आकाशवाणीत राष्ट्रीय साक्षरता मिशन

आकाशवाणीत काम करताना, अमूक योजनेवर कार्यक्रम करा, तमूक विषयाला प्रसिद्धी द्या - असे आदेश दिल्लीहून आले की, संबंधित क्षेत्रातल्या व्यक्तींना शोधून बोलवायचं आणि त्यांचं भाषण, मुलाखत प्रसारित करायचं, हे ठरलेलं. सरकारच्या आदेशाबरहुकूम असं काम करताना, त्यात सहसा यांत्रिकपणा येत जातो.

आकाशवाणीतल्या माझ्या काळात याला अपवाद ठरले, पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळातल्या योजना, निर्णय यावर केलेले कार्यक्रम. मतदानाचं वय २१ वरून १८ वर आणणं, आपल्याकडच्या शिक्षणपद्धतीला आधुनिक करणारं, ग्रामीण मुलामुलींना अधिक शिक्षणसुविधा देऊ करणारं त्यांचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि राष्ट्रीय साक्षरता मिशन. आकाशवाणीत, मी शिक्षणविषयक कार्यक्रम करत असल्याने या तीन्हींशी माझा संबंध आला.
साक्षरता मिशनला लोकांपर्यंत पोचवण्यासाठी नवा कार्यक्रम सुरू करायचं ठरलं आणि त्याला आकार द्यायची जबाबदारी आली. प्रौढ शिक्षण, साक्षरता हे वापरून गुळगुळीत झालेले शब्द होते. साक्षरता मिशन हे निरक्षरतेच्या समस्येकडे नव्या नजरेने बघत होतं. केवळ लिहिणं,वाचणं, सही करता येणं याच्या पलीकडचं बरंच काही होतं त्या उद्दिष्टांमध्ये. एकूण जगण्याला अर्थ देणारी ही साक्षरता होती. या नव्या कार्यक्रमाला नाव दिलं लोकजागर. साक्षरता म्हणजे काहीतरी ‘सरकारी’ असं म्हणून टीका करण्याची किंवा त्याकडे लक्षच न देण्याची आपली वृत्ती. तेव्हा, लोकजागर कार्यक्रम ‘सरकारी’ छापाचा असायला नकोच होता. या कार्यक्रमात निरक्षरांसह शिक्षित समाजाचा सहभागही अपेक्षित होता. योजना नवी, कार्यक्रम नवा. माझी पाटीही कोरीच. त्यामुळेच मी अगदी मुळातून विषय समजून घेत काम सुरू केलं. ते आदेश पाळण्यापुरतं राहिलंच नाही. मी त्यात गुंतत गेले. देशाची, मुंबईची साक्षरता हे माझंही मिशन होऊन गेलं.

आकाशवाणीत राष्ट्रीय साक्षरता मिशन

पूर्वतयारीसाठी दादर, वरळी, परळ, लालबाग इथल्या परिचयाच्या वस्त्यांमध्ये फिरताना जाणवलं की, निरक्षर स्त्रियांच्या शिकण्याच्या प्रेरणा फार प्रबळ आहेत. मुलांच्या शिक्षणावर लक्ष ठेवण्यासाठी, मुलांना चांगलं मोठं करण्यासाठी, मुलं शिकल्यावर अडाणीपणापायी आपली लाज जाऊ नये म्हणून, समाजात ताठ मानेने जगण्यासाठी, त्यांचा भाजीविक्रीसारखा व्यवसाय अधिक चांगला करता यावा अशा कारणांनी त्या शिकत होत्या. दादरच्या आगरबाजार परिसरात भेटलेल्या वारकरी बाईंनी सांगितलं – “मी गळ्यात तुळशीची माळ घातलीये. वारीला जाते. पण मला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही. ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. तर माउलींची ज्ञानेश्वरी वाचता यावी म्हणून मी शिकतेय.”

