एका (न झालेल्या) लग्नाची गोष्ट

नुकतंच खूप वर्षांनंतर आई-बाबांबरोबर मराठी नाटक पाहिलं. 'एका लग्नाची पुढची गोष्ट'. खरं तर हा दुग्धशर्करा योग होता. आई बाबांबरोबर निवांत वेळ, मराठी नाटक आणि त्यातही आवडत्या कलाकारांच्या आवडत्या सुप्रसिद्ध नाटकाचा पुढील भाग. पण का कुणास ठाऊक नाटक सुरू झाल्यावर काही वेळाने हळू हळू डोळे मिटायला लागले. सुरुवातीला वाटलं दमलो असेन. मग लक्षात आलं की दमण्याइतपत काही काम केलं नाहीय. मग जाणवलं की नाटकाची एकंदरीत प्रत्येक गोष्ट आवडली असली तरी विषयच आतपर्यंत भिडत नाहीय. घरी परत आल्यावर मात्र झोपताना खरंच विचारमग्न झालो. आणि एक गोष्ट ठळकपणे जाणवली.

माझ्या आजूबाजूला ऑफिसमध्ये, नातेवाईकांत, मित्रमैत्रिणीमध्ये शेकडो सांसारिक आप्तेष्ट आणि त्यांच्या संसारिक कथा असल्या तरी मला आता त्यात विशेष मन रमत नाही. म्हणजे गैरसमज नका हं करून घेऊ. अजूनही प्रत्येकाची माया आणि काळजी वाटतेच. अजूनही खुपजण माझ्याशी मन मोकळं करतात, सांसारिक अडचणी आणि आनंद सांगतात, अगदी भरभरून बोलतात. मलाही माझ्या आवडत्यांनी हलकं झालेलं आवडतं. तसे आता मी सल्ले द्यायचे टाळतोच. कारण मीच लग्न केलं नसल्याने

जोडीदार, मुलाबाळांच्या विषयांत बोलायचा मला हक्क काय हा प्रश्न मला कायम पडतो. शिवाय माझे निर्णय मी विशिष्ट परिस्थितीत, कारणांनी घेतो हे मला माहीत आहे. मग इतरांचे निर्णय मी माझ्या चष्म्यातून का पाहू असंही वाटतं.

पण कालच्या नाटकामुळे एक विचार मात्र टोचायला लागला. आपल्याकडे एकटी व्यक्ती तिच्यावरील संस्कारांमुळे, सहवासामुळे संसारी व्यक्तीच्या अडचणी समजावून घेते. बहुतांशी मदतही करते. पण संसारी व्यक्ती मात्र एकट्या व्यक्तीच्या अडचणी समजावून घेण्यात कमीच पडतात का? त्यांना नसलेला वेळ, एकटी व्यक्ती कायम मजेत किंवा एकलकोंडी असते असे गैरसमज, आणि आपल्या आजूबाजूस खूप कमी एकट्या व्यक्ती असल्याने एकंदरीत त्यांच्याविषयी बेफिकिरी ही कारणं असावीत का? दुसरं म्हणजे एकट्या व्यक्तीला पैशांची किंवा व्यावसायिक वाढीची आवश्यकताच काय हा ऍटिट्यूड. 'तू काय एकटा आहेस, वडिलांचं घर म्हणजे तुझंच घर, मग तुला जास्त पैशांची गरजच काय' हे प्रश्न तर कायम ऐकू येतात. बाबांनो, माझ्या गरजा मला ठरवू द्या तो हक्क तुम्हाला कोणी दिला? काम करताना मी कमी करतो का? तुम्ही तुमच्या वाढत्या गरजांचं स्पष्टीकरण तुमच्या बॉसला किंवा इतरांना देता म्हणून ते एकट्या व्यक्तीनेही द्यावं ही अप्रत्यक्ष अपेक्षा का? ज्याच्या गरजा आणि आकांक्षा त्यानेच ठरवाव्यात.

तुम्हाला आता खर्च जास्त असेल पण तुमच्या म्हातारपणी तुम्हाला जोडीदार, मुलं-नातवंडं सांभाळतील, माझं काय' असा वाद मीही घालू शकतो. पण झपाट्यानं बदलणारं समाजमन बघता प्रत्येकानेच आपापली तरतूद करावी असा हा काळ ! त्यात म्हातारपणी 'बॅकअप' नसेल तर गरज उलट जास्त नाही का? शिवाय भविष्यातली महागाई ही नक्कीच आजच्यापेक्षा जास्त भीषण असणार. तिसरं म्हणजे माध्यमं समाजमनाचा आरसा असतात असं म्हणतात. पण एकट्या व्यक्तींवर किती मालिका, सिनेमे, नाटकं, पुस्तकं आपल्या नजरेत आल्यात? घटस्फोट किंवा जोडीदाराचा मृत्यू होऊन एकट्या पडलेल्या व्यक्तींचे विषय हाताळले गेले. पण ठरवून एकटे राहणाऱ्या व्यक्तींचा विचार कलामाध्यमांत झालाय असं फारसं दिसत नाही.

