड सिटीमध्ये त्यांचं एक इंडियन रेस्तराँ आहे. सध्या त्याची एक उन्हाळी शाखा वार्ता नदीच्या काठी आहे. तिथल्याच आवारात इंडियन कल्चरल इव्हीनिंग होणार होती. माझ्याकडे दोन तबले, माईक, केबल्स, स्टॅन्ड असं सामान होतं आणि वाटेत अजून आम्हाला माझ्या ऑफिसमधून डेकोरेशनच्या साड्या वगैरे घ्यायच्या होत्या. हे सर्व मला सायकलवर नेणं शक्य नव्हतं. अंशूभाई घरी आले, मी चहा बनवलाच होता आणि सकाळच्या नाश्त्याचे बनवलेले थोडे पोहे शिल्लक होते. आम्ही कार्यक्रमाच्या तयारीबद्दल चर्चा करीत चहा प्यायलो, पोहे खाल्ले आणि पायात चपला सरकावणार इतक्यात अंशूभाईंना घरून फोन आला. व्हाट्सअप वर त्यांच्या आईनं सांगितलं, ‘ आत्ताच पाचमिनिटांपूर्वी तुझी मावशी गेली! हॉस्पिटलमध्ये होती, तिच्याशी फोनवर बोलत असतानाच गेली.’ ही सगळी बातचीत मला ऐकू येत होतीच. अंशूभाईंना मी शांत केलं. सामान घेऊन आम्ही गाडीत बसलो. त्यांनी फोन ठेवला. काही सेकंद एकदम शांततेत गेले. एकूण कोरोनामुळे एक प्रकारची चमत्कारिक आणि न भूतो न भविष्यती अशी ऍब्सर्डिटी आपल्या सर्वांच्याच जीवनात आली आहे. आपल्या प्रियजनांना आपल्यापैकी अनेकजण अखेरचा निरोप देऊ शकत नाहीत. स्थलांतरित मनुष्याच्या जीवनात ही ऍब्सर्डिटी खूप आधीपासून आहे. अर्थात काही लोक अशा काळात इमर्जन्सी तिकीट काढून हातची सगळी कामंधामं टाकून मायदेशाकडे धाव घेतात, पण सध्याच्या काळात तेदेखील शक्य नाही. मग ऑफिस येईपर्यंत अंशूभाई त्यांच्या बिहारी परिवाराच्या कहाण्या सांगत होते. तिथल्या परिवाराची रचना, त्याचे ताणेबाणे खूप वेगळे आहेत. बिहारमध्ये अजूनही एकत्र कुटुंब पद्धती जिवंत आहे. अशा क्षणांमध्ये जो एक हताशपणा जाणवतो, तो अंशूभाईंच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसणं स्वाभाविक होतं. एकाच पृथ्वीवर राहत असूनही एका स्थलांतरितासाठी भौगोलिक अंतर हा एक मोठा अडसर असतो. तर आता आम्ही ऑफिसवर गेलो. तिथून काही साड्या आणि डेकोरेशनचं किरकोळ इंडियन सामान घेतलं, गाडीत टाकलं. अंशूभाईंना म्हणालो , मी आता माईक होल्डर घ्यायला शिमॉनकडे जातो, नंतर झुपांस्की फेस्टिवलमध्ये थोडा वेळ जाऊन मदत करतो आणि चार साडेचारच्या आसपास येतो, आपण साऊंड चेक करूयात. मग मी शिमॉनकडे जाऊन माईक होल्डर घेतला आणि लगोलग ट्रामने रिनेक विलडा अर्थात विलडा मार्केट कडे गेलो. इथल्या एक छोट्या पार्कमध्ये हा फेस्टिव्हल होतो. मी दोन वाजून दहा मिनिटांनी पोहोचलो. मला वाटलं होतं , की आमचे लोक जमून चित्रं लावत असतील; पण कसलं काय! तिथे एक शामियाना सोडला तर बाकी काही नव्हतं. शहरातील सुप्रसिद्ध असे क्लाऊस माईकवाले साऊंड टेस्टिंग करत होते आणि अजून सर्व गोष्टी लागत होत्या. हळू हळू आमचे अर्बन स्केचरवाले लोक आले. त्यांच्याशी थोडा वेळ गप्पा मारल्या. आयोजक बाईंनी आमचं स्वागत केलं आणि आमच्या स्केचेसची आणि एकूणच आमच्या या ग्रुपची स्तुती केली. आमच्या ग्रुपमधला ग्रेगोरी ( हा पोस्टमन आहे ) माझ्याकडं इंगित करून आयोजक बाईंना म्हणाला , की आमचा ग्रुप एकदम इंटरनॅशनल आहे. त्यावर बाई छानसं हसून म्हणाल्या, ‘नाही हो! तो ( म्हणजे मी ) इथलाच आहे.’ बाजूलाच एका इंटरेस्टिंग परफॉर्मन्सची तयारी होत होती. परफॉर्मन्स करणाऱ्या बाईनी कोविड काळाला अनुसरून परफॉर्मन्स बनवला होता. फोनपे कविता! अर्थात दिलेल्या नंबरवर फोन करायचा आणि त्या बाई त्यांच्या आवडत्या कविता तुम्हाला वाचून दाखवतील. आमचा शामियाना लागेपर्यंत तीन वाजून गेले. माझं मन संध्याकाळच्या कन्सर्टमध्ये जास्त होतं आणि तिथला साऊंड चेक फार महत्वाचा होता. थोडीशी मदत करून, गप्पा मारून मी सटकलो. पुन्हा ट्रामने वार्ता नदीच्या काठी ! आता भूक लागली होती. पण अंशूभाईंना डेकोरेशनमध्ये मदत केली. थोड्या वेळात एरीक आला आणि वाद्ये काढून, माईक, मिक्सर, स्पीकर यांच्या केबलचा जुगाड करून आम्ही साऊंड चेकला सुरुवात केली.एव्हाना चार वाजले होते, हळूहळू लोक येऊ लागले होते. ध्वनीसंयोजन हे इतकं महत्वाचं आहे, पण अशा कार्यक्रमांमध्ये त्याच्याकडे सर्रास दुर्लक्ष होतं हा माझा अनुभव. साधारण अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर साऊंड चेक पूर्ण झाला. आम्ही दोघेही खुश झालो. कडक ऊन असल्याने तबला खणखणीत वाजू लागला. इथल्या कडाक्याच्या थंडीत तबल्याची काळजी घेणं हा एक फार वैतागवाणा प्रकार आहे. या कल्चरल इवनिंगमध्ये बॉलिवूड नृत्याचे काही ग्रुप होते, भरतनाट्यम वाल्या एक दोघी होत्या आणि आमचा एक छोटा कार्यक्रम होता. एरीक सध्या सुप्रतीक सेनगुप्ताकडून सतारीचे धडे घेतो. त्याने सहाना ( कानडा) रागातली एकछोटी गत निवडली होती, आधी आम्ही देस वाजवणार होतो. सुरुवातीला थोडी आलापी, नंतर शॉर्ट झाला आणि बऱ्यापैकी द्रुत तीनतालातली छोटी गत! असा वीस पंचवीस मिनिटांचा छोटा कार्यक्रम! मी कोणत्याही अंगाने भारी तबलावादक नाही. परंतु एरिकला साथ करावी म्हणून मी अधूनमधून वाजवतो इतकंच! अर्थात मी तबला भरपूर आणि खूप प्रेमाने ऐकतो. बॉलिवूड ग्रुप मध्ये जास्तकरून पोलिश मुली होत्याच, काही भारतीय देखील होत्या. पोलिश मुलींचं बॉलिवूड प्रेम, किंवा त्याचं फॅसिनेशन हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. प्रस्तुत केलेल्या कार्यक्रमांत सुरेख आणि देखणं भरतनाट्यम् करणारी एक आग्न्येष्का सोडली तर बाकी सर्व हौशी प्रकार होता. माझ्यासाठी भरतनाट्यम् हे फक्त सुचेता चापेकर आणि दक्षिणेतल्या काही नर्तकांनी करण्याचं नृत्य आहे. पोलिश मुलींमध्ये अभावाने सापडणारी तालाची समज या मुलीमध्ये होती आणि तिने फार सुरेख अलारिपू दाखवला.