पुढे धारावी, चेंबूर परिसरात वस्त्यांमध्ये अनेक तरुण मुलं-मुली भेटली, आपापल्या आई-वडिलांना, शेजार्‍यांना साक्षर करण्याच्या ध्येयाने झपाटलेली. वस्त्यांमधल्या भटकंतीत कार्यक्रमाचे अनेक विषय सुचू लागले. लोकजागरचाच भाग म्हणून आकाशवाणीतर्फे शिक्षित-नवसाक्षर पत्रमैत्री असा उपक्रम सुरू केला. अनेक श्रोते सहभागी झाले. मी स्वतःसुद्धा नवसाक्षर स्त्रियांना पत्र लिहीत असे. स्वतःला पत्रं येणं, हा नवसाक्षरांना सन्मान वाटत असे. पत्र हा शिक्षितांच्या जगात प्रवेश मिळण्याचा परवानाच.

वस्त्यांमध्ये निरक्षर पुरुषसुद्धा मोठ्या संख्येने होते. पण बायांचा उत्साह उदंड. चेंबुर परिसरात वाशीनाक्याजवळ राष्ट्रीय केमिकल्स ऍंड फर्टिलायझर्सचा कारखाना. जवळच नागाबाबानगर, राहुलनगर, अशा वस्त्या. तिथल्याही शिकणार्‍या बाया आकाशवाणीत रेकॉर्डिंगला यायच्या. अशा शंभराहून अधिक नवसाक्षर बायांच्या मुलाखती मी घेतल्या. तोचतोपणा येऊ द्यायचा नाही, हे आव्हान असायचं. म्हणून आणखीच मजा यायची. ध्वनिमुदण झालं की नियमानुसार त्यांना मानधनाचा चेक द्यायचा असे. चेक घेताना पावतीवर सही करावी लागे. बायका सही हौसेहौसेने करत. सही करायला त्यांना जास्त वेळ लागे. परक्या माणसांपुढे आणि नवख्या वातावरणात क्वचित त्यांचा हात कापे. पण आता पूर्वीसारखा अंगठा द्यावा लागत नाही याचा आनंद आणि स्वतःविषयीचा अभिमान त्यांच्या चेहर्‍यावर वाहायचा.

एक साठीच्या पुढच्या बाई. कार्यकर्ते सांगायचे की त्या कायम पाटी पेन्सिल घेऊन लिहिताना, पुस्तक घेऊन अक्षरं लावताना दिसतात. याचं कारण त्यांनाच विचारलं. तर त्यांनी फार मोठं तत्वज्ञानच सांगितलं – “घरात मुलं, सुना यांची भांडणं सुरू असतात. आता मी या कटकटीत कशाला पडावं? दुसरा काही उद्योग नसला की, मलाही घरात तोंड वाजवावसं वाटतं. त्यापेक्षा हा शिकण्याचा उद्योग बरा.”

आकाशवाणीत राष्ट्रीय साक्षरता मिशन

लोकजागरच्या रेकॉर्डिंगसाठी असा गोतावळा आला की आकाशवाणीतले आमचे सिक्युरिटी गार्ड्स म्हणायचे – ही मेधामॅडमची माणसं. त्यांचं आणि माझं नातं असं जुळून गेलं. मैतरणीच त्या. या सगळ्याजणी मला भेटल्या, त्यांच्या ‘स्व’ ची ओळख होण्याच्या काळात. ‘स्व’ची जाणीव होणारी कोणतीही व्यक्ती सुंदरच दिसते. त्याही खूप उत्कट आणि सुंदर दिसायच्या.

माझ्याच लोकजागर कार्यक्रमाने माझी स्वतःचीच साक्षरता अशी वाढवली. आज, इथे राजीवचा फोटो, पोस्ट्स पाहिल्यावर या सर्व आठवणी घोंगावल्या. चक्क दोन जुने फोटोही सापडले. उमाळा वाटला. साक्षरता मिशनचे जनक म्हणून राजीव गांधींना या आठवणी समर्पित कराव्याशा वाटल्या.

- मेधा कुळकर्णी

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

अनुभव आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सरकारी काम असून सुद्धा त्या कामात तुम्ही स्वतःला झोकून दिले ह्या तुमच्या समर्पित वृत्तीला सलाम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान अनुभव

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0