राष्ट्रीय सर्वेक्षणं बघता एकट्या व्यक्तींची संख्या वाढतेय नक्की. त्याची अनेक करणेही आहेत. प्रत्येकजण आपापला मार्ग विचारांती निवडतो. काहींना कुटुंबाच्या समाजाच्या पगड्यामुळे ते सुचत नाही, ती संधी मिळत नाही तर काहींची हिंमत होत नाही. प्रत्येक एकट्या व्यक्तीला एकाच मापात तोलता येणार नाही. पण त्यांचे काही सामायिक विषय, गरजा, सुखदुःखं, अडचणी आहेत एवढी जाणीवही समाजाला झाली तर पुष्कळ. त्यांच्या मानसिक, शारीरिक, सामाजिक, आर्थिक गरजा सांसारिक व्यक्तींइतक्याच प्रखर असतात इतकच नाही तर त्या थोड्याअंशी वेगळ्याही असतात हे लोकांना कधी कळणार? 'तू एकटं रहायचं ठरवलंस ना मग भोग आता फळं' इतका कोता दृष्टीकोन ठेवू नये कारण 'तू लग्न करायचं ठरवलस ना मग भोग आता फळं' असं सांसारिक व्यक्ती एकमेकांना हिणवत नाहीत.

वीस वर्षांपूर्वी फारसा विचार न करता ज्या गोष्टी करत गेलो त्या आता पण कराव्यात किंवा होतीलच असं नाही हे कळलं. पण कुटुंबांशी, मित्रांशी, सहकाऱ्यांशी जोडून ठेवणाऱ्या जुन्यानव्या आवडी वाढवायला, शोधायला लागणार हे नक्की.

Single Person

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

विचार समजले. एकट्याच्या समस्या संसारी लोक जाणून घेण्याच्या तयारीत नसतात किंवा सहानुभूती मिळत नाही. खरंय.
बाकी म्हातारपण सुखाने / विना विवंचनेत जाणे हे प्रत्येकजणच इच्छितो. नशिबाचाच भाग अधिक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सल्ला किंवा इलाज मागितल्याखेरीज दिला तर तो फक्त विनोदासाठी देते.

मला मुलं नाहीत. माझ्या इतर काही मित्रमैत्रिणींना मुलं आहेत, काहींना नाहीत, काही तुमच्यासारखे एकटे आहेत. पण सगळ्यांची आयुष्यं, विचारपद्धती निराळ्या आहेत. बऱ्या अर्ध्याला मुलं नाहीत आणि त्याच्या बाबतीतही हेच म्हणेन.

लोक आपल्या अडचणी सांगतात तेव्हा त्यांना आपला सल्ला हवाच असतो; आपण त्यांच्या अडचणी सोडवणं अपेक्षित असतं, हे गृहितक मला उद्दामपणाचं वाटतं. बरेचदा त्या अडचणी वाटत नाहीत, माझं हे असं आहे, ह्याचं वर्णन वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

विचार मंथन आवडले.

पण संसारी व्यक्ती मात्र एकट्या व्यक्तीच्या अडचणी समजावून घेण्यात कमीच पडतात का? त्यांना नसलेला वेळ, एकटी व्यक्ती कायम मजेत किंवा एकलकोंडी असते असे गैरसमज

एकट्या व्यक्तींना "भोग आपल्या कर्माची फळे" मध्ये हिणवण्याचा हेतू नसून असूयेमुळे तो कंटेम्प्ट येत असेल. काही तडजोडी नाही, मस्तमौला आयुष्य. हवी ती पुस्तके वाचा, भटका, खा-प्या. एखाद्या कलेत मन गुंतवा परत पैशाचे नियोजन आपल्यावरती. बचत आपल्याला, हवी तितकी.
याउलट, लग्न झालेल्यांना बऱ्याच तडजोडी असतात. म्हणतात ना - शादी वोह लड्डू है खाये भी पछयताये ना खाये वोह भी पछताये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0