या कार्यक्रमात माझे काही पोलिश मित्र आले होते त्यात होता नवीनच ओळख झालेला कुबा काप्राल. काहीच दिवसांपूर्वी त्याने लिहिलेली श्रुतिका - UCHO ( उखो ) अर्थानं कान - मी वाचली होती. फेसबुकवर आम्ही थोडं बोललो होतो आणि या फेस्टिव्हलमध्ये जमलं तर चर्चा करूया असं ठरलं होतं. आमच्या कन्सर्टनंतर काहीतरी खाऊन मी आणि कुबा रेस्तराँच्या मागे असलेल्या बागेत जाऊन निवांत बसलो. स्टेजवर आय लव्ह माय इंडिया, ये मेरा इंडिया सारखी गाणी सुरु होती, पण इथे बऱ्यापैकी शांतता होती. कुबाच्या या श्रुतिकेमध्ये वडिलांचा मृत्यू आणि मग त्या अनुषंगाने उलगडणारे वडील-मुलगा, वडील-मुलगी, भाऊ-बहीण नात्याचे पदर ही थीम आहे. यात किंचित जुना पोलिश काळ देखील आहे आणि संगीताची फार फार महत्वाची भूमिका आहे. यामध्ये सररियालिस्ट पद्धतीच्या नेपथ्याला पुरेपूर वाव आहे. त्याने हे नाटक, श्रुतिका म्हणूनच लिहिलं आहे की त्याला याचं नाटक करायचं आहे यावर आम्ही पुष्कळ चर्चा केली. पुन्हा ही श्रुतिका मला मराठीत भाषांतरित करायची आहे असंही मी म्हणालो. होता होता चर्चा भारतीय नाटकांवर आली. भारतीय रंगभूमीबद्दल इथल्या माणसाला फार माहिती नसतेच, परंतु भारतीय साहित्य पोलिशमध्ये बऱ्यापैकी उपलब्ध आहे. तरीही भारतीय भाषांमधील पुष्कळ साहित्य अजूनही अनुवादित झालेलं नाही. मराठीपुरतं बोलायचं तर सदानंद रेगे, आरती प्रभू, शंकर पाटील, माडगूळकर , नेमाडे आणि यासारखे अनेक लोक त्यांच्या अनेक साहित्यकृती, साहित्यिक निबंध हे अनुवादित व्हायला हवेत. ते झालेले नाहीत आणि आपल्याला यात अजून काही वाटा उचलता येत नाही याची खंत वाटण्यासाठी पंधरा ऑगस्टपेक्षा दुसरा कोणता चांगला दिवस असू शकतो! भारतीय इंग्लिश साहित्य मात्र पोलिश भाषेमध्ये बऱ्यापैकी उपलब्ध आहे. गंमत म्हणजे मी कुबाला विचारलं की तू हे नाटक घेऊन एखाद्या थिएटरकडे का जात नाहीस? त्यावर तो मस्त हसला आणि म्हणाला, मी नाट्यलेखनाला चाळीशीत सुरुवात केली, म्हणजे ती आपोआप झाली. मी या क्षेत्रात पुष्कळच नवा आहे आणि थिएटरच्या लोकांबरोबर बसून वोडका पिण्याचं काही मला जमत नाही, कारण मी पीत नाही. यावर आम्ही दोघेही मनसोक्त हसलो. ‘समानशीले व्यसनेषु सख्यम’ हा श्लोक बरोबर आहेच पण ‘समानशीले अव्यसनेषु सख्यम’ असाही त्याचा पैलू असावा. अर्थात कुठलंही व्यसन नसणाऱ्या लोकांमध्ये पण एक प्रकारचं सख्य असतं. पुढं मी त्याला महानिर्वाण नाटकाची ष्टोरी थोडक्यात सांगितली आणि आळेकरांच्याच ‘एक दिवस मठाकडे’ चं पोलिश भाषांतर पाठवेन म्हणालो. त्या एकांकिकेवरदेखील थोडा वेळ बोललो. त्यातदेखील संगीत, खासकरून फिल्मी संगीत महत्वाची भूमिका बजावत. एकूणच मृत्यू हेच एक महत्वाचं पात्र असणारी फार कमी नाटकं आहेत त्यात महानिर्वाण येतं आणि काही अंशी ‘एक दिवस मठाकडे’ देखील. सध्याच्या कोरोना काळातील थिएटर हादेखील चर्चेचा विषय होताच. अजूनही काही नवीन कल्पनांवर आम्ही बोललो आणि लवकरच भेटूया या नोटवर कुबाने माझी राजा घेतली.

दुसरी एक खूप चांगली मैत्रीण आली होती , आगाता! तेआत्र आनिमात्सि या बाहुली थिएटरमध्ये काम करणारी, नाटकाच्या संदर्भात पीएचडी करणारी, अत्यंत हसमुख अशी ही मैत्रीण. भारतनाट्यमचा परफॉर्मन्स सुरु असताना मुद्रांबद्दल तिनं बरंच काही विचारलं, मला जे थोडंफार समजत होतं, मी सांगितलं. आम्ही पाहिलेल्या, न पाहिलेल्या अनेक नाटकांबद्दल आम्ही पुष्कळ वेळ बोलत होतो. पुन्हा भारतीय नाटकांबद्दल बोललोच. दुसऱ्या भाषेतली नाटकं वाचणं आणि पाहणं किती महत्वाचं आहे याचा एक मजेदार अनुभव तिने सांगितला. विद्यार्थी म्हणून तिला ‘एशियन थिएटर’ असा विषय होता. ‘एशियन थिएटर’ हा खूप मोठी व्याप्ती असलेला आणि जटिल विषय आहे. त्यात कोरियन थिएटर शिकताना, खुद्द कोरियाहून आलेल्या एक अध्यापिका त्यांच्यासोबत कोरियन नाटक वाचत होत्या. त्या नाटकातली मुख्य नायिका सध्याचं जीवन ज्या प्रकारे जगते आहे त्यामागे तिच्या मागच्या दोन जन्माचे संदर्भ होते आणि एका अर्थाने पुनर्जन्म न मानणाऱ्या समाजातल्या विद्यार्थ्याला अशा प्रकारची कृती समजून घेताना प्रयत्नांची , कल्पनेची पराकाष्ठा करावी लागते. आपण वरवर खूप ग्लोबलाईज झालो आहोत; पण आपल्याला एकमेकांची रंगभूमी समजून घ्यायला फार मोठा प्रवास करावा लागणार आहे हे अशा गप्पांमधून सारखं जाणवत राहतं.

एकूण कार्यक्रम ठीकच झाला ! विविध राज्यांतले भारतीय आले होते आणि एकमेकांना हैप्पी पन्द्रह अगस्त , हॅप्पी इंडिपेन्डेन्स डे म्हणत होतो. पोझनानमध्ये दहाएक वर्षांपूर्वी भारतीय चेहरा शोधावा लागायचा ; आता मात्र त्यांची संख्या पुष्कळ वाढली आहे , वाढते आहे.

कार्यक्रम संपला. सगळ्यांकडून कोविडफॉर्म भरून घेतला होता, ते फॉर्म गोळा करून झाले. आता साडेनऊ झाले होते.अंशूभाईंना म्हणालो, चला आता मी निघतो. जाऊन झोपतो. अंधार झाला होताच, पण नदीकाठी अजून काही बार आहेत, तिथे संगीत सुरु होतं, रोषणाई होती. लोकांची वर्दळ होती. अंशूभाईंशी पुन्हा गप्पा सुरु झाल्या. अंशूभाई आता एकदम इमोशनल झाले होते.ते म्हणाले, की मी इथे कितीही वर्षे राहिलो, अगदी पोलिश भाषा बोलू वगैरे लागलो तरी मी इथला काही होणार नाही, मी राहणार इंडियनच! आपल्या आयुष्यातली पहिली वीसेक वर्षे जिथे गेली ती वर्षे आपल्याला कायम बोलावत राहतात अशा अर्थाचं त्यांचं म्हणणं होतं. आम्ही बोलत बोलत बाहेर रस्त्यावर आलो. हा रस्ता
नदीकाठी आहे. आमच्या गप्पा सुरु होत्या. इतक्यात एक मोठी जीप आमच्याजवळ येऊन थांबली आणि ड्रायव्हरने जोरात आवाज दिला. मला वाटलं, की आम्ही रस्त्यात उभे आहोत, म्हणून आम्ही थोडे आत सरकलो. पण आता तो ड्रायव्हर माझ्या दिशेने हात करून काहीतरी बोलू लागला. आता माझ्या लक्षात आलं, की तो माझ्याशीच बोलतो आहे. त्याने गाडी उतारावर थांबवलीच आणि त्याच्या ड्रायव्हरसीटवरून हात बाहेर काढून माझ्याशी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला. मी उत्तरादाखल हस्तांदोलन केलं, पण त्या अंधारात हा मनुष्य नक्की कोण हे मात्र समजेना आणि हा आपल्याला ओळखत असल्यासारखा का करतो आहे ते पण समजेना. तो मनुष्य म्हणाला , “ तुमचा फोटो आणि विडिओ मस्त आलाय! टाकलाय मी फेसबुक पेजवर !”. क्षणभर वाटलं, की संध्याकाळच्या कन्सर्टबद्दल हा बोलत असेल पण दुसऱ्याच क्षणी डोक्यात प्रकाश पडला. साधारण आठवडाभरापूर्वी मी नदीकाठी स्केचिंग करत बसलो होतो. तिथे एक मनुष्य ( हाच तो ) आला आणि अर्थात पाहू लागला . यात नवीन काहीच नाही. पण पुढे त्याने अनेक प्रश्न विचारले , आमची बातचीत झाली आणि लक्षात आलं , की “रातुय रिबं” अर्थात “मासे वाचवा/नदी वाचवा” संस्थेचा हा एक सभासद आहे. वार्ता नदीची स्वच्छता , तिच्याभोवती आढळणारी झाडं , तिच्यातले मासे, या संदर्भात जनजागृती करण्याचं काम ही संस्था करते. तेव्हा त्याने माझा आणि माझ्या अर्ध्यामुर्ध्या स्केचचा फोटो काढला होता आणि एक छोट्याशा व्हिडिओत मी ‘नदी वाचवूया , नदीकाठ सुंदर ठेवूया’ अशा प्रकारचं काहीतरी बोललो होतो. ‘जीवितनदी’ या पुण्यातल्या संस्थेत काही मित्र काम करतात. या मनुष्याला भेटून माझ्या त्या मित्रांची आठवण झाली होती. तर त्याला मी थँक्यू वगैरे म्हणालो आणि फेबुवर पाहतो असं म्हणालो. कोडं मला
अजून हेच पडलं आहे की इतक्या अंधारात त्याने मला ओळखलं कसं! त्याच्या गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश आमच्या अंगावर पडला नव्हता हे नक्की! असो! तर ट्राम पकडून घरी आलो आणि झोपी गेलो! झोपेत मी कोणीच नव्हतो, ना भारतीय, ना पोलिश, ना स्वदेशी, ना परदेशी, ना स्थलांतरित!
---------------------------------------------------------------------------------------------------------------

सोळा ऑगस्ट:

रविवारचा दिवस हा खरोखरच सूर्याचा दिवस म्हणून उगवला ! सकाळपासून अठ्ठावीस डिग्री तापमान होतं. ठरल्या वेळी बाराच्या आधी रुसाऊकावर पोहोचलो. तिथे सारा, तिचा नवरा, बाकीचे काही लोक होतेच. तळ्याकाठी असलेल्या झाडांखाली छोटी टेबलं मांडून वर्कशॉप होणार होतं. साराने आधी काही सूचना दिल्या आणि आम्ही त्याप्रमाणे काम करायला, चिकणमाती मळायला सुरुवात केली. सुरुवातीला आम्ही एक मग बनवला. माझ्या बाजूला एक उला नावाची तरुण मुलगी होती. आमच्याच विद्यापीठात पोलिश विभागात शिकणारी. ती अगदी दक्षिणेवरून आली होती. पोझनान तिचं आवडतं शहर आहे म्हणाली आणि प्रकाशन व्यवसायाबद्दल , वाचनाबद्दल आमच्या काही छान गप्पा झाल्या. नंतर मग आम्ही छोट्या नावा बनवायला सुरुवात केली. या वर्षीच्या माल्टा फेस्टिव्हलची थीम आहे”पाणी”. सारा आणि तिच्या टीमने एक इन्स्टॉलेशन आणि स्टोरीटेलिंग प्रोजेक्ट दिला होता, तो मंजूर झाला. या इंस्टॉलेशनची थोडक्यात कल्पना अशी, की वर्कशॉपमध्ये येणारे लोक मातीच्या छोट्या मोठ्या नावा बनवतील. या नावा तीनचार दिवस वाळत ठेवल्या जातील. पंचवीस तारखेला इंस्टॉलेशनमध्ये या नावा ठेवल्या जातील आणि त्या नावांवर पाणी पडत राहील. नावा अर्थातच हळूहळू विरघळून जातील, नष्ट होतील. काहीच महिन्यांपूर्वी युरोपकडे धाव घेणाऱ्या स्थलांतरितांच्या नावा समुद्रात बुडाल्या त्याची आठवण या नावा करून देतील. रुसाऊका हे तळं जर्मन लोकांनी बांधून घेतलं . त्यासाठी अर्थातच ज्यू कैद्यांची मदत घेतली. काहीच दिवसांपूर्वी या तळ्यातून काही फार पुराण्या थडग्यांचे शिलालेख मिळाले होते. या सर्व घटनांची देखील नोंद साराचं इन्स्टॉलेशन आणि स्टोरीटेलिंग घेणार आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हा ग्रुप काय करतो तर , वेळ मिळेल तेव्हा शहरात ( कधीकधी दुसऱ्या शहरात , जवळच्या भागात ) जमून स्केचिंग करतो.

हे सोलीव सुख! पोलिश हे नवं रसायन तुमच्यामुळे पहायला, वाचायला खरं तर मिळतंय्...

छान लेख